मीनाक्षी (देवता)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
हिंदू धर्माशी निगडित लेख
हिंदू धर्मOm symbol.svg

हिंदू धर्म

मीनाक्षी ही एक एक हिंदू देवता आहे. नायक वंशातील राजांनी बांधलेले सतराव्या शतकातील तिचे विख्यात मंदिर तमिळनाडूमधील मदुराई येथे आहे[१]. या मंदिरात तिची द्विभुज व पूर्वाभिमुख मूर्ती आहे. या मंदिराच्या उत्तरेला सुंदरेश्वराचे म्हणजे शंकराचे मंदिर आहे.

मीनाक्षी मंदिर मदुराई

मीन म्हणजे मासा. मीनाक्षी म्हणजे माशासारखे सुंदर डोळे असलेली. तिचे डोळे सुंदर असल्यामुळे तिला हे नाव देण्यात आले, अशी कथा आहे. मीन हे मदनाचे प्रतीक असल्यामुळे प्रणययुक्त डोळे असलेली ती मीनाक्षी, असाही या नावाचा अर्थ करण्यात आला आहे. तिच्या अंगाला माशाच्या वासासारखा वास येत होता, हा कथाभागही तिचा माशाशी संबंध जोडतो. ती कुबेरकन्या असल्यामुळे तिला यक्षिणी म्हटले जाई, अशीही एक कथा आढळते. जन्म, विवाह इत्यादींविषयीच्या विविध कथांपैकी एका कथेनुसार ती मलयध्वज नावाच्या पांड्य राजाला नवसाने झालेली मुलगी होती. तिच्या छातीवर तीन स्तन होते. आपल्याबरोबरच्या युद्धात जो अजिंक्य ठरेल, त्याला पती म्हणून निवडावयाचे, अशी तिची प्रतिज्ञा होती. तिने अनेक राजांना जिंकल्यावर कैलासावर स्वारी करण्याचा निर्णय घेतला, परंतु शंकर तिच्यासमोर उभा राहताक्षणीच ती लज्जित झाली, तिचा तिसरा स्तन गळून पडला आणि तिच्या अंगाला असलेला माशाचा वासही नाहीसा झाला. त्यामुळे तिने शंकराला वरले.

सांस्कृतिक देवाणघेवाणीच्या ओघात मूळची द्राविड शक्तिदेवता असलेल्या मीनाक्षीला पार्वती आणि छोक्कलिंगम या द्राविड देवाला शंकर मानण्यात आले असे दिसते. दरवर्षी चैत्र महिन्यात या दोघांच्या विवाहाचा सोहळा साजरा केला जातो. हा सोहळा ऐतिहासिक दृष्टीनेही महत्त्वाचा मानला जातो. कारण, राजा तिरूमल नायक याने शैव, वैष्णव व शाक्त संप्रदायांमधील कटुता कमी करण्यासाठी हा सोहळा सुरू केला, असे म्हटले जाते. विष्णूचा अवतार मानलेल्या अलगर या देवाला मीनाक्षीचा भाऊ बनविण्यात आले आणि तो दरवर्षी मीनाक्षी व सुंदरेश्वर यांचा विवाह लावून देण्यासाठी मदुराईला येतो, अशी कल्पना करण्यात आली.

उत्सव[संपादन]

मदुराई येथे दरवर्षी आषाढ महिन्यात मीनाक्षीची विशेष पूजा होते. शंकराने मीनाक्षीबरोबर केलेल्या ६४ लीलांचा स्मरणोत्सव श्रावणात केला जातो; तसेच, पौष पौर्णिमेला मीनाक्षीची रथयात्रा निघते.


संदर्भ[संपादन]

  1. ^ भारत सरकार. "मीनाक्षी मंदिर मदुराई". https://knowindia.gov.in/culture-and-heritage/monuments/meenakshi-temple-madurai.php. External link in |संकेतस्थळ= (सहाय्य); Missing or empty |url= (सहाय्य); |access-date= requires |url= (सहाय्य)