रामायण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रामायणात वर्णिलेले लंकेचे महायुद्ध (चित्रनिर्मिती: इ.स. १६४९-५३)

रामायण हे वाल्मीकी ऋषींनी रचलेले एक महाकाव्य असून त्याला हिंदू धर्मात एक पवित्र ग्रंथ मानलेले आहे.[१]

रामायणामध्ये २४,००० श्लोक असून ते ७ कांडांमध्ये विभागले आहेत.[२] रामायणाची मुख्य कथा अयोध्येचा राजपुत्र रामाची पत्‍नी सीतेचे रावणाकडून अपहरण, आणि तत्पश्चात रामाकडून रावणाचा वध अशी आहे. ग्रंथानुसार वाल्मीकी ऋषींनी रचलेल्या या काव्याचा रामाच्या मुलांनी (लव-कुश) प्रचार केला.[३]

नंतरच्या काळातील संस्कृत काव्यांच्या छंद रचनाशैलीवर रामायणाचा गाढा प्रभाव दिसून येतो. रामायणाचा उल्लेख नीतिकथा, तात्त्विक व भक्तिसंबंधित चर्चांमध्ये येतो. राम, सीता, लक्ष्मण, भरत, हनुमान व कथेचा खलनायक रावण आदी पात्रे भारतीय सांस्कृतिक प्रज्ञेचा हिस्सा बनले आहेत. रामायणाचा प्राचीन भारताच्या प्रमुख साहित्यकृतींवर व भारतीय उपखंडातील कला व संस्कृतीवर सखोल प्रभाव दिसतो. प्रभावित कृतींमध्ये इ.स.च्या १६व्या शतकातील मराठी संत एकनाथ, हिंदी भाषा कवी तुलसीदास, इ.स.च्या १३व्या शतकातील तामिळ कवी कंब,[४] इ.स.च्या २०व्या शतकातील मराठी कवी गजानन दिगंबर माडगूळकर आदी प्रमुख होत.

रामायणाचा प्रभाव आठव्या शतकापासून भारतीय वसाहत असलेल्या आग्नेय आशियामधील इंडोनेशिया (जावा, सुमात्रा व बोर्नियो) थायलंड, कंबोडिया, मलेशिया, व्हिएतनामलाओस आदी देशांच्या साहित्य, शिल्पकला, नाटक या माध्यमांवरही पडलेला आढळतो.[५][६]

रामायणातील कांडे[संपादन]

रामायणाच्या अनेक ठिकाणी पूर्ण व अपूर्ण अशी अनेक हस्तलिखिते सापडली आहेत. यांतील सर्वात जुने हस्तलिखित ११व्या शतकातील आहे.[७] वाल्मीकी रामायणाच्या प्रतींच्या उत्तर भारतदक्षिण भारत प्रदेशातील अनेक प्रादेशिक आवृत्त्या मिळाल्या आहेत. रामाचे जन्मापासून ते अवतारसमाप्तीपर्यंतचे जीवन सांगणारे रामायण हे सात कांडांत(प्रकरणांत) विभागले आहे.[८]

शैलीमधील फरकांमुळे प्रथम व अंतिम कांड ही मूळ रामायणात नसल्याचा संदेह संशोधकांना आहे.[१०]

रामायणातील पात्रे, वगैरे[संपादन]

रामायणातील नीतिपाठ[संपादन]

वाल्मीकी ऋषींनी त्यांच्या रामायणात रामाच्या रूपाने आदर्श जीवन कसे असावे याचा नीतिपाठ प्रस्तुत केला आहे. मानवी जीवन क्षणभंगुर असून भोगलालसेचा त्याग करून रामाप्रमाणे आदर्श जीवन व्यतीत करावे, यातच मानवाचे कल्याण आहे असा वाल्मीकी रामायणचा अभिप्राय आहे.[११]

नारदमुनी हे संक्षेप रामायण या वाल्मिकी रामायणातील सर्गात आदर्श मनुष्याच्या १६ गुणांचे वर्णन करतात. हे सोळा गुण येणेप्रमाणे -
१. गुणवान - नीतिवंत
२. वीर्यवान- शूर
३. धर्मज्ञ - धर्माचा जाणकार
४. कृतज्ञ ,
५. सत्यवाक्य – सत्यवचनी
६. दृढवृत्त – आत्मविश्वासी,
७. चरित्र्यवान – चारित्र्य चांगले असणारा,
८. सर्वभूतहित – सर्व जीवांचे हित बघणारा
९. विद्वान
१०. समर्थ
११. सदैक प्रियदर्शन – ज्याचे दर्शन सदा सुखकर आहे असा
१२. आत्मवंत – धैर्यस्थ,
१३. जितक्रोध –क्रोध जिंकलेला ,
१४. द्युतिमान् – कांती सुंदर असलेला ,
१५. अनसूयक – असूया नसलेला,
१६. कस्य बिभ्यति देवाश्च जातरोशस्य संयुगे' - ज्याच्या कोपास देवताही घाबरतात असा.

रामायणातील राम स्वतःस मनुष्यच म्हणवितो. (आत्मानं मानुषं मन्ये), पण, रावणाला असुर, राक्षस व देवता मारू शकणार नाही अस रावणाला वरदान असल्यामुळे रावणाचा वध करण्यासाठी विष्णूनेच मनुष्य रूपात अवतार घेतला होता.

रामायणाचा काळ[संपादन]

परंपरेने या महाकाव्याची घटना हिंदू कालगणनेच्या तिसऱ्या युगात - त्रेतायुगात (सत्ययुगात) घडली. रचयिते वाल्मीकी हे सुद्धा या महाकाव्यातील एक सक्रिय पात्र होते.

रामायणाची भाषा पाणिनीय काळापेक्षाही जुनी संस्कृत भाषा आहे. महाभारत व रामायण यांच्या संस्कृतमध्ये फरक दिसतात. रामायणाच्या मूळ कृतीची रचना इ.पू. पाचव्या शतकात सुरू झाली व अनेक शतके चालली. मूळ स्वरूपात अनेक फेरफार होऊन रामायणाचे सध्याचे स्वरूप तयार झाले. रचनाकालाच्या अभ्यासासाठी भाषेचे स्वरूप हा पायाभूत आधार आहे.

रामायणाच्या कथेचा काळ याहून पुरातन असू शकतो. रामायणाची पात्रांची नावे - राम, सीता, दशरथ, जनक, वसिष्ठ, विश्वामित्र हे वाल्मीकी रामायणापूर्वीच्या ब्राह्मणग्रंथांत व वेदांत आढळतात.[१२][१३] रामायणाची मुख्य पात्रे वहिसुव(?), ब्रह्मा, विष्णू वा वेदोक्त देवता नाहीत. महाभारत-रामायणांच्या रचनेनंतर या देवता लोकप्रिय झाल्या.

सामान्यपणे, रामायणाचे दुसरे कांड ते सहावे कांड हे भाग या महाकाव्याचे प्राचीनतम भाग मानले जातात. पहिले बालकांड व शेवटचे उत्तरकांड नंतर मूळ प्रतीस जोडले आहे.[१४] बालकांड व अयोध्याकांड यांतील घटना गंगेच्या खोऱ्यातील प्रदेशाची व प्राचीन भारतातील १६ जनपदांची (मगध व कोसल प्रदेश) परिचिती दाखवतात. या भागांचे राजकीय व भौगोलिक वर्णन रामायणात आहे.

