Jump to content

पल्लव वंश

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(पल्लव या पानावरून पुनर्निर्देशित)

इसवी सनाच्या चौथ्या शतकाच्या सुरुवातीला शिवस्कंदवर्मा या पल्लव राजाने कृष्णेपासून पेन्नेरू नदीपर्यंतचा प्रदेश जिंकून आपल्या अधिपत्याखाली आणला. त्याच्यानंतरच्या विष्णूगोप या कांचीच्या पल्लव राजाचा समुद्रगुप्ताने पराभव केला. पुढे दिडशे वर्षे या भागात अराजक माजले पण सिंहविष्णू अवनीसिंह या राजाने अराजकाचा नाश करून पल्लवांची सत्ता पुन्हा प्रस्थापित केली. त्याने चोळांचा पराभव करून तोंडमंडलम जिंकले. त्याने कलभ्र, पांड्य, चेर यांचा पराभव करून सिलोनच्या राजाचाही पराभव केला. याच्यामुळेच सार्वभौमत्वाच्या चढाओढीत पल्लवांचे पदार्पण झाले.

सिंहविष्णू अवनीसिंहानंतर गादीवर आलेला त्याचा मुलगा पहिला महेंद्रवर्मन याने दक्षिणेत तिरुचिरापल्लीपर्यंत आपली सत्ता वाढवली. याने चैत्यकारी, चित्रकारपुली, मत्तविलास, विचित्रचित्त या पदव्या धारण केलेल्या होत्या. याने आपल्या कालखंडात अनेक देवळे बांधली. महेंद्रवाडी हे गाव वसविले व तेथे महेंद्र तलाव बांधला. त्याच तलावाच्या काठावर एक विष्णूमंदिर बांधले. याच मंदिरावरील शिलालेखात हे विटाविरहित, लाकूडविरहित, धातूविरहित व चुनाविरहित मंदिर विचित्रचित्तराजाने खोदविले असा उल्लेख आहे. महाराष्ट्रातील चालुक्य राजांशी पहिल्या महेंद्रवर्मनाला अनेक वर्षे झगडावे लागले. चालुक्य राजा पुलकेशी दुसरा याने महेंद्रवर्मनाचा पराभव केला होता. पहिल्या महेंद्रवर्मनानंतर त्याचा पुत्र पहिला नरसिंहवर्मा गादीवर आला. त्याने इ.स. ६४२ मध्ये दुसऱ्या पुलकेशीचा पराभव करून त्याला युद्धात ठार मारले. त्यानिमित्त त्याने महामल्लवातापिकोंड या पदव्या धारण केल्या. सिलोनवर दोनदा नाविक स्वाऱ्या केल्या होत्या.

महत्त्वाचे राजे

[संपादन]

सिंहविष्णूच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा महेंद्रवर्मन हा पल्लवांचा राजा झाला. त्याने तमिळआंध्रप्रदेशात आपला राज्यविस्तार केला. चालुक्य राजा पुलकेशीने पल्लवांचे वेंगीचे राज्य जिंकून घेऊन राजधानी कांचीवर प्रभुत्व निर्माण केले त्यामुळे महेंद्रवर्मनला माघार घ्यावी लागली. महेंद्रवर्मनाने त्रिचनापल्ली, चिंगलपूरअर्काट जिल्ह्यात अनेक मंदिरे बांधली. महेंद्रवाडीजवळ एका भव्य जलाशयाची निर्मिती केली. महेंद्रवर्मनने चेत्याकारी (मंदिर निर्माता), चित्रकारपुल्ली (चित्रकारातील चित्ता) व विचित्र चित्त (अलौकिक बुद्धिचा) अशा पदव्या धारण केलेल्या होत्या.

