महाराजा सयाजीराव गायकवाड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सयाजीराव गायकवाड
Sayajirao Gaekwad III, Maharaja of Baroda, 1919.jpg
महाराज श्रीमंत तिसरे सयाजीराव गायकवाड, बडोदा संस्थानाचे अधिपती (चित्र: इ.स. १९१९)]]
Baroda flag.svg
बडोद्याचा ध्वज
अधिकारकाळ १८७५-१९३९
राज्यव्याप्ती गुजरात
राजधानी बडोदा
पूर्ण नाव गोपाळराव ऊर्फ सयाजीराव गायकवाड
जन्म ११ मार्च १८६३
कौळाणे, ता. मालेगांव (नाशिक जिल्हा)
मृत्यू ६ फेब्रुवारी १९३९
मुंबई
उत्तराधिकारी प्रतापसिंह गायकवाड
वडील खंडेराव सयाजीराव गायकवाड (दत्तक वडील)
आई जमनाबाई खंडेराव गायकवाड
पत्नी चिमणाबाई सयाजीराव गायकवाड
Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

महाराज श्रीमंत सयाजीराव खंडेराव गायकवाड (तिसरे), जन्मनाव गोपाळराव काशीराव गायकवाड, (जन्म : कौळाणे, ता. मालेगांव, नाशिक जिल्हा, ११ मार्च १८६३; - मुंबई, ६ फेब्रुवारी १९३९) हे इ.स. १८७५ ते इ.स. १९३९ सालांदरम्यान बडोदा संस्थानचे अधिपती होते. ते अत्यंत पुरोगामी वृत्तीचे, कर्तृत्ववान संस्थानिक (कारकीर्द - १८८१-१९३९) होते. बडोदा संस्थानातील प्रजेच्या कल्याणासाठी केलेल्या कार्याकरता ते विशेषत्वाने ओळखले जातात.

सयाजीरावांचे वडील खंडेराव महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्‍नी महाराणी चिमणाबाई ७ मे १८८५ रोजी निधन पावली. त्याच वर्षी २८ डिसेंबर रोजी खंडेरावांचा दुसरा विवाह झाला. त्यांची तीन तरुण मुलेही अकालीच मरण पावली. सयाजीराव ७६वर्षाचे होऊन निधन पावले.[१]

दिवाण सर टी. माधवराव यांनी सयाजीरावांना राज्यकारभाराचे शिक्षण दिले. २८ डिसेंबर १८८१ रोजी गादीवर आल्याबरोबर सयाजी रावांनी राज्याची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी उपाययोजना केल्या. प्रशासकीय जबाबदारीची विभागणी हे तत्त्व राज्यकारभारात लागू करून राज्ययंत्रणेत त्यांनी सुरळीतपणा निर्माण केला, सल्लागार नेमून कल्याणकारी योजना अंमलात आणल्या (१८८३),. न्यायव्यवस्थेत सुधारणा केल्या,. ग्रामपंचायतींचे पुनरुज्जीवन केले (१९०४); तसेच सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची योजना सुरू करून (१८९३) अल्पावधीतच ती सर्व राज्यभर लागू केली. संपूर्ण देशामध्ये मोफत आणि सक्तीचे शिक्षण लागू करणारे बडोदा संस्थान हे देशातील पहिले राज्य ठरले (१९०६). गरीब, गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या देऊन उच्च शिक्षणाची सोय केली. औद्योगिक कलाशिक्षणाकरिता ‘कलाभुवन’ ही संस्था स्थापन केली. त्यांनी ‘प्राच्य विद्यामंदिर’ या संस्थेच्या वतीने प्राचीन संस्कृत ग्रंथांचे संशोधन व प्रकाशन करण्यास उत्तेजन दिले. सयाजीरावांनी ‘श्रीसयाजी साहित्यमाला’ व ‘श्रीसयाजी बाल ज्ञानमाला’ या दोन मालांमधून उत्तम ग्रंथांची भाषांतरे प्रसिद्ध केली. त्यांनी संस्थानात गावोगावी वाचनालये स्थापन केली;. फिरत्या वाचनालयांचीही सोय केली. त्यांनी या काळामध्ये इंग्लंड अमेरिकेसारख्या देशांना भेट दिली. तेथील शिक्षण पद्धती आणि ग्रंथालय यांनी ते प्रभावित झाले. अशाच प्रकारची शिक्षण व्यवस्था आणि ग्रंथालये आपल्या देशातही निर्माण झाली पाहिजेत. या दृष्टीने त्यांनी विशेष प्रयत्न केले. त्यासाठी त्यांनी ग्रंथालय तज्ञ बॉर्डन यांना भारतामध्ये आमंत्रित केले. ते दहा वर्ष बडोदा संस्थानांमध्ये ग्रंथालय प्रमुख म्हणून कार्यरत होते. बॉर्डन यांच्या मार्गदर्शनाखाली बडोदा संस्थानात ग्रंथालयाचे जाळे निर्माण करण्यात आले संस्थानांमध्ये अनेक ग्रंथालये स्थापन करण्यात आली. फिरती ग्रंथालये, ग्राम ग्रंथालये सुरू झाली. महाराज सयाजीराव गायकवाड यांनी स्वतः ग्रंथालयशास्त्राचे शिक्षण घेतले होते. खऱ्या अर्थाने ते भारतीय ग्रंथालयशास्त्राचे जनक आहेत.