रामायणाच्या अरण्यकांडात राक्षस, विचित्र प्राणी आदींचे काल्पनिक वर्णन आढळते. इतिहासकार एच.डी. सांकलिया यांनी रामायणाचा काळ सुमारे इ.पू. चौथ्या शतकातला असल्याचे प्रतिपादले आहे.[१५] तर इतिहासकार ए.एल. भाषम हे रामकाळ इ.पू. ७व्या वा ८व्या शतकाचा असल्याचे मानतात.[१६]

रामायणाची कथा सहा हजार वर्षे जुनी असू शकते.[१७]

’रामायणाचा खगोलशास्त्रीय शोध’ (प्रकाशक - पुष्पक प्रकाशन, २०१५) या प्रफुल्ल मेंडकी यांनी लिहिलेल्या पुस्तकात रामायणातील वेगवेगळ्या घटना किती वर्षांपूर्वी घडल्या ते निश्चित करण्याचा प्रयत्‍न केला आहे.

विभिन्न भाषांतरे/रूपांतरे[संपादन]

रामायणाच्या कथेचा आशियाच्या अनेक संस्कृतींमध्ये प्रसार झाला आहे. रावण आणि त्याची बहीण, जावा बेटावरच्या एका नृत्यात

अनेक जानपद कथांमध्ये रामायणाच्या कथेचे विविध रूपांतरे दिसतात. उत्तर भारतातील रामायणकथा दक्षिण भारतातील व आग्नेय आशियामधील प्रचलित रूपांतरांपेक्षा भिन्न आहेत. रामायणाचा कथासंप्रदाय थायलंड, कंबोडिया, मलेशिया, लाओस, व्हिएतनामइंडोनेशिया देशांमध्ये प्रचलित आहे.

मलेशियातील काही रूपांतरांत लक्ष्मणास रामापेक्षा जास्त महत्त्व दिले आहे. या रूपांतरांत राम दुय्यम व दुर्बल भूमिकेत आहे.

वाल्मीकी रामायणात रामचरित्राचे वर्णन आहे, तर वाल्मीकी यांनीच लिहिलेल्या अद्भुत रामायणात सीतेच्या चरित्र कथनाला प्राधान्य दिले आहे.

लाओसमध्ये रामायणाचे फ्रा लाक फ्रा राम या नावाने रूपांतर केले गेले.

भारतीय रूपांतरे[संपादन]

भारतात विविध काळांत लिहिलेली रामायणे परस्परांपासून भिन्न आहेत. १८व्या शतकात मराठी भाषेत श्रीधरपंतांनी रामायण रचले. १४-१५व्या शतकात कुमार वाल्मीकी यांनी कानडीत तोरवे रामायण नावाने रूपांतर केले. कानडीत कुवेंपु यांनी श्री रामायण दर्शनम्‌ व रंगनाथ शर्मा यांनी "कन्नड वाल्मीकि रामायण" नावाची रामायणे लिहिली.

१२व्या शतकातील तमिळ कवी कंब यांनी "रामावतारम्" अथवा कंबरामायण ग्रंथ रचिला. संत एकनाथांनी "भावार्थ रामायण" हा काव्यग्रंथ मराठी भाषेत लिहिला. हिंदी भाषा भाषेचे प्रसिद्ध रामायण १५७६ सालात तुलसीदास यांनी श्री रामचरित मानस नावाने रचले. रामायणाच्या रूपांतरित आवृत्त्या गुजराती कवी प्रेमानंद यांनी १७व्या शतकात, बंगाली कवी कृत्तिवास यांनी १४व्या शतकात, उडिया कवी बलरामदास यांनी १६व्या शतकात, तेलुगू कवी रंगनाथ यांनी लिहिल्या..

रामायणाच्या काही उप-रूपांतरांत रावण अहिरावण - महिरावण रूपात येतो.

केरळच्या "मापिळ्ळे रामायण" या रामायण रूपात रामायण लोकगीतांमध्ये गुंफण्यात आले आहे. [१८]

रामायणाची मुसलमान प्रत सुद्धा आहे. या रूपांतरात रामायणाचा नायक एक मुस्लिम सुलतान आहे. रामाचे नाव यात "लामन" असे बदलले आहे; इतर पात्रे रामायणाप्रमाणेच आहेत.

हंपी येथे विजयनगर साम्राज्याचे अवशेष आहेत. तेथे सुग्रीवन गुहे (सुग्रीवाची गुहा) नावाची गुहा आहे. हे स्थळ सुंदरकांडातील किष्किंधेय वर्णनातील स्थळ असल्याचे मानण्यात येते. या ठिकाणी सुप्रसिद्ध हजारी राम मंदिर आहे.

आग्नेय आशियातील रूपांतरे[संपादन]

आग्नेय आशियातील रामायणाचे चित्र

आशियाच्या अनेक संस्कृतींवर रामायणाचा प्रभाव पडला आहे. काही देशांच्या राष्ट्रीय महाकाव्यांसाठी रामायण प्रेरणास्थान आहे. चीनचे महाकाव्य "पश्चिमदत्त पयण" याचे काही भाग रामायणावर आधारित आहेत. या महाकाव्याचे "सुन् वुकांग्" पात्र हनुमानाच्या पात्रावर आधारित आहे. इंडोनेशियाच्या जावा प्रदेशातील सुमारे नवव्या शतकातील रूपांतर "काकाविन् रामायण" नावाने ओळखले जाते.यात संस्कृत रामायणाच्या तुलनेत अनेक ठिकाणी भेद आहे. लाओस देशाचे काव्य "फ्रा लक फ्रा लाम" हे सुद्धा रामायणाचे रूपांतर; या नावातील "लक" आणि "लाम" नावे म्हणजे लक्ष्मणरामाच्या नावांचे लाओ रूपांतर. यात रामाचे जीवन बुद्धाचा पूर्वावतार म्हणून चित्रित केले आहे. मलेशियाच्या "हिकायत्‌ सेरि राम" काव्यात रावणास ब्रह्माच्या वराऐवजी अल्लाचा वर प्राप्त झाल्याचे दाखविले आहे.[१९]

थायलंडचे काव्य "रामकियेन" रामायणावर आधारित आहे. यात सीता ही रावणमंदोदरी यांची कन्या असल्याचे दाखविले आहे. ज्योतिषी विभीषण जेव्हा सीतेची कुंडली पाहून जेव्हा अपशकून वर्तवितो तेव्हा रावण तिला पाण्यात फेकून देतो, नंतर ती जनकास प्राप्त होते. थाई रामायणात मारुती हे महत्त्वाचे पात्र आहे. काव्याची कथा बँकॉकनजीकच्या "वात फ्रा कयेव" देवस्थानाजवळ घडल्याचे सांगितले आहे.

इतर आग्नेय आशियाई रूपांतरांत बालीचे "रामकवच", फिलिपाईन्सचे "मरडीय लावण", कंबोडियाचे "रीम्कर" आणि म्यानमारचे "याम जात्दव" प्रमुख होत.

वर्तमानात रामायण[संपादन]

राम रावण युद्ध

कानडीतील कुवेंपु यांचे रामायण रामायण दर्शनम व तेलुगू कवी विश्वनाथ सत्यनारायण यांच्या रामायण कल्पवृक्षमु या कृतींस ज्ञानपीठ पुरस्कार लाभले आहेत. अशोक बँकर यांनी इंग्लिश भाषेत रामायणाधारित सहा मालिका कादंबऱ्या लिहिल्या आहेत.

कांचीपुरमच्या गेइटी रेल्वे थिएटर कंपनीने द्राविड स्वाभिमानाची पुनःस्थापना या उद्देशाखाली या महाकाव्याची पुनर्रचना केली. यात रावण विद्वान, राजकारणी, सीता त्याची धर्मपत्‍नी, राम हा एकएक नीतिनियम धाब्यावर टाकणारा लंपट राजकुमार असे दाखविले आहे. रामायणाची ही आवृत्ती पारंपरिक आवृत्तीच्या उलटी असून ती लिहून द्राविड चळवळीस बळ देण्याचा प्रयत्‍न केला गेला.

जैन /पंप रामायण[संपादन]

रामचंद्र चरित पुराण अर्थात पंप रामायण हे कन्नड साहित्यप्रकारात येते. जैन परंपरेनुसार लिहिल्या गेलेल्या पंप रामायणाचा कर्ता आहे- नागचंद्र. अभिनव पंप असेही नामाभिधान असलेले हे चम्पू काव्य आहे.चम्पू काव्यामध्ये गद्य आणि पद्य अशा दोन्ही पद्धतीने विषय मांडलेला असतो. भावनात्मक विषय पद्यात आणि वर्णनात्मक विषय गद्यात अशी याची रचना असते.याचे कन्नड नाव रामचंद्र-चरिते पुराण असे नाव आहे.

उत्तर भारतातील घराघरांत तुलसी रामायणाचे वाचन होते, ते सर्वज्ञात आहे. परंतु पंप रामायणाचा परिचय समाजाला न झाल्याने ते लोकाभिमुख न होता केवळ साहित्य वर्तुळातच सीमित राहिले.

या रामायणाचा कर्ता नागचंद्र याचा काळ इ.स. १०७५ ते ११०० असावा असे मानले जाते. चालुक्य व होयसळ राजांनी नागचंद्राचा सन्मान केला असे मानले जाते. नागचंद्र जैन परंपरेचे उपासक  व गुरुभक्त असून जैन परंपरेविषयी निष्ठा व भक्ती त्यांच्या साहित्यातून दिसून येते.

कथेचा सारांश[संपादन]

मिथीलेचा अधिपती महाराज जनकाची पत्‍नी गर्भवती राहिली. पूर्वजन्मीच्या वैमनस्यातून एक निशाचर त्या गर्भाला नष्ट करण्याची वाट पहात होता. राणीने जुळ्या बालकांना जन्म दिला. या बालकांपैकी मुलाचे अपहरण निशाचराने केले. आकाशमार्गाने जात असता पूर्वजन्मीच्या तपस्येचे स्मरण होऊन निशाचराने त्या बालकाला कोणतीही इजा न करता, अलगदपणे पृथ्वीवर उतरविले. ते बालक हळूहळू पुढे जात रथनुपूर चक्रवालपूरचे महाराज इंदुगती यांना मिळाले. आनंदलेल्या राजाने त्या बाळाचे नाव प्रभामंडल ठेवले. जनकाने ज्योतिषांकडून  आपले दुसरे बालक सुखरूप आहे असे समजून घेतल्यावर कन्येचे नामकरण केले वा तिचे नाव सीता ठेवले. सौंदर्यवती सीता मोठी होऊन शास्त्रादी कलांमध्ये निपुण झाली. (वाल्मिकी रामायणात राजा जनकाला सीता ही शेतामध्ये नांगराच्या फाळाशी सापडली अशी कथा आहे.)

अनेक किरातांकडून होणाऱ्या त्रासामुळे पृथ्वीवर अनाचार माजू लागला. या संकटातून सोडविण्यासाठी मदत करायला जनकाने राजा दशरथाला विनंती केली. त्यावेळी तरुण, अत्यंत पराक्रमी असे दशरथाचे पुत्र राम व लक्ष्मण यांनी त्या किरातांचा पराभव केला. या पराक्रमाने आनंदित झालेल्या जनकाने सीतेचा विवाह रामाशी करण्याचे ठरविले. ही बातमी समजताच नारद उत्सुकतेने पहायला गेले व स्वतःच मोहित झाले. त्यांनी सीतेचे एक चित्र तयार केले व मणिमंडपात ठेवले. प्रभामंडलाने (निशाचराने नेलेला तिचा जुळा भाऊ) सीतेचे ते चित्र पाहिले व त्याने आपल्या वडिलांना तिला मागणी घालायला सांगितले. जनक राजाने हा प्रस्ताव नाकारला. सीतेचा विवाह रामाशी करायचा असल्याचे जनक राजाने सांगितल्यावर इंदुगती राजा चिडला, त्याने त्याच्या कुलातील वज्रावर्त धनुष्यावर प्रत्यंचा चढवून दाखविण्याचे सामर्थ्य रामात असेल तरच सीतेचा विवाह रामाशी करावा असा युक्तिवाद केला. रामाच्या पराक्रमावर विश्वास असलेल्या जनकाने स्वयंवर योजले. देशोदेशीचे राजे हरले, पण रामाने मात्र हे आव्हान पेलले व सीतेने रामाला वरमाला घातली. सागरावर्त नावाच्या धनुष्यावर प्रत्यंचा चढवून लक्ष्मणानेही आपला पराक्रम सिद्ध केला. त्यामुळे चंद्रध्वज राजाने आपल्या अठरा कन्यांचे विवाह लक्ष्मणाशी करून दिले. (वाल्मिकी रामायणात लक्ष्मणाची पत्‍नी म्हणून ऊर्मिला हिचाच उल्लेख सापडतो.)

या पराक्रमामुळे प्रभामंडलाच्या मनात रामाविषयी ईर्ष्या व मत्सर निर्माण झाला. रामावर आक्रमण करण्यासाठी प्रभामंडल निघाला त्यावेळी आपल्या जन्माचे रहस्य समजल्यावर त्याला मूर्च्छा आली. शुद्धीवर आल्यावर त्याला शोक झाला कारण त्याने आपल्या बहिणीचाच लोभ धरला हे त्याला समजले होते. त्यानंतर प्रभामंडलावर राज्य सोपवून राजा इंदुगतीने जैन धर्माची दीक्षा घेतली. सीतेसह अयोध्येस येताना राजा दशरथाने संपूर्ण परिवारासहित भूतहितरत भट्टारकांचे दर्शन घेतले. अयोध्येस आल्यावर दशरथाने रामाला राज्यभार स्वीकारण्यास सांगितले. भरताने विरक्त होऊन वडिलांसह तपस्येसाठी जाण्याची इच्छा व्यक्त केली. ते ऐकून कैकेयी दुःखी  झाली वा तिने दशरथाकडे भरतासाठी चौदा वर्षांपर्यंत राज्यभार मागितला. हे ऐकून सर्वजण व्यथित झाले, परंतु रामाने चौदा वर्षे दिग्विजयासाठी बाहेर पडण्याचे जाहीर केले. सीता वा लक्ष्मणही रामासह निघाले. प्रयाणाला निघताना राम-सीता –लक्ष्मणाने रत्‍नभवनात जाऊन जिनदेवांचे आशीर्वाद घेतले. विविध नगरांमधून प्रवास करीत असताना राम-लक्ष्मणांनी वाटेवर आड आलेल्या शत्रूंचा नाश केला. विनयाने सामोरे आलेल्या राजांची मैत्री स्वीकारली.या राजांना त्यांची मदत झाली त्यांनी राम व लक्ष्मण यांच्याशी आपापल्या कन्यांचे विवाह करून दिले. (वाल्मिकी रामायणात श्रीराम हा एकपत्‍नी आदर्श पती म्हणून मान्यता पावला आहे.)  कर्णध्वज नावाच्या सरोवराकाठी शांतीच्या अपेक्षेने अणुव्रत स्वीकारलेल्या एका गिधाडाला सीतेने आपला पुत्र मानले- हा जटायू! दंडकारण्यात रहात असताना एक प्रसंग घडला- रावणाची बहीण चंद्रनखी  हिचा मुलगा अरण्यात तप करीत होता.अनवधानाने राम-लक्ष्मणाकडून त्याची हत्या झाली. ते ऐकून खर व दूषण रामावर चालून गेले. सीतेला एकटी सोडून जाण्यापेक्षा लक्ष्मणाने युद्ध करावे व गरज भासल्यास लक्ष्मण रामाला बोलावून घेईल असे ठरले. युद्धभूमीवर लक्ष्मण पराक्रम गाजवीत असताना रावणाने एका शक्तिदेवतेला वश केले. लक्ष्मणाच्या मदतीसाठी रामाला खोटी हाक त्या देवतेने मारली व ती ऐकून, सीतेला एकटे सोडून राम युद्धासाठी आला. त्यानंतर राम-लक्ष्मणांच्या लक्षात आले की कोणी मायावी शक्तीने हा कट रचला होता. परंतु तोपर्यंत रावणाने सीतेचे हरण केले होते. जटायूकडून त्यांना ही बातमी समजली. सुग्रीव, जांबुवंत, हनुमान यांच्या भेटीनंतर शोकाकुल राम-लक्ष्मणांनी रावणाचे पारिपत्य करण्याचे ठरविले. त्यापूर्वी हनुमानाने लंकेत जाऊन सीतेची भेट घेतली व स्व-पराक्रमाने लंकेची नासधूस केली. ते सारे पाहून रावण अतिशय रागावला. नभोगमन – विद्या बलाने राम-लक्ष्मणासह सर्व सैन्य आकाशमार्गे लंकेच्या रणभूमीवर येऊन पोहोचले. युद्धात लक्ष्मणाने वीरश्री गाजविली. रावणाने फेकलेल्या सुदर्शन चक्रानेच रावणाचा नाश करण्याची आज्ञा रामाने लक्ष्मणाला केली व त्यानुसार  लक्ष्मणाने रावणाचा वध केला! ( वाल्मीकी रामायणात श्रीरामानेच दशानन रावणाचा वध केला आहे.)

रावणाच्या निधनानंतर त्याची पत्नी मंदोदरी हिने ४८,००० विद्याधर स्त्रिया व आपल्या कुटुंबासह जिनव्रताची दीक्षा घेतली. सीतेसह अयोध्येला सुखरूप परत आल्यावर राम-लक्ष्मणांनी ज्या ज्या कन्यांचे पाणिग्रहण केले होते त्यांनाही अयोध्येला बोलावून घेतले.

एके रात्री सीतेला दोन स्वप्ने पडली. एका स्वप्नात  दिसले की दोन बाण तिच्या मुखात प्रवेश करीत आहेत व दुसऱ्या स्वप्नात ती पुष्पक विमानातून खाली पडली आहे. पहिले स्वप्न शुभसूचक असून सीतेला दोन पराक्रमी पुत्र होतील असा त्या अर्थ, पण दुसरे स्वप्न दुःखरूप ठरेल असे रामाने सीतेला सांगितले.

कालांतराने सीता गर्भवती राहिली. तिच्या मनात जिनपूजेची तीव्र इच्छा जोर धरू लागली. त्याचवेळी काही ग्रामीण लोक रामाकडे आले व दुराचारी रावणाकडे राहिलेल्या सीतेचा रामाने स्वीकार केल्याबद्दल टीका करू लागले. याविषयी लक्ष्मणाने सीतेची बाजू घेतली व रामाने सीतात्याग करू नये असे रामाला सुचविले. पण रामाने आपला राजधर्म पाळायचे ठरविले. अयोध्येजवळ असलेल्या सम्मेद पर्वतापाशी असलेल्या जिनाल्यात सीतला पूजा करण्यासाठी न्यावे वा तेथेच सोडून द्यावे अशी आज्ञा रामाने दिली. अरण्यात पोहोचल्यावर सीतेला हे समजले व ती रडू लागली. पण जिनव्रती असल्याने परलोकप्राप्तीची साधना करण्याचे तिने ठरविले. याचवेळी जिनव्रती राजकुमार वज्रजंघ वनात शिकारीला आला.एकाकी सीतेचा वृतान्त समजल्यावर ते तिला आपल्या राज्यात घेऊन आला व तिला त्याने आपल्या बहिणीप्रमाणे सांभाळले. ( वाल्मिकी रामायणात  सीतात्यागानंतर  वाल्मिकी ऋषींच्या आश्रमात राहिली असे कथानक आहे.) नवमास पूर्ण झाल्यावर सीतेने लव-कुशाना जन्म दिला. ते यथावकाश मोठे झाले; शास्त्र-कला पारंगत, पराक्रमी झाले. एकदा नारद, लव आणि कुशाला भेटले आणि राम-लक्ष्मण यांचा आदर्श घेऊन त्यांनी कीर्ति प्राप्त करावी असे ते त्यांना म्हणाले. नारदांकडून रामकथा ऐकल्यावर, आपल्या निरपराध मातेचा त्याग केलेल्या रामावर, लव आणि कुश यांनी ससैन्य हल्ला चढविला. त्यांच्या पराक्रमापुढे राम व लक्ष्मणही हतबल झाले. त्यावेळी नारदांनी लक्ष्मणाला सांगितले की सीतेवर झालेल्या अन्यायामुळे चिडून युद्धासाठी आलेले हे दोघे रामाचे पुत्र आहेत. हे ऐकून राम व लक्ष्मण आनंदित झाले. त्यांनी लव-कुशाचे प्रेमाने स्वागत केले. पुंडरीकपूरला जाऊन सुग्रीव सीतेला भेटला व तिला अयोध्येला घेऊन आला. आपण अकलंकित असल्याचा पुरावा म्हणून सीतेने अग्निपरीक्षाही दिली. रामाने तिला राजगृही येण्याची विनंती केली, पण ती नाकारून सीतेने विरागिनी होऊन तपस्या करण्याचे ठरविले. श्रीरामानेही सिद्धशैल शिखरावर जिनव्रताची कठोर तपश्चर्या केली व शाश्वत मुक्ती प्राप्त केली.

या रामायणावर जैन परंपरेचा प्रभाव असल्याने या रामायणातील सर्वच पात्रे ही जैन परंपरा पाळणारी आहेत, व ती त्याप्रमाणे आचरण करतात असे दिसून येते- हे या रामायणाचे वैशिष्टय!

अध्यात्म रामायण[संपादन]

परमेश्वराच्या ठिकाणी भक्तिभाव कसा ठेवावा याचे मार्गदर्शन करणारा ग्रंथ म्हणून अध्यात्म रामायणाचे विशेष महत्त्व आहे. यामध्ये रामायणाच्या कथानकातच प्रसंगानुरूप रामाच्या तत्त्वज्ञानात्मक रूपाचे वर्णन केलेले दिसून येते.ब्रह्मांड पुराणाचा एक भाग असलेल्या अध्यात्म रामायणात ज्ञान आणि भक्ती यांचा समन्वय झालेला दिसून येतो. यालाच अध्यात्मरामचरित किंवा आध्यात्मिक रामसंहिता असेही म्हणतात.या ग्रंथाची ७ कांडे आणि १५ सर्ग आहेत.

अध्यात्म म्हणजे आत्म्याविषयीचे ज्ञान. सर्व विश्वाला व्यापणारे अव्यक्त अविनाशी तत्त्व कोणते त्याचा विचार करणे म्हणजे अध्यात्मशास्त्र. ईश्वरस्वरूपाची ओळख करून घेणे म्हणजे अध्यात्म. या ग्रंथात श्रीराम हे सर्व जगाचे आदिकारण आहेत आणि भक्तांच्या उद्धारासाठी त्यांनी रामावतार घेतला आहे अशी या रामकथेचा मुख्य आशय असल्याने तिला अध्यात्म रामायण असे नाव दिले आहे.

