"अक्षर ही निसर्गाने मानवाला दिलेली कल्पना बायनरीतून यशस्वीपणे कशी पेलायची, हे इंग्रजीला एका विवक्षित पातळीनंतर झेपणार नाही. जगाला "अक्षर' ही कल्पना मराठीच देऊ शकेल. त्यामुळे संगणकीय क्षेत्रात मोठी क्रांती होऊ शकेल. मराठी भाषा अस्तंगत झाली तर जगाला पुढील शतकात शास्त्रीय भाषा शोधताना मराठीचे पुन्हा उत्खनन करावे लागेल.'
मराठी शुद्धलेखनाची नवी नियमावली तयार करण्याचा निर्णय अखिल मराठी साहित्य महामंडळाने घेतला असून, त्याची माहिती मराठी जगताला व्हावी, यासाठी महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी दहा दिवसांपूर्वी एक पत्र पाठविले. ते बातमीरूपात "सकाळ'मध्ये प्रसिद्ध झाले. हे पत्र प्रसिद्ध झाल्यावर मला प्रश्न पडला, की व्याकरण, शुद्धलेखनाचे इतके नियम असताना महामंडळाने हा घाट का घातला असेल? मराठीच्या भवितव्याची दररोज चिंता व्यक्त केली जात असताना मराठीच्या गळ्यात हे लोढणे कशासाठी बांधायचे? असे काही विचार मनात असतानाच मुंबईचे श्री. शुभानन गांगल यांचा मेल इनबॉक्समध्ये पडला. "मराठी भाषेतील अक्षर किती उच्च दर्जाचे आहे, हे "मराठी भाषाविज्ञान, ध्वनी ते अक्षरनिर्मिती' या नव्या पुस्तकातून उमगेल. आजपर्यंत मराठी भाषेचे लेखन-नियम कसे चुकीचे लिहिले गेले, हे या पुस्तकातून कळेल,' अशा आत्मविश्वासाने त्यांच्या पत्राची सुरवात होती आणि पुस्तकाचे मनोगत त्यांनी वाचण्यासाठी पाठविले होते. या लेखाच्या सुरवातीस दिलेले वाक्य हा त्या मनोगताचाच भाग आहे. श्री. गांगल काहीतरी वेगळे, मूलभूत काम करत आहेत, हे या मनोगतावरून लक्षात आले. त्यांच्याशी संवाद झाल्यावर खात्री पटली, की मराठी भाषेच्या संदर्भात एक ऐतिहासिक संशोधन ते करत आहेत. या संशोधनाचे महत्त्व हे, की मराठी भाषेचे श्रेष्ठत्व त्यांनी "शास्त्र' म्हणून सिद्ध केले आणि व्यवहारात तिचा इंग्रजीपेक्षाही चांगला वापर कसा होऊ शकेल, यासाठीचे यशस्वी प्रयोग केले. प्रक्षेपण आणि ग्रहण साध्य करणारी ध्वनी ही एकमेव ऊर्जा असून, त्या ध्वनिऊर्जेचा शास्त्रोक्त वापर मराठीने किती चपखल केला आहे आणि या निकषावर इंग्रजीसह इतर भाषा किती अतृप्त, अपूर्ण आहेत, हेही दाखवून दिले. मराठीचा इंग्रजीपुढे निभाव लागणार नाही, असे आपण मानायला लागलो आहोत. पण श्री. गांगल यांचे संशोधन समजून घेणारा मराठी माणूस हे गृहीतक मान्य करणार नाही. उलट जगातील सर्वश्रेष्ठ भाषा बोलण्याची, लिहिण्याची, ऐकण्याची आणि संगणकासाठी वापरण्याची संधी मिळाली म्हणून त्याचे मन अभिमानाने भरून जाईल.
गोकुळ यांनी आपल्या कारकिर्दीची सुरवात "प्रभात'मध्ये १९४७ पासून केली. "प्रभात'च्या कॅमेरा विभागात त्यांनी उमेदवारी केली. पुढे त्यांनी स्वतंत्रपणे छायालेखनास सुरवात केली. "सोबती', "सख्या सावरा मला', "छोटा जवान', "देवा तुझी सोन्याची जेजुरी', "मानसापरीस मेंढरं बरी', "लक्ष्मीची पाउले', "पुढारी', "नवर्याने सोडली', "स्त्रीधन', "फुकटचंबू बाबूराव', "डाळिंबी', "बहिणीबहिणी', "संसार माझा सुखाचा' अशा अनेक चित्रपटांसाठी त्यांनी छायालेखन केले. त्यापैकी "सोबती', "स्त्रीधन', "लक्ष्मीची पाउले' या चित्रपटांच्या छायालेखनासाठी त्यांना पुरस्कार मिळाले. नुकताच अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे त्यांना चित्रकर्मी पुरस्कार देण्यात आला होता.
संघटित शक्ती उभी करून स्थानिक लोकांच्या व्यवसायांवर अतिक्रमण करून त्यांना देशोधडीला लावणे, गोरगरीब आदिवासींना नाडणे, स्थानिक पुढार्यांना हाताशी धरून आपला स्वार्थ साधणे, गावात धामिर्क आणि प्रांतिक दुफळी माजविणे, असे असंख्य उद्योग परप्रांतीयांनी जव्हारमध्ये आरंभले होते. स्थानिकांमध्ये असंतोष खदखदत होता; त्याचाच उदेक बुधवारी झाला आणि गुरुवारी तर हे लोण शेजारच्या वाडा, विक्रमगड या आदिवसी तालुक्यांतही पसरले.
जव्हारमधील प्रकाराला हिंदू-मुस्लिम संघर्षाचा रंग देण्याचा प्रयत्न होत असला तरी या संघर्षामागील मुख्य कारण परप्रांतियांविरोधातील असंतोष हेच आहे. त्यामुळे परप्रांतीय लोंढ्यांचा उपदव केवळ मुंबई-ठाण्यापुरता मर्यादित नसून ते लोण आता खेड्यापाड्यातही पोहोचल्याचे स्पष्ट होत आहे.
आदिवासींचा तालुका म्हणून जव्हार ओळखला जातो. या गावात स्थानिक मुस्लिम आणि हिंदू गुण्यागोविंदाने नांदत होते. मात्र, गेल्या चार वर्षांपासून या भागात उत्तर प्रदेश आणि बिहारहून लोंढे धडकू लागले आहेत. त्यात बहुसंख्य मुस्लिम आहेत. जव्हार एसटी स्टँडच्या मागे असलेल्या डॅम आळी भागात झोपड्या बांधून ते राहतात. त्यापैकी काही जणांनी व्यवसायधंदे करून आपले बस्तान बसवले असून नव्याने येणार्या परप्रांतियांना स्थिरस्थावर होण्यासाठी ते आपली सारी शक्ती पणाला लावतात. जव्हारच्या १५ हजार लोकवस्तीत १५०० परप्रांतीय आहेत. त्यांनी संघटितरित्या स्थानिक लोकांच्या व्यवसायांवर अतिक्रमण करण्यास सुरुवात केली आहे. स्थानिक लोकांचे व्यवसाय बंद पाडणे, हा त्यांचा एकमेव उद्देश असतो. त्यामुळे सुरुवातीला नुकसान सोसून हे लोक धंदा करतात...
स्वतःचा अनुभव हाच गुरू मानून कलेची सेवा केली- गंगाराम गवाणकर
कुणाचाही आधार नसताना, कोणताही गुरू अथवा गॉडफादर नसताना गेली ३६ वर्षे मी मराठी रंगभूमीची निःस्वार्थीपणे सेवा केली आहे. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर अनुभवाचा एक-एक गुरू मला भेटत गेला. अशा शब्दांत आपले भवविश्व उलगडतानाच तरुण कलावंतांनीही स्वतःच गुरू बनून कलेची सेवा केली पाहिजे, असे आवाहन वस्त्रहरणकारगंगाराम गवाणकर यांनी केले.
एकता कल्चरल अकादमी या संस्थेचा एकता सांस्कृतिक महोत्सव व एकता पुरस्कार वितरण सोहळा नुकताच पार पडला. या वेळी गवाणकर यांना आंतरराष्ट्रीय ख्यातीचे लघुपट निर्माते-दिग्दर्शक आनंद पटवर्धन यांच्या हस्ते एकता कला गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अकादमीचे अध्यक्ष प्रकाश जाधव होते.
आचार्य अत्रे, पु. ल. देशपांडे आदींचा आशीर्वाद लाभल्यामुळे माझ्यासारख्या गरीब कुटुंबातून आलेल्या कलाकाराला हुरूप आला. नामवंतांकडून प्रेरणा व शाब्बासकी मिळत गेली, असेही गवाणकर यांनी आपल्या सत्काराला उत्तर देताना सांगितले.
एकता सांस्कृतिक महोत्सवाचे आनंद पटवर्धन यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या वेळी अकादमीतर्फे घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमधील विजेत्यांना ज्येष्ठ नृत्य दिग्दर्शक सुबल सरकार, अभिनेते राजा मयेकर, कवी व पत्रकार भगवान निळे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले, तर कवी भाऊ पंचभाई, पत्रकार हर्षल मळेकर, क्रीडापटू लता पांचाळ, अभिनेता संदेश जाधव, नृत्यांगना किशू पाल, उद्योजक रुजारिओ पिंटो, शाहीर दत्ताराम म्हात्रे, समाजसेवक मोहन पवार, ज्योती ठाकरे, सिद्धार्थ कासारे, धनेश रुके, सुधा पवार, संजय भावसार, चंद्रकिरण सतपाळ, दशरथ पवार आदींना एकता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
विविध ज्ञानशाखांतील विषयांचे आकलन होण्यासाठी संदर्भ साहित्याची पुस्तके सोप्या मराठीत तयार करावीत. तसेच एनसीईआरटीची पुस्तके आधारभूत मानून त्यांचा अनुवाद करण्याचे आदेश मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी संबंधितांना सोमवारी येथे दिले.
राज्य मराठी विकास संस्थेच्या नियामक मंडळाच्या मंत्रालयात झालेल्या बैठकीत अध्यक्ष या नात्याने बोलताना मुख्यमंत्री देशमुख म्हणाले: मराठीच्या विकासासाठी काम करणार्या आणि महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोलाचा वाटा असलेल्या राज्यातील शैक्षणिक सांस्कृतिक व सामाजिक संस्थांचा माहितीकोश असणे आवश्यक आहे.
हा माहितीकोश स्वातंत्र्यपूर्व, महाराष्ट्राच्या निमिर्तीपूवीर्चा आणि निमिर्तीनंतरचा काळ अशा तीन टप्प्यांत व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त करून, मराठीच्या विकासासाठी राज्याबाहेर प्रयत्नशील असणार्या संस्थांना आर्थिक मदत देण्यास सरकार तयार असल्याचे ते म्हणाले...
सुमारे वर्षभर जागतिक स्तरावर चर्चा सुरू असलेल्या टाटा मोटर्सच्यानॅनो या 'पीपल्स कार'चे अखेर गुरुवारी अनावरण झाले. देशातील सर्वात मोठ्या ऑटो शोमध्ये रतन टाटांनी चार चाकांवर चालणार्या आणि जाहीर केल्याप्रमाणे एक लाख रुपयांत उपलब्ध केल्या जाणार्या या गाडीचे दर्शन घडवले. सुरक्षेचे आणि पर्यावरणाचे निकष पाळणारी ही गाडी असल्याची ग्वाहीही कंपनीने दिली आहे.
