गुर्जर-प्रतिहार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Disambig-dark.svg
गुर्जर-प्रतिहार साम्राज्य
[[चित्र:| px]]

Indian Kanauj triangle map.svg
इ.स. ७३० - इ.स. १०१९
राजधानी कनौज
राजे इ.स. ७३० ते इ.स. ७५६: नागभट्ट
इ.स. ७७८ ते इ.स. ८०५: वत्सराज
इ.स. ८०५ ते इ.स. ८३३: नागभट्ट दुसरा
इ.स. ८३६ ते इ.स. ८८५: मिहीर भोज
इ.स. ८८५ ते इ.स. ९१०: महेंद्रपाल
भाषा संस्कृत
क्षेत्रफळ १८,००,००० चौ. कि.मी. वर्ग किमी

गुर्जर-प्रतिहार (इ.स. ७३० ते इ.स. १०१९) हा भारतामध्ये असलेला राजपुतांचा प्रभावी असा एक राजवंश होता. कनौज ही प्रतिहार साम्राज्याची राजधानी होती.[१] [२] [३]

स्थापना[संपादन]

हरिश्चंद्राने राजस्थानातील जोधपूर येथे गुर्जरवंशाची स्थापना केली. त्यानंतर राजस्थानात त्यांच्या अनेक शाखा स्थापन झाल्या. त्यापैकी पहिल्या नागभट्टाने इ.स. ७३० मध्ये मध्यप्रदेशातील अवंती येथे प्रतिहार घराण्याचे स्वतंत्र राज्य स्थापन केले.

राज्यकर्ते[संपादन]

नागभट्ट (इ.स. ७३० ते इ.स. ७५६)[संपादन]

मुख्य पान: नागभट्ट पहिला

प्रतिहारांचे स्वतंत्र राज्य स्थापन करणारा नागभट्ट हा सुरूवातीला राष्ट्रकुटांचा मांडलिक होता. याने जोधपूर व नंदपूरच्या प्रतिहारांचा प्रदेश जिंकून घेतला. राष्ट्रकूट राजा दंतिदुर्ग याच्याशीही त्याने प्रतिकार केला होता. राजपुताना, गुजरात, व माळव्याचा बराच भाग याने आपल्या राज्याला जोडला होता. नागभट्टाने इ.स. ७३० ते इ.स. ७५६ पर्यंत राज्य केले. त्यानंतर कक्कूक, देवराज व वत्सराज हे गादीवर आले.

वत्सराज (इ.स. ७७८ ते इ.स. ८०५)[संपादन]

नागभट्टानंतर वत्सराज हा गुर्जर-प्रतिहार घराण्यातील कर्तबगार राजा होऊन गेला. त्याने इ.स. ७७८ ते इ.स. ८०५ पर्यंत राज्य केले. वत्सराजाने राजपुताना हा प्रांत जिंकून घेतला होता. राष्ट्रकूट राजा ध्रुव याने वत्सराजावर आक्रमण करून त्याचा भीषण पराभव केला होता.

नागभट्ट दुसरा (इ.स. ८०५ ते इ.स. ८३३)[संपादन]

वत्सराजानंतर त्याचा मुलगा नागभट्ट दुसरा हा सत्ताधीश झाला. त्याने इ.स. ८०५ ते इ.स. ८३३ पर्यंत राज्य केले. याने चक्रायुधाचा पराभव करून कनौज जिंकून घेतले होते.

