वाडवळ समाज
वाडवळ समाज महाराष्ट्रातील उत्तर कोकणातील समाज आहे. वडवळ या शब्दाची उत्पत्ती 'वाडी करणारे ते वाडवळ'अशी झाली असावी असे समाजातील जुनी वयस्कर माणसे म्हणतात. अशोक सावे यांच्या मते वाडवळ शब्दाची उपपत्ती वाडवडील या शब्दातून झाली.[ संदर्भ हवा ]
वाडवळ समाजाच्या कुलदेवता - एकविरा, वज्रेश्वरी, शितला देवी, महालक्ष्मी, मातृकी ऊर्फ महिकावती या आहेत. वाडवळ समाजाचा कुलदेव - खंडोबा देव आहे.
महिकावतीची बखर (लेखक - केशवाचार्य व इतर) हा प्राचीन दस्तऐवज आहे. बखरीत महिकावती राजधानी असलेल्या बिंब राजांचा इतिहास (वंशावळी) वर्णलेला आहे. बिंब राजे सोमवंशी व सूर्यवंशी क्षत्रिय राजे होते. ज्यांना वाडवळ असे संबोधले जाते ते त्यातील सोमवंशी राजांशी संबंधित आहेत. महिकावतीच्या बखरीबरोबर ‘बिंबाख्यान’ (लेखक - रघुनाथ पुतळाजी राणे), ‘अर्ली हिस्ट्री ऑफ बॉम्बे’ ‘उत्तर कोकणचा इतिहास’ (लेखक - पु. बा. जोशी), ओरिजिन ऑफ बॉम्बे (लेखक - डॉ. जी. द. कुन्हा) इत्यादी ग्रंथांमधून सोमवंशी क्षत्रियांचा इतिहास उपलब्ध होतो.