सामाजिक क्षेत्रात सयाजीराव गायकवाडांनी केलेली कामगिरीही त्यांच्या सामाजिक सुधारणेची साक्ष देणारी आहे. पडदापद्धती बंदी, बालविवाह बंदी, कन्याविक्रयबंदी, मिश्रविवाहाचा पुरस्कार, स्त्रियांना वारसा हक्क मिळवून देणे, अस्पृश्यतानिवारण, विधवाविवाह इ. सुधारणा प्रत्यक्ष अंमलात आणल्या. घटस्फोटासंबंधीचा कायदा हा सर्व भारतात पहिल्यांदाच त्यांनी जारी केला. हरिजनांसाठी अठरा शाळा काढल्या (१८८२). डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली आणि त्यांची संस्थानात उच्च पदावर नेमणूकही केली. सुधारणांच्या प्रत्यक्ष पुरस्कारामुळे त्यांना ‘राष्ट्रीय सामाजिक परिषदे’च्या अध्यक्षपदाचा मान मिळाला (१९०४).

बडोदे ही कलापूर्ण प्रेक्षणीय नगरी ठरली, याचे कारण त्यांनी बांधलेल्या सुंदर वास्तू. लक्ष्मीविलास राजवाडा, वस्तुसंग्रहालय, कलावीथी, श्री सयाजी रुग्णालय, नजरबाग राजवाडा, महाविद्यालयाची इमारत वगैरे वास्तूंनी बडोद्याची शोभा वाढविली आहे. महाराज सयाजीराव गायकवाड हे दातृत्वासाठी नेहमी तत्पर असत. सत्पात्री दान देण्यात ते नेहमीच अग्रेसर होते. हिंदुस्थानातील नव्हे तर जगातील अनेक गरजवंतांना त्यांनी उदार हस्ते मदत केली होती. ज्यावेळी पुत्रवत प्रेम असणारी त्यांची प्रजा संकटात असेल त्यावेळी त्यांचे दातृत्व आणि कार्य खूपच मोलाचे ठरलेले दिसून येते.

सयाजीराव प्रत्येक गोष्ट नियोजनपूर्वक करत हे नियोजन करत असताना ते नेहमीच दूरदृष्टी ठेवत. त्यांचे नियोजन आणि व्यवस्थापन नेहमीच उत्कृष्ट असे. महाराज अशा प्रकारची मदत करत असताना प्रजेला परावलंबी करण्यापेक्षा स्वावलंबी करण्याकडे त्यांचा मोठा कल असे. शंभर वर्षांपूर्वी महाराज सयाजीराव गायकवाड यांनी बडोदा आणि आजूबाजूच्या जिल्ह्यात आलेल्या पुरामुळे उद्भवलेल्या गंभीर संकटाचे उत्तम व्यवस्थापन करून जनतेला दिलासा प्राप्त करून दिला. या संकटात महाराजांनी संस्थानातील सर्व यंत्रणा कार्यरत केली. लोकांना मदत पोहोचवली. ते प्रजाहितदक्ष राजे होते. जनतेचे कल्याण हाच माझ्या जीवनाचा ध्यास आहे असे ते म्हणत. या विचारांप्रमाणे त्यांनी संपूर्ण आयुष्य प्रजेसाठी व्यतीत केले शिक्षणाचे महत्त्व या जाणत्या राजाने जाणले होते. अनेक सुधारणा करताना त्यांनी शिक्षणाला प्राधान्यक्रम दिला. शेतकरी वर्गाला त्यांनी दुष्काळ आणि अतिवृष्टी या काळात मदत केली