चार वर्षांपूर्वी एक लाख रुपयांमध्ये गाडी बनवण्याचे आपण वचन दिले होते, त्यानंतर कच्च्या मालाच्या किमतीत प्रचंड वाढ झाली. परंतु वचन हे पाळण्यासाठी असते या तत्त्वाचा दाखला देत हे ड्रीम प्रोजेक्ट प्रत्यक्षात उतरवल्याचे टाटा म्हणाले. डीलरकडे ही गाडी एक लाख रुपयांमध्ये मिळेल, ज्यावर व्हॅट आणि वाहतूक खर्च ग्राहकाला भरावा लागेल. सध्या या सेगमेंटमधील गाडीच्या जवळपास अर्ध्या किमतीत ही गाडी मिळणार असून, महागड्या मोटरसायकल घेणारे ग्राहकही आकर्षित होतील असा अंदाज आहे. सुरक्षेचे नियम, पर्यावरणाचे निकष आदींच्या दृष्टीने टाटांच्या कारबाबत प्रश्नचिन्हे निर्माण करण्यात आली होती. परंतु 'नॅनो' भारत स्टेज टू तसेच युरो फोर या निकषांना उतरेल असे टाटा म्हणाले.
भारताचा माजी कर्णधार आणि ऑलिंपियन हॉकीपटू विरेन रस्किन्हाने आंतरराष्ट्रीय हॉकीमधून निवृत्ती जाहीर केली. आता तो उच्च शिक्षणावर लक्ष केंदित करणार आहे. मुंबईकर रस्किन्हा मधल्या फळीतील भरवशाचा खेळाडू म्हणून नावलौकिक कमावलेल्या या २७ वषीर्य गुणी खेळाडूने आठ वर्ष देशाचे प्रतिनिधित्त्व केले. यापुढे एमबीएचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यावर तो भर देतोय. गेले सहा महिने रस्किन्हाचा अभ्यास सुरू असून हैदराबादच्याइंडियन स्कूल ऑफ बिसनेसमध्ये त्याने प्रवेश मिळवलाय.
बॉलिवूडप्रमाणेमराठी सिनेमा ही एक स्वतंत्र सिनेमासृष्टी असून कोणताही ताण न घेता तरुण निर्मात्या-दिग्दर्शकांनी त्यांच्या नवीन कल्पना घेऊन हवा तसा सिनेमा काढावा. ऑस्करसाठी 'श्वास' गेला, तसा व्यावसायिक मराठी यशाचे गाणित बदलणार्या 'साडे माडे तीन' मुळे कापोर्रेट क्षेत्रही आता मराठी सिनेमात पैसे गुंतवू लागले आहे, असा सकारात्मक सूर मराठी सिनेमापुढील आव्हानांवरील चर्चासत्रातून बुधवारी व्यक्त झाला.
' साडे माडे तीन' मुळे मराठी सिनेमा दाखवण्यासाठी नवी थिएटर पुढे आली आहेत. दिग्दर्शक सुभाष घई 'कांदेपोहे'ची निमिर्ती करत असताना रिलायन्ससारखा मोठा उद्योगसमूह बंगालीप्रमाणे मराठी सिनेमाच्या निमिर्तीसाठी पुढे येतोय, असे अजय सरपोतदार यांनी सांगितले. मराठीत तरुण दिग्दर्शक सर्वात जास्त असल्यामुळेच अमराठी माणसांकडून मराठी सिनेमात पैसा गुंतवला जात आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पर्थ, ता. १७ - टीम इंडियाच्या कसोटी संघाच्या कर्णधार अनिल कुंबळेने आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसर्या कसोटी सामन्यात ऍण्ड्य्रू सायमंडस्ला बाद करून कुंबळेने कसोटी क्रिकेटमध्ये आपला ६०० वा बळी मिळविला.
अशी गौरवशाली कामगिरी करणारा तो पहिला भारतीय आणि कसोटी क्रिकेटमधील तिसरा गोलंदाज ठरला आहे. आपल्या १२४ व्या कसोटी सामन्यांत त्याने ही दैदीप्यमान कामगिरी केली.
