Jump to content

मुंबई–पुणे द्रुतगती मार्ग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मुंबई–पुणे–मुंबई द्रुतगतीमार्ग या पानावरून पुनर्निर्देशित)
मुंबई–पुणे द्रुतगतीमार्ग
एक्सप्रेसवेचा नकाशा
खंडाळा येथून टिपलेले चित्र
मार्ग वर्णन
देश भारत ध्वज भारत
लांबी ९४.५ किलोमीटर (५८.७ मैल)
सुरुवात कळंबोली, नवी मुंबई
प्रमुख जोडरस्ते शीव पनवेल महामार्ग, राष्ट्रीय महामार्ग ४
शेवट देहू रोड, पुणे जिल्हा
स्थान
शहरे नवी मुंबई, पनवेल, लोणावळा, पुणे
जिल्हे रायगड जिल्हा, पुणे जिल्हा
राज्ये महाराष्ट्र
मुंबई–पुणे द्रुतगतीमार्ग
किमी
नवी मुंबईकडून
0 कळंबोली नोड (द्रुतगती मार्ग आरंभ)
8.5 शेडुंग फाटा
14.8 भातन बोगदा (१०४६ मी)
23.1 पाताळगंगा नदी
25.4 माडप बोगदा (२९५ मी)
32.7 खालापूर टोल नाका
खोपोलीकडे
46.5 खंडाळा बोगदा (३२० मी)
खंडाळ्याकडे
23.1 उल्हास नदी
लोणावळ्याकडे
69.8 कामशेत-१ बोगदा (९३५ मी)
71 कामशेत-२ बोगदा (१९१ मी)
82.1 तळेगाव टोल नाका
तळेगावकडे
85.5 सोमाटणेकडे
93.1 द्रुतगती मार्ग समाप्त
93.2 पश्चिम बाह्यवळण महामार्ग
पुण्याकडे
पुणे–मुंबई द्रुतगती मार्ग
किमी
पुण्याकडून
0 द्रुतगती मार्ग आरंभ
7.6 सोमाटणे फाटा
11 तळेगाव टोल नाका
22.1 कामशेत-२ बोगदा(१९१ मी)
23.3 कामशेत-१ बोगदा(९३५ मी)
43.9 खंडाळा
46.6 खंडाळा बोगदा(३२० मी)
51.9 आडोशी बोगदा (२३० मी)
60.4 खालापूर टोल नाका
67.7 माडप बोगदा(२९५ मी)
70 पाताळगंगा नदी
78.3 भातन बोगदा(१०४६ मी)
84.6 शेडुंग फाटा
93.1 द्रुतगती मार्ग समाप्त
नवी मुंबईकडे

मुंबई पुणे द्रुतगतीमार्ग (यशवंतराव चव्हाण द्रुतगतीमार्ग; स्थानिक प्रचलित नाव : एक्सप्रेसवे) हा भारत देशामधील सर्वात पहिला नियंत्रित-प्रवेश महामार्ग आहे. २००२ साली बांधून पूर्ण झालेला हा ९४.५ किमी लांबीचा गतिमार्ग मुंबईपुणे ह्या महाराष्ट्रातील सर्वात मोठया दोन शहरांना जोडतो. कोणताही अडथळा, काटरस्ता अथवा वाहतूक नियंत्रक सिग्नल नसलेल्या ह्या मार्गामुळे सुसाट वेगाने प्रवास करण्याची ओळख भारतवासीयांना झाली. सध्या हा भारतामधील सर्वात वर्दळीच्या महामार्गांपैकी एक आहे. २००९ साली मुंबई–पुणे गतिमार्गाला महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण ह्यांचे दिले गेलेले नाव वापरले जात नाही..

मुंबई–पुणे एक्सप्रेसवेमुळे मुंबई पुणे हा १४८ किमी लांबीचा प्रवास ४-५ तासांवरून २ तासांवर आला. मुंबई-पुणे प्रवास करणारी बहुतांश खाजगी वाहने, एस.टी. बसेस, खाजगी परिवहन बसेस तसेच मालवाहू वाहने एक्सप्रेसवेचा वापर करतात.

