महाराष्ट्रामध्ये धर्म

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
इतरात पारसीयहुदींचा समावेश
महाराष्ट्र मधील धर्म (२०११)[१]
धर्म प्रमाण
हिंदू
  
79.8%
मुस्लिम
  
11.5%
बौद्ध
  
5.8%
जैन
  
1.2%
ख्रिश्चन
  
1.0%
शीख
  
0.2%
इतर
  
0.5%

महाराष्ट्रामधील धर्म हे धार्मिक श्रद्धा आणि प्रथांमधून आपली विविधता दर्शवितात. महाराष्ट्रात जगातील आठ धर्मांचे अनुयायी आहेत; ते म्हणजे हिंदू धर्म, इस्लाम, बौद्ध धर्म, जैन धर्म, ख्रिश्चन धर्म, शीख धर्म पारशी धर्म आणि यहुदी धर्म होय. महाराष्ट्राच्या इतिहासात धर्म हा राज्याच्या संस्कृतीचा महत्त्वाचा भाग बनलेला आहे.

भारताचे संविधान राज्याला एक धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक घोषित करते, त्यामुळे भारतीय नागरिकाला कोणत्याही धर्माची किंवा विश्वासाची उपासना करणे आणि त्या विचारसरणीचा प्रसार करण्याचे स्वातंत्र्य वा मुभा आहे.[२][३] भारताच्या राज्यघटनेनसार धर्मस्वातंत्र्य हा भारतीय व्यक्तीचा मूलभूत अधिकार आहे.

दीक्षाभूमी, देशभरातील नवयानी बौद्धांचे नागपूरमधील प्रमुख केंद्र
श्री हजूर साहेब गुरुद्वारा, नांदेड

हिंदू धर्म[संपादन]

२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार महाराष्ट्र राज्याच्या एकूण लोकसंख्येपैकी ७९.८३% किंवा ८,९७,०३,०५७ हिंदुधर्मीय आहेत आणि हा हिंदू धर्म महाराष्ट्रीय लोकांच्या दैनंदिन जीवनात महत्त्वाची भूमिका बजावतो. गणेश हा मराठी हिंदूंचा सर्वात लोकप्रिय देव आहे, त्यानंतर ते विठ्ठल रूपातील कृष्ण ते शंकर आणि पार्वतीसारख्या शिव कौटुंबिक देवतेची उपासना करतात. वारकरी परंपरेची महाराष्ट्रातील स्थानिक हिंदूंवर मजबूत पकड आहे. १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात बाळ गंगाधर टिळकांनी सुरू केलेला गणेशोत्सव अतिशय लोकप्रिय आहे. मराठी हिंदूंना संत ज्ञानेश्वर, संत सावता माळी, संत तुकाराम, संत नामदेवसंत चोखामेळा, संत तुकडोजी महाराज (संत आणि तत्त्वज्ञ), संत गाडगे महाराज (संत आणि तत्त्वज्ञ) व डॉ. बाबासाहेब आंबेडकर (धर्मवेत्ते व बौद्ध आणि दलितांचे आध्यात्मिक नेते) हे सन्माननिय आहेत.

इस्लाम[संपादन]

इस्लाम हा राज्यात दुसरा सर्वात मोठा धर्म आहे, २०११ च्या भारतीय जनगणनेनुसार, महाराष्ट्रात १,२९,७१,१५२ लोक मुस्लिम असून त्यांचे लोकसंख्येमधील प्रमाण सुमारे १२% (११.५४ %) आहे. ईद-उल-फित्र (रमजान ईद) आणि ईद-उल-अधा (बकरी ईद) हे राज्यातील दोन सर्वात महत्त्वाचे मुस्लिम सण आहेत. राज्यातील मुस्लिम बहुसंख्य लोक सुन्नी आहेत. राज्यातील मुस्लिम लोकसंख्या ही मोठ्या प्रमाणात शहरात वसलेली आणि विविध क्षेत्रांमध्ये पसरलेली आहे. सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या मराठवाडा, खानदेश, आणि मुंबई-ठाणे पट्ट्यात आढळते. विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाच्या क्षेत्रात देखील मुस्लिम लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे. महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई शहरामध्ये २५.०६% लोक मुस्लिम आहेत, तर उपराजधानी नागपूर शहरात ११.९५% लोक मुस्लिम आहेत. औरंगाबाद शहरामध्ये मुस्लिम लोकसंख्या ही ३०.७९% आहे. मालेगाव आणि भिवंडीसारख्या शहरांमध्येही मुस्लिम बहुसंख्य आहेत.