पल्लवांची स्थापत्यकला

[संपादन]

जगप्रसिद्ध माम्मळपुरमची (महाबलीपुरम) आणि कांचीपुरमची मंदिरे पल्लव राजांनी बांधली. मद्रासपासून अठ्ठावन्न किलोमीटर अंतरावर माम्मळपुरमची मंदिरे आहेत. येथे दहा मंदिरे असून ती पल्लव राजा नरसिंहवर्मनने बांधली. येथे त्रिमुर्ती, वराह, दुर्गा, गणेश, पिंडारी व पाच पांडवांची मंदिरे आहेत. त्यांना धर्मराज, अर्जुन, भीम, सहदेवद्रौपदी रथ अशी नावे आहेत. याच मंदिरात अर्जुन तपस्य व गंगावतरण ही प्रेक्षणीय शिल्पे आहेत. गुहास्थापत्यामधून मंदिरस्थापत्याचे परिवर्तन पल्लवकलेने घडवून आणले.

पल्लव आणि चालुक्य यांच्यातील संघर्ष

[संपादन]

इ.स.चे ६ वे शतक ते इ.स.चे ८ वे शतक भारतातील राजकीय इतिहासाचा प्रमुख रोख पल्लव व बदामीचे चालुक्य यांच्यात श्रेष्ठत्वासाठी चाललेल्या झगड्याभोवती केंद्रीत होता. कृष्णातुंगभद्रा या दोन नद्यांमधील प्रदेशावर प्रभुत्व मिळविण्यासाठी दोन्हीही सत्तांचे प्रयत्न चालू असत. पल्लव राजांनी अनेक वेळा तुंगभद्रा नदी ओलांडून जाण्याचा प्रयत्न केला. हा संघर्ष कधी एकाला तर कधी दुसऱ्याला विजय मिळवून देत दीर्घकाळ चालू राहिला.

दीर्घकाळ चाललेल्या या संघर्षातील महत्त्वाची घटना चालुक्य नरेश दुसरा पुलकेशी याच्या काळात घडली. त्याने कदंबांची राजधानी बाणावसी आपल्या अमलाखाली आणली व म्हैसूरच्या गंग राजांना आपल्या अधिराज्यत्वाला मान्यता देण्यास भाग पाडले. या संघर्षातदुसरा पुलकेशी जवळजवळ पल्लवांच्या राजधानीपर्यंत पोहोचला होता पण पल्लवांनी त्यांचे उत्तरेकडिल प्रांत पुलकेशीला देऊन टाकले. हाच प्रदेश वेंगी नावाने ओळखला जातो. चालुक्यांनी आपल्या घराण्याची एक शाखा येथे स्थापन केली तीच शाखा वेंगीचे पूर्वेकडील चालुक्य म्हणून ओळखली जाते.

पल्लवांच्या प्रदेशावर दुसऱ्या पुलकेशीने केलेले दुसरे आक्रमण मात्र अयशस्वी ठरले. या आक्रमणावेळी पल्लव राजा नरसिंहवर्मन याने इ.स. ६४२च्या सुमारास वातापी ही चालुक्यांची राजधानी ताब्यात घेतली. याचवेळी दुसरा पुलकेशीही मारला गेला. इ.स.च्या ७ व्या शतकाच्या अखेरीस पल्लव व चालुक्य यांच्यातील संघर्ष काहिसा थंडावला. इ.स.च्या ८ व्या शतकाच्या पूर्वार्धात चालुक्य राजा दुसरा विक्रमादित्याने तीनवेळा कांचीवर हल्ला करून कांची जिंकण्याचा प्रयत्न केला. इ.स. ७४० मध्ये विक्रमादित्याने पल्लवांचा अतिशय दारुण पराभव केला. चालुक्यांकडून झालेल्या या पराभवानंतरही शंभर वर्षे पल्लव राज्यकर्ते तग धरून राहिले असले तरी चालुक्यांच्या या विजयामुळे पल्लवांची अतिदक्षिणेकडील श्रेष्ठता मात्र पूणपणे संपुष्टात आली.

संदर्भ

[संपादन]
  • Avari, Burjor. India: The Ancient Past. New York.
  • Dubreuil, G. Jouveau. The Pallavas. India.
  • Hermann, Kulke. A History of India.
  • Minakshi, Cadambi. Administration and Social Life Under the Pallavas. Madras.
  • Nilakanta Sastri, K.A. A History of South India. New Delhi.
  • Prasad, Durga. History of the Andhras up to 1565 A.D. Guntur, India.
  • "South Indian Inscriptions". Archaeological Survey of India. 2008-05-30 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत