Jump to content

अशोकाचे शिलालेख

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अशोकाचे शिलालेख म्हणजेच अशोकस्तंभ, मोठमोठे गोलाकार खडक आणि गुहांमधील (लेण्यामधील) भिंतीवर कोरलेल्या ३३ शिलालेखांचा संग्रह आहे. आणि मौर्य साम्राज्याचा सम्राट अशोक याने इ.स.पू. २७२ ते इ.स.पू. २३२ या आपल्या राज्यकारभाराच्या काळात हे शिलालेख तयार करून घेतलेले आहेत.

सध्याच्या पाकिस्तान, नेपाळ आणि भारत या देशांमध्ये सगळीकडे हे शिलालेख विखुरलेले आहेत आणि बौद्ध धर्माचा हा पहिला स्पष्ट आणि निश्चित पुरावा आहे. भारतीय इतिहासात होऊन गेलेल्या सर्वात सामर्थ्यवान व बलाढ्य अशा सम्राट अशोकाच्या पुरस्कारामुळे आणि प्रयत्नांमुळे बौद्ध धर्माचा पहिल्यांदाच प्रचंड प्रसार कसा झाला त्याचे इत्थंभूत वर्णन या आज्ञापत्रांमध्ये केलेले आहे.

प्रकार

[संपादन]

सम्राट अशोकाच्या शाही आज्ञा आणि त्याच्या अन्य आलेखांचे बृहद शिलालेख, लघु शिलालेख, विशाल स्तंभालेख, लघु स्तंभालेख आणि गुंफा शिलालेख असे पाच प्रकारचे शिलालेख आहेत. चौदा बृहद शिलालेख शृंखला पाच ठिकाणी, सहा विशाल स्तंभालेख शृंखला सहा ठिकाणी (त्या पैकी टोपरा स्तंभावर सात लेख), एकोणीस ठिकाणी लघु शिलालेख, सहा लघु स्तंभालेख आणि तीन गुंफा-शिलालेख असे शिलालेख उपलब्ध झाले आहेत. या लेखांचे स्थळ आणि लेख-संख्या असे वर्गीकरण खालील प्रमाणे आहे.

चौदा बृहद शिलालेख शृंखला पाच ठिकाणी - गिरनार (१४), कालसी (१४), शहाबाजगढ (१४), मानसेहरा (१४) येरागुडी (१४), धौली (११ - ११,१२ व १३ शिलालेख वगळलेले), जौगड (११,१२ व १३ शिलालेख वगळलेले), सोपारा (८वा आणि ९वा फक्त). धौली आणि जौगड येथे शृंखलेव्यतिरिक्त प्रत्येकी दोन अधिकचे बृहद शिलालेख आहेत.

सहा स्तंभालेख शृंखला सहा ठिकाणी - दिल्ली (टोपरा) (सातवा अधिकचा स्तंभालेख फक्त याच स्तंभावर), दिल्ली (मेरठ), लोरिया (आराराज), लोरिया (नंदनगढ), रामपूर्वा आणि कौसंबी (अलाहाबाद).

लघु शिलालेख - अर्हुआरा, भाब्रु, बैरट, गुजर्रा, गविमठ, जतिंग (रामेश्वर), मास्की, पांगुरिया, रुपनाथ, रतनपूर्वा, सहसराम, बहापुर, ब्रम्हगिरी, रजुला मंदगिरी या ठिकाणी प्रत्येकी एक.

नित्तूर, उदेगोलम या ठिकाणी प्रत्येकी दोन.

लघु स्तंभालेख - सारनाथ, कौसंबी, सॉंची, देविया (राणी), लुंबिनी आणि निगलिवा या ठिकाणी प्रत्येकी एक.

गुंफा शिलालेख - बार्बरा पर्वतातील तीन गुंफा - निग्रोध, खलीतक आणि सुप्पिय अशा एकूण तीन.

