Jump to content

रवळनाथ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

।। श्री रवळनाथ प्रसन्न ।।

[संपादन]

श्री देव रवळनाथ महाराष्ट्र–कर्नाटक आणि गोव्याच्या त्रिवेणी संगमावर वसलेला चंदगड तालुका विविधतेने नटलेला आहे. तालुक्यातील सृष्टी सौंदर्य म्हणजे महाराष्ट्राला पडलेले एक मधुर, गोड स्वप्न आहे. चंदगड तालुक्याला निसर्गाचे वरदान मिळालेले आहे. चंदगड गांव ताम्रपर्णी नदीच्या कुशीत वसलेले आहे. चंदगड गावाचं श्री देव रवळनाथ हे ग्रामदैवत आणि तीर्थपीठ.

श्री देव रवळनाथ इतिहास

श्री रवळनाथ देवालयाचे उगमस्थान गोमंतक आहे. गोमंतकातील हिंदू धर्मियांची लोकसंख्या पाहता तिथे देवस्थानाची संख्या मोठी होती. म्हणूनच गोमंतकातील देवभूमी असे म्हटले जाते. गोमंतकातील प्रमुख दैवत श्री रवळनाथचं आहे. श्री रवळनाथ हे मूळ नांव नसून ते ‘रवळू’ असे पुरातन कालापासून चालत आलेले आणि त्याच्या भक्तांनी अत्यंत प्रेमाने ठेवलेले आहे. गोमंतकात पुढे नागपंथीयाचे आगमन झाल्यावर त्यांनी देवाचे नांव बदलून श्री देव रवळनाथ असे ठेवले. रवळनाथ हे दैवत श्री शंकराच्या गणांपैकी एक असल्याचे मानले जाते. श्री रवळनाथाला कोकणात पिसो रवळू असे म्हटले जाते.

स्थापना

चंदगड येथील रवळनाथाचे पहिले देऊळ पांडवकालीन होते. चंद्रासूर राक्षसास येथेचं यमसदनी पाठवल्याने ‘चंदगड’ हे गांवचे नामाभिमान झाले. त्याकाळी हे देऊळ हेमाडपंथी बांधणीचे होते. या मंदिराची स्थापना केलेल्या अज्ञान सपत्निकांची समाधी रवळनाथ देवालयाच्या चौकटीपासून चौदा पावलांवर आहे. भाविक प्रथम या समाधीसमोर नतमस्तक होतो, मगचं देवळात प्रवेश करतो. श्री रवळनाथाच्या मूर्तीची स्थापना सुमारे पावणेचारशे वर्षापूर्वी शहाजीराजांचे वडील जिजाजीराव यांच्या हस्ते झाली. सन 1617 साली प्रथम जिर्णोद्धार झाला. त्याकाळी गाभा–याच्या ठिकाणी फक्त लहान देऊळ व चौथरा असे बांधकाम होते. दुसरा जिर्णोद्धार राजे सयाजीराव संभाजीराव सावंत–भोसले यांच्या काळी झाला. त्यानंतर मुघल साम्राज्यात देवस्थानाची बरीचं मोडतोड झाली. सन 1823 साली तिसरा जिर्णोद्धार झाला व लाटगांव सरंजामाकडे सर्व व्यवस्था सोपविण्यात आली. लाटगांव सरंजामकडून हेरेकरांना मुलगी देऊ केली. सोबत तीन गावे आंदण म्हणून आली. हिंडगांव, चंदगड आणि कोनेवाडी. त्यामुळे हेरेकर सरंजामाकडे सर्व व्यवस्था आली. परंतु बाईंचा निर्वंश झाल्याने त्यांनी सर्व व्यवस्था लाटगांव संस्थानाकडे न देता श्री रवळनाथ देवस्थानाकडे दिली. त्यामुळे संस्थान खालसा झाल्यानंतर सुद्धा सर्व सरंजाम देवस्थानकडेचं राहिला व श्री रवळनाथचं सरंजामाचे स्वामी राहिले. सन 1892 मध्ये विश्वस्त मंडळाची स्थापना झाली. यामध्ये एकूण पाच सदस्य आहेत. श्री देवाचा सरंजाम हिंडगांव 428 एकर, चंदगड 165 एकर, कोनेवाडी 135 एकर असा असून विश्वस्त मंडळाने 99 वर्षाच्या कराराने कसायला दिलेल्या आहेत. तसेचं लाटगांव व हेरे आणि कणकुंबीतील 84 गांवे सुद्धा सरंजामात येतात. म्हणूनचं श्री रवळनाथाला 84 चौबार असेही म्हटले आहे.

