कपाली शास्त्री
टी.व्ही. कपाली शास्त्री (जन्म ३ सप्टेंबर १८८६ मैलापूर - मृत्यू १७ ऑगस्ट १९५३ पाँडिचेरी येथे) संस्कृत विद्वान, लेखक, अनुवादक आणि श्रीअरविंद यांचे अनुयायी होते. [१] [२]
चरित्र
[संपादन]शास्त्री यांचा जन्म १८८६ मध्ये मैलापूर, तामिळनाडू येथे पारंपरिक वैदिक कुटुंबात झाला. मद्रासमधील ओरिएंटल मॅन्युस्क्रिप्ट्स लायब्ररीत संस्कृतचे विद्वान असलेल्या त्यांच्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी संस्कृतचे प्राथमिक शिक्षण घरीच घेतले. शिक्षण पूर्ण केल्यानंतर मद्रास येथील हायस्कूलमध्ये ते संस्कृतचे शिक्षक झाले.
वयाच्या विसाव्या वर्षी ते रमण महर्षींचे प्रमुख शिष्य आणि विद्वान आणि कवी गणपती मुनी यांच्या प्रभावाखाली आले. मुनी यांनी त्यांचे ज्ञान शास्त्री यांच्याकडे दिले. नंतर ते वेदाध्ययन आणि तंत्रशास्त्राच्या अभ्यासात बुडून गेले आणि त्यांनी इंग्रजी, तमिळ, तेलगू आणि संस्कृतमध्ये पुस्तके आणि लेख प्रकाशित केले. रमण महर्षी - गणपती मुनी - कपाली शास्त्री - माधव पंडित अशी ज्ञानपरंपरा आहे. [३]
ते १९२९ मध्ये पाँडिचेरीला गेले आणि श्रीअरविंद आणि श्रीमाताजी ( मिरा अल्फासा ) यांचे अनुयायी झाले. त्यांनी श्रीअरविंदांच्या तत्त्वज्ञानाचा आणि लेखनाचा सखोल अभ्यास केला. विशेषतः श्रीअरविंद यांनी ऋग्वेदाचे जे विवेचन केले होते, त्याचा शास्त्री यांनी आपल्या अनेक पुस्तकांमध्ये विस्तृतपणे शोध घेतला. [४] [५] त्यांनी श्रीअरविंदांच्या काही महत्त्वाच्या ग्रंथांचे संस्कृत तसेच तमिळ आणि तेलगूमध्ये भाषांतर केले. [१]
शास्त्री यांचे १७ ऑगस्ट १९५३ रोजी पाँडिचेरी येथे निधन झाले.
निवडक ग्रंथसंपदा
[संपादन]इंग्रजी
[संपादन]- लाईट्स ऑन द वेदा
- साइडलाईट्स ऑन द तंत्र
- श्रीअरबिंदो: लाइट्स ऑन द टीचिंग्ज
- द महर्षी
- गॉस्पेल ऑफ द गीता
- ऋग भाष्य भूमिका
संस्कृत
[संपादन]- ऋग्वेद भाष्य (सिद्धांजना)
- मातृ-तत्त्व-प्रकाशा
- सावित्री
- अहनिकस्तव
तमिळ
[संपादन]- अग्नि सुक्तंगळ
- श्रीअरविंदर
- वेणीरा सुदारोली
तेलगु
[संपादन]- मात्र वक्कुलु
संदर्भ साहित्य
[संपादन]- पी. राजा (१९९३), माधव पु. पंडित. अ पीप इन्टू पास्ट. पाँडिचेरी, दिप्ती पब्लिकेशन्स, पृ.क्र.२१-२६
- एस. रानडे (१९९७), माधव पंडितजी . पाँडिचेरी, दिप्ती पब्लिकेशन्स, पृ.क्र.१०-११
- कवी योगी श्री कपाली शास्त्री, डॉ. के. वेंकटसुब्रमण्यन, कुलगुरू, पाँडिचेरी सेंट्रल युनिव्हर्सिटी यांचे उद्घाटनपर भाषण. मध्ये: माधव पंडित, सत्-संग, खंड-५, पाँडिचेरी १९८७, पृ.क्र.१५६-१६०