बौद्ध धर्म[संपादन]

बौद्ध धर्म हा महाराष्ट्र राज्यातील तिसरा सर्वात मोठा धर्म आहे. २०११ च्या भारतीय जनगणनेनुसार, बौद्ध धर्म हा महाराष्ट्रातील एकूण लोकसंख्येपैकी सुमारे ६% (५.८१%) असून ६५,३१,२०० लोक बौद्ध धर्माचे अनुयायी आहेत. भारतातील एकूण बौद्ध लोकसंख्येपैकी ७७.३६% बौद्ध हे महाराष्ट्र राज्यात आहेत. राज्यातील बौद्धांपैकी साधारणपणे ९९.९८% बौद्ध हे नवयान बौद्ध धर्माचे (नवबौद्ध धर्म) अनुयायी आहेत, १९ व्या व २० व्या शतकात दलित बौद्ध चळवळ या भारतातील बौद्ध पुनरुत्थान मोहिमेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचेकडून सर्वात महत्त्वाची प्रेरणा प्राप्त झाली. डॉ. आंबेडकरांपासून प्रेरित होऊन बौद्ध बनणाऱ्या भारतातील धर्मांतरित बौद्ध व्यक्तींना ‘नवबौद्ध’ म्हणजेच ‘नवयानी बौद्ध' म्हटले जाते. भारतातील एकूण बौद्ध लोकसंख्येत ८७% बौद्ध हे नवयानी आहेत आणि या नवयानी बौद्ध अनुयायांपैकी जवळजवळ ९०% नवयानी बौद्ध हे महाराष्ट्रात राहणारे आहेत.

जैन धर्म[संपादन]

Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही.
कृपया लेख तपासून पुनर्लेखन करावे. हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.जैन धर्म हा महाराष्ट्रामधील एक प्रमुख धर्म असून राज्यात चौथा सर्वात मोठा धर्म आहे. २०११ च्या भारतीय जगनगणेच्या अहवालानुसार महाराष्ट्रातील जैन समाजाची लोकसंख्या १४,००,३४९ (१.२५%) आहे. महाराष्ट्रातील जैन हे राजस्थान मधील मारवाड प्रांत आणि गुजरात राज्यातून आलेले आहेत. महाराष्ट्रात एक अल्पसंख्य देशी मराठी जैन समुदाय आहे. राष्ट्रकूट आणि चालुक्यासारख्या ख्रिस्तपूर्व राजवटींच्या काळात पहिल्या हजार वर्षांपासून महाराष्ट्रातील शासक जैन धर्माचे अनुयायी होते. प्राचीन वेरूळ लेणी परिसारात हिंदू आणि बौद्ध लेण्यांच्या बाजूला काही जैन लेणी आहेत.

ख्रिश्चन धर्म[संपादन]

२०११ भारतीय जनगणनेच्या अहवालानुसार, महाराष्ट्राची १०,८०,०७३ (०.९६%) एवढी लोकसंख्या ख्रिस्ती आहे. ख्रिश्चन धर्मात ३३,००० हून अधिक पंथ अाहेत. [ संदर्भ हवा ] महाराष्ट्रात रोमन कॅथलिक आणि प्रोटेस्टंट या पंथीयांची संख्या सगळ्यात जास्त आहे. त्याशिवाय अँग्लिकन, इव्हेंजलिस्ट, ईस्टर्न ऑर्थोडॉक्स, ख्राइस्ट चर्च, जेहोवाज चिल्ड्रेन, जेसुइट, पेंटेकोस्टल, बॅप्टिस्ट, मेथॉडिस्ट, सीरियन या पंथीयांचे प्रमाणही विचारात घेण्याइतके जास्त आहे.[ संदर्भ हवा ] मुंबई आणि पुणे या शहरी भागात प्रामुख्याने गोवन, मंगलोरियन, केरलाइट आणि तामिळी ख्रिश्चन आहेत.

