Jump to content

भीम स्वामी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
श्रीभीम स्वामी(तन्जावर )
Tanjavar Rajmudra-तंजावर राजचिन्ह

मूळचे साताऱ्याजवळच्या शहापूरचे असणारे भीमस्वामी हे समर्थांच्या आज्ञेवरून तामिळनाडू प्रांतामधील तंजावर येथे गेले. तेथेच त्यांचा मठ व समाधी आहे. त्यांना ९९ वर्षांचे दीर्घायुष्य लाभले.

समर्थ संप्रदायाचे घनिष्ठ संबंध

[संपादन]

भीमस्वामी इ.स. १६७७ पासून इ.स. १७४२ पर्यंत तंजावरात रामदासी मठाधिपती म्हणून राहिले व त्यांनी दक्षिण भारतात श्रीरामभक्तीचा प्रचार व प्रसार केला. या कालखंडात तंजावर भोसले राजदरबारात राजसत्ता चालविणारे राजे खालीलप्रमाणे होते:

  1. श्रीमंत व्यंकोजी राजे भोसले इ.स. १६७७ ते १६८३
  2. श्रीमंत शहाजी राजे भोसले इ.स. १६८४ ते १७१२
  3. श्रीमंत शरभोजी राजे भोसले (पहिले) इ.स. १७१२ ते १७२८
  4. श्रीमंत तुळजेंद्र राजे भोसले (पहिले) तथा तुकोजी इ.स. १७२८ ते १७३५
  5. श्रीमंत एकोजी राजे भोसले (दुसरे) इ.स. १७३६ ते १७३९
  6. श्रीमंत प्रतापसिंह राजे भोसले इ.स. १७४० ते १७६३
  7. श्रीमंत तुळजेंद्र राजे भोसले (दुसरे) १७६३ ते १७८७

श्री भीमस्वामी तंजावर मठात सुमारे ६३ वर्षे होते. सर्व भोसले वंशीय राजे भीमस्वामींस यथोचित आदर सत्कार करीत असत. सर्वप्रथम व्यंकोजीराजेंनी रामदासी दीक्षेचा स्वीकार केला व तदनंतर प्रतापसिंह राजे रामदासी झाले. त्यांच्या दीक्षेमागे एक रंजक कथा तंजावरात सांगितली जाते, ती अशी.

एके दिवशी श्रीरामनवमी उत्सवांत श्रीप्रतापसिंहराजे श्रीभीमस्वामी मठांत श्रीरामांचे दर्शनास गेले होते. त्यावेळी भीमस्वामींचे कीर्तन सुरू होते. काही विघ्नसंतोषी लोकांनी श्रीप्रतापसिंह महाराजांना आग्रह करून पुढील प्रश्न विचारावयास सांगितला, “स्वामी तुम्ही थोर रामभक्त आहात. तरी कीर्तन करून श्रीरामास प्रत्यक्ष कराल काय?

परिस्थिती जाणून श्रीभीमस्वामींनी श्रीसमर्थांचे स्मरण करून रामाचे ध्यान केले व “येई राम राया । नेई भवतम विलया” अशी रामरायाची आर्त विनवणी करणारे पद कीर्तनात गाण्यास सुरुवात केली. सवेंच मठांत श्रीरामासंनिध ज्योतिमय प्रकाश उत्पन्न होऊन श्रीरामाचा मंडप (देव्हारा) दोन हात पुढे सरकून आला! प्रतापसिंह राजे व सभेतील सर्व मंडळी या घटनेने आश्चर्यमुग्ध होऊन रामाच्या ध्यानात विमग्न झाले!पुढे महाराजांनी भीमस्वामींकडे क्षमायाचना केली. ह्या घटनेचा उल्लेख श्रीभीमस्वामींचे चरित्रात येतो.

चाले वृत्त: मिळोनि साधु सत्त्वरीं। तयासी भोजनोत्तरीं।पुसे कसें बसे घरी। असोनी देव अंतरी।

विचार थोर यापरी। करोनियां परोपरी।प्रजा निजार्थ अंतरी। घरी सुभक्ति त्यावरी॥३१॥

आर्या: प्रार्थिती शिष्य तयाशीं एके दिवसी कथा करायासी।पाहुनि रघुवर यांशी गाति भक्ति कडुनि रामासी ॥३२॥

पद: येई रामराया नेई भवतम विलया...॥३३॥

श्लोकः गड गड रथ आला राघवाचा समोरी।निरखुनी जन त्यांची मानिती भक्ति भारी।

बहुविद महिमेतें दाविले या प्रकारी।श्रवण जगीं तयाचे सर्व पापें निवारी॥३४॥

आर्या: पाउनि खेद मनासी निंदुमि निर्बंधकारी शिष्यासी।निगमाद्यगोचराशी म्हणती अपराधी जाहलो यासे॥३५॥

या प्रसंगानंतर श्रीप्रतापसिंह राजांनी आपणास मंत्रोपदेश करण्याचे विनंती श्री भीमस्वामींस केली. श्री भीमस्वामींनी राजांना मन्नरगुडी येथील अनंतमौनी मठाचे परंपरेतील श्रीमेरुस्वामींचे शिष्य श्रीसेतुस्वामींकडे मंत्रोपदेश घेण्याची आज्ञा केली. त्यांचे आज्ञेप्रमाणे श्री महाराजांनी श्रीसेतुस्वामींकडे जाऊन मंत्रोपदेश घेतला. (सदर घटनेचे पत्रव्यवहार तंजावर येथे सुरक्षित आहेत, व अस्सल कागदपत्रे प्रकाशित आहेत)

आपल्या सद्गुरूंचा गौरव करावा या हेतूने श्रीप्रतापसिंह महाराजांनी तंजावरातील आपल्या राजवाड्यासमोर श्रीस्वामींस एक प्रचंड मोठा मठ निर्माण करून देऊन, श्रीसीताराम प्रभुंचे नित्य पूजा उत्सवासाठीं काहीं भूमीही दानशासन करून दिली आणि श्रीस्वामीचे विशेष आराधनेसाठी एक मारुतीचे मंदिर पश्चिम राजरस्त्यावर बांधून देऊन त्या मारुतीस “प्रतापवीर हनुमान” असे नाव दिले.आजही तो त्याच नावाने प्रसिद्ध आहे. तसेच श्रीरामाचे मंदीरही निर्माण केले व त्याचे “प्रतापराम” असेनामकरण केले व आपला या रामाशी व रामदासी सांप्रदायाशी असलेला ऋणानुबंध कायमचा रहावा व सर्व जगतांस ज्ञात व्हावा या हेतूने आपल्या राजमुद्रेत “श्रीरामप्रताप” अशी अक्षरेही श्रीप्रतापसिंहराजेंनी कोरून घेतली.

श्रीसेतूस्वामींकडे अनुग्रह घेतल्यामुळे महाराज श्रीमंत प्रतापसिंह राजे भोसले स्वतः रामदासी झाले. महाराजांनी स्वतः मराठी भाषेत एकूण वीस नाटके लिहिली. स्वतः रामदासी असल्याने त्यांच्या प्रत्येक नाटकास प्रभु रामचंद्रांचे आशीर्वाद लाभावेत म्हणून ती सर्व नाटके प्रथम रामनवमी उत्सवात सादर केली जात.

तसा उल्लेख त्यांच्या “प्रबोध चंद्रोदय” या नाटकाच्या पहिल्या अंकाच्या शेवटच्या पानावर आहे. यातील तंजावरच्या सरस्वती महाल ग्रंथालयात सध्या १७ नाटके उपलब्ध आहेत. १) सीताकल्याण २) उषाकल्याण ३) पार्वतीकल्याण ४)मित्रविंदा परिणय ५)मायावती परिणय ६) प्रभावती परिणय ७)रुक्मिणी कल्याण ८) धृव चरित्र ९)ययातीचरित्र १०) रुक्मांगद चरित्र ११) पारिजातापहरण १२) जानकीसुखोल्हास १३) श्रीकृष्णजनन १४) अनसूया उपाख्यान १५) स्यमंतकोपाख्यान १६) प्रबोधचंद्रोदय १७) लक्ष्मणपरिणय इ.

तंजावर श्री भीमस्वामी कॄत पद.