Jump to content

खंडोबा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

खंडोबा किंवा खंडेराय हे मुख्यत्वे महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यातील शैव पंथीय दैवत आहे.[१] महाराष्ट्रातील अनेकांचे कुलदैवत आहे. प्रामुख्याने क्षत्रिय धनगर, ९६ कुळी क्षत्रिय मराठे, गडरिया, वंजारी, आगरी कराडी, कुणबी, खारवी, गवळी, गोसावी, भंडारी, भोई, मल्हारकोळी, मातंग, माळी, रामोशी (नाईक), वाडवळ, लिंगायत, सोनार समाज, गानली(रेड्डी गानलोलु), रोंडु एडला गानलोलु किंवा गानगोलु, गोलकर, बेलदार, पद्मशाली व सोनकोळी समाजांचे, तसेच कित्येक ब्राम्हण व कायस्थ प्रभू समाजांतील लोकांचे कुलदैवत मानले जाते.[२] परंपरेने खंडोबा हा शंकराचा अवतार मानला जातो. खंडोबाच्या परिवारात म्हाळसा, बाणाई या पत्‍नी[३]; हेगडे हा प्रधान (हा बाणाईचा भाऊ आहे) आणि कुत्रा आणि वाहन घोडा यांचा समावेश होतो.[४] खंडोबाच्या मूर्ती, उभ्या व अश्वारूढ अशा स्वरूपात असून हातात डमरू, त्रिशूळ, खंडा (अतिशय मोठी आणि जड तलवार) आणि पानपत्र असून तो चतुर्भुज व कपाळाला भंडारा लावलेल्या रूपात असतो.[४]

चंपा षष्ठीच्या दिवशीची जेजुरीच्या खंडोबाच्या देवळातली हळदीची उधळण

नाव[संपादन]

एका मतानुसार खंडोबा हे नाव या देवतेच्या खंडा (संस्कृत खड्ग -> मराठी खंडा) या शस्त्रावरून आले आहे. दुसऱ्या मतानुसार हा संस्कृत स्कंद शब्दाचा अपभ्रंश आहे. (स्कंद -> स्कंदोबा -> खंडोबा) याखेरीज मल्हारी(मल्लारी), खंडेराय, मार्तंडभैरव, म्हाळसाकांत, रवळनाथ, येळकोटी(येळ=सात,सात कोटी सैन्य असलेला) ही खंडोबाची इतर नावे होत. मल्लू खान आणि अजमत खान (अजमत = चमत्कार) ही नावे खंडोबाच्या मुसलमान भक्तांमध्ये लोकप्रिय आहेत. ते खंडोबाच्या खंडा शस्त्रास मल्लू खान की गदा अशा नावाने संबोधतात. मल्ह / मल्ल + अरी अशी मल्हारी शब्दाची फोड असून मल्ल राक्षसाचा शत्रू असा त्याचा अर्थ आहे. म्हाळसेचा पती म्हणून खंडोबास म्हाळसाकांत असे म्हणतात. येळकोटी म्हणजे सात कोटी सैनिकांचा नायक. खंडेराय (राय = राजा) हे नावही खंडोबाचे राजेपण दर्शविते.[५]

कर्नाटकात खंडोबास मैलार किंवा खंडू गौडा (स्वैरपणे : खंडू पाटील) तर आंध्रात मल्लाण्णा नावाने ओळखतात.

मल्हार हा महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांचा लोकप्रिय असा कुलस्वामी (कुलदैवत) आहे. खंडोबाचेही ते एक नाव आहे. खंडोबा हा शंकराचा अवतार समजला जातो. मल्लासुर दैत्याचा संहार केला, मल्लाची हार झाली म्हणून मल्ल + हार अशा रितीने मल्हार हे नाव मिळाले असावे.[ संदर्भ हवा ] "येळकोट येळकोट जय मल्हार" असा या देवाचा जयघोष केला जातो. मल्हारी मार्तंड (मल्लारिमार्तंड) असेही नामाभिधान आहे. मूळ संस्कृतमध्ये या नावाचा उच्चार "मल्लार" असा आहे.

दैवत[संपादन]

खंडोबा म्हाळसा मणिमल्लांचा संहार करताना (मूळ शिळाचित्राचे साल - १८८०)

खंडोबा हे दैवत अकराव्या शतकापासून लोकप्रिय झाले असावे.[४] खंडोबाचे ऐतिहासिक उल्लेख चौदाव्या शतकापासून येतात.[६] खंडोबावरील सर्वाधिक महत्त्वाचा ग्रंथ मल्हारी माहात्म्य सांगतो की मल्हारीचा निर्देश ब्रह्मांड पुराणातील क्षेत्रकांडात केला आहे. पण या पुराणाच्या प्रमाण आवृत्तीत याचा उल्लेख मिळत नाही.[७] मूळचे लोकदैवत असलेल्या खंडोबाचे क्रमश: वैदिकीकरण झाल्याचे दिसते. लोककथा या देवतेस पौराणिक शिव व वैदिक रुद्र यांचा पूर्णावतार मानतात. खंडोबाच्या परिवारातील इतर सदस्यांचेंही वैदिकीकरण झाले आहे. यामुळे म्हाळसा बाणाई या पार्वतीगंगा यांच्या, रक्त पिणारा खंडोबाचा कुत्रा कृष्णाचा तर शुभ्र घोडा नंदीचा अवतार मानला गेला.[८] खंडोबा हे दैवत वैदिक पशुपती रुद्राप्रमाणे दरोडेखोर, घोडा आणि कुत्रा यांच्याशी संबंधित आहे. खंडोबाचा भक्तिपंथ किमान बाराव्या शतकापासून अस्तित्वात आहे. महानुभाव पंथीय चक्रधर स्वामींनी खंडोबाचा उल्लेख केला आहे. आंध्राच्या काकटीय सम्राटांचे खंडोबा हे कुलदैवत होते. मल्हारी माहात्म्य ग्रंथातील प्रेमपुरी जागा कर्नाटकातील बिदरजवळचे आदी मैलार स्थान आहे असे मानले जाते. आदी मैलार खंडोबाच्या बारा प्रमुख स्थानांमध्ये मोडते. मराठी परंपरेने मूळचा प्रेमपुरीचा खंडोबा प्रेमपुरी -> नळदुर्ग -> पाली (जि. सातारा) असे करत जेजुरीस स्थिरावला.[९] मराठी परंपरेत खंडोबा कानडी देव मानला जात असल्याचे संशोधक सोन्थेमर सांगतात. दख्खनच्या लिंगायत, जैन व इतर व्यापाऱ्यांनी खंडोबा पंथाचा प्रसार केला असावा. पैठणच्या मराठी कंडक यक्षाशीही या देवतेचे एकीकरण झाले आहे.[ संदर्भ हवा ] खेळखंडोबा हा वाक्प्रचार सर्वनाश या अर्थी येतो. त्याचवेळी मराठीत मल्हारी माहात्म्य, जयाद्रिविजय आदी ग्रंथ व वाघ्यामुरळींच्या लोकगीतांमध्ये या देवतेची स्तुती केल्याचे दिसते.

महात्मा फुले यांनी खंडोबा देवतेस बळीराजाच्या राज्यातील महाराष्ट्र क्षेत्राचा अधिपती मानले आहे. महाराष्ट्र क्षेत्र विस्ताराने मोठे असल्याने बळीराजाने या प्रदेशाचे नऊ खंड केले. जेजुरीचा क्षेत्रपती असणारा खंडोबा त्यातील एक होय. खंडोबाचे मार्तंड हे नाव "मार-तोंड" यावरून आले असल्याचे त्यांचे मत आहे.[१०]