बडोद्यात १९२७ च्या जुलै महिन्यात गंभीर पूरस्थिती निर्माण झाली. यावेळी चार दिवसांमध्ये नेहमीपेक्षा जाऊ जास्त पाऊस पडला. यावेळी वाघोडियामध्ये ५५ इंच पावसाची नोंद झाली. एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे नदी-नाल्यांना महापूर आला. हे सर्व अचानक घडले. लोकांना आपला जीव वाचवण्यासाठी आपली घरेदारे जनावरे व साधनसंपत्ती सोडून पलायन करावे लागे.पूर्वी अशा संकटांची पूर्वसूचना देण्यासाठी यंत्रणा नव्हती. त्यामुळे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले. या काळात थोडीफार असणारी संपर्क यंत्रणा कोलमडली. कोणत्या भागात किती नुकसान झाले याची माहिती समजायला थोडा वेळ लागला. परंतु पुराची भीषणता आणि झालेली जीवित आणि वित्तहानी पाहता बडोद्यातील प्रशासन ताबडतोब कामाला लागले. या महापूरातून सर्वप्रथम प्रशासनाने वेगवेगळ्या भागात अडकलेल्या लोकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित केले आणि कमीत कमी हाणी कशी होईल याकडे लक्ष पुरवले. त्यासाठी उपाययोजना केल्या. लोकांबरोबर शेतकऱ्यांच्या जनावरांनाही सुरक्षित स्थळी हलवले. अधिकारी आणि अधिकारी नसलेल्या लोकांनी ही सर्व प्रकारच्या मदत कार्यात भाग घेतला. शहरात सर्वांनी मिळून काम केले. उपलब्ध असलेल्या सर्वच साधनांचा वापर करून स्थिती पूर्ववत करण्याचा प्रयत्न केला. निराधार आणि बेघर लोकांना तात्काळ मदत पुरवली. बडोदा शहर आणि इतर जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक इमारती आणि धर्मशाळा नागरिकांसाठी खुला करण्यात आल्या. लोकांना मदतीसाठी सरकारतर्फे तातडीने पन्नास हजार रुपये मंजूर करण्यात आले. प्रशासनाच्या या सहकार्यामुळे महाभयंकर पुराच्या काळातही लोकांना दिलासा मिळाला.

सयाजीराव गायकावाडांना प्रवासाची अत्यंत आवड होती व त्यांनी जगभर प्रवास केला. जेथे जेथे जे जे चांगले असेल, ते ते चोखंदळपणे स्वीकारून आपल्या संस्थानाची सर्वांगीण भरभराट करण्याचा त्यांनी सतत प्रयत्न केला. लंडनला भरलेल्या पहिल्या दोन गोलमेज परिषदांनाही ते हजर होते. लो. टिळक, बाबू अरविंद घोष या थोर नेत्यांशी त्यांचा घनिष्ठ संबंध होता. राष्ट्रीय आंदोलनाला त्यांचा अप्रत्यक्ष पाठिंबा होता, असे म्हटले जाते. ज्ञानवृद्धी, समाजसुधारणा व शिस्तबद्ध प्रशासन या सर्वच बाबतींत ते यशस्वी ठरले. ‘हिंदुस्थानातील शेवटचा आदर्श राजा’ या शब्दांत त्यांचे यथोचित वर्णन पंडित मदनमोहन मालवीय यांनी केले आहे. मुंबई येथे सयाजीरावांचे निधन झाले.

महाराजा सयाजीराव गायकवाड यांची चरित्रे[संपादन]

  • जाणता राजा महाराजा सयाजीराव गायकवाड (अजित पाटील)
  • महाराजा सयाजीराव : गाथा युगपुरुषाची (२५ खंडी चरित्र, संपादक बाबा भांड)
  • स्वातंत्र्यलढ्याचे पाठीराखे सयाजीराव गायकवाड (लेखक बाबा भांड)
  • आदर्श राजा सयाजीरावांच्या बडोद्यात डाॅ बाबासाहेब आंबेडकर ढसाढसा रडले (भीमराव सरवदे, औरंगाबाद,940466441)
  • डाॅ बाबासाहेब आंबेडकरांना महाराजा सयाजीराव गायकवाडांनी स्कॉलरशिप दिली होती का शैक्षणिक कर्ज?(भीमराव सरवदे, औरंगाबाद)
  • जेव्हा गुराखी राजा होतो (लेखक - निंबाजीराव पवार, राजहंस प्रकाशन)

लघुपट[संपादन]

  • ग्रेट मराठा सयाजीराव गायकवाड (लघुपटाचा कालावधी : अर्धा तास, दिग्दर्शक : नरेंद्र शिंदे, नागपूर)

हे सुद्धा पहा[संपादन]

  1. ^ भांड, बाबा (२०२१). सयाजीराव - चारित्र्यवान, निर्व्यसनी सार्वभौम राजा. औरंगाबाद: महाराजा सयाजीराव गायकवाड संशोधन व प्रशिक्षण संस्था. pp. ८-१०.