Jump to content

होळकर स्टेडियम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(होळकर क्रिकेट स्टेडियम या पानावरून पुनर्निर्देशित)
होळकर क्रिकेट मैदान
मैदान माहिती
स्थान रेस कोर्स मार्ग, इंदूर, मध्यप्रदेश
स्थापना १९९०
आसनक्षमता ३०,०००
मालक मध्य प्रदेश क्रिकेट संघटन
प्रचालक मध्य प्रदेश क्रिकेट संघटन
यजमान मध्य प्रदेश

आंतरराष्ट्रीय माहिती
एकमेव क.सा. ८-१२, ऑक्टोबर २०१६:
भारत  वि. न्यूझीलंड
प्रथम ए.सा. १५ एप्रिल २००६:
भारत वि. इंग्लंड
अंतिम ए.सा. २४ सप्टेंबर २०२३:
भारत वि. ऑस्ट्रेलिया
यजमान संघ माहिती
मध्य प्रदेश क्रिकेट संघ (१९९०-सद्य)
कोची टस्कर्स केरळ (२०११)
शेवटचा बदल २४ नोव्हेंबर २०१६
स्रोत: होळकर क्रिकेट मैदान, क्रिकइन्फो (इंग्लिश मजकूर)

होळकर क्रिकेट मैदान हे इंदूर, मध्य प्रदेश येथील क्रिकेट मैदान आहे. आधी हे मैदान महाराणी उषाराजे ट्रस्ट क्रिकेट मैदान म्हणून ओळखले जात असे. पण २०१० साली, मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनने इंदूरवर राज्य करणाऱ्या मराठ्यांचे राजघराणे होळकर यांच्या नावावरून ह्या मैदानाचे नामकरण केले.

मैदानाची आसनक्षमता ३०,००० प्रेक्षक इतकी आहे. रात्रीच्या सामन्यांसाठी मैदानावर प्रकाशझोताची व्यवस्था आहे.[ संदर्भ हवा ] विरेंद्र सेहवागने एकदिवसीय इतिहासातील तिसरी सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्या २१९ ह्याच मैदानावार नोंदविली.[] ग्वाल्हेर स्थित कॅप्टन रूप सिंग मैदान, हे मध्य प्रदेशामधील आणखी एक आंतरराष्ट्रीय मैदान आहे, परंतु ते इंदूरच्या होळकर क्रिकेट मैदानापेक्षा थोडे लहान आहे.[] परंतु कॅप्टन रूप सिंग मैदानाची क्षमता होळकर क्रिकेट मैदानापेक्षा जास्त आहे.

रणजी करंडक स्पर्धेचे मध्य प्रदेश क्रिकेट संघाचे अनेक सामने ह्या मैदानावर खेळवले जातात. सदर मैदानाची भारताच्या सहा नवीन कसोटी स्थळांपैकी एक म्हणून निवड झाली आहे. भारत-न्यू झीलंड कसोटी मालिकेतील ८ ऑक्टोबर २०१६ रोजी सुरू झालेली तिसरी कसोटी हा ह्या मैदानावरील पहिला कसोटी सामना होता. भारतातील हे बावीसावे कसोटी मैदान आहे.

इतिहास

[संपादन]

मैदानासाठी जमीन देण्याचे श्रेय जाते ते मराठा राज्याच्या होळकरांकडे. इंदूर राज्यावर राज्य करणाऱ्या मराठा घराण्याने देशाच्या ह्या भागात क्रिकेटचा पाया रोवला आणि लोकांना प्रवृत्त केले. होळकर क्रिकेट संघ रणजी करंडकाच्या दहा मोसमात सहभागी झाला होता त्यापैकी आठ वेळा अंतिम फेरीत पोहोचला आणि चार वेळा संघाने रणजी करंडक जिंकला होता.

ह्या मैदानाच्याच काही भागात ते स्टेडियम वसलेले आहे जेथे ४० च्या दशकाच्या उत्तरार्धात आणि ५० च्या दशकाच्या सुरुवातीला होळकर क्रिकेट संघाने तीन रणजी करंडक जिंकले होते. एका अर्थी ह्या मैदानाच्या काही भागाने सी.के. नायडू आणि मुश्ताक अलीसारख्या दिग्गज खेळाडूंना रणजी करंडक स्पर्धेमध्ये खेळताना पहिले.

मैदानावर तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने झाले आहेत, ज्यापैकी दोन भारत आणि इंग्लंड दरम्यान झाले. पहिला सामना १५ एप्रिल २००६ रोजी झाला, ज्यामध्ये भारताने २८९ धावांचा यशस्वी पाठलाग करून मालिका ५-१अशी जिंकली. त्यानंतर जवळ जवळ अडीच वर्षांनंतर इंग्लंड संघ भारताच्या दौऱ्यावर आला असताना दुसरा सामना खेळवला गेला, ज्यामध्ये पुन्हा भारताने विजय मिळवला.

१३ मे २०११ रोजी मैदानावर आयपीएलचा पहिला सामना खेळवला गेला. कोची टस्कर्स केरळ संघाचे ७ पैकी २ सामने ह्या मैदानावर खेळवण्यात आले. विरेंद्र सेहवागने मर्यादित षटकांच्या सामन्यामधील २१९ धावांचा सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम वेस्ट इंडीज विरुद्ध ८ डिसेंबर २०११ रोजी ह्याच मैदानावर केला, जो नंतर रोहित शर्मा ने मोडला.

