राजीव गांधी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
राजीव गांधी

कार्यकाळ
ऑक्टोबर ३१,इ.स. १९८४ – डिसेंबर २, इ.स. १९८९
राष्ट्रपती झैल सिंग
रामस्वामी वेंकटरमण
मागील इंदिरा गांधी
पुढील विश्वनाथ प्रताप सिंग

कार्यकाळ
ऑक्टोबर ३१,इ.स. १९८४ – सप्टेंबर २४, इ.स. १९८५
मागील इंदिरा गांधी
पुढील बलिराम भगत
कार्यकाळ
जुलै २५, इ.स. १९८७ – जून २५, इ.स. १९८८
मागील नारायण दत्त तिवारी
पुढील पी.व्ही. नरसिंहराव

जन्म ऑगस्ट २०, इ.स. १९४४
मुंबई, ब्रिटिश भारत
मृत्यू मे २१, इ.स. १९९१
श्रीपेरुमबुदूर,तमिळनाडू, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
आई इंदिरा नेहरू -गांधी
वडील फिरोज जहांगीर गांधी
पत्नी सोनिया गांधी
अपत्ये राहुल गांधी ,प्रियांका गांधी -वडेरा
व्यवसाय वैमानिक, राजकारणी
धर्म पारसी

राजीव गांधी (२० ऑगस्ट इ.स. १९४४ - २१ मे इ.स. १९९१[१] ) हे भारताचे सातवे पंतप्रधान होते. इंदिरा गांधी आणि फिरोज गांधी यांचे ते ज्येष्ठ पुत्र होते. राजीव गांधी हे नेहरू घराण्यातले तिसरे पंतप्रधान होते. इंदिरा गांधीच्या निधनानंतर ३१ ऑक्टो. इ.स. १९८४ ते २ डिसे· इ.स. १९८९ पर्यंत ते भारताचे पंतप्रधान होते. जेव्हा राजीव गांधीनी पंतप्रधान पदाची सूत्रे हातात घेतली तेव्हा ते भारताचे सर्वांत तरुण पंतप्रधान बनले. (वय ४० वर्षे)

राजीव गांधी राजकारणात येण्यापूर्वी इंडियन एरलाइन्समध्ये वैमानिक होते. आई इंदिरा गांधी या भारताच्या पंतप्रधान असल्या तरी त्यांनी मात्र राजकारणातून दूर राहणे पसंत केले होते. दरम्यान इंग्लंडमधील केंब्रिज येथे असतांना त्यांची ओळख इटालियन वंशाच्या सोनियाशी झाली व पुढे त्यांचा विवाह झाला. अखेर इ.स. १९८० मध्ये भाऊ संजय गांधी याच्या निधनानंतर राजीवने राजकारणात प्रवेश केला. पुढे आई इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर ते इ.स. १९८४ मध्ये पंतप्रधान बनले.

राजीव गांधीच्या नेतृत्वात काँग्रेसने त्यानंतर झालेल्या १९८४ च्या लोकसभा निवडणुकांत ५४२ पैकी ४११ जागा जिंकत दणदणीत विजय मिळवला. राजीव गांधीच्या आधुनिक विचारांचा पगडा त्यांच्या सुधारणावादी कामांतून पहायला मिळाला. संगणकयुगाची त्यांनी भारताला ओळख करून दिली. तसेच टेलिकॉमच्या क्रांतीची सुरुवात ही त्यांच्या धोरणांतून झाली.

इ.स. १९८८ मध्ये त्यांनी श्रीलंकेत शांतिसेना पाठविण्याचा निर्णय घेतला. त्याची परिणती लिट्टेसोबतच्या संघर्षात झाली. याच सुमारास बोफोर्स घोटाळ्यात त्यांच्यावर झालेल्या आरोपांनी त्यांची स्वच्छ राजकारण्याची प्रतिमा मलिन झाली. अखेर इ.स. १९८९च्या लोकसभा निवडणुकांत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.

राजीव गांधी त्यानंतरही काँग्रेसच्या अध्यक्षपदावर कायम होते. इ.स. १९९१च्या लोकसभा निवडणुकात एका प्रचार सभेच्या वेळी त्यांची लिट्टेकडून हत्या करण्यात आली. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी सोनिया गांधी, मुलगा राहुल गांधी व मुलगी प्रियंका गांधी या राजकारणात आहेत.

राजीव गांधी यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.

सुरुवातीचे आयुष्य[संपादन]

राजीव गांधीचा जन्म भारताच्या प्रसिद्ध राजकीय घराण्यात झाला. आजोबा जवाहरलाल नेहरू भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील प्रमुख नेते आणि भारताचे पहिले पंतप्रधान होते. जवाहरलाल नेहरू यांची मुलगी इंदिरा गांधी यांनी काँग्रेसचे एक सदस्य फिरोज गांधी यांच्या सोबत विवाह केला. इंदिरा गांधींनी इ.स. १९४४ मध्ये राजीव यांना जन्म दिला. याकाळात त्यांचे आईवडील स्वातंत्र्य लढयातील सहभागामुळे सतत तुरुंगात असत. अखेर इ.स. १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते अलाहाबाद (प्रयागराज) येथे स्थायिक झाले. पण इ.स. १९४९च्या सुमारास इंदिरा व फिरोज यांच्यात दुरावा निर्माण झाला. इंदिरा मुलांसकट पित्याकडे दिल्लीला परतल्या व पुढेही पित्यासोबतच रहिल्या. इ.स. १९६० मध्ये फिरोज गांधींचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.

शिक्षण व वैवाहिक जीवन[संपादन]

राजीव गांधीचे सुरुवातीचे शिक्षण बोर्डिंग स्कूलमध्ये झाले. इ.स. १९६१ला पुढील शिक्षणासाठी ते लंडनला गेले. केंब्रिजमध्ये असताना इ.स. १९६५च्या जानेवारीत त्यांची ओळख इटलीच्या ॲन्टोनीया माईनो (Antonia Maino - सोनिया गांधी) यांच्याशी झाली. पुढे इ.स. १९६८ मध्ये त्यांनी भारतात येऊन त्या दोघांनी विवाह केला. इ.स. १९६७ मध्ये आई इंदिरा या भारताच्या पंतप्रधान बनल्या तरी राजीव राजकारणापासू दूर रहात इंडियन एरलाइन्समध्ये वैमानिक म्हणुन रुजू झाले. त्यांना इ.स. १९७० मध्ये राहुल तर इ.स. १९७२ मध्ये प्रियांका ही दोन अपत्ये झाली.

राजकारणात प्रवेश[संपादन]

इ.स. १९८० मध्ये लहान भाऊ संजय गांधी राजकारणात सक्रिय होता. त्याचा विमान अपघातात मृत्यु झाला. यानंतर आई आणि काँग्रेस पक्ष यांच्याकडून राजीव यांच्यावर राजकारणात उतरण्यासाठी दबाब येऊ लागला. राजीव व सोनिया दोघांचा राजकारणात येण्यास विरोध होताच, तशी जाहीर व्यक्तव्ये राजीव गांधीनी केली होती तरी पुढे विचार बदलून इ.स. १९८१ मध्ये त्यांनी अमेठी येथून लोकसभा निवडणूक लढवली. त्यांनी लोकदलचे उमेदवार शरद यादव यांचा २ लाख मताधिक्याने पराभव केला. लवकरच ते आईचे प्रमुख सल्लागार तसेच युवक काँग्रेसचे प्रमुख बनले.

पंतप्रधानपद[संपादन]

३१ ऑक्टोंबर इ.स. १९८४ रोजी इंदिराजींची हत्या झाली. राजीव गांधीवर पंतप्रधान पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. पंतप्रधानपदी निवड होताच राजीव गांधीनी लोकसभा बरखास्त करत निवडणुका घेतल्या. मोठया बहुमताने काँग्रेस निवडून आली. त्यांच्या स्वच्छ प्रतिमेचा त्यांना फायदा झालाच. त्यांनी रशिया सोबतचे मैत्रीपूर्ण संबंध अधिक दृढ केले तसेच अमेरिकेची संयुक्त संस्थाने आणि चीन यांसोबतही चांगले संबंध बनवण्याचे प्रयत्न केले.

