Jump to content

मुक्ता बर्वे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मुक्ता बर्वे
मुक्ता बर्वे
जन्म मुक्ता वसंत बर्वे
१७ मे, १९७९ (1979-05-17) (वय: ४५)
चिंचवड, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारत भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय, निर्मिती
कारकीर्दीचा काळ २००० पासून
भाषा मराठी
प्रमुख नाटके देहभान, फायनल ड्रॅफ्ट, कबड्डी कबड्डी, छापा काटा, कोडमंत्र
प्रमुख चित्रपट जोगवा, मुंबई-पुणे-मुंबई भाग १/२/३, डबलसीट
प्रमुख टीव्ही कार्यक्रम अग्निहोत्र एका लग्नाची दुसरी गोष्ट रुद्रम अजूनही बरसात आहे
वडील वसंत बर्वे
आई विजया बर्वे

मुक्ता बर्वे (१७ मे, १९७९ - ) या मराठी नाट्य आणि चित्रपट सृष्टीतील एक नावाजलेल्या आणि यशस्वी अभिनेत्री आहेत.

त्या मूळच्या पुण्याजवळील चिंचवड गावच्या आहेत. यांचे वडील वसंत बर्वे आणि आई शिक्षिका व नाट्यलेखिका विजया बर्वे आहेत. मुक्ताने रंगभूमीवरील बालपणापासून सुरुवात केली. चार वर्षाची असताना आईच्या ‘‘रुसू नका फुगू नका‘’ या नाटकात काम केले आणि त्यानंतर १५ व्या वर्षी नाट्यस्पर्धेच्या निमित्ताने रत्‍नाकर मतकरींच्या घर तिघांचे हवे या नाटकात भूमिका केली. मुक्ता बर्वे प्रामुख्याने मराठी भाषिक चित्रपट, नाटके आणि दूरचित्रवाणी मालिकांमध्ये कामे करतात. २००० साली व्यावसायिक कारकिर्दीस सुरुवात केलेल्या मुक्ताने काही हिंदी चित्रपटांतूनही अभिनय केला आहे. त्यांनी पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रमधून नाट्यशास्त्राची पदवी मिळवली आहे.

बर्वे यांनी अनेक यशस्वी नाटक, मालिका आणि चित्रपटांतून काम केले आहे. यासाठी त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. जोगवा ह्या २००९ सालच्या मराठी चित्रपटामधील भूमिकेसाठी बर्वे यांना पुरस्कार देखील मिळाले.[] २०१२ मध्ये झी मराठी प्रदर्शित झालेल्या एका लग्नाची दुसरी गोष्ट या मालिकेत राधा देसाई ही मध्यवर्ती भूमिका बर्वे यांनी केली होती.

1999 मध्ये तिने घडले बिगडले या शोद्वारे मराठी दूरचित्रवाणीवर पदार्पण केले. आम्हाला वेगाचे (२००१) या मराठी नाटकातून तिने मराठी रंगभूमीवर पदार्पण केले. 2002 मध्ये तिने चकवा या चित्रपटातून मराठी चित्रपटात पदार्पण केले. थांग (2006), माती माये (2007), सवार रे (2007), सास बहू और सेन्सेक्स (2008), सुंबरन (2009) आणि एक डाव धोबीपछाड (2009) या चित्रपटांमध्ये तिच्या कामाचे कौतुक झाले. 2009 चा जोगवा हा चित्रपट तिच्या कारकिर्दीत टर्निंग पॉईंट ठरला, ज्याने तिला बॅक टू बॅक हिट चित्रपट दिले: मुंबई-पुणे-मुंबई (2010), आघात (2009), बदाम रानी गुलाम चोर (2012), लग्न पाहावे करुण (2013). ), मंगलाष्टक वन्स मोअर (2013), डबल सीट (2015) आणि मुंबई-पुणे-मुंबई 2 (2015). अग्निहोत्र (2009-2010) आणि एक लग्नाची दुनिया गोश्ता (2012) हे शो तिच्या दूरचित्रवाणी कारकीर्दीतील महत्त्वाचे भाग आहेत. तिच्या थिएटर कारकिर्दीतील फायनल ड्राफ्ट (2005), देहभान (2005), कबड्डी कबड्डी (2008) आणि छपा काटा (2013) ही तिची काही प्रसिद्ध नाटके आहेत. 2015 मध्ये, ती तीन यशस्वी चित्रपटांचा भाग बनली ज्यात हायवे, डबल सीट आणि मुंबई-पुणे-मुंबई 2 यांचा समावेश आहे. 2016 मध्ये, ती YZ आणि गणवेश या दोन मराठी चित्रपटांमध्ये दिसली.

बर्वे यांच्याकडे रसिका प्रॉडक्शन नावाचे प्रोडक्शन हाऊस देखील आहे, ज्या अंतर्गत त्यांनी नाटकांची निर्मिती केली आहे: छापा काटा, लव्हबर्ड्स (2015) आणि इंदिरा (2015), रंग नवा हा थिएटर-आधारित कविता कार्यक्रम, ज्यामध्ये त्या स्वतःच्या काही कविता सादर करतात. आणि इतर काही. सध्या, ती रसिका प्रॉडक्शनच्या बॅनरखाली कोडमंत्र (2016) नावाच्या नाटकात अभिनय आणि निर्मिती करत आहे. मुक्ताला भारताची जेसिका अल्बा म्हणून देखील ओळखले जाते कारण त्यांच्या दिसण्यात आणि चित्रपटाच्या निवडीतील काही समानता.

शिक्षण आणि कौटुंबिक पार्श्वभूमी

[संपादन]

बर्ने यांचा जन्म पुण्याजवळच्या चिंचवड येथे १९७९ साली झाला. त्यांचे वडील वसंत बर्वे टेल्को कंपनीत नोकरी करीत होते. आई विजया बर्वे या शिक्षिका तसेच नाट्यलेखिका होत्या.[]. मुक्ता यांचा मोठा भाऊ देबू बर्वे व्यावसायिक कलाकार आहे तसेच त्याने लहानपणी काही चित्रपटातून भूमिका केल्या आहेत. मूळचा लाजाळू आणि बुजरा स्वभाव[ संदर्भ हवा ] कमी व्हावा यासाठी मुक्ताच्या आई विजया बर्वे यांनी रुसू नका फुगू नका हे बालनाट्य लिहिले, यात भित्रा ससा आणि परी राणी अश्या दुहेरी भूमिका मुक्ताने साकारल्या. या प्रकारे वयाच्या चौथ्या वर्षी मुक्ताचे रंगभूमीवर पदार्पण झाले. दहावीच्या परीक्षेनंतर घर तिघांचे हवे या रत्‍नाकर मतकरी लिखित नाटकात मुक्ताने भूमिका साकारली. या नंतर त्यांनी रंगभूमीवर कारकीर्द करायचे ठरविले. त्यांनी इयत्ता ११ आणि १२वीचे शिक्षण पुण्यातील एस.पी. कॉलेजमध्ये घेतले. यानंतर ललित कला केंद्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे नाट्य शास्त्र विषयात पदवी घेतली []. नाट्यशास्त्रातील पदवी प्राप्त केल्यावर लगेच मुक्ता मुंबईत आल्या. २००० सालापासून त्या मुंबईत वास्तव्यास आहेत [].

अभिनय कारकीर्द 

[संपादन]

१९९९ ते २००७ : नाटक, मालिका आणि चित्रपटात पदार्पण 

[संपादन]

इ. १०वीच्या परीक्षेनंतर, टेल्को कंपनीतील स्पर्धेसाठी बसवलेल्या, रत्‍नाकर मतकरी लिखित घर तिघांचे हवे या नाटकातून बर्वेने एक भूमिका साकारली. १९९८ साली घडलंय बिघडलंय या मालिकेतून तिने दूरचित्रवाणीमालिकांमध्ये पदार्पण केले. खेडवळ अश्या चंपाची भूमिका तिने साकारली. त्यानंतर पिंपळपान (१९९८), बंधन (१९९८), बुवा आला (१९९९), चित्त चोर (१९९९), मी एक बंडू (१९९९), आभाळमाया (१९९९), श्रीयुत गंगाधर टिपरे (२००१) आणि इंद्रधनुष्य (२००३) या मालिकांमधून मुक्ताने छोट्या भूमिका साकारल्या []. २००१ मध्ये सुयोगच्या आम्हाला वेगळे व्हायचंय या नाटकातून तिला व्यावसायिक नाटकात काम करण्याची पहिली संधी मिळाली.

२००४ साली चकवा या चित्रपटातून बर्वेने मराठी चित्रपटसृष्टीत पहिल्यांदा काम केले. चकवा चित्रपटातील भूमिकेसाठी महाराष्ट्र राज्य शासनाचा उत्कृष्ट पदार्पण अभिनेत्री तिला पुरस्कार मिळाला. २००५मध्ये अमोल पालेकरांच्या थांग या मराठी आणि इंग्लिश द्वैभाषिक सिनेमात बर्वेची छोटी भूमिका होती. याच वर्षी देहभान आणि फायनल ड्राफ्ट या दोन व्यावसायिक नाटकांमधून तिने काम केले []. "फायनल ड्राफ्ट" मध्ये तिने विद्यार्थिनीची भूमिका केली होती. २००५ साली, देहभान साठी उत्कृष्ट पदार्पण अभिनेत्री आणि उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा अल्फा गौरवचा पुरस्कार बर्वेला मिळाला. प्रायोगिक नाटकासाठीचा उत्कृष्ट अभिनेत्रीचा अल्फा गौरव २००५चा पुरस्कार तिला यांना फायनल ड्राफ्ट साठी मिळाला. याशिवाय तिला २००६चा महाराष्ट्र टाइम्स पुरस्कार आणि २००८चा झी गौरव पुरस्कार दिले गेले.[].

यापुढे शेवरी (२००६), ब्लाइंड गेम (२००६) आणि मातीमाय (२००६) या चित्रपटातून बर्वेने छोट्या भूमिका साकारल्या. त्याच वर्षी तिने अग्निशिखा या दूरचित्रवाणीमालिकेत मध्यवर्ती भूमिका केली.

२००६ साली बर्वेने हम तो तेरे आशिक है या व्यावसायिक नाटकात रुकसाना साहिल या मुस्लिम मुलीची प्रमुख भूमिका केली. या नाटकात रुकसाना, अनिल प्रधान (जितेंद्र जोशी) या हिंदू मुलाच्या प्रेमात पडते आणि ते लग्न करतात अशी कथा आहे. या भूमिकेसाठी महाराष्ट्र शासनाच्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्काराने मुक्ताला सन्मानित करण्यात आले.

२००७ साली सावर रे या चित्रपटात मुक्ताने याच नावाने भूमिका साकारली. पुढे जितेंद्र पाटील यांच्या कबड्डी कबड्डी या व्यावसायिक नाटकात कबड्डीपटूची भूमिका साकारली. या नाटकात एका कबड्डीपटूची खेळाविषयीची महत्त्वाकांक्षा आणि तिच्या वडिलांचा (विनय आपटे) तिला अमेरिकेला स्थायिक होण्याचा आग्रह यातील संघर्ष दाखविला आहे. या भूमिकेसाठी बर्वेला २००७ सालच्या राज्य सरकार तसेच महाराष्ट्र टाइम्स पुरस्कार आणि २००८ साली झी गौरव सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हे पुरस्कार मिळाले.[].

मुंबई-पुणे-मुंबई मधील मुक्ता 

२००८ ते २०११ : जोगवा आणि मुंबई- पुणे- मुंबईचे यश

[संपादन]

बर्वेने २००८ साली दे धक्का या मराठी आणि सास बहू और सेन्सेक्स या हिंदी चित्रपटातून छोट्या भूमिका केल्या.

२००९ साली एक डाव धोबीपछाड आणि सुंबरान या मराठी चित्रपटांतून बर्वेने सहाय्यक अभिनेत्री म्हणून भूमिका केल्या. त्यानंतर राजीव पाटील दिग्दर्शित, २००९ सालच्या जोगवा या चित्रपटाने बर्वेला यश मिळवून दिले [] यात महाराष्ट्रातील आणि कर्नाटकातील जोगते आणि जोगतिणींच्या दुःखद जीवनाच्या पार्श्वभूमीवर तायप्पा (उपेंद्र लिमये) आणि सुली (मुक्ता बर्वे) यांच्या प्रेमकथेचे कथानक आहे. या चित्रपटाने २००८ चे अनेक राष्ट्रीय पुरस्कार मिळवले. बर्वेने साकारलेली सुलीची भूमिका तिच्या कारकिर्दीतला महत्त्वाचा टप्पा म्हणून मानली जाते []. बर्वेने या चित्रपटासाठी छायाचित्रे, लेख आणि प्रत्यक्ष जोगतिणींच्या आयुष्याचे जवळून निरीक्षण करून या भूमिकेचा अभ्यास केला. बर्वेने या चित्रपटातील अनेक प्रसंगांमध्ये केवळ डोळ्यांच्या भाषेतून प्रेम, दुःख, संघर्ष ​ या भावना चितारल्या आहेत. या भूमिकेसाठी बर्वेला २००९ च्या राज्य शासनाच्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. याशिवाय तिला याच वर्षी संगीत नाटक अकादमीच्या उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार सुद्धा मिळाला.[१०].

२०१० मध्ये थॅंक्स मा या हिंदी चित्रपटात बर्वेने लक्ष्मी नावाच्या वेश्येची भूमिका साकारली. जोगवा नंतर २०१०मध्ये प्रदर्शित झालेल्या सतीश राजवाडे दिग्दर्शित मुंबई-पुणे-मुंबई चित्रपटाने पुन्हा एकदा बर्वेला यश मिळवून दिले. या चित्रपटातून बर्वे आणि स्वप्निल जोशी यांनी जोडीने काम केले आहे.[११] मुंबईची मुलगी लग्नासाठी मुलाला पाहायला पुण्याला येते आणि एका दिवसाच्या त्यांच्या भेटीत ते एकमेकांच्या प्रेमात पडतात अशी या चित्रपटाची कथा आहे. या चित्रपटात बर्वे आणि जोशी यांच्या सहज अभिनय केला आहे तसेच आणि दोन्ही शहरांच्या स्वभाव वैशिष्ट्यांचे अचूक चित्रण केले आहे. या चित्रपटातील अभिनयानंतर बर्वे आणि जोशी यांच्या जोडीची तुलना शाहरूख खान आणि काजोलच्या जोडीशी केली जाते.[१२]

२०१० मधील अग्निहोत्र या दूरचित्रवाणीमालिकेतली मंजुळा श्रीपाद अग्निहोत्री ही भूमिका बर्वेने केली.[१३]. २०१० मधील विक्रम गोखले दिग्दर्शित आघात या चित्रपटातील डॉ. स्मिता देशमुख ही भूमिकासुद्धा लक्षवेधी ठरली. यासाठी बर्वेला पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार (२०११) मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.

राजा परांजपे चित्रपट महोत्सव २०११मध्ये मराठी चित्रपट सृष्टीतील योगदानाबद्दल मुक्ताला तरुणाई सन्मान देण्यात आला.[१४][१५]

२०१२ ते २०१४ : एका लग्नाची दुसरी गोष्ट आणि इतर नाटक व चित्रपट

[संपादन]

बर्वे आणि स्वप्निल जोशी यांनी २०१२ मध्ये झी मराठी वरील सतीश राजवाडे दिग्दर्शित एका लग्नाची दुसरी गोष्ट या मालिकेतून काम केले.[१६] एका जाहिरात कंपनीत काम करणारी राधा महेश देसाई (बर्वे) आणि सॉफ्टवेर अभियंता असलेला घनःश्याम काळे (जोशी) घरच्यांच्या दबावाला कंटाळून कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करतात आणि शेवटी खरोखरीच एकमेकांच्या प्रेमात पडतात अशी या मालिकेची कथा आहे.[१७][१८] [१३] केवळ उच्च टीआरपीच नाही तर झी मराठीच्या इतिहासातील सुवर्णपान या शब्दात झी टेलिफिल्म्सने मालिकेचे वर्णन केले.

माकडाच्या हाती शॅम्पेन या नाटकाचे २०१२ मध्ये बदाम राणी गुलाम चोर या सतीश राजवाडे दिग्दर्शित चित्रपटात रूपांतर झाले. या चित्रपटात बर्वेने उपेंद्र लिमये, पुष्कर श्रोत्री आणि आनंद इंगळे यांच्या बरोबर काम केले. टाइम्स ऑफ इंडियाने मुक्ताच्या अभिनयाचा मुक्ताने पेन्सिलचे पात्र चोखपणे वठविले आहे! या शब्दात वर्णन केले.[१९]

२०१३ साली, बर्वेने गिरीश जोशी यांच्या बरोबर टोराँटोमध्ये प्रसिद्ध अशा फायनल ड्राफ्ट या नाटकाच्या प्रयोगात काम केले.[२०]

२०१३ हे मुक्तासाठी यशस्वी वर्ष होते. या वर्षी आपल्या रसिका प्रॉडक्शन्स या कंपनीद्वारे बर्वेने नाट्य निर्मितीत प्रवेश केला. या कंपनीचे नाव बर्वेने रसिका जोशी या आपल्या अभिनेत्री मैत्रिणीच्या नावाने ठेवले आहे.[२१][२२] इरावती कर्णिकलिखित आणि समीर विद्वंस दिग्दर्शित छापा काटा या नव्या नाटकात बर्वेनेने मैत्रेयी भागवत पात्र साकारले. यातून आधुनिक मुलींचे आपल्या आईशी असलेले नातेसंबंध दर्शविलेले आहेत.[२३] यात काही प्रयोगांसाठी मैत्रयी भागवतच्या आईची भूमिका रीमा लागू आणि नंतर नीना कुलकर्णी यांनी साकारली.[२४] या नाटकासाठी मुक्ता बर्वे आणि सहनिर्माते दिनेश पेडणेकर यांना दिनानाथ मंगेशकर पुरस्कार (२०१४ चे सर्वोत्कृष्ट नाटक) लता मंगेशकर यांच्या हस्ते मिळाला.[२५][२६]

२०१३ मध्ये अजय नाईक यांचे पहिले दिग्दर्शन असलेल्या लग्न पहावे करून या चित्रपटात बर्वेने उमेश कामत बरोबर प्रेमकथा साकारली.[२७] यात वधूवर सूचक मंडळ स्थापन केलेल्या अदिती टिळक या मुलीची भूमिका बर्वेने केली होती.. इंडियन नर्वने कामगिरीनुसार, मुक्ता एक दृढ आणि निश्चयी आदिती म्हणून आहे. तिला अपयशी होण्याची भीती असते. हे त्यातले सर्वोत्कृष्ट पात्र आहे. तिने ही भूमिका अगदी चोखपणे निभावली.[२८] २०१३ मध्ये रेणू देसाई निर्मित मंगलाष्टक वन्स मोअर या चित्रपटातून बर्वे आणि जोशी यांनी पुन्हा एकदा बरोबर काम केले.[२९] लग्नानंतर ​नवऱ्याच्या भोवती आयुष्य विणून स्वतःला विसरलेली आरती पाठक या अत्यंत भाबड्या आणि हळव्या मुलीचे चित्रण बर्वेने केले. टाईम्स ऑफ इंडियाने मुक्ता तिच्या कॉमिक टाइमिंग आणि संवाद फेकीत उत्कृष्ट आहे. असे वर्णन केले.[३०]

२०१४ मध्ये मुक्ताने कवितांवर आधारित रंग नवा या कार्यक्रमाची निर्मिती केली. या मध्ये संगीतकार मिलिंद जोशी यांच्याबरोबर ज्ञात कवींच्या अज्ञात कविता या विषयावरील आणि स्वतः लिहिलेल्या काही कविता सादर केल्या.[३१]

याच वर्षी रत्‍नाकर मतकरी लिखित शॉट या कथेवरून चित्रित केलेल्या लघुपटात बर्वेने श्रुती हे पात्र साकारले. मुक्ता बर्वे आणि सुप्रिया मतकरी यांच्या भूमिका असलेला हा लघुपट अनेक चित्रपट महोत्सवांतून दाखवला गेला.

२०१५-१६ : ‘डबलसीट’चे यश आणि पुढील प्रवास

[संपादन]

२०१५ साली मुक्ताचे अत्यंत महत्त्वाचे चित्रपट प्रदर्शित झाले. यातील समीर विद्वंस दिग्दर्शित "डबलसीट" या चित्रपटात तिने अंकुश चौधरी बरोबर प्रथमच चित्रपटात काम केले.[३२] रोहा सारख्या कोकणातील गावातून अमित नाईकशी (अंकुश चौधरी) लग्न झाल्यावर मुंबईत आलेल्या मंजिरीचे पात्र मुक्ताने रेखाटले.[३३][३४] मध्यम वर्गीय नवऱ्याबरोबर चांगले आयुष्य जगण्याची आस असलेली, स्वप्ने पहायला न डगमगणारी आणि त्यासाठी प्रामाणिकपणे कष्ट करायला तयार असलेली मंजिरी मुक्ताने जिवंत केली. टाइम्स ऑफ इंडियाने मुक्ताचे या शब्दांत कौतुक केले "Mukta, who too makes a return after two years, is brilliant as ever as the strong-willed, caring and accommodative wife".[३५] मंजिरीच्या डोळ्यातला आशावाद, आत्मविश्वास आणि निरागसता मुक्ताने रसिकांच्या मनात आपल्या अभिनयातून पोहोचवला. आपण सहज आणि नैसर्गिक अभिनयाच्या साम्राज्ञी आहोत हे या चित्रपटातून मुक्ताने पुन्हा एकदा सिद्ध केले.

तिच्या ‘डबलसीट’ मधील कामासाठी तिला २०१५ आणि २०१६ सालात अनेकोत्तम पुरस्कार मिळाले. संस्कृती कलादर्पण २०१६मध्ये तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठीचे नामांकन होते [३६] तर महाराष्ट्राचा फेवरेट कोण २०१५, झी चित्र गौरव पुरस्कार २०१६, महाराष्ट्र राज्य शासनाचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री २०१६[३७], मराठी फिल्मफेर २०१६ [३८] या पुरस्कारांनी गौरविले गेले.[३९][४०]

मुंबई पुणे मुंबई-२ च्या ट्रेलर लॉंच सोहळ्यास मुक्ता आणि स्वप्निलची उपस्थिती

२०१५ मध्येच, अमित त्रिवेदीच्या "हायवे- एक सेल्फी आरपार" या चित्रपटात इतर अनेक दिग्गज कलाकारांबरोबर (रेणुका शहाणे, टिस्का चोप्रा, गिरीश कुलकर्णी, विद्याधर जोशी) मुक्ताने काम केले. तमासगीर तरुणीची भूमिका मुक्ताने अत्यंत सहजपणे साकारली.[४१][४२]

नोव्हेंबर २०१५ मध्ये बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित अशा ‘मुंबई-पुणे-मुंबई’च्या भाग दोनमध्ये मुक्ता बर्वे आणि स्वप्निल जोशी ही जोडी पुन्हा एकदा रसिकांना पाहायला मिळाली.[४३][४४] पहिल्या भागातील तिची (मुंबई म्हणजे गौरी देशपांडे) आणि स्वप्निलची ( पुणे म्हणजे गौतम देशपांडे) प्रेमकथा पुढे सरकलेली पाहायला मिळाली. काहीशा गोंधळलेल्या मनस्थितीतली आणि लग्नाला होकार देण्यासाठी चाचरत असलेल्या गौरीची मुक्ताने साकारलेली भूमिका समीक्षकांना आणि रसिकांना खूप आवडली.[४५] या कथेवर पुढे चित्रपट निघाला. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने चाणगली कमाई केली.मुंबई- पुणे- मुंबई २ मधल्या कामासाठी मुक्ताला मराठी फिल्मफेअर २०१६ पुरस्काराचे सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे नामांकन मुक्ताला होते.[४६]

२०१६ मध्ये, अतुल जगदाळे दिग्दर्शित "गणवेश" या चित्रपटात किशोर कदम, दिलीप प्रभावळकर, स्मिता तांबे, गुरू ठाकूर यांच्या बरोबर काम केले.[४४] खाकी वर्दीमधल्या कर्तव्यकठोर पण मनातून माणूसपण न हरवलेल्या मीरा पाटील या पोलीस इन्स्पेक्टरची भूमिका मुक्ताने केली. टाइम्स ऑफ इंडिया ने तिच्या ‘गणवेश’मधील कामाबद्दल पुढीलप्रमाणे लिहिले "Barve (who is an absolute pleasure to watch) delivers her usual balanced performance.[४७]

ऑगस्ट २०१६ मध्ये मुक्ताने समीर विद्वंस दिग्दर्शित YZ या चित्रपटात सायली ही छोटी भूमिका साकारली.[४८] या चित्रपटात तिच्याबरोबर सागर देशमुख, अक्षय टांकसाळे, पर्ण पेठे आणि सई ताम्हणकर यांच्या प्रमुख भूमिका होत्या. भूमिकेची लांबी किती आहे हे महत्त्वाचे नसून तेवढ्या छोट्या भूमिकेत सुद्धा पात्र किती समर्थपणे साकार करता येते याचा प्रत्यय मुक्ताच्या अभिनयातून नेहमीच मिळतो. टाइम्स ऑफ इंडिया तिच्या YZ मधील भूमिकेविषयी " In a small role too, Mukta drives the point home with her expressions." असे वर्णन केले.[४९]

२०१७: हृदयांतर : एक महत्त्वाचा टप्पा 

[संपादन]

२०१७ मध्ये, मुक्ता, सुबोध भावे बरोबर "हृदयांतर" या चित्रपटातून समायरा जोशी या मुख्य भूमिकेत झळकल्या.[५०] फॅशन डिझायनर विक्रम फडणीस यांच्या दिग्दर्शनातील पदार्पणातल्या या चित्रपटाच्या मुहूर्ताचा शॉट शाहरुख खानच्या हस्ते झाला.[५१] हृदयांतर चित्रपटाचा ट्रेलर लॉंच हृतिक रोशनच्या हस्ते झाला.

हृदयांतर चित्रपटाच्या ट्रेलर लॉंच सोहळ्यातील मुक्ताची प्रसन्न मुद्रा

[५२]

ऑगस्ट २०१७ पासून झी युवा वाहिनीवर प्रदर्शित झालेल्या रुद्रम मालिकेत मुक्ताची प्रमुख भूमिका आहे. अन्यायाविरुद्ध प्रतिशोध घेणाऱ्या रागिणी देसाईची भूमिका मुक्ता करते आहे. या मालिकेत तिच्याबरोबर या मालिकेत मोहन आगाशे, वंदना गुप्ते, सतीश राजवाडे, संदीप पाठक, किरण करमरकर इ. दिग्गज कलाकार तिच्याबरोबर काम करीत होते. भय आणि रहस्यमय कथानक असलेली ही मालिका प्रेक्षकांना खूप आवडली. 

फेब्रुवारी २०१८मध्ये प्रदर्शित झालेल्या "आम्ही दोघी" या चित्रपटात मुक्ता बर्वे आणि प्रिया बापट यांच्या प्रमुख भूमिका होत्या. गौरी देशपांडेंच्या "पाऊस आला मोठा" या लघुकथेवर आधारित या चित्रपटात मुक्ताने अमलाचं पात्र साकारलं. कमी शिक्षण घेतलेल्या, अनाथ आणि अत्यंत कमी वयात खूप काही सोसलेल्या, धीरगंभीर, अंतर्बाह्य शांतता पावलेल्या अमलाचंपात्र मुक्ताने अतिशय अप्रतिमरित्या उभे केले. महाराष्ट्र टाइम्स ने मुक्ताच्या अभिनयाचा उल्लेख पुढील वाक्यात केला आहे. "केवळ आपल्या चेहऱ्यावरच्या भावांतून, नुसत्या अस्तित्त्वाने आणि मिळालेल्या मोजक्या फुटेजमधून मनात घर करणाऱ्या मुक्ता बर्वेच्या "अम्मी"ला अधिक मार्क द्यायला हवेत." मार्च 2018 मध्ये, मुक्ताला चित्रपट श्रेणीतील लोकसत्ता तरुण तेजंकित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.[५३] मुंबई-पुणे-मुंबई या चित्रमालेतला मुंबई-पुणे-मुंबई 3 डिसेंबर २०१८ रोजी प्रकाशित झाला.[५४] तिच्या चित्रपटातील सहजतेचे आणि पडद्यावरील सुंदर वावराबद्दल टाइम्स ऑफ इंडियाने कौतुक  केले.[५५] २०१९ मध्ये मुक्ताने तीन चित्रपटांमध्ये काम केले. दिग्दर्शनात पदार्पण केलेल्या सलील कुलकर्णी दिग्दर्शित "वेडिंगचा शिनेमा" मध्ये रुचा इनामदार, शिवराज वायचळ आणि इतरांसोबत दिसली होती. तिने उर्वी नावाच्या महत्त्वाकांक्षी चित्रपट निर्मात्याची भूमिका साकारली.[५६] त्यानंतर तिने मिलिंद लेले दिग्दर्शित "बंदिशाळा" चित्रपटात शरद पोंक्षे, प्रवीण तरडे आणि इतर अनेकांसोबत काम केले. या चित्रपटात तिने माधवी सावंत नामक एका कडक पोलीस अधिकारीची भूमिका साकारली होती.[५७] तिच्या अभिनयाची समीक्षकांनी प्रशंसा केली होती " The whole responsibility of taking the story forward lies on the shoulders of Mukta, who handles it like a pro." [५८] या चित्रपटासाठी मुक्ताला महाराष्ट्र राज्य शासनाचा २०१९चा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.[५९] तिचा तिसरा चित्रपट होता विक्रम फडणीस दिग्दर्शित  'स्माइल प्लीज' ज्यात तिने ललित प्रभाकर आणि प्रसाद ओक यांच्याबरोबर काम केले.[६०] स्मृतिभ्रंशाने ग्रासलेल्या फोटोग्राफर नंदिनी जोशी या स्रीचा प्रवास मुक्ताने सशक्त अभिनयाने रसिकांसमोर आणला. टाइम्स ऑफ इंडियाच्या मिहीर भणगे यांनी पुढील शब्दात मुक्ताच्या अभिनयाचे कौतुक केले. "Mukta portrays the strong-headedness and vulnerability of Nandini with aplomb".[६१]

२०२१-२०२२​ : अजूनही बरसात आहे

[संपादन]

२०२०-२०२१ मध्ये संपूर्ण जगाला कोरोनाने ग्रासल्यामुळे एकूणच चित्रपट, नाटक आणि मनोरंजन माध्यमांना खूप मोठा आर्थिक फटका बसला. या काळात बर्वेने कथावाचन, नाट्य शिबिरे आणि कथाकथन या रूपात काम केले.[६२][६३][६४]

बर्वेने २०२१ मध्ये चित्रीकरणांना सुरुवात झालेल्या सोनी मराठी वरील "अजूनही बरसात आहे[६५]" या मालिकेतून दूरचित्रवाणीमालिकांमध्ये पुन्हा काम केले.[६६] २०२२ हे वर्ष बर्वे साठी खूप महत्वाचे होते. २०००-२०२२ ह्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून झी मराठीने बर्वेला झी गौरव पुरस्कार दिला. [६७] बहुप्रतीक्षित Y सिनेमा जुन २०२२ मध्ये चित्रपटगृहांमध्ये झळकला आणि मान्यवर आणि प्रेक्षकांनी प्रशंसा केली. Y हा स्त्रीभ्रूणहत्या या विषयावर थरारपट आहे.[६८] रंगमंचावर देखील ५ वर्षांनंतर बर्वेने पुनर्पदार्पण केले. प्रिय भाई , एक कविता हवी आहे या अभिवाचनाच्या कार्यक्रमातून मुक्ताने सुनीताबाईंची भूमिका साकारली.[६९] पु. लं च्या पुण्यातील मालती माधव या निवासस्थानी देखील याचा विशेष प्रयोग झाला. जयवंत दळवी लिखित आणि चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित "चारचौघी" या नाटकाचे पुन्हा नवीन संचातील प्रयोग सुरू झाले ज्यात रोहिणी हट्टंगडी, पर्ण पेठे, कादंबरी कदम आणि मुक्ता बर्वे प्रमुख भूमिकेत आहेत.[७०]

नाट्यनिर्मिती, इतर भूमिका, कार्य आणि पुरस्कार 

[संपादन]

नाटक, सिनेमा आणि मालिकांबरोबर मुक्ताचे अन्य कार्यसुद्धा महत्त्वाचे आहे. २०१० मध्ये मुक्ताने "आम्ही मराठी पोरं हुशार" या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, तर २०१२ च्या झी मराठी गौरव पुरस्काराचे सूत्रसंचालन स्वप्निल जोशीं रोबर केले.[७१] २०१२ मध्ये सुयोग ग्रुपची मुक्ता स्वप्निलबरोबर ब्रॅंड ॲंबेसिडर होती.[७२] ७ डिसेंबर २०१४ मध्ये विनय आपटेंच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त मुक्ताने लोकसत्तामध्ये विनय आपटेंच्या काही आठवणी लिहिल्या.[७३] तसेच विनय एक वादळ या कार्यक्रमात कबड्डी कबड्डी या नाटकातील तिचा विनय आपटेंबरोबरचा प्रवेश सादर केला.[७४] ९X झकास हिरोईन सीझन २ मध्ये मुक्ताने स्पर्धेचे परीक्षकपद भूषविले.[७५]

मुक्ताचे प्राणिप्रेमदेखील सर्वश्रुत आहे. २०१५ मध्ये इतर कलाकारांबरोबर मुक्ताने अ‍ॅनिमल्स मॅटर या NGO च्या "पक्षी वाचवा" उपक्रमात भाग घेतला.[७६] आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त लोकसत्ता वृत्तपत्राने भरवलेल्या "कर्ती करविती" या दोन दिवसाच्या चर्चासत्राचे उद‌घाटन करण्याचा मान मुक्ता बर्वे यांना मिळाला.[७७] उदघाटनाच्या भाषणातील मुक्ताने प्रकट केलेले विचार तिच्या प्रगल्भ व्यक्तिमत्त्वाची साक्ष देतात.[७८][७९]

२०१६ मध्ये लोकमत महाराष्ट्रियन ऑफ द इयर (मराठी थिएटर मधील मुक्ताच्या कार्यासाठी) आणि जुलै २०१६ मध्ये निळू फुले चतुरस्र अभिनेत्री पुरस्काराने मुक्ताला गौरविले गेले.[८०]

महाराष्ट्र वन चॅनेलच्या महिलादिन विशेष "सावित्री सन्मान २०१६" सोहळ्यात मुक्ताला तिच्या सिनेक्षेत्रातील योगदानाबद्दल पुरस्कराने गौरविले गेले.[८१] मुक्ताचा सन्मान करताना श्री. वामन केंद्रे यांनी "Mukta is most talented girl around us. मुक्ता महाराष्ट्राला, भक्ती बर्वेनंतर पडलेलं स्वप्न आहे" या शब्दात गौरविले.[८१]

नोव्हेंबर २०१६ मध्ये पुलोत्सव २०१६ तर्फे मुक्ताचा तरुणाई सन्मान पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.[८२]

कोडमंत्र नाटकात वकिलाच्या भूमिकेत मुक्ता

मुक्ताने व्यावसायिक रंगभूमीवर मोजक्या नाटकांत कामे करून रंगभूमीवरील आपले अस्तित्त्व कायम ठेवले. २०१५ आणि १६ मध्ये तिने काही नाटकांची निर्मिती केली. २०१५ साली संस्पेंस थ्रिलर प्रकारातील लव्हबर्ड्‌स मध्ये काहीशी नकारात्मक छटा असलेली देविका तिने साकारली.[८३] २०१५ मध्ये रत्‍नाकर मतकरी लिखित "इंदिरा" या नाटकाची निर्मिती केली. 

२०१६ मध्ये, भारतीय सैन्याच्या पार्श्वभूमीवरचे "कोडमंत्र" हे नाटक मुक्ताने रंगभूमीवर आणले. या नाटकातील सैनिकी कायदातज्ज्ञ अहिल्या देशमुखचे पात्र मुक्ताने साकारले.[८४] त्याचे प्रयोग सुरू असतानाच या नाटकावर आधारित एका पुस्तकाची निर्मिती करावी, असा विचार तिच्या मनात आला व तिने ‘कोडमंत्र’ या नावानेच एक पुस्तक तयार केले. नुकत्याच झालेल्या नाटकाच्या दीडशेव्या प्रयोगाला त्याचे प्रकाशन करण्यात आले. सैनिकांच्या आयुष्यावरील ‘कोडमंत्र’ या नाटकाच्या टीमने या नाटकावर आधारलेल्या पुस्तकाच्या विक्रीतून जमा झालेली रक्कम सैनिक कल्याण निधीला देण्यात येत आहेत. सुरुवातीला मुक्ता बर्वे अणि तिच्या टीमने ५१००० रुपये महाराष्ट्र राज्याच्या सैनिक कल्याण निधीसाठी दिले आहेत. ’कोडमंत्र’च्या सुरुवातीला एक हजार प्रती छापण्यात आल्या. काही महिन्यांतच त्याची पहिली आवृत्ती संपली. ‘अ फ्यू गुड मेन’ या इंग्रजी नाटकावर कोडमंत्र नाटक आधारलेले असून त्यामध्ये सैनिकांची निष्ठा, त्यांची शौर्यगाथा, त्यांचे जगणे, शिस्त अशा अनेक पैलूंचा मागोवा घेण्यात आला आहे.

मराठी रंगभूमीवर नवनवीन नाट्य प्रयोग करून पाहायला मुक्ता बर्वे नेहमीच उत्सुक असतात. मुक्ताने ऑक्टोबर २०१६ मध्ये नसीम सोलेमानपूर (इराणी लेखक) यांनी लिहिलेले व सिद्धेश पूरकर यांनी मराठीत अनुवादित केलेले "व्हाईट रॅबिट रेड रॅबिट" हे नाटक पुण्यातील भरत नाट्य मंदिर येथे सादर केले. जगभरातील अनेक भाषांमध्ये अनुवादित झालेल्या या नाटकाचे वैशिष्ट्य त्याच्या उत्स्फूर्त सादरीकरणात होते. दिग्दर्शक नाही, आणि संहितेचे सादरीकारणापूर्वी वाचन नाही, कलाकाराला थेट रंगमंचावर संहिता हातात मिळते, नाटकाचा एका कलाकाराला एकच प्रयोग सादर करता येतो असे या नाटकाचे स्वरूप होते. रंगमंचावर कलाकाराने संहिता वाचत वाचत कलाकार आणि प्रेक्षकांनी नाटकाचा सह-अनुभव घ्यायचा अशा कलाकारासाठी धाडसी आणि प्रेक्षकांसाठी नवख्या वाटाव्या अशा प्रयोगाचे चॅलेंज मुक्ताने अगदी सहजी पेलले.[८५][८६]

ऑक्टोबर २०१६ मध्ये मुक्ताने रसिका-अनामिका प्रॉडक्शन्सतर्फे 'दीपस्तंभ' नाटक रंगभूमीवर आणले.[८७]

फेब्रुवारी २०१७ मध्ये ललित कला केंद्राच्या माजी विद्यार्थ्यांबरोबर, मुक्ता बर्वे यांनी, 'सखाराम बाईंडर' या विजय तेंडुलकर लिखित सुप्रसिद्ध नाटकाचे विशेष पाच प्रयोग रंगभूमीवर सादर केले.[८८] नाटकातील सर्व कलाकारांनी या प्रयोगांचे मानधन न घेता, या प्रयोगांमधून जमणारा निधी बॅकस्टेज कलाकारांना मदत निधी म्हणून दिला.[८९]

कारकीर्द

[संपादन]

चित्रपट

[संपादन]

मुक्ता बर्वेची भूमिका असलेले चित्रपट :

वर्ष शीर्षक भाषा भूमिका
२००४ चकवा मराठी सिस्टर छाया
२००५ थांग मराठी/इंग्रजी पाहुणी कलाकार
२००६ शेवरी मराठी पाहुणी कलाकार
ब्लाईंड गेम मराठी सहाय्यक अभिनेत्री
माती माय मराठी सहाय्यक अभिनेत्री -यशोदा
२००७ सावर रे मराठी सहाय्यक अभिनेत्री- मुक्ता
२००८ दे धक्का मराठी पाहुणी कलाकार
सास बहू और सेन्सेक्स हिंदी परिमल
२००९ एक डाव धोबीपछाड मराठी सहाय्यक अभिनेत्री- सुलक्षणा
जोगवा मराठी प्रमुख भूमिका- सुली
सुंबरान मराठी सहाय्यक अभिनेत्री- कल्याणी
२०१० आघात मराठी प्रमुख भूमिका- डॉक्टर
ऐका दाजिबा मराठी सहाय्यक अभिनेत्री
थॅंक्स मा हिंदी सहाय्यक अभिनेत्री-वेश्या
मुंबई-पुणे-मुंबई मराठी प्रमुख भूमिका- मुंबई
२०१२ बदाम राणी गुलाम चोर मराठी प्रमुख भूमिका- पेन्सिल
गोळाबेरीज मराठी सहाय्यक अभिनेत्री- नंदिनी चौबळ
२०१३ मंगलाष्टक वन्स मोअर मराठी प्रमुख भूमिका- आरती
लग्न पहावे करून मराठी प्रमुख भूमिका- अदिती टिळक
२०१४ गुणाजी कोकणी प्रमुख भूमिका- धनगर स्त्री
शॉट मराठी शॉर्ट फिल्म - श्रुती
२०१५ डबल सीट मराठी प्रमुख भूमिका- मंजिरी नाईक
मुंबई-पुणे-मुंबई २ मराठी प्रमुख भूमिका- गौरी देशपांडे
हायवे- एक सेल्फी आरपार मराठी सहाय्यक अभिनेत्री
२०१६ गणवेश मराठी प्रमुख भूमिका - इन्स्पेक्टर मीरा पाटील
वाय झेड मराठी सहाय्यक अभिनेत्री- सायली
२०१७ हृदयांतर मराठी प्रमुख भूमिका - समायरा जोशी
२०१८ आम्ही दोघी मराठी प्रमुख भूमिका - अम्मी
मुंबई-पुणे-मुंबई ३ मराठी प्रमुख भूमिका- गौरी देशपांडे
२०१९ बंदिशाळा मराठी प्रमुख भूमिका- जेलर माधवी सावंत
वेडिंगचा शिनेमा मराठी प्रमुख भूमिका-उर्वी
Smile Please मराठी प्रमुख भूमिका- नंदिनी जोशी
वाय/ Y मराठी Mumbai Film Festival २०१९ मध्ये प्रदर्शित (चित्रपटगृहात प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत )
२०२० देवी हिंदी शॉर्ट फिल्म- सहाय्यक अभिनेत्री- आरझू
२०२१ चंद सांसे हिंदी शॉर्ट फिल्म-प्रमुख भूमिका- राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रदर्शित
२०२२ वाय/ Y मराठी प्रमुख भुमिका - डॉ आरती देशमुख
आपडी थापडी मराठी प्रमुख भुमिका - पार्वती पाटील
एकदा काय झालं मराठी पाहुणी कलाकार-डॉ. सानिया
२०२४ अलिबाबा आणि चाळिशीतले चोर मराठी सुमित्रा
नाच ग घुमा मराठी प्रमुख भुमिका - राणी
रावसाहेब मराठी प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत

दूरचित्रवाणी

[संपादन]

मुक्ता बर्वे यांचे दूरचित्रवाणीवर प्रदर्शित झालेले कार्यक्रम :

वर्ष कार्यक्रमाचे नाव भूमिकेचे नाव टिप्पणी
१९९९ घडलंय बिघडलंय ​चंपा
१९९९ पिंपळपान सहाय्यक भूमिका
१९९९ बंधन सहाय्यक भूमिका
१९९९ बुवा आले सहाय्यक भूमिका
चित्तचोर सहाय्यक भूमिका
मी एक बंडू सहाय्यक भूमिका
१९९९ आभाळमाया वर्षा निमकर सहाय्यक भूमिका
२००१ श्रीयुत गंगाधर टिपरे योगिता सहाय्यक भूमिका
२००३ इंद्रधनुष्य सहाय्यक भूमिका
२००६ अग्निशिखा कलिका मुख्य भूमिका
२०१०-११ अग्निहोत्र मंजुळा श्रीपाद अग्निहोत्री मुख्य भूमिका
२०१० आम्ही मराठी पोरं हुशार सूत्रसंचालिका
२०११ लज्जा ॲड. मीरा पटवर्धन सहाय्यक भूमिका
२०११ मधु इथे अन् चंद्र तिथे गौरी सहाय्यक भूमिका
२०१२ एका लग्नाची दुसरी गोष्ट राधा काळे मुख्य भूमिका
२०१३ मला सासू हवी राधा काळे पाहुणी
२०१४ विनय: एक वादळ सहाय्यक भूमिका
२०१५ झकास हिरोईन (पर्व २) परीक्षक ​
२०१७ रुद्रम् रागिणी मुख्य भूमिका
२०२१ अजूनही बरसात आहे मीरा देसाई मुख्य भूमिका

नाटके

[संपादन]
वर्ष नाटकाचे नाव भूमिकेचे नाव नाटकाची भाषा
१९९६ घर तिघांचे हवे पदार्पणातील नाटक मराठी
२००१ आम्हाला वेगळे व्हायचंय सहाय्यक अभिनेत्री मराठी
२००५ देहभान सहाय्यक अभिनेत्री मराठी
फायनल ड्राफ्ट प्रमुख भूमिका -विद्यार्थिनी मराठी
२००६ हम तो तेरे आशिक हैं प्रमुख भूमिका- रुक्साना साहिल मराठी
२००८ कबड्डी कबड्डी प्रमुख भूमिका- पूर्वा मराठी
२०१३ छापा काटा निर्माती आणि प्रमुख भूमिका - मैत्रेयी भागवत मराठी
२०१४ रंग नवा निर्माती आणि प्रमुख भूमिका मराठी
२०१५ लव्ह बर्ड्‌स निर्माती आणि प्रमुख भूमिका- देविका मराठी
इंदिरा निर्माती मराठी
२०१६ कोडमंत्र निर्माती आणि प्रमुख भूमिका- अहिल्या देशमुख मराठी
दीपस्तंभ निर्माती मराठी
२०१७ सखाराम बाईंडर निर्माती आणि प्रमुख भूमिका- चंपा मराठी
धाई अक्षर प्रेम के निर्माती मराठी
२०१८ चॅलेंज निर्माती मराठी
२०२२ प्रिय भाई , एक कविता हवी आहे प्रमुख भूमिका- सुनीताबाई मराठी
चारचौघी प्रमुख भुमिका - विद्या मराठी

इतर कार्य

[संपादन]

बर्वेने कथाकथनाचे कामही केलेले आहे.

मुक्ताचं वाचिक अभिनयातील काम
साल शीर्षक भाषा टिप्पणी
२०२० अॅडिक्ट मराठी गुन्हेगारी - ऑडिओ बुक - कथाकथन
२०२० व्हायरस पुणे मराठी विज्ञानकथा - ऑडिओ बुक - कथाकथन
२०२१ ६१ मिनिट मराठी लघुकथा - ऑडिओ बुक - कथाकथन

पुरस्कार आणि प्रशंसा

[संपादन]

मुक्ता बर्वे ही एक भारतीय अभिनेत्री आणि निर्माती आहे जी मुख्यत्वे मराठी चित्रपट, दूरदर्शन आणि रंगमंचावर  दिसते. तिला अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत, ज्यात सात महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार, दोन फिल्मफेअर मराठी पुरस्कार, सहा संस्कृती कला दर्पण पुरस्कार, दोन झी चित्र गौरव पुरस्कार आणि सात झी नाट्य गौरव पुरस्कारांचा समावेश आहे.

बर्वेने आपल्या करिअरची सुरुवात मराठी रंगभूमीवरील नाटकं आणि दूरदर्शन मालिकांमधून केली. 'देहभान' या नाटकासाठी तिला २००३ मध्ये झी नाट्य गौरव पुरस्कारांतर्गत आशादायक नवोदित पुरस्कार आणि २००५ मध्ये सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री पुरस्कार मिळाला. २००४ मध्ये तिने 'चकवा' या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले, ज्यासाठी तिला महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कारांतर्गत आशादायक नवोदित पुरस्कार मिळाला. त्यानंतरच्या वर्षांत तिने 'हम तो तेरे आशिक हैं', 'फायनल ड्राफ्ट' आणि 'कबड्डी कबड्डी' या व्यावसायिक नाटकांमधील भूमिकांसाठी राज्य पुरस्कारांतर्गत तीन वेळा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार जिंकला. 'फायनल ड्राफ्ट' मधील शैक्षणिक अयशस्वी झालेल्या विद्यार्थिनीच्या भूमिकेसाठी तिला खूप प्रशंसा मिळाली आणि संस्कृती कला दर्पण पुरस्कार, महाराष्ट्र टाइम्स सन्मान आणि दोन झी नाट्य गौरव पुरस्कारांसह सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार मिळाले. बर्वेने 'जोगवा' (२००९) या चित्रपटात ग्रामीण भारतातील धार्मिक अंधश्रद्धांवर आधारित जोगतिणिची भूमिका साकारली, ज्यासाठी तिला पहिला महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार मिळाला, तसेच संस्कृती कला दर्पण पुरस्कार, झी चित्र गौरव पुरस्कार आणि मिफ्ता मिळाले.

२०११ मध्ये, बर्वेला 'आघात' चित्रपटात डॉक्टरच्या भूमिकेसाठी पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार मिळाला. तिने २०१३ मध्ये 'छापा काटा' या नाटकाच्या निर्मिती गृहाची स्थापना केली, ज्यामध्ये तिने अभिनयही केला आणि तिला दीनानाथ मंगेशकर पुरस्कार आणि संस्कृती कला दर्पण पुरस्कारांतर्गत सर्वोत्कृष्ट नाटक पुरस्कार मिळाला. 'डबल सीट' (२०१५) मध्ये सरळ, मध्यमवर्गीय विमा एजंटच्या भूमिकेसाठी तिला फिल्मफेअर मराठी पुरस्कार, महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार आणि झी चित्र गौरव पुरस्कार मिळाले. या चित्रपटाने तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून तिचा पहिला 'महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण' पुरस्कार मिळवून दिला, त्यासाठी आठ नामांकने मिळाली. 'स्माईल प्लीज' साठी तिला दुसरा फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार मिळाला आणि २०१९ मध्ये 'बंदिशाळा' साठी सातवा राज्य पुरस्कार मिळाला.

या पुरस्कारांव्यतिरिक्त, बर्वेला मराठी रंगभूमीतील कर्तृत्वासाठी संगीत नाटक अकादमीने उस्ताद बिस्मिल्लाह खान युवा पुरस्काराने सन्मानित केले.

फिल्मफेअर मराठी पुरस्कार

[संपादन]

फिल्मफेअर मराठी पुरस्कार हे मराठी चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट कर्तृत्वासाठी टाइम्स ग्रुपद्वारे वार्षिक दिले जाणारे पुरस्कार आहेत।

वर्ष नामांकित काम वर्ग निकाल संदर्भ
२०१६ डबल सीट सर्वोत्कृष्ट अभिनेत्री जिंकला
२०१६ मुंबई-पुणे-मुंबई २ सर्वोत्कृष्ट अभिनेत्री नामांकित
२०१८ ह्रदयांतर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री नामांकित
२०१९ स्माईल प्लीज सर्वोत्कृष्ट अभिनेत्री जिंकला
२०२२ वाय सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (समालोचक) नामांकित
२०२२ वाय सर्वोत्कृष्ट अभिनेत्री नामांकित

महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार

[संपादन]

महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार हे मराठी चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट सिनेमाई कर्तृत्वासाठी महाराष्ट्र शासनाद्वारे वार्षिक दिले जाणारे पुरस्कार आहेत

वर्ष नामांकित काम वर्ग निकाल संदर्भ
२००५ चकवा सर्वोत्कृष्ट नवोदित जिंकला
२००६ हम तो तेरे आशिक हैं व्यावसायिक नाटकातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री जिंकला
२००७ फायनल ड्राफ्ट सर्वोत्कृष्ट अभिनेत्री जिंकला
कबड्डी कबड्डी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री जिंकला
२००९ जोगवा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री जिंकला
२०१६ डबल सीट सर्वोत्कृष्ट अभिनेत्री जिंकला
२०१९ बंदिशाळा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री जिंकला

महाराष्ट्र टाइम्स सन्मान

[संपादन]
वर्ष नामांकित काम वर्ग निकाल संदर्भ
२००६ फायनल ड्राफ्ट व्यावसायिक नाटकातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री नामांकित
२००७ कबड्डी कबड्डी व्यावसायिक नाटकातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री जिंकला
२०१७ कोडमंत्र सर्वोत्कृष्ट नाटक जिंकला
२०२३ वाय सर्वोत्कृष्ट अभिनेत्री जिंकला

महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण?

[संपादन]

हे मराठी चित्रपटसृष्टीतील उत्कृष्टतेचा सन्मान करण्यासाठी मराठी दूरदर्शन वाहिनी झी टॉकीजद्वारे सादर केले जातात

वर्ष नामांकित काम वर्ग निकाल संदर्भ
२०११ मुंबई-पुणे-मुंबई आवडती अभिनेत्री नामांकित
२०१२ बदाम राणी गुलाम चोर आवडती अभिनेत्री नामांकित
२०१४ मंगळाष्टक वन्स मोअर आवडती अभिनेत्री नामांकित
२०१५ डबल सीट आवडती अभिनेत्री जिंकला
२०१६ मुंबई-पुणे-मुंबई २ आवडती अभिनेत्री नामांकित
२०१७ ह्रदयांतर नामांकित नामांकित
२०१८ आम्ही दोघी आवडती सहाय्यक अभिनेत्री नामांकित
२०१९ बंदिशाळा आवडती अभिनेत्री नामांकित
२०२१ डबल सीट आवडती अभिनेत्री नामांकित

प्लॅनेट मराठी फिल्म आणि ओटीटी पुरस्कार

[संपादन]
वर्ष नामांकित काम वर्ग निकाल संदर्भ
२०२३ वाय सर्वोत्तम अभिनेत्री नामांकित

सकाळ प्रीमियर पुरस्कार

[संपादन]
वर्ष नामांकित काम वर्ग निकाल संदर्भ
२०१९ स्माईल प्लीज सर्वोत्तम अभिनेत्री नामांकित
२०२३ वाय सर्वोत्तम अभिनेत्री नामांकित

संस्कृती कलादर्पण पुरस्कार

[संपादन]

संस्कृती कला दर्पण पुरस्कार दरवर्षी अर्चना नेवरेकर फाऊंडेशनद्वारे मराठी चित्रपट, दूरदर्शन आणि नाट्य क्षेत्रातील सन्मान म्हणून प्रदान केले जातात.

वर्ष नामांकित काम वर्ग निकाल संदर्भ
२००७ फाइनल ड्राफ्ट व्यावसायिक नाटकातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री जिंकला
२००९ जोगवा सर्वोत्तम अभिनेत्री जिंकला
२०१४ छापा काटा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री जिंकला
सर्वोत्कृष्ट नाटक जिंकला
२०१६ डबल सीट सर्वोत्कृष्ट अभिनेत्री नामांकित
२०१७ कोडमंत्र सर्वोत्कृष्ट नाटक जिंकला
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री जिंकला

इतर विशेष पुरस्कार

[संपादन]
साल चित्रपट/ नाटक पुरस्कार विभाग/ नामांकने निकाल
२००९ संगीत नाटक अकादमी पुरस्कार उस्ताद बिस्मिल्लाह खान युवा पुरस्कार विजयी[९०]
२०११ राजा परांजपे फेस्टिव्हल पुरस्कार तरुणाई सन्मान पुरस्कार विजयी[९१]
२०१२ ॲड फिझ विशेष उपलब्धी पुरस्कार विजयी
२०१४ आय.बी.एन. लोकमत उद्याची प्रेरणा पुरस्कार (नाटक आणि सिनेमा) विजयी[९२]
२०१६ महाराष्ट्र वन सावित्री सन्मान (सिनेमा) विजयी[९३]
छापा काटा लोकमत महाराष्ट्रियन ऑफ द ईयर नाटक विभाग विजयी[९४]
निळू फुले सन्मान २०१६ वर्षातील बुद्धिमान अभिनेत्री पुरस्कार विजयी[९५]
पु. ल. पुरस्कार तरुणाई सन्मान पुरस्कार विजयी[९६]
२०१७ कोडमंत्र लोकमत महाराष्ट्रियन ऑफ द इयर नाटक विभाग नामांकन[९७]
२०१८ लोकसत्ता तरुण तेजांकित कला / चित्रपट विभाग विजयी[९८]
२०१८ प्रियदर्शिनी अ‍ॅकॅडमी ग्लोबल पुरस्कार स्मिता पाटील पुरस्कार - सर्वोत्कृष्ट अभिनेत्री विजयी[९९]
२०२० सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी युवा गौरव पुरस्कार जिंकला.[१००]
२०२२ N/A झी गौरव पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेत्री २०००-२२ जिंकला.[१००]
  • आय.बी.एन. लोकमत या दूरचित्रवाणी वाहिनीचा प्रेरणा पुरस्कार : २०१४
  • ’आघात’साठी पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार:२०११
  • ’मुंबई-पुणे-मुंबई’साठी पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार:२०१०
  • संगीत नाटक अकादमी (नवी दिल्ली)चा नाट्यक्षेत्रासाठीचा उस्ताद बिस्मिल्लाखान युवा पुरस्कार:२००९
  • ’जोगवा’साठी महाराष्ट्र सरकारचा वर्षातील उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार:२००८-०९
  • कबड्डी-कबड्डीसारख्या मनोरंजक नाटकातील भूमिकेसाठीचा महाराष्ट्र सरकारचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार:२००६-०७
  • कबड्डी-कबड्डीसारख्या मनोरंजक नाटकातील भूमिकेसाठीचा महाराष्ट्र टाइम्सचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार:२००६-०७
  • कबड्डी-कबड्डीसारख्या मनोरंजक नाटकातील भूमिकेसाठीचा झी कंपनीचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार:२००६-०७ [१०१]
  • फायनल ड्राफ्टसारख्या मनोरंजक नाटकातील भूमिकेसाठीचा महाराष्ट्र टाइम्सचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार:२००५-०६
  • फायनल ड्राफ्टसारख्या मनोरंजक नाटकातील भूमिकेसाठीचा झी कंपनीचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार:२००५-०६
  • हम तो तेरे आशिक हैं सारख्या मनोरंजक नाटकातील भूमिकेसाठीचा महाराष्ट्र सरकारचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार:२००४-०५
  • फायनल ड्राफ्टसारख्या प्रायोगिक नाटकातील भूमिकेसाठी झी दूरचित्रवाणीचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री अल्फा गौरव अवॉर्ड:२००४-०५
  • ’चकवा’साठी, पदार्पणातच चमकणाऱ्या कलावंताला दिला जाणारा महाराष्ट्र सरकारचा २००४-०५चा पुरस्कार
  • ’देहभान’मधील उत्कृष्ट सहकलाकाराच्या भूमिकेसाठी झी दूरचित्रवाणीचा अल्फा गौरव पुरस्कार:२००२-०३
  • ’देहभान’मधील भूमिकेसाठी, पदार्पणातच चमकणाऱ्या कलावंताला ’झी’तर्फे दिला जाणारा अल्फा गौरव पुरस्कार:२००२-०३
  • ‘डबल सीट’ चित्रपटाला पाच पुरस्कार मिळाले.