नोव्हेंबर २०१५ मध्ये, सदर मैदान आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटच्या भारतातील सहा नवीन मैदानांपैकी एक म्हणून निवडले गेले. इतर स्थळांमध्ये महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, जेएससीए आंतरराष्ट्रीय मैदान संकुल, सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मैदान, हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन मैदान आणि डॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी एसीए-व्हिडीसीए क्रिकेट मैदान ह्या मैदानांचा समावेश होता.[]

होळकर क्रिकेट मैदानावर पहिला कसोटी सामना न्यू झीलंडचा संघ भारत दौऱ्यावर असताना ऑक्टोबर २०१६ मध्ये खेळवला गेला.[] भारताने चौथ्या दिवशी न्यू झीलंडचा ३२१ धावांनी पराभव करून न्यू झीलंडला मालिकेमध्ये ३-० असा व्हाईटवॉश दिला.

मैदानाबद्दल

[संपादन]

सध्या हे मैदान मुख्यत्वे क्रिकेट सामन्यांसाठी वापरले जाते. सदर मैदान २००३ मध्ये बांधले गेले आणि त्याची आसनक्षमता ३०,००० इतकी आहे. दिवस-रात्र क्रिकेटसाठी मैदानावर प्रकाशदिव्यांची सोय आहे. शिवाय मैदानावर पाण्याचा निचरा होण्यासाठीची भारतातील एक सर्वोत्तम सुविधा उपलब्ध आहे. भारतीय संघ आजवर ह्यामैदानावर सर्वच्या सर्व चार एकदिवसीय आणि एक कसोटी सामने जिंकून अजिंक्य राहिला आहे.

मैदानावरील ठिकाणांची नावे

[संपादन]

२०११ मध्ये, मैदानातील पॅव्हिलियन, ड्रेसिंग रुम, स्टँड्स/गॅलरी ह्यांचे नामकरण करण्यासाठी एक समिती नेमली गेली. ह्या समितीचे अध्यक्षपद, क्रिकेट समिक्षक आणि लेखक सूर्य प्रकाश चतुर्वेदी ह्यांच्याकडे दिले गेले. समितीच्या शिफारसींनुसार खालील प्रमाणे नावे दिली गेली:

मैदानावर खेळवले गेलेले कसोटी सामने

[संपादन]

२०१६-१७ मध्ये न्यू झीलंडचा संघ भारताच्या दौऱ्यावर असताता, ८ ऑक्टोबर २०१६ रोजी, होळकर मैदानावर पहिला कसोटी सामना झाला.

आजवर मैदानावर झालेल्या कसोटी सामन्यांची यादी खालीलप्रमाणे:

दिनांक संघ १ संघ २ विजयी संघ फरक धावफलक
८ – ११ ऑक्टोबर २०१६ भारतचा ध्वज भारत न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड भारतचा ध्वज भारत ३२१ धावांनी धावफलक

मैदानावर खेळवले गेलेले एकदिवसीय सामने

[संपादन]

आजवर मैदानावर झालेल्या आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांची यादी खालीलप्रमाणे:[]

दिनांक संघ १ संघ २ विजयी संघ फरक धावफलक
१५ एप्रिल २००६ भारतचा ध्वज भारत इंग्लंडचा ध्वज इंग्लंड भारतचा ध्वज भारत ७ गडी राखून धावफलक
१७ नोव्हेंबर २००८ भारतचा ध्वज भारत इंग्लंडचा ध्वज इंग्लंड भारतचा ध्वज भारत ५४ धावांनी धावफलक
८ डिसेंबर २०११ भारतचा ध्वज भारत वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज भारतचा ध्वज भारत १५३ धावांनी धावफलक
१४ ऑक्टोबर २०१५ भारतचा ध्वज भारत दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका भारतचा ध्वज भारत २२ धावांनी धावफलक

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Virender Sehwag scores a double hundred; breaks Sachin Tendulkar's record". Cricket Country (इंग्रजी भाषेत). 2011-12-08. 2018-09-15 रोजी पाहिले.
  2. ^ "Sachin Tendulkar's knock was slightly better, says MPCA curator". India Today (इंग्रजी भाषेत). 2018-09-15 रोजी पाहिले.
  3. ^ "BCCI revamps selection committee, announces new Test centres". Cricinfo (इंग्रजी भाषेत). 2018-09-15 रोजी पाहिले.
  4. ^ "BCCI ushers in big home season: 13 Tests, six new venues". Cricinfo (इंग्रजी भाषेत). 2018-09-15 रोजी पाहिले.
  5. ^ "'This is the most energetic Test crowd I have ever seen anywhere in the world'". Cricket Country (इंग्रजी भाषेत). 2016-10-12. 2018-09-15 रोजी पाहिले.
  6. ^ "The guy who keeps Hindi commentary alive in cricket". Rediff. 2018-09-15 रोजी पाहिले.
  7. ^ "होळकर क्रिकेट मैदान, इंदूर / नोंदी / आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने / सामना निकाल". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २५ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.