Jump to content

वासुदेव गोविंद आपटे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(वा.गो. आपटे या पानावरून पुनर्निर्देशित)


वासुदेव गोविंद आपटे
जन्म नाव वासुदेव गोविंद आपटे
जन्म एप्रिल १२, १८७१
धरणगाव, खानदेश, महाराष्ट्र
मृत्यू फेब्रुवारी २, १९३०
पुणे, महाराष्ट्र
कार्यक्षेत्र साहित्य, पत्रकारिता
भाषा मराठी
साहित्य प्रकार ललित, कथा, अनुवादित, बालसाहित्य
विषय इतिहास, तत्त्वज्ञान, भाषा (मराठी, बंगाली)

वासुदेव गोविंद आपटे (जन्म : धरणगाव-खानदेश, १२ एप्रिल १८७१; - पुणे, २ फेब्रुवारी १९३०[]) हे मराठी लेखक, भाषांतरकार, पत्रकार, आनंद मासिकाचे संस्थापक व संपादक, बंगाली कथा-कादंबऱ्यांचे अनुवादक, निबंधकार व कोशकार होते.

जीवन

[संपादन]

आपटे यांचे बालपण भडगाव आणि धुळे येथे गेले. कलकत्ता विद्यापीठाची बी. ए. परीक्षा सन १८९३मध्ये उत्तीर्ण झाल्यावर ते नागपूरच्या 'हिस्लॉप' कॉलेजात एक वर्ष फेलो होते. त्यांचा बंगाली भाषेशी परिचय झाला.[] वा.गॊ. आपटे त्यानंतर पुण्यातही नूतन मराठी विद्यालयात काही काळ शिक्षक होते. पुणे मुक्कामी त्यांना हरि नारायण आपटे यांच्या सहवासात मराठी भाषा व साहित्याची विशेष गोडी निर्माण झाली.[]

इंदूर येथे शिवाजीराव होळकर यांचे खाजगी चिटणीस या पदावर त्यांनी काही काळ काम केले. []

कार्य

[संपादन]

'अशोक अथवा आर्यावर्तातला पहिला चक्रवर्ती राजा याचे चरित्र' (१८९९) हे आपट्यांचे पहिले प्रकाशित पुस्तक. ते कोल्हापूरचे प्रोफेसर विजापूरकर यांच्या ग्रंथमालिकेतून प्रसिद्ध झाले. त्या काळी अशोकावर जेवढे संशोधन झाले होते त्याचा अभ्यास करून हे चरित्र लिहिले असल्यामुळे डॉ. भांडारकर आणि न्यायमूर्ती रानडे यांनी या पुस्तकाची प्रशंसा केली.[] त्यानंतर भगवान बुद्ध आणि त्याचा धर्म ह्या विषयावरील 'बौद्धपर्व अथवा बौद्ध धर्माचा साद्यंत इतिहास' हा अभ्यासपूर्ण ग्रंथ त्यांनी १९०५ मध्ये लिहिला व १९१४ साली तो प्रसिद्ध झाला. काही काळ त्यांनी अलाहाबाद येथील 'मॉडर्न रिव्ह्यू'त मराठी पुस्तकांच्या परीक्षणाचे व नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांच्या 'ज्ञानप्रकाश' या दैनिकाचे संपादन केले. १९०६ साली त्यांनी 'आनंद (मासिक)' हे मुलांचे मासिक सुरू केले, ते अद्यापही (२०१८ साली) सुरू असावे. 'आनंद'चे संपादन व ग्रंथलेखन ह्यांच्या बरोबरीने तरुण पिढीला राष्ट्रीय, सामाजिक व धार्मिक गोष्टींचे सम्यक ज्ञान मिळावे या उद्देशाने १९१९ साली त्यांनी 'विचारसाधन (साप्ताहिक)' नावाचे नियतकालिक सुरू करून पाहिले, परंतु प्रकृति अस्वास्थ्यामुळे ते बंद करावे लागले (१९२०). त्यांच्या एकूण लेखनापैकी सुमारे ७५ टक्के लिखाण भाषांतरित, रूपांतरित व आधारित अशा स्वरूपाचे आहे. त्यांनी हिंदी, बंगाली आणि गुजराथी या भाषांमधील साहित्य मराठीमध्ये अनुवादित करून, एक प्रकारे प्रांत-भारतीची पायाभरणीच केली.कानडी, तेलगू आणि तमिळ या भाषांचा परिचय करून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला.[]

लेखन हा व्यवसाय त्यांनी आर्थिकदृष्ट्या यशस्वी करून दाखविला.

आपटे हे इंदूर येथील 'मल्हारी मार्तंड'चे संपादक होते. पण तेथील वातावरण न मानवल्यामुळे त्यांनी राजीनामा दिला व १९१९ साली कायमचे पुण्यात स्थायिक झाले. पुढे ते टिळक महाविद्यालयात अध्यापनाचे काम करू लागले.[]

त्यांचे साहित्यः- मिसेस हेन्‍रीवुड, सॅम्युएल लव्हर, बंकिमचंद्र चटोपाध्याय यांच्या दुर्गेशनंदिनी आदी कादंबऱ्यांचे मराठी अनुवाद; 'मराठी भाषेचे संप्रदाय व म्हणी' (१९१०),'लेखनकला आणि लेखनव्यवसाय' (१९२५), 'मराठी शब्दरत्‍नाकर' (१९२२), 'मराठी शब्दार्थचंद्रिका' (१९२२), आणि 'मराठी-बंगाली शिक्षक' (१९२५) ही भाषाभ्यास विषयक; 'जैनधर्म' (१९०४), 'टापटीपचा संसार' (१९१४), 'बालोद्यान पद्धतीचे गृहशिक्षण' (१९१८), 'सौंदर्य आणि ललितकला' (१९१९) इत्यादी विविध विषयांवरील चोवीस-पंचवीस पुस्तके व बालवाङ्‌मय विभागात छोटीछोटी तीस-बत्तीस पुस्तके त्यांनी लिहिली. सुप्रसिद्ध बंगाली कादंबरीकार बंकिमचंद्र यांचे संपूर्ण कादंबरीवाङ्‌मय, त्यातील बंगाली वातावरण, पार्श्वभूमी व पात्रांची नावे कायम ठेवून वा. गो. आपट्यांनी चार खंडांत मराठीत आणले आहे. 'वाल्मीकीचा जय' (१९१०) ही त्यांची कादंबरीही बंगालीचे भाषांतर आहे. 'मूर्तिमंत देशाभिमान', 'माणिकबाग', आणि 'दुःखाअन्ती सुख' ही त्यांची पाश्चात्य कादंबऱ्यांची रूपांतरेही उत्कृष्ट आहेत. याशिवाय 'श्रीहरनाथ ठाकुर यांची पत्रावली', 'महाभारतातील सोप्या गोष्टी', 'नाट्यभारत', नाट्यरामायण, 'बालभारत', 'मनी व मोत्या', 'महाराष्ट्राचा बालबोध इतिहास', 'मुलांसाठी गोड गाणी', 'एक दिवसाच्या सुटीत' यांसारखी बालवाचकांच्या दृष्टीने रंजक असूनही उद्‌बोधक अशी पुस्तके त्यांनी लिहिली. पुराणे, इतिहास, विविधज्ञानसंग्रह, संतांची व थोरांची चरित्रे यांच्या आधारे वा. गो. आपटे यांनी बालांसाठी व कुमारांसाठी निर्माण केलेले साहित्य उल्लेखनीय आहे. 'महाराष्ट्र साहित्य परिषदे'चे ते पहिले घटनाकार, एका परीने जनक व संवर्धकही होते.[ संदर्भ हवा ]

'मराठी शब्दरत्‍नाकर' हा मराठी-मराठी शब्दकोश [] हे आपटे यांचे अजरामर स्मारक आहे; असे उद्गार श्री. गोपीनाथ तळवळकर यांनी तिसऱ्या आवृत्तीच्या प्रस्तावनेच्या निमित्ताने काढले होते.[]

गौरव

[संपादन]
  • वा.गो. आपटे यांच्यावर 'वा. गो. आपटे: व्यक्ती अणि वाङ्मय' नावाचा ग्रंथ आहे. (लेखक - राणे, राघव)
  • महाराष्ट्र साहित्य परिषदेतील ग्रंथालयाला वा.गो. आपटे यांचे नाव देण्यात आले आहे. या ग्रंथालयात ५०,०००हून अधिक जुने - नवे ग्रंथ, दुर्मिळ नियतकालिके, सर्व प्रकारचे कोश व संदर्भग्रंथ आहेत. आपटे यांनी या ग्रंथालयासाठी दहा हजार रुपयांची देणगी दिली होती.[]

कोश वाङ्मय व भाषा विषयक साहित्य

[संपादन]
  • मराठी-बंगाली शिक्षक
  • बंगाली-मराठी कोश []
  • मराठी शब्दरत्नाकर, प्रकाशक - आनंद कार्यालय, पुणे; प्रथम आवृत्ती प्रकाशन वर्ष १९२० - यामध्ये संत-साहित्यातील बहुतांश संज्ञांचा समावेश आहे. ३९००० शब्दांचा समावेश असणारा त्या काळातील हा एकमेव कोश होता, असे दिसते.
  • विस्तारित शब्दरत्नाकर (वा.गो. आपटे+ह.अ.भावे)
  • मराठी शब्दार्थ चंद्रिका
  • मराठी भाषेचे सांप्रदाय व म्हणी []
  • लेखनकला आणि लेखनव्यवसाय - साहित्याच्या रचनात्मक व व्यावहारिक बाजूंचे ज्ञान करून देणारे हे पहिलेच पुस्तक असे म्हणावे लागते. []
  • सौंदर्य आणि ललितकला - यामध्ये प्रामुख्याने शिल्प, संगीत आणि चित्रकलेचा विचार केलेला आहे.

अनुवाद

[संपादन]
  • अरविंदबाबूचीं आपल्या पत्नीस पत्रे
  • अरविंदबाबूंनी आपला बंधू बारीन्द्र यास लिहिलेले पत्र , चित्रमय जगत (नियतकालिक) - जुलै १९२२
  • दुःखाअंती सुख (पाश्चात्य कादंबरीचे रूपांतर)
  • दुर्गेशनंदिनी (बंकिमचंद्रांच्या बंगाली कादंबरीचा मराठी अनुवाद)
  • चित्तरंजन अथवा मुलांचे अरेबियन नाइट्स (अनेक भाग)
  • संपूर्ण बंकिमचंद्र (चार खंड)
  • माणिकबाग (मिसेस हेन्‍रीवुड यांच्या इसलिन इंग्रजी कादंबरीचा मराठी अनुवाद)[]
  • ..... (मिसेस हेन्‍रीवुड यांच्या एका इंग्रजी कादंबरीचा मराठी अनुवाद)[]
  • मूर्तिमंत देशाभिमान (पाश्चात्य कादंबऱ्रीचे रूपांतर)
  • वाल्मीकीचा जय (मूळ बंगाली कादंबरीचा मराठी अनुवाद) - वंग विद्वतकुलशेखर हरप्रसादशास्त्री लिखित पुस्तकाचा अनुवाद []
  • शांतिनिकेतनमाला (किमान ४ भाग)
  • रवीचे उज्ज्वल किरण - रवींदनाथ यांच्या गोष्टींच्या पुस्तकाचा अनुवाद []
  • रवींद्रनाथ यांच्या शिशु या शिशुकाव्याचा अनुवाद []
  • बंगाली साहित्यसंमेलनातील भाषणे - विविध ज्ञानविस्तार मध्ये प्रकाशित []
  • माॅडर्न रिव्ह्यू मध्ये मराठी पुस्तकांचा परिचय []
  • गुजराथी बालसाहित्याचे अग्रणी गिजूभाई बधेका यांच्या गोष्टींचा आनंद मासिकासाठी अनुवाद []

बालसाहित्य किंवा बालोपयोगी साहित्य

[संपादन]
  • बालक त्याची प्रकृति व संवर्धन
  • बालभागवत
  • बालभारत
  • बालभारती
  • बालमनोरंजन
  • बालरामायण
  • बाल विनोदमाला
  • बाल विहारमाला
  • बालोद्यान पद्धतीचे गृहशिक्षण
  • मनी व मोत्या
  • महाभारतांतल्या सोप्या गोष्टी
  • मुलांचे शहाणपण
  • मुलांसाठी गोड गाणी
  • रामायणांतल्या सोप्या गोष्टी
  • राष्ट्रीय शिक्षणाचे पहिले-दुसरे-तिसरे-चौथे पुस्तक
  • लहान मुलांसाठी मौजेच्या गोष्टी
  • वाचनपुस्तक - पहिले, दुसरे, तिसरे, चौथे
  • वीरांच्या कथा
  • साधुसंतांच्या गोष्टी
  • महर्षींचा प्रसाद
  • चित्तरंजन
  • देशभक्तिपर वाचनपाठ

इतिहासपर लेखन

[संपादन]
  • बौद्धपर्व अथवा बौद्ध धर्माचा साद्यंत इतिहास
  • पेशवाईची हकीकत
  • पेशवाईतील पहिले बाजीराव
  • मनोरंजक इतिहास
  • मराठ्यांचा दरारा
  • महाराष्ट्राचा बालबोध इतिहास

विविध प्रकारचे लेखन

[संपादन]
  • सम्राट अशोक
  • अशोक चरित्र - आपटे यांचे पहिले पुस्तक - प्रकाशन १८९८ []
  • अशोक अथवा आर्यावर्तातला पहिला चक्रवर्ती राजा याचे चरित्र - प्रकाशन १९२८, अशोक चरित्राची अनेक वर्षांच्या संशोधनातून प्रकाशित केलेली सुधारित आवृत्ती []
  • ज्ञानदीप - ज्ञानेश्वरीचे गद्य, सुबोध, संक्षिप्त रूप
  • एका दिवसाच्या सुट्टीत
  • कां व कसें?
  • जैनधर्म
  • टापटीपचा संसार
  • त्रिवेणी
  • देशक्तिपर वाचनपाठ
  • नवयुग
  • नाट्यभारत
  • नाट्यरूप भारतवर्ष
  • पंजाब प्रकरण भाग १, २
  • परीस्तानातल्या गोष्टी
  • भारतकन्या
  • गांधीगीता
  • महात्माजींची उत्तरगीता[]
  • मोतीमिनार
  • रवीचे उज्ज्वल किरण
  • विलक्षण भोळेपणा
  • सकाळचा अभ्यास
  • सौंदर्य आणि ललितकला
  • स्वर्गावर स्वारी
  • श्रीहरनाथ ठाकुर यांची पत्रावली
  • ज्ञानदीप - प्रकाशन १९२८ []
  • रवीन्द्रांचा जयजयकार - रवींद्रनाथांना नोबेल पारितोषिक मिळाल्यानंतर लिहिलेला लेख, मनोरंजन (नियतकालिक) मध्ये प्रकाशित झाला होता.[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ a b c d e f g h i j k l m n o p q r s t u v w x y z मराठी शब्दरत्नाकर, प्रकाशक - आनंद कार्यालय, पुणे; तिसरी आवृत्ती प्रकाशन वर्ष १९५२