जेजुरीचे मंदिर वीरपाल वीरमल्ल याने इ.स. १३८१ साली बांधले. १६३५ साली खटावच्या राघो मंबाजीने याचा विस्तार केला.[६] बंगाली संत चैतन्य महाप्रभू यांनी या मंदिरास भेट दिली होती व मुरळींचा वेश्याव्यवसाय बंद करण्याचे प्रयत्न केले होते; असे ऐतिहासिक उल्लेख आहेत. जेजुरी गडावरील शिलालेखांत विठ्ठल सदाशिव विंचूरकर, मल्हारराव होळकर वगैरेंचे उल्लेख येतात. नारायणरावाच्या हत्येनंतर नाना फडणीस यांनी नारायणरावाची गरोदर पत्‍नी गंगाबाई हीस पुत्र झाल्यास एक लाख अर्पण करू असा नवस केला होता. नवस पूर्ण झाल्यामुळे पेशवे दरबाराकडून विविध रूपात हा नवस फेडला गेला.[६]

खंडोबाची प्रतीके[संपादन]

खंडोबाची प्रतीके विविध आहेत. लिंग, तांदळा, मूर्ती, टांक ही प्रतीके आज रूढ आहेत.

कुळाचार[संपादन]

जेजुरी गडावरील गोंधळी महिला

हे दैवत अनेक कुटुंबांचे कुलदैवत असल्याने विविध कुळाचारात खंडोबास स्थान आहे.

जागरण गोंधळ

देवतेची गीतांमधून स्तुती असे या आचाराचे स्वरूप असते. अनेक मराठी कुटुंबांमध्ये लग्नानंतर गोंधळ घालण्याची प्रथा आहे. जेजुरी गडावरील दर्शन परंपरेत देवाची पूजा गोंधळी मंडळी कडून करवून घेण्याची परंपरा प्रचलित आहे.

 • चित्रफीत-
पूजा

तळी भरणे[संपादन]

Tali Bhandara at jejuri

तळीभरण हा नैमित्तिक स्वरूपाचा कुळाचार आहे. यात पाच पुरुषांद्वारे बेल, भंडारा, सुपारीने देवतेला ओवाळले जाते. शेवटी तीन वेळा थाळी उचलून वरखाली करताना सदानंदाचा येळकोट, भैरवनाथाचे चांगभले असा जयजयकार करतात. मराठीतील तळी उचलणे हा समर्थन करणे या अर्थाचा वाक्प्रचार या आचारावरूनच आला आहे.

तळी भरणे
विधी

तळी भंडार[संपादन]

|| श्री खंडोबा महाराज तळी आरती || आगडदुम नगारा सोन्याची जेजुरी ।
निळा घोडा, पाव में तोडा।
मस्तकी तुरा, बेंबी हिरा ।
अंगावर शाल, सदाही लाल ।
म्हाळसा सुंदरी , आरती करी ।
खोबऱ्याचा कुटका, भंडाऱ्याचा भंडका ।
बोला सदा आनंदाचा येळकोट ।
खंडेराव महाराजकी जय ।
हर हर महादेव ।
चिंतामणी मोरया ।
आनंदीचा उदय उदय ।
भैरीचा चांग भले ।
सदानंदाचा येळकोट ।
खंडेराव महाराज की जय ।
हर हर महादेव ।
चिंतामणी मोरया ।
चिंतामणी मोरया ।
आनंदाचा उदय उदय ।
भैरीचा चांगभले ।
सदानंदाचा येळकोट ।
खंडेराव महाराजकी जय ॥ चुका उधृत करा: <ref> टॅग सापडला पण त्याबरोबर पाहिजे असलेला </ref> टॅग नाही सापडला. ही मोहिनी व पार्वती यांचा संयुक्त अवतार मानण्यात येते. म्हाळसा नेवाश्याच्या तिमशेट नावाच्या व्यापाऱ्याच्या घरात जन्मली. स्वप्नात मिळालेल्या खंडोबाच्या दृष्टांतानुसार तिमशेटने पाली (जि. सातारा) येथे पौष पौर्णिमेस दोघांचे लग्न लावले असे सांगितले जाते.

