आर्य मासिक
"आर्य: अ फिलॉसॉफिकल रिव्ह्यू" हे ६४ पानांचे इंग्रजी मासिक होते आणि ते १९१४ ते १९२१ दरम्यान भारतात प्रकाशित होत होते. मीरा अल्फासा, पॉल रिचर्ड आणि श्रीअरविंद त्याचे संस्थापक होते. पुढे पहिल्या महायुद्धामुळे मीरा अल्फासा, रिचर्डस यांना फ्रान्सला परत जावे लागले. त्यामुळे नंतर या मासिकाची संपूर्ण जबाबदारी श्रीअरविंद यांनी सांभाळली. मुळात हे मासिक काढण्याची संकल्पना पॉल रिचर्ड (मीरा अल्फासा यांचे पती) यांची होती. माझ्या कार्याची बौद्धिक बाजू असे यातील लेखनाचे वर्णन करता येईल, असे श्रीअरविंद यांनी म्हटले होते.[१] वेदान्त तत्त्वज्ञान (वैदिक वेदान्त) जगासमोर नव्या परिभाषेत मांडणे हा याचा एक हेतू होता.[१]
| आर्य | |
|---|---|
| प्रकार | तत्त्वज्ञानात्मक मासिक |
| भाषा | इंग्रजी, फ्रेंच |
| संपादक | अरविंद घोष |
| खप | भारत, इंग्लंड, अमेरिका आणि फ्रान्स |
| स्थापना | १९१४ |
| पहिला अंक | १५ ऑगस्ट १९१४ |
| देश | भारत |
प्रारंभ आणि अखेर
[संपादन]दि. १५ ऑगस्ट १९१४ या दिवशी आर्य मासिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला. सात वर्षांनंतर म्हणजे दि. १५ जानेवारी १९२१ रोजी याचा अखेरचा अंक प्रकाशित झाला. [२] आपली सर्व ऊर्जा अध्यात्म-साधनेसाठी उपयोगात आणण्याची आवश्यकता श्रीअरविंद यांना जाणवली त्यामुळे त्यांनी हे मासिक बंद केले.[३]
संस्थापक
[संपादन]इ.स. १९१४ मध्ये मिसेस मीरा अल्फासा (उत्तरायुष्यातील श्रीमाताजी) आणि त्यांचे पती मि.पॉल रिचईस यांच्या समवेत योगी श्रीअरविंद यांनी आर्य या तत्त्वज्ञानात्मक मासिकाचे कार्य हाती घेतले. आर्यची इंग्रजी व फ्रेंच आवृत्ती एकाच वेळी प्रकाशित होत असे.
फ्रेंच आवृत्ती
[संपादन]श्रीअरविंद यांचे विचार, तत्त्वज्ञान फ्रान्समध्ये प्रसृत व्हावेत या हेतुने आर्य मासिकाची फ्रेंच आवृत्ती प्रकाशित होत असे. त्याचे नाव Revue de la Grande Synthèse असे होते.[२] त्यामध्ये श्रीअरविंद यांनी लिहिलेल्या लेखांचे भाषांतर फ्रेंचमध्ये मीरा अल्फासा करत असत.[४] परंतु पहिले महायुद्ध सुरू झाले आणि ७ अंकांनंतर फ्रेंच आवृत्ती बंद करावी लागली.[२]
लेखन
[संपादन]श्रीअरविंदांचे (अरविंद घोष) यांचे पुढे ग्रंथरूपाने प्रकाशित झालेले बहुतांशी सर्व साहित्य 'आर्य'मध्ये क्रमश: प्रकाशित होत असे. ते पुढीलप्रमाणे -
- Synthesis of Yoga (योगसमन्वय),
- Essays on the Gita (गीतेवरील निबंध),
- Isha Upanishad (ईश-उपनिषदावरील भाष्य),
- Life Divine (दिव्य जीवन),
- The foundation of Indian Culture (भारतीय संस्कृतीचा पाया),
- The secret of the Veda (वेदरहस्य)
- The ideal of human Unity (मानवी एकतेचा आदर्श)
सुमारे साडेसहा वर्षे म्हणजे इ.स. १९२१ पर्यंत हा अंक नियमितपणे प्रकाशित होत असे. मिसेस मीरा अल्फान्सा या फ्रान्सला परत गेल्यानंतर अंकाच्या ६४ पानांचे लिखाण करण्याची जबाबदारी श्रीअरविंद यांनी स्वीकारली होती. आर्य मासिकातील लेखन हे उच्च मनाच्या स्तरावरून झाले असल्याचे श्रीअरविंद यांनी नमूद केले आहे.[२]
कार्यालय
[संपादन]No.41 Rue Francois Martin, Pondicherry येथे आर्य मासिकाचे कार्यालय होते. मासिकाच्या संपूर्ण काळात श्रीअरविंद येथेच वास्तव्यास होते.[२] वर्गणीदारांच्या याद्या करणे, हिशोब सांभाळणे, आणि या मासिकाचे सर्वसाधारण प्रशासन सांभाळणे ही जबाबदारी मीरा पाहत असत. [५]
उपलब्ध अंक
[संपादन]पूरक वाचन
[संपादन]आर्य मासिकाची कहाणी[permanent dead link]
संदर्भ
[संपादन]- ^ a b "Arya: A Philosophical Review". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2025-01-23.
- ^ a b c d e Life of Sri Aurobindo by A.B.Purani
- ^ ए.बी.पुराणी (१९७०). Evening Talks with Sri Aurobindo,. पुडुचेरी: Sri Aurobindo Ashram Trust.
- ^ प्रभाकर नूलकर. श्रीअरविंद क्रांतिकारक व योगी. सोलापूर: कर्मयोगी प्रकाशन.
- ^ "Arya - Auroville Wiki". wiki.auroville.org.in. 2025-06-26 रोजी पाहिले.