मूर्ती

मंदिरातील रवळनाथाची मूर्ती काळ्या पाषाणाची असून दक्षिणमुख आहे. ही मूर्ती चतुर्भूज असून खड्ग, अमृतपात्र, त्रिशूल, डमरू धारण केलेली आहेत. डोक्यावर मुकुट, गळ्यात यज्ञोपवीत आहे.

चंदगडचा श्री रवळनाथ, परिसरातील 84 गावांचा अधिपती मानला जातो. म्हणून त्यांना चौऱ्याशी चोबार संबोधले जाते. श्री रवळनाथांच्या परिवार देवता चंदगड गावामध्ये आहेत. श्री गणपती, हनुमान, सातेरी, भावेश्वरी, रामलिंग, ब्रम्हदेव, चंद्रसेन, मांडदेव, चाळोबा, चव्हाटा, काळम्मादेवी-जैन मंदिर, क्षेत्रपाल अशी मंदिरे आहेत.

रविवार हा देवाचा विशेष वार मानला जातो. ह्या दिवषी सायंकाळी 8.00 वाजता नामस्मरण, पालखी सेवा व आरती केली जाते. देवाची अश्वारुढ मूर्ती चांदीच्या पालखीतून विराजमान करून प्रदक्षिणा केली जाते. देवास श्रीफळ, पंचाचे मान अर्पण केले जातात. पालखी सेवा (छबीना) पावसाळयात बंद ठेवण्याची प्रथा आहे.

येथील उत्सवांमधील वैशिष्ट्य म्हणजे डोक्यावरील आरती (महाआरती) मुंडण केलेल्या डोक्यावर गुरव पुजारी चांदीच्या तबकातून निरांजने, काकडा यांनी सजवलेली आरती तोलून प्रदक्षिणा केली जाते. हा कार्यक्रम वर्षातून पाच वेळा साजरा होतो. माघ पोर्णिमा नंतरचा बुधवार ते रविवार हा वार्षिक यात्रेचा काळ आहे.

देवालयातील उत्सव

  • पंचांग पूजन – श्री रवळनाथाच्या देवळात गुढी पाडव्याच्या सायंकाळी पंचांग पूजन, पाडवा वाचन, आरती प्रसाद, पानसुपारी, आदीचा कार्यक्रम असतो. वंषपरंपरेने वर्षीलदारही बदलण्याचा कार्यक्रम होतो.
  • गणेश चतुर्थी – गणेश चतुर्थीदिवशी सर्व बलुतेदार मिळून पालखीतून श्री गणेशाची मूर्ती रवळनाथ देवालयात आणतात. त्यानंतर गावातील लोक आपापल्या घरी श्री मूर्ती आणतात.
  • नवरात्र – दसरा – अश्विन शुद्ध प्रतिपदेदिवशी श्रीची मूर्ती धुऊन पूसून पूजा केली जाते. सायंकाळी देवासमोरील चौकात रूजवण घालून घट बसविला जातो. नऊ दिवस नंदादीप अखंड असतो. अश्विन शुद्ध अष्टमीदिवशी श्रीची अश्वारूढ मूर्ती दागदागिने घालून सजवली जाते. त्या रात्री कीर्तनानंतर पिठात आरती बांधली जाते. त्यानंतर मूर्तीसमोरील चौकात रांगोळी भरण्याचा मान कुलकर्णी घराण्याचा आहे. त्यावेळी डोक्यावर आरती घेऊन गुरव चौकाभोवती पाच फे–या मारतो. आरती उचलल्यानंतर चौकातील विडे मानक–यांना दिले जातात. घटपूजा झाल्यानंतर चौकावर असलेल्या झेंडूच्या माळा लुटल्या जातात. दस–याच्या दिवशी सायंकाळी श्री रवळनाथाची पालखीतून वाजत गाजत मिरवणूक काढली जाते. पंचायत समितीच्या आवारातील आपटयाच्या झाडाच्या डहाळया देवळात आणून त्याचे पूजन केले जाते. त्यानंतर सर्वत्र सोने वाटले जाते.
  • दीपावली पाडवा – अश्विन कृष्ण चतुर्दशी दिवशी पहाटे सर्व लोक देवदर्शन घेतात. सर्व मानक–यांना देवस्थानातर्फे नारळ वाटप केले जाते. नवमीप्रमाणे आरतीची व चौकाची मांडणी केली जाते. गुरव आरती डोक्यावर घेऊन देवळाला प्रदक्षिणा घालत असताना बाजूच्या छोटया देवळांना गा–हाणे घालत जातो. आरती नेहमीच्या मार्गाने रामलिंग देवस्थान, ब्रम्हलिंग देवस्थानामाफ‍र्त चंदगड पंचायत समितीजवळ जाते. तिथे हरिजन लोक सदर आरतीपासून पणती घेऊन श्री म्हारतळाला ओवाळून श्री रवळनाथ मंदिराकडे आणतात. तर आरती पंचायत समितीकडे गेलेल्या मार्गानेचं परत वेगाने पुन्हा श्रींच्या मंदिराकडे येते. यावेळी मांडदेव चौकात लोक ओलांडण्यासाठी झोपतात. आरतीचा गुरव या लोकांच्या अंगावरून चालत ओलांडत जातो.
  • जत्रा – माघ पौर्णिमेला श्री देव रवळनाथाची जत्रा भरते. ही जत्रा बुधवारपासून पाच दिवस रविवारपर्यंत असते. त्याआधी माघ महिन्यातील दुस–या मंगळवारी कुंभार गल्लीत श्री महालक्ष्मीचा उत्सव होतो. गावातील सुवासिनी खणानारळाने श्री महालक्ष्मीची ओटी भरतात. त्यानंतर एका आठवडयाने देवाची यात्रा भरते. मंगळवारी रात्री जत्रेच्या आदल्या दिवशी माहीचा गोंधळ असतो. या वेळी महाप्रसाद केला जातो. बुधवार हा मुख्य जत्रेचा दिवस असतो. त्यादिवशी उत्सवमूर्ती सजवली जाते. दुपारी चौक भरणे, विडे मांडणे, आरती बांधणे आदी कामे बलुतेदार करतात. दुपारी मंदिराचा गुरव आरती घेऊन मंदिराला प्रदक्षिणा घालतो. आरतीसोबत पालखी व सासनकाठी मंदिराला पाच प्रदक्षिणा घालतात. जत्रा पाच दिवस चालते. रविवारी बुधवारप्रमाणेचं लोक गर्दी करतात. आपले नवस फेडतात. रविवारी रात्री पुन्हा पालखीची सेवा केली जाते. नंतर गूळ, साखर व मिठाईचा प्रसाद वाटला जातो व कार्यक्रमाची सांगता केली जाते.
  • होळी – फाल्गुन पौर्णिमेला होळीचा कार्यक्रम असतो. ब्राम्हण गल्लीच्या गणेश होळीचा पहिला मान आहे. ती होळी सर्व गावकरी आणतात. त्यानंतर बाजार पेठेतील दिवाण होळी गावकरी आणतात. बाकीच्या पाच होळया त्या गल्लीचे लोक आणतात. या कालावधीत पाच दिवस रवळनाथ देवस्थानातर्फे नैवेद्य दाखविला जातो. येथील शिंपणे पंधरा दिवसांचे असते. अमावस्येला रंगपंचमी असते. त्यापूर्वी मांड चौकात आठ दिवस आधी मोठा मंडप घालून नायकिणीच्या गायनाचा कार्यक्रम होतो. अमावस्येच्या आधी जागर असतो. त्यानंतर रात्रभर रामलक्ष्मण, कौरव–पांडव अशी सोंगे असतात. या सर्वामधून एक दिसून येते की, चंदगड गांव हे एक सांस्कृतिक चळवळीचे केंद्रचं असावे असे वाटते.

