महिकावती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून  ?महिकावती

महाराष्ट्र • भारत
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जिल्हा पालघर
लोकसंख्या १६,२८९ (२०११)
भाषा मराठी
सरपंच मुकेश करबट
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• ४०१४०२
• +०२५२५
• एमएच४८
संकेतस्थळ: goo.gl/maps/qzV5jFzuJMH2
बोलीभाषा:वाडवळी भाषा,भंडारी भाषा, मांगेली भाषा


महिकावती ऊर्फ केळवा-माहीम ऊर्फ माहीम (पालघर) हे ठिकाण महाराष्ट्रातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील पालघर तालुक्यातील पालघर रेल्वे स्थानकापासून सुमारे ८ किलोमीटर (५ मैल) अंतरावर समुद्रकिनारी वसलेले एक गाव आहे.

प्रास्ताविक[संपादन]

मुख्यतः शेती व बागायती व्यवसाय असलेल्या या ठिकाणी नारळ, पोफळी, आंबा, फणस, केळी, पानवेल, चाफा, भोकर, रिठा, पांढरी व काळी जांभळे, करवंदे, पोफणीस उर्फ पपनस, बदाम, अननस, कारली, मिरची, कांदे, गवार, दुधी, शिराळे, भोपळा, पडवळ, हळद, आले, इत्यादी पिके घेतली जातात.

हे नगर देवळांसाठी खास प्रसिद्ध आहे कारण येथे फार पुरातन काळापासून राम मंदिर, लक्ष्मण, सीता, दत्त मंदिर, महिकावती मंदिर, कालिका मंदिर, व्यंकटेश मंदिर, शिव मंदिर,सिद्धेश्वर मंदिर, महेश्वरी मंदिर, मारुती मंदिर, सूर्य नारायण मंदिर , गणपती, इत्यादी देवदेवतांची मंदिरे आहेत आणि प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वर्षी भारतीय पंचांग तिथीनुसार यात्रा/पालखी सोहळा परंपरागत रीतीने साजरा होतो.

या महिकावती उर्फ माहीम नगराला फार थोर पुरुषांनी जन्म घेऊन पावन केलेले आहे. ब्रम्हीभूत अनिऋद्धेंद्र सरस्वती उर्फ केशवनाथ स्वामी महाराज[१] स्वामी प्रज्ञानंद सरस्वती ऊर्फ पूर्वाश्रमीचे दत्तात्रय नारायण कर्वे, ह.भ.प. शंकर वामन तथा सोनोपंत तथा मामासाहेब दांडेकर, केशवनाथ स्वामीचे वंशज भुवनेश कीर्तने ऊर्फ भुवनेश्वर महाराज, अशा अनेक संतमहंतानी माहीमनगरीला त्यांच्या पदस्पर्शाने पवित्र केले आहे.

महाराष्ट्रात जिवंत समाधी घेतलेली दोनच पुण्यस्थाने आहेत आणि त्यातील एक माहीमनगरीत केशवाश्रम येथे दत्तमंदिरात आहे. इसवी सन १८७३ साली ह्याच ठिकाणी ब्रह्मीभूत अनिऋद्धेंद्र सरस्वती उर्फ केशवनाथ स्वामी महाराजांनी जिवंत समाधी घेतलेली आहे.

नाव[संपादन]

माहीम उर्फ महिकावती हे नाव महिकावती या देवीवरून पडले आहे.

इतिहास[संपादन]

शके १०६० मध्ये चालुक्य राजाचा मांडलिक राजा गोवर्धन बिंब याने आपला भाऊ प्रताप बिंब यास दहा हजार घोडेस्वार देऊन उत्तर कोकणावर स्वारी करण्यास फर्माविले. त्याप्रमाणे त्याने प्रथम दमण व नंतर तारापूर घेऊन, शिरगाव मार्गे तो महिकावतीस आला.

सन १९१८ पर्यंत माहीम हा तालुका होता व पालघर हे एक छोटे खेडेगाव होते. सन १८९३ मध्ये आताची पश्चिम रेल्वे म्हणजे अगोदरची बीबीसीआय रेल्वे पालघरहून जात असल्याने पालघर रेल्वे स्थानक झाले.१८९० च्या सुमारास केळवा माहीमला प्लेग मलेरियाची भयंकर साथ आली व माहीम गावातील दांडेकर वगैरे श्रीमंत लोक पालघरला स्थायिक झाले व पालघर वाढू लागले.पालघरला रेल्वेचीही सोय असल्याने १० मार्च १९१८ साली माहीम तालुका कचेरी पालघरला हलविण्यात आली.सन १९२३ साली पालघर ग्रामपंचायत स्थापन झाली व माहीमचे महत्त्व पालघरला प्राप्त झाले.

भूगोल[संपादन]

माहीमच्या उत्तरेस शिरगाव तर्फे सातपाटी गाव आहे तर दक्षिणेस केळवे गाव आहे. पूर्वेस पालघर गाव तालुका व जिल्ह्याचे ठिकाण आहे. माहीमच्या पश्चिमेस अरबी समुद्र आहे.

माहीममध्ये दक्षिणेकडे फणसभट, पाटे,बाजार, शिपाळभट,नारळवाडी,रेवाळे, पोंडा, पूर्वेकडे आंबेडकरआळी, पाटीलवाडी, वागूळसार, हरणवाळी, पश्चिमेकडे गिलगोडी, खारोडी, पाणशेत,टेंभी व उत्तरेकडे पंगळदार,गदोडी, फारोडी,कंदोडी, शेत्रोडी,दुगारी,वडराई, साखरेपाडा तर मध्यभागी पाटलोडी, माच, लालभट, राऊतआळी, ब्राह्मणवाडी, वारेख, हालोडी, हरदोडी, मांगोळी, असे विभाग आहेत.

माहीम-मनोर राज्यमार्गावर मुख्यतः देवखोप, सज्जनपाडा, आदिवासीपाडा, चहाडे, कोकणेर, मासवण, काटाळे, निहे, नागझरी तर्फे बोईसर, गोवाडे,धुुुकटण ऊर्फ दुुुखटण, बहाडोली,खामलोळी वगैरे गावे लागतात

पालघर-बोईसर राज्यमार्गाने मोरेकुरण, दापोली,कोळगाव तर्फे पालघर, पंचाळी,उमरोळी,सरावली,बेटेगाव गावांना जाता येते.

[[शेकाट्या/शेकोट्या/शेकाटया हा स्थलांतरित पक्षी पालघर जिल्ह्यातील पालघर तालुक्यात माकुणसार, केळवे, माहीम, खारेकुरण येथील मिठागरात हल्ली दिसू लागला आहे.[२]

हवामान[संपादन]

माहीमला पावसाळ्यात - भरपूर प्रमाणात पाऊस, हिवाळ्यात - गुलाबी थंडी तर उन्हाळ्यात - फारच गरमी अनुभवायला मिळते.येथील हवामान भातशेती, बागायती, फळभाजी, फुलभाजी,नारळ, आंबा, केळी, फणस, जांब, काळी जांभुळ, पपई,पपनस, अननस,पानवेल,सुपारी,हळद, आले, टोमॅटो, कांदा,मिरची,हरभरा इत्यादी पिके व फळांसाठी फारच अनुकूल आहे. येथील मांगेले लोक मासेमारी करतात. मुख्यतः पापलेट, सरंगा, बोंबील, मांदेळी, सुरमई, रावस, कोलंबी हे मासे पकडले जातात. ह्याशिवाय निवटी, खरबी, शिसवी खरबी, काळा दामा, पोपटी, सिताडू, वरडोल्या, बोय, जिभटी, पोपा, घोडा, टोंगली, नाव्हेडा, चरबट, खरवड, मुरडी, शिंगाळी, अवरा, ढोंडेरा, काटी, वाव, पाला, खाजरी, कटला, शिडगुल, मोडका, कोती, चिंबोरी हे मासे पकडले जातात.

