विद्युतचुंबकत्व

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

विद्युतचुंबकत्व किंवा विद्युतचुंबकीय बल हे निसर्गातील चार मूलभूत बलांपैकी एक आहे. या बलाचे वर्णन विद्युतचुंबकीय क्षेत्र या संकल्पनेच्या आधारे करण्यात येते. विद्युतचुंबकीय क्षेत्र हे असे क्षेत्र आहे की जे विद्युतप्रभार असणाऱ्या कणांवर बल प्रयुक्त करते. तसेच अशा कणांच्या अस्तित्वाने व त्यांच्या गतीने या क्षेत्रावर परिणाम होतो. विद्युतचुंबकीय क्षेत्र विद्युतप्रभार असणाऱ्या कणांवर जे बल प्रयुक्त करते त्याला विद्युतचुंबकीय बल असे म्हणतात. विद्युतभारित कणांचे आकर्षण आणि प्रतिकर्षण, चुंबकीय क्षेत्राचा विद्युत सुवाहकावर होणारा परिणाम, अशा अनेक उदहरणांमधून विद्युतचुंबकीय बल दिसून येते.

विद्युतचुंबकीय बल गुरुत्वाकर्षण वगळता दैनंदिन जीवनातील जवळजवळ सर्व बलांमागील मुलभुत बल आहे. साधारणतः सर्व पदार्थांच्या अंतर्गत अणु-रेणूरचनेला मुख्यत्वे हेच बल जबाबदार असते. जवळपास सर्व पदार्थ हे रेणुंचे बनलेले असतात. (रेणुंपासून न बनलेल्या पदार्थाची दोन उदाहरणे न्यूट्रॉन तारा आणि बोस आइन्स्टाइन संघनन). या रेणुंच्या आपआपसांतील बलांमुळे पदार्थांना विविध गुणधर्म आणि रचना प्राप्त होतात. रेणुंमधील ही बले विद्युतचुंबकीय प्रकारची असतात.

विद्युतचुंबकत्वाला अभिजात विद्युतचुंबकत्व आणि पुंजविद्युतचुंबकत्व अशा दोन भागांमध्ये विभागता येते. अभिजात भौतिकशास्त्र हे पुंजगतिकीचे परिणाम विचारात घेत नसल्यामुळे बऱ्याचदा हे फक्त रेणुंपेक्षा मोठ्या आकाराच्या वस्तुंसाठी लागू करता येते. अभिजात विद्युतचुंबकत्वाचे परिपूर्ण गणितीय वर्णन मॅक्सवेलच्या समीकरणांद्वारे केले जाते.

काही विद्युतचुंबकीय एकके, आणि कंसामधे त्या एककांनी मोजली जाणारी राशी -

ॲंपीअर (विद्युतधारा)
कूलोम (विद्युतप्रभार)
ओहम (रोध / विद्युतरोध)
व्होल्ट (विभवांतर)
वॅट (शक्ती)