श्री रवळनाथ जन्मकथा

श्री रवळनाथ चरित्र ब्रम्हांड पुराण, पद्मपुराणामध्ये वर्णन केले आहे. श्री केदार विजय या ग्रंथामध्ये रवळनाथांचा महिमा प्राकृतमध्ये वर्णिला आहे. त्या आधारे चरित्र सारांष असा-

पूर्व इतिहास

‘‘पुण्यपावन पंचगंगा नदीच्या दक्षिण तीरावर करवीर नावाचे शक्तीपीठ होते. त्या पीठावर महालक्ष्मी विराजमान होऊन राज्य करीत होती. तिच्या कृपेने संपूर्ण प्रजा सुखी-समृद्ध होती. एके दिवशी महालक्ष्मीने ब्रम्हपुत्र कोल्हासूराला आपल्या राज्यावर बसवले आणि शंभर वर्षे राज्य करण्याबद्दल त्याला वर दिला व ती हिमालयातील बद्रिकाश्रमाला निघून गेली. महालक्ष्मी तेथून निघून जाताच राक्षसांनी तेथे उच्छाद मांडला. जप-तप, होम, हवन, देवकृत्य बंद होऊन वाईट शक्तींचे प्राबल्य वाढले. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, दंभ ह्या सहा अवगुणांनी राक्षसी रूपे धारण केली. ह्या राक्षसांनी तपष्चर्या करून शंकरांना प्रसन्न करून घेतले. शंकरांनी त्यांना वर दिला. ‘युद्धात तुमच्यापुढे कोणाचाही निभाव लागणार नाही परंतु तुम्ही योगमायेची आराधना केली पाहीजे.’ विंध्य पर्वत हा अगस्ती ऋषींचा शिष्य होता, त्याला अहंकार उत्पन्न झाला. सर्व पर्वतांपेक्षा आपण उंच झाले पाहिजे, म्हणून तो वाढत मोठा झाला. यामुळे सूर्याच्या रथाला दक्षिणेस येण्यास मार्ग मिळेना, दक्षिण दिशेला सर्वत्र अंधकार पसरला. न्याय, नीती बुडाली. राक्षसांनी सर्वत्र उत्पात मांडला. करवीर क्षेत्रामध्ये रक्तभोज, कोल्हासूर, करवीर अशा तीन राक्षसांनी छळ आरंभला. गिरिजापूरात गृध्रासूर, देवाळे येथे देविलासूर, रत्‍नागिरीवर रत्नासूर, पराशर ऋशींच्या आश्रमाजवळ महिशासूर आणि सह्याद्रीच्या पूर्वेला सिंधुरासूर असे राक्षस ठाण मांडूण होते. ह्या राक्षसांच्या जुलूम-जबरदस्तीने संपूर्ण दक्षिण भूभाग त्रासला होता. ह्या त्रासाने व्यथित होऊन भूमाता इंद्र देवाकडे गाईचे रूप घेऊन गेली. दक्षिणेतील अंधकार आणि राक्षसांचे थैमान दूर करण्यासाठी तिने इंद्राला साकडे घातले, तेव्हा इंद्राने सांगितले, ‘ब्रम्हा, विश्णु, महेष, सूर्य व अग्नी या पाच देवता एकत्र येऊन श्री रवळनाथ ज्योतिबा यांचा अवतार होइल तेंव्हा या राक्षसांच्या त्रासातून तुझी सुटका होईल.’ श्री महालक्ष्मीने पृथ्वीला सांगितले, ‘राक्षसांच्या निर्दालनासाठी देवाच्या भैरव स्वरूपी अवताराबरोबर आपणसुद्धा उपस्थित राहू.’