सर्वाधिक कसोटी बळींच्या शर्यतीत ऑस्ट्रेलियाचा शेन वॉर्न (७०८) आणि श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरन (७२३) हे दोन गोलंदाज कुंबळेपेक्षा पुढे आहेत. वॅकाच्या वेगवान खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजांना फारसे यश मिळालेले नाही. भारताचे वेगवान गोलंदाज ऑस्ट्रेलियन फलंदाजीचे कंबरडे मोडत असताना कुंबळेने स्वतःला २८ व्या षटकात गोलंदाजी घेतली आणि आपल्या पाचव्या षटकातील चौथ्या चेंडूवर त्याने सायमंडस्चा बळी मिळविला. धोणीच्या ग्लोजला लागून उडालेला चेंडू द्रविडने झेलल्यानंतर जोरदार अपिल झाले. पंच अर्षद रौफ यांनी काही सेकंदांनंतर सायमंडस् बाद असल्याचा निर्णय दिला आणि कुंबळेचा आनंद गगनात मावेनासा झाला. दुसर्या एण्डकडे असलेला नाबाद फलंदाज ऍडम गिलख्रिस्टने लगेचच कुंबळेचे अभिनंदन केले.
एकाच डावात १० पैकी १० बळीं मिळविण्याची ऐतिहासिक कामगिरी करणार्या कुंबळेने ४०० आणि ५०० वा बळी मायदेशात अनुक्रमे बंगळूर आणि मोहाली येथे मिळविलेले आहेत.
घर देताना सर्वप्रथम मराठी माणसाला प्राधान्य... मध्यमवगीर्य मराठी माणसाच्या गरजा ध्यानात घेऊन ५०० चौरस फुटांपर्यंतची घरे १० लाख रुपयांपर्यंत... इतरांना घरे देताना ते निदान १५ वषेर् महाराष्ट्रात वास्तव्य असलेले असतील याची काळजी घेणार... हे नवे 'गृहधोरण' आखलेय मराठी बिल्डरांनी. महाराष्ट्र बिल्डर असोसिएशनच्या बॅनरखाली नवी मुंबईत 'मी मराठी'ला जोरदार प्रतिसाद मिळाल्यामुळे मुंबई, ठाणे, पुणे, नाशिकमध्येही 'जय महाराष्ट्र'चा आवाज घुमवण्याचे असोसिएशने ठरवले आहे.
' कोणाला टक्कर देण्यासाठी नव्हे तर स्थानिकांना चांगली घरे योग्य किंमतीत उपलब्ध करून देणे हा यामागील उद्देश आहे. नवी मुंबईत असोसिएशनच्या माध्यमातून १०४ बिल्डर एकत्र आले असून काही दिवसांत मुंबईतीलही मराठी बिल्डरांना एकत्र आणले जाणार आहे, असे असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश हावरे यांनी 'मटा'ला सांगितले. पण यातून मराठी आणि परप्रांतीय असे नवे 'बिल्डर वॉर' निर्माण होण्याची शक्यता काही बिल्डर वर्तवत आहेत....
सिडनी कसोटीत दाखविलेली मस्ती ऑस्ट्रेलियाला महागात पडली. अनिल कुंबळेच्या भारतीय संघाने रिकी पॉंटिंगच्या संघाला "गर्वाचे घर खाली' हेच दाखविले. मेलबर्न व सिडनी कसोटी गमावलेल्या भारतीय संघासमोर पर्थच्या खेळपट्टीचा बागुलबुवा निर्माण करून घाबरविण्याचा केलेला प्रयत्न आज ऑस्ट्रेलियाच्याच अंगाशी आला. स्विंग गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलिया नांगी टाकते, हे सिद्ध करीत, पर्थमधील पहिला कसोटी विजय भारताने साकारला.