सम्राट अशोकाच्या शिलालेखांचा शोध

[संपादन]

सम्राट अशोकाचा मीरतमध्ये असलेला पहिला आलेख इ.स. १७५० मध्ये पेड्रोटिफेन-थेलरने शोधून काढला. त्यानंतर इ.स. १९१५ पर्यंत टॉंड, किट्टो, राईस, एलिस, कॅप्टन ले, फीहरर, ऑस्ट्रेल, बीडन व भगवानलाल इंद्र यांनी अशोकाचे आलेख शोधले. इ.स. १८३७ साली प्रिन्सेप याने आलेखातील ब्राह्मी लिपीचे वाचन केले. हे आलेख शाहबाझगढी, मानसेरा, कालसी, गिरनार, धौली, जौगड, कर्नूल, सोपारा या ठिकाणी सापडलेले आहेत. अशोकाचे स्तंभालेख लोरिया नंदनगड, टोपरा, अलाहाबाद, लोरिया अरराज, रामपुरवा व सारनाथ येथे मिळाले. याचबरोबर आणखी काही महत्त्वपूर्ण आलेख रूपनाथ, सहसराम, बैराट, रतनपूर्वा, बाराबर, मस्की, भाब्रू, सॉंची व कौशांबी येथेही सापडले आहेत. रतनपूर्वा हा लधु शिलालेख या सर्वांत नवीन इ.स. २००९ मधे सापडलेला आहे.

देवानांपिय पियदसि म्हणजेच राजा अशोक असे निश्चित

[संपादन]
अशोकाचा गुजर्रा येथील शिलालेख- या शिलालेखात "देवानांपियस पियदसिनो असोकराजस" असा उल्लेख आढळला.
कर्नाटकातील रायचूर जिल्ह्यातील मस्की येथील शिलालेख-या शिलालेखात"देवानांपियस असोकस"असा उल्लेख आढळला.

इसवीसन १९१५ मधे कर्नाटक राज्यातील रायचूर या जिल्ह्यात मास्की या गावी सी. बिडॉन या खाण अभियंत्यास एक शिलालेख सापडला.या शिलालेखात नेहेमीच्या "देवानांपिय पियदसि" ऐवजी "देवानांपियस असोकस" असा उल्लेख आढळला. पाठोपाठ कर्नाटकातीलच बेल्लारी जिल्ह्यातील नित्तूर या गावी अशोकाचे दोन लघु-शिलालेख सापडले. या शिलालेखात "देवानांपिय पियदसि" ऐवजी "राजा असोक" असा उल्लेख आढळला. नित्तूरपासून जवळच उदेलगोलम या गावी दोन शिलालेख सापडले. या दोहोंपैकी एक क्षतिग्रस्त झालेला होता परंतु दुसऱ्या शिलालेखात "देवानांपिय पियदसि" ऐवजी "राजा असोको देवानांपियो" असा उल्लेख आढळला. आणि देवानांप्रिय प्रियदर्शी म्हणजेच इ.स.पू. २७२ ते २३२ मधील भारतीय राजा सम्राट अशोक हे सिद्ध झाले. इ.स. १९५५ मधे मध्य प्रदेशातील दतिया जिल्ह्यातील गुजर्रा या गावी अशोकाचा आणखी एक शिलालेख सापडला या शिलालेखात "देवानांपियस पियदसिनो असोकराजस" असा उल्लेख आढळला. अशा प्रकारे देवानांप्रिय प्रियदर्शी म्हणजेच सम्राट अशोक, या सत्यावर शिक्कामोर्तब झाले.

शिलालेखांची भाषा आणि लिपी

[संपादन]

अशोकाच्या कोरीव लेखांची संख्या चाळीसच्या आसपास असून मोठ्या शिळांवरील राजाज्ञा, लहान शिळांवरील राजाज्ञा, स्वतंत्र दगडावरील राजाज्ञा, मोठ्या स्तंभावरील व लहान स्तंभावरील राजाज्ञा अशा पाच गटात त्याची विभागणी केली जाते. अशोकाचे नाव फक्त लहान शिळांवरील राजाज्ञांच्या प्रतिकृतीत आढळते. अन्य कोरीव लेखांवर फक्त देवानाम पिय पियदस्सी एवढाच त्याचा उल्लेख येतो. अशोकाचे हे लेख सामान्यपणे प्राकृत भाषेत आणि ब्राह्मी लिपीत कोरलेले आढळतात परंतु भारताच्या वायव्य भागात आढळलेले लेख आरमाइक भाषेतखरोष्ठी लिपीत आढळतात. अफगाणिस्तानात ते आरमाइक व ग्रीक भाषांमध्ये कोरलेले आहेत.

दगडी शिलालेख

[संपादन]

सहाव्या बृहद शिलालेखाचा अनुवाद

[संपादन]

देवानांप्रिय प्रियदर्शी राजा असे सांगतो. अतिशय अंतराळ झाला, (खुप कालावधी गेला) ज्यापूर्वी राज्यात आवश्यक कार्ये होत नव्हती, वा (कार्याची) माहिती ही मिळत नव्हती. म्हणून मी असे केले (अशी व्यवस्था केली) आहे. सर्व काळी, भोजन समयी, अंतःपुरात, शयनकक्षात, पशुशाळेत, घोड्यावर स्वार असेतो अथवा उद्यानात असेतो, सर्वत्र (कोणत्याही स्थळी-काळी) वृत्तदात्याने स्थिर होउन (शांततेने, घाई न करता) मला जनतेचे वृत्त सांगावे. (मी) सर्वत्र जनतेचे काम करतो. आणि (मी) ज्या कांही तोंडी आज्ञा देतो, दाना संबंधी वा घोषणे संबंधी वा महामात्रांवर सोपविलेल्या कामा संबंधी - जर कांही विवाद उत्पन्न झाला किंवा परिचर्चा होउ लागली तर – त्याची सुचना मला  त्वरित सर्वत्र सर्वकाळी द्यावी. मी अशी आज्ञा करतो. (कितीही) परिश्रमाने किंवा कार्यपूर्तीने मला (संपूर्ण) समाधान होत नाही. सर्व लोकांचे हित हे माझे कर्तव्य आहे. व त्याचे मुळ आहे परिश्रम आणि कार्यपूर्ती. सर्व लोकहिताहून मोठे कांही नाही. मी जो कांही पराक्रम करतो तो, सर्व प्राणिमात्रांच्या(ऋणा)तुन ऋणमुक्त व्हावे, त्यांना येथे सुख द्यावे व पुढे(ही) स्वर्ग प्राप्ति व्हावी, म्हणून. हा नीती-लेख चिरस्थायी व्हावा आणि माझ्या पुत्र, पौत्र व प्रपौत्रांनी लोकहितास्तव त्याचे अनुसरण करावे म्हणून लिहवीला आहे. परम-पराक्रमा विना हे कठीण आहे.

बाराव्या बृहद शिलाेखाचा अनुवाद

[संपादन]

देवांनाप्रिय प्रियदर्शी राजा दानाने व विविध पुजनाने सर्व संप्रदायातील प्रवज्जित (गृहत्यागी) आणि (सद्)गृहस्थांचा सन्मान करतात. परंतु देवांनाप्रिय कीर्ती व सारवृद्धीस (जसे) मानतात (तसे) दानास व पुजनास नव्हे. सारवृद्धी अनेक प्रकारे होते. यात मुख्य (म्हणजे) अल्पवाणी (बोलण्यावर संयम). (म्हणजे) काय ? तर विनाकारण स्वसंप्रदायाची पुजा व परसंप्रदायाची निन्दा न करावी वा अल्पशी (चर्चा) त्या त्या प्रकरणी व्हावी. वेळोवेळी परसंप्रदायाची पुजाच व्हावी. असे करणारा स्वसंप्रदायाची वृद्धी व परसंप्रदायास उपकृत करतो. याविपरित करणारा स्वसंप्रदायाची क्षति आणि परसंप्रदायास(ही) अपकार करतो. जो कुणी स्वसंप्रदायाच्या भक्तिस्तव स्वसंप्रदायास (अधिक) प्रकाशित करण्यासाठी स्वसंप्रदायाची पुजा व परसंप्रदायाची निन्दा करतो, तो सत्यतः स्वसंप्रदायाची अधिकाधिक हानी करतो. म्हणून एकत्र  असणे चांगले, एकमेकांचा धर्म (जीवन-तत्त्वे) ऐकणे व ऐकविणे (चांगले). देवानांप्रिय (राजा) इच्छा करतात की, सर्व संप्रदाय बहुश्रुत (विद्वान) होवोत, कल्याणगामी होवोत. त्या-त्या प्रसन्न (आपपल्या संप्रदायात प्रसन्न) जनांस सांगावे की, देवांनाप्रिय कीर्ती व सारवृद्धीस (जसे) मानतात (तसे) दानास व पुजनास नव्हे. याच कारणास्तव अनेक धर्म-महामात्र, स्त्री-प्रधान-महामात्र, वज्रभुमिक आणि अन्य (अधिकारी) नियुक्त केले आहेत. याचाच परिणाम आहे की, स्वसंप्रदायाची वृद्धी आणि धम्माचे प्रकाशन होत आहे.

ब्रहमगिरी लघु शिलालेखाचा अनुवाद

[संपादन]

आर्यपुत्राचे (सम्राटाचे) नावे, सुवर्णगिरीच्या महामात्रांनी आणि इसिलसिच्या महामात्रांस आरोग्य चिंतून असे सांगावे की, देवानंप्रियांनी आज्ञापिले आहे. अडीच वर्षांहून अधिक मी उपासक होतो पण विकास नव्हता. या वर्षांहून अतिरिक्त एक वर्षापासुन संघाच्या सानिध्यात अधिक विकास आहे. या काळात जंबुद्वीपा मधे श्रमण आणि मानवांत देव मिसळत नव्हते, आता मिसळत आहेत. हे पराक्रमाचे फळ आहे. हे केवळ महान लोकांनाच शक्य होते असे नव्हे तर विपुल पराक्रमाने सामान्य लोकांनाही स्वर्गात आरोहण शक्य आहे. यासाठीच हे सांगीतले आहे. सर्व लहान व थोरानी असा पराक्रम करावा. सीमेवरील लोकांनीही हे जाणून घ्यावे. असा पराक्रम चिरंतन व्हावा. यामुळे विकास वाढेल, विपुल वाढेल, अवरोधाविना दिवसेंदिवस वाढत राहील. २५६ काळ दूर रहातांना ही घोषणा केली आहे. देवानंप्रिय असे सांगतात. माता-पित्यांशी आज्ञाधारक असावे, तसेच गुरुजनांशीही (आज्ञाधारक असावे). प्राणिमात्रांशी दयाशील असावे, सत्य बोलावे. हे सद्धर्माचे गुण होत. असेच शिष्यांनी आचार्यांशी आचरावे. नातेवाईकांशी असेच आचरावे. पुर्वजांनीही असे सांगीतले आहे, यामुळे दीर्घायुष्य लाभते म्हणून असे वागावे.

चापड (या) लिपिकाराने लिहीले.

स्तंभावरील शिलालेख

[संपादन]
अशोकाचा सारनाथ येथील स्तंभशीर्ष

सम्राट अशोकाने प्रजेच्या हितासाठी व धर्मोपदेशासाठी आज्ञा ज्या दगडी स्तंभांवर कोरलेल्या आहेत त्यांना अशोकस्तंभ म्हणतात. उपलब्ध स्तंभांपैकी सर्वात लहान स्तंभ सहा मीटर उंचीचा असून, सर्वात उंच स्तंभ एकवीस मीटर उंचीचा आहे. सर्वात मोठ्या स्तंभाचे वजन पन्नास टन, व्यास ०.७६ मीटर आणि जमिनीखालील भाग ०.३७ चौरस मीटर आहे.[]. सर्व अशोकस्तंभांमध्ये सारनाथ येथील स्तंभ सांस्कृतिक व कलात्मक दृष्ट्या महत्त्वाचा आहे. इ.स. १९०५ मध्ये केलेल्या उत्खननात याचे फक्त स्तंभशीर्षच सापडले. ते दोन मीटर उंचीचे असून सध्या ते सारनाथ येथील संग्रहालयात ठेवलेले आहे. भारतीय प्रजासत्ताकाने पहिल्या प्रजासत्ताकदिनी या स्तंभाचे शीर्ष राष्ट्रचिन्ह म्हणून स्वीकारले. या स्तंभशीर्षावरील चार सिंह विशिष्ट मौर्यशैलीत कोरलेले असून त्याखालील चित्रमालिकेत हत्ती, घोडा, बैल, सिंह व चोवीस आरे असलेले चक्र आहे. त्याखाली उलटे कमळ कोरलेले आहे. हे चक्र सत्यधर्माचे व व शांततामय परिवर्तनाचे प्रतीक आहे, असे वर्णन भारतीय तत्त्वज्ञ डॉ. राधाकृष्णन यांनी केले आहे []. अशोकाच्या उपलब्ध सात स्तंभलेखांपैकी टोपरा (अंबाला जिल्हा) व मीरत येथे आढळलेले स्तंभ दिल्लीत ठेवलेले आहेत.

चौथ्या स्तंभालेखाचा अनुवाद

[संपादन]

देवांनाप्रिय प्रियदर्शी राजा असे म्हणाला. अभिषेकानंतर सव्वीस वर्षांनी मी हा धम्मलेख लिहविला. माझे रज्जुक (सम्राट अशोकाचे राजकिय अधिकारी) अनेक लक्ष प्राणि आणि लोकांमधे नेमलेले आहेत. त्यांनी वरदान द्यावे कि शिक्षा द्यावी हे (त्यांच्या) स्व-हेतु (आत्म-विवेका) वर ठेवले आहे. का ? रज्जुकांनी आश्वस्त आणि निर्भयपणे कार्यप्रवृत्त व्हावे व जनते साठी देशा साठी हित-सुख उपलब्धीचा अनुग्रह करावा. ते (जनतेचे) सुख-दुःख जाणतील आणि धंमयुक्तांना (धम्मा प्रमाणे वागणाऱ्यांना) प्रेरित करतील ज्या योगे ते (धम्मयुक्त) इहलोकात व परलोकात प्रसन्न होतील. रज्जुक माझ्या आज्ञापालनास उत्सुक असतात. माझे (राज)पुरुष (अधिकारी) माझ्या इच्छेनुसार परिचर करून अनेक प्रेरणा देतील यामुळे माझे रज्जुक मला प्रसन्न करण्यास समर्थ होतील. जसे (कोणी) आपत्य कुशल दाईकडे सोपवून आश्वस्त होतो की ही कुशल दाई माझ्या आपत्याचे सुखकर पालन करण्यास समर्थ आहे, अशाच प्रकारे मी देशाच्या हित-सुखासाठी रज्जुक नियुक्त केले आहेत. रज्जुकांनी निर्भय, आश्वस्त व शांतचित्त होउन प्रसन्नतेने कार्य करण्यास प्रवृत्त असावे म्हणून त्यांनी वरदान द्यावे कि शिक्षा द्यावी हे मी (त्यांच्या) स्व-हेतु (आत्म-विवेका) वर ठेवले आहे. हे माझ्या इच्छेनुसार आहे, का ? कारण व्यवहार-समता आणि शिक्षा-समता असावी (व्यवहारात व शिक्षेत पक्षपात नसावा). माझा आदेश आहे की जे बंदिवान आहेत त्यांना तोलुन (विचारपूर्वक) शिक्षा द्यावी आणि ज्यांना मृत्यूदंड दिला आहे त्यची सुचना तीन दिवस पूर्व मला द्यावी. या दिवसात नातेवाइक वा इतर अनेक त्याच्या जीवीताकडे (पुनर्विचारास्तव) ध्यानाकर्षण करतील अथवा तसे ध्यानाकर्षण करु (शकणे) नसल्यास त्याच्या (पारलौकिक) संरक्षणासाठी दान देणे किंवा उपवास करणे करतील. कारण माझी इच्छा आहे की बंदिवास-काळातही (त्यांनी) पार-प्रसन्न (पारलोकी सुखी) असावे. या प्रकारे लोकांमधे विविध प्रकारे धम्माचरण, संयम आणि योग्य-भागी (योग्य ठिकाणी) दान देणे यात वृद्धी होइल.

शिलालेखांचे ऐतिहासिक महत्त्व

[संपादन]

अशोकाचे शिलालेख हे अशोकाच्या कारकिर्दीच्या इतिहासाची अतिशय महत्त्वाची अशी साधने आहेत. गिरनार गुजरात येथे अशोकाचे 14 लेख आढळले .ज्या ज्या ठिकाणी हे आलेख सापडले त्यावरून मौर्य साम्राज्याच्या सीमा निश्चित करणे शक्य होते. अशोकाच्या कारकिर्दीत झालेल्या कलिंगच्या युद्धाची माहिती त्याच्याच कलिंग आलेखातून मिळते. अशोकाच्या कारकिर्दीचा कालानुक्रम निश्चित करण्यासाठी या आलेखांची मदत झाली. अशोकाने बौद्ध धर्माचा स्वीकार केल्याचा पुरावा यामधून मिळतो. बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी अशोकाने केलेल्या कामगिरीचे वर्णन यातून मिळते. बौद्ध धर्माची दीक्षा घेतली असली तरी, अशोक कर्मठ नव्हता तसेच आपल्या प्रजाजनांवर बौद्ध धर्म सक्तीने लादण्याचा अशोकाने कधीच प्रयत्न केला नसल्याचेही या आलेखांतून स्पष्ट होते. परदेशात बौद्ध धर्म आणि भारतीय संस्कृतीचा प्रसार करण्यासाठी अशोकाने बौद्ध भिक्षूंना पाठवल्याचा लेखी पुरावा या शिलालेखांतून मिळतो.[]

चित्रदालन

[संपादन]

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "अशोकस्तंभ". २९ जानेवारी, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)[permanent dead link]
  2. ^ "अशोकचक्र". २९ जानेवारी, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)[permanent dead link]
  3. ^ जे.एल. मेहता, सरिता मेहता. "हिस्ट्री ऑफ एन्शन्ट इंडिया" (इंग्रजी भाषेत). January 30, 2012 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]