रामकथा-
प्रमाणातीत, माया-जीव-ईश्वर यांच्या पलीकडे असलेल्या, निर्मल, विषयरूप मलविवर्जित, आत्म्स्वरूपज्ञान हेच शरीर, वाणी वा मन यांना अगोचर अशा दक्षिणामूर्तींना नमस्कार करून या रामायणाची सुरुवात होते.
देवर्षी नारद एकदा ब्रह्मलोकात गेले असता त्यांनी ब्रह्मदेवाला विचारले- ‘कलियुगात अनेक चुकीच्या गोष्टींच्या अधीन झालेल्या नष्टबुद्धी लोकांना परलोकाची प्राप्ती कशी होईल यावर काही उपाय सांगा.’ त्यावर ‘रामाचे यथार्थ स्वरूप जाणून घेण्याच्या इच्छेने पार्वतीने केलेल्या विनंतीनुसार भगवान शंकरांनी सांगितलेले अध्यात्म रामायण या कलियुगातील लोकांचे रक्षण करील’ असे ब्रह्मदेवाने नारदांना सांगितले.
अध्यात्म रामायणाच्या कथानकात वाल्मिकी रामायणापेक्षा काही वेगळेपण आहे.-
१. वाल्मिकी रामायणाचे गायन राम-सीतेचे पुत्र लव-कुश यांनी केले आहे, तर अध्यात्म रामायण हे भगवान शंकरांनी पार्वतीला सांगितले आहे.
२. रामजन्माचे प्रयोजन सांगताना म्हटले आहे की रावण वा त्याचा भाऊ कुंभकर्ण यांनी देवांना त्रास दिला. मनुष्याच्या हातूनच रावणाचा वध होईल अशी ब्रह्मदेवाची योजना होती वा त्यासाठीच विष्णूने रामावतार घेतला.
३. विश्वामित्रांनी राम व लक्ष्मण यांना मिथिलेला नेले.जनक राजाने आपली कन्या सीता हिच्या स्वयंवराची योजना केली होती. भगवान शिवाचे धनुष्य जो कोणी उचलेल आणि त्याला प्रत्यंचा लावेल त्याला सीता माळ घालेल असा स्वयंवराचा पण होता. सीता स्वयंवराचे असे आख्यान अध्यात्म रामायणात नाही. रामाने जनकाच्या नगरीत जाऊन तेथे असलेले शिवधनुष्य सहज पेलले आणि जनकाने या पराक्रमी युवराजाला आपली कन्या सीता विवाहपूर्वक दिली. धनुष्य तुटलेले समजल्यावर भगवान परशुराम, मिथिलेहून अयोध्येच्या वाटेवर परत जाणाऱ्या दशरथ आदि सर्वांना रागाने सामोरे गेले. प्रथम रामाविषयी त्यांनी आपला क्रोध व्यक्त केला परंतु नंतर मात्र श्रीरामाचे स्व-रूप लक्षात येताच त्यांना शरण जाऊन त्यांची स्तुती केली.परशुराम म्हणाले- ‘मला तुझ्या भक्तांची संगती वा तुझ्या चरणी दृढ भक्ती सदा लाभो. जो हे तुझे स्तोत्र म्हणेल त्याला भक्ती, विज्ञान वा अंतःकाळी तुझे स्मरण लाभो.’

ज्याप्रमाणे सीता स्वयंवर आख्यान या रामायणात नाही त्याप्रमाणे प्रसिद्ध अशा लक्ष्मणरेषेचा उल्लेखही यामध्ये नाही. मारीचाने कांचनमृगाचे रूप घेऊन सीतेला मोहित केल्यावर श्रीराम त्याच्यामागे जातात, त्यावेळी श्रीरामांचा आवाज ऐकून सीता लक्ष्मणाला रामाच्या रक्षणासाठी जायला सांगते. त्यावेळी तिच्याच रक्षणाचा विचार करून लक्ष्मण जायला तयार होत नाही. सीतेच्या आग्रहाखातर तो जातो, पण जाण्यापूर्वी लक्ष्मण एक रेषा काढतो वा कोणीही आले तरी ही रेषा ओलांडू नकोस असेही बजावतो. अध्यात्म रामायणातील सीता लक्ष्मणाचा अपमान करून त्याचा धिक्कार करते आणि त्यामुळे काहीसा चिडलेला लक्ष्मण तिला तसेच सोडून रामाच्या मदतीला निघून जातो असा कथाभाग आहे.
या रामायणामध्ये श्रीरामांनी शबरीला भक्तीची आणि लक्ष्मणाला ज्ञानाची साधने सांगितली वनवासाहून परत आल्यानंतर हनुमानाला प्रत्यक्ष सीतेने रामाचे स्वरूप सांगितले, त्याला ‘रामहृदय’ असे म्हटले जाते. त्याचे पठन जो करतो त्याची पापातून मुक्ती होते असे त्याचे फलही सांगितले आहे. योगमाया सीता सांगते- “राम हा सच्चिदानंदरूप आहे. तो गुणरहित, सर्वप्रेरक, स्वयंप्रकाशी, पापरहित आहे. राम हा शोकरहित आहे. त्याच्या रूपात बदल होत नाही. तो सृष्टिरूप भासतो ते मायेमुळेच. उत्पत्ती, स्थिती आणि लय करणारी आदिमाया मीच आहे आणि या रामायाणातील सर्व घटना मायारूपी सीतेनेच घडविल्या आहेत.”
. या रामायणात गंधर्वाने केलेली रामस्तुती वैशिष्टपूर्ण आहे.- रामाचा देह म्हणजे ब्रह्मांड. पाताळ हे त्याचे तळवे, आकाश ही त्याची नाभी, अग्नी हे त्याचे मुख, सूर्य हे डोळे, चंद्र हे मन, यम ह्या त्याच्या दाढा, नक्षत्रे त्याचे दात, दिवस वा रात्र म्हणजे त्याच्या डोळ्यांची उघडझाप असे म्हणून श्रीराम हे सर्वव्यापी तत्त्व आहे असे म्हटले आहे. या रामायणाच्या शेवटी भगवान शंकर म्हणतात-
अहं भवन्नाम गृणान्कृतार्थो वसामि काश्यामनिशं भवान्या |
मुमूर्षमाणस्य विमुक्तये S हं दिशामि मंत्रं तव रामनाम ||
मी (महादेव) तुझाच जप करीत काशीतच निवास करतो. मरणासन्न प्राण्याला मुक्तीसाठी तुझ्याच नावाचा उपदेश करतो.

रामायणाचा विश्वव्यापी प्रभाव[संपादन]

रामायण आणि महाभारत ही महाकाव्ये भारतीय संस्कृतीचे दोन शाश्वत आधार स्तंभ आहेत. सांस्कृतिक जीवनाच्या वाटचालीत, पडझडीत आजही मार्गदर्शन करणारे दीपस्तंभ आहेत. रामायण, महाभारत या ग्रंथांतील तत्त्वज्ञानाने भारतीय संस्कृतीला नीतिमूल्यांचे, जीवनाच्या शाश्वत मूल्यांचे अधिष्ठान मिळाले. त्यातील महन्मंगल चारित्र्याच्या गुण संस्कारामुळे येथील समाजमनाचे पोषण झाले. विकसन झाले. आसेतु हिमाचलपसरलेल्या या देशात सांस्कृतिक एकता निर्माण होऊ शकली. त्याच एकात्मतेच्या जोरावर ही संस्कृती अनेक भीषण आघात व इतिहासातील आक्रमणे पचवू शकली.

