Jump to content

गायत्री मंत्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हिंदू धर्माशी निगडित लेख
हिंदू धर्म

हिंदू धर्म

राजा रवी वर्मा द्वारा चित्रित गायत्री देवी

गायत्री मंत्र ही ऋग्वेदातील एक ऋचा (ऋग्वेद ३.६२.१०) आहे. []. ही ऋचा मंत्राप्रामाणे उच्चारली जाते. ही ऋचा गायत्री छंदात आहे. हा मंत्र सूर्याच्या उपासनेचा मंत्र आहे. गायत्री मंत्र हा चोवीस अक्षरांचा आहे. प्रत्येक अक्षराची एक देवता अशा या चोवीस देवता मानल्या आहेत. []

मूळ गायत्री मंत्र येणेप्रमाणे :

तत्सवितुर्वरेण्यं। भर्गो देवस्य धीमहि। धीयो यो नः प्रचोदयात्।

देवता-१ अग्नि, २ वायु, ३ सूर्य, ४ आकाश, ५ यम, ६ वरुण, ७ बृहस्पति, ८ पर्जन्य, ९ इंद्र, १० गंधर्व, ११ पूषा, १२ मित्र, १३ त्वष्टा, १४ वसु, १५ मरुद्रण, १६ सोम, १७ अंगिरा, १८ विश्वेदेव, १९ अश्विनीकुमार, २० प्रजापति, २१ संपूर्ण देवता, २२ रुद्र, २३ ब्रह्मा आणि २४ श्रीविष्णु[]

गायत्री महामंत्र : यजुर्वेदतील मंत्र 'ॐ भूर्भूवः स्वः' मूळ गायत्री मंत्रास जोडून गायत्री महामंत्र पुढील प्रमाणे होतो:

ॐ भूर्भूवः स्वः। तत्सवितुर्वरेण्यं। भर्गो देवस्य धीमहि। धीयो यो नः प्रचोदयात्।


ओंकारला प्रणव असं म्हटलं जातं. तीन ओंकार जोडून 'त्रिप्रणव गायत्री मंत्र' तयार होतो, ज्याला अतिशय शक्तिशाली मानल्या जाते.

ॐ भूर्भूवः स्वः। ॐ तत्सवितुर्वरेण्यं। भर्गो देवस्य धीमहि। धीयो यो नः प्रचोदयात् ॐ।

मूळ गायत्री मंत्राचा अर्थ : विश्वाची उत्पत्ती ज्याच्यापासून होते; त्याचे आम्ही ध्यान करतो. तोच सच्चिदानंदरूप आहे. तो अज्ञानाचा नाश करतो. किंवा सविता देवाचे अत्यंत प्रिय किंवा सर्वश्रेष्ठ असे तेज आहे, त्याचे ध्यान आम्ही करीत आहोत. तो आमच्या विचारांना प्रेरणा देवो.[]

गायत्री मंत्रात परब्रह्माचे म्हणजे सत्याचे स्मरण करताना आपल्या डोळ्यांंना दिसणारा सूर्यच समोर आणायचा असतो. 'तो सविता आमच्या सर्वांच्या बुद्धीला प्रेरणा देवो' अशी प्रार्थना यामध्ये करायची असते.

गायत्री देवीसंबंधी पौराणिक कथा

[संपादन]

देवी गायत्रीची तीन रूपे मानली जातात.सकाळी ती रक्तवर्णी अक्षमाला-कमंडलुधारिणी ब्राह्मी असते. मध्याह्नी ती शङ्ख, चक्र, गदा धारणकारिणी वैष्णवी असते व संध्याकाळी ती वृषभारूढा व शूळ, पाश, नर-कपाल धारिणी वृद्ध शिवानी असते.

शब्द-कल्पद्रुमानुसार एकदा ब्रह्मापत्नी सावित्रीस यज्ञस्थळी प्रवेश नाकारण्यात आला. क्रुद्ध ब्रह्मदेवाने दुसऱ्या स्त्रीसोबत विवाह करून यज्ञ समाप्त करण्याची इच्छा धरिली. त्याच्या इच्छेनुसार वधू शोधन करताना इंद्रास एका गवळ्याची पोर मिळाली. विष्णूच्या सल्ल्यानुसार या मुलीशी ब्रह्मदेवाने गांधर्वविवाह केला. ही मुलगीच गायत्री होय.[]

गायत्रीच्या ध्यानानुसार ती सूर्यमंडलात मध्यस्थानी असून ब्रह्मा, विष्णू वा शिवरूपिणी आहे. आचार्याकडून संथा घेतलेल्या व्यक्तीने गायत्रीचा मंत्रजप करणे अपेक्षित असते. गायत्रीची स्तुती छांदोग्य उपनिषद व बृहदारण्यक उपनिषद या वैदिक ग्रंथांत केली आहे. गायत्री मंत्राच्या आधाराने काही देवतांच्या इतरही गायत्री रचण्यात आल्या आहेत.[]

इतरही देवतांच्या गायत्री:- श्रीगणेश गायत्री ,श्रीविष्णू गायत्री ,श्रीशिव गायत्री ,श्रीमहालक्ष्मी गायत्री.

  • श्रीगणेश गायत्री: एकदन्ताय विद्महे। वक्रतुण्डाय धीमहि। तन्नो दन्ति: प्रचोदयात्॥
  • श्रीविष्णू गायत्री: ॐ नारायणाय विद्महे। वासुदेवाय धीमहि। तन्नो विष्णू: प्रचोदयात्॥
  • श्रीशिव गायत्री: ॐ तत्पुरूषाय विद्महे। महादेवाय धीमहि। तन्नो रुद्र: प्रचोदयात्॥
  • श्रीमहालक्ष्मी गायत्री: ॐ महालक्ष्मैच विद्महे। विष्णूपत्नैच धीमहि। तन्नो लक्ष्मी: प्रचोदयात्॥

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ ऋग्वेद ३.६२.१०
  2. ^ संदर्भ: देवी भागवत स्कंध (१२-१)
  3. ^ संदर्भ: देवी भागवत स्कंध (१२-१)
  4. ^ "गायत्री (मंत्र):". vishwakosh.marathi.gov.in. ९ मार्च २०२१ रोजी पाहिले.
  5. ^ पौराणिका (विश्वकोष हिन्दुधर्म), प्रथम खंड, फार्मा केएलएम प्राइव्हेट लिमिटेड, कलकत्ता, २००१
  6. ^ "हरेक का होता है अलग मंत्र जानें 7 प्रमुख देव और उनके शक्‍तिशाली गायत्री मंत्र". jagran.com (हिंदी भाषेत). ९ मार्च २०२१ रोजी पाहिले.