आरोप[संपादन]

इंदिराजींची हत्या झाल्यावर दिल्लीत शीख विरोधी दंगली उसळल्या. सुमारे २७०० शीख यात मारले गेले. याबाबत काँग्रेस नेत्यांवर दंगली भडकवण्याचे आरोपही झाले. राजीव गांधी यांनी पुढीलप्रमाणे उद्गार काढल्याचे म्हटले जाते,"जेव्हा मोठे झाड पडते तेव्हा आजुबाजुची जमीन हादरणे सहाजिकच आहे." [ संदर्भ हवा ] या व्यक्तव्यावरून राजीव गांधीवर प्रचंड टीका झाली.

आर्थिक धोरणे[संपादन]

राजीव गांधीनी तंत्रज्ञानसंबंधी क्षेत्रात आयातीवर सूट दिली. खासकरून संगणक, दूरसंचार क्षेत्र यात त्यांनी खास प्रयत्न केले. लायसन्स राज संपवण्याचा प्रयत्न करत त्यांनी आयातीचे नियम शिथिल केले.

हत्या[संपादन]

राजीव गांधी स्मारक

इ.स. १९९१ मध्ये लोकसभा निवडणुकांचा प्रचारसभेदरम्यान लिट्टे ने मानवी बॉम्बचा वापर करून राजीव गांधींची हत्या केली. "धनु" नावाची मुलगी राजीव गांधींच्या सभास्थानी स्वागतासाठी जमलेल्या गर्दीत होती. राजीव गांधी जवळ येताच ती गर्दीतून पुढे येण्याचा प्रयत्न करू लागली. तेव्हा राजीव गांधींच्या महिला सुरक्षारक्षकने तिला अडविले. पण राजीव गांधींनी त्या महिला रक्षकाला थांबवून धनूला जवळ येऊ दिले. धनु राजीव गांधींच्या पाया पडण्यास वाकली आणि तिने आपल्या कमरेला असणारी स्फोटके उडवून दिली. यात तिचा, राजीव गांधींचा आणि जवळ उभ्या असणाऱ्या व्यक्तींचा मृत्यू झाला. लिट्टेने सुरुवातीस जबाबदारी घेण्यास नकार दिला पण घटनास्थळाचे चित्रीकरण उपलब्ध झाल्यावर, इतर दहशतवाद्यांची ओळख पटवून माग घेण्यात आला. यामुळे लिट्टेने भारताची उरली सुरली सहानुभुती तर गमावलीच शिवाय लिट्टेला दहशतवादी संघटना म्हणून घोषित करणारा भारत पहिला देश ठरला. याचे अनुकरण करत ३२ देशांनी लिट्टेला दहशतवादी घोषित केले.

चरित्र[संपादन]

अन्य पुस्तके[संपादन]

  • राजीव गांधी हत्या एक अंतर्गत कट (मूळ इंग्रजी Assassination of Rajiv Gandhi: An Inside Job, लेखक फराझ अहमद; मराठी अनुवाद अवधूत डोंगरे)

टपालाचे तिकीट[संपादन]

राजीव गांधी यांची छबी असलेले पाच रुपये किमतीचे टपालाचे तिकीट होते. सप्टेंबर २०१५ पासून त्याची छपाई बंद करण्यात आली.

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ 'तो' स्फोट ज्यानं राजीव गांधींना संपवून टाकलं. BBC News मराठी. 21-05-2018 रोजी पाहिले. 21 मे 1991 च्या रात्री 10 वाजून 21 मिनिटांनी तामिळनाडूच्या श्रीपेरंबुदूरमध्ये असंच काहीसं घडलं. जे घडलं ते भीषण होतं. 30 वर्षांची एक बुटकी, सावळी आणि जाडी मुलगी हातात चंदनाचा हार घेऊन भारताचे तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या दिशेनं चालू लागली. ती मुलगी राजीव यांच्या पाया पडण्यासाठी वाकली आणि.... आसमंत हादरला, कानठळ्या बसणारा एक स्फोट झाला. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
मागील:
इंदिरा गांधी
भारतीय पंतप्रधान
ऑक्टोबर ३१, इ.स. १९८४डिसेंबर २, इ.स. १९८९
पुढील:
विश्वनाथ प्रताप सिंग