 • ईस्ट इंडियन - बहुतेक कॅथोलिक पंथीय ख्रिश्चन हे मुंबई, ठाणे आणि शेजारील रायगड जिल्ह्यांमध्ये केंद्रित आहेत. इ.स.पू. पहिल्या शतकात सेंट बार्थोलेमेव यांनी या भागाच्या स्थानिक लोकांत धर्म प्रचार केला होता.
 • मराठी ख्रिश्चन -१८ व्या शतकात अहमदनगर, नाशिक आणि सोलापूरमध्ये अमेरिकेच्या व अँग्लिकन मिशनऱ्यांनी यांना प्रोटेस्टंट पंथात आणले. मराठी ख्रिश्चनांनी त्यांच्या ख्रिश्चन होण्यापूर्वीच्या सांस्कृतिक पद्धती बहुधा तशाच ठेवल्या आहेत.
 • १९ व्या शतकाच्या सुरुवातीला काही जणांनी अहमदनगर आणि मिरजमधील दुष्काळग्रस्तांच्या काळात ख्रिस्ती धर्मात प्रवेश केला.[४] ते अमेरिकन मराठी मिशन, चर्च मिशन सोसायटी आणि युनायटेड सोसायटी फॉर द प्रॉपेगेशन ऑफ द गॉस्पेल यांच्या चर्च ऑफ इंग्लंडने अहमदनगर येथे इव्हॅन्जेिलिस्ट्स आल्यानंतर पंथबदल केला. अहमदनगर जिल्ह्यामधील मिशनरी तेथील स्थानिकांना बायबल समजावून संगण्यासाठी गावॊगाव प्रवास करीत असत.[५] तथापि, या ख्रिश्चन धर्मांतराला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या उदयाने आणि बौद्ध धर्मातील प्रवेशामुळे मोठ्या प्रमाणावर आळा बसला.[६]

शीख धर्म[संपादन]

२०११ च्या जनगणनेनुसार, महाराष्ट्रात २,२३,२४७ (०.२०%) शीखधर्मीय आहेत. औरंगाबादच्या खालोखाल मराठवाडामधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर असलेले नांदेड हे शीख धर्मासाठी एक मोठे पवित्र स्थान आहे, तेथील हजूर साहिब गुरुद्वारा प्रसिद्ध आहे. हजूरसाहेब ही शीख धर्मातल्या पाच तख्तांपैकी (तात्पुरती अधिकारांची जागा) एक आहे. तिथेच गोदावरी नदीच्या काठावरच्या नांदेड गावी, शिखांचे दहावे गुरु, गोविंद सिंह यांचा मृत्यू झाला.

कॉम्प्लेक्सच्या आतील गुरुद्वाराला 'सच-कांड' असे म्हणतात. हजूर साहिब गुरुद्वारापासून एका हाकेच्या टप्प्यावर एक भव्य लंगर आहे. त्याला लंगर साहिब गुरुद्वारा म्हणतात. महाराष्ट्रात ऐतिहासिक महत्त्व असलेले लहानमोठे १३ गुरुद्वारा आहेत. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक आणि औरंगाबाद या ठिकाणी बरीच शीख लोकसंख्या आहे.

झोरास्ट्रियन[संपादन]

महाराष्ट्रातील दोन झारोसीवादी जमाती आहेत.

 • पारसी, मुख्यत्वे मुंबईत (आणि दक्षिणी गुजरातमध्ये राहतात). हे इराणी झोरास्ट्रियनांच्या एका गटातले असून इराणमधील मुसलमानांच्या छळामुळे १०व्या शतकात पश्चिमी भारतात स्थलांतरित झाले. बोहरी लोकांप्रामाणे तेही गुजराती भाषा बोलतात.
 • इराणी, पारसींच्या तुलनेने नवीन व कमी आहेत. यांच्या पूर्वजांचा सांस्कृतिकदृष्ट्या आणि भाषादृष्ट्या संबंध याझ्डकर्मान प्रांतातील झोरास्ट्रियनांप्रमाणे इराणमधील झोरास्ट्रियन लोकांशी आहे. ते आजही त्या प्रांतातील झरोस्तींची दारी बोली बोलतात. एकेकाळी मुंबईत आणि पुण्यात अनेक इराणी रेस्टॉरन्ट्स होती. त्यांच्या मालकांतही दोन प्रकारचे इराणी होते, एक दाढी नसलेले आणि दुसरे खुरटी का होईना, पण दाढी ठेवणारे. बिन दाढीवाल्यांची हॉटेले मुंबईतील कुलाब्यात, फोर्टमध्ये आणि मुंबईच्या पश्चिम किनाऱ्यावर ग्रँट रोड, दादर-बांद्रा आदी भागात होती. पुण्यात ती डेक्कन जिमखान्यावर, अलका टॉकीजसमोर आणि कॅन्टॉनमेन्टमध्ये होती. दाढीवाले इराणी पक्के मुसलमान वाटत. त्यांची हॉटेले मुंबईच्या पूर्व किनाऱ्यावर, महंमद अली रोड, गोलपीठा, चोरबाजार आदी भागात होती. पुण्यात ती गणेश-भवानी पेठांत आणि शिरीन टॉकीज परिसरात होती.

ज्यू धर्म[संपादन]

महाराष्ट्रामध्ये ज्यू धर्मीयांचे प्रमाण लक्षणीय आहे. ज्यूंच्या धर्माला इंग्रजीत ज्युडाइझम आणि हा धर्म पाळणाऱ्या लोकांना ज्युइश म्हणतात. महाराष्ट्रातील ज्यूंना बेने इस्रायली किंवा 'शनवार तेली' म्हणतात.

