Jump to content

महादजी शिंदे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(श्रीमंत महादजी शिंदे या पानावरून पुनर्निर्देशित)
महादजी शिंदे

महादजी शिंदे (जन्म : इ.स.३ डिसेंबर १७३०; - १२ फेब्रुवारी १७९४ हे मराठा साम्राज्याचे एक मुत्सद्दी होते. पुणे शहरात त्यांचे शिंद्यांची छत्री या नावाचे स्मारक आहे.

महादजी शिंदे यांचे नाव मराठ्यांच्या इतिहासात शिवाजी महाराज, संभाजी महाराज,बाजीराव पेशवे, महाराजा रघुजी भोसले यांच्यानंतर महान सेनानी म्हणून घेतले जाते. इंग्रजांकडून मानाने यांना द् ग्रेट मराठा असे म्हणले जाई. पानिपतच्या तिसऱ्या लढाईनंतर यांनी मराठा साम्राज्याला पुन्हा उभारी मिळवून देण्याचे काम केले. पहिल्या इंग्रज मराठा युद्धामध्ये त्यांनी इंग्रजाचा काही लढायांमध्ये निर्णायक पराभव केला व इंग्रजांना तह करण्यास भाग पाडले. त्यामुळे त्यांच्या निधनापर्यंत मराठा साम्राज्याला स्थैर्य लाभले. श्रीगोंदा शहरात त्यांच्या नावावर महादजी शिंदे विद्यालय हे विद्यालय आहे.

सैनिकी कारकीर्द

[संपादन]

दक्षिण भारत

[संपादन]

महादजी शिंदे वयाच्या दहाव्या वर्षापासूनच रणांगणावर आपले अस्तित्त्व दाखवण्यास सुरुवात केली होई. १७४० च्या निजामा विरुद्धच्या लढाईत त्यांनी दत्ताजी शिंदे व त्रिंबक किन्नड यांना साथ दिली होती. १७४२ मध्ये बेळूरच्या लढाईत महादजीने भाग घेतला होता या लढाईत मराठ्यांनी निझामच्या सैन्याला परतावून लावले होते.

उत्तर भारत

[संपादन]

१७४५ ते १७६१ दरम्यान ( जो मराठ्यांचा राज्य विस्तारातील सुवर्णकाळ मानला जातो) त्या काळात महादजी शिंदे यांनी जवळपास ५० लढायांचे नेतृत्व/ सहभाग घेतला, मालव, राजपुताना, बुंदेलखंड,१७४७, मारवाड १७४७ व हिम्मत नगर १७४८. ब्रिज, दोआब, रोहिलखंड, दिल्ली कुंजपूर तसेच पानिपतच्या तिसऱ्या लढाईत हिरिरीचा सहभाग होता. यातील महादजींच्या महत्त्वाच्या लढाया म्हणजे चंद्रावती गंज १७४६, फतेहाबाद १७४६, बडी साद्री.

मल्हाराव होळकरांच्या साथीने शिंदे यांनी अनेक राजपूत संस्थाने मराठा साम्राज्याखाली आणली. रतन गढ, लालगढ, बिकानेर, लासवारी, लाखमगढ, कुंभेर, डीग ही मराठा साम्राज्याला जोडली गेली. तसेच जोधपूर व जयपूर ह्या मोठ्या राजपूत राज्यांनी मराठा वर्चस्व मान्य करून टाकले. मथुरा हे मुघल सत्तेखाली होते ते मराठा अखत्यारीत आणून त्यांनी तेथील काही हिंदू मंदिरांचा जीर्णोद्धार केला. शिंद्यांचा अधिपत्याखाली मथुरेला संस्कृत शिक्षण केंद्र तयार झाले. जानेवारी १७५८ मध्ये महादजी यांनी ग्वाल्हेर येथे शिंद्यांचे राज्य बनवले.

ग्वाल्हेरचे शासक

[संपादन]

जयाप्पा शिंदे जे शिंदे घराण्याचे प्रमुख होते ते २५ जुलै १७५५ रोजी राजस्थानमधील नागौर येथील लढाईत मारले गेले, त्यानंतर दत्ताजी शिंदे व जनकोजी शिंदे यांच्याकडे शिंदे घराण्याची सूत्रे आली. मराठ्यांच्या वाढत्या लष्करी वर्चस्वाला इस्लामी जिहादाचे उत्तर म्हणून लवकरच उत्तर भारतात अब्दाली विरुद्ध मराठे असा मोठा सामना झाला. बुरुडी घाटावरील लढाईत दत्ताजी शिंदेची नजीबकडून क्रूरपणे हत्या झाली. शिंद्यांनी अब्दालीविरुद्धच्या पानिपतच्या तिसऱ्या लढाईत हिरिरीने सहभाग घेतला होता. या लढाईत जनकोजी शिंदे मारला गेला, तसेच महादजी देखील लढता लढता घायाळ झाले होते. महादजी यांनी यशस्वीपणे माघार घेतली, या लढाईत त्यांचा पाय लुळा पडला तो पुढील जन्मभर तसाच राहिला. पानिपतच्या लढाईनंतर साहजिकच शिंदे घराण्याची सूत्रे महादजींकडे आली. मराठे-अब्दाली युद्धातील पराभवानंतर मराठा साम्राज्याचे विकेंद्रीकरण झाले व शिंदे हे स्वतंत्र मराठा संस्थानिक बनले व ग्वाल्हेर हे त्यांचे संस्थान बनले.

पानिपतच्या लढाईनंतरची कारकीर्द

[संपादन]

पानिपतच्या लढाईतील विनाशानंतर महत्त्वाचे होते की मराठ्यांचे उत्तर भारतावरील वर्चस्व पुन्हा प्रस्थापित करणे, १७७० मध्ये महादजीने भरतपूरच्या जाट राजा नवल सिंग याचा पराभव केला व मराठ्यांचे वर्चस्व पुन्हा प्रस्थापित झाले. १७७७ मध्ये पेशव्यांचे कोल्हापूर संस्थानाशी खटके उडाले होते यात महादजीने निर्णायक कामगिरी केली.

पहिले इंग्रज-मराठा युद्ध

[संपादन]

१७७३ मध्ये नारायणराव पेशवे याचा खून झाला. व रघुनाथराव स्वयंघोषित पेशवा बनला. बाराभाईच्या कारभारानुसार नारायणरावचा मुलगा सवाई माधवराव पेशवा बनला व रघुनाथरावला पेशवे पदावरून हटवले. या बारभाईंमध्ये महादजी व नाना फडणिसांची भूमिका महत्त्वाची होती. रघुनाथरावांना हा निर्णय पटला नाही व त्यांनी इंग्रजांची मदत घेण्याचे ठरवले.

वडगावची लढाई

[संपादन]

१७७७ मध्ये नाना फडणीस यांनी कलकत्ता कौन्सिल बरोबर केलेला कराराचा भंग करत फ्रेंचाना पश्चिम किनारपट्टी वर बंदर उभारायची परवानगी दिली. ब्रिटिशांनी प्रत्युतरादाखल मुंबईवरून सैन्य पाठवले. जानेवारी १७७९ मध्ये ३,९०० ब्रिटिश सैन्य कर्नल एगर्टनच्या नेतृत्वाखाली पुण्यावर चालून गेले. वाटेत रघुनाथरावांचे सैन्यही येून मिळाले. मराठ्यांच्या सैन्य महादजी शिंदे व् तुकाजी होळकर यांच्या नेतृत्वाखाली होते. ब्रिटिश सैन्याच्या वाटेत असंख्य अडथळे आणून त्यांचा चाल थंडावली व त्यांनी तळेगाव येथे तळ टाकला. महादजींनी वाटेतील सर्व रस्त्यामधील गावातील कुरणे जाळली विहरी विषमय करून टाकल्या, तसेच मुंबईकडून येणारी रसदही पूर्णपणे तोड्न टाकली. ब्रिटिश सैन्याचे अन्नपाण्याहून हाल होउ लागले. ब्रिटिशांनी माघार घेण्याचे ठरवले १२ जानेवारी १७७९ रोजी मध्य रात्री मराठ्यांनी ब्रिटिशांवर आक्रमण केले व सर्व बाबतीत चित करून वडगाव येथे शेवटी ब्रिटिश सैन्य महादजींना शरण आले.

१६ जानेवारी रोजी वडगावचा तह झाला. ईस्ट इंडिया कंपनीने १७७३ पासून मिळवलेला सर्व प्रांत परत करण्यात यावा असे ठरले. यात साष्टी, ठाणे व जवळपास सर्व गुजरात पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात आला. महादजीने ब्रिटिशांकडून युद्धाचा खर्च म्हणून ४१,००० रुपये देखील वसूल केले. रघुनाथरावाला मराठ्यांच्या हाती देण्यात यावे असे ठरले.त्यानुसार १८ जानेवारी १७७९ रोजी रघुनाथराव व त्याचच्या सैनिकांना पकडण्यात आले. तसेच महादजीने सखाराम बापूचा पराभव करून त्यागी सिंहगडाच्या तुरुंगात रवानगी केली

सिप्री येथील हार

ब्रिटिश गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टींन यांनी वडगावचा तह मुंबईच्या अधिकाऱ्यांना यावर सही करण्याची परवानगी नव्हती असा युक्तीवाद करत नामंजूर केला व शमलेले युद्ध पुन्हा सुरू करण्यास आदेश दिले, oकर्नल गोडार्ड यांनी ६०००ची फौज फेब्रुवारी १७७९ मध्ये घेउन अहमदाबाद काबीज केले व १७८० मध्ये भासीं (?) बंगालमधून निघून कॅप्टन पॉपहॅमनेनी ग्वाल्हेर काबीज केले. वॉरन हेस्टिंग्जने महादजी शिंदेंना अजून नामोहरम करण्यासाठी मेजर केमॅकला पाठवले. त्याने महादजी शिंद्यांच्या फौजेला गाठून हैराण केले. फेब्रुवारी १७८१ मध्ये ब्रिटिशांनी सिप्री येथे महादजी शिंद्यांच्या सेनेचा पराभव केला. सिप्रीच्या पराभवानंतर देखील महादजीने आपल्या आघाड्या शाबूत ठेवत ब्रिटिशांना आव्हान दिले. ब्रिटिशांप्रमाणेच महादजीचे सैन्य संख्येने जास्त व ब्रिटिशांच्या शिस्तबद्ध सैनिकांप्रमाणेच तुल्यबळ असल्याने महादजीवर पूर्णपणे मात करणे अवघड गेले, तसेच महादजीलाही ब्रिटिशांच्या आधुनिक युद्धतंत्रापुढे त्यांना अजून मात देणे अवघड गेले.

सालबाईचा तह १७ मे १७८२

[संपादन]
मुख्य पान: सालबाईचा तह

महादजी शिंदे यांचा इंग्रजांकडून पराभव झाल्यानंतर महादजीने इंग्रजाबरोबर मुत्सदेगिरीने तहाची बोलणी केली. हा तह सालाबाईचा तह या नावाने ओळखला जातो. या तहानुसार इंग्रजांनी सवाई माधवरावला पेशवा म्हणून मान्यता दयावी व रघुनाथरावला वेतन द्यावे. या तहानुसार शिंद्यांना यमुनेच्या पश्चिमेकडील सर्व प्रांत परत मिळाला पण उज्जैनमध्ये माघार घ्यावी लागली.

इंग्रजाशी झालेल्या तहानंतर इंग्रजांबरोबर असलेल्या शस्त्रसंधीचा उपयोग महादजीने चांगलाच उपयोग करून घेतला.