वडराई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

वडराई हे महाराष्ट्रातील एक गाव आहे.ते पालघर तालुक्यात व पालघर जिल्ह्यात येते.

नाव[संपादन]

या गावाचे नाव येथे असलेल्या वडाच्या राईमुळे पडलेले आहे.येथे सुमारे साठ सत्तर वर्षांपासून वीस ते पंचवीस वडाची झाडे मासेबाजार इमारतीच्या समोर आहेत.

जनजीवन[संपादन]

मुख्यतः मासेमारी करणारे मांगेली समाज आणि ताडी काढणारे भंडारी समाज ह्यांची येथे वस्ती आहे.मोलमजुरी करणाऱ्या आदिवासी समाजाचीसुद्धा तुरळक वस्ती येथे कायमस्वरूपात पाहायला मिळते.मासे विक्रीसाठी असलेल्या मासेमार्केटमध्ये सकाळी व संध्याकाळी मासे बाजार भरतो. मार्केटच्या बाहेर फुले, फळे, पालेभाज्या, फळभाज्या, फुलभाज्या ह्यांचा बाजार भरतो. तसेच बाहेर फेरीवाले चणे,वाटाणे,शेंगदाणे,बटाटावडा, कांदाभजी,सरबत,लिंबूउसाचा रस विकत असतात.

मासेमारी करणारे लोक हे भरतीच्या वेळेनुसार सकाळी होडीतून खोल समुद्रात जातात तेथे नांगर टाकून दिवसभर मासे पकडून पुन्हा भरतीच्या वेळेनुसार दुसऱ्या दिवशी सकाळी किंवा दुपारी परत येतात. होडी आल्यानंतर लगेच घरातील स्त्रिया व पुरुष मासे घरी आणून ताबडतोब त्याची मासेप्रकारानुसार विभागणी करतात व विक्रीसाठी मासेबाजारात जातात. मासे हे शीघ्र नाशिवंत असल्यामुळे काही स्त्रिया टोपलीत मासे घेऊन घरोघरी विकण्यासाठी जातात. ताडी काढणारे लोक सकाळी व संध्याकाळी अशी दिवसातून दोनदा ताडाची ताडी काढतात. ताडी काढण्यासाठी ताडाच्या झाडावर मडके बांधून ठेवतात ज्यामध्ये संध्याकाळ पासून जमलेली ताडी सकाळी काढतात व सकाळपासून जमलेली ताडी संध्याकाळी काढतात. हीं ताडीची मडकी वेळोवेळी धुऊन साफ करावी लागतात.

आदिवासी समाजातील लोक शेतमजुरी, बागायती कामगार, कंत्राटी कामगार अथवा होडीवर खलाशी म्हणून काम करतात.

नागरी सुविधा[संपादन]

ग्रामपंचायतीने मासे विक्रीसाठी अद्ययावत मार्केट बांधून दिलेले आहे तसेच उर्वरित मासे सुकविण्यासाठी समुद्रकिनारी ओटे बांधलेले आहेत.माहीम ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक पाणीपुरवठा, स्वच्छता, वीजबत्ती, आरोग्यसेवा उपलब्ध केलेली आहे.पालघर वडराई एसटी बसचा हा अंतिम थांबा आहे.

संदर्भ[संपादन]

https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html

२.

http://tourism.gov.in/india-tourism-development-corporation-itdc