दुसरी पत्‍नी बाणाई इंद्राची मुलगी असल्याचे मानले जाते. ही एका धनगरास सापडली. बाणाईला जेजुरी येथे पती मिळेल असे वर्तविण्यात आले. जेजुरीस बाणाईने खंडोबास पाहिले तिथे दोघे प्रेमात पडले. बाणाईच्या सहवास मिळण्यासाठी खंडोबाने आपली पत्‍नी म्हाळसा हिच्या सोबत सारीपाटाचा डाव मांडला. डाव हरणाऱ्यास बारा वर्षे वनवास ही अट होती. खंडोबा हा डाव हरला व धनगराचे रूप घेऊन बाणाईच्या पित्याकडे नोकर म्हणून राहू लागला. एक दिवस खंडोबाने सारी मेंढरे मारली व बाणाईच्या पित्यास बाणाईशी लग्न लावल्यास सारी मेंढरे जिवंत करतो असे सांगितले; आणि बाणाईचे लग्न या धनगराशी झाले. खंडोबाच्या प्रेमात पडलेली बाणाई या लग्नास अनिच्छुक होती. जेजुरीच्या वाटेवर खंडोबाने आपले खरे रूप बाणाईस दाखविले. बाणाईस बघून म्हाळसा संतप्‍त झाली. तेव्हा बायकांचे भांडण थांबविण्यासाठी जेजुरी डोंगराचा वरचा भाग म्हाळसेस तर खालचा भाग बाणाईस दिला. म्हणून जेजुरी गडावर म्हाळसेचे मंदिर वर तर बाणाईचे पायथ्यास आहे असे सांगतात.

दंतकथा[संपादन]

 • सावकारी भुंगा औरंगजेबाच्या दक्षिणेवरील मोहिमेवर असताना त्याने यवतजवळील दौलतमंगल किल्ला काबीज केला. तेथून त्याने जेजुरीचे मंदिर पाहिले व मंदिर भ्रष्ट करण्याच्या हेतूने सैन्य पाठवले. मुघल सैन्य जेजुरीच्या गडकोटापाशी आले असता त्यांना मंदिराचे दरवाजे बंद असल्याचे दिसले. त्यांनी सुरूंग लावून कोट उडविण्याचे ठरवले. पण जेथे सुरूंगासाठी भोक केले होते तेथून हजारो भुंगे बाहेर पडले व त्यांनी मुघल सैन्यावर हल्ला चढविला. सैन्य जेथे जाईल तेथे त्यांचा पाठलाग केला. मुसलमान सरदाराने या घटनेचा अर्थ एका हिंदूस विचारला तेव्हा त्याने खंडोबा हे कडक दैवत असून तुम्ही त्यास डिवचले यामुळे असे घडले असे सांगितले आता ही अस्मानी बंद करण्यासाठी तुम्हास काहीतरी करणे भाग आहे असे सांगितले. सरदाराने औरंगजेबाकडे जाऊन या घटनेचा वृत्तान्त सांगितला. तेव्हा औरंगजेबाने सव्वा लाख रुपये खंडोबास नजर केले. अशी सावकारी रक्कम वसूल केल्यामुळे या भुंग्यांना सावकारी भुंगे म्हणतात. जेजुरी मंदिराच्या उजव्या दरवाज्याजवळील भुंगे सावकारी भुंगे म्हणून दाखवले जातात.
 • भाया भक्ताची साक्ष: एकदा कडेपठारावर (हे पठार जेजुरी मुख्य मंदिरानजीक आहे) धनगरांची पोरे विश्रांतीसाठी बसली असता खंडोबा तेथे आला. पण आपला भक्त भाया येत आहे पाहून तो अदृश्य झाला. इतर मुलांनी खंडोबाच्या या येण्याजाण्याबद्दल भायास सांगितले. खंडोबाचे दर्शन चुकल्याने भाया अस्वस्थ झाला. खंडोबा जेथे बसला होता त्या घोंगड्याखाली हळदीचे लिंग सापडले. तेव्हा भायाने त्या लिंगाची प्रार्थना सुरू केली. वडिलधाऱ्यानी जेव्हा पोरांच्या कथेवर विश्वास न ठेवता लिंग फेकून दिले तेव्हा लिंगाचे रूपांतर एका मौल्यवान मण्यात झाले आणि वडील माणसे विचारात पडले. इकडे कोणाच्या भक्तीमुळे खंडोबा प्रकट झाला हा वाद सुरू झाला तेव्हा ज्या कोणाची कुऱ्हाड लिंगात रुतेल त्याला खंडोबा आणण्याचे श्रेय मिळेल असे ठरले. अपेक्षेप्रमाणे भायाची कुऱ्हाड रुतली आणि त्यातून रक्तदुधाचा प्रवाह सुरू झाला. यानंतर देव स्वतः प्रकट झाला व मरळ घराण्यातील व्यक्तीने स्वतःचे रक्त शिंपडल्यास हा प्रवाह थांबेल असे सांगितले आणि त्याप्रमाणे हा रक्तप्रवाह थांबला. तेथे मंदिर उभारण्यात आले. पुढे मंदिराच्या वहिवाटीचा वाद उत्पन्न झाला असता वरील कथा पेशवे दरबारात पुरावा म्हणून मांडण्यात आली होती. (सन १७५०)[ संदर्भ हवा ]