मिहीर भोज (इ.स. ८३६ ते इ.स. ८८५)[संपादन]

मिहीर भोज हा प्रतिहार घराण्यातील सर्वश्रेष्ठ सम्राट होता. कारकिर्दीच्या सुरूवातीला त्याला अनेक शत्रूंशी सामना करावा लागला. बंगालमधल्या देवपालाने त्याचा पराभव केला. राष्ट्रकूट राजा दुसर्या ध्रुवानेही त्याच्यावर स्वारी केली. कलचुरी राजा कोक्कलाकडूनही त्याला पराभव स्विकारावा लागला. या आक्रमणांनी खचून न जाता त्याने परत बंगालच्या देवपालावर आक्रमण करून त्याला पराभूत केले व राष्ट्रकूटाच्या कृष्णाचाही पराभव केला आणि माळवा, गोरखपूर, सौराष्ट्रबुंदेलखंडावर आपले प्रभुत्व प्रस्थापित केले. मिहीर भोजाने कनौज ही प्रतिहार साम्राज्याची राजधानी केली.

महेंद्रपाल (इ.स. ८८५ ते इ.स. ९१०)[संपादन]

महेंद्रपाल हा मिहीरभोजाचा मुलगा होता. त्याने इ.स. ८८५ ते इ.स. ९१० पर्यंत राज्य केले. याने सुरूवातीला मगध व उत्तर बंगालवर प्रभुत्व प्रप्त केले, सौराष्ट्राचाही भाग आपल्या ताब्यात घेतला पण नंतर काश्मीरच्या राजाने आक्रमण करून महेंद्रपालाचे काही प्रदेश जिंकून घेतले.

महिपाल (इ.स. ९१२ ते इ.स. ९४४)[संपादन]

महिपालाच्या कारकिर्दीत राष्ट्रकूट राजा तिसरा इंद्र याने प्रतिहार साम्राज्यावर आक्रमण करून बराच मोठा प्रदेश जिंकून घेतला आणि राजधानी कनौजचाही विध्वंस केला.

इतर राजे[संपादन]

महिपालानंतर महेंद्रपाल दुसरा, देवपाल, विनायकपाल दुसरा, महिपाल दुसरा, विजयपाल, राज्यपाल, त्रिलोचनपाल व यशपाल हे गुर्जरवंशी राजे वारसदार बनले.

शेवट[संपादन]

राष्ट्रकूट राजा तिसरा इंद्र याने प्रतिहार साम्राज्यावर केलेल्या आक्रमणामुळे गुर्जरांची सत्ता दुर्बल झाली. याचा फायदा घेऊन बंगालमधल्या पालांनीही सोम नदीपर्यंतचा मुलुख आपल्या ताब्यात घेतला. महिपालानंतर इतर राजपुतांनी आक्रमणे करून प्रतिहारांचे राज्य जिंकून घेतले. चंदेल्ल वंशीयांनी कनौज जिंकले. परमार, चालुक्य, गुहिलोत या राजपूत घराण्यांनी प्रतिहार साम्राज्य वाटून घेतले. त्याचवेळी इ.स. १०१९ मध्ये गझनीच्या महमूदाने त्रिलोचनपालाला पूर्ण पराभूत केले व गुर्जर सत्ता पूर्णपणे नामशेष झाली.

हे ही पहा[संपादन]

संदर्भ व नोंदी[संपादन]

  1. कल्के हेरमन; रॉदरमंड डाइटमँड (इ.स. २००४). अ हिस्ट्री ऑफ इंडिया (इंग्रजी मजकूर) (४ थी आवृत्ती.). रूटलेग. pp. ४३२. आय.एस.बी.एन. 0-415-32920-5. २१ डिसेंबर, २०११ रोजी पाहिले. 
  2. मुजुमदार रमेशचंद्र (इ.स. १९५४). द हिस्ट्री अँड कल्चर ऑफ द इंडियन पीपल:द क्लासिकल एज (इंग्रजी मजकूर). जी ॲलन अँड अलविन. २१ डिसेंबर, २०११ रोजी पाहिले. 
  3. चोप्रा प्राणनाथ (इ.स. २००३). अ काँम्रेहेन्सिव्ह हिस्ट्री ऑफ एंशंट इंडिया (इंग्रजी मजकूर). स्टर्लिंग पब्लिशर्स. pp. १९६. आय.एस.बी.एन. 81-207-2503-4. २१ डिसेंबर, २०११ रोजी पाहिले.