गीतरामायण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

Please make a note of this here officially that the permission to use applies to marathi wikipedia only and that the matter is still protected under applicable copyrights.

गीतरामायण म्हणजे गीतांच्या रुपाने सांगितलेले रामायण. ग. दि. माडगूळकरांनी आपल्या अतुल्य काव्यप्रतिभेने गीतरामायण मराठी गीतांत रचले. सुधीर फडके यांनी सुंदर संगीत देऊन स्वतः गीतरामायणाचे गायन केले.

गीतरामायणाचे आजपर्यंत हिंदी भाषा, गुजराथी, कन्नड, बंगाली, आसामी भाषा, तेलुगु, मल्याळी, संस्कृत, कोकणी अशा विविध भारतीय भाषांमध्ये भाषांतर झालेले आहे. या सर्व भाषांतरांचे वैशिष्ठ्य म्हणजे भाषांतरकर्त्यांनी एका मात्रेचाही फरक केलेला नाही. ही सर्व भाषांतरे मूळ बाबूजींनी दिलेल्या चालीवरच गायली जातात.

बाबूजींनी स्वतः त्यांच्या आयुष्यात गीतरामायणाचे जवळजवळ १८०० प्रयोग केले. हे प्रयोग त्यांनी देशात तसेच परदेशात केले.

अनुक्रमणिका

[संपादन] गीतरामायण

खाली दिलेले संपूर्ण गीत रामायण हे प्रताधिकारीत असून श्री. सुमित्र श्री. माडगूळकर यांच्या संमतीने इथे उद्धृत केलेले आहे.

संपूर्ण गीत रामायणासाठीचा अधिकृत दुवा http://www.gadima.com हा आहे.

[संपादन] १. कुश लव रामायण गाती

स्वयें श्रीरामप्रभू ऐकती
कुश लव रामायण गाती

कुमार दोघे एक वयाचे
सजीव पुतळे रघुरायाचे
पुत्र सांगती चरित पित्याचे
ज्योतिनें तेजाची आरती

राजस मुद्रा, वेष मुनींचे
गंधर्वच ते तपोवनींचे
वाल्मीकींच्या भाव मनींचे
मानवी रूपें आकारती

ते प्रतिभेच्या आम्रवनांतील
वसंत-वैभव-गाते कोकिल
बालस्वरांनी करुनी किलबिल
गायनें ऋतुराज भारिती

फुलांपरी ते ओठ उमलती
सुगंधसे स्वर भुवनीं झुलती
कर्णभुषणें कुंडल डुलती
संगती वीणा झंकारिती

सात स्वरांच्या स्वर्गामधुनी
नऊ रसांच्या नऊ स्वर्धुनी
यज्ञ-मंडपीं आल्या उतरुनी
संगमी श्रोतेजन नाहती

[संपादन] २. सरयू-तीरावरी

सरयू-तीरावरी
अयोध्या मनुनिर्मित नगरी

त्या नगरीच्या विशालतेवर
उभ्या राहिल्या वास्तु सुंदर
मधुन वाह्ती मार्ग समांतर
रथ, वाजी, गज, पथिक चालती, नटुनी त्यांच्यावरी

घराघरावर रत्नतोरणें
अवती भंवती रम्य उपवनें
त्यांत रंगती नृत्य गायनें
मृदंग वीणा नित्य नादती, अलका नगरीपरी

स्त्रिया पतिव्रता, पुरुषहि धार्मिक
पुत्र उपजती निजकुल-दीपक
नृशंस ना कुणि, कुणि ना नास्तिक
अतृप्तीचा कुठें न वावर, नगरिं, घरीं,अंतरीं

इक्ष्वाकु-कुल कीतीं भूषण
राजा दशरथ धर्मपरायण
त्या नगरीचें करितो रक्षण
गृहीं चंद्रसा, बगरिं इंद्रसा, सूर्य जसा संगरी

[संपादन] ३. उगा का काळीज माझे उले

उगा कां काळिज माझें उले?
पाहुनी वेलीवरचीं फुलें

कधीं नव्हे तें मळलें अंतर
कधीं न शिवला सवतीमत्सर
आज कां लतिकावैभव सले?

काय मना हे भलतें धाडस?
तुला नावडे हरिणी-पाडस
पापणी वृथा भिजे कां जले?

गोवत्सांतिल पाहून भावां
काय वाटतो तुजसी हेवा?
चिडे कां मौन तरी आंतलें?

कुणी पक्षिणी पिलां भरविते
दृश्य तुला तें व्याकुळ करितें
काय हें विपरीत रे जाहलें?

स्वतःस्वतःशीं कशास चोरी?
वात्सल्याविण अपूर्ण नारी
कळालें सार्थक जन्मांतलें

[संपादन] ४. उदास का तू?

उदास कां तूं? आवर वेडे, नयनांतिल पाणी
लाडले कौसल्ये राणी

वसंत आला, तरूतरूवर आली नव पालवी
मनांत माझ्या उमलून आली तशीच आशा नवी
कानीं माझ्या घुमूं लागली सादाविण वाणी

ती वाणी मज म्हणे, "दशरथा, अश्वमेघ तूं करी
चार बोबडे वेद रांगतिल तुझ्या धर्मरत घरीं."
विचार माझा मला जागवो, आलें हें ध्यानीं

निमंत्रिला मी सुमंत मंत्री आज्ञा त्याला दिली-
"वसिष्ठ, काश्यप, जाबालींना घेउन ये या स्थलीं.
इष्ट काय तें मला सांगतील गुरुजन ते ज्ञानी"

आले गुरुजन, मनांतलें मी सारें त्यां कथिलें
मीच माझिया मनास त्यांच्या साक्षीनें मथिलें
नवनीतासम तोंच बोलले स्निग्धमधुर कोणी

"तुझे मनोरथ पूर्ण व्हायचे", मनोदेवतो वदे,
"याच मुहूर्ती सोड अश्व तूं, सत्वर तो जाऊं दे"
"मान्य"-म्हणालो-"गुर्वाज्ञा" मी, कर जुळले दोन्ही

अंग देशींचा ऋष्यश्रुंग मी घेउन येतो स्वतः
त्याच्या करवीं करणें आहे इष्टीसह सांगता
धूमासह ही भारुन जावो नगरी मंत्रांनी

सर्यूतीरीं यज्ञ करूं गे, मुक्त करांनी दान करूं
शेवटचा हा यत्न करूं गे, अंती अवभृत स्नाना करूं
ईप्सित तें तो देइल अग्नी, अनंत हातांनीं

[संपादन] ५. दशरथा, घे हे पायसदान

दशरथा, घे हें पायसदान
तुझ्या यज्ञिं मी प्रगट जाहलों हा माझा सन्मान

तव यज्ञाची होय सांगता
तृप्त जाहल्या सर्व देवता
प्रसन्न झाले नृपा तुझ्यावर, श्रीविष्णू भगवान्‌

श्रीविष्णूंची आशा म्हणुनी
आलों मी हा प्रसाद घेउनि
या दानासी या दानाहुन अन्य नसे उपमान

करांत घे ही सुवर्णस्थाली
दे राण्यांना क्षीर आंतली
कामधेनुच्या दुग्धाहुनही, ओज हिचें बलवान

राण्या करितील पायसभक्षण
उदरीं होइल वंशारोपण
त्यांच्या पोटीं जन्मा येतिल, योद्धे चार महान

प्रसवतील त्या तीनहि देवी
श्रीविष्णूंचे अंश मानवी
धन्य दशरथा, तुला लाभला, देवपित्याचा मान

कृतार्थ दिसती तुझीं लोचनें
कृतार्थ मीही तुझ्या दर्शनें
दे आज्ञा मज नृपा, पावतो यज्ञीं अंतर्धान

[संपादन] ६. राम जन्मला ग सखे

चैत्रमास, त्यांत शुद्ध नवमि ही तिथी
गंधयुक्त तरिहि वात उष्ण हे किती

दोन प्रहरिं कां ग शिरीं सूर्य थांबला?
राम जन्मला ग सखी राम जन्मला

कौसल्याराणि हळूं उघडी लोचनें
दिपुन जाय माय स्वतः पुत्र-दर्शनें
ओघळले आंसु, सुखे कंठ दाटला

राजगृहीं येई नवी सैख्य-पर्वणी
पान्हावुन हंबरल्या धेनुं अंगणीं
दुंदुभिचा नाद तोंच धुंद कोंदला

पेंगुळल्या आतपांत जागत्या कळ्या
‘काय काय’ करत्पुन्हां उमलल्या खुळ्या
उच्चरवे वायु श्वांस हसुंन बोलला

वार्ता ही सुखद जधी पोंचली जनी
गेहांतुन राजपथीं धावले कुणी
युवतींचा संघ एक गात चालला

पुष्पांजलि फेंकि कुणी, कोणी भूषणें
हास्यानें लोपविले शब्द, भाषणें
वाद्यांचा ताल मात्र जलद वाढला

[संपादन] ७. सावळा ग रामचंद्र

सांवळा ग रामचंद्र माझ्या मांडीवर न्हातो
अष्टगंधांचा सुवास निळ्या कमळांना येतो

सांवळा ग रामचंद्र माझ्या हातांनी जेवतो
उरलेल्या घासासाठीं थवा राघूंचा थांबतो

सांवळा ग रामचंद्र रत्नमंचकी झोंपतो
त्याला पाहतां लाजून चंद्र आभाळीं लोपतो

सांवळा ग रामचंद्र चार भावांत खेळतो
हीरकांच्या मेळाव्यांत नीलमणी उजळतो

सांवळा ग रामचंद्र करी भावंडांसी प्रीत
थोराथोरांनी शिकावी बाळाची या बाळरीत

सांवळा ग रामचंद्र त्याचे अनुज हे तीन
माझ्या भाग्याच्या श्लोकाचे चार अखंड चरण

सांवळा ग रामचंद्र करी बोबडे भाषण
त्याशी करितां संवाद झालों बोबडे आपण

सांवळा ग रामचंद्र करी बोबडे हे घर
वेद म्हणतां विप्रांचे येती बोबडे उच्चार

सांवळा ग रामचंद्र कर पसरूनि धांवतो
रात जागावतो बाई सारा प्रासाद जागतो

सांवळा ग रामचंद्र उद्यां होईल तरुण
मग पुरता वर्षेल देवकृपेचा वरुण

[संपादन] ८. ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा

ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा
यज्ञ-रक्षणास योग्य तोचि सर्वथा

मायावी रात्रीचर
कष्टविति मजसी फार
कैकवार करून यज्ञ नाही सांगता

शाप कसा देउं मी?
दीक्षित तो नित्य क्षमी
सोडतोंच तो प्रदेश याग मोडतां

आरंभितां फिरुन यज्ञ
आणिति ते फिरुन विघ्न
प्रकटतात मंडपांत कुंड पेटतां

वेदीवर रक्तमांस
फेंकतात ते नृशंस
नाचतात स्वैंर सुखें मंत्र थांबतां

बालवीर राम तुझा
देवों त्या घोर सजा
सान जरी बाळ तुझा थोर योग्यता

शंकित कां होसि नृपा?
मुनि मागे राजकृपा
बावर्सी काय असा शब्द पाळतां?

[संपादन] ९. मार ही त्राटिका रामचंद्रा

जोड झणीं कार्मुका
सोड रे सायका
मार ही ताटिका रामचंद्रा

दुष्ट मायाविनी
शापिता यक्षिणी
वर्तनीं दर्शनीं ही अभद्रा

तप्त आरक्त हीं पाहतां लोचनें
करपल्या वल्लरी, करपलीं काननें
अनुलबलगर्विता
मूर्त ही क्रूरता
ये घृणा पाहतां क्रूर मुद्रा

ऐक तें हास्य तूं, दंत, दाढा पहा
मरुन हस्ती जणूं, भरून गेली गुहा
मृत्यु-छाया जशी
येतसे ही तशी
ओढ दोरी कशी मोड तंद्रा

थबकसी कां असा? हाण रे बाण तो
तूंच मृत्यू हिचा, मी मनीं जाणतो
जो जनां सुखवितो
नारीवध क्षम्य तो
धर्म तुज सांगतो मानवेद्रा!