भारतीय संस्कृतीची प्रसरणशीलता विलक्षण आहे. येथील पूर्वज जीवनाचे, संस्कृतीचे उच्च तत्त्वज्ञान घेऊन संपूर्ण जगात पसरले. कोणत्याही प्रकारची जुलूम-जबरदस्ती, हिसाचार न करता त्यांनी आपला सांस्कृतिक प्रभाव निर्माण केला. त्याची साक्ष आज जे संशोधने होत आहेत, साहित्याचा अभ्यास होतो आहे, त्यातील भावधारा शोधण्याचा, तिचा उगम शोधण्याचा, संशोधक प्रयत्‍न करीत आहेत यावरून पटते आहे. जगाच्या निरनिराळ्या भागांत होत असलेल्या उत्खननांतून डोकावणारी भारतीय देव-देवतांची मंदिरे, त्यांच्या साहित्यातून निर्माण झालेल्या कथा व त्यातील उल्लेख आपल्या या सांस्कृतिक अधिराज्याच्या खुणा दर्शवितात.

चीन आणि तिबेट[संपादन]

इतिहासाच्या अनुशीलनाने हे लक्षात येते की, इ.स.च्या प्रारंभी काली ‘कुशाण' वंशाचे राज्य काशीपासून तो खोतानपर्यंत पसरले होते. त्यामुळे त्याला जोडून असलेले देश भारतीय संस्कृतीमुळे प्रभावित होणे हे अगदी स्वाभाविक होते. हा संपर्क स्थापित होण्याचे आणखीही एक कारण म्हणजे इ. स. ८५ ते १०५ या कालखंडात चिनी सम्राट ‘हो-ती' याचा सेनापती ‘यान्-छाव' याने मध्य आशियात केलेल्या स्वाऱ्या होत. त्यामुळे चीन आणि मध्य आशिया यांचा परस्परांशी संबंध प्रस्थापित होऊन दुसऱ्या शतकापर्यंत तेथे भारतीय साहित्याचा प्रभाव बराच वाढला. इ. स. ४७२ मध्ये ‘चि-चिया-यन्'ने‘पाओ-त्सांग-चिङग्' या त्याच्या ग्रंथाचा प्रारंभच रामायणाने केला. ‘चि-चिआ-य' हे संस्कृतच्या ‘केकेय' नावाचे रूपांतर आहे. या ग्रंथाच्या उपसंहारात रामराज्याचे मोठे गुणगान केलेले आहे. इ. स. ५८० मध्ये नेपाळ अधिपती ‘अशुवर्मा' याच्या मुलीचा विवाह ‘ल्हासा' या ठिकाणी करण्यात आला. त्यामुळे त्याचा भारताशी अधिकच निकटचा संबंध आला. त्या काळात भारतात प्रभुत्व पावलेल्या बौद्ध साहित्याचा तेथे प्रभाव पडणे अगदी स्वाभाविकच होते. त्यापैकी ‘अनामकं जातकम्'नावाच्या बौद्ध जातकाचे ‘कांग-से-इ' नावाच्या चिनी लेखकाने चिनी भाषेत रूपांतर केले ते ‘लिये-उतुत्सी' नावाच्या ग्रंथात सुरक्षित आहे. त्यात राम-सीतेचा वनवास, सीताहरण, जटायुचा वृत्तान्त, वाली आणि सुग्रीव यांचे युद्ध, सीतेची अग्निपरीक्षा इत्यादी घटनांचे मोठे रोचक वर्णन केले आहे. या ग्रंथाच्या कितीतरी हस्तलिखित प्रती उपलब्ध आहेत.

सायबेरिया[संपादन]

सायबेरिया हा आशियाच्या अति उत्तरेला असलेला देशआहे. त्यालाच प्राचीन भारतीय साहित्यात ‘शिबिर देश' म्हणून उल्लेखिला जात असे.[ संदर्भ हवा ] हा प्रदेश हिमाच्छादित आहे. त्याठिकाणी मंगोलियाच्या क्षेत्रात, तसेच रशियामधून वाहणाऱ्या ‘व्होल्गा' नदीच्या किनाऱ्यावर भगवान प्रभू रामचंद्रांचे चरित्र ऐकविले जात असे.[ संदर्भ हवा ] तेथे इ. स. ११८२ ते १२५१ मध्ये ‘कुबलाईखान' नावाचा सम्राट होता. त्याचे गुरू पंडित ‘आनंदध्वज' होते.[ संदर्भ हवा ] त्यांनी ‘एर्देनियन-सांङ्ग-सुबाशिदि' नावाचा ग्रंथ लिहिला.[ संदर्भ हवा ] त्यातील ‘एर्देनि' हे रत्‍नाचे व ‘सुबाशिदि' हे सुभाषिताचे मंगोलियन भाषारूप होय. त्याचे सरळ भाषांतर म्हणजे ‘सुभाषित रत्‍ननिधी' हे होय. त्यावर ‘रिच्छेनपाल्साङ्पो'यांची टीका आहे. त्यात रामायणाचा सारांश मिळतो.[ संदर्भ हवा ] त्यात असे सांगितले आहे की, लंकाधिपती रावण जनहितापासून विन्‍मुख झाल्यामुळे नाशाला प्राप्त झाला. खालील मूळ उताऱ्यात त्या कथेचे सार आले आहे.

ओलान्-दुर-आरव बोलुग्रासन येरवे रवुुमुन् देमि*आलिया नागादुम्बांŸ। ओख्यु आमुर सांगुरक्रुबा इद्रेन ओम्दागानदूर नेङ्ग उलु शिनुग्युयाईŸ। ओल्ज गुसेल दुर नेङ्ग येसेशिनुग्सेन-उ गेम इयेरŸ। ओरिदुमान्गोस-उन निगेन खागान् लंगा-दुर आलाग्दासान-

म्हणजे जनतेच्या नेत्यांनी, महापुरुषांनी क्षुल्लक अशा आनंदात मग्न होऊ नये. विषयलंपट होऊ नये. लोभात पडल्यानेव कामवश झाल्याने प्राचीन काळी राक्षसराज रावण लंकेत मारला गेला. अशा प्रकारे ही ‘रामन खागान्' म्हणजे ‘राजा राम' यांची कथा आज हजारो वर्षांपासून मंगोलियन, सैबेरियन, रशियन लोकांमध्ये वाचली जाते, सांगितली जात आहे.

कांबोडिया[संपादन]

कांबोडियालाच ‘कांबोज' किवा ‘कंबूज' असेही म्हणतात. याची स्थापना स्वायंभुव मनुने केली असे समजले जाते. या देशाची राजधानी ‘नॉम्पेन' आहे. या ठिकाणी संस्कृत भाषेतील सहस्रावधी शिलालेख सापडले आहे. येथील भाषेवर संस्कृत आणि पाली भाषेचा प्रभाव आहे. येथील विराट सभागृहावरील भिंतीवर इ. स. १२०० मध्ये सम्राट द्वितीय सूर्यवर्मन याच्या काळात रामायण आणि महाभारत यांतील दृश्ये अंकित केली आहेत. येथील साहित्यात रामायण हे ‘रामकीर्ती' या नावाने प्रतिष्ठित झाले आहे.