वाहतूक व्यवस्था[संपादन]

माहीमवरून पालघरला जाण्यासाठी एसटी बस मिळते.तसेच रिक्शासुद्धा दिवसभर उपलब्ध असतात.

नागरी सुविधा[संपादन]

माहीम ग्रामपंचायतीने प्रत्येक आळीत सार्वजनिक पाणी नळाची सुविधा उपलब्ध केलेली आहे. काही ठिकाणी व्यक्तिगत पाण्याची सोयसुद्धा आहे. ग्रामपंचायत मार्फत रस्ता, दिवाबत्ती, सार्वजनिक स्वच्छता, आरोग्यसुविधा पुरविण्यात आल्या आहेत. तसेच घाणपाण्याचा व पावसाळ्यात पडणाऱ्या पाण्याचा निचरा होण्यासाठी सिमेंटची गटारे बांधलेली आहेत. गावात बाजारात राष्ट्रीयकृत बँकेच्या दोन शाखा आहेत -१ बँक ऑफ बडोदा आणि २.देना बँक. शाखेच्या ठिकाणी दोन्ही बँकांची वेगवेगळी रोख पैशांची देवघेव करणारी स्वयंचलित यंत्रे आहेत. गावात बाजारात पोलीस चौकी आहे. सरकारी दवाखाना माहीम किल्ल्याच्या परिसरात आहे.गावात दोन रेशन दुकाने आहेत.गावात माहीम विविध कार्यकारी सहकारी संस्था, मर्यादित आहे.

लोकजीवन[संपादन]

हे मोठ्या आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात २४६२ कुटुंबे राहतात. एकूण १०३४३ लोकसंख्येपैकी ५०८६ पुरुष तर ५२५७ महिला आहेत. गावाची साक्षरता ७५.९४ टक्के आहे.पुरुष साक्षरता ८२.७९ आहे तर स्त्री साक्षरता ६९.३६ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या १०८२ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या १०.४६ टक्के आहे. मुख्यतः वाडवळ समाज, भंडारी समाज, मांगेला समाज आणि आदिवासी समाजातील लोक येथे राहतात. शेती, बागायती हा मुख्य व्यवसाय आहे.येथील लोक प्रामाणिक, कष्टाळू, अंगमेहनत करणारे, शांत, सुसंस्कृत, सुस्वभावी, आदरातिथ्यशील, संकटकाळी आपणहून मदत करणारे, धार्मिक प्रवृत्तीचे, उदारमतवादी आहेत. येथे वेगवेगळ्या पंथाचे लोक गुण्यागोविंदाने राहतात व गावाच्या विकासासाठी अहर्निश झटत राहतात.गावातील प्रत्येक देवता मंदिराची प्रत्येक वर्षी जत्रा भरत असते. गावातील सगळे लोक जत्रेत आवर्जून सहभागी होतात.

पूर्वी स्वयंपाक घरात पाटा,वरवंटा,खलबत्ता ह्यांचा वापर केला जात असे. हल्ली त्याऐवजी मिक्सर, ग्राइंडर वापरतात.पाटा,वरवंटा वापरून बनवलेली चटणी सरस, चवदार लागायची. ठेचण आणि वाटण ह्या दोन प्रक्रिया होतात. वापरून गुळगुळीत झालेल्या पाट्या वरवंट्याला परत टाके/टाचे मारावे लागत असत. ते काम पाथरवट करीत असत.