[संपादन] १०. चला राघवा चला

चला राघवा चला
पहाया जनकाची मिथिला

मिथिलेहुनिही दर्शनीय नृप
राजर्षीं तो जनक नराधिप
नराधिंपे त्या नगरीमाजीं यज्ञ नवा मांडिला

यज्ञमंडपी सुनाभ कार्मुक
ज्यास पेलता झाला त्र्यंबक
त्र्यंबक देवे त्याच धनूनें त्रिपुरासुर मारिला

शिवधनुतें त्या सदनीं ठेवुन
जनक तयाचें करितो पूजन
पूजनीय त्या विशाल धनुला जगांत नाहीं तुला

देशदेशिंचे नृपती येउन
स्तिमित जाहले धनुष्य पाहुन
पाहतांच तें उचलायाचा मोह तयां जाहला

देव, दैत्य वा सुर, नर, किन्नर
उचलुं न शकले त्यास तसूभर
तसूभरी ना सरलपणा त्या चापाचा वाकला

कोण वाकवुन त्याला ओढिल?
प्रत्यंचा त्या धनूस जोडिल?
सोडिल त्यांतुन बाण असा तर कोणी ना जन्मला

[संपादन] ११. आज मी शापमुक्त जाहले

रामा, चरण तुझे लागले
आज मी शापमुक्त जाहलें

तुझ्या कृपेची शिल्प-सत्कृति
माझी मज ये पुन्हां आकृति
मुक्त जाहले श्वास चुंबिती पावन हीं पाउलें

पुन्हां लोंचनां लाभे दृष्टि
दिसशी मज तू, तुझ्यांत सृष्टि
गोठगोठले अश्रू तापुन गालांवर वाहिले

श्रवणांना ये पुनरपि शक्ति
मनां उमगली अमोल उक्ति
"ऊठ अहल्ये"-असे कुणींस करुणावच बोललें

पुलकित झालें शरीर ओणवें
तुझ्या पदांचा स्पर्श जाणवे
चरण्धुळीचे कुंकुम माझ्या भाळासी लागलें

मौनालागी स्फुरलें भाषण
श्रीरामा, तूं पतीतपावन
तुझ्या दयेनें आज हलाहल अमृतांत नाहलें

पतितपावना श्रीरघुराजा।
काय बांधूं मी तुमची पूजा
पुनर्जात हें जीवन अबघें पायांवर वाहिलें

[संपादन] १२. स्वयंवर झाले सीतेचे

राम धनुष्य तोडताना

आकाशाशीं जडलें नातें धरणीमातेचें
स्वयंवर झालें सीतेचे

श्रीरामांनी सहज उचलिले धनु शंकराचें
पूर्ण जाहले जनकनृपाच्या हेतु अंतरींचे
उभे ठाकले भाग्य सांवळे समोर दुहितेचें

मुग्ध जानकी दुरून न्याहळी राम धनुर्धारी
नयनांमाजीं एकवटुनिया निजशक्ति सारी
फुलूं लागलें फूल हळू हळू गालीं लज्जेचें

उंचावुनिया जरा पापण्या पाहत ती राही
तडिताघातापरी भयंकर नाद तोंच होई
श्रीरामांनीं केले तुकडे दोन धनुष्याचे

अंधारुनिया आले डोळे, बावरले राजे
मुक्त हासतां भूमीकन्या मनोमनीं लाजे
तृप्त जाहले सचिंत लोचन क्षणांत जनकाचे

हात जोडूनि म्हणे नृपति तो विश्वामित्रासी
"आज जानकी अर्पियली मी दशरथापुत्रासी"
आनंदाने मिटले डोळे तृप्त मैथिलीचे

[संपादन] १३. व्हायचे राम अयोध्यापती

आनंद सांगूं किती सखे ग आनंद सांगूं किती
सीतावल्लभ उद्यां व्हायचे राम अयोध्यापति

सिंहासनिं श्रीराघव बसतां
वामांगी तूं बसशिल सीता
जरा गर्विता, जरा लाज्जता
राजभूषणां भूषवील ही, कमनिय तव आकृति

गुरुजन मुनिजन अमीप येतिल
सप्त नद्यांची जलें शिंपतिल
उभय कुळें मग कृतार्थ होतिल
मेघाहुनिही उच्चरवांनीं, झडतिलं गे नौबति

भर्त्यासम तुज जनीं मान्यता
राज्ञीपद गे तुला लाभतां
पुत्राविण तूं होशील माता
अखील प्रजेच्या मातृपदाची, तुज करणें स्वीकृति

तुझ्याच अंकित होईल धरणी
कन्या होइल मातृस्वामिनी
भाग्य भोगिलें असलें कोणीं?
फळाफुलांनी बहरुनि राहिल, सदा माउली क्षिति

पतीतपावन रामासंगें
पतितपावना तूंही सुभगे
पृथ्वीवर या स्वर्गसौख्य घे
तिन्ही लोकीं भरून राहूं दे, तुझ्या यशाची द्युति

महाराणि तूं, आम्ही दासी
लीन सारख्या तव चरणंसी
कधीं कोणती आज्ञा देसी
तुझिया चरणीं लीन राहूं दे, सदा आमुची मति

विनोद नच हा, हिच अपेक्षा
तव भाग्याला नुरोत कषा
देवदेवता करोत रक्षा
दृष्ट न लागो आमुचीच गे, तुझिया भाग्याप्रति

आओळखिचे बघ आले पदरव
सांवलींतही दिसते सौष्ठव
तुला भेटण्या येती राघव
बालिश नयनीं तुझ्या येई कां, लज्जेला जागृति?

[संपादन] १४. मोडु नको वचनास

मोडुं नका वचनास-नाथा मोडूं नका वचनास
भरतालागीं द्या सिंहासन, रामासी वनवास

नलगे सांत्वन, नको कळवळा
शब्द दिले ते आधी पाळा
आजोळाहुन परत बोलवा, झणीं माझ्या भरतास

सुतस्नेहानें हौन वेडे
कां घेतां हे आढेवेढे?
वचनभंग का शोभुन दिसतो, रघुवंशज वीरास?

दंडकवनि त्या लढतां शंबर
इंद्रासाठीं घडलें संगर
रथास तुमच्या कुणी घातला, निजबाहूंचा आंस?

नाथ रणीं त्या विजयी झाले
स्मरतें का ते काय बोलले?
"दिधले वर तुज दोन लाडके, सांग आपुली आस"

नरिसुलभ मी चतुरपणानें
अजून रक्षिलीं अपुलीं वचनें
आज मागतें वर ते दोन्ही, साधुनिया समयास

एक वरानें द्या मज अंदण
भरतासाठीं हें सिंहासन
दुजा वरानें चवदा वर्षे रामाला वनवास

पक्षपात करि प्रेमच तुमचें
उणें अधिक ना यांत व्हायचें
थोर मुखानें दिलेत वर मग, आतां कां निःश्वास?

प्रासांतुन रामा काढा
वा वंशाची रीती मोडा
धन्यताच वा मिळवा, जागुनि निज शब्दांस

खोटी मूर्च्छा, खोटे आंसूं
ऐश्वर्याचा राम पिपासू
तृप्त करावा त्यास हाच कीं आपणांसि हव्यास

व्योम कोसळो, भेंगो शरणी
पुन्हां पुन्हां कां ही मनधरणी?
वर-लाभाविण मी न घ्यायची, शेवटचाहि श्वास

[संपादन] १५. नको रे जाऊ रामराया

उंबरट्यासह ओलांडुनिया मातेची माया
नको रे जाऊं रामराया

शतनवसांनी येउन पोटीं
सुखविलेंस का दुःखासाठीं?
प्राण मागतो निरोप, रडते कासाविस काया

कशी मूढ ती सवत कैकयी
तीही मजसम अबला आई
आज्ञा देइल का भरता ती कांतारी जाया?

तृप्त होउं दे तिचीं लोचनें
भरत भोगूं दे राज्य सुखाने
वनीं धाडिते तुजसी कशास्तव वैरिण ती वाया?

सांगुं नयें ते आज सांगतें
मजहुन ह्यांना ती आवडते
आजवरी मी कुणां न कथिल्या मुक यातना या

तिच्या नयनिंच्या अंगारांनीं
जळतच जगलें मुला, जीवनीं
तुझिया राज्यीं इच्छित होतें अंतीं तरी छाया

अधर्म सांगू कसा बालका?
तुष्ट ठेव तूं तुझिया जनका
माग अनुज्ञा मात्र जननितें कांतारी न्याया

तुझ्यावांचुनी राहूं कशी मी?
वियोग रामा, साहूं कशी मी?
जमदग्नीसम तात तुझें कां कथिति न माराया

तुझ्या करें दे मरणच मजसी
हो राजा वा हो वनवासी
देहावांचुन फिरेन मग मी मागोवा घ्याया

[संपादन] १६. रामावीण राज्य पदी कोण बैसतो

रामाविण राज्यपदीं कोण बैसतो?
घेउनियां खड्ग करीं, मीच पाहतो

श्रीरामा, तूं समर्थ
मोहजालि फससि व्यर्थ
पाप्यांचे पाप तुला उघड सांगतो

वरहि नव्हे, वचन नव्हे
कैकीयला राज्य हवें
विषयधुंद राजा तर तिजसि मानतो

वांच्छिति जे पुत्रघात
ते कसले मायतात?
तुज दिधला शब्द कसा नृपति मोडतो?

लंपट तो विषयीं दंग
तुजसि करी वचनभंग
भायेंचा हट्ट मात्र निमुट पाळितो

वर दिधलें कैकेयीस
आठवले या मितीस
आजवरी नृअपति कधीं बोलला न तो?

मत्त मतंगजापरी
दैव तुझे चाल करो
श्रीरामा, मीच त्यास दोर लावितो

बैस तूंच राज्यपदीं
आड केण येई मधीं
येउं देत, कंठस्नान त्यास घालितो

येऊं देत तिन्ही लोक
घालिन मी त्यांस धाक
पाहुं देच वृद्ध पिता काय योजितो

शत शतकें पाळ धरा
श्रीरामा, चापधरा,
रक्षणासि पाठीं मी सिद्ध राहतों

येईल त्या करिन सजा
बंधू नच, दास तुझा
मातुःश्री कौसल्येशपथ संगतो

[संपादन] १७. जेथे राघव तेथे सीता

निरोप कसला माझा घेतां
जेथें राघव तेथें सीता

ज्या मार्गी हे चरण चालती
त्या मार्गी मी त्यांच्या पुढती
वनवासाची मला न भीति
संगे आपण भाग्यविधाता!

संगे असता नाथा, आपण
प्रासादाहुन प्रसन्न कानन
शिळेस म्हणतील जन सिंहासन
रघुकुलशेखर वरी बैसतां

वनीं श्वापदें, क्रूर निशाचर
भय न तयांसें मजसी तिळभर
पुढती मागें दोन धनुर्धर
चाप त्यां करीं, पाठिस भाता

ज्या चरणांच्या लाभासाठीं
दडलें होतें धरणीपोटी
त्या चरणांचा विरह शेवटीं
काय दिव्य हें मला सांगतां?

कोणासाठीं सदनीं राहूं?
कां विरहाच्या उन्हांत न्हाऊ?
कां भरतावर छत्रे पाहूं?
दास्य करूं कां कारण नसतां?