इंडोनेशिया[संपादन]

कांबोडियानंतर रामायणाचा प्रचार व प्रभाव इंडोनेशियातही बराच असल्याचे आढळून येते. प्राचीन साहित्यात इंडोनेशियाला ‘द्वीपान्तर' या नावाने ओळखले जात असे. येथील दोन मंदिरांच्या भिंतीवर खोदलेल्या चित्रलिपीवरून रामायण कथेचे अस्तित्व दिसून आले. इंडोनेशियातील रामायणावर प्रामुख्याने वाल्मीकि रामायणाचा प्रभाव आहे. त्याचे नाव ‘काकाविन रामायण' असून, त्याचा रचयिता योगेश्वर कवी आहे, असे म्हणतात. याचा रचनाकाल ११ वे शतक आहे. यात संस्कृत काव्य रचनेतील प्रमुख वृत्तांचा व छंदांचा वापर केलेला आहे. रामायणातील सर्व महत्त्वाचे प्रसंग मर्मस्पर्शी पद्धतीने रंगविले असून, त्यातून रामायणातील तत्त्वज्ञानाची मांडणी केली आहे. राम-भरत भेटीच्या प्रसंगात पादुका देताना रामचंद्र भरताला उपदेश करतात-

शील रहयु रक्षन रागद्वेष हिलङकॅनŸ। किम्बरू यत हीलनु, शून्याम्बक्त लवन अनवŸ।। गॉंङग हॅंकार यत हिलनŸ। निन्दा तन् गवयाकॅन्Ÿ। तं जन्मामुहर वॅक्रŸ । येक प्रश्नय सुमुखŸ।।

म्हणजे- ‘हे भरता! चारित्र्याचे रक्षण कर. राग-द्वेष सोडून दे. ईर्षा आदी दोषांपासून मन आणि शरीर शून्य कर. अत्यधिक अहंकारापासून स्व्त:ला वाचव. निंदा करू नकोस. कुलीन घराण्याचा गर्व करू नकोस. हे भरता! हाच खरा धर्म आहेव हेच खरे सत्य आहे.' या प्रकाराचा रामाचा उपदेश ग्रहण करून भरत अयोध्येला परत गेला आणि भक्तिपूर्वक राज्यरक्षणात व्यस्त राहिला.

‘भरत सिर तमोल: भक्ति मंराक्षराज्य-' या ‘काकाविन रामायण' परंपरेच्या जोडीने ‘हिकायतसेरी राम' आणि जावामधील ‘रामकेलि' या रामायणाच्या प्रती सापडतात. याशिवाय रामायणाचा प्रभाव इंडोचीन, सयाम, ब्रह्मदेश, पश्चिमी देश याही देशांमध्ये दिसून येतो. इंडोचीनमध्ये ‘चंपा' राज्य स्थापन झाले. भारतीय व्यापाऱ्यांबरोबर ‘रामकथा' तेथे पोहोचली. सयाम मध्ये रामायण ‘रामकियेन' या नावाने प्रसिद्ध आहे, तर ब्रह्मदेशातील काव्यग्रंथ ‘यामत्वे' हा वस्तुतः रामकथाच आहे. पश्चिमेकडील सुमेरियन वंशातील लोक ‘दशावतार' मानतात, ते सुद्धा रामकथेला अधिक महत्त्व देतात. जेसुईट मिशनरी ‘जे. फेनचियो' याने इ. स. १६०९ मध्ये ‘लिब्रो-डा-सैटा' या नावाचे लिखाण केले. त्यात त्याने दशावताराचे निरूपण केले आहे, तसेच दक्षिणेकडे प्रचलित असलेल्या एका रामकथेचे विस्तृत वर्णन केले आहे. याप्रमाणे संपूर्ण विश्वात पसरलेल्या रामकथेचे हे रूप आहे.

मर्यादा-पुरुषोत्तम प्रभू श्रीराम[संपादन]

वाल्मीकी रामायणात सांगितलेले प्रभू श्रीराम हे मर्यादा-पुरुषोत्तम आहे. कवीच्या दिव्य प्रतिभेतून साकार झालले हे महन्मंगल व्यक्तिमत्त्व आहे असे समजायला हरकत नाही. त्यानुसार, मानवी जीवनाशी संबंधित असलेल्या सर्व भूमिकांचा परमोच्च, उत्तुंग आदर्श म्हणजे श्रीप्रभू रामचंद्र. आदर्श राजा, आदर्श पुत्र, आदर्श बंधू, आदर्श सखा, आदर्श पती, आदर्श नेता, आदर्श वीराग्रणी,‘जननी जन्म भूमिश्च स्वर्गादपि गरियसी' असा देशभक्तीचा उत्तुंग आदर्श जीवनात आचरणात आणणारा मातृभक्त आणि ‘मरणान्तानि वैराणि न मे कृतानिच' हा प्रत्यक्ष वैरी व शत्रूच्याही बाबतीत अंतःकरणाची विशालता दाखविणारा हा मानव आहे. या विविध गुण समुच्चयाचे सांस्कृतिक प्रतीक असणाऱ्या रामाला म्हणूनच मर्यादा-पुरुषोत्तम म्हटले जाते.

महर्षी वाल्मीकींनी रामायणाच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचे जीवनव्यापी शाश्वत मूल्ये मांडली.. त्यांचा प्रभाव संपूर्ण जगात पसरला. त्यासाठी आपले(?) पूर्वज विजिगीषु वृत्तीने जगाच्या अनेक भागांत गेले. श्रेष्ठ असलेल्या भारतीय संस्कृतीचे पसायदान त्यांनी मुक्त हस्ते संपूर्ण मानवजातीला दिले. त्यांच्या जीवनात ‘राम' निर्माण केला.

Rin Mochan Mangal stotra in Sanskri | ऋणमोचक मंगल स्तोत्र मङ्गलो भूमिपुत्रश्च ऋणहर्ता धनप्रदः।

स्थिरासनो महाकयः सर्वकर्मविरोधकः ॥1॥

लोहितो लोहिताक्षश्च सामगानां कृपाकरः।

धरात्मजः कुजो भौमो भूतिदो भूमिनन्दनः॥2॥

अङ्गारको यमश्चैव सर्वरोगापहारकः।

व्रुष्टेः कर्ताऽपहर्ताच सर्वकामफलप्रदः॥3॥

एतानि कुजनामनि नित्यं यः श्रद्धया पठेत्।

ऋणं न जायते तस्य धनं शीघ्रमवाप्नुयात्॥4॥

धरणीगर्भसम्भूतं विद्युत्कान्तिसमप्रभम्।

कुमारं शक्तिहस्तंच मङ्गलं प्रणमाम्यहम्॥5॥

स्तोत्रमङ्गारकस्यैतत्पठनीयं सदा नृभिः।

न तेषां भौमजा पीडा स्वल्पाऽपि भवति क्वचित्॥6॥

अङ्गारक महाभाग भगवन्भक्तवत्सल।

त्वां नमामि ममाशेषमृणमाशु विनाशय॥7॥

ऋणरोगादिदारिद्रयं ये चान्ये ह्यपमृत्यवः।

भयक्लेशमनस्तापा नश्यन्तु मम सर्वदा॥ 8 ||

अतिवक्त्र दुरारार्ध्य भोगमुक्त जितात्मनः।

तुष्टो ददासि साम्राज्यं रुश्टो हरसि तत्ख्शणात्॥9॥

विरिंचिशक्रविष्णूनां मनुष्याणां तु का कथा।

तेन त्वं सर्वसत्त्वेन ग्रहराजो महाबलः॥10॥

पुत्रान्देहि धनं देहि त्वामस्मि शरणं गतः।

ऋणदारिद्रयदुःखेन शत्रुणांच भयात्ततः॥11॥

एभिर्द्वादशभिः श्लोकैर्यः स्तौतिच धरासुतम्।

महतिं श्रियमाप्नोति ह्यपरो धनदो युवा॥12॥

|| इति श्री ऋणमोचक मङ्गलस्तोत्रम् सम्पूर्णम् |

      एकश्लोकिरामायणम्==

आदौ रामतपोवनादिगमनं हत्वा मृगं काञ्चनम्

वैदेहीहरणं जटायुमरणं सुग्रीवसम्भाषणम् ।

वालीनिर्दलनं समुद्रतरणं लङ्कापुरीदाहनम्‌

पश्चात् रावणकुम्भकर्णहननम् एतद्धि रामायणम्

रामायणाच्या कथानकावर आधारित मराठी-हिंदी-इंग्रजी पुस्तके[संपादन]

  • अयोध्येचा रावण आणि लंकेचा राम  : राम आणि रावण ह्यांच्या वैचारिक सहअस्तित्वाची अभिनव पुराणकथा (मूळ गुजराथी लेखक - दिनकर जोषी; मराठी अनुवादक - सुषमा शाळिग्राम)
  • उत्तररामचरितम् (संस्कृत नाटक, लेखक भवभूती; मराठी रूपांतर : परशुरामपंत गोडबोले)
  • उर्मिला (हिंदी काव्य; कवी - मैथिलीशरण गुप्त)
  • उर्मिला (महाकाव्य; हिंदी कवी - बालकृष्ण शर्मा नवीन)
  • कंब रामायण (मूळ तमिळ कवी - कंबर)
  • बंगला कृत्तिवास रामायण (मूळ बंगाली कवी संत कृत्तिवास, हिंदीत अनुवादित, ३ खंड)
  • गीतरामायण (काव्य; कवी - ग.दि. माडगुळकर)
  • तत्त्वार्थ रामायण (हिंदी, प्रवचनसंग्रह लेखक/प्रवचनकार डोंगरे महाराज)
  • दक्षिण भाषेतील रामायणे (तौलनिक अभ्यास, पुस्तक; लेखक - लक्ष्मीनारायण बोल्ली)
  • श्री राम चरित मानस/तुलसी रामायण (मूळ हिंदी काव्य; कवी तुळशीदास, मराठी अनुवाद - सुलोचना खांडेकर)
  • बर्ड्‌ज ऑफ रामायणा (इंग्रजी; लेखक - डॉ. भारत भूषण) :- रामायणात उल्लेख असलेल्या काकभृशंडी, क्रौंच, गरुड, जटायू, संपाती आदी पक्ष्यांबद्दलचे संशोधनात्मक पुस्तक.
  • भानुभक्त रामायण (काव्य, नेपाळी कवी - भानुभक्त)
  • भावार्थ रामायण (काव्य, कवी - एकनाथ)
  • श्री मोल्ल रामायण (काव्य, मूळ तेलुगू कवी मोल्ल; हिंदी अनुवाद - ?)
  • रामायण (८-खंडी पुस्तक मालिका; इंग्रजी लेखक - अशोक बँकर).  :- ई-पुस्तक म्हणूनही उपलब्ध)
  • श्री रामायण कथा (लेखक - त्र्यं. ग. बापट)
  • रामायण कथासार (अलका मुतालिक)
  • महामुनि आदिकवि वाल्मीकिप्रणीत श्री रामायण महाकाव्य (मूळ संस्कृत आणि मराठी अनुवाद, १० खंड; लेखक -श्री.दा. सातवळेकर आणि विष्णू दामोदरशास्त्री पंडित तोफखाने)
  • श्रीमद्वाल्मीकीय रामायण (हिंदी)
  • रामायण : वनवास रहस्य (सकाळ प्रकाशन)
  • वास्तव रामायण (लेखक - पद्माकर विष्णू वर्तक)
  • शत्रुंजय रामायण (हिंदी काव्य; कवी - रघुनाथ महंत)
  • सीता : रामायणाचे चित्रमय पुनःकथन (मूळ लेखक-चित्रकार - देवदत्त पट्टनाईक, मराठी अनुवाद - विदुला टोकेकर)
  • ह्यांना विसरू नका (लेखिका - अनुराधा निवसरकर)

प्रसंगानुरूप चित्रपट[संपादन]

  • सीता स्वयंवर (मराठी) आणि इतर अनेक

संपूर्ण चित्रपट[संपादन]

  • संपूर्ण रामायण (मराठी चित्रपट, १९६१, दिग्दर्शक बाबूभाई मिस्त्री)
  • यू-ट्यूबवरील चित्रपटमालिका

दूरदर्शन मालिका[संपादन]

  • राम सिया के लव कुश (निर्माता : सिद्धार्थकुमार तिवारी) पहिला एपिसोड कलर्स टीव्हीवर ५ ऑगस्ट २०१९पासून
  • रामायण (लेखक, दिग्दर्शक, निर्माता : रामानंद सागर) : ७८ भाग. सुरुवातीला १९८७-८८ आणि नंतर सन २००८.

चित्रदालन[संपादन]

बालकांड[संपादन]

अयोध्या कांड[संपादन]

अरण्य कांड[संपादन]

किष्किंधा कांड[संपादन]

सुंदर कांड[संपादन]

लंका कांड[संपादन]

उत्तर कांड[संपादन]

अधिक वाचन[संपादन]


हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]


  1. ^ Valmiki (1980-11). Ramayana (इंग्रजी भाषेत). Greenleaf Books. ISBN 978-0-934676-17-5. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ Joshī, Dinakara (2005). Bhāratiya samskriti ke sarjaka (हिंदी भाषेत). Star Publications. ISBN 978-81-85244-93-8.
  3. ^ Sharma, Arvind (2003). The Study of Hinduism (इंग्रजी भाषेत). Univ of South Carolina Press. ISBN 978-1-57003-449-7.
  4. ^ Kampar (2002). Kamba Ramayana (इंग्रजी भाषेत). Penguin Books India. ISBN 978-0-14-302815-4.
  5. ^ Bose, Anita. Ramayana: Footprints in South-East Asian Culture and Heritage (इंग्रजी भाषेत). BEE Books.
  6. ^ Roveda, Vittorio (2015). In the Shadow of Rama: Murals of the Ramayana in Mainland Southeast Asia (इंग्रजी भाषेत). River Books. ISBN 978-616-7339-30-6.
  7. ^ Robert P. Goldman, The Ramayana of Valmiki: An Epic of Ancient India, pp 5
  8. ^ Soni, Suresh (2009-01-01). Sources Of Our Cultural Heritage (इंग्रजी भाषेत). Prabhat Prakashan. ISBN 978-81-8430-051-2.
  9. ^ GUPTA, SEEMA (2013-01-02). Ramayana (इंग्रजी भाषेत). V&S Publishers. ISBN 978-93-5057-334-1.
  10. ^ Raghunathan, N. (trans.), Srimad Valmiki Ramayana
  11. ^ रघुनाथन्, एन्. (अनुवाद), श्रीमद् वाल्मीकि रामायणम्
  12. ^ In the Vedas Sita means furrow relating to a goddess of agricuture. - S.S.S.N. Murty, A note on the Ramayana
  13. ^ Goldman, Robert P., The Ramayana of Valmiki: An Epic of Ancient India pp 24
  14. ^ Goldman, Robert P., The Ramayana of Valmiki: An Epic of Ancient India pp 15-16
  15. ^ See Sankalia, H.D., Ramayana: Myth or Reality, New Delhi, 1963
  16. ^ Basham, A.L., The Wonder that was India, London, 1956, pp303
  17. ^ Goldman, Robert P., The Ramayana of Valmiki: An Epic of Ancient India p. 14
  18. ^ See A different song, The Hindu, Aug 12, 2005 Archived 2010-10-27 at the Wayback Machine.
  19. ^ See Effect Of Ramayana On Various Cultures And Civilisations