इतिहास

[संपादन]

भारताची आर्थिक राजधानी मुंबई व महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे ह्यांदरम्यान प्रवासासाठी जुना मुंबई–पुणे महामार्ग (रा.मा. ४) ब्रिटिशांच्या काळात बांधला गेला होता. ह्या मार्गावर सातत्याने वाढती वाहतूक व वर्दळ पाहता व भविष्यामधील वाढीव वाहतूकीचा अंदाज घेता ह्या हमरस्त्याला पर्यायी मार्ग बांधणे गरजेचे बनले होते. १९९० साली महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारच्या राइट्स व ब्रिटिश कंपनी स्कॉट विल्सन समूह ह्यांना नव्या द्रुतगतीमार्गाची पाहणी व अभ्यास करण्यासाठी नेमले. १९९४ साली राइट्सने आपला अहवाल सादर केला. त्यामध्ये ह्या प्रकल्पाचा एकूण खर्च ₹ १,१४६ कोटी इतका अपेक्षित होता. १९९७ साली महाराष्ट्र शासनाने ह्या महामार्गाच्या बांधकामाची जबाबदारी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळावर सोपवली. बांधा-वापरा-हस्तांतरित करा ह्या तत्त्वावर एकूण ३० वर्षे पथकर आकारून बांधकामखर्च वसूल करण्याचा निर्णय घेण्यात आला.

डिसेंबर १९९७मध्ये रस्ते विकास महामंडळाने निविदा मागवल्या. ह्या प्रकल्पाच्या लोकप्रियतेमुळे तब्बल ५५ निविदा दाखल केल्या गेल्या. त्यांपैकी ४ कंत्राटदारांना १ जानेवरी १९९८ रोजी संपूर्ण एक्सप्रेसवेच्या बांधकामाचे कंत्राट देण्यात आले. महामार्गाचा पहिला टप्पा २००० साली उघडण्यात आला व २००२ सालच्या एप्रिलमध्ये संपूर्ण महामार्ग वाहतूकीसाठी खुला करण्यात आला.

मार्गाचा तपशील

[संपादन]

मुंबई–पुणे गतिमार्ग नवी मुंबई शहराच्या कळंबोली ह्या नोडपाशी सुरू होतो. शीव पनवेल महामार्गरा.मा. ४ येथेच जुळतात. येथून साधारणपणे आग्नेय दिशेने धावत जाऊन हा मार्ग पुण्याबाहेरील देहू रोड येथे मुंबई-बंगलोर या राष्ट्रीय महामार्ग क्र.४ च्या बाह्यमार्गाला (बायपास) येऊन मिळतो. येथून वाहनांना पुण्याकडे अथवा पिंपरी चिंचवडकडे जाण्याचा पर्याय उपलब्ध आहे. सह्याद्री डोंगररांगेतून वाट काढण्यासाठी बोरघाटामध्ये एक्सप्रेसवे व जुना महामार्ग एकत्र धावतात. ह्यामुळे जुन्या बोरघाटामधील अत्यंत तीव्र वळणे व खोल उतारांचा वाहनांना सामना करावा लागत नाही. गतिमार्गावरील वाहनांना बाहेर पडण्याचे केवळ ९ फाटे आहेत: शेडुंग, चौक, खालापूर, लोणावळा-१, लोणावळा-२, सोमाटणे (तळेगावसाठी), देहूरोड, रावेत (निगडीसाठी) व चिंचवड.

मुंबई–पुणे गतिमार्गावर संपूर्ण लांबीदरम्यान प्रत्येक दिशेने ३ असे एकूण ६ पदर (लेन्स) आहेत. मार्गावर अनेक उड्डाणपूल व एकूण ६ बोगदे आहेत. खालापूरतळेगाव ह्या दोन ठिकाणी टोलनाके असून मोटार कारना एकेरी फेरीसाठी ₹२३० इतका टोल मोजावा लागतो. (हा दर दोनचार महिन्यांनी वाढतो.) दुचाकी, तीन चाकी वाहने, ट्रॅक्टर, बैलगाड्या व पादचारींना गतिमार्गावर प्रवेश नाही.

बोगदे

[संपादन]

एक्सप्रेस-वेवर एकूण ६ बोगदे असून हे सर्व बोगदे कोकण रेल्वे कॉर्पोरेशनने बांधले आहेत.

बोगदा लांबी
भाताण मुंबई–पुणे : १,०४६ मी
पुणे-मुंबई : १,०८६ मीटर
मडप मुंबई–पुणे : २९५ मी
पुणे-मुंबई : ३५१ मी
आडोशी मुंबई–पुणे मार्गावर हा बोगदा लागत नाही
पुणे-मुंबई : २३० मी.
खंडाळा मुंबई–पुणे : ३२० मी
पुणे-मुंबई : ३६० मी
कामशेत- १ मुंबई–पुणे : ९३५ मी
पुणे-मुंबई : ९७२ मी
कामशेत- २ मुंबई–पुणे : १९१ मी
पुणे-मुंबई : १६८ मी

अमृतांजन पूल

[संपादन]

दख्खन आणि कोकण यांना जोडणाऱ्या बोर घाटाच्या १८३० च्या मूळ बांधकामातील कमान म्हणजेच अमृतांजन पूल होय. हा पूल २०१० साली पाटला.

पुलाचा इतिहास :

मुंबई-पुणे महामार्गावर खंडाळा घाटात (बोर घाटात) असलेला अमृतांजन पूल हा काही अभ्यासकांच्या मते बोर घाटाच्या आठवणीप्रीत्यर्थ बांधलेली कमान आहे. या कमानीच्या मध्यवर्ती खांबावर लावलेल्या संगमरवरी लादीवर याचा उल्लेख आहे. मेजर जनरल सर जॉन माल्कम यांच्या कारकिर्दीत कॅप्टन ह्य़ुजेस यांनी या घाटाचे बांधकाम केले असून, १० नोव्हेंबर १८३० साली हा घाट खुला करण्यात आला. दख्खन आणि कोकण यामध्ये मालाची वाहतूक करण्यासाठी व्हील्ड कॅरेजचा वापर करण्यासाठी बांधलेला रस्ता, अशा आशयाचा मजकूर या लादीवर कोरण्यात आला आहे. गेल्या शतकात या पुलाजवळ अमृतांजन या वेदनाशामक बामची मोठी जाहिरात लावण्यात आली होती. त्यामुळे तो अमृतांजन पूल म्हणून ओळखला जाऊ लागला.

अमृतांजन पूलाचा नागपूर दुवा :

एक ऐतिहासिक घटनाही या परिसराशी संबंधित आहे आणि विशेष म्हणजे त्याचा संबंध नागपूरशी आहे. खंडाळ्याच्या पुलावर नागपुरातील प्रसिद्ध चित्रकार एम.एच. तिवारी (जयंती ता. २२ एप्रिल; निधन १६ नोव्हेंबर १९९९) यांनी अमृतांजनची जाहिरात साकारली. पुढे याच जाहिरातीमुळे हा पूल अमृतांजन नावाने प्रसिद्ध झाला. अभियांत्रिकी क्षेत्रातील आश्‍चर्य समजल्या जाणारा हा पूल १९४४ साली पेन्टर एम.एच. तिवारी यांनी 'बी के. नाईक अँड सन्स होर्डिंग ॲडव्हर्टायझर्स' या जाहिरात कंपनीसाठी उभारला होता. विशेष म्हणजे वळणदार रस्ता असल्याने बी.के. नाईक यांनी होर्डिंग लावण्यासाठीच ही जागा विकत घेतली होती. एम.एच. तिवारी यांच्यापुढे खंडाळा घाटातील वाऱ्याचा वेग सहन करणारे फलक उभारण्याचे आव्हान होते. त्यामुळे केवळ अक्षरांचेच कटआऊट उभारण्याचा निर्णय बी.के. नाईक यांनी घेतला. पुढे येथेच नॅरोलॅक पेंट्‌स, ग्वालियर रेयाॅन, साठे बिस्किट्स व दैनिक सकाळचाही फलक उभारण्यात आला.

पूल आणि पर्यटन :

खंडाळ्याचा घाट आणि तो परिसर नैसर्गिक सौंदर्यामुळे पर्यटकांना नेहमीच आकर्षित करत आला आहे. या अमृतांजन पुलावरून निसर्गरम्य खंडाळा घाटातील नयनरम्य दृश्य, नागफणीचा डोंगर व सुळका, बोगद्यातून बाहेर पडणारी आगगाडी आदींचे दर्शन होत होते. पर्यटकांसाठी ते एक महत्त्त्वाचे ठिकाण बनले होते. मुंबई/कोकणातील उकाड्यामधून आल्यानंतर याच ठिकाणी सह्याद्रीच्या आल्हाददायी वातावरणाची व थंड हवेची चुणूक जाणवते.

