मायराणी (देवता)
मायराणी ही महाराष्ट्रात लोकपरंपरेने पुजली जाणारी देवता आहे. महाराष्ट्रात हिचा आयराणी म्हणून सुद्धा उल्लेख होत असे. हिचे उत्तर भारतात 'माताराणी' नावाच्या देवतेशी नामसाधर्म्य दिसते. केतकर ज्ञानकोशात 'मायराणी' देवीचा उल्लेख (भा. इ. सं. मं. वार्षिक इतिवृत्त, १८३८चा हवाला देऊन) आहे त्यात मायराणीचे देऊळ कुठेही आढळत नसल्याचा उल्लेख आहे. समर्थ रामदासांच्या दासबोधात ' जळीच्या मेसको मायेराणी । ' असाही उल्लेख येतो (या ओळीत मेसकोचा आदरार्थी उल्लेख मायेराणी आहे अथवा मायराणीचा उल्लेख स्वतंत्र आहे ते स्पष्ट होत नाही) त्या उल्लेखावरून या कदाचित जलदेवता असू शकतील.[१][२] ब्रिटिशकालीन बिजापूर गॅझेटिअर (इ.स.१८८४)मध्ये भटक्या आणि भिक्षामागून उदरनिर्वाह करणाऱ्या संख्येने अत्यल्प भट समुदाय सिधोबाच्या प्रतिमेसोबतच मायराणीची प्रतिमा बाळगत असल्याचा उल्लेख येतो.[३]
कुलाचार
[संपादन]केतकर ज्ञानकोशानुसार लोकांच्या देव्हाऱ्यात हिच्या नांवाचा एक टाक करून बसविलेला आढळतो. हा कुळधर्म म्हणजे वपन केलेल्या विधवेचे पूजन होय. अशी पूजन करून घेणारी विधवा क्वचित मिळते. अशी विधवा जेव्हा कधी मिळेल तेव्हा हा कुळधर्म उरकून घेतात. विधवेस हळदकुंकू देतात तें ती आपल्या कपाळी लावते. गंधपुष्पादिकांनीं मस्तकावर तिचें पूजन करतात. लुगडें, खण व चांगली दक्षणा तिला देतात आणि जेवू घालून तिची रवानगी करतात. मायेचें जें स्वरूप वर्णन करतात त्यावरून कांहीं एक प्रकारच्या समजुतीनें ह्या 'मायराणी'ची उत्पत्ति झाली असावी. केतकर ज्ञानकोशात मायराणी आणि राजरा (राजेश्वरी/राजराजेश्वरी) यांच्या कुलाचारात साम्य जाणवते.[४] दाते-कर्वे यांच्या महाराष्ट्र शब्दकोशानुसार आषाढात आंत तेल घालून व वात लावून कणकेचे लहान लहान दिवे मायराणीस समर्पित केले जातात त्यांना ' मायराणीचे दिवे ' असे म्हणतात. समर्थ रामदास त्यांच्या दासबोध ग्रंथात (दशक चौथे, समास पाचवा, ओवी १४,१५,१६) मध्ये देवतांचा उत्तम अथवा मध्यम असा भेद न करता ' जाखमाता मायराणी । बाळा बगुळा मानविणी । पूजा मांगिणी जोगिणी । कुळधर्में करावीं ॥ १६॥ ' असे सुचवतात, परंतु इतर (वारकरी संप्रदायातील) संत तुकाराम, संत शेख महंमद इत्यादी संत समुदाय नवसास पावणाऱ्या प्राण्यांचे बळी मागणाऱ्या देवतांपेक्षा पंढरपूरच्या विठोबास महत्त्व द्या असे सांगताना दिसतो.[५]
शिमगा फाल्गुन होळी
[संपादन]शेख महंमदाच्या योगसंग्राममध्ये १२.४९.८२ क्रमांकाच्या अभंगात शिमगा फाल्गुन होळीच्या दिवशी 'मायराणी'चे पूजन होत असल्याचा उल्लेख येतो.[६]
म्हणींमधील उल्लेख
[संपादन]दाते कर्वे महाराष्ट्र शब्द कोश तसेच अल्फ्रेड मॅनव्हरिंगचा म्हणी कोश 'मायराणी' शब्द असलेल्या म्हणींची दखल घेताना दिसून येतात.
संदर्भ
[संपादन]- ^ "माय - Marathi Dictionary Definition". TransLiteral Foundation. 2019-01-18 रोजी पाहिले.
- ^ समर्थ रामदासकृत दासबोध अध्याय तिसरा, समास दुसरा, श्लोक २७
- ^ Gazetteer of the Bombay Presidency: Bijápur (इंग्रजी भाषेत). Government Central Press. 1884.
- ^ केतकरांचा महाराष्ट्रीय ज्ञानकोशातील मायराणी (एक कुलधर्म) हे पान दिनांक २६ मार्च २०१७ रोजी सकाळी ११ वाजून ५० मिनिटांनी जसे दिसले
- ^ http://www.misalpav.com/node/33792
- ^ http://www.misalpav.com/comment/773826#comment-773826