भवानी
हा लेख भवानी देवीबद्दल आहे. शिवाजी महाराजांच्या भवानी तलवारीबद्दलचा लेख येथे आहे.
तुळजापूरची तुळजाभवानी हे महाराष्ट्राचे दैवत आहे. महाराष्ट्तील देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी हे एक आहे. हे तुळजापूर गाव उस्मानाबाद जिल्ह्यात बालाघाट डोंगराच्या एका पठारावर आहे. तुळजा हे त्वरजा या शब्दाचा अपभ्रंश आहे, असे सांगितले जाते.
धार्मिक आख्यायिका[संपादन]
कृतयुगाच्या वेळी 'कर्दम' ऋषींची पत्नी 'अनुभूती' हिच्याबद्दल 'कुंकुर' नावाच्या दैत्याला अभिलाषा उत्पन्न झाली. तिच्या पातिव्रत्याच्या भंग करण्याचा त्याने प्रयत्न करताच देवी पार्वती ही धावून आली. तिने दैत्याचा नाश केला. त्वरित धावून येणारी म्हणून ती त्वरिता किंवा मराठीत तुळजा. छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याच्या स्थापनेसाठी देवीने भवानी तलवार दिली असे मानले जाते. त्यामुळे महाराजांनीही तिला कुलस्वामिनी मानून, तिची प्रतापगडावरही प्रतिष्ठापना केली होती.
या देवीला छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी कुलस्वामिनी मानतात. तर भगवान श्रीराम हे हिचा वरदायिनी असा उल्लेख करतात. (उल्लेख केव्हा, कोठे केला आहे?) भक्ती आणि शक्तीचा अविष्कार असणाऱ्या तुळजाभवानी मातेचा नवरात्र महोत्सव आश्विन महिन्यात शुद्ध प्रतिपदेपासून कोजागिरीपर्यंत चालतो.
तुळजाभवानीच्या देवळाच्या प्राचीनतेचा पुरावा देणारा १४ नोव्हेंबर इ.स. १३९८चा शिलालेख उपलब्ध आहे. तुळजाभवानीचे मंदिर हे सोळाशे वर्षांपूर्वीचे असल्याचे मानले जाते. भवानीची मूर्ती मंदिरात असली, तरीही तुळजाभवानीची प्रतिकृती असणारी मूर्ती धाकटे तुळजापूर येथेही आहे.
भौगोलिक स्थान[संपादन]
तुळजापूर हे उस्मानाबाद या जिल्ह्याच्या ठिकाणापासून २२ किमी तर सोलापूर या जिल्हा केंद्रापासून ४४ किमी अंतरावर आहे.
मंदिर[संपादन]
मुख्य मंदिराभोवती मोठे प्रांगण आहे आणि आजुबाजूला प्रशस्त ओवऱ्या आहेत. मंदिराचे बांधकाम हेमाडपंथी आहे. या मंदिरावर हत्ती, घोडे, मोर, यश, गंधर्व, किन्नर यांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. मंदिराच्या प्रांगणामध्ये दोन मोठ्या दीपमाळा आहेत. त्यांचे बांधकाम शिवाजी महाराजांनी केले आहे, असे म्हणतात. देवीच्या मंदिरासमोर भवानीशंकराचे मंदिर आहे. या मंदिरात स्फटिकाचा एक सिंह आहे. हा सिंह हे देवीचे वाहन आहे. तुळजाभवानीची मूर्ती ही गंडकी शिळेची असून अष्टभुजा आहे. तिने बिचवा, बाण, चक्र, शंख, धनुष्य, पानपात्र व राक्षसाची शेंडी धारण केली आहे. पाठीवर बाणाचा भाता धारण केला आहे. युद्धाच्या तयारीत असलेल्या या अष्टभुजेचे हे रौद्र रूप तरीही विलोभनीय आहे.
तुळजाभवानीची मूर्ती चल असून, ती वर्षातून तीन वेळेस सिंहासनावरून हलवली जाते.
या देवीने रामाला लंकेचा रस्ता दाखवला म्हणून तिला रामवरदायिनी असे म्हणतात. रामाला दिशादर्शन करणारी, शिवाजी महाराजांना आणि अख्ख्या महाराष्ट्राला प्रेरणा देणारी अशी ही तुळजाभवानी आहे महाराष्ट्राचे कुलदैवत आहे.