उमाजीराजे नाईक हे खंडोबाचे परम भक्त म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांना खंडोबा प्रसन्न असल्याचेही सांगितले जाते त्यांच्याकडे खंडोबाचे कडे असल्याने त्यांना (उमाजीना) इंग्रज फाशी देत असताना फाशी बसली जात नव्हती. कडे काढल्यानंतर नाईकांना फाशी बसली असेही बोलले जाते.[ संदर्भ हवा ]

मल्हारराव होळकर नावाचे मोठे सरदार खंडोबाचे भक्त होऊन गेलेत.

मध्यामांमध्ये[संपादन]

 • जय मल्हार नावाने एक प्रसिद्ध मालिका झी मराठी वाहिनीवर होती. महेश कोठारे यांनी मालिकेचे दिग्दर्शन केले होती. ही मालिका वीर मर्थांदन नावाने तमिळ भाषेमध्ये आहे. ही मालिका तमिळ वा थाई भाषेत डब केली आहे. व थाई भाषेत जय मर्थांदन. व पहिल्यांदाच भारतीय भाषेच्या व्यातिरिक्त डब केली गेली आहे.
 • 'जय मल्हार' नावाच्या चित्रपटात जय मल्हार मालिकेची थोडक्यात कथा दाखवली आहे. खंडोबावर खंडोबाचा महिमा व येळकोट येळकोट जयमल्हार हे दोन चित्रपट प्रसिद्ध आहे.[ संदर्भ हवा ]

उत्सव/यात्रा[संपादन]

 • जेजुरी : वर्षात चैत्री, पौषी, श्रावणी व माघी अशा चार मोठ्या यात्रा होतात. देवाची विधिपूर्वक पूजा, विविध घराण्यांच्या मानाच्या पालख्यांचे व झेंड्याचे आगमन असे या यात्रा उत्सवांचे स्वरूप असते. सुप्याचे खैरे, संगमनेरचे होलम आणि इंदूरच्या होळकरांना पालखीचा मान असतो. डफ, मर्फा, सनई, ताशा आदी वाद्यांच्या साथीने झेंड्यांच्या काठ्या शिखरास टेकवण्याची स्पर्धा चालते. जेजुरीगडावर हळदीची मुक्त उधळण होते. मुरळींचे नृत्य या सोहळ्याचे आणखी एक आकर्षण असते. पौषी यात्रेस भरणारा गाढवांचा बाजार हे पौष यात्रेचे आकर्षण आहे.[ संदर्भ हवा ]