कां कैकयि वर मिळवा तिसरा?
कां अपुल्याही मनीं मंथरा?
कां छळितां मग वृथा अंतरा?
एकटीस मज कां हो त्यजितां?

विजनवास या आहे दैवीं
ठाउक होते मला शैशवीं
सुखदुःखांकित जन्म मानवी
दुःख सुखावेंप्रीती लाभतां

तोडा आपण; मी न तोडितें
शात जन्मांचे अपुलें नातें
वनवासासी मीही येतें
जाया-पति कां दोन मानितां?

पतीच छाया, पतीच भूषण
पतिचरणांचे अखंड पूजन
हें आर्यांचे नारीजीवन
अंतराय कां त्यांत आणिंता?

[संपादन] १८. थांब सुमंता, थांबवि रे रथ

राम चालले, तो तर सत्पथ
थांब सुमंता, थांबवित रे रथ

थांबा रामा, थांब जानकी
चरणधूळ द्या धरूं मस्तकीं
काय घडें हें आज अकल्पित!

रामराज्य या पुरीं यायचें
स्वप्न लोचनीं अजून कालचें
अवचित झाले भग्न मनोरथ

गगननील्हे, उष:प्रभा ही
श्रीरघुनंदन, सीतामाई
चवदा वर्षे का अस्तंगत?

चवदा वर्षे छत्र लोपतां
चवदा वर्शे रात्रच आतां
उरेल नगरी का ही मूर्च्छित?

कुठें लपें ती दुष्ट कैकयी?
पहा म्हणावे हीन दशा ही
अनर्थ नच हा, तुझेच चेष्टित

करि भरतातें नृप मातोश्री
रामा मागे निघे जयश्री
आज अयोध्या प्रथम पराजित

पिताहि मूर्च्छित, मूर्च्छित माता
सोदुन रामा, कोठें जातां?
सर्वे न्या तरी नगर निराश्रित

ये अश्रूंचा पट डोळ्यांवर
कोठें रथ तो? केठे रघुवर
गळ्यांत रुतली वाणी कंपित

[संपादन] १९. जय गंगे, जय भागिरथी

नकोस नौके परत फिरू ग, नकोस गंगे ऊर भरूं,
श्रीरामांचे नाव गात या, श्रीरामाला पार करूं

जय गंगे जय भागिरथी
जय जय राम दाशरथी

ही दैवाची उलटी रेघ
माथ्यावरचा ढळवू मेघ
भाग्य आपुले अपुल्या हातें अपुल्यापासुन दूर करूं

जय गंगे जय भागिरथी
जय जय राम दाशरथी

श्रीविष्णूचा हा अवतार
भव-सिंधूच्या करतो पार
तारक त्याला तारून नेऊं, पदस्पर्शाने सर्व तरूं

जय गंगे जय भागिरथी
जय जय राम दाशरथी

जिकडे जातो राम नरेश
सुभग सुभग तो दक्षिण देश
ऐल अयोध्या पडे अहल्या, पैल उगवतील कल्पतरूं

जय गंगे जय भागिरथी
जय जय राम दाशरथी

कर्तव्याची धरून कास
राम स्वीकरी हा वनवास
दासच त्याचे आपण, का मग कर्तव्यासी परत करूं

जय गंगे जय भागिरथी
जय जय राम दाशरथी

अतिथि असोत वा असोत राम
पैल लाविणे अपुलें काम
भलेबुरे ते राम जाणता, आपण अपुलें काम करूं

जय गंगे जय भागिरथी
जय जय राम दाशरथी

गंगे तुज हा मंगल योग
भगिरथ आणि तुझा जलौघ
त्याचा वंशज नेसी तूही, दक्षिण देशा अमर करूं

जय गंगे जय भागिरथी
जय जय राम दाशरथी

पावन गंगा पावन राम
श्रीरामांचे पावन नाम
त्रिदोषनाशी प्रवास हा प्रभु, नाविक आम्ही नित्य स्मरूं

जय गंगे जय भागिरथी
जय जय राम दाशरथी

[संपादन] २०. या इथे लक्ष्मणा बांध कुटी

या इथे लक्ष्मणा, बांध कुटी
या मंदाकिनीच्या तटनिकटीं

चित्रकूट हा, हेच तपोवन
येथ नांदती साधक, मुनिजन
सखे जानकी, करी अवलोकन
ही निसर्गशोभा भुलविं दिठीं

पलाश फुलले, बिल्व वाकलें
भल्लातक फलभारे लवले
दिसती न यांना मानव शिवले
ना सैल लतांची कुठें मिठी

किती फुलांचे रंग गणावे?
कुणा सुगंधा काय म्हणावें?
मूक रम्यता सहज दुणावें
येतांच कुजने कर्णपुटीं

कुठे काढिती कोकिल सुस्वर
निळा सुर तो चढवि मयूर
रत्नें तोलित निज पंखांवर
संमिश्र नाद तो उंच वटीं

शाखा-शाखांवरी मोहळे
मध त्यांच्यांतिल खाली निथळे
वन संजीवक अमृत सगळें
ठेविती मक्षिका भरून घटीं

हां सौमित्रे, सुसज्ज, सावध,
दिसली, लपली क्षणांत पारध
सिद्ध असूं दे सदैव आयुध
या वनी श्वापदां नाही तुटी

जानकिसाठी लतिका, कलिका
तुझिया माझ्या भक्ष्य सायकां,
उभय लाभलें वनांत एका
पोंचलों येथ ती शुभचि घटी

जमव सत्वरी काष्ठें कणखर
उटज या स्थळीं उभवूं सुंदर
शाखापल्लव अंथरुनी वर
रेखुं या चित्र ये गगनपटीं

[संपादन] २१. बोलले इतुके मज श्रीराम

शेवटीं करितां नम्र प्रणाम
बोलले इतुकें मज श्रीराम --

"अयोध्येस तू परत सुमंता,
कुशल आमुचें कथुनी तातां
पदवंदन करि माझ्याकरितां
तातचरण ते वंदनीय रे, शततीर्थांचे धाम"

"अंत:पुरी त्या दोघी माता
अतिव दु:खी असतील सूता,
धीर देई त्या धरुन शांतता
सौख्य आमुचे सांगुन त्यांच्या शोका देई विराम"

"सांग माउली कौसल्येसी
सुखांत सीता सुत वनवासी
पूजित जा तूं नित्य अग्निशीं
तुझिया श्रवणीं सदा असावा मुनिवरघोषित साम"

"वडिलपणाची जाणीव सोडुनि
सवतींशी करि वर्तन जननी
मग्न पतीच्या रहा पूजनीं
तव हृदयाविन त्या जिवासी अन्य नसे आराम"

"राजधर्म तूं आठव आई
अभिषेक्ताते गुण वय नाहीं
दे भरतासी मान प्रत्यहीं
पढव सुमंता, विनयाने हे, सांगुन माझे नाम"

"सांग जाउनी कुमार भरता
हो युवराजा, स्वीकार सत्ता
प्रजाजनांवर ठेवी ममता
भोग सुखाचा अखंड घेइ, मनीं राही निष्काम"

"छात्र शिरावर तुझ्या पित्याचें
पाळच वत्सा, वचन तयांचें
सार्थक कर त्या वृद्धपणाचें
राज्य नीतिनें करून वाढवी रघुवंशाचें त्या नाम"

"काय सांगणें तुज धीमंता,
उदारधी तूं सर्व जाणता
पुत्रवियोगिनि माझी माता
तुझ्या वर्तनें तिला भासवी भरत तोच श्रीराम"

बोलत बोलत ते गहिवरले
कमलनयनी त्या आसूं भरलें
करूण दृश्य तें अजून न सरले-
गंगातीरीं-सौमित्रिसह-उभे जानकी-राम

[संपादन] २२. दाटला चोहीकडे अंधार

दाटला चोहिकडे अंधार
देउं न शकतो क्षीण देह हा प्राणांसी आधार

आज आठवे मजसी श्रावण
शब्दवेध ती मृगया भीषण
पारधींत मी वधिला ब्राम्हण
त्या विप्राच्या अंध पित्याचे उमगे दु:ख अपार

त्या अंधाची कंपित वाणी
आज गर्जते माझ्या कानीं
यमदूतांचे शंख होऊनी
त्याच्यासम मी पुत्रवियोगें तृशार्तसा मरणार

श्रीरामाच्या स्पर्शावाचून
अतृप्तच हे जळके जीवन
नाही दर्शन नच संभाषण
मीच धाडिला वनात माझा त्राता राजकुमार

मरणसमयिं मज राम दिसेना
जन्म कशाचा? आत्मवंचना
अजून न तोडी जीव बंधनां
धजेल संचित केवीं उघडूं मज मोक्षाचे द्वार?

कुंडलमंडित नयनमनोहर
श्रीरामाचा वदन सुधाकर
फुलेल का या गाढ तमावर?
जातां जातां या पारयावर फेकित रश्मितुषार

अघटित आतां घडेल कुठलें?
स्वर्गसौख्य मी दूर लोटलें
ऐक कैकयी, दुष्टे, कुटीले
भाग्यासह तूं सौभाग्यासहि क्षणांत अंतरणार

पाहतील जे राम जानकी
देवच होतील मानवलोकीं
स्वर्गसौख्य ते काय आणखी?
अदृष्टा, तुज ठावे केव्हा रामागम होणार?

क्षमा करी तूं मज कौसल्ये
क्षमा सुमित्रे पुत्रवत्सले
क्षमा देवते सती उर्मिले
क्षमा प्रजानन करा, चाललो सुखदु:खांच्या पार

क्षमा पित्याला करी श्रीरामा
पतितपावन मेघश्यामा
राम लक्ष्मणा सीतारामा
गंगोदकसा अंतीं ओठीं तुमचा जयजयकार

श्री राम-श्री-राम-रा-म

[संपादन] २३. माता न तू वैरिणी

माता न तूं, वैरिणी

अश्वपतीची नव्हेस कन्या, नव्हेस माझी माय
धर्मात्म्यांच्या वंशी कृत्या निपजे, नांदे काय?
वध नाथाचा करील मूढे, पतिव्रता का कुणी?

शाखेसह तूं वृक्ष तोडिला, फळां इच्छिसी वाढ
आत्मघातकी ज्ञानाचे या गातील भाट पवाड
स्वीकारीन मी राज्य तुझ्यास्तव, कीर्ती होइल दुणी

वनांत भ्रात्या धाडिलेंस तूं, स्वर्गी धाडिलें तात
श्रीरामांते वल्कल देतां कां नच जळले हात?
उभी न राही पळभर येथें, काळें कर जा वनीं

निराधार हा भरत पोरका, कुठें आसरा आज?
निपुत्रिके, तूं मिरव लेवूनी वैधव्याचा साज
पडो न छाया तुझी पापिणी, सदनीं, सिंहासनीं

तुला पाहतां तृषार्त होते या खड्गाची धार
श्रीरामांची माय परी तूं, कसा करूं मी वार?
कुपुत्र म्हणतील मला कैकयी, माता दोघीजणीं

कसा शांतवूं शब्दानें मी कौसल्येचा शोक?
सुमित्रेस त्या उदासवाणे गमतिल तिन्ही लोक
कुठल्या वचनें नगरजनांची करूं मी समजावणी?

वनाहुनीही उजाड झालें रामाविण हें धाम
वनांत हिंडुन धुंडुन आणीन परत प्रभु श्रीराम
नका आडवे येऊं आतां कुणी माझिया पणीं

चला सुमंता, द्या सेनेला एक आपुल्या हांक
श्रीरामाला शोधायास्तव निघोत नजरा लाख
अभिषेकास्तव घ्या सांगातीं वेदजाणतें मुनी

असेल तेथे श्रीरामाचा मुकुट अर्पिणें त्यास
हाच एकला ध्यास, येथूनि हीच एकली आस
कालरात्रसी रहा इथें तूं आक्रंदत विजनीं

[संपादन] २४. चापबाण घ्या करी

आश्रया गुहेकडे जानकीस पाठवा
चापबाण घ्या करी सावधान राघवा!

मेघगर्जनेपरी काननांत हो ध्वनी
धांवतात श्वापदें, भक्ष्यभाग टाकुनी
कोंकतात भेंकरें, कंपितांग थांबुनी
धूळ ही नभी उडे, सैन्य येतसे कुणी
खूण ना दिसो कुणा, दीप्त अग्नी शांतवा

उत्तरेस तो थवा, काय तर्क्बांधुनी?
पाहतोंच काय तें, तालवृक्षि जाउनी
कोण येई चालुनी, निर्मनुष्य या वनीं
सिद्ध राहु द्या करी, चाप रज्जु ओढुनी
पाहुं वीर कोण तो, दावी शौर्य-वैभवा

कैक पायिं धावती, हस्ती अश्व दौडती
धर्मस्नात सारथी, आंत ते महारथी
कोण श्रेष्ठ एक तो, राहिला उभा रथीं
सांवळा तुम्हांपरी, दीर्घबाहु आकृति
बंधु युद्धकाम का, शोधु येई बांधवां?

भ्याड भरत काय हा बंधुघात साधतो
येउं दे जरा पुढे, कंठनाल छेदतों
कैकयीस पाहूं दे, छिन्न पुत्रदेह तो
घोडदौड वाजते, ये समीप नाद तो
ये पुनश्च आज ही, संधि शस्त्रपाटवा

एक मी उभा येथें, येऊं देत लाख ते
लोकपाल तो नवा, सत्वहीन लोक ते
क्षम्य ना रणांगणीं पोरकेहि पोर तें
शत्रुनाश क्षत्रियां, धर्मकार्य थोर तें
ये समोर त्यास मी, धाडितोंच रौरवा

नावरेच क्रोध हा बोधिल्या अनेकदां
राम काय जन्मला सोसण्यास आपदा
होऊं देच मेदिनी पापयुक्त एकदां
भरतखंड भोगूं दे रामराज्य संपदां
धर्मरक्षण-क्षणीं, मी अजिंक्या वासवां

[संपादन] २५. दैवजात दु:खे भरता

दैवजात दु:खें भरतां दोष ना कुणाचा
पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा

माय कैकयी ना दोषी, नव्हे दोषी तात
राज्यत्याग, काननयात्रा, सर्व कर्मजात
खेळ चाललासे माझ्या पूर्वसंचिताचा

अंत उन्नतीचा पतनीं होई या जगांत
सर्व संग्रहाचा वत्सा, नाश हाच अंत
वियोगार्थ मिलन होतें, नेम हा जगाचा

जिवासंगे जन्मे मृत्यु, जोड जन्मजात
दिसें भासतें तें सारें विश्व नाशवंत
काय शोक करीसी वेड्या, स्वप्नींच्या फळांचा

तात स्वर्गवासी झले, बंधु ये वनांत
अतर्क्य ना झाले कांहीं, जरी अकस्मात
मरण-कल्पनेशी थांबे तर्क जाणत्यांचा

जरामरण यांतून कोण सुटला प्राणिजात?
दु:खमुक्त जगला का रे कुणी जीवनांत?
वर्धमान तें तें चाले मार्ग रे क्षयाचा

दोन ओंडक्यांची होते सागरांत भेट
एक लाट तोडी दोघां, पुन्हा नाही गांठ
क्षणिक तेंवि आहे बाळा, मेळ माणसांचा

नको आंसु ढाळूं आतां, पुस लोचनांस
तुझा आणि माझा आहे वेगळा प्रवास
अयोध्येंत हो तूं राजा, रंक मी वनींचा

नको आग्रहानें मजसी परतवूंस व्यर्थ
पितृवचन पाळून दोघे होऊं रे कृतार्थ
मुकुटकवच धारण करिं, कां वेश तापसाचा?

संपल्याविना हीं वर्षे दशोत्तरीं चार
अयोध्येस नाहीं येणें, सत्य हें त्रिवार
तूंच एक स्वामी आता राज्यसंपदेचा

पुन्हां नका येऊं कोणी दूर या वनांत
प्रेमभाव तुमचा माझ्या जागता मनांत
मान वाढवीं तूं लोकीं अयोध्यापूरीचा

[संपादन] २६. तात गेले, माय गेली, भरत आता पोरका

तात गेले, माय गेली, भरत आतां पोरका
मागणें हें एक रामा, आपुल्या द्या पादुका

वैनतेयाची भरारी काय मशकां साधते?
कां गजाचा भार कोणी अश्वपृष्ठीं लादतें?
राज्य करणें राघवाचें अज्ञ भरता शक्य का?

वंशरीतीं हेंच सांगे-थोर तो सिंहासनीं
सान तो सिंहासनीं कां, ज्येष्ठ ऐसा काननीं?
दान देतां राज्य कैसें या पदांच्या सेवका?

घेतला मी वेष मुनिचा सोडतांना देश तो
कैकयीसा घेऊं माथीं का प्रजेचा रोष तो?
काय आज्ञा आगळी ही तुम्हिच देतां बालका?

पादुका या स्थापितो मी दशरथांच्या आसनीं
याच देवी राज्यकर्त्या कोसलाच्या शासनीं
चरणचिन्हें पूजुनीं हीं साधितों मी सार्थका

राग नाहीं, चरणचिन्हें राहूं द्या हीं मंदिरीं
नगरसीमा सोडुनि मी राहतों कोठें तरी
भास्कराच्या किरणरेखा सांध्यकाळीं दीपिका

चालवीतों राज्य रामा, दुरून तुम्ही येइतों
मोजितों संवत्सरें मी, वाट तुमची पाहतों
नांदतों राज्यांत, तीर्थी कमलपत्रासारखा

सांगतां तेव्हा न आले, चरण जर का मागुती
त्या क्षणीं या तुच्छ तनुची अग्निदेवा आहुती
ही प्रतिज्ञा, ही कपाळीं पाउलांची मृत्तिका

[संपादन] २७. कोण तूं कुठला राजकुमार?

कोण तूं कुठला राजकुमार?
देह वाहिला तुला श्यामला, कर माझा स्वीकार

तुझ्या स्वरूपीं राजलक्षणें
रुद्राक्षांचीं श्रवणि भूषणें
योगी म्हणुं तर तुझ्या भोंवती वावरतो परिवार

काय कारणें वनीं या येसी?
असा विनोदें काय हांससी?
ज्ञात नाहिं का? येथ आमुचा अनिर्बंध अधिकार

शूर्पणखा मी रावणभगिनी
याच वनाची समज स्वामिनी
अगणित रूपें घेउन करितें वनोवनीं संचार

तुझ्यासाठिं मी झालें तरुणी
षोडषवर्षा मधुरभाषिणी
तुला पाहतां मनांत मन्मथ जागुन दे हुंकार

तव अधराची लालस कांती
पिऊं वाटतें मज एकांती
स्मरतां स्मर का अवतरसी तूं अनंग तो साकार?

मला न ठावा राजा दशरथ
मनांत भरला त्याचा परि सुत
प्राणनाथ हो माझा रामा, करू सौख्यें संसार

तुला न शोभे ही अर्धांगी
दूर लोट ती कुरुप कृशांगी
समीप आहे तुझ्या तिचा मी क्षणीं करितें संहार

माझ्यासंगे राहुनि अविरत
अलिंगनाची आस उफाळे तनूमनीं अनिवार

[संपादन] २८. सूड घे त्याचा लंकापती

विरुप झाली शूर्पणखा, ही दाशरथीची कृति
सूड घे त्याचा लंकापति

कसलें करीसी राज्य रावणा, कसलें जनपालन?
श्रीरामानें पूर्ण जिंकिलें तुझें दंडका-वन
सत्तांधा, तुज नाहीं तरिही कर्तव्याची स्मृति

वीस लोचनें उघडूनि बघ या शूर्पणखेची दशा
श्रीरामाच्या पराक्रमाने कंपित दाही दिशा
तुझे गुप्तचर येउन नच का वार्ता ही सांगति?

जनस्थानिं त्या कहर उडाला, मेले खरदूषण
सहस्त्र चौदा राक्षस मेले हें का तुज भूषण?
देवासम तो सुपूज्य ठरला जनस्थानिंचा यति

तुझ्याच राज्यीं तुझ्याहुनीही पूज्य जाहला नर
सचिवांसंगें बैस येथ तूं स्वस्थ जोडूनि कर
जाळुन टाकील तव सिंहासन उद्यां त्याची द्युति

सुदर्शनासह व्यर्थ झेलले छातीवर तूं शर
व्यर्थ मर्दिले देव, उचलले सामर्थ्ये डोंगर
तूंच काय तो धर्मोच्छेदक अजिंक्य सेनापति?

तूंच काय रे कुबेर जिंकून पुष्पक नेलें घरीं?
तूंच काय तो, वरिली ज्यानें तक्षकनृपसुंदरी?
तूंच काय तो भय मृत्युचें लव नाहीं ज्याप्रति?

[संपादन] २९. मज आणून द्या तो हरीण अयोध्यानाथा

तोडीतां फुलें मी सहज पाहिला जातां
मज आणून द्या तो हरिण अयोध्यानाथा

झळकती तयाच्या रत्नें श्रृंगावरती
नव मोहफुलांसम सुवर्ण अंगावरती
हे नयन भाळले त्याच्या रंगावरती
तें इंद्रचापसे पुच्छ भासलें उडतां

तो येउन गेला अनेकदां या दारीं
दिसतात उमटलीं पदचिन्हें सोनेरी
घाशिलें शिंग या रंभास्तंभावरी
तो दिसे सुवर्णी बघा देवरा, कांता

चालतो जलद-गति, मान मुरडितो मंद
डोळ्यांत कांहिसा भाव विलक्षण धुंद
लागला मृगाचा मला नाथ हो छंद
वेडीच जाहलें तृणांतरीं त्या बघतां

किती किती मृगाचे लक्षण त्या मी गणूं?
त्या मृगास धरणें अशक्य कैसे म्हणूं?
मजसाठिं मोडिलें आपण शांकरधनू
जा, त्वरा करा, मी पृष्ठिं बांधतें भाता

कोषांत कोंडिलें अयोध्येंत जें धन
तें असेल धुंडित ’चरणां’ साठीं वन
जा आर्य, तयातें कुटिरी या घेउन
राखील तोंवरी गेह आपुला भ्राता

सांपडे जरी तो सजीव आपुल्या हातीं
अंगीची तयाच्या रत्नें होतिल ज्योति
देतील आपणां प्रकाश रानीं राती
संगती नेऊं त्या परत पुरीसी जाता

जातांच पाहतिल हरिण सासवा, जावा
करितील कैकयी भरत आपुला हेवा
ठेवीन तोंवरी जपुन गडें तो ठेवा
थांबला कशास्तव धनुर्धरा हो आतां?

फेंकून बाण त्या अचूक जरी माराल
काढून भाउजी घेतिल त्याची खाल
त्या मृगासनीं प्रभु, इंद्र जसे शोभाल
तो पहा, दिसे तो दूर टेकडी चढतां

[संपादन] ३०. याचका थांबू नको दारात

याचका, थांबु नको दारांत
घननीळांची मूर्त वीज मी, नकोस जाळूं हात

कामव्यथेची सुरा प्राशुनी
नकोस झिंगूं वृथा अंगणी
जनकसुतेचा नखस्पर्शही अशक्य तुज स्वप्नांत

मी न एकटी, माझ्याभंवती
रामकीर्तिच्या दिव्य आकृति
दिसल्यावांचुन तुला धाडितील देहासह नरकांत

जंबुकस्वरसें कसलें हंससी?
टक लावून कां ऐसा बघसी?
रामावांचुन अन्य न कांहीं दिसेल या नयनांत

या सीतेची प्रीत इच्छिसी
कालकुटांतुन क्षेम वांच्छिसी
चंद्रसूर्य कां धरूं पाहसी हतभाग्या हातांत?

वनीं निर्जनीं मला पाहुनी
नेउं पाहसी बळें उचलुनी
प्रदीप्त ज्वाला बांधुन नेसी मूढा, कां वसनांत?

निकषोपल निज नयनां गणसी
वर खड्गासी धार लाविसी
अंधपणासह यांत आंधळ्यां, वसे तुझा प्राणांत

कुठें क्षुद्र तूं, कोठें रघुवर
कोठें ओहळ, कोठें सागर
विषसदृष तूं, रामचंद्र ते अमृत रे साक्षात

कुठें गरुड तो, कुठें कावळा
देवेंद्रच तो राम सांवळा
इंद्राणीची अभिलाषा कां धरिती मर्त्य मनांत?

मज अबलेला दावुनिया बल
सरसाविसि कर जर हे दुर्बल
श्रीरामाचे बाण तुझ्यावर करितील वज्राघात

सरशि कशाला पुढती पुढती?
पाप्या, बघ तव चरणहि अडती
चरणांइतुकी सावधानता नाहीं तव माथ्यांत

धांवा धांवा नाथ रघूवर!
गजशुंडा ये कमलकळीवर
असाल तेथून ऐका माझा शेवटचा आकान्त

[संपादन] ३१. कोठे सीता जनकनंदिनी

उजाड आश्रम उरे काननीं
कोठें सीता जनकनंदिनी?

सांग कदंबा बघुनि सत्वर
दिसते का ती नदीतटावर?
करीं कमंडलु, कलश कटीवर
हरिमध्या ती मंदगामिनी

सांग अशोका शोकनाशका!
कुठें शुभांगी क्षमा-कन्यका?
कंपित कां तव पल्लव-शाखा?
अशुभ कांही का तुझिया स्वप्नीं?

कुठें चंदना, गौरांगी ती?
कुंदलते, ती कोठें सुदती?
कोठें आम्रा, विनयवती ती?
शहारतां कां वायावांचुनि?

घात-घटी का पुन्हां पातली?
सीते, सीते, सखे मैथिली!
हांक काय तूं नाहिं ऐकिली?
येइ, शिळेच्या बसूं आसनीं

पहा लक्ष्मणा, दिसती डोळे
प्रियेचेच ते विशाल भोळे
मृगशावक हें तिचें कोवळें
कां याच्याही नीर लोचनीं?

अबोल झाले वारें पक्षी
हरिली कां कुणी मम कमलाक्षी?
का राक्षस कुणि तिजला भक्षी
शतजन्माचें वैर साधुनी?

पुनश्च विजती दैव एकदां
घातांवर आघात, आपदा
निष्प्रभ अवघी शौर्यसंपदा
जाइ बांधवा, पुरा परतुनी

काय भोगणें आतां उरलें?
चार दिसांचें चरित्र सरलें
हे दु:खांचे सागर भरलें
यांत जाऊं दे राम वाहुनी

[संपादन] ३२. ही तिच्या वेणींतील फुले

हीं तिच्या वेणिंतिल फुलें
लक्ष्मणा, तिचींच ही पाउलें

एक पदांचा ठसा राक्षसी
छेदित गेला पदचिन्हांसी
वादळें तुटली पद्मदलें

खचित लक्ष्मणा, खचित या स्थलीं
रात्रिंचर कुणि छळी मैथिली
जिंकली सती का अंगबलें?

दूर छिन्न हें धनु कुणाचें?
जडाव त्यावर रत्नमण्यांचे
कुणाला कोणी झुंजविलें?

वैदुर्याकित कवच कुणाचें?
धुळिंत मिळाले मणी तयाचे
राक्षसा कोणीं आडविलें?

पहा छत्र तें धूलीधूसर
मोडुन दांडा पडलें भूवर
कुणीं या सूतां लोळविलें?

प्रेत होऊनी पडे सारथी
लगाम तुटके तसेच हातीं
तोंड तें रुधिरें भेसुरलें

पहा रथाचें धूड मोडके
कणा मोडला, तुटलीं चाके
बाणही भंवती विस्कटले

थंड दृष्टिनें न्याहळीत नभ
मरून थिजले ते बघ रासभ
कुणाचें वाहन हें असलें?

अनुमानाही पडे सांकडें
कोणी नेली प्रिया? कुणिकडे?
तिच्यास्तव दोघे कां लढले?

हता, जिता वा मृता, भक्षिता
कैसी कोठे माझी सीता?
गूढ तें नाहीं आकळलें

असेल तेथून असेल त्यांनी
परतुन द्यावी रामस्वामिनी
क्षात्रबल माथीं प्रस्फुरलें

स्वर्गिय वा तो असो अमानुष
त्यास जाळण्या उसळे पौरुष
कांपविन तीन्ही लोक बलें

[संपादन] ३३. पळविली रावणें सीता

सीताहरण

मरणोन्मुख त्याला कां रे मारिसी पुन्हां रघुनाथा?
अडवितां खलासी पडलों, पळविली रावणें सीता

पाहिली जधीं मी जातां
रामविण राज्ञी सीता
देवरही संगे नव्हता
मी बळे उडालों रामा, रोधिलें रथाच्या पंथा

तो नृशंस रावण कामी
नेतसे तिला कां धामीं
जाणिलें मनीं सारें मी
चावलों तयाच्या हातां, हाणिले पंख हे माथां

रक्षिण्या रामराज्ञीसी
झुंजलों घोर मी त्यासी
तोडिलें कवचमुकुटासी
लावूं नच दिधलें बाणां, स्पर्शू ना दिधला भाता

सर्वांगा दिधले डंख
वज्रासम मारित पंख
खेळलों द्वंद्व नि:शंक
पाडला सारथी खाली, खाई तो खरांच्या लाथा

सारुनी दूर देवीस
मोडिला रथाचा आंस
भंगिलें उभय चक्रांस
ठेंचाळुनि गर्दभ पडलें, दुसऱ्याच्या थटुनी प्रेता

लोळलें छत्रही खालीं
युद्धाची सीमा झाली
मी शर्थ राघवा, केली
धांवला उगारुन खड्गा, पौलस्ती चावित दातां

हे पंख छेदिल्यावरती
मी पडलो धरणीवरती
ती थरथर कांपे युवती
तडफडाट झाला माझा, तिज कवेंत त्यानें घेतां

मम प्राण लोचनीं उरला
मी तरी पाहिला त्याला
तो गगनपथानें गेला
लाडकी तुझी सम्राज्ञी, आक्रंदत होती जातां

[संपादन] ३४. धन्य मी शबरी श्रीराम!

धन्य मी शबरी श्रीरामा!
लागलीं श्रीचरणें आश्रमा

चित्रकुटा हे चरण लागतां
किती पावले मुनी मुक्तता
वृक्षातळिं या थांबा क्षणभर, करा खुळीला क्षमा

या चरणांच्या पूजेकरितां
नयनिं प्रगटल्या माझ्या सरिता
पदप्रक्षालन करा, विसरा प्रवासांतल्या श्रमां

गुरुसेवेंतच झिजलें जीवन
विलेपनार्थे त्याचे चंदन
रोमांचांचीं फुलें लहडलीं, वठल्या देहद्रुमा

निजज्ञानाचे दीप चेतवुन
करितें अर्चन, आत्मनिवेदन
अनंत माझ्या समोर आलें, लेवुनिया नीलिमा

नैवेद्या पण काय देउं मी?
प्रसाद म्हणूनी काय घेऊं मी?
आज चकोरा-घरीं पातली, भुकेजली पौर्णिमा

सेवा देवा, कंदमूळें हीं
पक्व मधुरशीं बदरिफळें हीं
वनवेलींनीं काय वाहणें, याविन कल्पद्रुमा?

क्षतें खगांचीं नव्हेत देवा,
मीच चाखिला स्वयें गोडवा
गोड तेवढीं पुढें ठेविलीं, फसवा नच रक्तिमा

कां सौमित्री, शंकित दृष्टी?
अभिमंत्रित तीं, नव्हेत उष्टीं
या वदनीं तर नित्य नांदतो, वेदांचा मधुरिमा

[संपादन] ३५. सन्मीत्र राघवाचा सुग्रीव आज झाला

साक्षीस व्योम, पृथ्वी, साक्षीस अग्निज्वाला
सन्मित्र राघवांचा सुग्रीव आज झाला

रामा, तुझ्यापरी मी वनवास भोगताहें
हनुमन्मुखें तुला तें साद्यंत ज्ञात आहे
दु:खीच साह्य होतो दु:खांत दु:खिताला

बंधूच होय वैरी, तुज काय सांगूं आर्या!
नेई हरून वाली मज सुशील भार्या
वालीस राघवा, त्या तूं धाड रौरवा

बाहूंत राहुच्या मी निस्तेज अंशुमाली
गतराज्य-लाभ होतां होईन शक्तिशाली
माझेंच शौर्य सांगूं माझ्या मुखें कशाला?

होतां फिरून माझें तें सैन्य वानरांचें
होतील लाख शत्रु त्या दुष्ट रावणाचे
ते लंघतील सिंधू, खणतील शैलमाला

ते शोधितील सीता, संदेह यांत नाहीं
निष्ठा प्लवंगमांची तूं लोचनेंच पाही
होतील सिद्ध सारे सर्वस्व अर्पिण्याला

झालेच सख्य रामा, देतों करीं करातें
आतां कशास न्यावे कोणा भयंकरातें?
तूं सिद्ध हो क्षमेंद्रा, वालीस मारण्याला

घालीन पालथी मी सारी धरा नृपाला,
रामासमीप अंतीं आणीन जानकीला
धाडीन स्वर्ग-लोकीं येईल आड त्याला

हनुमान, नील, ऐका, मंत्री तुम्ही न माझे
सुग्रीव एक मंत्री, हे रामचंद्र राजे
आज्ञा प्रमाण यांची आतां मला तुम्हांला

[संपादन] ३६. वालीवध ना, खलनिर्दालन

मी धर्मांचें केलें पालन
वालीवध ना, खलनिर्दालन

अखिल धरा ही भरतशासिता
न्यायनीति तो भरत जाणता
त्या भरताचा मी तर भ्राता
जैसा राजा तसे प्रजानन

शिष्य, पुत्र वा कनिष्ठ भ्राता
धर्में येते त्यास पुत्रता
तूं भ्रात्याची हरिली कांता
मनीं गोपुनी हीन प्रलोभन

तूं तर पुतळा मूर्त मदाचा
सुयोग्य तुज हा दंड वधाचा
अंत असा हा विषयांधांचा
मरण पशूचें पारध होऊन

दिधलें होतें वचन सुग्रिवा
जीवहि देईन तुझिया जीवा
भावास्तव मी वधिलें भावा
दिल्या वचाचें हें प्रतिपालन

नृपति खेळती वनीं मृगयेतें
लपुनि मारिती तीर पशूतें
दोष कासया त्या क्रीडेतें
शाखामृग तूं क्रूर पशूहुन

अंत घडी तुज ठरो मोक्षदा
सांभाळिन मी तुझ्या अंगदा
राज्य तुझें हें, ही किष्किंधा
सुग्रीवाच्या करीं समर्पण