सिडनीत पंच स्टीव्ह बकनर व मार्क बेन्सन यांच्या "कर्तबगारी'च्या जोरावर विजय मिळवून सलग सोळा कसोटी विजयांच्या कामगिरीची बरोबरी केल्यानंतर पॉंटिंगचा संघ पर्थमध्ये सलग सतरावा विजय मिळविण्यासाठी उत्सुक होता. प्रत्यक्षात, २००१च्या इतिहासाची आज पुनरावृत्ती झाली. त्या वेळी स्टीव्ह वॉच्या संघाने सलग सोळा कसोटी सामने जिंकले होते. कोलकत्यातील कसोटी फॉलोऑनच्या नामुष्कीनंतरही भारताने जिंकली व वॉच्या संघाची विजयी घोडदौड रोखली. आजही ऑस्ट्रेलियाला सलग सतराव्या कसोटी विजयापासून भारतीय संघानेच परावृत्त केले. २००३मध्ये ऍडलेडवर अजित आगरकरची भेदक गोलंदाजी व राहुल द्रविडच्या फलंदाजीच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाला मायदेशात हरविण्याचा पराक्रम केला होता. त्यानंतर आज पर्थवरील पराभव हा ऑस्ट्रेलियाचा २००३नंतरचा मायदेशातील पहिलाच पराभव. या काळात ऑस्ट्रेलियाने मायदेशात २५ कसोटी सामने खेळले; त्यात २२ जिंकले. तीन कसोटी अनिर्णित राहिल्या.
आपण स्वत:च्या व्यवहारात मराठीची सक्ती केली पाहिजे. त्याची सुरुवात घरापासूनच झाली पाहिजे. घरातल्या मंडळींशी, बाहेर नातेवाईकांशी, मित्रांशी मराठीतच बोलले पाहिजे... अगदी अमराठी सहकार्यांशीही मराठीतच बोलले पाहिजे. आपण एवढे तरी नक्की करू शकलो तरी मराठी जतन होण्यास मदत होईल आणि ती निश्चितच वृद्धिंगतही होईल, असा विश्वास ८१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म.द.हातकणंगलेकर यांनी शनिवारी व्यक्त केला.
गेले अनेक दिवस चर्चेत असलेल्या साहित्य संमेलनाचे उद्घाटन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्याहस्ते शनिवारी येथे झाले. या सोहळ्यासाठी तुडुंब गर्दी झाली होती...
"सब प्राईम'च्या पेचामुळे अमेरिकी अर्थव्यवस्थेत मंदीची शक्यता आणि "मार्जिन कॉल्स'चा दबाव, अशी कारणे पुढे करीत मुंबई शेअर बाजार आज "न भूतो न भविष्यती' अशा घसरणीने गाजला. सलग सहाव्या सत्रात घसरत चाललेल्या निर्देशांकाने आज नाट्यपूर्ण वळणे घेत तब्बल १४०८.३५ अंशांची घट नोंदविली. एका दिवसात झालेली ही आजपर्यंतची सर्वांत मोठी घसरण आहे. त्यामुळे हा "ब्लॅक मंडे' भल्याभल्यांना कायमस्वरूपी लक्षात राहणारा ठरणार आहे. गेल्या सहा सत्रांतील घसरणीमुळे गुंतवणूकदारांनी एकूण ११ लाख ८५ हजार २८५ कोटी रुपये गमावले. भारताबरोबरच आशियाई आणि युरोपीय बाजारांत मोठी घसरण नोंदली गेली.