श्री रवळनाथ जन्मकथा

पौगंड ऋशी आणि त्यांची पत्नी विमलांबुजा ह्यांनी पुत्रप्राप्तीसाठी प्रदोष व्रत केले. त्यांच्या व्रताने बद्रिनाथ प्रसन्न झाले. चैत्र महिन्यात शुद्ध षष्ठी रविवारी विमलांबुजा यांच्या तळहातामधुन बालक जन्मास आले. हा अवतार अयोनीसंभव, म्हणजेच जन्मतःच त्रिषुल, डमरू, खड्ग आणि अमृतपात्र ह्यांनी युक्त चतुर्भुज असा होता. यांचे नाव ‘ज्योतिबा, केदारनाथ’ ठेवले.

रवळनाथ नामाभिधान

एके दिवषी जमदग्नी ऋशींना पत्नी रेणुकाबद्दल राग उत्पन्न झाला. त्यांनी आपला पुत्र परशुराम ह्याला रेणुकेचा शिरच्छेद करण्याची आज्ञा दिली. पित्याच्या आज्ञेप्रमाणे परशुरामाने कृती केली. जमदग्नी परशुरामावर प्रसन्न झाले आणि वर मागण्यास सांगितले. परशुरामाने मातेला पुन्हा जिवंत करावी आणि आपण हत्या केल्याची गोष्ट स्मरणात येऊ नये असा वर मागितला, म्हणून जमदग्नींनी रेणुकामातेला जिवंत केले. आपल्या कृत्याने जमदग्नींना पश्चाताप झाला. त्यांनी आपल्या शरीरातून क्रोध बाहेर काढला. या क्रोधाग्नीला रवाग्नी असे म्हणतात, त्याने भुवनत्रय जळू लागले. त्यांनी क्रोधाग्नीचा अर्धा भाग परशुरामांना दिला आणि राक्षसांच्या निर्दालनासाठी थोडा भाग आपला शिष्य केदारनाथांना दिला. या क्रोधाग्नीचा अंश धारण केल्याने केदारनाथांना रवळनाथ असे नाव पडले व रवळनाथ जमदग्नी ऋषीकडे विदयार्जन करू लागले. देवसेना दक्षिणेस येण्यासाठी विंध्य पर्वताचा अडसर होता, म्हणून इंद्राने काशी क्षेत्री अगस्ती ऋषीची भेट घेतली आणि त्यांना विंध्य पर्वताला नमविण्यास सांगितले. त्याप्रमाणे अगस्ती ऋषी आपली पत्नी लोपमुद्रासह दक्षिणेस येण्यास निघाले. वाटेत विंध्य पर्वताने त्यांना नमस्कार केला. अगस्तींनी त्याला तेथे ‘मी दक्षिणेतून परत येईपर्यंत निद्रा कर’ असे सांगितले. त्यामुळे विंध्य पर्वत आडवा झाला. व ऋषीना दक्षिणेस येण्यास मार्ग मोकळा झाला. दक्षिण दिशेला सूर्यभ्रमण सुरू झाले. ऋषी-मुनी, संन्याशी यज्ञ-याग, देवकर्म करू लागले. जमदग्नी ऋषीकडे शिक्षण पूर्ण झाल्यावर रवळनाथ राक्षसांच्या निर्दालनासाठी दक्षिणेस येण्यास निघाले. त्यांच्यासोबत श्रीगणेश, महालक्ष्मी, अष्टभैरव, नवनाथ, अकरारूद्र, अष्टवसू, सोळासिद्ध हे सुद्धा येण्यास निघाले. राक्षसांना ही बातमी कळताच त्यांनी ही देवसेना थोपविण्यासाठी रूधिरोद्गारी यास पाठवले. त्याचे व रवळनाथांचे सेनापती तोरणभैरव यांचे घनघोर युद्ध झाले. तोरणभैरवाने रूधिरोद्गारी राक्षसाचा वध केला. विंध्य पर्वत ओलाडूंन रवळनाथ सेना दक्षिणेस आले. सह्याद्रीच्या शिखराशिखरावर अनेक उन्मत राक्षस रहात होते. रवळनाथांच्या अधिपत्याखाली भैरवसेनेने राक्षसांच्या निःपात करण्यास सुरुवात केली.

