योगिराज पैठणकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

श्री योगिराज महाराज पैठणकर ( Yogiraj Maharaj Paithankar ),(श्रीएकनाथमहाराज संस्थान, श्रीक्षेत्र पैठण) हे महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार , प्रवचनकार म्हणून सुपरिचित आहेत. शांतिब्रह्म श्रीसंत एकनाथ महाराजांचे ते १४ वे वंशज [१] आहेत. घरात परंपरेने चालत आलेल्या वारकरी सांप्रदायाचे संस्कार असल्याकारणाने बालपणापासूनच परमार्थाप्रती त्यांना विशेष रुची निर्माण झाली. महाराज हे जेष्ठ आध्यात्मिक विभूती तथा श्रीएकनाथमहाराज संस्थानाधिपती श्री भैय्यासाहेब महाराज पैठणकर यांचे नातू. योगिराज महाराजांचे पारमार्थिक शिक्षण सद्गुरू श्री जोगमहाराज वारकरी शिक्षणसंस्था आळंदी येथे झाले असून तेथील कीर्तन परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. येथील चार वर्षांचा अभ्यास पूर्ण केल्यानंतर इ. स. २००५ पासून महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरही अनेक कीर्तन व्याख्यानांच्याद्वारा वारकरी संप्रदायाचा प्रसार आणि प्रचार करीत आहेत.

इ. स. २००६ साली त्यांनी "शांतिब्रह्म श्रीएकनाथमहाराज मिशन,पैठण" या सामाजिक संस्थेची स्थापना केली[२] सर्व स्तरातील गरजुंना मदत व्हावी यासाठी ते समाजकार्यातही कार्यरत आहेत. श्री जोगमहाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या शताब्दी वर्षपूर्तीचे औचीत्त्य साधत त्यांचेद्वारा "Online वारकरीसंप्रदाय अभ्यासक्रम परीक्षा" या नावीन्यपूर्ण प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली आहे. या तीन वर्षांच्या अभ्यासक्रमाद्वारे सर्व संतांचे वाङ्मय अभ्यासण्याची सोय झाली असून जगभरातील हजारो विद्यार्थी याचा लाभ घेत आहेत. मिशनद्वारा इ.स.२०१८ सालापासून श्रीसंत एकनाथमहाराजांच्या नावाने विविध सहा पुरस्कार देण्यास सुरुवात करण्यात आली असून राज्यस्तरीय असणाऱ्या या पुरस्कारांनी अनेक मान्यवरांना सन्मानित करण्यात आले आहे. मिशनद्वाराच इ.स. २०१८ मध्ये श्रीक्षेत्र आळंदी येथील श्रीसंत ज्ञानेश्वरमहाराज समाधी मंदिरात असणाऱ्या श्रीसंत एकनाथमहाराज पाराचा जीर्णोद्धार करून त्याठिकाणी श्री एकनाथमहाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे.

सोशल मीडियाचा वापर हा संतवाङ्मयाच्या प्रसारासाठीही चांगल्यापद्धतीने होऊ शकतो हे जाणून दररोज नित्य 'श्री सार्थ एकनाथी भागवताच्या' काही ओव्या पोचवण्याचे कार्य सुरू आहे. हजारो वाचक याचा लाभ घेत आहेत. संत एकनाथमहाराजांचे, संतांचे विचार हे फक्त सांगण्यासाठी नसून त्याचे आचरणही व्हावे या उद्देशाने गेल्या अनेक वर्षांपासून श्रीएकनाथ षष्ठीच्या दिवशी स्वतःच्या वाड्यात त्यांनी 'वारकरी-वैष्णव पाद्य पूजनास' सुरुवात केली आहे. [१] वृत्तपत्रीय स्तंभ लिखाण, टेलिव्हिजनच्या माध्यमातून कीर्तन आणि संतांच्या वाङ्मयाचा प्रसार ते करीत आहेत. श्रीसंत एकनाथमहाराजांच्या वाङ्मयाविषयी त्यांचे विशेष प्रेम दिसून येते. नाथ महाराजांच्या शांती आणि समतेचा विचार विश्वपटलावर नेण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत.

संदर्भयादी[संपादन]

  1. ^ "संग्रहित प्रत". Archived from the original on 2013-12-06. 2013-02-04 रोजी पाहिले.
  2. ^ http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/11467240.cms मटा संकेतस्थळ दि. १९ एप्रिल २०१३ रोजी दुपारी भाप्रवे १३.३६ वाजता जसे तपासले

बाह्य दुवे[संपादन]