मुंबईच्या विविधांगी संस्कृतीचे दर्शन घडवण्याच्या अविर्भावात 'मुंबई फेस्टिवल'ने निरनिराळे ढीगभर कार्यक्रम घेतले. मात्र राज्याचे प्रतिनिधित्व करणारा 'महाराष्ट्र माझा' हा एकमेव मराठी उत्सवच गायब झाला आहे. केंद्राने निधी न दिल्याने राज्यातील कला-संस्कृतीचे प्रदर्शन रद्द करण्यात आल्याचे एमटीडीसीचे म्हणणे आहे.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे 'महाराष्ट्र माझा' हा राज्यातील हस्त, चित्र, संगीत अशा विविध कलांवर आधारित उत्सव गेली दोन वर्षे 'मुंबई फेस्टिवल'मध्ये भरतो. यावर्षीही तो प्रभादेवी येथील नर्दुल्ला टँकवर आयोजित केला जाणार होता. लावणी, चौफुला, मालवणी जत्रा, हस्तकला, चित्रकला, महाराष्ट्रीय खाद्योत्सव इत्यादी विविध प्रकारचे कार्यक्रम सादर होणार होते तसेच महाराष्ट्रातून सुमारे दोनशे कलाकार आणि शंभर स्टॉल्स लागणार होते. तशी घोषणा मुंबई फेस्टिवलच्या आयोजकांनी केली होती. फेस्टिवलच्या वेळापत्रकांमध्येही या कार्यक्रमाचा समावेश केला होता, मात्र ऐनवेळी उत्सव रद्द करण्यात आला....
भोजपुरी चित्रपटांना थिएटर टॅक्समध्ये सवलत: हमार बीएमसी हुई गयी उदार!
हमार घरवाली, गजब भइल रामा, बैरी पिया, हमार बबुआ हुए गया जवान...या सारखे अनेक भोजपुरी सिनेमे उत्तर प्रदेश-बिहारची सीमा ओलांडून मुंबईच्या थिएटरांमध्ये जोरात सुरू आहेत. यापुढे तर थिएटरांमध्ये बिहारी बाबूंची गर्दी आणखी वाढलेली दिसेल आणि निर्मातेही जोमाने भोजपुरी सिनेमे काढतील. कारण मुंबई पालिकेने थिएटर टॅक्समध्ये सवलत देण्याचे औदार्य दाखवले आहे. त्यामुळे 'हमार बीएमसी हुई गयी उदार' असा आवाज उमटल्याशिवाय राहणार नाही.
मराठी चित्रपटांना थिएटर टॅक्समध्ये सवलत आहे. अगदी नाममात्र दराने टॅक्स घेतला जातो. त्याच धर्तीवर भोजपुरी सिनेमांनाही सवलत मिळावी, असा प्रस्ताव विरोधी पक्षनेते राजहंस सिंह यांनी महापालिकेत मांडला. त्यास मनसे वगळता सर्वच पक्षांनी पाठिंबा दिला. मनसेचे गटनेते राजेंद लाड यांनी विधानसभानिवडणुका डोळ्यासमोर ठेवून काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप उत्तरप्रदेशी आणि बिहारींना खूष करण्यासाठी औदार्य दाखवत आहे, असा आरोप केला. सवलत द्यायची तर सर्व भाषांना द्या, असे ते म्हणाले. पण बहुमताच्या जोरावर प्रस्ताव मंजूर झाला.....
इन्फोसिसचे प्रमुख एन. आर. नारायणमूर्ती यांना "ऑफिसर ऑफ द लिजन ऑफ ऑनर' हा फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला आहे. फ्रान्सच्या उच्च शिक्षण आणि संशोधनमंत्री वॅलरी पिक्रीस यांच्या हस्ते काल मूर्ती यांना हा सन्मान देऊन गौरविण्यात आले. मूर्ती यांच्या मार्गदर्शनाखाली "इन्फोसिस"ने घेतलेली झेप अतुलनीय आहे, असे वॅलरी यांनी या वेळी सांगितले. नेपोलियन बोनापार्ट याने १८०२ मध्ये फ्रान्समध्ये सर्वोच्च कामगिरी केलेल्या व्यक्तीला हा पुरस्कार देऊन गौरविणे सुरू केले होते.
हिंदी, तसेच तमिळ, तेलुगू, कानडी, मल्याळी या दाक्षिणात्य भाषांसह नऊ भारतीय भाषांमध्ये गेल्या ४३ वर्षांमध्ये १२४ सिनेमे काढणार्या डॉ. डी. रामा नायडू यांनी १२५वा सिनेमा 'माझी आई' या नावाने मराठीत प्रदर्शित केला असून तो ११ जानेवारी रोजी पुण्यासह जळगाव, औरंगाबाद, लातूर, परभणी, अकोला, अमरावती आणि नागपूर येथे प्रदर्शित झाला आहे. विविध भाषांमध्ये सर्वाधिक चित्रपट काढणार्या डॉ. नायडू यांची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही झाली आहे.
माणसाच्या जीवनातील नाट्याला भाषेची सीमा नसते. म्हणूनच मूळ तेलुगूतील 'प्रेमींचू' चा रिमेक असणारा 'माझी आई' हा मराठी प्रेक्षकांसमोर आणला आहे. तो त्यांच्या नक्कीच पसंतीस उतरेल असा विश्वास नायडू यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. या सिनेमात देविका दप्तरदार, सुबोध भावे, रमेश भाटकर, स्मिता जयकर आणि नागेश भोसले यांच्या भूमिका असून कांचन नायक यांची दिग्दर्शन केले आहे...
परप्रांतीयांची शिवसेनेबद्दलची नाराजी दूर करण्यासाठी मंगळवारी सकाळी अकरा वाजता शिवसेना भवनात 'उत्तर हिंदुस्थानी कार्यकर्ता' शिबिर होत आहे.
शिवसेना भवनात उत्तर भारतीयांचा हा पहिलाच मेळावा असून मुंबई, ठाणे, कल्याण, बदलापूरमधील नगरसेवकांसह मुंबईतील शिवसेनेच्या उत्तर भारतीय कार्यकर्त्यांनाही आमंत्रित केले आहे. शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, खासदार मनोहर जोशी, संजय राऊत, सुभाष देसाई, मुंबईतील उत्तर भारतीयांचे नेते प्रेम शुक्ल उपस्थित राहतील....
राज्यात महाराष्ट्र दिन वगळता इतर राज्यांचे कोणतेही दिन साजरे होता कामा नये, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे. मुलुंड पश्चिम येथील राजगड शाखा क्रमांक ९९ च्या वर्धापनदिनी ते बोलत होते. मनसेचे सरचिटणीस शिशिर शिंदे, नितीन सरदेसाई, शिरीष पारकर आदी या प्रसंगी उपस्थित होते.
महाराष्ट्राने देशाला नेतृत्त्व दिले, लढे दिले. अशा महाराष्ट्राचा दिन अख्ख्या देशाने साजरा का करू नये, असा सवाल ठाकरे यांनी केला. मराठीचे अस्तित्व सांभाळण्यासाठी प्रयत्न हवेत असे सांगून ते म्हणाले, 'मला धर्म कळत नाही. फक्त मराठी आहोत इतकेच मला माहीत आहे. मराठी माणसांने जातीपातींना गाडून एकवटल्यास कोणीही डोळा वाकडा करून पाहण्याची हिंमत करणार नाही.'
देशातील १७ कोटी उत्तर भारतीयांबद्दल अपमानास्पद भाषा करणारे राज ठाकरे यांना अटक करण्याची मागणी समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष खा. अबु असीम आझमी यांनी केली आहे. राज यांच्यावर पोलिस कारवाई न झाल्यास उत्तर भारतीयांना स्वसंरक्षणासाठी लाठ्या वाटण्याचे काम समाजवादी पार्टी करील, असा इशारा त्यांनी पत्रकारपरिषदेत दिला.
मुंबईत २४ जानेवारीला तीन ठिकाणी उत्तरप्रदेश दिन साजरा झाला. त्यापैकी दोन भाजपने तर कांदिवलीच्या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील हजर होते. त्यावेळी उत्तर भारतीयांना चांदीची लाठी समारंभपूर्वक देण्यात आली. त्यावेळी मुंबईतील हिंदी भाषिकांचे संरक्षण करण्याचे वचन आबांनी दिले. त्याचे काय झाले? असा सवाल आझमी यांनी केला.