पूल आणि वाहतुकीस अडथळा :

६ पदरी असलेला मुंबई–पुणे द्रुतगतीमार्ग अमृतांजन पुलाच्या खाली ४ पदरी आहे. त्यामुळे या ठिकाणी वारंवार वाहतुकीची मोठी कोंडी होत होती. या पुलाचे खांब हे वाहतुकीस अडथळा ठरत होते. अनेक अपघात या ठिकाणी झालेले आहेत.

पूल पाडण्याचा निर्णय व वाद :

हा ऐतिहासिक पूल वाहतुकीस अडथळा ठरत असल्याचे कारण देत महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने हा पूल पाडायचा निर्णय घेतला. परंतु इतिहासप्रेमी, वारसाप्रेमी व इतर नागरिकांनी याविरोधात उठवलेला आवाज व त्यास माध्यमांनी दिलेली साथ यांमुळे हा निर्णय थोपवण्यात आला होता. इतिहासाची साक्ष देणाऱ्या या पुलाची नोंद ऐतिहासिक वारसा यादीत करून त्याचे जतन व संगोपन करावे अशी मागणी नागरिकांनी केलेली होती. घाटमाथ्यावरील लोणावळा ते कोकणातील खालापूर यादरम्यान द्रुतगती मार्गाच्या नवीन मार्गिकांचे काम यापूर्वीच सुरू झालेले असल्याने अमृतांजन पूल पाडण्याची गरज नसल्याचे नागरिकांचे मत होते.

पुलाचे पाडकाम :

मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतुकीस अमृतांजन पुलाचा अडथळा होत असल्यामुळे हाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने हा पूल पाडण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पूल पाडण्याचे नियोजन सुरू होते, मात्र महामार्गावरील वाहनांच्या सततच्या प्रचंड संख्येमुळे ते शक्य होत नव्हते. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर केलेल्या टाळेबंदीमुळे महामार्गावरील रोडावलेल्या वाहन संख्येने पूल तोडण्याची संधी गवसली. याचा फायदा घेत ऐतिहासिक महत्त्व असलेला हा पूल ५ एप्रिल २०२० रोजी नियंत्रित स्फोटाने पाडण्यात आला. अमृतांजन पुलाचे एकूण ४ गाळे पाडण्यात आले. स्फोटक लावण्यासाठी प्रत्येक खांबाला प्रत्येकी एक मीटर अंतरावर आणि दोन मीटर आत खोलवर अशी ४० ते ४५ छिद्रे पाडून एकूण ३०० किलो जिलेटीन स्फोटकांचा वापर हा पूल पाडण्यासाठी करण्यात आला.

पुल पाडल्यानंतरची वाहतूक स्थिती :

अमृतांजन पूल

दिनांक १५/०६/२०२० रोजी दुपारी एकच्या सुमारास पाडलेल्या पुलाच्या ठिकाणी अपघात झाल्याने मुंबईकडे जाणारी वाहतूक सुमारे अडीच तास ठप्प झाली. खंडाळा बोगदा ते अमृतांजन पूल यादरम्यान तीव्र उतार व वळण असल्याने अपघात होतात. परिणामतः वाहतूक कोंडी होण्याची सबब देऊन ऐतिहासिक महत्त्वाचा अमृतांजन पूल पाडूनदेखील वाहतूक कोंडीची समस्या कायम आहे.[]

सुरक्षा

[संपादन]

सुरू झाल्यापासून एक्सप्रेसवेवर अपघातांचे प्रमाण कायम जास्त राहिले आहे. अनेक वाहनचालकांना वेगाची व शिस्तबद्ध चालनाची सवय नसल्यामुळे अतिवेगाने बव्हंशी अपघात होतात. २००२-१२ ह्या १० वर्षांच्या काळादरम्यान ह्या मार्गावर १,७५८ अपघातांची नोंद झाली. भक्ती बर्वे, आनंद अभ्यंकर, अक्षय पेंडसे इत्यादी लोकप्रिय मराठी अभिनेते या गतिमार्गावरील अपघातांमध्ये मृत्युमुखी पडले. १८ जुलै, २०१५ रोजी आडोशी बोगद्याच्या मुखाशी दरड कोसळून तीन व्यक्तींचा मृत्यू झाला.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ https://www.esakal.com/pimpri-chinchwad/traffic-jam-pune-mumbai-expressway-near-new-amrutanjan-bridge-307631. Missing or empty |title= (सहाय्य)

बाह्य दुवे

[संपादन]