मराठ्यांचे राज्य खालसा झाल्यानंतर ब्रिटिश राजवटीत बेने इस्रायली समाज महाराष्ट्रातील इतर भागातही स्थायिक होऊ लागला. १८५७च्या स्वातंत्र्ययुद्धानंतर बेने इस्रायली सैनिकांची कुटुंबे पुण्याच्या रास्ता पेठेत, विशेषत: लकेऱ्या मारुतीच्या समोरील रस्त्याच्या दुतर्फा स्थायिक झाली होती. त्याला इस्रायली आळी असे नाव होते. त्यातील कित्येकांना खान बहाद्दुर, खानसाहेब अशा पदव्या मिळाल्या होत्या. ब्रिटिशकाळात सैन्यात नोकरी करणाऱ्या बेने इस्रायलींप्रमाणेच सरकारी नोकरीत काम करणारे बेने इस्रायलीसुद्धा मोठ्या प्रमाणात होते. सरकारी खात्यांपैकी रेल्वे, कस्टम, पोस्ट आणि टेलिग्राफ खात्यात अनेक बेने इस्रायली काम करत. त्यामुळे त्यांनी महाराष्ट्रातील इतर भागांत व भारतातील इतर शहरांत वास्तव्य केले होते.

पुण्याच्या कँप भागातील प्रसिद्ध 'लाल देऊळ' हे ज्यूंचे प्रार्थनालय (सिनेगॉग) आहे.

१९६१ व १९७१च्या जनगणनेनुसार पुणे, इगतपुरी, भोर, सातारा, मुंबई, ठाणे यांप्रमाणेच नाशिक, सोलापूर, सातारा, नागपूर, धुळे, जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, भंडारा, वर्धा, नांदेड येथेही कमी प्रमाणात का होईना; पण ज्यूंची नोंद झाली आहे.

मुंबईतील ज्यू[संपादन]

ईस्ट इंडिया कंपनीच्या कारकिर्दीत मुंबईत मोठ्या प्रमाणात ज्यू आले. बेने इस्रायलींबरोबर बगदादी ज्यू, कोचीन ज्यू हेही आले. सन १७४६मध्ये बेने इस्रायली समाजातल्या आवसकर घराण्यातील पुरुषाने मुंबईतील खडक भागात सर्वात प्रथम घर बांधले. त्यानंतर दिवेकर कुटुंबीय त्यांच्या शेजारी राहण्यास आले.पुढच्या काळात मुंबईत मोठ्या प्रमाणावर बेने इस्रायली दाखल होऊन या भागात त्यांची स्वतंत्र घरे उभी राहिली. त्यामुळे ही वस्ती ‘इस्रायली मोहल्ला’ म्हणून ओळखली जाऊ लागली. मुंबईत बेने इस्रायली प्रार्थना मंदिर दिवेकर यांनी बांधले. या प्रार्थनालयात सेफेरतोरा आणण्यासाठी ते कोचीनला निघाले. प्रवासात त्यांचा अंत झाला. पुढे त्यांच्या वारसांनी सेफेरतोरा (ज्यू धार्मिक हस्तलिखित ग्रंथ) आणून प्रार्थनालय चालू केले. हेच मुंबईतील जुने शाआर हारा हमीम प्रार्थनालय हॊय. ते मांडवी भागातील एका रस्त्यावर सन १७९६मध्ये स्थापन झाले. म्हणूनच प्रार्थनालय असलेल्या रस्त्याला इंग्रजांनी सॅम्युएल स्ट्रीट असे नाव दिले. या प्रार्थनालयाला मशीद म्हटले जाई. यावरून तेथून जवळ बांधलेल्या रेल्वे स्टेशनला ‘मशीद बंदर’ (मसजिद) असे नाव देण्यात आले.

हेही पहा[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

 1. .
 2. The Constitution of India Art 25-28. Retrieved on 22 April 2007.
 3. .
 4. रेगे, शर्मिला (२००६). Writing caste, writing gender : reading Dalit women's testimonios. झुबन. आय.एस.बी.एन. 8189013017. 
 5. Shelke, Christopher (२००८). God the Creator : universality of inculturality.. Pontificia università gregoriana. आय.एस.बी.एन. 887839128X. 
 6. Stackhouse, editors, Lalsangkima Pachuau, Max L. (२००७). News of boundless riches : interrogating, comparing, and reconstructing mission in a global era. ISPCK. आय.एस.बी.एन. 8184580134. 

बाह्य दुवे[संपादन]