[संपादन] ३७. असा हा एकच श्री हनुमान

तरुन जो जाइल सिंधु महान
असा हा एकच श्रीहनुमान

भुजंग धरुनी दोन्ही चरणीं
झेपेसरशी समुद्र लंघुनी
गरुड उभारी पंखां गगनीं
गरुडाहुन बलवान

अंजनिचा हा बलाढ्य आत्मज
हा अनिलाचा सुपुत्र क्षेत्रज
निजशक्तीनें ताडील दिग्गज
बलशाली धीमान

सूर्योदयिं हा वीर जन्मला
त्रिंशत योजनें नभीं उडाला
समजुनिया फळ रविबिंबाला
धरूं गेला भास्वान

बाल-वीर हा रवितें धरतां
भरें कापरें तीन्ही जगतां
या इवल्याशा बाळाकरीता
वज्र धरी मधवान

देवेंद्राच्या वज्राघातें
जरा दुखापत होई हनूतें
कोप अनावर येई वायुतें
थांबे तो गतिमान

पवन थांबता थांबे जीवन
देव वायुचें करिती सांत्वन
पुत्रातें वर त्याच्या देउन
गौरविती भगवान

शस्त्र ना छेदिल या समरांगणि
विष्णुवराने इच्छामरणी
ज्याच्या तेजें दीपे दिनमणी
चिरतर आयुष्मान

करि हनुमन्ता, निश्चय मनसा
सामान्य न तूं या कपिजनसा
उचल एकदां पद वामनसा
घे विजयी उड्डाण

[संपादन] ३८. हीच ती रामांची स्वामीनी

हीच ती रामांची स्वामिनी

चंद्रविरहिणी जणूं रोहिणी
व्याघ्रींमाजीं चुकली हरिणी
श्येन-कोटरी फसें पक्षिणी
हिमप्रदेशीं थिजे वाहिनी

मलिन कृशांगी तरी सुरेखा
धूमांकित कीं अग्निशलाका
शिशिरीं तरि ही चंपकशाखा
व्रतधारिणि ही दिसे योगिनी

रुदनें नयनां येई अंधता
उरें कपोली आर्द्र शुष्कता
अनिद्रिता ही चिंताक्रान्ता
मग्न सारखी पती-चिंतनीं

पंकमलिन ही दिसे पद्मजा
खचित असावी सती भूमिजा
किती दारुणा स्थिती दैवजा!
अपमानित ही वनीं मानिनी

असून सुवर्णा, शामल, मलिना
अधोमुखी ही शशांक-वदना
ग्रहण-कालिंची का दिग्ललना
हताश बसली दिशा विसरुनी

संदिग्धार्या जणूं स्मृति ही
अन्यायार्जित संपत्ती ही
अमूर्त कोणी चित्रकृती ही
पराजितां वा कितीं विपनीं

रामवर्णिता आकृती, मुद्रा
बाहुभूषणें, प्रवाल-मुद्रा
नि:संशय ही तीच सु-भद्रा
हीच जानकी जनकनंदिनी

असेच कुंडल, वलयें असलीं
ऋष्यमुकावर होतीं पडलीं
रघुरायांनीं तीं ओळखिलीं
अमृत-घटीं ये यशोदायिनी

[संपादन] ३९. नको करुंस वल्गना

नको करुस वल्गना रावणा निशाचरा!
समूर्त रामकीर्ति मी, ज्ञात हें सुरासुरां

वंदनास योग्य मी परायिता पतिव्रता
पुण्य जोड राक्षसा झणीं करून मुक्तता
लाज राख नारिची वीर तूं जरी खरा

नृपति-पाप पाहतें, अनयनित्य साहतें
राष्ट्र तें जगावरीं नाममात्र राहतें
काय आग लाविशी तुझ्या करें तुझ्या पुरा?

जियें तिथें दिसे मला लोकनाथ राम तो
शयनिं ये उशातळीं रामहस्तवाम तो
चिंतनांत पूजितें त्याच मी धनुर्धरा

योग्य एक त्यास मी, योग्य ना दुजा कुणा
परत धाड रे मला प्रियासमीप रावणा!
शरण त्यास रक्षुनी राम देई आसरा

सख्य जोड त्यासवें हो कृतार्थ जीवनीं
नित्यशुद्ध जानकी राघवांस अर्पुनी
ना तरी मृतीच ये चालूनि तुझ्या धरा

इंद्रवज्रही कधीं चुकेल घाव घालितां
क्षणहि आयु ना तुझे रामचंद्र कोपतां
रामबाणवृष्टि ती प्रळयसी भयंकरा

ठाकतां तुझ्यापुढे वीर युद्धकाम तो
ठेवणार वंश ना असा समर्थ राम तो
अधम काममूढ तूं, विचार हा करी जरा

बघेन रामबाण मी निडर या तुझ्या उरीं
कंक पंख पाठिशीं, नामचिन्ह ज्यावरी
भारमुक्त होऊंदे एकदां वसुंधरा

[संपादन] ४०. मज सांग अवस्था दूता, रघुनाथांची

मुद्रिका अचूक मी ही ओळखिली त्यांची
मज सांग अवस्था दूता, रघुनाथांची

हातांत धनु तें, अक्षय भाता पृष्ठीं
विरहात काय ते राघव झाले कष्टी?
कां श्यामल वलयें नयनतळीं चिंतांची?

बसलेत काय ते लावून कर कर्मातें?
विसरले काय ते दु:खे निजधर्मातें?
करितात अजून ना कर्तव्यें नृपतीचीं?

सोडिले नाहिं ना अजून तयांनी धीरा?
का शौर्याचाही विसर पडे त्या वीरा?
साह्यार्थ असती ना सैन्ये सन्मित्रांची?

इच्छिती विजय ना त्यांचा अवघें राजें?
का लोकप्रीतिला मुकले प्रियकर माझे?
विसरले थोरवी काय प्रभु यत्नांची?

का मलाच विसरून गेले माझे स्वामी?
मी दैवगतीने पिचतां परक्या धामीं
का स्मृती तयांना छळिते या सीतेची?

करतील स्वयें ना नाथ मुक्तता माझी?
धाडिल भरत ना सैन्य, पदाती, वाजी?
कळतसे त्यांस का वार्ता रघुनगरीची?

का विपत्कालिं ये मोह तयांच्या चित्तीं?
पुसटलीं नाही ना सीतेवरची प्रीती?
करितील मुक्तता कधीं तें वैदेहीची?

त्या स्वर्णघडीची होइन का मी साक्षी?
कधिं रामबाण घुसेल का रावणवक्षीं?
वळतील पाउलें कधीं इथें नाथांचीं?

जोंवरीं तयांचें कुशल ऐकतें कानीं
तोवरी सजिव असेन मी तैशा स्थानीं
जन्मांत कधी का होइल भेट तयांचीं?

[संपादन] ४१. पेटवी लंका हनुमंत

लीलया उडुनी गगनांत
पेटवी लंका हनुमंत

नगाकार घन दिसे मारती
विजेपरी तें पुच्छ मागुतीं
आग वर्षवी नगरीवरती
गर्जना करी महावात

या शिखराहुन त्या गेहावर
कंदुकसा तो उडे कपीवर
शिरे गवाक्षीं पुच्छ भयंकर
चालला नगर चेतवीत

भडके मंदिर, पेटे गोपुर
द्वार कडाडून वाजे भेसुर
रडे, ओरडे तों अंत:पुर
प्रकाशीं बुडे वस्तुजात

जळे धडधडा ओळ घरांची
राख कोसळे प्रासादांची
चिता भडकली जणूं पूराची
राक्षसी करिती आकांत

कुणी जळालें निजल्या ठायीं
जळत पळत कुणि मार्गी येई
कुणि भीतीनें अवाक होई
ओळखी नुरल्या प्रलयांत

माय लेकरां टाकून धावे
लोक विसरले नातीं नावें
उभें तेवढें पडे आडवें
अचानक आला कल्पांत

खड्गे ढाली पार वितळल्या
वीरवृत्ति तर सदेह जळल्या
ज्वाळेंमाजीं ज्वाळा मिळल्या
सघनता होय भस्मसात

वारा अग्नी, अग्नी वारा
नुरे निवारा, नाहीं थारा
जळल्या वेशी, जळे पहारा
नाचतो अनल मूर्तिमंत

[संपादन] ४२. सेतू बांधा रे सागरी

बांधा सेतू बांधा रे सागरीं

गिरिराजांचे देह निखळुनी
गजांगशा त्या शिळा उचलुनी
जलांत द्या रे जवें ढकलुनी
सेतुबंधने जोडून ओढा समीप लंकापुरी

फेका झाडें, फेका डोंगर
पृष्ठीं झेलिल त्यांना सागर
ओढा पृथ्वी पैलतटावर
वडवाग्नी तो धरील माथीं सेतू शेषापरी

रामभक्ति ये दाटुनि पोटीं
शततीर्थाच्या लावल्या पाठी
सत्कार्याच्या पथिकासाठीं
श्रीरामाला असेच घेती वानर पाठीवरी

नळसा नेता सहज लाभतां
कोटी कोटी हात राबतां
प्रारंभी घे रूप सांगता
पाषाणच हे पहा लीलया तरती पाण्यावरी

चरण प्रभुचे जळांत शिरतां
सकळ नद्यांना येई तीर्थता
आरंभास्तव अधीर पूर्तता
शिळा होऊनी जडूं लागल्या, लाटा लाटांवरी

गर्जा, गर्जा हे वानरगण!
रघुपति राघव, पतितपावन
जय लंकारी, जानकिजीवन
युद्धाआधी झडूं लागु द्या स्फूर्तीच्या भेरी

सेतू नच हा क्रतू श्रमांचा
विशाल हेतु श्रीरामांचा
महिमा त्यांच्या शुभनामाचा
थबकुनि बघती संघकार्य हें स्तब्ध दिशा चारी

भुभु:कारुनी पिटवा डंका
विजयी राघव, हरली लंका
मुक्त मैथिली, कशास शंका
सेतुरूप हा झोतच शिरला दुबळ्या अंधारीं

[संपादन] ४३. रघुवरा बोलता का नाही?

काय ऐकतें? काय पाहतें? काय अवस्था ही?
रघुवरा, बोलता कां नाहीं?

जायेआधीं मरण पतीचे, हें कैसें घडले?
दैवच अंती तुटुन खड्गसे माझ्यावर पडलें
पुण्यहीन का ठरल्या लोकीं कौसल्यामाई?

ज्योतिष्यांचीं ग्रहगणितें का सर्वथैव चुकलीं?
अभागिनी ही कशी अचानक सर्वस्वा मुकली?
धुळींत निजले पुरुषोत्तम का या मूढेपायीं?

ओळखितें मी कमलनेत्र हे, ओळखितें श्रवणें
सरे न का ही झोंप राघवा, दीनेच्या रुदने?
गतीहीन कां झाली सृष्टी, सुन्न दिशा दाही?

सुवर्णधनु हें ओळखिलें पण कुठें महाबाहू?
श्यामवर्ण ती मूर्त पुन्हां मी कुठें कधीं पाहूं?
नयन जाहले रडुन कोरडे, अंगाची लाही

विवाहसमयीं शपथ दिली ती विसरलांत सखया!
पुशिल्यावांचुन स्वर्गी गेला सोडुनिया जाया
ऐकलेंत का? - जनकनंदिनी आर्त तुम्हां बाही

रघुकुलतिलका, तुम्ही भेटलां पितरांना स्वर्गी
परक्या हातीं सजीव उरली अर्धांगी मार्गी
रघुकुलजातें शोभुन दिसली रीत तरी का ही?

अथांग सागर जिंकून आला कशास मजसाठीं?
काय जन्मलें कुलनाशिनि मी धरणीच्या पोटीं?
जनकें केले यज्ञ, तयांची काय सांगता ही?

