धनंजय चंद्रचूड
धनंजय चंद्रचूड | |
---|---|
धनंजय चंद्रचूड | |
५०वे भारताचे सरन्यायाधीश | |
Assumed office ९ नोव्हेंबर २०२२ | |
Appointed by | द्रौपदी मुर्मू |
Prime Minister | नरेंद्र मोदी |
मागील | उदय उमेश लळीत |
न्यायाधीश, भारतीय सर्वोच्च न्यायालय | |
कार्यालयात ८ नोव्हेंबर २०२२ – १३ मे २०१६ | |
Nominated by | टी.एस. ठाकूर |
Appointed by | प्रणव मुखर्जी |
वैयक्तिक माहिती | |
जन्म |
धनंजय चंद्रचूड ११ नोव्हेंबर, १९५९ बॉम्बे, मुंबई प्रांत |
धनंजय यशवंत चंद्रचूड (११ नोव्हेंबर १९५९) हे भारताचे ५० वे सरन्यायाधीश आहेत. [१] त्यांचा कार्यकाळ २ वर्षांचा अपेक्षित आहे. [२] त्यांनी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे J1 न्यायाधीश (सरन्यायाधीशानंतरचे सर्वात वरिष्ठ न्यायाधीश) असताना राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाचे माजी पदसिद्ध कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम केले आहे. [३] याव्यतिरिक्त ते अलाहाबाद उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश आणि मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आहेत.
सर्वाधिक काळ सेवा देणारे मुख्य न्यायाधीश वाय.व्ही. चंद्रचूड यांच्या पोटी त्यांचा जन्म झाला. सुलिव्हन आणि क्रॉमवेल आणि मुंबई उच्च न्यायालयात काम करण्यापूर्वी त्यांचे शिक्षण दिल्ली आणि हार्वर्ड विद्यापीठात झाले. ते मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि नंतर अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश झाले.
एक उदारमतवादी न्यायाधीश म्हणून ओळखले जाणारे चंद्रचूड हे गोपनीयतेचा निकाल आणि सबरीमाला प्रकरण यासारखे ऐतिहासिक निकाल देणाऱ्या खंडपीठांचा भाग आहेत. ते मुंबई, ओक्लाहोमा, हार्वर्ड, येल आणि इतर विद्यापीठांना प्राध्यापक म्हणून भेट देतात.
त्यांनी ९ नोव्हेंबर २०२२ रोजी न्यायमूर्ती उदय उमेश लळित यांच्यानंतर भारताचे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला. त्यापूर्वी त्यांच्या नामांकनाला हितसंबंधांच्या संघर्षाच्या कारणास्तव आव्हान देण्यात आले होते. न्यायमूर्ती उदय उमेश लळित यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने चंद्रचूड यांच्या शपथविधी समारंभाच्या एक आठवडा आधी ही याचिका फेटाळून लावली होती. [४]
शिक्षण
[संपादन]धनंजय चंद्रचूड यांचे शालेय शिक्षण मुंबईतील कॅथेड्रल व जॉन कॅनन स्कूलमध्ये आणि नवी दिल्लीत सेंट कोलंबा स्कूलमध्ये झाले. दिल्ली विद्यापीठातून अर्थशास्त्र व गणितात प्रथम क्रमांकाने पदवी संपादन केल्यावर त्यांनी तेथूनच एल्एल.बी. आणि हार्वर्ड विद्यापीठातून एल्एल.एम. प्राप्त केली. त्यानंतर हार्वर्डमधून जोसेफ बेले पारितोषिकासह न्यायशास्त्र (ज्युरिडिकल सायन्स) विषयात डॉक्टरेटही मिळविली.
वकिली आणि न्यायाधीशी
[संपादन]मुंबई उच्च न्यायालयात वकिली करीत असताना चंद्रचूडांनी रिझव्र्ह बँक, ओएनजीसी यासह अनेक केंद्रीय आस्थापना, मुंबई विद्यापीठ यांसह अन्य महत्त्वाच्या संस्थांची बाजू मांडली. मुंबईतील चौपाट्यांच्या पर्यावरणीय दृष्टिकोनातून झालेल्या दुरवस्थेबाबत अहवाल देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या उच्चस्तरीय समितीत ते सदस्य होते. त्यांची १९९८ मध्ये अतिरिक्त सॉलिसिटर जनरलपदी, तर २९ मार्च २००० रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाली. अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून त्यांचा ३१ ऑक्टोबर २०१३ रोजी शपथविधी झाला. १३ मे २०१६ रोजी चंद्रचूड सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती झाले.
मुंबईच्या उच्च न्यायालय
[संपादन]मुंबईच्या कारकिर्दीत भारतातील कंपनीचे समभाग परदेशात हस्तांतर केल्यावर झालेल्या भांडवली वृद्धीवर (कॅपिटल गेन) भारतात कर आकारला जाऊ शकतो, हा त्यांचा निकाल देशासाठी आजही महत्त्वाचा आहे. मुंबईतील वारसा-वास्तूंवर जाहिरातफलक लावू नयेत, मुंबईतील सर्व टॅक्सी व बसगाड्या डीझेलवर न चालवता त्यांचे सीएनजीकरण करावे, मुंबई महानगर प्रदेशातील सर्व कांदळवनांचे उपग्रह-नकाशे तयार करावे यासारखे मुंबईवर प्रभाव टाकणारे, तसेच पुण्यातील हरित पट्ट्यांचे संरक्षण व त्यांची वाढ करणे, वृक्षप्राधिकरणाचे अधिकार आदींबाबतचे निर्णयही त्यांनी मुंबई उच्च न्यायालयातून दिले.
अलाहाबाद उच्च न्यायालय
[संपादन]मानवाधिकार आयोगाने सरकारला किंवा प्रशासनाला दिलेले निर्देश हे सरकारवर बंधनकारकच असतात, शिक्षणाचा मूलभूत हक्क यशस्वी होण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांनी सरकारी शाळांतच आपल्या पाल्यांना शिकवावे यासारखे निर्णय त्यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयातून दिले. बेकायदा वाळू उत्खनन, लैंगिक छळवादातून झालेल्या अॅसिड हल्ल्याच्या प्रकरणासारख्या जनहिताच्या बाबींवर महत्त्वाचे निकालही त्यांनी तेथून दिले.
संदर्भ
[संपादन]- ^ "Justice DY Chandrachud, Set to Become CJI in 2022, Finds Place in All Important Matters of SC". News18 (इंग्रजी भाषेत). 2019-11-10. 2022-01-22 रोजी पाहिले.
- ^ "Justice D.Y. Chandrachud appointed 50th Chief Justice of India". TheHindu.com. 17 October 2022 रोजी पाहिले.
- ^ "Justice D.Y. Chandrachud appointed as the executive chairman of National Legal Services Authority". The Hindu. 2022-09-03. 2022-09-03 रोजी पाहिले.
- ^ "Supreme Court dismisses plea challenging DY Chandrachud's appointment as next CJI; 'Misconceived'". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2022-11-02. 2022-11-08 रोजी पाहिले.