कोकणेर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कोकणेर हे महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यातील गाव आहे. हे प्राचीन काळापासून प्रसिद्ध तीर्थस्थान आहे. पालघर रेल्वे स्थानकापासून मनोरच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याने गेल्यावर वाघोबा खिंड सोडल्यानंतर डावीकडे फुटणाऱ्या फाट्यावर हे गाव १२ किमी अंतरावर आहे.

  ?कोकणेर

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जिल्हा पालघर
लोकसंख्या १,१६६ (२०११)
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• ४०१४०४
• +०२५२५
• महा ४८

ऐतिहासिक पार्श्वभूमी[संपादन]

हे सूर्या नदीकाठी वसलेले ऐतिहासिक वारसा असलेले गाव आहे. गावात पुरातन शंकराचे मंदिर आहे. गावातून वाहणाऱ्या सूर्या नदीच्या तीरावर गरम पाण्याचे झरे आहेत आणि त्याभोवती दगडी कुंडे बांधलेली आहेत.परंतु ही कुंडे वसई-विरार महानगरपालिका क्षेत्राला पाणी पुरवठा करण्यासाठी बांधलेल्या बंधाऱ्यामुळे साचलेल्या पाण्याखाली गेली आहेत. महाशिवरात्रीला आणि मकरसंक्रांतीला येथे मोठी यात्रा भरते. येथे घरासाठी खोदकाम करताना पोलीस पाटील श्री. विलास गजानन पाटील ह्यांना प्राचीन धेनुगळ शिळा सापडली.आजतागायत धेनुगळ शिळा पालघर जिल्ह्यातील माहीम ऊर्फ महिकावती, केळवे,निर्मळ, डहाणू, तारापूर ह्या ठिकाणी प्राप्त झालेल्या आहेत.

लोकजीवन[संपादन]

कोकणेरमध्ये मुख्यतः कुणबी व आदिवासी राहतात. शेती-बागायती हा त्यांचा मुख्य व्यवसाय असून ते भात,नागली, व काकडी, दुधी, ह्यांचे उत्पन्न घेतात; नदीत जाळी टाकून मासेमारी करतात. जंगल परिसरात अल्पप्रमाणात शेळी बकरी यांचे पालन केले जाते. येथील लोक फक्त घरगुती वापरासाठी कोंबड्या पाळतात. गावात पुरातन काळापासूनचे एक शंकराचे देऊळ आहे; सूर्या नदीच्या पात्रात गरम पाण्याची दोन कुंडे आहेत. प्रत्येक वर्षी महाशिवरात्रीला येथे मोठा उत्सव होतो. येथे भरपूर प्रमाणात रानभाज्या मिळतात. खरशिंग,करडू,बाफली,पेंढर, बांबूशिंद,कवळ, खुरासनीचा पाला, लोत, शेवळी, उडदाचा पाला, काकड, रानचिकू, आभईची शेंग, अळबी, आंबट बिबली, माड, चावा वेल,टेरा, कर्टुलं,लोथी, सतरा, हळंदा, शेवळे,कोरड, टाकळा, शेवगा, तेरे, कुडाची फुलं, घोळ, कोळू, रताळ्याचे कोंब, टेंभरण, मोहदोडे,नारळी, मोखा, चायवळ, वांगोटी, भोपा, बोंडारा, रानकेळी, भारंगा ह्या काही रानभाज्या आहेत. ह्या भाज्या मुख्यतः पावसाळ्यात होतात.ह्या भाज्या पोटाचे विकार, खोकला आणि इतर तत्सम आजारावर गुणकारी असतात. आदिवासी समाज बांधवांना त्याची चांगली समज असते. तारपा नृत्य आणि वारली रंगकला हे आदिवासी समाजाचे अविभाज्य भाग आहेत.

नागरी सुविधा[संपादन]

कोकणेरची ग्रामपंचायत ही सार्वजनिक स्वच्छता, दिवाबत्ती, पाणीपुरवठा व आरोग्यसेवा पुरवते. पालघर रेल्वे स्थानकापासून निघून मासवण, काटाळे, मनोर तसेच मनोरपुढे जाणाऱ्या एसटी बसेस कोकणेर फाट्यावर थांबतात. तेथून १ किमी पायी चालत कोकणेरला पोचता येते. महाशिवरात्रीच्या दिवशी यात्रेसाठी पालघर रेल्वे स्थानकापासून खास एसटी बसेसची सोय असते.

संदर्भ[संपादन]

 1. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html
 2. http://tourism.gov.in/india-tourism-development-corporation-itdc
 3. https://villageinfo.in/
 4. https://www.census2011.co.in/
 5. http://tourism.gov.in/
 6. https://www.incredibleindia.org/
 7. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
 8. https://www.mapsofindia.com/
 9. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
 10. https://www.weather-atlas.com/en/india-climate
 11. महाराष्ट्र टाईम्स शुक्रवार,५ मार्च २०२१.