राक्षस वध

लवणासूर आणि खदिरांगार या राक्षसांचा वध रवळनाथांच्या सांगण्याप्रमाणे सोहंसिद्धाने केला. शंभू शिखरावर कुतोहल राक्षस व केदारनाथांचे युद्ध झाले. नाथांच्या प्रहारामुळे कुतोहल गुप्त होऊ लागला तेव्हा भगवान शंकर प्रकट झाले आणि कुतोहलाला ठार करण्यात आले. त्या क्षेत्राला शिखर शिंगणापूर असे नाव पडले. पुढे पंचवटीस बालभैरवाने तीन दिवस युद्ध करून ताडकासुराचा वध केला. शिकटभैरीने शबरासुराचा वध केला. रवळनाथांनी शिष्टाईकरिता तोरणभैरवास रत्नासूराकडे पाठवले. रत्नासूराने रुधिरोचनाला तोरणभैरवास भेटण्यास पाठवले. रुधिरोचनाने आपल्या कौशल्याने तोरणभैरवास आपल्या बाजूस वळवले. अशाप्रकारे तोरणभैरव फितूर झाला. नंतर श्री महालक्ष्मी व रवळनाथांनी विघ्नहर्त्या गणपतीला बोलावले. गणपतीने गुप्त वेशाने रत्‍नागिरी पर्वताच्या मार्गावर सर्वत्र बोरीच्या बिया पेरल्या. त्यामुळे सर्वत्र बोरीची दाट कुंपणे आणि वृक्ष निर्माण झाले. पुढे मायावी राक्षसांसोबत युद्धात भैरवसेनेला या वृक्षांचा आधार मिळाला. जेजुरी भागी सात किल्ले व्यापून मणिभद्र आणि मल्लभद्र हे दोघे राक्षस रहात होते. शंकराचा अवतार मार्तंड भैरव आणि त्यांचे युद्ध झाले. मार्तंड भैरवाने त्यांचा वध केला आणि स्वतः जेजुरी प्रांती वस्ती केली. त्यांनाच खंडोबा म्हणून ओळखले जाते. मल्लांचा साथीदार अवंदासूर ह्याचा संहार यमाई देवीने केले. यमाई तेथेच मुळपिठी राहिली ते क्षेत्र औंध म्हणून ओळखले जाते. कालभैरवाने कोथळासूर राक्षसाचा वध केला. रक्तभोजाचा पुत्र महिशासूर आणि रवळनाथ यांचे युद्ध सुरू झाले. अनेक शस्त्रास्त्रांनी महिषासूर मरत नाही, असे पाहून रवळनाथांनी महालक्ष्मी देवीला बोलावले. इंद्रायणी देवीने शक्तीने महिषासूराचा वध केला. रक्तभोजाचा पुत्र पुष्कर, रुधिरोचन, धीरोचन तसेच त्यांचा मामा एकाक्ष देशीचा यक्षराजा चंद्रसेन यांनी विमानातून भैरव सैन्यावर हल्ला चढवला. त्यांचा निःपात करण्याकरता हनुमानाचे आवाहन केले. हनुमंताने त्यांची विमाने पाडली. आकाशभैरवाने रुधिरोचनाचा, कमलभैरवाने चंद्रसेनाचा, कालभैरवाने पुष्कर व धीरोचनाचा वध केला. रवळनाथ स्वतः सिद्ध बैराग्याचे रूप घेऊन रत्नासूराला भेटायला आले. बैराग्याच्या वेशातील रवळनाथांनी रत्नासूराला युद्ध थांबवून नाथांना शरण जायला सांगितले. उलट रत्नासूराने बैराग्याची निर्भत्सना (निंदा) केली आणि मंडुकासूराला भैरव सैन्यावर लढायला पाठवले. रवळनाथांनी शेषनागाला युद्धास पाठवले. शेषाने मंडुकासूराचा वध केला. हे पाहून रक्तभोज देवसेनेचा पराभव व्हावा म्हणून सात दिवसांच्या अनुष्ठानाला बसला. रत्नासूर राक्षस सेना घेऊन युद्धाला आला. रवळनाथांचे व अनेक आयुधांनी परस्पर युद्ध रंगले. रत्नासूरची अनेक शस्त्रे, अस्त्रे मोडून रवळनाथ थकू लागले. तेव्हा शक्तिसेना घेऊन चोपडाई देवी नाथांच्या सहाय्यास आली. रत्नासूर तिच्यासोबत युद्ध करू लागला. चोपडाईने खड्गाने रत्नासूराचे शिर उडवले. रत्नासुराने मृत्युसमयी विनंती केली, ‘श्रीनाथा, माझ्या नावाने या क्षेत्राला ‘रत्‍नागिरी’ असे नाव असावे.’ रक्तभोजाचे अनुष्ठान कालभैरवाने मोडून टाकले. चिडलेला रक्तभोज रवळनाथांसमोर आला. रणांगणात नाथांच्या अस्त्राने रक्तभोज पडे पण नाथांच्या हातातील अमृतपात्रातील थेंब त्यावर पडताच पुन्हा उठे. तेव्हा नाथांनी हातातील अमृतपात्र सह्याद्रीच्या अमरनाथ कड्याावर ठेवून युद्धास सुरुवात केली. रक्तभोजाने वृक्षाचे रूप धारण केले. तेव्हा नाथांनी अस्त्राने रक्तभोजाच्या शरीराचे आठ तुकडे केले आणि त्याचा वध केला. रक्तभोजाने नाथांकडे प्रार्थना केली, ‘माझ्या आठ अवयवांपासून सुवासिक वृक्ष व वनस्पती निर्माण व्हाव्यात आणि त्यापासून अष्ठगंध तयार व्हावे. त्याचा उपयोग आपणास मंगलतिलक लावण्याकरता व्हावा.’ नाथांनी ‘तथास्तु’ म्हटले. ती अष्ठगंधे म्हणजे मलयागरु, देवदार, कृष्णगरु, हरिचंदन, कुंकूमकेषर, दवणा, गव्हलकचोरा, रक्तचंदन होत. रक्तोद्भवाची पत्नी ‘जलसेना’ व रक्तभोजाची पत्नी ‘चंद्रसेना’ ह्या सती गेल्या. त्यांनी सुगंधी जलरुपे धारण केली. रक्तभोज, रत्नासूर यांच्या वधाची बातमी ऐकून महालक्ष्मीला आनंद झाला. तेव्हा देवी म्हणाली, ‘चांगला भला आहे रवळनाथ’. तेव्हापासून देवाचा जयजयकार सुरू झाला. ‘रवळनाथाच्या नावानं चांगभलं’ ‘जोतीबाच्या नावानं चांगभलं’ श्री महालक्ष्मीने करवीर आणि कोल्हासूर राक्षसांचा वध केला. रवळनाथांनी करवीर पीठावर पुनश्च श्री महालक्ष्मीची स्थापना केली. आणि ते उत्तरेत जाण्यास निघाले. तेव्हा लक्ष्मीने नाथांना रत्‍नागिरीवर राहण्यासाठी व सदैव दृष्ठी आपल्याकडे ठेवण्याची विनंती केली, नाथांनी मान्य केली.

रवळनाथांचा अभिषेक

श्री महालक्ष्मीने श्रावण शुद्ध षष्ठीला रवळनाथांना राज्याभिषेक केला. रत्नासूराची सर्व रत्ने नाथांच्या मुकुटावर बसवण्यात आली. अशारीतीने संपूर्ण दक्षिण भाग भयमुक्त करून रवळनाथ रत्‍नागिरीवर राहू लागले. श्री रवळनाथ अनेक गावांमध्ये ग्रामदैवत म्हणून विराजमान आहेत. श्री जोतीबा, रवळनाथ अनेकांचे कुलदैवत आहे. रवळनाथ आपल्या भक्तांचे दुःख-दारिद्रय निवारण करून त्यांच्या हृदय सिंहासनावर विराजमान होतात.