हे लंकेशा, ज्या शस्त्रानें मारविलें नाथां
घाव तयाचा घाल सत्वरीं सीतेच्या माथां
रामामागें तरी जाउंदे अंतीं वैदेही

[संपादन] ४४. सुग्रीवा हे साहस असले

सुग्रीवा, हें साहस असलें
भूपतीस तुज मुळीं न शोभलें

अटीतटीचा अवघड हा क्षण
मायावी तो कपटी रावण
भिडलासी त्या अवचित जाउन
काय घडें तें नाहीं कळलें

विचारल्याविण मला, बिभिषणा
सांगितल्याविण नला, लक्ष्मणा
कुणा न देतां पुसट कल्पना
उड्डाणा तव धाडस धजलें

ज्ञात मला तव अपार शक्ति
माझ्यावरची अलोट भक्ति
तरिहि नव्हतें योग्य संप्रति
अनपेक्षित हें कांही घडले

द्वंद्वे जर तुज वधणें रावण
वृथा जमविलीं सैन्ये आपण
कशास यूथप वा वानरगण
व्यर्थच का हे ऋक्ष मिळविले?

काय सांगूं तुज, शत्रूदमना
नृप नोळखती रणीं भावना
नंतर विक्रम, प्रथम योजना
अविचारें जय कुणा लाभले?

तू पौलस्त्यासवें झुंजतां
क्षीण क्षण जर एकच येता
सन्मित्राते राघव मुकता
तव सैनिक मग असते खचले

काय लाभते या द्वंद्वानें?
फुगता रावण लव विजयानें
लढते राक्षस उन्मादानें
वानर असते परतच फिरले

दशकंठचि मग विजयी होता
मैथिलीस मग कुठुन मुक्तता?
व्यर्थच ठरतीं वचनें शपथा
कुणी राक्षसां असतें वधिलें?

जा सत्वर जा, जमवी सेना
करी रणज्ञा, सुयोग्य रचना
आप्त-सैन्यसह वधूं रावणा
व्यर्थ न दवडी शौर्य आपुलें

[संपादन] ४५. रावणास सांग अंगदा

जा, क्षणि जा, रावणास सांग अंगदा
शेवटचा करि विचार फिरुन एकदां

नगरद्वारि राम उभा सिंधु लंघुनी
रणरागीं वानरगण जाय रंगुनी
शरण येई राघवास सोडुनि मदा

वरलाभें ब्रह्माच्या विसरूनी बला
पाप्या, तूं पीडिलेंस अखिल पृथ्विला
छळिसी तूं देव, नाग, अप्सरा सदा

उतरविण्या गर्व तुझा ठाकला उभा
शौर्याचा सूर्य राम, सैन्य ही प्रभा
जाळिल तव वंश, सर्व राज्य-संपदा

शंखनाद ऐक, देख धरणिकंप ते
तुजसाठीं राक्षसकुल आज संपते
अजून तरी सोड तृषा तव घृणास्पदा

अंतीं तरि सोड मूढ वृत्ति आपुली
परतुन दे राघवास देवी मैथिली
शरणागत होई त्यास, टाळ आपदा

स्थिर राही समरीं रे समय जाणुनी
जातिल तुज रामबाण स्वर्गी घेउनी
वाट उरे हीच एक तुजसी मोक्षदा

नातरि बल मायावी दाव संगरीं
ज्यायोगें हरिली तूं रामसहचरी
वज्राप्रति भिडव बाण, मेरुसी गदा

नामहि तव भूमीवर कठीण राहणें
आपणिली रामकृपा सुज्ञ विभिषणें
लंकेच्या भूषवील तोच नृपपदां

[संपादन] ४६. नभा भेदूनी नाद चालले

नभा भेदुनी नाद चालले शंख दुंदुभींचे
अनुपमेय तो सुरूं युद्ध हें रामरावणांचें

सर्शख राक्षसगण तो दिसला
कृष्णवनांवर बलाकमाला
मुखांतुनी शत गजें चपला
रणांगणावर कोसळलें तों पाउस बाणांचे

नाचत थय थय खिंकाळति हय
गजगर्जित करि नादसमन्वय
भीषणता ती जणूं नादमय
त्या नादांतच मिळले पदरव प्लवग-राक्षसांचे

दंत दाबुनी निज अधरांवर
वानरताडण करिती निशाचर
नभांत उडती सदेह वानर
शस्त्र म्हणून ते घाव घालिती वृक्ष-पर्वतांचे

"जय दाशरथी, जय तारासुत"
प्रहार करिती वानर गर्जत
झेलित शस्त्रां अथवा हाणित
भरास आलें द्वंद्व जणूं कीं महासागरांचे

गदा, शूळ वा लागून शक्ति
राक्षस वानर घेती मुक्ति
रणांत पडती अपुल्या रक्तीं
’जय लंकाधिप’ घोष घुमविती अरि वानरांचे

द्वीप कोसळे, पडला घोडा
वर बाणांचा सडा वांकडा
’हाणा मारा, ठोका तोडा’
संहारार्थी अर्थ धावती सर्व भाषितांचे

रणांत मरतां आनंदानें
मांसकर्दमी फुलती वदनें
तींहि तुडविलीं जातीं चरणें
रणभूमीवर ओहळ सुटले लाल शोणिताचे

कलेवरावर पडे कलेवर
रुक्ष, निशाचर, नकळे वानर
मरणांहुनही शौर्य भयंकर
कैक योजनें उडुनी जाती भाग अवयवांचे

चक्रें, चरणें, हस्त, लांगुलें
शुंडा, ग्रीवा, शिरें, पाउलें
पडलें तें शतखण्डित झालें
प्रलयकाळसें अंग थरारे धरणी-गगनाचें

द्वंद्व तरी हो कुठें कुणाचें
काळमुखांतुन कोणी वांचें
कुठें कुणाचें कबंध नाचे
धुमाळींत त्या कोणा नुरलें भानच कोणाचें

[संपादन] ४७. लंकेवर काळ कठीण आज पातला

योग्य समयीं जागविलें बांधवा, मला
लंकेवर काळ कठीण आज पातला

पाप्याप्रति आत्मघात
दुष्कर्म्या नरकपात
अटळचि तो नियतीने नियम योजिला

तव मानसीं आत्मगर्व
विषमय तव आयु सर्व
बोधशब्द कधीं न मधुर तुजसिं लागला

बिभिषणकृत सत्यकथन
अप्रिय परि पथ्य वचन
झिडकारुन एक आप्त तूंच हरविला

मंदोदरि विनवी नित
हित गमलें तुजसी अहित
भाव तिचा पायतळीं व्यर्थ तुडविला

पाहुनिया देश समय
पडताळुन न्याय, अनय
कार्याप्रति हात कधीं तूं न घातला

मनिं आला तो निर्णय
ना विचार वा विनिमय
सचिव कुणी पारखुनी तूं न पाहिला

प्रिय तितकें ऐकलेंस
अप्रिय तें त्यागिलेंस
यांत घात तूंच तुझा पूर्ण साधिला

उपदेशा हा न समय
लंकेशा, होई अभय
कर्तव्या कुंभकर्ण नाहिं विसरला

बोलवि मज बंधुभाव
रणिं त्याचा बघ प्रभाव
रिपुरक्तें भिजविन मी आज पृथ्विला

सहज वध्य मजसी इंद्र
कोण क्षुद्र रामचंद्र!
प्राशिन मी क्षीरसिंधु, गिळिन अग्निला

वचन हाच विजय मान
करि सौख्यें मद्यपान
स्कंधी मी सर्व तुझा भार घेतला

[संपादन] ४८. आज का निष्फळ होती बाण

आज कां निष्फळ होती बाण?
पुण्य सरें कीं सरलें माझ्या बाहूंमधलें त्राण?

शरवर्षामाजीं दारुण
पुन्हां तरारे तरुसा रावण
रामासन्मुख कसे वांचती रामरिपूचे प्राण?

चमत्कार हा मुळीं ना उमजे
शीर्ष तोडितां दुसरें उपजें
रावणांग कीं असे कुणी ही सजिव शिरांची खाण?

शत शीर्षे जरि अशीं तोडिली
नभीं उडविलीं, पदीं तुडविलीं
पुन्हां रथावर उभाच रावण, नवें पुन्हां अवसान

इंद्रसारथे, वीर मातली,
सांग गूढता मला यांतली
माझ्याहुन मज असह्य झाला विद्येचा अपमान

वधिला खर मी, वधिला दूषण
वधिला मारिच, विराध भीषण
हेच बाण ते केला ज्यांनी वाली क्षणि निष्प्राण

ज्यांच्या धाकें हटला सागर
भयादराचे केवळ आगर
त्या भात्यांतच विजयी शरांची आज पडे कां वाण?

सचैल रुधिरें न्हाला रावण
सिंहापरि तरि बोले गर्जुन
मलाहि ठरला अवध्य का हा तनुधारी अभिमान?

संचित असतील देव, अप्सरा
सुचेल तप का कुणा मुनिवरा?
व्यर्थच झालें काय म्हणूं हें अवघें शरसंधान?

[संपादन] ४९. भूवरी रावण वध झाला

देवहो, बघा रामलीला
भूवरी रावणवध झाला

दाहि दिशांचीं मुखें उजळलीं
कंपरहित ती अवनी झाली
रविप्रभेतें स्थिरता आली
पातली महद्भाग्यवेला

’साधु साधु’ वच वदती मुनिवर
छेडुं लागले वाद्यें किन्नर
प्रमोद उसळे भूलोकावर
सुरांचा महारिपु मेला

रणीं जयाचें चाले नर्तन
नृपासहित हे विजयी कपिगण
श्रीरामांचे करिती पूजन
वाहुनी फुलें, पर्णमाला

’जय जय’ बोला उच्चरवाने
कल्पतरूंची फेका सुमनें
फेका रत्नें, मणीभूषणें
जयश्री लाभे सत्याला

श्याम राम हा धर्मपरायण
हा चक्रायुध श्रीनारायण
जगदुत्पादक त्रिभुवनजीवन
मानवी रामरूप त्याला

हा उत्पत्ति-स्थिति-लयकारक
पद्मनाभ हा त्रिभुवनतारक
शरण्य एकच खलसंहारक
आसरा हाच ब्रह्मगोलां

वत्सलांछना धरुनी वक्षीं
संतसज्जनां हा नित रक्षी
हा सत्याच्या सदैव पक्षीं
जाणतो हाच एक याला

हा श्री विष्णू, कमला सीता
स्वयें जाणता असून, नेणता
युद्ध करी हें जगताकरितां
दाखवी अतुल रामलीला

[संपादन] ५०. किती यत्नें मी पुन्हां पाहिली

किति यत्नें मी पुन्हां पाहिली तूंते
लीनते, चारुते, सीते

संपलें भयानक युद्ध
दंडिला पुरा अपराध
मावळला आतां क्रोध
मी केलें जें, उचित नृपातें होतें

घेतले रणीं मी प्राण
नाशिला रिपू, अवमान
उंचावे फिरुनी मान
तव भाग्यानें वानर ठरले जेते

शब्दांची झाली पूर्ती
निष्कलंक झाली कीर्ति
पाहिली प्रियेची मूर्ति
मी शौर्यानें वांकविलें दैवातें

तुजसाठीं सागर तरला
तो कृतार्थ वानर झाला
सुग्रीव यश:श्री ल्याला
सुरललनाही गाती मंगल गीतें

हें तुझ्यामुळें गे झालें
तुजसाठीं नाही केलें
मी कलंक माझे धुतले
गतलौकिक गे लाभे रघुवंशातें

जो रुग्णाइत नेत्रांचा
दीपोत्सव त्यातें कैचा?
मनि संशय अपघाताचा
मी विश्वासूं केवि तुझ्यावर कांते?