लोकांची वस्ती मुख्यतः गावठाण भागात आहे.जेथे वस्ती आहे त्या परिसराला आळी म्हटले जाते.येथे प्रत्येक आळीत विशिष्ट आडनावाची कुटुंबे पिढ्यानपिढ्या राहतात. उदाहरणार्थ : वर्तक,पाटील,ठाकूर आडनावाची दुगारी; पाटील आडनावाची गदोडी; ठाकूर,राऊत आडनावाची पंगळदार; राऊत आडनावाची लालभाट; राऊत, ठाकूर, पाटील आडनावाची माच; सावे,वर्तक आडनावाची हालोडीवारेख; पाटील आडनावाची पाटलोडी; पाटील आडनावाची गिलगोडी;इत्यादी. प्रत्येक आळीत एकाच कुटुंबातील माणसे असल्याने जरी ती विभक्त संसार करीत असली तरी लग्न, वाढदिवस, श्राद्ध, किंवा कुठल्याही कौटुंबिक कार्यक्रम असला की सर्व एकत्र येऊन एकमेकांच्या सहकार्याने साजरा करतात. गावात हिंदू आणि मुसलमान गुण्यागोविंदाने व सुखासमाधानाने राहतात.पूर्वी गावात सिधवा नावाचे पारशी कुटुंब सुद्धा होते. ते मुंबईत स्थायिक झाले.

हेसुद्धा पहा[संपादन]

केळवे; शिरगाव,एडवण,दांडा,माकुणसार,मधुकरनगर

संदर्भ[संपादन]

 1. उत्तर कोंकण सामाजिक जीवन आणि परंपरा : श्री.ल.राऊत.
 2. श्री सिद्धेश्वर मंदिर जीर्णोद्धार व प्राणप्रतिष्ठा महोत्सव स्मरणिका सोमवार २६/०१/२०१५ :जीर्णोद्धार समिती, माहीम, पालघर ४०१४०२.
 3. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html
 4. http://tourism.gov.in/india-tourism-development-corporation-itdc
 5. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html
 6. https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/
 7. http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036
 8. https://palghar.gov.in/
 9. https://palghar.gov.in/tourism/
 10. गुरुवर्य महाराज :माहीम शिक्षण संस्था, माहीम, ता.जि.पालघर,महाराष्ट्र.मुद्रक-आनंद प्रिंटींग प्रेस, पालघर.२७ डिसेंबर२००९.
 11. श्री सूर्यनारायण मंदिर शतक महोत्सव स्मरणिका:श्री सूर्यनारायण सेवा संघ, रजि. नं.ए११३ ठाणे, श्रीक्षेत्र के.माहीम, ता.जि.पालघर ४०१४०२.०४/०२/२००६.
 12. गुरू कृपा सुमनांजली:चंद्रकांत शंकरराव लोमटे,निवाळी रोड, सैफी कॉलनी, मु.पो. सेंधवा, जिल्हा बडवानी, म.प्र.४५१६६६.रामनवमी १३/०४/२००८.
 13. प्रसाद:मोरेश्वर रामचंद्र चौधरी, वासळई,वसई, जि.पालघर. चैत्र शुद्ध दशमी,१८९६.०२/०४/१९७४.
 14. आशापुरी माऊली :रमाकांत पाटील. प्रकाशन २१/०९/२०१४ पालघर तालुका मराठी साहित्य मंडळ, मु.पो.केळवे बीच, ता.जि.पालघर.४०१४०१.
 15. निर्माल्याच्या गंधामधुनी :भा.मु.राऊत माहीम, पालघर ४०१४०२.
 16. शतकोत्तर पंचवर्षिय सोहळा १९१३-२०१८,स्मरणिका माहीम विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादित, माहीम ४०१४०२.

बाह्य दुवे[संपादन]

 1. ^ #प्रसाद:मोरेश्वर रामचंद्र चौधरी, वासळई,वसई, जि.पालघर. चैत्र शुद्ध दशमी,१८९६.०२/०४/१९७४.
 2. ^ #महाराष्ट्र टाईम्स, वसई विरार पुरवणी, मंगळवार दिनांक १ आगस्ट २०२३