लाल बहादूर शास्त्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
लाल बहादूर शास्त्री

कार्यकाळ
जून ९, इ.स. १९६४ – जानेवारी १२ इ.स. १९६६
मागील गुलजारी लाल नंदा
पुढील गुलजारी लाल नंदा

कार्यकाळ
जून ९, इ.स. १९६४ – जुलै १७, इ.स. १९६४
मागील गुलजारी लाल नंदा
पुढील सरदार स्वर्णसिंग

जन्म ऑक्टोबर २, इ.स. १९०४
मुगलसराई, भारत
मृत्यू जानेवारी ११, इ.स. १९६६
ताश्कंद
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पत्नी ललिता देवी
धर्म हिंदू

लाल बहादूर शास्त्री (रोमन लिपी: Lal Bahadur Shastri) (२ ऑक्टोबर, इ.स. १९०४ - ११ जानेवारी, इ.स. १९६६) हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यसैनिक व भारतीय प्रजासत्ताकाचे दुसरे पंतप्रधान होते. ९ जून, इ.स. १९६४ रोजी यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली. यांच्या कार्यकाळात इ.स. १९६५सालचे दुसरे भारत-पाकिस्तान युद्ध घडले. सोव्हिएत संघाच्या मध्यस्थीने पाकिस्तानबरोबर युद्धबंदीचा ताश्कंद करार करण्यासाठी ताश्कंद (तत्कालीन सोव्हिएत संघात, वर्तमान उझबेकिस्तानात) येथे दौऱ्यावर असताना ११ जानेवारी, इ.स. १९६६ रोजी विषप्रयोग झाल्यामुळे मृत्यू झाला. [ संदर्भ हवा ]

जीवन[संपादन]

त्यांचा जन्म २ ऑक्टोबर, इ.स. १९०४ साली वाराणसी येथे एका गरीब, प्राथमिक शिक्षकाच्या घरी झाला. ते दीड वर्षांचे झाले तेव्हा त्यांचे वडील निधन पावले. माता रामदुलारी आपल्या मुलांना पदराखाली घालून माहेरी आली. प्राथमिक शिक्षण मिर्झापूर येथे तर माध्यमिक शिक्षण वाराणसीला झाले. तेथे त्यांना निल्कामेश्वर प्रसाद असे पितृतुल्य गुरू भेटले. त्यांनी महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, लाला लजपतराय यांच्या जीवनदर्शनाचे महत्त्व त्यांना समजाविले.

वयाच्या अकराव्या वर्षी बनारस हिंदू विश्वविद्यालयाची कोनशिला बसविण्यासाठी आलेले गांधीजी त्यांना दिसले. तिथे त्यांच्या गाजलेल्या भाषणाने ते भारावून गेले. मग त्यांनी गांधीजींची पाठ सोडली नाही. चंपारण्य सत्याग्रह, रौलेट अ‍ॅक्ट, जालियनवाला हत्याकांड इत्यादी घटनांचे प्रतिसाद त्यांच्या मनात घर करून बसले. विदेशीवर बहिष्कार, स्वदेशीचा वापर यातच लालबहादूर गुंतले व त्यातून सुटताच पुन्हा विद्यापीठात दाखल झाले. काशी विद्यापीठाचे 'शास्त्री' झाले.( त्यांचे मूळ आडनाव 'वर्मा' हे होते.) 'सर्व्हंटस ऑफ दि पीपल्स' सोसायटीचे सदस्य झाले. शैक्षणिक आणि सामाजिक सुधारणा हे त्यांचे ध्येय होते. समानतेचे सूत्र होते. इ.स. १९२८ साली लाला लजपतराय गेले व पुरूषोत्तमदास टंडन सोसायटीचे अध्यक्ष झाले. ते अलाहाबादला दाखल झाले. त्यांचीच अध्यक्ष म्हणून निवड झाली. विधायक कार्यकर्त्यांची ती पाठशाळाच होती. आचार्य नरेंद्र देव, आचार्य कृपलानी, डॉ. भगवानदास, डॉ. संपूर्णानंद, श्रीप्रकाश यांचा परिचय व मैत्री झाली.

राजकीय जीवन[संपादन]

भारत स्वातंत्र्यानंतर त्यांची संसदीय सदस्य म्हणून त्यांच्या उत्तर प्रदेश राज्यात नियुक्ती झाली. १५ ऑगस्ट १९४७ रोजी गोविंद वल्लभ पंत यांच्या मुख्यमंत्री पदाच्या नेतृत्वाखाली पोलीस व परिवहन मंत्री झाले .

नेहरू, शास्त्रीना काँग्रेसचे मवाळ धोरण मान्य नव्हते. इ.स. १९३७ मध्ये सत्याग्रह करून ते कारावासात गेले. सत्तेची लालसा नव्हती; पण इ.स. १९४६ साली निवडणुका झाल्या. ते गोविंदवल्लभ पंतांचे सेेक्रेटरी झाले. पंत गेल्यावर ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले. इ.स. १९५१ साली मध्ये त्यांनी पं. जवाहरलालजींनी त्यांना काँग्रेसचे सचिव केले. इ.स. १९५६ साली त्यांना रेल्वेमंत्रीपद दिले. पण एका अपघाताची नैतिक जबाबदारी घेऊन त्यांनी त्या पदाचा राजीनामा दिला. इ.स. १९५७ मध्ये त्यांनी काँग्रेसला निवडणूका जिंकून दिल्या. २७मे, इ.स. १९६४ला नेहरू गेले. त्यानंतर लालबहादूर एकमताने पंतप्रधान झाले. पाकिस्तानला ही सुसंधी वाटली. पाकिस्तानने भारतावर आक्रमण केले. 'जय जवान, जय किसान' हा घोषणामंत्र वातावरणात निनादला. भारताने पाकिस्तानला नमविले. युनोने युद्धबंदी केली. रशियाने मध्यस्थी केली. १० जानेवारी, इ.स. १९६६ रोजी विषप्रयोग झाल्याने त्यांची जीवनज्योत मालवली. त्यांनी देशासाठी केलेल्या महत्त्वपूर्ण कार्यासाठी त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले.

मृत्यूविषयी संशय[संपादन]

शास्त्रींवर विषप्रयोग झाल्याचा आरोप त्यांच्या पत्नी ललिता शास्त्रींनी सातत्याने केला. मृत्यूनंतर त्यांचे शरीर काळेनिळे पडले होते हा त्यांच्यावरील विषप्रयोगाचा पुरावाच असल्याचे अनेकांचे मत आहे. शास्त्रींच्या रशियन स्वयंपाक्याला त्यांच्यावर विषप्रयोग केल्याच्या आरोपावरून अटकही करण्यात आली होती, मात्र नंतर त्याची निर्दोष सुटका करण्यात आली. इ.स. २००९ साली अरुण धर यांनी माहितीहक्काच्या कायद्यानुसार पंतप्रधान कार्यालयाकडे शास्त्रींच्या मृत्यूचे कारण जाहीर करण्याची विनंती केली. पण पंतप्रधान कार्यालयाने ही विनंती फेटाळून लावली. त्यासाठी कारण देताना यामुळे आपले इतर देशांशी असलेले संबंध बिघडण्याची शक्यता, देशात हिंसाचार उफाळून येण्याची शक्यता आणि संसदेच्या विशेषाधिकाराचा भंग होऊ शकतो असे नमूद करण्यात आले. पंतप्रधान कार्यालयाने शास्त्रींच्या मृत्यूबाबत एक दस्ताऐवज आपल्याकडे असल्याचा दावा केला, मात्र तो उघड करण्यास नकारही दिला. तसेच त्यावेळच्या सोवियत रशियाने शास्त्रींचे पोस्टमॉर्टेम न केल्याचे मान्य केले. पण, शास्त्रींचे वैयक्तिक डॉक्टर आर. एन. चुग आणि काही रशियन डॉक्टरांनी केलेल्या तपासणीचा अहवाल आपल्याजवळ असल्याचे मान्य केले. आपल्याकडील कोणताही दस्तऐवज नष्ट केलेला नाही वा गहाळ झालेला नाही हेसुद्धा पंतप्रधान कार्यालयाने नमूद केले. मात्र भारताने त्यांच्या पार्थिवाचे पोस्टमॉर्टेम केले वा नाही, तसेच शास्त्रींच्या मृत्यूबाबत कोणती दुर्घटना घडवून आणण्यात आली होती वा कसे याबाबत कोणतीही प्रतिक्रिया जुलै, इ.स. २००९ पर्यंत तरी गृहमंत्रालयाने दिलेली नाही.

लालबहादूर शास्त्रींवरील पुस्तके[संपादन]

  • गोष्टीरूपी लालबाहादुर (बालसाहित्य, लेखक - शंकर कऱ्हाडे)
  • शांतीदूत लालबहाद्दूर शास्त्री (प्रभाकर नारायण तुंगार)

लालबहादूर शास्त्री नावाच्या संस्था[संपादन]

  • लालबहादूर शास्त्री झोपडपट्टी नं १, २, ३ : मुंबईतील वांद्रा स्टेशनच्या पश्चिमेला असलेली झोपडपट्टी
  • लालबहादूर शास्त्री मार्ग (एल.बी.एस.रोड -मुंबई) : जुने नाव - (सायनपासून ते मुलुंडपर्यंतचा) आग्रा रोड
  • लालबहादूर शास्त्री रोड (नवा एटी-फीट रोड, पुणे) : जुने नाव : नवी पेठ; अलका टाॅकीज ते स्वार गेटपर्यंतचा रस्ता.
  • लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी (lbsnaa) मसुरी,देहरादून,उत्तराखंड.

बाह्य दुवे[संपादन]