तो रावण कामी कपटी
तूं वसलिस त्याच्या निकटीं
नयनांसह पापी भृकुटी
मज वदवेना स्पष्ट याहूनी भलतें

मी केलें निजकार्यासी
दशदिशा मोकळ्या तुजसी
नच माग अनुज्ञा मजसी
सखि, सरलें तें दोघांमधलें नातें

[संपादन] ५१. लोकसाक्ष शुद्धी झाली

लोकसाक्ष शुद्धी झाली सती जानकीची
स्वामिनी निरंतर माझी, सुता ही क्षमेची

ज्ञात काय नव्हतें मजसी हिचें शुद्ध शील?
लोककोप उपजवितो का कधी लोकपाल?
लोकमान्यता ही शक्ती लोकनायकांची

अयोध्येस जर मी नेतों अशी जानकीते
विषयलुब्ध मजसी म्हणते लोक, लोकनेते
गमावून बसतो माझ्या प्रीत मी प्रजेची

प्रजा रंजवितों सौख्यें तोच एक राजा
हेंच तत्व मजसी सांगे राजधर्म माझा
प्रजा हीच कोटी रूपें मला ईश्वराचीं

प्राणही प्रसंगी देणे प्रजासुखासाठी
हीच ठाम श्रद्धा माझ्या वसे नित्य पोटीं
मिठी सोडवूं मी धजलों म्हणून मैथिलीची

वियोगिनी सीता रडतां धीर आवरेना
कसे ओलवूं मी डोळे? उभी सर्व सेना
पापण्यांत गोठविली मी नदी आसवांची

राम एक हृदयीं आहे सखी जानकीच्या
जानकीविना ना नारी मनीं राघवाच्या
शपथ पुन्हां घेतों देवा, तुझ्या पाउलांची

विषयलोभ होता जरि त्या वीर रावणातें
अनुल्लंघ्य सीमा असती क्षुब्ध सागरातें
स्पर्शिलीं तयें ना गात्रें हिच्या साउलीचीं

अग्निदेव, आज्ञा अपुली सर्वथैव मान्य
गृहस्वामिनीच्या दिव्यें राम आज धन्य
लोकमाय लाभे फिरुनी प्रजा अयोध्येची

[संपादन] ५२. त्रिवार जयजयकार रामा

त्रिवार जयजयकार, रामा, त्रिवार जयजयकार
पुष्पक यानांतुनी उतरले स्वर्गसौख्य साकार

तुला चिंतिते सुदीर्घ आयू
पुण्यसलीला सरिता सरयू
पुलकित पृथ्वी, पुलकित वायू
आज अहल्येपरी जाहला नगरीचा उद्धार

शिवचापसम विरह भंगला
स्वयंवरासम समय रंगला
अधीर अयोध्यापुरी मंगला
सानंदाश्रू तुला अर्पिते दृढ प्रीतीचे हार

तव दृष्टीच्या पावन स्पर्शे
आज मांडिला उत्सव हर्षे
मनें विसरलीं चौदा वर्षे
सुसज्ज आहे तव सिंहासन, करी प्रभो स्वीकार

तुझ्या मस्तकी जलें शिंपतां
सप्त नद्यांना मिळो तीर्थता
अभिषिक्ता तुज जाणीव देतां
मुनिवचनांचा पुन्हां होऊं दे अर्थासह उच्चार

पितृकामना पुरी होऊं दे
रामराज्य या पुरीं येऊं दे
तें कौसल्या माय पाहूं दे
राज्ञीसंगे तूं परंपरेनें भोग तुझा अधिकार

प्रजाजनीं जें रचिलें स्वप्नीं
मूर्त दिसे तें स्वप्न लोचनीं
राजा राघव, सीता राज्ञी
चतुर्वेदसे लोक पूजिती रघुकुलदीपक चार

रामराज्य या असतां भूवर
कलंक केवल चंद्रकलेवर
कज्जल-रेखित स्त्रीनयनांवर
विचारांतलें सत्य आणतील अयोध्येंत आचार

समयि वर्षतिल मेघ धरेवर
सत्यशालिनी धरा निरंतर
सेवारत जन, स्वधर्मतत्पर
"शांति: शांति:" मुनी वांछिती, ती घेवो आकार

[संपादन] ५३. प्रभो, मज एकच वर द्यावा

प्रभो, मज एकच वर द्यावा
या चरणांच्या ठायीं माझा निश्चल भाव रहावा

कधिं न चळावे चंचल हें मन
श्रीरामा, या चरणांपासुन
जोंवरि भूवर रामकथानक तोंवर जन्म असावा

रामकथा नित वदनें गावी
रामकथा या श्रवणीं यावी
श्रीरामा, मज श्रीरामाविण दुसरा छंद नसावा

पावन अपुलें चरित्र वीरा
सांगुं देत मज देव अप्सरा
श्रवणार्थी प्रभु, अमरपणा या दीनासी यावा

मेवासम मी अखंड प्राशिन
असेल तेथून श्रीरामायण
मेघापरि मी शतधारांनी करीन वर्षावा

रामकथेचें चिंतन गायन
तें रामांचें अमूर्त दर्शन
इच्छामात्रें या दासातें रघुकुलदीप दिसावा

जोंवरि हें जग, जोंवरि भाषण
तोंवरि नूतन नित रामायण
सप्तस्वरांनी रामकथेचा स्वाद मला द्यावा

असंख्य वदनें, असंख्य भाषा
सकलांची मज एकच आशा
श्रीरामांचा चरित्र-गौरव त्यांनीं सांगावा

सूक्ष्म सूक्ष्मतम देहा धरुनी
फिरेन अवनीं, फिरेन गगनीं
स्थलीं स्थलीं पण रामकथेचा लाभ मला व्हावा

[संपादन] ५४. डोहाळे पुरवा रघुकुलतिलका माझे

ओठांत थांबुनी सशब्द आशा लाजे
डोहाळे पुरवा रघुकुलतिलका, माझे

मज उगा वाटतें वनीं विहारा जावें
पांखरांसारखें मुक्त स्वरांनीं गावें
कानांत बांसरी वंशवनांतिल वाजे

वाटतें धरावें कुशींत पाडस भोळें
मज आवडती ते विशाल निर्मळ डोळे
चुंबीन त्यास मी, भरविन चारा चोजें

वल्कलें भिजावीं जळांत माझीं सारीं
घागरी कटीवर, करांत घ्यावी झारी
मस्तकी असावें दुजा घटाचे ओझे

वाटतें खणावें, कंदमूळें काढावीं
तीं हलक्या हातें लीलेनें सोलावीं
चाखून बघावें अमृतान्न तें ताजें

सांजेस बसावें आम्रतरूच्या खालीं
गळतील सुगंधित जधीं मंजिऱ्या भाली
करतील गर्जना दुरून वनाचे राजे

घेऊन धनूतें, बांधुन भाता पाठीं
वाटतें फिरावें वनांत मृगयेसाठीं
पाडीत फिरावें दिसेल श्वापद जें जें

वाटतें प्रभातीं बसुनी वेदीपाशीं
वेदांत करावा प्रकांड अध्वर्यूशी
लालिमा मुखावर यावा पावकतेजें

कां हंसतां ऐसें मला खुळीला देवा?
एवढा तरी हा हट्ट गडे पुरवावा
का विनोद ऐसा प्रिया, अवेळीं साजे?

[संपादन] ५५. मज सांग लक्ष्मणा, जाऊ कुठे?

मज सांग लक्ष्मणा, जाऊं कुठें?
पतिचरण पुन्हां मी पाहूं कुठें?

कठोर झाली जेथें करुणा
गिळी तमिला जेथें अरुणा
पावक जिंके जेथें वरुणा
जें शाश्वत त्याचा देंठ तुटे

व्यर्थ शिणविले माता जनका
मी नच जाया, नव्हे कन्यका
निकषच मानी कासें कनका
सिद्धीच तापला आज विटे

अग्नी ठरला असत्यवक्ता
नास्तिक ठरवी देवच भक्ता
पतिव्रता मी तरि परित्यक्ता
चरणिज्या धरेसी कंप लुटे

प्राण तनूंतुन उडूं पाहती
अवयव कां मग भार वाहती?
वाहतसे मज श्रीभागिरथी
अडखळें अंतींचा विपळ कुठें?

सरलें जीवन, सरली सीता
पुनजॉत मी आतां माता
जगेन रघुकुल-दीपाकरितां
फल धरी रूप हें, सुमन मिटें

वनांत विजनीं मरुभूमीवर
वाढवीन मी हा वंशांकुर
सुखांत नांदो राजा रघुवर
जानकी जनांतुन आज उठे

जाई देवरा, पुरा मागुती
शरसे माझे स्वर मज रुपती
पती न राघव, केवळ नृपती
बोलतां पुन्हां ही जीभ थटे

इथुन वंदितें मी मातांना
प्रणाम पोंचवि रघुनाथांना
आशिर्वच तुज घे जातांना
आणखी ओठी ना शब्द फुटे

[संपादन] ५६. गा बाळांनो, श्री रामायण

रघुराजाच्या नगरीं जाउन
गा बाळांनो, श्रीरामायण

मुनिजन-पूनित सदनांमधुनी
नराधिपांच्या निवासस्थानी
उपमार्गातुन, राजपधांतुनि
मुक्त दरवळो, तुमचें गायन

रसाळ मूलें, फलें सेवुनी
रसाळता त्या स्वरांत भरुनी
अचुक घेत जा स्वरां मिळवुनी
लय-तालांचें पाळा बंधन

नगरिं लाभतां लोकमान्यता
जाइल वार्ता श्रीरघुनाथां
उत्सुक होऊन श्रवणाकरितां
करवितील ते तुम्हां निमंत्रण

सर्गक्रम घ्या पुरता ध्यानीं
भाव उमटुं द्या स्पष्ट गायनीं
थोडें थोडें गात प्रतिदिनीं
पूर्ण कथेचे साधा चित्रण

नका सांगूं रे नाम ग्राम वा
स्वतःस माझे शिष्यच म्हणवा
स्वरांत ठेवा हास्य गोडवा
योग्य तेवढे बोला भाषण

स्वयें ऐकतां नृप शत्रुंजय
संयत असुं द्या मुद्रा अभिनय
काव्य नव्हे, हा अमृतसंचय
आदरील त्या रघुकुलभूषण

नच स्वीकारा धना कांचना
नको दान रे, नको दक्षिणा
काय धनाचें मूल्य मुनिजनां?
अवध्या आशा श्रीरामार्पण

श्री रा म चं द्रा र्प ण म स्तु

संपूर्ण गीत रामायण हे प्रताधिकारीत असून श्री. सुमित्र श्री. माडगूळकर यांच्या संमतीने इथे उद्घ्रुत केलेले आहे.

संपूर्ण गीत रामायणासाठीचा अधिकृत दुवा http://www.gadima.com हा आहे.

[संपादन] इतर माहिती

मुख्य लेख - गीतरामायणाचे रामायण

आदिकवी वाल्मीकीने आपल्या स्वतंत्र सौंदर्य दृष्टीने विधात्याच्या सूक्ष्म आणि स्थूल सृष्टीतून नेमके सौंदर्य टिपून काढून त्यातून आपली रामकथा रचली. त्याचप्रमाणे कविश्री माडगूळकरांनी वाल्मीकीच्या काव्य सृष्टीतले वेचीव सौंदर्य आपल्या स्वयंभू प्रतिभेने बिनचूकपणे निवडले आहे. गीतरामायणातली काही गीते रामायणासारखीच चिरंजीव होऊन राहतील आणि त्याचबरोबर माडगूळकरांचे नाव देखील. -- कविवर्य बा. भ. बोरकर

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये