न्यूट्रिनो
न्यूट्रिनो | |
सर्वसाधारण माहिती | |
---|---|
वर्गीकरण (सांख्यिकीप्रमाणे) | फर्मिऑन |
संरचना | मूलभूत कण |
कुळ | लेप्टॉन |
पिढी | पहिली |
अन्योन्यक्रिया | अशक्त अन्योन्यक्रिया |
चिन्ह | |
भौतिक गुणधर्म | |
वस्तुमान | keV-c-२ kg |
विद्युतभार | 0 |
फिरक | १/२ |
स्थिरता/आयुर्मान | स्थिर |
न्युट्रिनो हा एक मूलभूत कण आहे. इटालियन भाषेतील या शब्दाचा अर्थ छोटा तटस्थ (विद्युतभाररहित) असा होतो. मूलकण भौतिकशास्त्राच्या प्रमाण प्रतिकृतीमध्ये न्युट्रिनोचे इलेक्ट्रॉन, म्युऑन व टाउ असे तीन स्वाद (प्रकार) आहेत. सूर्यगर्भातील आण्विक प्रक्रियांद्वारे इलेक्ट्रॉन स्वादाच्या न्युट्रिनोंची सतत निर्मिती होत असते. याशिवाय पृथ्वीच्या वातावरणावर होणाऱ्या वैश्विक किरणांच्या भडिमाराने वातावरणाच्या वरच्या थरात इलेक्ट्रॉन तसेच म्युऑन स्वादाच्या न्युट्रिनोंची निर्मिती निरंतर चालू असते. हे सौर न्युट्रिनो तसेच वातावरणीय न्युट्रिनो पृथ्वीवर पोहोचेपर्यंत स्वादांदोलनांमुळे काही न्युट्रिनोंचे इतर स्वादांत परिवर्तन झालेले असते. न्युट्रिनोंचे तिसरे उगमस्थान म्हणजे पृथ्वीतलावरील अणुभट्ट्या. पृथ्वीवरील न्युट्रिनोंची अशी तीन उगमस्थाने जरी असली तरी त्यांत सिंहाचा वाटा हा सौर न्युट्रिनोंचाच असतो. दर सेकंदाला मानवी शरीरातून तब्बल ५०० खर्व न्युट्रिनो पार होत असतात. न्युट्रिनो केवळ अशक्त अन्योन्यक्रियांत व तेही अत्यंत अशक्तपणे सहभागी होत असल्याने बहुतांशी न्युट्रिनो हे पृथ्वीतून आरपार निघून जातात आणि त्यांच्या याच गुणधर्मामुळे शोधून काढण्यास तसेच अभ्यास करण्यास अत्यंत क्लिष्ट ठरतात.