सोमवती अमावस्येस (सोमवारी येणाऱ्या अमवास्येस) खंडोबाच्या दर्शनास मोठी गर्दी जमते. सोमवतीस खंडोबा व म्हाळसा यांच्या पालख्यांची प्रातःपूजेनंतर सवाद्य मिरवणूक निघते. खंडोबाच्या पालखीला खांदा देण्याचा मान फक्त रामोशी (नाईक), धनगर समाजाकडे आहे. नंतर त्यांच्या प्रतिमांना कऱ्हा नदीवर स्नान घातले जाते.[ संदर्भ हवा ]

 • नळदुर्ग : नळदुर्ग येथील मंदिर खंडोबाच्या १२ प्रमुख स्थानांमध्ये मोडते. येथे श्रावणी पौर्णिमेस खंडोबा व बानाई (दुसरे नाव : पालाई) यांचा विवाह सोहळा पार पडतो.[ संदर्भ हवा ]
 • पाली (सातारा जिल्हा) : पालीचे मंदिर पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरच्या अतीत गावाजवळ असून हे मंदिरही खंडोबाच्या १२ प्रमुख स्थानांमध्ये मोडते. येथे पौष पौर्णिमेस खंडोबा व म्हाळसा यांचा विवाहसोहळा पार पडतो.
 • बहुतेक सर्व खंडोबा देवस्थानांत देवदीपावलीनिमित्त दीपोत्सव होतो, तो चंपाषष्ठीपर्यंत किंवा निदान त्या दिवशी असतो. दावडी निमगांव मल्हारी मार्तंड खंडोबा देवस्थानातर्फे हा चंपाषष्ठीचा दीपोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होतो.[ संदर्भ हवा ]

खंडोबाची मंदिरे[संपादन]

साचा:संदर्भहिन

खंडोबा मंदिर,जेजुरी येथील मंदिर

भारतात खंडोबाची खालील मंदिरे आहेत -

इतर[संपादन]

’मल्हार’ या नावाचे खंडोबाची स्तोत्रे आणि तळीभंडार, कुलाचार वगैरेंविषयी माहिती देणारे एक छोटेखानी पुस्तक आहे.

संदर्भ[संपादन]

 1. ^ Pattanaik, Devdutt (2020-06-15). Devi Devtaon Ke Rahasya: Bestseller Book by Devdutt Pattanaik: Devi Devtaon Ke Rahasya (हिंदी भाषेत). Prabhat Prakashan. ISBN 978-93-5048-789-1.
 2. ^ KOLI, DR SANTOSH RAGHUNATH (2022-11-18). KOLI SANSKRUTI AANI SAMAJIK AAKLAN. Dnyanmangal Prakashan Vitaran. ISBN 978-93-92538-10-0.
 3. ^ Pattanaik, Devdutt (2021-01-19). Ganesh Ka Rahasya: Ganesh Ka Rahasya: Unveiling the Mysteries of Lord Ganesha by Devdutt Pattanaik (हिंदी भाषेत). Prabhat Prakashan.
 4. ^ a b c "खंडोबा". ८ डिसेंबर २०२१ रोजी पाहिले.
 5. ^ Mitchell, John Murray (1899). In Western India: Recollections of My Early Missionary Life (इंग्रजी भाषेत). D. Douglas.
 6. ^ a b c माटे
 7. ^ Sontheimer in Bakker p.103
 8. ^ Stanley in Hiltebeitel p.278
 9. ^ Sontheimer in Bakker p.105
 10. ^ महात्मा फुले समग्र वाङ्‌मय प्रकाशक साहित्य आणि संस्कृती मंडळ, सहावी आवृत्ती पृष्ठ १५९

अधिक वाचन[संपादन]

 • दक्षिणेचा लोकदेव खंडोबा - रा.चिं.ढेरे
 • टेंपल्स इन महाराष्ट्र (इंग्लिश) - एम.एस. माटे

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: