Jump to content

पांडुरंग वामन काणे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पांडुरंग वामन काणे
पांडुरंग वामन काणे
जन्म ७ मे १८८०
पेढे परशुराम, चिपळूण , रत्‍नागिरी
मृत्यू १८ एप्रिल १९७२
पुरस्कार भारतरत्‍न


महामहोपाध्याय डॉ. पांडुरंग वामन काणे (जन्म : पेढे परशुराम , तालुका चिपळूण , जिल्हा : रत्‍नागिरी, ७ मे १८८०, - १८ एप्रिल १९७२) हे एक उल्लेखनीय भारतशास्त्रज्ञ, संस्कृत विद्वान, भारतीय कायदेपंडित आणि धर्मशास्त्राचे अभ्यासक होते. १९६३ मध्ये त्यांना भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न प्राप्त झाला त्यांच्या अभ्यासपूर्ण कार्यासाठी ४० वर्षांपेक्षा जास्त सक्रिय शैक्षणिक संशोधन ज्याचा परिणाम धर्मशास्त्राच्या इतिहासाच्या ६,५०० पृष्ठांवर झाला. इतिहासकार राम शरण शर्मा म्हणतात: "पांडुरंग वामन काणे, एक महान संस्कृतशास्त्रज्ञ, ज्याने सामाजिक सुधारणेचा विवाह केला, त्यांनी विद्वत्तेची पूर्वीची परंपरा चालू ठेवली. विसाव्या शतकात पाच खंडांमध्ये प्रकाशित "धर्मशास्त्राचा इतिहास" हे त्यांचे स्मारक कार्य आहे. प्राचीन सामाजिक कायदे आणि रीतिरिवाजांचा ज्ञानकोश. हे आपल्याला प्राचीन भारतातील सामाजिक प्रक्रियांचा अभ्यास करण्यास सक्षम करते." त्यांच्या पन्नासाव्या स्मृतिदिनानिमित्त राजभवन महाराष्ट्र इथे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते टपाल तिकिटाचे प्रकाशन झाले.

पूर्वेतिहास[संपादन]

कोकणातील वेदशास्त्रपारंगत व विद्वत्तेची मोठी परंपरा असलेल्या अशा मध्यमवर्गीय कुटुंबात काणे यांचा जन्म झाला. त्यांचे पणजोबा उत्तम ज्योतिषी आणि पंचांगकर्ते, तर आजोबा वैदिक पंडित, ज्योतिषी आणि उत्तम वैद्य होते. वडील वामनरावांना वेद, उपनिषदे, भगवद्गीता यांचे सखोल ज्ञान होते. महत्त्वाचा असा ऋग्वेद तर त्यांचा तोंडपाठ होता. वामनराव पुढे वकिलीची परीक्षा उत्तीर्ण होऊन, न्यायालयात इंग्रजीतून कामकाज करणारे पहिलेच वकील ठरले. म्हणजे परंपरागत भारतीय ज्ञान आणि आधुनिक इंग्रजी भाषेतील कायद्याचे ज्ञान असा मिलाफ असलेले असे त्यांचे वडील वामनराव ! डॉ. पां. वा. काणे यांचे दुसरे आजोबा म्हणजे आईचे वडीलही वैदिक पंडित आणि वैद्यकीचे उत्तम ज्ञान असलेले असे होते.

पां.वा. काणे यांना अमरकोशातील सर्व श्लोक लहानपणीच तोंडपाठ होते. लहान वयातच त्यांनी विविध नियतकालिकांतून आधी मराठीतून आणि नंतर इंग्रजीतून लेखन सुरू केले. त्यांच्या ज्ञान आणि विद्वत्तेचा आलेख सतत वरच चढत गेला. बी.ए. आणि संस्कृतमधून एम.ए. करतानाच त्यांनी अनेक विषयांमध्ये संशोधन सुरू केले. संस्कृत, मराठी, हिंदी इंग्रजी या भाषांबरोबरच त्यांनी फ्रेंच आणि जर्मनसह अनेक भाषांवर प्रभुत्व मिळवले. अश्या रीतीने त्यांनी अतिशय मेहनतीने स्कॉलरशिप मिळवत आणि एकीकडे शिकवत राहून खूप विद्या संपादन केली. संस्कृत भाषेवर अतिशय प्रेम, त्यामुळे बी.ए.ला संस्कृतमध्ये सर्वप्रथम आले. त्याबद्दल त्यांना भाऊ दाजी पारितोषिक मिळाले. मग एल्‌‍एल.बी. झाले. नंतर झाला वेदान्त पारितोषिकासह ते मुंबईच्या विल्सन महाविद्यालय येथून एम.ए. झाले. त्यानंतर ’हिंदू-मुसलमान कायदा’ घेऊन एल्‌एल.एम. झाले. या परीक्षेत त्यांना व्ही.एन. मंडलिक सुवर्णपदक मिळाले. त्यांना मराठी, हिंदी,इंग्रजी खेरीज संस्कृत, जर्मन, फ्रेंच इ. भाषा अवगत होत्या.

काणेंनी १९०४ साली रत्‍नागिरी जिल्ह्यातील एका शाळेत शिक्षक म्हणून कामास सुरुवात केली. नंतर ते एल्फिन्स्टन हायस्कूल, मुंबई येथे नोकरीवर होते. मुंबईच्याच गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमध्येसुद्धा त्यांनी शिकवले होते. मुंबई विद्यापीठाचे ते सन १९४७ ते १९४९ दरम्यान कुलगुरू होते.

ग्रंथलेखन[संपादन]

प्राचीन संस्कृत वाङ्‌मयाचा अभ्यास, सामाजिक अभिसरणाचे भान या दोन अगदी वेगळ्या वाटणाऱ्या गोष्टींमधून काण्यांनी ’धर्मशास्त्राचा पंचखंडात्मक इतिहास’ नावाचा ग्रंथ सिद्ध केला. १९४१ साली त्यांनी प्राच्यविद्येवरचा ग्रंथ लिहिला.१९४२ साली त्यांना 'महामहोपाध्याय' ही पदवी मिळाली. 'हिस्टरी ऑफ संस्कृत पोएटिक्स' हासुद्धा त्यांचा अजून एक महत्त्वाचा ग्रंथ. भारतरामायणकालीन समाजस्थिति (१९११) आणि धर्मशास्त्रविचार (१९३५) हे ग्रंथ त्यांच्या महत्त्वाच्या मराठी ग्रंथांपैकी होत. प्राचीन भाषा, वाङ्‌मय, काव्य महाकाव्य, अलंकारशास्त्र यांचे प्रेम आणि कायदेविषयक जाण, तार्किक मांडणी, प्रथा आणि परंपरांचा कालानुरूप अर्थ लावण्याची क्षमता या आणि अशा शेकडो पैलूंचे एक विस्मयकारी मिश्रण पांडुरंगशास्त्रींच्या लेखनात झाले. खगोलविद्या, सांख्य, योग, तंत्र,पुराणे आणि मीमांसा या विषयांचा सखोल अभ्यास करून त्यांनी त्यांवर भाष्य लिहिले. त्यांचे हे प्रकांड पांडित्य, हा साक्षेपी व्यासंग ही तैलबुद्धी आणि सखोल संशोधनाची आस पुढील कित्येक पिढ्यांपर्यंत झिरपली गेली.

प्राचीन ज्योतिषशास्त्र, खगोलविद्या, योगशास्त्र, पुराणे, टीका आणि मीमांसा, सांख्य तत्त्वज्ञान, महाराष्ट्राचा सांस्कृतिक इतिहास, कौटिल्याचे अर्थशास्त्र, गणित, धर्मशास्त्र, मराठी भाषेचा सर्वांगीण अभ्यास, काव्यशास्त्र, नाट्यशास्त्र, अशा असंख्य विषयांवर त्यांनी सुमारे ४० ग्रंथ, ११५ लेख, ४४ पुस्तक परिचय/परीक्षणे लिहिली आहेत. यावरून त्यांच्या ज्ञानाचा आवाका आणि प्रचंड विस्तार लक्षात येतो.

