मुक्ता बर्वे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
मुक्ता बर्वे
मुक्ता बर्वे
जन्म मुक्ता वसंत बर्वे
१७ मे, १९८१ (1981-05-17) (वय: ४०)
सातारा, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारत भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय, निर्मिती
कारकीर्दीचा काळ २००० पासून
भाषा मराठी
प्रमुख नाटके देहभान, फायनल ड्रॅफ्ट, कबड्डी कबड्डी, छापा काटा, कोडमंत्र
प्रमुख चित्रपट जोगवा, मुंबई-पुणे-मुंबई भाग १/२/३, डबलसीट
प्रमुख टीव्ही कार्यक्रम एका लग्नाची दुसरी गोष्ट
वडील वसंत बर्वे
आई विजया बर्वे

मुक्ता बर्वे (जन्म: १७ मे १९८१) मुक्ता बर्वे या मराठी नाट्य आणि चित्रपट सृष्ंटीतील एक नावाजलेल्या आणि यशस्वी अभिनेत्री आहेत. अभ्यासू, स्वतंत्र विचारांची आणि मेहनती अभिनेत्री म्हणून मुक्ता बर्वे मराठी नाट्य आणि चित्रपट सृष्टींत ओळखल्या जातात.

त्या मूळच्या पुण्याजवळील चिंचवड गावच्या आहेत. वडील वसंत बर्वे आणि आई शिक्षिका व नाट्यलेखिका विजया बर्वे. रंगभूमीवरील मुक्ताची सुरुवात बालपणापासून झाली. मुक्ताने अवघी चार वर्षाची असताना आईच्या ‘रुसू नका फुगू नका’ या नाटकात काम केले आणि त्यानंतर १५ व्या वर्षी नाट्यस्पर्धेच्या निमित्ताने रत्‍नाकर मतकरींच्या ‘घर तिघांचे हवे’ या नाटकात भूमिका केली. मुक्ता बर्वे प्रामुख्याने मराठी भाषिक चित्रपट, नाटके आणि दूरचित्रवाणी मालिकांमध्ये कामे करतात. २००० साली व्यावसायिक कारकिर्दीस सुरुवात केलेल्या मुक्ताने काही हिंदी चित्रपटांतूनही अभिनय केला आहे. तिने पुणे विद्यापीठातून (ललित कला केंद्र) नाट्यशास्त्राची पदवी मिळवली आहे.

अनेक गाजलेल्या नाटक, मालिका आणि चित्रपटातून मुक्ताने आपल्या सशक्त अभिनयाचे दर्शन घडवले आहे. यासाठी अनेक पुरस्कारांनी तिला गौरविण्यात आले आहे. जोगवा ह्या २००९ सालच्या मराठी चित्रपटामधील भूमिकेसाठी मुक्ताचे कौतुक झाले व तिला ह्यासाठी काही पुरस्कार देखील मिळाले.[१] २०१२ मध्ये झी मराठी प्रदर्शित झालेल्या एका लग्नाची दुसरी गोष्ट या मालिकेत राधा देसाई ही मध्यवर्ती भूमिका मुक्ता बर्वेने केली होती.

आपल्या वैविध्यपूर्ण आणि सहज अभिनयाने मुक्ताने रसिकांच्या मनात प्रेमाचे स्थान मिळवले आहे. टेलिव्हिजन, सिनेमा आणि नाटक अश्या तिन्ही माध्यमांवर जबरदस्त पकड असणा‍‍‍र्‍या अत्यंत मोजक्या अभिनेत्यांमध्ये मुक्ताचे स्थान अग्रक्रमावर आहे.

शिक्षण आणि कौटुंबिक पार्श्वभूमी[संपादन]

पुण्याजवळच्या चिंचवड येथे मुक्ताचा १९८१ साली जन्म झाला. वडील श्री वसंत बर्वे टेल्को कंपनीत नोकरी करत होते. आई विजया बर्वे या शिक्षिका तसेच नाट्यलेखिका होत्या [२]. मोठा भाऊ देबू बर्वे कमर्शियल आर्टिस्ट आहे तसेच त्याने लहानपणी काही चित्रपटातून भूमिका केल्या आहेत. मुक्तावर कलेचे संस्कार लहानपणापासून घरातूनच होत होते. मूळचा लाजाळू आणि बुजरा स्वभाव कमी व्हावा यासाठी मुक्ताच्या आई विजया बर्वे यांनी "रुसू नका फुगू नका" हे बालनाट्य लिहिले, यात भित्रा ससा आणि परी राणी अश्या दुहेरी भूमिका मुक्ताने साकारल्या. अश्या पद्धतीने वयाच्या चौथ्या वर्षी मुक्ताचे रंगभूमीवर पदार्पण झाले. दहावीच्या परीक्षेनंतर "घर तिघांचे हवे" या रत्‍नाकर मतकरी लिखित नाटकात मुक्ताने भूमिका साकारली. या नंतर नाटकाविषयी ओढ निर्माण झाल्याने त्यात कारकीर्द करायचे ठरविले. इयत्ता ११ आणि १२ वीचे शिक्षण सर परशुराम भाऊ कॉलेज पुणे येथे घेतले. यानंतर ललित कला केंद्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे नाट्य शास्त्र विषयात पदवी घेतली [३]. नाट्यशास्त्रातील पदवी प्राप्त केल्यावर लगेच मुक्ता मुंबईत आल्या. २००० सालापासून त्या मुंबईत वास्तव्यास आहेत [४].

अभिनयातील कारकीर्द [संपादन]

१९९९ ते २००७ : नाटक, मालिका आणि चित्रपटात पदार्पण [संपादन]

इ. १० वी च्या परीक्षेनंतर, टेल्को कंपनीसाठी स्पर्धेसाठी बसवलेल्या, रत्‍नाकर मतकरी लिखित "घर तिघांचे हवे" या नाटकातून मुक्ताने भूमिका साकारली. १९९८ साली  "घडलंय बिघडलंय" या मालिकेतून मुक्ताने टेलिव्हिजन वरील पदार्पण केले. खेडवळ अश्या चंपाची भूमिका तिने साकारली. ती रसिकांना खूप आवडली. त्यानंतर पिंपळपान (१९९८), बंधन (१९९८), बुवा आला (१९९९), चित्त चोर (१९९९), मी एक बंडू (१९९९), आभाळमाया (१९९९), श्रीयुत गंगाधर टिपरे (२००१) आणि इंद्रधनुष्य (२००३) या मालिकांमधून मुक्ताने छोट्या भूमिका साकारल्या [५]. २००१ मध्ये सुयोगच्या "आम्हाला वेगळे व्हायचंय" या नाटकातून तिला व्यावसायिक नाटकात काम करण्याची पहिली संधी चालून आली.

२००४ साली, "चकवा" या चित्रपटातून मुक्ताने मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. चकवा चित्रपटातील भूमिकेसाठी महाराष्ट्र राज्य शासनाचा उत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेत्री पुरस्कार मिळाला. २००५ मध्ये अमोल पालेकरांच्या "थांग" या मराठी आणि इंग्रजी द्वैभाषिक सिनेमात मुक्ताची छोटी भूमिका होती. याच वर्षी "देहभान" आणि "फायनल ड्राफ्ट" या दोन व्यावसायिक नाटकांमधून मुक्ताने काम केले [६]. "फायनल ड्राफ्ट" मधील विद्यार्थिनीच्या भूमिकेचे खूप कौतुक झाले. २००५ साली, देहभान साठी उत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेत्री आणि उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री चा अल्फा गौरव चा पुरस्कार मुक्ताला मिळाला. प्रायोगिक नाटकासाठीचा उत्कृष्ट अभिनेत्री चा अल्फा गौरव २००५ चा पुरस्कार मुक्ता बर्वे यांना 'फायनल ड्राफ्ट' साठी मिळाला. २००६चा महाराष्ट्र टाइम्स पुरस्कार आणि २००८चा झी गौरव पुरस्कार यांनी मुक्ताला सन्मानित केले गेले.[७].

यापुढे शेवरी (२००६), ब्लाइंड गेम (२००६) आणि मातीमाय (२००६) या चित्रपटातून मुक्ताने छोट्या भूमिका साकारल्या. त्याच वर्षी टेलिव्हिजनवरील अग्निशिखा या मालिकेतून मध्यवर्ती भूमिका साकारली.

२००६ साली "हम तो तेरे आशिक है" या व्यावसायिक नाटकात रुकसाना साहिल या मुस्लिम मुलीची प्रमुख भूमिका साकारली. या नाटकात रुकसाना, अनिल प्रधान (जितेंद्र जोशी) या हिंदू मुलाच्या प्रेमात पडते आणि ते लग्न करतात अशी कथा आहे. नाटकातील मुक्ताच्या या भूमिकेचे भरभरून कौतुक झाले. या साठी महाराष्ट्र शासनाच्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्काराने मुक्ताला सन्मानित करण्यात आले.

२००७ साली सावर रे या चित्रपटात मुक्ता याच नावाने भूमिका साकारली. पुढे जितेंद्र पाटील यांच्या "कबड्डी कबड्डी" या व्यावसायिक नाटकात कबड्डीपटूची भूमिका साकारली. या नाटकात एका कबड्डीपटूची खेळाविषयीची महत्त्वाकांक्षा आणि तिच्या वडिलांचा तिला अमेरिकेला स्थायिक होण्याचा आग्रह यातील संघर्ष समर्थपणे दाखविला आहे. मुक्ताची कबड्डीपटूची भूमिका आणि विनय आपटेंनी साकारलेली तिच्या वडिलांची भूमिका समीक्षकांना आणि रसिकांना खूप आवडली. या भूमिकेसाठी मुक्ताला २००७ सालच्या राज्य सरकारच्या तसेच महाराष्ट्र टाइम्स पुरस्काराने आणि २००८ साली झी गौरव सर्वोत्कृष्ठ अभिनेत्री या पुरस्काराने गौरविले [७].

मुंबई-पुणे-मुंबई मधील मुक्ता 

२००८ ते २०११: जोगवा आणि मुंबई- पुणे- मुंबईचे यश[संपादन]

२००८ साली "दे धक्का" या मराठी आणि "सास बहू और सेन्सेक्स" या हिंदी चित्रपटातून मुक्ताने छोट्या भूमिका साकारल्या.

२००९ साली "एक डाव धोबीपछाड" आणि "सुंबरान" या मराठी चित्रपटातून साहाय्यक अभिनेत्री म्हणून भूमिका साकारल्या. त्यानंतर राजीव पाटील दिग्दर्शित, २००९ सालच्या "जोगवा" या चित्रपटाने मुक्ताला चित्रपटातील घवघवीत यश मिळवून दिले [८] तायप्पा (उपेंद्र लिमये) आणि सुली (मुक्ता बर्वे) यांच्या प्रेमकथेने रसिकांच्या काळजाचा ठाव घेतला. महाराष्ट्रातील आणि कर्नाटकातील जोगते आणि जोगतिणींच्या दुःखद जीवनावर प्रकाश टाकणाऱ्या या चित्रपटाने २००८ सालच्या राष्ट्रीय पुरस्कारांवर मोहोर उमटवली. मुक्ताने साकारलेली सुलीची भूमिका तिच्या कारकिर्दीतला महत्त्वाचा टप्पा म्हणून मानली जाते [९]. या चित्रपटासाठी फोटो, लेख आणि प्रत्यक्ष जोगतिणींच्या आयुष्याचे जवळून निरीक्षण करून मुक्ताने या भूमिकेचा अभ्यास केला. अत्यंत बोलक्या डोळ्यांचे वरदान लाभलेल्या मुक्ताने अनेक प्रसंगांमध्ये केवळ डोळ्यांच्या भाषेतून प्रेम, दुःख, संघर्ष ​ या भावना अत्यंत सशक्तपणे चितारल्या आहेत. या भूमिकेसाठी मुक्ताला २००९ सालच्या राज्य शासनाच्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्काराने गौरविले गेले. २००९ सालच्या संगीत नाटक अकादमी च्या "उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्काराने" मुक्ताला गौरविण्यात आले [१०].

२०१० साली थॅंक्स मा या हिंदी चित्रपटात लक्ष्मी नावाच्या वेश्येची भूमिका साकारली. "जोगवा" नंतर २०१० साली प्रदर्शित झालेल्या सतीश राजवाडे दिग्दर्शित मुंबई-पुणे-मुंबई चित्रपटाने पुन्हा एकदा मुक्ताला घवघवीत यश मिळवून दिले. या चित्रपटातून मुक्ता बर्वे आणि स्वप्निल जोशी यांची सुपरहिट जोडी मराठी चित्रपट सृष्टीला लाभली.[११] मुंबईची मुलगी लग्नासाठी मुलाला पाहायला पुण्याला येते आणि एका दिवसाच्या त्यांच्या भेटीत ते एकमेकांच्या प्रेमात पडतात अशी या चित्रपटाची कथा रसिकांना खूपच भावली. मुक्ता आणि स्वप्निलच्या अत्यंत सहज अभिनयाने आणि दोन्ही शहरांच्या स्वभाव वैशिष्ट्यांचे अचूक चित्रण केल्याने हा चित्रपट व्यावसायिक पातळीवर खूप यशस्वी ठरला. मुक्ता आणि स्वप्निलची जोडी रसिकांना इतकी आवडली की त्याची तुलना शाहरूख आणि काजोलच्या जोडीशी केली जाते.[१२]

शहरी मुलीची भूमिका असो किंवा खेडवळ बाजाची व्यक्तिरेखा असो, मुक्ता जेव्हा अभिनयास उभी राहते तेव्हा ते पात्र जिवंत करते असा रसिकांचा अनुभव आहे. २०१० साली आलेल्या टेलिव्हिजनवरील "अग्निहोत्र" मालिकेतली "मंजुळा श्रीपाद अग्निहोत्री" ही भूमिकासुद्धा मुक्ताने अशीच समर्थपणे रेखाटली.[१३].२०१० साली, विक्रम गोखले दिग्दर्शित "आघात" या चित्रपटातील डॉ. स्मिता देशमुख ही भूमिकासुद्धा लक्षवेधी ठरली. यासाठी मुक्ताला, पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार (२०११) मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.

राजा परांजपे फिल्म फेस्टिव्हल २०११मध्ये मराठी चित्रपट सृष्टीतील योगदानाबद्दल तरुणाई सन्मानाने मुक्ताला गौरविण्यात आले.[१४][१५]

२०१२ ते २०१४ : एका लग्नाची दुसरी गोष्ट आणि इतर नाटक व चित्रपट[संपादन]

२०१२ साली झी मराठी वरील, सतीश राजवाडे दिग्दर्शित "एका लग्नाची दुसरी गोष्ट" या मालिकेतून पुन्हा एकदा मुक्ता बर्वे आणि स्वप्निल जोशी यांची जोडी रसिकांच्या भेटीला आली.[१६] एका जाहिरात कंपनीत काम करणारी राधा महेश देसाई (मुक्ता बर्वे) आणि सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेला घनःश्याम काळे (स्वप्निल जोशी) घरच्यांच्या दबावाला कंटाळून कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करतात आणि शेवटी खरोखरीच एकमेकांच्या प्रेमात पडतात अशी या मालिकेची कथा रसिकांना वर्षभर खिळवून ठेवण्यात यशस्वी ठरली.[१७][१८] मुक्ताने साकारलेले राधाचे पात्र आणि दोघांची प्रेमकहाणी रसिकांनी अक्षरशः उचलुन धरली.[१३] केवळ हाय TRP नाही तर झी मराठीच्या इतिहासातील सुवर्णपान या शब्दात या मालिकेचा गौरव केला गेला.

माकडाच्या हाती शॅम्पेन या नाटकाचे २०१२ साली "बदाम राणी गुलाम चोर" या चित्रपटात रूपांतर केले. सतीश राजवाडे दिग्दर्शित या चित्रपटात मुक्ताने उपेंद्र लिमये, पुष्कर श्रोत्री आणि आनंद इंगळे यांच्या बरोबर काम केले. यातील मुक्ताने साकारलेले पेन्सिल नावाचे पात्र खूप आवडले. टाइम्स ऑफ इंडियाने मुक्ताच्या अभिनयाचा "मुक्ताने पेन्सिलचे पात्र चोखपणे वठविले आहे!" या शब्दात गौरव केला.[१९]

२०१३ साली, मुक्ता ने गिरीश जोशी यांच्या बरोबर टोरांटोमध्ये प्रसिद्ध अशा फायनल ड्रॅफ्ट या नाटकाचा प्रयोग सादर केला.[२०]

२०१३ साल मुक्तासाठी अत्यंत महत्त्वाचे आणि यशस्वी वर्ष होते. या वर्षी आपल्या "रसिका प्रॉडक्शन्स" ( रसिका जोशी या प्रसिद्ध अभिनेत्री मैत्रिणीस स्मरणात ठेवून ) या कंपनीद्वारे मुक्ताने नाट्य निर्मितीत प्रवेश केला.[२१][२२] इरावती कर्णिकलिखित आणि समीर विद्वंस दिग्दर्शित "छापा काटा" या नव्या नाटकात मुक्ताने मैत्रेयी भागवत या आजच्या काळातील मुलीचे तिच्या आईशी असलेले नातेसंबंध दाखवणारे पात्र साकारले.[२३] यात काही प्रयोगांसाठी मैत्रयी भागवतच्या आईची भूमिका रीमा लागू आणि नंतर नीना कुलकर्णी यांनी साकारली.[२४] जिला चांगले जगण्याची आस आहे आणि ती ते नाकारत नाही, त्यासाठी ती धडपडते आहे एक अशी मुलगी आणि जिला एकटेपणाची भीती आहे, मुलीची काळजी आहे आणि प्रेमापोटी तिला बांधून ठेवण्यासाठी आटपिटा करते आहे, एक अशी आई, अशा आई- मुलीच्या नात्याची गोष्ट अत्यंत समर्थपणे दाखवणारे नाटक रसिकांना खूप आवडले. या नाटकासाठी मुक्ता बर्वे आणि सहनिर्माते श्री. दिनेश पेडणेकर यांना दिनानाथ मंगेशकर पुरस्कार (२०१४चा सर्वोत्कृष्ट नाटकाचा पुरस्कार) लता मंगेशकर यांच्या हस्ते मिळाला.[२५][२६]

२०१३ साली अजय नाईक यांच्या दिग्दर्शनातील पदार्पणातील "लग्न पहावे करून" या चित्रपटात उमेश कामत बरोबर प्रेमकथा साकारली.[२७] वधुवर सूचक मंडळ स्थापन केलेल्या अदिती टिळक या मुलीची भूमिका मुक्ताने अत्यंत समर्पकरीत्या साकारली. इंडियन नर्व ने तिच्या कामाचे कौतुक पुढील शब्दात केले आहे, "कामगिरीनुसार, मुक्ता एक दृढ आणि निश्चयी आदिती म्हणून आहे. तिला अपयशी होण्याची भीती असते. हे त्यातले सर्वोत्कृष्ट पात्र आहे. तिने ही भूमिका अगदी चोखपणे निभावली.[२८]०१३ मध्ये रेणू देसाई निर्मित "मंगलाष्टक वन्स मोअर" या चित्रपटातून मुक्ता बर्वे आणि स्वप्निल जोशी यांची जोडी पाहायला मिळाली.[२९] लग्नानंतर ​नवऱ्याच्या भोवती आयुष्य विणून स्वतःला विसरलेली आरती पाठक या अत्यंत भाबड्या आणि हळव्या मुलीचे चित्रण मुक्ताने अतिशय उत्तमरीत्या साकारले. द टाईम्स ऑफ इंडिया ने तिच्या अभिनयाचे वर्णन पुढील शब्दात केले "मुक्ता तिच्या कॉमिक टाइमिंग आणि संवाद वितरणासह उत्कृष्ट आहे".[३०]

२०१४ मध्ये मुक्ताने कवितांवर आधारित "रंग नवा" या कार्यक्रमाची निर्मिती केली. या मध्ये संगीतकार मिलिंद जोशी यांच्याबरोबर "ज्ञात कवींच्या अज्ञात कविता" या विषयावरील आणि स्वतः लिहिलेल्या काही कविता सादर केल्या.[३१]

२०१४ साली रत्‍नाकर मतकरी लिखित "शॉट" या कथेवरुन चित्रित केलेल्या शॉर्ट फिल्ममध्ये मुक्ताने श्रुती हे पात्र साकारले. मुक्ता बर्वे आणि सुप्रिया मतकरी यांच्या भूमिका असलेली ही शॉर्ट फिल्म अनेक चित्रपट महोत्सवांतून दाखवली गेली.

२०१५-१६ : ‘डबलसीट’चे यश आणि पुढील प्रवास[संपादन]

२०१५ साली मुक्ताचे अत्यंत महत्त्वाचे चित्रपट प्रदर्शित झाले. यातील समीर विद्वंस दिग्दर्शित "डबलसीट" या चित्रपटात तिने अंकुश चौधरी बरोबर प्रथमच चित्रपटात काम केले.[३२] रोहा सारख्या कोकणातील गावातून अमित नाईकशी (अंकुश चौधरी) लग्न झाल्यावर मुंबईत आलेल्या मंजिरीचे पात्र मुक्ताने रेखाटले.[३३][३४] मध्यम वर्गीय नवऱ्याबरोबर चांगले आयुष्य जगण्याची आस असलेली, स्वप्ने पहायला न डगमगणारी आणि त्यासाठी प्रामाणिकपणे कष्ट करायला तयार असलेली मंजिरी मुक्ताने जिवंत केली. टाइम्स ऑफ इंडियाने मुक्ताचे या शब्दांत कौतुक केले "Mukta, who too makes a return after two years, is brilliant as ever as the strong-willed, caring and accommodative wife".[३५] मंजिरीच्या डोळ्यातला आशावाद, आत्मविश्वास आणि निरागसता मुक्ताने रसिकांच्या मनात आपल्या अभिनयातून पोहोचवला. आपण सहज आणि नैसर्गिक अभिनयाच्या साम्राज्ञी आहोत हे या चित्रपटातून मुक्ताने पुन्हा एकदा सिद्ध केले.

तिच्या ‘डबलसीट’ मधील कामासाठी तिला २०१५ आणि २०१६ सालात अनेकोत्तम पुरस्कार मिळाले. संस्कृती कलादर्पण २०१६मध्ये तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठीचे नामांकन होते [३६] तर महाराष्ट्राचा फेवरेट कोण २०१५, झी चित्र गौरव पुरस्कार २०१६, महाराष्ट्र राज्य शासनाचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री २०१६[३७], मराठी फिल्मफेअर २०१६ [३८] या पुरस्कारांनी गौरविले गेले.[३९][४०]

मुंबई पुणे मुंबई-२ च्या ट्रेलर लॉंच सोहळ्यास मुक्ता आणि स्वप्निल ची उपस्थिती

२०१५ मध्येच, अमित त्रिवेदीच्या "हायवे- एक सेल्फी आरपार" या चित्रपटात इतर अनेक दिग्गज कलाकारांबरोबर (रेणुका शहाणे, टिस्का चोप्रा, गिरीश कुलकर्णी, विद्याधर जोशी) मुक्ताने काम केले. तमासगीर तरुणीची भूमिका मुक्ताने अत्यंत सहजपणे साकारली.[४१][४२]

नोव्हेंबर २०१५ मध्ये बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित अशा ‘मुंबई-पुणे-मुंबई’च्या भाग दोनमध्ये मुक्ता बर्वे आणि स्वप्निल जोशी ही जोडी पुन्हा एकदा रसिकांना पाहायला मिळाली.[४३][४४] पहिल्या भागातील तिची (मुंबई म्हणजे गौरी देशपांडे) आणि स्वप्निलची ( पुणे म्हणजे गौतम देशपांडे) प्रेमकथा पुढे सरकलेली पाहायला मिळाली. काहीशा गोंधळलेल्या मनस्थितीतली आणि लग्नाला होकार देण्यासाठी चाचरत असलेल्या गौरीची मुक्ताने साकारलेली भूमिका समीक्षकांना आणि रसिकांना खूप आवडली.[४५] या कथेवर पुढे चित्रपट निघाला. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने चाणगली कमाई केली.मुंबई- पुणे- मुंबई २ मधल्या कामासाठी मुक्ताला मराठी फिल्मफेअर २०१६ पुरस्काराचे सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे नामांकन मुक्ताला होते.[४६]

२०१६ मध्ये, अतुल जगदाळे दिग्दर्शित "गणवेश" या चित्रपटात किशोर कदम, दिलीप प्रभावळकर, स्मिता तांबे, गुरू ठाकूर यांच्या बरोबर काम केले.[४४] खाकी वर्दीमधल्या कर्तव्यकठोर पण मनातून माणूसपण न हरवलेल्या मीरा पाटील या पोलीस इन्स्पेक्टरची भूमिका मुक्ताने केली. टाइम्स ऑफ इंडिया ने तिच्या ‘गणवेश’मधील कामाबद्दल पुढीलप्रमाणे लिहिले "Barve (who is an absolute pleasure to watch) delivers her usual balanced performance.[४७]

ऑगस्ट २०१६ मध्ये मुक्ताने समीर विद्वंस दिग्दर्शित YZ या चित्रपटात सायली ही छोटी भूमिका साकारली.[४८] या चित्रपटात तिच्याबरोबर सागर देशमुख, अक्षय टांकसाळे, पर्ण पेठे आणि सई ताम्हणकर यांच्या प्रमुख भूमिका होत्या. भूमिकेची लांबी किती आहे हे महत्त्वाचे नसून तेवढ्या छोट्या भूमिकेत सुद्धा पात्र किती समर्थपणे साकार करता येते याचा प्रत्यय मुक्ताच्या अभिनयातून नेहमीच मिळतो. टाइम्स ऑफ इंडिया तिच्या YZ मधील भूमिकेविषयी " In a small role too, Mukta drives the point home with her expressions." असे वर्णन केले.[४९]

२०१७: हृदयांतर : एक महत्त्वाचा टप्पा [संपादन]

२०१७ मध्ये, मुक्ता, सुबोध भावे बरोबर "हृदयांतर" या चित्रपटातून समायरा जोशी या मुख्य भूमिकेत झळकल्या.[५०] फॅशन डिझायनर विक्रम फडणीस यांच्या दिग्दर्शनातील पदार्पणातल्या या चित्रपटाच्या मुहूर्ताचा शॉट शाहरुख खानच्या हस्ते झाला.[५१] हृदयांतर चित्रपटाचा ट्रेलर लॉंच हृतिक रोशन च्या हस्ते झाला.[५२]

ऑगस्ट २०१७ पासून झी युवा वाहिनीवर प्रदर्शित झालेल्या रुद्रम मालिकेत मुक्ताची प्रमुख भूमिका आहे. अन्यायाविरुद्ध प्रतिशोध घेणाऱ्या रागिणी देसाईची भूमिका मुक्ता करते आहे. या मालिकेत तिच्याबरोबर या मालिकेत मोहन आगाशे, वंदना गुप्ते, सतीश राजवाडे, संदीप पाठक, किरण करमरकर इ. दिग्गज कलाकार तिच्याबरोबर काम करीत होते. भय आणि रहस्यमय कथानक असलेली ही मालिका प्रेक्षकांना खूप आवडली. 

नाट्यनिर्मिती, इतर भूमिका, कार्य आणि पुरस्कार [संपादन]

हृदयांतर चित्रपटाच्या ट्रेलर लॉंच सोहळ्यातील मुक्ताची प्रसन्न मुद्रा

नाटक, सिनेमा आणि मालिकांबरोबर मुक्ताचे अन्य कार्यसुद्धा महत्त्वाचे आहे. २०१० मध्ये मुक्ताने "आम्ही मराठी पोरं हुशार" या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, तर २०१२च्या झी मराठी गौरव पुरस्काराचे सूत्रसंचालन स्वप्निल जोशीं रोबर केले.[५३] २०१२ मध्ये सुयोग ग्रुपची मुक्ता स्वप्निलबरोबर ब्रॅंड ॲंबेसिडर होती.[५४] ७ डिसेंबर २०१४ मध्ये विनय आपटेंच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त मुक्ताने लोकसत्तामध्ये विनय आपटेंच्या काही आठवणी लिहिल्या.[५५] तसेच विनय एक वादळ या कार्यक्रमात कबड्डी कबड्डी या नाटकातील तिचा विनय आपटेंबरोबरचा प्रवेश सादर केला.[५६] ९X झकास हिरोईन सीझन २ मध्ये मुक्ताने स्पर्धेचे परीक्षकपद भूषविले.[५७]

मुक्ताचे प्राणिप्रेमदेखील सर्वश्रुत आहे. २०१५ मध्ये इतर कलाकारांबरोबर मुक्ताने अ‍ॅनिमल्स मॅटर या NGO च्या "पक्षी वाचवा" उपक्रमात भाग घेतला.[५८] आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त लोकसत्ता वृत्तपत्राने भरवलेल्या "कर्ती करविती" या दोन दिवसाच्या चर्चासत्राचे उद‌घाटन करण्याचा मान मुक्ता बर्वे यांना मिळाला.[५९] उदघाटनाच्या भाषणातील मुक्ताने प्रकट केलेले विचार तिच्या प्रगल्भ व्यक्तिमत्त्वाची साक्ष देतात.[६०][६१]

२०१६ मध्ये लोकमत महाराष्ट्रियन ऑफ द इयर (मराठी थिएटर मधील मुक्ताच्या कार्यासाठी) आणि जुलै २०१६ मध्ये निळू फुले चतुरस्र अभिनेत्री पुरस्काराने मुक्ताला गौरविले गेले.[६२]

महाराष्ट्र वन चॅनेलच्या महिलादिन विशेष "सावित्री सन्मान २०१६" सोहळ्यात मुक्ताला तिच्या सिनेक्षेत्रातील योगदानाबद्दल पुरस्कराने गौरविले गेले.[६३] मुक्ताचा सन्मान करताना श्री. वामन केंद्रे यांनी "Mukta is most talented girl around us. मुक्ता महाराष्ट्राला, भक्ती बर्वेनंतर पडलेलं स्वप्न आहे" या शब्दात गौरविले.[६३]

नोव्हेंबर २०१६ मध्ये पुलोत्सव २०१६ तर्फे मुक्ताचा तरुणाई सन्मान पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.[६४]

कोडमंत्र नाटकात वकिलाच्या भूमिकेत मुक्ता

मुक्ताने व्यावसायिक रंगभूमीवर मोजक्या नाटकांत कामे करून रंगभूमीवरील आपले अस्तित्व कायम ठेवले. २०१५ आणि १६ मध्ये तिने काही नाटकांची निर्मिती केली. २०१५ साली संस्पेंस थ्रिलर प्रकारातील लव्हबर्ड्‌स मध्ये काहीशी नकारात्मक छटा असलेली देविका तिने साकारली.[६५] २०१५ मध्ये रत्‍नाकर मतकरी लिखित "इंदिरा" या नाटकाची निर्मिती केली. 