संदर्भ व नोंदी

[संपादन]
  1. ^ भुते, वैशाली. "खास भेट : मुक्ता बर्वे". 2013-01-02 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ३० जुलै २०१० रोजी पाहिले.
  2. ^ "संग्रहित प्रत". 2016-10-21 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-11-30 रोजी पाहिले.
  3. ^ "मुक्ता बर्वे त्यांच्या ललित कला केंद्र येथिल शिक्षण व नाट्य शास्त्र पदवी बद्दलचे अनुभव व्यक्त करताना".
  4. ^ "मुक्तायन".
  5. ^ "परफॉर्मिंग आर्ट्‌स 'पदवी हळुूहळू आकार घेत आहे".
  6. ^ "बेभान करणारं.. देहभान!".
  7. ^ a b "मुक्ता बर्वे अधिकृत संकेतस्थळ". 2017-01-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-11-30 रोजी पाहिले.
  8. ^ "मुक्ता बर्वे आपली कार विकायचा विचार करीत आहेत का?".
  9. ^ "ठळक प्रयत्न: जोगवा".
  10. ^ "संगीत नाटक अकादमीने २००९ सलाची उस्ताद बिस्मिल्लाह खान युवा पुरस्कारांची घोषणा केली".
  11. ^ "रोमान्स".
  12. ^ "स्वप्निल आणि मुक्ता प्रखर अभिनय!".
  13. ^ a b "मुक्त संवाद. मुक्ता बर्वेशी!".
  14. ^ "मुक्ताला तरुणाई सन्मान पुरस्कार".
  15. ^ "पसंतीला 'आघात'". 2010-12-30 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-12-03 रोजी पाहिले.
  16. ^ "'स्वप्निल-मुक्ता' पुन्हा एकत्र".
  17. ^ "टीव्हीशी झाली आहे आभासी मैत्री".
  18. ^ "एका लग्नाची दुसरी गोष्ठ मिनी फिल्म म्हणून प्रसारित होणार".
  19. ^ "बदाम राणी गुलाम चोर चित्रपट पुनरावलोकन!".
  20. ^ "टोरंटोमधील चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी मुक्ता".
  21. ^ "मुक्ता निर्मितीतही". 2015-12-23 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-12-03 रोजी पाहिले.
  22. ^ "मुक्ता बर्वे ने रसिका जोशी यांच्या नावावर प्रॉडक्शन हाऊस सुरू केले".
  23. ^ "रंगमंच पुनरावलोकन: छापा कटा".
  24. ^ "रीनाने नाटकात नीनाची जागा घेतली".
  25. ^ "तबला वादक झाकीर हुसेन आणि शास्त्रीय गायन पंढरीनाथ कोल्हापुरे यांना मंगेशकर पुरस्कार".
  26. ^ "संस्कृती कलादर्पण पुरस्काराची नामांकने जाहीर".
  27. ^ "मुक्ता बर्वे आणि उमेश कामत यांची रॉम-कॉमची जोडी".
  28. ^ "लग्न पहावे करून - मराठी चित्रपट समीक्षा".
  29. ^ "'स्वप्निल-मुक्ता' पुन्हा एकत्र".
  30. ^ "मंगलाष्टक वन्स मोअर - मराठी चित्रपट समीक्षा". Unknown parameter |''''Bold text'दुवा= ignored (सहाय्य)
  31. ^ "रंग नवा.. तरल कवितानुभव".
  32. ^ "वर्ल्ड दूरचित्रवाणी प्रीमियर ऑफ डबल सीट".
  33. ^ "मायानगरीतील स्वप्नांच्या प्रवासाची गोष्ट 'डबल सीट'".
  34. ^ "डबल सीटसाठी मुक्ता बर्वेची वास्तविक जीवनाची प्रेरणा".
  35. ^ "डबल सीट मूव्ही पुनरावलोकन".
  36. ^ "संस्कृती कलादर्पण पुरस्कार नामांकने: अशोक सराफ यांना जीवनगौरव पुरस्कार, फेस ऑफ द इयर स्वप्नील जोशी". 2016-04-20 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-12-03 रोजी पाहिले.
  37. ^ "महाराष्ट्र राज्य फिल्म पुरस्कार".
  38. ^ "मराठी फिल्मफेअर पुरस्कारांमध्ये मुक्ता बर्वेने सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जिंकला".
  39. ^ "झी टॉकीजच्या 'महाराष्ट्राचा फेवरेट कोण २०१५' 'पुरस्काराने मोठ्या प्रमाणात यश मिळवले".
  40. ^ "झी चित्र गौरव पुरस्कारामध्ये 'कट्यार काळजात घुसली' ची बाजी; विजेत्यांची संपूर्ण यादी".
  41. ^ "हायवे चित्रपट हा अभिनेता आणि नॉन-अ‍ॅक्टर्सचा संगम आहे".
  42. ^ "हायवे चित्रपटचा आढावा: उमेश आणि गिरीश कुलकर्णी यांचा ताजा हा मराठी सिनेमा आणि एफटीआयआयचा विजय आहे".
  43. ^ "मुंबई-पुणे-मुंबई २ चित्रपट पुनरावलोकन".
  44. ^ a b "विनाकारण कोणत्याही चित्रपटाला हो म्हणत नाही."
  45. ^ "रिव्ह्यू : एका लग्नाची प्रॅक्टिकल गोष्ट".
  46. ^ "फिल्मफेअर मराठी: नामनिर्देशन जाहीर केले".
  47. ^ "गणवेश मूव्ही आढावा".
  48. ^ "'वायझेड'मध्ये मुक्ता बर्वेची एण्ट्री".
  49. ^ "वायझेड मूव्ही पुनरावलोकन".
  50. ^ url=http://www.megamarathi.com/marathi-movies/hrudayantar-marathi-movie/ Archived 2016-12-22 at the Wayback Machine.
  51. ^ url=http://www.marathimovieworld.com/news/shahrukh-khan-gives-clap-for-vikram-phadnis-marathi-film-hrudayantar.php
  52. ^ "Hrithik Roshan returns as Krrish in Hrudayantar but has no dialogues". 29 मे, 2017. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  53. ^ "समाजासाठी प्रेरणा ठरणाऱ्या 'त्या' बारा जणांचा 'लोकसत्ता तरुण तेजांकित' पुरस्काराने गौरव". Loksatta. 2021-10-01 रोजी पाहिले.
  54. ^ "'Mumbai Pune Mumbai 3' teaser: Swapnil Joshi and Mukta Barve's chemistry and humorous act promises a light-hearted affair - Times of India". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). 2021-10-01 रोजी पाहिले.
  55. ^ "'Mumbai-Pune-Mumbai 2': The Swapnil Joshi and Mukta Barve starrer clocks three - Times of India". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). 2021-10-01 रोजी पाहिले.
  56. ^ "'Wedding Cha Shinema': Mukta Barve kick-starts films promotions - Times of India". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). 2021-10-01 रोजी पाहिले.
  57. ^ "कर्तव्यदक्ष महिला तुरुंग अधिकार्‍याच्या भूमिकेत मुक्ता बर्वे". Loksatta. 2021-10-01 रोजी पाहिले.
  58. ^ "Bandishala's trailer focuses on women's issues - Times of India". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). 2021-10-01 रोजी पाहिले.
  59. ^ "Unreleased films strike gold at state film awards - Times of India". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). 2021-10-01 रोजी पाहिले.
  60. ^ "Vikram Phadnis's next with Mukta Barve to be titled 'Smile Please' - Times of India". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). 2021-10-01 रोजी पाहिले.
  61. ^ https://timesofindia.indiatimes.com/entertainment/marathi/movie-reviews/smile-please/movie-review/70292680.cms. Missing or empty |title= (सहाय्य)
  62. ^ "Theatre Workshop". Balranjan Kendra Pune (इंग्रजी भाषेत). 2015-10-06. 2021-10-01 रोजी पाहिले.
  63. ^ "Tea 4 Theatre - Online theatre workshop with Mukta Barve !! Link for registration bit.ly/SSMCMuktaBarve | Facebook". www.facebook.com (इंग्रजी भाषेत). 2021-10-01 रोजी पाहिले.
  64. ^ "Narrator - Mukta Barve - Storytel". www.storytel.com (इंग्रजी भाषेत). 2021-10-01 रोजी पाहिले.
  65. ^ "Ajunahi Barsaat Aahe". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2021-11-21.
  66. ^ "'अजूनही बरसात आहे', मुक्ता आणि उमेश झळकणार छोट्या पडद्यावर". Loksatta. 2021-10-01 रोजी पाहिले.
  67. ^ {{https://pipanews.com/mukta-barves-best-actress-award-at-zee-maha-gaurav-ceremony-zee-marathi-mahagaurav-awards-best-actress-award-mukta-barve/.}}
  68. ^ साचा:Https://www.cinestaan.com/reviews/y-the-film-49929
  69. ^ साचा:Https://www.news18.com/news/movies/mukta-barve-returns-to-stage-with-the-play-titled-priya-bhai-ek-kavita-havi-ahe-5335525.html
  70. ^ साचा:Https://india.postsen.com/entertainment/137633/Actress-mukta-barve-comeback-with-marathi-play-charchaughi-mhrn.html
  71. ^ url=http://www.dnaindia.com/entertainment/report-zee-gaurav-celebrates-100-years-of-indian-cinema-1658617
  72. ^ url=http://www.loksatta.com/vruthanta-news/swapnil-joshi-mukta-barve-brand-ambassador-of-suyog-group-5252/
  73. ^ url=http://www.loksatta.com/lokrang-news/vinay-apte-in-mukta-barves-memory-1048570/
  74. ^ url=http://www.loksatta.com/manoranjan-news/actor-vinay-apte-birth-anniversary-celebrated-616403/
  75. ^ url=http://www.loksatta.com/manoranjan-news/jhakkas-heroine-season-2-1129059/
  76. ^ url=http://www.loksatta.com/mumbai-news/marathi-actor-become-active-for-birds-save-1189699/
  77. ^ url=http://indianexpress.com/article/cities/mumbai/maharashtra-with-its-progressive-outlook-is-a-better-place-for-women/
  78. ^ url=https://www.youtube.com/watch?v=ovxk6BaEoQE
  79. ^ url=http://www.loksatta.com/ls-diwali2015-news/poem-7-1196994/
  80. ^ url=https://twitter.com/ColorsMarathi/status/758668154008637440
  81. ^ a b url=https://www.youtube.com/watch?v=WwnEnL0H8dE&t=4830s
  82. ^ url=http://timesofindia.indiatimes.com/city/pune/Pu-La-awards-for-Ameen-Sayani-Mirasdar/articleshow/55320773.cms
  83. ^ url=http://www.loksatta.com/manoranjan-news/lovebirds-marathi-drama-1103671/
  84. ^ url=http://marathicineyug.com/theatre/news/1298-mukta-barve-s-marathi-play-code-मंत्र-opens-from-18-june-2016[permanent dead link]
  85. ^ url=http://sakaaltimes.com/NewsDetails.aspx?NewsId=5461738112727328060&SectionId=5131376722999570563&SectionName=Features&NewsTitle=A%20real%20%E2%80%98live%E2%80%99%20theatrical%20experience[permanent dead link]
  86. ^ url=https://www.youtube.com/watch?v=g0h95nb5lY0
  87. ^ url=http://marathicineyug.com/theatre/news/1770-mukta-barve-produced-new-marathi-play-deepstambh-muhurat-held Archived 2016-12-30 at the Wayback Machine.
  88. ^ url=http://www.loksatta.com/manoranjan-news/mukta-barve-lalitkala-kendra-revive-classic-marathi-play-sakharam-binder-for-a-cause-1395292/
  89. ^ url=http://marathicineyug.com/theatre/news/2224-mukta-barve-lalitkala-kendra-revive-classic-marathi-play-sakharam-binder-for-a-cause Archived 2017-01-31 at the Wayback Machine.
  90. ^ Special Correspondent. "Sangeet Natak Akademi announces Ustad Bismillah Khan Yuva Puraskars for 2009". The Hindu. 30 October 2015 रोजी पाहिले.
  91. ^ "Raja Paranjape festival kicks off in Pune". dna. 17 April 2011. 30 October 2015 रोजी पाहिले.
  92. ^ "News: IBN-Lokmat presents Prerna Awards 2014". Free Press Release.
  93. ^ "महाराष्ट्र1 felecitating Mukta Barve". Twitter. 9 March 2016 रोजी पाहिले.
  94. ^ "Lokmat Maharashtrian Of The Year 2016". Lokmat. 1 April 2016. 30 April 2016 रोजी पाहिले.
  95. ^ "Nilu Phule Sanman 2016". Twitter. 28 July 2016. 29 July 2016 रोजी पाहिले.
  96. ^ "Pu La awards for Ameen Sayani, Mirasdar - Times of India". 17 November 2016 रोजी पाहिले.
  97. ^ "लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर - २०१७,". lmoty.lokmat.com. 13 May 2017 रोजी पाहिले.
  98. ^ "समाजासाठी प्रेरणा ठरणाऱ्या 'त्या' बारा जणांचा 'लोकसत्ता तरुण तेजांकित' पुरस्काराने गौरव". 31 March 2018. 16 November 2018 रोजी पाहिले.
  99. ^ Lokmat (12 December 2018). "मुक्ता बर्वेला 'स्वर्गीय स्मिता पाटील स्मृती पुरस्कार २०१८'जाहीर". Lokmat. 17 December 2018 रोजी पाहिले.
  100. ^ a b "Mukta barve zee gaurav". Loksatta (Marathi भाषेत). 21 March 2022. 2021-10-01 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  101. ^ "मराठी अ‍ॅक्ट्रेस मुक्ता बर्वेज् अवॉर्ड्‌ज" (इंग्लिश भाषेत). ३० जुलै, इ.स. २०१० रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)[permanent dead link]

बाह्य दुवे

[संपादन]