ब्रिटिशांनी येथे आपले बस्तान बळकट करतांनाच इथल्या संस्कृती, विद्या, ग्रंथ, प्रथा, समाज, रूढी यांची कुचेष्टा सुरू केली. मिशनऱ्यांनी हिंदू धर्माची विविधांगी टिंगल सुरू केली. त्यांमध्ये त्यांनी इथल्या काही तथाकथित विद्वानांनाही सामील करून घेतले. इंग्रजीतील एखादी कविता ही संपूर्ण संस्कृत काव्यापेक्षा श्रेष्ठ आहे, असे अत्यंत उर्मट उद्गार, मेकॉलेसारख्या अधिकाऱ्याने काढले होते. लॉर्ड कर्झनने तर भारतीयांना सत्य म्हणजे काय याची कल्पनाच नसल्याची दर्पोक्ती केली होती. डॉ.काणे या सर्व गोष्टींनी व्यथित झाले होते. १९२६ मध्ये त्यांनी व्यवहारमयूख हा ग्रंथ प्रसिद्ध केला. त्यावेळी केलेला अभ्यास, जमविलेली कागदपत्रे आणि अन्य साधने, आजवरचे धर्म आणि कायदा यांचे ज्ञान अशा भक्कम तयारीनिशी त्यांनी भारतीय धर्मशास्त्राचा इतिहास लिहिण्यास सुरुवात केली. इंग्रज आणि इतर युरोपीय देशांना कळावे म्हणून त्यांनी हा परिपूर्ण इतिहास इंग्रजीत लिहिला. सुमारे ७००० पाने आणि ५ खंडांमध्ये त्यांनी लिहिलेला हा इतिहास आजही जागतिक पातळीवर अचूक आणि प्रमाण म्हणून मानला जातो.

समाजसुधारणा[संपादन]

समाजसुधारणा आणि पुरोगामी विचारांचा पुरस्कार हे सुद्धा डॉ. काणेंची वैशिष्ट्ये होती.

भारतीय कायदे आणि रुढींचा अभ्यास असलेल्या डॉ. काणेंनी तत्कालीन अनिष्ट चालींविरुद्ध आवाज उठवला होता.

विधवांना केस कापून टाकण्याची सक्ती करणे, अस्पृश्यता यांसारख्या रुढींना त्यांनी तीव्र विरोध केला. एका केस न काढलेल्या विधवेला पंढरपुरात विठ्ठलाची पूजा करण्याचा अधिकार मिळावा यासाठी त्यांनी तिचे वकीलपत्र घेतले होते.

आंतरजातीय विवाह, विधवाविवाह तसेच घटस्फोटाचा अधिकार याचाही त्यांनी पुरस्कार केला. पण वकिली आणि शिक्षणक्षेत्रात सक्रिय असणाऱ्या काणेंनी प्रत्यक्ष राजकारणात सहभाग घेतला नाही. सन १९५३ ते १९५९ या काळात पां.वा. काण्यांची राज्यसभेवर नियुक्ती झाली होती.

पां.वा. काण्यांच्या पुढील पिढ्या[संपादन]

  • त्यांचे चिरंजीव डॉ. प्रभाकर पांडुरंग काणे हे रॉचेस्टर विद्यापीठाचे पीएच.डी. आहेत. ते आ्य‍आय‍टी मध्ये प्राध्यापक होते.
  • दुसरे चिरंजीव डॉ. गोविंद पांडुरंग हे रसायनशास्त्र घेऊन एम.एस्‌सी झाले. मग केमिकल टेक्नॉलॉजी आणि केमिकल इंजिनिअरींगकडे वळले. त्यांना लंडनच्या इंपीरियल कॉलेजमधून इंधन वायूंच्या ज्वलनाच्या अभ्यासासाठी पीएच.डी मिळाली आहे.डॉ.गोविंद पांडुरंग काणे हे मुंबई विद्यापीठात प्रपाठक, प्राध्यापक होते आणि नंतर माटुंग्याच्या यू.डी.सी.टी.मधे डायरेक्टर झाले. त्यांनी अनेक विद्यार्थी घडवले. गोविंद पांडुरंग काणे हे दिल्लीच्या उद्योग मंत्रालयाचे वैज्ञानिक सल्लागार होते. त्यांना पद्मश्री देण्यात आली होती.
  • नातू डॉ. शांताराम यांना मुंबईच्या आय‍आयटीकडून डॉक्टरेट मिळाली आहे. ते अमेरिकेत रेनसेलर पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटमध्ये प्राध्यापक आहेत. जगातील १०० प्रभावशाली वैज्ञानिकांमध्ये त्यांचा समावेश आहे.

उल्लेखनीय[संपादन]

  • पां.वा. काणे यांना १९४६ साली अलाहाबाद विद्यापीठाने सन्माननीय डॉक्टरेट बहाल केली.
  • तसेच १९६० साली पुणे विद्यापीठाने सुद्धा सन्माननीय डॉक्टरेट बहाल केली.
  • काणे यांनी धर्मशास्त्राचा इतिहास मराठीत लिहून काढला. या कामाबद्दल त्यांना १९५२ साली नॅशनल प्रोफेसर हा पुरस्कार देण्यात आला.
  • ते राष्ट्रपतींनी निवडलेले असे राज्यसभेचे खासदार झाले.
  • काणे यांना १९६३ साली भारतरत्‍न हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
  • 'हिस्ट्री ऑफ धर्मशास्त्र'च्या पाच खंडांपैकी चौथ्या खंडाला १९६५ मध्ये साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला.

संस्थांमध्ये कार्य[संपादन]

भारतरत्न असून उपेक्षा[संपादन]

महामहोपाध्याय पां.वा. काणे ह्यांना सन १९६३मध्ये भारताचा " भारतरत्न " हा सर्वोच्च नागरी 'किताब देण्यात आला. भारतात २०१९ सालापर्यंत ४५ व्यक्तींना भारतरत्न हा सन्मान देण्यात आला. भारतीय टपाल खात्याचा एक खास नियम आहे. सहसा जिवंत व्यक्तीवर टपाल तिकीट काढले जात नाही. तथापि या नियमाला अपवाद म्हणून आजवरच्या इतिहासात डॉ. विश्वेश्वरैय्या, महर्षी धोंडो केशव कर्वे, राजीव गांधी, मदर तेरेसा आणि सचिन तेंडुलकर या पाच व्यक्तींवर त्यांच्या हयातीतच टपाल तिकिटे प्रसिद्ध झाली. डॉ. विश्वेश्वरैय्या, महर्षी कर्वे यांना भारतरत्न सन्मान मिळाला आणि त्यांनी वयाची शंभरी पार केली म्हणून त्यांच्यावर हयातीतच टपाल तिकीट निघाले. काँग्रेसच्या शताब्दीनिमित्त तत्कालीन पक्षाध्यक्ष म्हणून राजीवजींवर तिकीट निघाले. मदर तेरेसांना नोबेल पारितोषिक जाहीर झाल्यावर, घाईघाईने आपल्या सरकारने त्यांना भारतरत्न दिले आणि तिकीटही प्रसिद्ध केले. २०० कसोटी पूर्ण करण्याच्या जागतिक विक्रमाबद्दल भारतरत्न सचिन तेंडुलकरवर दोन तिकिटे निघण्याचा विक्रम प्रस्थापित झाला. मात्र लता मंगेशकर आणि अमर्त्य सेन हे दोन्हीही भारतरत्न हयात असल्याने त्यांच्यावर टपाल तिकीट प्रसिद्ध झाले नाही.

डॉ. पां. वा. काणे हे अत्यंत विद्वान पंडित म्हणून त्यांना अनेक सर्वोच्च सन्मान लाभले. त्यांना भारतरत्न देण्यात आल्यावर खरेतर त्या किताबाचीच शान वाढली. पण आजवर प्रत्येक भारतरत्नावर टपाल तिकीट काढणारे भारतीय टपाल खाते आणि सरकार, फक्त डॉ. पां. वा. काणे यांनाच साफ विसरले. नेहरू, इंदिराजी, राजीव गांधी, मोरारजी देसाई असल्या भारतरत्नांवर तर अनेकदा टपाल तिकिटे निघाली. मग फक्त डॉ. पां. वा. काणे यांच्यावरच एकदासुद्धा टपाल तिकीट न काढण्याचे कारण समजत नाही.


त्यांच्या पन्नासाव्या स्मृतिदिनानिमित्त राजभवन महाराष्ट्र इथे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते टपाल तिकिटाचे प्रकाशन झाले....

संदर्भ[संपादन]