२०१६ मध्ये, भारतीय सैन्याच्या पार्श्वभूमीवरचे "कोडमंत्र" हे नाटक मुक्ताने रंगभूमीवर आणले. या नाटकातील सैनिकी कायदातज्ज्ञ अहिल्या देशमुखचे पात्र मुक्ताने साकारले.[६६] त्याचे प्रयोग सुरू असतानाच या नाटकावर आधारित एका पुस्तकाची निर्मिती करावी, असा विचार तिच्या मनात आला व तिने ‘कोडमंत्र’ या नावानेच एक पुस्तक तयार केले. नुकत्याच झालेल्या नाटकाच्या दीडशेव्या प्रयोगाला त्याचे प्रकाशन करण्यात आले. सैनिकांच्या आयुष्यावरील ‘कोडमंत्र’ या नाटकाच्या टीमने या नाटकावर आधारलेल्या पुस्तकाच्या विक्रीतून जमा झालेली रक्कम सैनिक कल्याण निधीला देण्यात येत आहेत. सुरुवातीला मुक्ता बर्वे अणि तिच्या टीमने ५१००० रुपये महाराष्ट्र राज्याच्या सैनिक कल्याण निधीसाठी दिले आहेत. ’कोडमंत्र’च्या सुरुवातीला एक हजार प्रती छापण्यात आल्या. काही महिन्यांतच त्याची पहिली आवृत्ती संपली. ‘अ फ्यू गुड मेन’ या इंग्रजी नाटकावर कोडमंत्र नाटक आधारलेले असून त्यामध्ये सैनिकांची निष्ठा, त्यांची शौर्यगाथा, त्यांचे जगणे, शिस्त अशा अनेक पैलूंचा मागोवा घेण्यात आला आहे.

मराठी रंगभूमीवर नवनवीन नाट्य प्रयोग करून पाहायला मुक्ता बर्वे नेहमीच उत्सुक असतात. मुक्ताने ऑक्टोबर २०१६ मध्ये नसीम सोलेमानपूर (इराणी लेखक) यांनी लिहिलेले व सिद्धेश पूरकर यांनी मराठीत अनुवादित केलेले "व्हाईट रॅबिट रेड रॅबिट" हे नाटक पुण्यातील भरत नाट्य मंदिर येथे सादर केले. जगभरातील अनेक भाषांमध्ये अनुवादित झालेल्या या नाटकाचे वैशिष्ट्य त्याच्या उत्स्फूर्त सादरीकरणात होते. दिग्दर्शक नाही, आणि संहितेचे सादरीकारणापूर्वी वाचन नाही, कलाकाराला थेट रंगमंचावर संहिता हातात मिळते, नाटकाचा एका कलाकाराला एकच प्रयोग सादर करता येतो असे या नाटकाचे स्वरूप होते. रंगमंचावर कलाकाराने संहिता वाचत वाचत कलाकार आणि प्रेक्षकांनी नाटकाचा सह-अनुभव घ्यायचा अशा कलाकारासाठी धाडसी आणि प्रेक्षकांसाठी नवख्या वाटाव्या अशा प्रयोगाचे चॅलेंज मुक्ताने अगदी सहजी पेलले.[६७][६८]

ऑक्टोबर २०१६ मध्ये मुक्ताने रसिका-अनामिका प्रॉडक्शन्सतर्फे 'दीपस्तंभ' नाटक रंगभूमीवर आणले.[६९]

फेब्रुवारी २०१७ मध्ये ललित कला केंद्राच्या माजी विद्यार्थ्यांबरोबर, मुक्ता बर्वे यांनी, 'सखाराम बाईंडर' या विजय तेंडुलकर लिखित सुप्रसिद्ध नाटकाचे विशेष पाच प्रयोग रंगभूमीवर सादर केले.[७०] नाटकातील सर्व कलाकारांनी या प्रयोगांचे मानधन न घेता, या प्रयोगांमधून जमणारा निधी बॅकस्टेज कलाकारांना मदत निधी म्हणून दिला.[७१]

कारकीर्द[संपादन]

चित्रपट[संपादन]

मुक्ता बर्वेची भूमिका असलेले चित्रपट :

वर्ष शीर्षक भाषा भूमिका
२००४ चकवा मराठी सिस्टर छाया
२००५ थांग मराठी/इंग्रजी पाहुणी कलाकार
२००६ शेवरी मराठी पाहुणी कलाकार
ब्लाईंड गेम मराठी सहाय्यक अभिनेत्री
माती माय मराठी सहाय्यक अभिनेत्री -यशोदा
२००७ सावर रे मराठी सहाय्यक अभिनेत्री- मुक्ता
२००८ दे धक्का मराठी पाहुणी कलाकार
सास बहू और सेन्सेक्स हिंदी परिमल
२००९ एक डाव धोबीपछाड मराठी सुलक्षणा
जोगवा मराठी प्रमुख भूमिका- सुली
सुंबरान मराठी सहाय्यक अभिनेत्री- कल्याणी
२०१० आघात मराठी प्रमुख भूमिका- डॉक्टर
ऐका दाजिबा मराठी सहाय्यक अभिनेत्री
थॅंक्स मा हिंदी वेश्या
मुंबई-पुणे-मुंबई मराठी प्रमुख भूमिका- मुंबई
२०१२ बदाम राणी गुलाम चोर मराठी प्रमुख भूमिका- पेन्सिल
गोळाबेरीज मराठी सहाय्यक अभिनेत्री- नंदिनी चौबळ
२०१३ मंगलाष्टक वन्स मोअर मराठी प्रमुख भूमिका- आरती
लग्न पहावे करून मराठी प्रमुख भूमिका- अदिती टिळक
२०१४ गुणाजी कोकणी प्रमुख भूमिका- धनगर स्त्री
शॉट मराठी शॉर्ट फिल्म - श्रुती
२०१५ डबल सीट मराठी प्रमुख भूमिका- मंजिरी नाईक
मुंबई-पुणे-मुंबई २ मराठी प्रमुख भूमिका- गौरी देशपांडे
हायवे- एक सेल्फी आरपार मराठी सहाय्यक अभिनेत्री
२०१६ गणवेश मराठी प्रमुख भूमिका - इन्स्पेक्टर मीरा पाटील
वाय झेड मराठी सहाय्यक अभिनेत्री- सायली
२०१७ हृदयांतर मराठी प्रमुख भूमिका - समायरा जोशी
२०१८ आम्ही दोघी मराठी प्रमुख भूमिका - अम्मी
मुंबई-पुणे-मुंबई ३ मराठी प्रमुख भूमिका- गौरी देशपांडे
२०१९ बंदिशाळा मराठी प्रमुख भूमिका- जेलर माधवी सावंत

दूरचित्रवाणी[संपादन]

मुक्ता बर्वे यांचे दूरचित्रवाणीवर प्रदर्शित झालेले कार्यक्रम :

वर्ष कार्यक्रमाचे नाव भूमिकेचे नाव टिप्पणी
१९९९ घडलंय बिघडलंय ​चंपा
१९९९ पिंपळपान सहाय्यक भूमिका
१९९९ बंधन सहाय्यक भूमिका
१९९९ बुवा आले सहाय्यक भूमिका
चित्तचोर सहाय्यक भूमिका
मी एक बंडू सहाय्यक भूमिका
१९९९ आभाळमाया वर्षा निमकर सहाय्यक भूमिका
२००१ श्रीयुत गंगाधर टिपरे योगिता सहाय्यक भूमिका
२००३ इंद्रधनुष्य सहाय्यक भूमिका
२००६ अग्निशिखा कलिका मुख्य भूमिका
२०१०-११ अग्निहोत्र मंजुळा श्रीपाद अग्निहोत्री मुख्य भूमिका
२०१० आम्ही मराठी पोरं हुशार सूत्रसंचालिका
२०११ लज्जा ॲड. मीरा पटवर्धन सहाय्यक भूमिका
२०११ मधु इथे अन् चंद्र तिथे गौरी सहाय्यक भूमिका
२०१२ एका लग्नाची दुसरी गोष्ट राधा देसाई मुख्य भूमिका
२०१४ विनय : एक वादळ सहाय्यक भूमिका
२०१५ झकास हिरोईन (पर्व २) परीक्षक ​
२०१७ रुद्रम रागिणी मुख्य भूमिका

नाटके[संपादन]

वर्ष नाटकाचे नाव भूमिकेचे नाव नाटकाची भाषा
१९९६ घर तिघांचे हवे पदार्पणातील नाटक मराठी
२००१ आम्हाला वेगळे व्हायचंय सहाय्यक अभिनेत्री मराठी
२००५ देहभान सहाय्यक अभिनेत्री मराठी
फायनल ड्राफ्ट प्रमुख भूमिका -विद्यार्थिनी मराठी
२००६ हम तो तेरे आशिक हैं प्रमुख भूमिका- रुक्साना साहिल मराठी
२००८ कबड्डी कबड्डी प्रमुख भूमिका- पूर्वा मराठी
२०१३ छापा काटा निर्माती आणि प्रमुख भूमिका - मैत्रेयी भागवत मराठी
२०१४ रंग नवा निर्माती आणि प्रमुख भूमिका मराठी
२०१५ लव्ह बर्ड्‌स निर्माती आणि प्रमुख भूमिका- देविका मराठी
इंदिरा निर्माती हमराठी
२०१६ कोडमंत्र निर्माती आणि प्रमुख भूमिका- अहिल्या देशमुख मराठी
दीपस्तंभ निर्माती मराठी
२०१७ सखाराम बाईंडर निर्माती आणि प्रमुख भूमिका- चंपा मराठी

पुरस्कार आणि प्रशंसा[संपादन]

साल चित्रपट/ नाटक पुरस्कार विभाग/ नामांकने निकाल
२००३ देहभान अल्फा गौरव अवॉर्ड उत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेत्री जिंकला.
उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री जिंकला.
२००५ फायनल ड्राफ्ट प्रायोगिक नाटकातील उत्कृष्ट अभिनेत्री जिंकला.
चकवा महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार उत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेत्री जिंकला.[७२]
२००६ हम तो तेरे आशिक है व्यापारविषयक नाटकातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री जिंकला.
फायनल ड्राफ्ट महाराष्ट्र टाइम्स सन्मान पुरस्कार जिंकला.
झी गौरव पुरस्कार जिंकला.
२००७ संस्कृती कलादर्पण पुरस्कार जिंकला.[७३]
महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार जिंकला.[७३]
महाराष्ट्र टाइम्स सन्मान पुरस्कार जिंकला.[७३]
कबड्डी कबड्डी जिंकला.
महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार जिंकला.
२००८ झी गौरव पुरस्कार जिंकला.[७४]
२००९ जोगवा महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेत्री जिंकला.[७५]
संस्कृती कलादर्पण पुरस्कार जिंकला.[७६]
२०१० मराठी आंतरराष्ट्रीय चित्रपट आणि रंगमंच पुरस्कार जिंकला.[७७]
२०११ मुंबई पुणे मुंबई महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण नामांकन.
झी गौरव पुरस्कार नामांकन.[७८]
आघात पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव जिंकला.
२०१४ लग्न पहावे करून स्क्रीन मराठी पुरस्कार नामांकन.[७९]
छापा काटा दीनानाथ मंगेशकर पुरस्कार मोहन वाघ पुरस्कर (दीनु पेडणेकर यांच्यासमवेत) जिंकला.[८०]
संस्कृती कलादर्पण पुरस्कार सर्वोत्कृष्ट नाटक जिंकला.[८१]
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री जिंकला.[८२]
​मंगलाष्टक वन्स मोअर महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण नामांकन.[८३]
२०१५ डबल सीट जिंकला.[८४]
२०१६ झी चित्र गौरव पुरस्कार जिंकला.[८५]
संस्कृती कला दर्पण पुरस्कार नामांकन.[८६]
महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार जिंकला.[८७]
मराठी फिल्मफेअर पुरस्कार जिंकला.
मुंबई पुणे मुंबई २ मराठी फिल्मफेअर पुरस्कार नामांकन.
महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण नामांकन.[८८]
२०१७ कोडमंत्र झी नाट्य गौरव पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेत्री नामांकन.[८९]
सर्वात अप्रतिम नैसर्गिक अभिनय जिंकला.[८९]
विशेष पुरस्कार- नाटक जिंकला.[८९]
सर्वोत्कृष्ट नाटक नामांकन.[८९]
महाराष्ट्र टाइम्स सन्मान पुरस्कार सर्वोत्कृष्ट नाटक जिंकला.[९०]
संस्कृती कलादर्पण पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेत्री जिंकला.[९१]
सर्वोत्कृष्ट नाटक जिंकला.[९१]
२०१८ हृदयांतर मराठी फिल्मफेअर पुरस्कार मुख्य भूमिकेत सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (महिला) नामांकन.[९२]
२०१९ बंदिशाळा महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेत्री जिंकला.[९३]

इतर विशेष पुरस्कार[संपादन]

साल चित्रपट/ नाटक पुरस्कार विभाग/ नामांकने निकाल
२००९ N/A संगीत नाटक अकादमी पुरस्कार उस्ताद बिस्मिल्लाह खान युवा पुरस्कार जिंकला.[९४]
२०११ राजा परांजपे फेस्टिव्हल पुरस्कार तरुणाई सन्मान पुरस्कार जिंकला.[९५]
२०१२ ॲड फिझ विशेष उपलब्धी पुरस्कार जिंकला.
२०१४ आय.बी.एन. लोकमत उद्याची प्रेरणा पुरस्कार (नाटक आणि सिनेमा) जिंकला.[९६]
२०१६ महाराष्ट्र वन सावित्री सन्मान (सिनेमा) जिंकला.[९७]
छापा काटा लोकमत महाराष्ट्रियन ऑफ द ईयर नाटक विभाग जिंकला.[९८]
N/A निळू फुले सन्मान २०१६ वर्षातील बुद्धिमान अभिनेत्री पुरस्कार जिंकला.[९९]
N/A पु. ल. पुरस्कार तरुणाई सन्मान पुरस्कार जिंकला.[१००]
२०१७ कोडमंत्र लोकमत महाराष्ट्रियन ऑफ द इयर नाटक विभाग नामांकन.[१०१]
२०१८ N/A लोकसत्ता तरुण तेजांकित कला / चित्रपट विभाग जिंकला.[१०२]
२०१८ N/A प्रियदर्शिनी अ‍ॅकॅडमी ग्लोबल पुरस्कार स्मिता पाटील पुरस्कार - सर्वोत्कृष्ट अभिनेत्री जिंकला.[१०३]
 • आय.बी.एन. लोकमत या दूरचित्रवाणी वाहिनीचा प्रेरणा पुरस्कार : २०१४
 • ’आघात’साठी पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार:२०११
 • ’मुंबई-पुणे-मुंबई’साठी पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार:२०१०
 • संगीत नाटक अकादमी (नवी दिल्ली) चा नाट्यक्षेत्रासाठीचा उस्ताद बिस्मिल्लाखान युवा पुरस्कार:२००९
 • ’जोगवा’साठी महाराष्ट्र सरकारचा वर्षातील उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार:२००८-०९
 • कबड्डी-कबड्डीसारख्या मनोरंजक नाटकातील भूमिकेसाठीचा महाराष्ट्र सरकारचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार:२००६-०७
 • कबड्डी-कबड्डीसारख्या मनोरंजक नाटकातील भूमिकेसाठीचा महाराष्ट्र टाइम्सचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार:२००६-०७
 • कबड्डी-कबड्डीसारख्या मनोरंजक नाटकातील भूमिकेसाठीचा झी कंपनीचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार:२००६-०७ [१०४]
 • फायनल ड्राफ्टसारख्या मनोरंजक नाटकातील भूमिकेसाठीचा महाराष्ट्र टाइम्सचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार:२००५-०६
 • फायनल ड्राफ्टसारख्या मनोरंजक नाटकातील भूमिकेसाठीचा झी कंपनीचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार:२००५-०६
 • हम तो तेरे आशिक हैं सारख्या मनोरंजक नाटकातील भूमिकेसाठीचा महाराष्ट्र सरकारचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार:२००४-०५
 • फायनल ड्राफ्टसारख्या प्रायोगिक नाटकातील भूमिकेसाठी झी टेलिव्हिजनचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री अल्फा गौरव अवॉर्ड:२००४-०५
 • ’चकवा’साठी, पदार्पणातच चमकणाऱ्या कलावंताला दिला जाणारा महाराष्ट्र सरकारचा २००४-०५चा पुरस्कार
 • ’देहभान’मधील उत्कृष्ट सहकलाकाराच्या भूमिकेसाठी झी टेलिव्हिजनचा अल्फा गौरव पुरस्कार:२००२-०३
 • ’देहभान’मधील भूमिकेसाठी, पदार्पणातच चमकणाऱ्या कलावंताला ’झी’तर्फे दिला जाणारा अल्फा गौरव पुरस्कार:२००२-०३
 • ‘डबल सीट’ चित्रपटाला पाच पुरस्कार मिळाले.

संदर्भ व नोंदी[संपादन]

 1. ^ भुते, वैशाली. "खास भेट : मुक्ता बर्वे". ३० जुलै २०१० रोजी पाहिले.
 2. ^ http://www.ozee.com/shows/home-minister-swapna-gruh-lakshmiche/video/home-minister-episode-1342-august-14-2015-full-episode.html. Missing or empty |title= (सहाय्य)
 3. ^ "मुक्ता बर्वे त्यांच्या ललित कला केंद्र येथिल शिक्षण व नाट्य शास्त्र पदवी बद्दलचे अनुभव व्यक्त करताना".
 4. ^ "मुक्तायन".
 5. ^ "परफॉर्मिंग आर्ट्‌स 'पदवी हळुूहळू आकार घेत आहे".
 6. ^ "बेभान करणारं.. देहभान!".
 7. ^ a b "मुक्ता बर्वे अधिकृत संकेतस्थळ".
 8. ^ "मुक्ता बर्वे आपली कार विकायचा विचार करीत आहेत का?".
 9. ^ "ठळक प्रयत्न: जोगवा".
 10. ^ "संगीत नाटक अकादमीने २००९ सलाची उस्ताद बिस्मिल्लाह खान युवा पुरस्कारांची घोषणा केली".
 11. ^ "रोमान्स".
 12. ^ "स्वप्निल आणि मुक्ता प्रखर अभिनय!".
 13. ^ a b "मुक्त संवाद. मुक्ता बर्वेशी!".
 14. ^ "मुक्ताला तरुणाई सन्मान पुरस्कार".
 15. ^ "पसंतीला 'आघात'".
 16. ^ "'स्वप्निल-मुक्ता' पुन्हा एकत्र".
 17. ^ "टीव्हीशी झाली आहे आभासी मैत्री".
 18. ^ "एका लग्नाची दुसरी गोष्ठ मिनी फिल्म म्हणून प्रसारित होणार".
 19. ^ "बदाम राणी गुलाम चोर चित्रपट पुनरावलोकन!".
 20. ^ "टोरंटोमधील चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी मुक्ता".
 21. ^ "मुक्ता निर्मितीतही".
 22. ^ "मुक्ता बर्वे ने रसिका जोशी यांच्या नावावर प्रॉडक्शन हाऊस सुरु केले".
 23. ^ "रंगमंच पुनरावलोकन: छापा कटा".
 24. ^ "रीनाने नाटकात नीनाची जागा घेतली".
 25. ^ "तबला वादक झाकीर हुसेन आणि शास्त्रीय गायन पंढरीनाथ कोल्हापुरे यांना मंगेशकर पुरस्कार".
 26. ^ "संस्कृती कलादर्पण पुरस्काराची नामांकने जाहीर".
 27. ^ "मुक्ता बर्वे आणि उमेश कामत यांची रॉम-कॉमची जोडी".
 28. ^ "लग्न पहावे करून - मराठी चित्रपट समीक्षा".
 29. ^ "'स्वप्निल-मुक्ता' पुन्हा एकत्र".
 30. ^ "मंगलाष्टक वन्स मोअर - मराठी चित्रपट समीक्षा".
 31. ^ "रंग नवा.. तरल कवितानुभव".
 32. ^ "वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर ऑफ डबल सीट".
 33. ^ "मायानगरीतील स्वप्नांच्या प्रवासाची गोष्ट 'डबल सीट'".
 34. ^ "डबल सीटसाठी मुक्ता बर्वेची वास्तविक जीवनाची प्रेरणा".
 35. ^ "डबल सीट मूव्ही पुनरावलोकन".
 36. ^ "संस्कृती कलादर्पण पुरस्कार नामांकने: अशोक सराफ यांना जीवनगौरव पुरस्कार, फेस ऑफ द इयर स्वप्नील जोशी".
 37. ^ "महाराष्ट्र राज्य फिल्म पुरस्कार".
 38. ^ "मराठी फिल्मफेअर पुरस्कारांमध्ये मुक्ता बर्वेने सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जिंकला".
 39. ^ "झी टॉकीजच्या 'महाराष्ट्राचा फेवरेट कोण २०१५' 'पुरस्काराने मोठ्या प्रमाणात यश मिळवले".
 40. ^ "झी चित्र गौरव पुरस्कारामध्ये 'कट्यार काळजात घुसली' ची बाजी; विजेत्यांची संपूर्ण यादी".
 41. ^ "हायवे चित्रपट हा अभिनेता आणि नॉन-अ‍ॅक्टर्सचा संगम आहे".
 42. ^ "हायवे चित्रपटचा आढावा: उमेश आणि गिरीश कुलकर्णी यांचा ताजा हा मराठी सिनेमा आणि एफटीआयआयचा विजय आहे".
 43. ^ "मुंबई-पुणे-मुंबई २ चित्रपट पुनरावलोकन".
 44. ^ a b "विनाकारण कोणत्याही चित्रपटाला हो म्हणत नाही."
 45. ^ "रिव्ह्यू : एका लग्नाची प्रॅक्टिकल गोष्ट".
 46. ^ "फिल्मफेअर मराठी: नामनिर्देशन जाहीर केले".
 47. ^ "गणवेश मूव्ही आढावा".
 48. ^ "'वायझेड'मध्ये मुक्ता बर्वेची एण्ट्री".
 49. ^ "वायझेड मूव्ही पुनरावलोकन".
 50. ^ url=http://www.megamarathi.com/marathi-movies/hrudayantar-marathi-movie/
 51. ^ url=http://www.marathimovieworld.com/news/shahrukh-khan-gives-clap-for-vikram-phadnis-marathi-film-hrudayantar.php
 52. ^ http://indianexpress.com/article/entertainment/regional/hrithik-roshan-returns-as-krrish-in-hrudayantar-but-has-no-dialogues-4679068/
 53. ^ url=http://www.dnaindia.com/entertainment/report-zee-gaurav-celebrates-100-years-of-indian-cinema-1658617
 54. ^ url=http://www.loksatta.com/vruthanta-news/swapnil-joshi-mukta-barve-brand-ambassador-of-suyog-group-5252/
 55. ^ url=http://www.loksatta.com/lokrang-news/vinay-apte-in-mukta-barves-memory-1048570/
 56. ^ url=http://www.loksatta.com/manoranjan-news/actor-vinay-apte-birth-anniversary-celebrated-616403/
 57. ^ url=http://www.loksatta.com/manoranjan-news/jhakkas-heroine-season-2-1129059/
 58. ^ url=http://www.loksatta.com/mumbai-news/marathi-actor-become-active-for-birds-save-1189699/
 59. ^ url=http://indianexpress.com/article/cities/mumbai/maharashtra-with-its-progressive-outlook-is-a-better-place-for-women/
 60. ^ url=https://www.youtube.com/watch?v=ovxk6BaEoQE
 61. ^ url=http://www.loksatta.com/ls-diwali2015-news/poem-7-1196994/
 62. ^ url=https://twitter.com/ColorsMarathi/status/758668154008637440
 63. ^ a b url=https://www.youtube.com/watch?v=WwnEnL0H8dE&t=4830s
 64. ^ url=http://timesofindia.indiatimes.com/city/pune/Pu-La-awards-for-Ameen-Sayani-Mirasdar/articleshow/55320773.cms
 65. ^ url=http://www.loksatta.com/manoranjan-news/lovebirds-marathi-drama-1103671/
 66. ^ url=http://marathicineyug.com/theatre/news/1298-mukta-barve-s-marathi-play-code-मंत्र-opens-from-18-june-2016
 67. ^ url=http://sakaaltimes.com/NewsDetails.aspx?NewsId=5461738112727328060&SectionId=5131376722999570563&SectionName=Features&NewsTitle=A%20real%20%E2%80%98live%E2%80%99%20theatrical%20experience
 68. ^ url=https://www.youtube.com/watch?v=g0h95nb5lY0
 69. ^ url=http://marathicineyug.com/theatre/news/1770-mukta-barve-produced-new-marathi-play-deepstambh-muhurat-held
 70. ^ url=http://www.loksatta.com/manoranjan-news/mukta-barve-lalitkala-kendra-revive-classic-marathi-play-sakharam-binder-for-a-cause-1395292/
 71. ^ url=http://marathicineyug.com/theatre/news/2224-mukta-barve-lalitkala-kendra-revive-classic-marathi-play-sakharam-binder-for-a-cause
 72. ^ "Deulgaonkar, Shammi Kapoor presented awards". Zee News.
 73. ^ a b c Girish Joshi. "Final Draft Comments & Feedback". 27 December 2015 रोजी पाहिले.
 74. ^ "Indian Television Dot Com - 9th Zee Gaurav awards presented". Indian Television Dot Com. 11 February 2008. 30 October 2015 रोजी पाहिले.
 75. ^ "Mukta Barve with her award at an event hosted by Pratap Sarnaik for achievements in Marathi industry, at Hotel Trident, Mumbai on April 8, 2010 - Photogallery". timesofindia.com.
 76. ^ "Sanskruti Kala Darpan Awards 2010, Celebrating 10th Year". 16 July 2011. Archived from the original on 16 July 2011. 16 November 2018 रोजी पाहिले.
 77. ^ "Mifta Awards 2010 Feb. 06 '11 Part - 25". 5 December 2018 रोजी पाहिले.
 78. ^ "Zee Gaurav Awards 2011 March 13 '11 Part - 25". 5 December 2018 रोजी पाहिले.
 79. ^ "स्क्रीन पुरस्कारांमध्ये सचिन खेडेकर, नितीश भारद्वाज, देविका दफ्तरदार यांना नामांकने". Loksatta. 12 January 2014. 27 December 2015 रोजी पाहिले.
 80. ^ "Tabla maestro Zakir Hussain and classical vocalist Pandharinath Kolhapure to get Mangeshkar award". Radioandmusic.com. 14 April 2014. 27 December 2015 रोजी पाहिले.
 81. ^ "Winners of Sanskruti Kaladarpan Awards 2014". 12 December 2015 रोजी पाहिले.
 82. ^ "संस्कृती कलादर्पण पुरस्काराची नामांकने जाहीर". Loksatta. 4 May 2014.
 83. ^ marathisanmaan. "Nominees of "Maharashtracha Favorite Kon" Awards 2014". Marathi Sanmaan. 30 October 2015 रोजी पाहिले.
 84. ^ "Zee Talkies' 'Maharashtracha Favorite Kon 2016' Awards a massive success". The Hans India. 26 November 2015. 12 December 2015 रोजी पाहिले.
 85. ^ "झी चित्रगौरव पुरस्कारामध्ये 'कट्यार काळजात घुसली' ची बाजी; विजेत्यांची संपूर्ण यादी". Loksatta. 13 March 2016. 15 March 2016 रोजी पाहिले.
 86. ^ "Sanskruti Kala Darpan Nominations 2016". Cineyug. 1 May 2016 रोजी पाहिले.
 87. ^ "53rd Maharashtra State Film Awards 2016: Ringan, Double Seat, Daagdi Chaawl Wins Best Film Awards". Cineyug. 2 May 2016. 2 May 2016 रोजी पाहिले.
 88. ^ "Maharashtracha Favourite Kon 2014 Nominations". 24 November 2016 रोजी पाहिले.
 89. ^ a b c d Kulye, Ajay. "'Zee Natya Gaurav Awards 2017' Winners - Full List - MarathiCineyug.com - Marathi Movie News - TV Serials - Theatre". marathicineyug.com. 13 May 2017 रोजी पाहिले.
 90. ^ "'सैराट', 'व्हेंटिलेटर'ची मोहोर -Maharashtra Times". 28 March 2017. 13 May 2017 रोजी पाहिले.
 91. ^ a b "संस्कृती कलादर्पण गौरवः 'कोडमंत्र' व 'व्हेंटिलेटर' ने मारली बाजी". Loksatta. 9 May 2017. 13 May 2017 रोजी पाहिले.
 92. ^ "Best Actress nominees at the Filmfare Marathi Awards - Entertainment - Times of India Videos". timesofindia.indiatimes.com. 16 November 2018 रोजी पाहिले.
 93. ^ "ऑस्कर अकादमीच्या अध्यक्षांच्या उपस्थितीत रंगला ५६ वा मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान सोहळा". Marathi Hindustan Times.
 94. ^ Special Correspondent. "Sangeet Natak Akademi announces Ustad Bismillah Khan Yuva Puraskars for 2009". The Hindu. 30 October 2015 रोजी पाहिले.
 95. ^ "Raja Paranjape festival kicks off in Pune". dna. 17 April 2011. 30 October 2015 रोजी पाहिले.
 96. ^ "News: IBN-Lokmat presents Prerna Awards 2014". Free Press Release.
 97. ^ "महाराष्ट्र1 felecitating Mukta Barve". Twitter. 9 March 2016 रोजी पाहिले.
 98. ^ "Lokmat Maharashtrian Of The Year 2016". Lokmat. 1 April 2016. 30 April 2016 रोजी पाहिले.
 99. ^ "Nilu Phule Sanman 2016". Twitter. 28 July 2016. 29 July 2016 रोजी पाहिले.
 100. ^ "Pu La awards for Ameen Sayani, Mirasdar - Times of India". 17 November 2016 रोजी पाहिले.
 101. ^ "लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर - २०१७,". lmoty.lokmat.com. 13 May 2017 रोजी पाहिले.
 102. ^ "समाजासाठी प्रेरणा ठरणाऱ्या 'त्या' बारा जणांचा 'लोकसत्ता तरुण तेजांकित' पुरस्काराने गौरव". 31 March 2018. 16 November 2018 रोजी पाहिले.
 103. ^ Lokmat (12 December 2018). "मुक्ता बर्वेला 'स्वर्गीय स्मिता पाटील स्मृती पुरस्कार २०१८'जाहीर". Lokmat. 17 December 2018 रोजी पाहिले.
 104. ^ "मराठी अ‍ॅक्ट्रेस मुक्ता बर्वेज् अवॉर्ड्‌ज" (इंग्लिश भाषेत). ३० जुलै, इ.स. २०१० रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)

बाह्य दुवे[संपादन]