Jump to content

चतुर्मास

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

चतुर्मास म्हणजे हिंदू धर्मशास्त्रानुसार आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी हा चार महिन्यांचा काळ होय.[] मात्र, काहीजण याला चातुर्मास असेही म्हणतात. जैन धर्मकल्पनेनुसार चातुर्मास आषाढ शुक्ल चतुर्दशीला सुरू होतो आणि कार्तिक पौर्णिमेपर्यंत चालतो. या काळात एरवी एका गावाहून दुसऱ्या गावाला विहार (प्रवास) करणारे जैन साधू एकाच गावात मुक्काम करतात.[]

चतुर्मास कालावधी

[संपादन]

चतुर्मास म्हणजे चार महिने. आषाढाचे २० दिवस, श्रावण-भाद्रपद-आश्विन हे तीन पूर्ण महिने आणि कार्तिक महिन्याचे पहिले ११ दिवस. भारतीय उपखंडात हा काळ मोसमी पावसाळ्याचा असतो. आषाढ शुद्ध एकादशीला सूर्य मिथुन राशीत येतो तेव्हा चतुर्मासाची सुरुवात होते. आषाढी शुद्ध एकादशीला पद्मा एकादशी किंवा देवशयनी एकादशी असे म्हणतात.[] कार्तिक शुद्ध एकादशीस चतुर्मास संपतो तेव्हा सूर्य तुळा राशीत आल्यावर कार्तिक शुद्ध एकादशी येते. कार्तिक शुद्ध एकादशीस 'प्रबोधिनी एकादशी असे नाव आहे. कार्तिक शुद्ध द्वादशीला चतुर्मास नसतो. जैनधर्मीय आषाढ शुक्ल चतुर्दशी ते कार्तिक पौर्णिमेपर्यंतचा काळ हा चातुर्मासाचा कालावधी मानतात. चतुर्मासातल्या देवशयनी एकादशीला देव झोपतात आणि प्रबोधिनीला उठतात, अशी धारणा आहे.

ज्या वर्षी श्रावण, भाद्रपद किंवा आश्विन महिन्यात अधिक मास येतो, त्या वर्षी चातुर्मास पाच महिन्यांचा असतो. २०२० साली अधिक आश्विन आहे, त्यामुळे चातुर्मास पाच महिन्यांचा.

शेतीतील पेरण्या ज्येष्ठात होतात, आषाढ येतो तेव्हा देव शयनात जातात,(अशी धारणा आहे) आश्विनात पिकांची तोडणी होते, कार्तिकात मळणी होऊन देवोत्थानची वेळ येते अशी कृषी परंपरा आहे.[]

चातुर्मासात हिंदूंचे विवाहमुहूर्त नसतात.

व्रत-उपासना

[संपादन]

या काळात हिंदू धर्मजैन धर्मांत अनेक व्रत-उपासना केल्या जातात.[] या काळात हिंदू धर्मात वर्णिलेल्या संस्कारांपैकी यज्ञोपवीत संस्कार (मुंज), विवाह, दीक्षाग्रहण, यज्ञ, गृहप्रवेश, गोदान इत्यादी शुभ कर्म केली जात नाहीत असा धर्मशास्त्रीय संकेत रूढ आहे. भागवत पुराणानुसार विष्णूंच्या निद्रेस हरिशयन म्हंटले जाते. संस्कृत भाषेत हरि हा शब्द सूर्य, चंद्र, वायु, विष्णू अशा अनेक अर्थांनी वापरला जातो. म्हणून हरिशयन म्हणजे ढगांमुळे सूर्य चंद्रांचे दिसेनासे होणे असाही अर्थ घेतला जातो.

आख्यायिका

[संपादन]
क्षीरसागरात शेषावर पहुडलेला विष्णू; सोबत लक्ष्मी, ब्रह्मा, नारद

चतुर्मासाला पौराणिक कथेचा संदर्भ आहे. काळात शेषशायी विष्णू जलाशयात -क्षीरसागरात निद्रा घेतात असा समज आहे.

पौराणिक कथा

[संपादन]

मांधाता नामक एका चक्रवर्ती सम्राटाची ब्रह्मांडपुराणातील कथा या संदर्भात सांगितली जाते. नारदाने विचारले, 'पित्या ब्रह्मदेवा, आषाढाच्या शुक्ल पक्षातील एकादशीचे नाव काय आहे? व तिचे माहात्म्य काय ते मला सांगा कारण मला विष्णूची आराधना करायची आहे?' ब्रह्मदेव म्हणाले, कलियुग आवडणाऱ्या मुनिश्रेष्ठा, तू चांगले विचारलेस. तू खरोखरच वैष्णव आहेस. त्रैलोक्यामध्ये एकादशीसारखे दुसरे पवित्र व्रत नाही. हे व्रत पुण्यकारक असून ते पापांचा नाश करते, व सर्व इच्छा पूर्ण करते. ज्या माणसांनी जन्माला येऊन हे व्रत केले नाही, त्यांना खरोखरच नरकाची इच्छा आहे असे समजावे. आषाढ महिन्यातील शुक्ल एकादशी पद्मा किंवा शयनी या नावाने प्रसिद्ध आहे. हृषिकेशाच्या प्रीतीकरता या एकादशीचे उत्तम व्रत जरूर करावे. आता मी तुला या एकादशीची पुराणातील कथा सांगतो. ही कथा ऐकल्यानेही महापापाचा नाश होतो. पूर्वी सूर्यवंशामध्ये मांधाता नावाचा राजा होता. तो चक्रवर्ती, सत्यप्रतिज्ञ व प्रतापी होता. तो आपल्या प्रजेचे पालन धर्माने व स्वतःच्या औरसपुत्राप्रमाणे करीत असे. त्याच्या राज्यात कधीही दुष्काळ पडत नसे व कोणालाही कसल्याच व्याधी नव्हत्या. त्या राजाच्या कोषागारात अन्यायाने मिळवलेले धन थोडेसुद्धा नव्हते. तो अशाप्रकारे राज्य करीत असताना पुष्कळ वर्षे लोटली. एकदा राजाच्या पूर्वजन्माच्या पापामुळे त्याच्या राज्यात तीन वर्षे पाऊस पडला नाही. त्यामुळे दुष्काळ पडून सर्व प्रजाजन त्रासले. व भुकेने आर्त झाले. राज्यात धान्य नसल्यामुळे देवयज्ञ, पितृयज्ञ, अग्निहोत्रे व वेदाध्ययन आदि व्यवहार बंद पडले. तेव्हा सर्व प्रजाजन राजाकडे आले आणि म्हणाले, 'राजा, प्रजेला हिताचे ठरेल असे आमचे बोलणे ऐक. पुराणामध्ये पंडितांनी पाण्याला 'नारा' असे म्हणले आहे. तेथे पाण्यातच राहण्याचे भगवंतांचे घर-आयन-आहे म्हणून तर भगवंतांना नारायण असे म्हणतात. नारायण सर्वांच्या ह्रदयात राहतो. हा भगवान विष्णू पर्जन्यरूपच आहे. पर्जन्याची वृष्टी तोच करतो. त्यातूनच अन्न निर्माण होते व अन्नातूनच प्रजा निर्माण होते. 'हे राजा, असा हा पर्जन्य नसेल तर प्रजेचा नाश होतो. तेव्हा नृपश्रेष्ठा, ज्यामुळे पाऊस पडेल व आमचा योगक्षेम चालेल असे काहीतरी कर.' राजा म्हणाला, 'प्रजाजनांनो, तुम्ही सांगितलेत ते अगदी खरे आहे. अन्न हे ब्रह्मस्वरूपच आहे. सर्व चराचर जग अन्नामुळेच स्थिर आहे. सर्व भूतमात्र-प्राणिमात्र अन्नातूनच निर्माण होतात. जगाचे जीवन अन्नावरच चालते. पुराणात व लोकांच्या तोंडून मी असे ऐकले आहे की, राजांच्या अनाचारामुळे प्रजाजनांचे दुःख भोगावे लागते. मी सूक्ष्म बुद्धीने विचार करीत आहे. मी काही पाप केल्याचे मला आढळले नाही. तरीही प्रजाजनांचे हित व्हावे म्हणून मी सर्व प्रयत्न करीन.' राजाने असा विचार केला आणि विधात्याला नमस्कार करून व बरोबर मोठे सैन्य घेऊन तो गहन वनात गेला. तेथे तप करणाऱ्या श्रेष्ठ मुनींच्या आश्रमांना त्याने भेटी दिल्या. त्यावेळी त्याला ब्रह्मदेवाचा मानसपुत्र असलेला अंगिर ऋषी दिसला. त्याच्या तेजाने दाही दिशा उजळल्या होत्या. तो जणू दुसरा ब्रह्मदेवच आहे की काय, असे वाटत होते. त्या ऋषीला पाहून मांधाता राजाला आनंद झाला व तो रथातून उतरून त्याच्यापुढे उभा राहिला. त्या ऋषीने राजाला आशीर्वाद देऊन त्याचे अभिनंदन केले व राज्यातील राजा, प्रधान, मित्र, भांडार, देश, किल्ले व सेना या राज्याच्या सात अंगांविषयी कुशल विचारले. राजाने स्वतःचे कुशल निवेदन करून ऋषीचे कुशल विचारले. नंतर ऋषीने राजाला इकडे वनात येण्याचे कारण विचारले. मुनीला ते कारण सांगताना राजा म्हणाला, 'मुनिश्रेष्ठा, मी स्वधर्माप्रमाणे पृथ्वीचे पालन करीत होतो. तरीही माझ्या राज्यात अनावृष्टी का व्हावी, याचे कारण मला समजत नाही. माझा संशय नाहीसा व्हावा म्हणून मी आपल्याशी आलो आहे. तरी प्रजाजनांचा योगक्षेम चालेल व त्यांचे समाधान होईल असा उपाय सुचवावा. अंगिरा ऋषी म्हणाला, हे राजा, तू आषाढ शुक्ल पक्षातील पद्मा नावाच्या एकादशीचे व्रत कर. या व्रताच्या प्रभावाने तुझ्या राज्यात निश्चितपणे उत्तम वृष्टी होईल. ही एकादशी सर्व सिद्धी देणारी आहे व सर्व उपद्रवांचा नाश करणारी आहे. राजा, तू आपल्या परिवारासह व प्रजाजनांसह या एकादशीचे व्रत कर.' मुनीचे हे म्हणणे ऐकून राजा घरी परतला. आषाढ महिना आल्यावर त्याने पद्मा (म्हणजेच शयनी) एकादशीचे व्रत केले. ब्राह्मण, वैश्य, शूद्र या चारी वर्णांच्या प्रजाजनांनीही हे व्रत केले. राजा, त्या सर्वांनी असे व्रत करताच मेघांनी वर्षा सुरू केली. सर्व पृथ्वी जलाने भरून गेली. व थोड्या दिवसातच शेते पिकांनी शोभू लागली. हृषिकेशाच्या प्रसादाने सर्व लोकांना सौख्य लाभले. याकरिता पद्मा एकादशीचे हे उत्तम व्रत अवश्य करावे. हे व्रत ऐश्वर्य व मुक्ती देणारे व सर्वांना सुखदायक आहे. या एकादशीचे माहात्म्य वाचल्याने किंवा ऐकल्याने मनुष्य सर्व पापातून मुक्त होतो. याप्रमाणे ब्रह्मांडपुराणातील पद्मा एकादशीचे माहात्म्य संपूर्ण झाले.

व्रते व आचरण

[संपादन]

ब्रह्मवैवर्त पुराणानुसार देवशयनी एकादशी या काळात व्रते केल्याने सर्व पाप नष्ट होते अशी श्रद्धा आहे. सत्कर्म करणे, सत्कथा ऐकणे, सत्पुरुषांची सेवा, संतदर्शन, दानधर्म इत्यादी गोष्टी चतुर्मासात अत्यंत कल्याण करणाऱ्या आहेत, असा समज आहे. एकादशीनंतर म्हणजे द्वादशीला विष्णूप्रबोधोत्सव साजरा केला जातो.’

देवांच्या या निद्राकालात असुर प्रबळ होतात आणि मानवाला त्रास देऊ लागतात. ‘असुरांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी प्रत्येकाने काहीतरी व्रत अवश्य करावे’, असे धर्मशास्त्र सांगते –

वार्षिकांश्चतुरो मासान् वाहयेत् केनचिन्नरः ।

व्रतेन न चेदाप्नोति किल्मिषं वत्सरोद्भवम् ।।

अर्थ: प्रतिवर्षी चातुर्मासात मनुष्याने कोणते तरी व्रत अवश्य करावे, अन्यथा त्याला संवत्सरोद्भव असे पातक लागते.

या कालावधीत पावसाळा असल्यामुळे धरणीचे रूप पालटलेले असते.

पावसाचा भर असल्यामुळे फारसे स्थलांतर घडत नाही. त्यामुळे चातुर्मास्य व्रत एका स्थानी राहूनच करावे, असा प्रघात पडला.

मानवाचे मानसिक रूपही पालटलेले असते. देहातील पचनादी संस्थांचे कार्यही निराळ्या ढंगात चाललेले असते. अशा वेळी त्यास अनुसरून कंद, वांगी, चिंचा इत्यादी खाद्यपदार्थ टाळण्यास सांगितले आहेत.[]

परमार्थाला पोषक गोष्टींचा विधी आणि प्रपंचाला मारक गोष्टींचा निषेध हे चातुर्मासाचे वैशिष्ट्य होय.

चातुर्मासातील श्रावण मास विशेष महत्त्वाचा आहे. भाद्रपद मासातील वद्य पक्षात महालय श्राद्धे करतात.

चातुर्मासात (चार मास) व्रतस्थ राहायचे असते.

व्रते

[संपादन]

‘सर्वसामान्य लोक चातुर्मासात एखादे व्रत करतात. [][]पर्णभोजन (पानावर जेवण करणे), एकभोजन (एक वेळेस जेवणे), अयाचित (न मागता मिळेल तेवढे जेवणे), एकवाढी (एकदाच सर्व पदार्थ वाढून घेणे), मिश्रभोजन (सर्व पदार्थ एकदम वाढून घेऊन त्याचा काला करून जेवणे) इत्यादी भोजननियम करता येतात.’ ‘कित्येक स्त्रिया चातुर्मासात ‘धरणे-पारणे’ नावाचे व्रत करतात. यात एक दिवस भोजन आणि दुसऱ्या दिवशी उपवास, असे सतत चार मास करायचे असते. कित्येक स्त्रिया चातुर्मासात एक किंवा दोन धान्यांवर रहातात. काही एकभुक्त रहातात. देशपरत्वे चातुर्मासातले असे विविध आचार दृष्टीस पडतात.[]

वर्ज्य

[संपादन]

१. ‘प्राण्यांच्या अस्थींचा चुना, चर्मपात्रातले उदक, ईडनिंबू, महाळुंग, वैश्वदेव न झालेले आणि विष्णूला अर्पण न केलेले अन्न, मसूर, मांस, पांढरे पावटे, घेवडा, चवळी, लोणची, वांगी, कलिंगड, बहुबीज किंवा निर्बीज फळ, मुळा, कोहळा, बोरे, आवळे, चिंच, कांदा आणि लसूण हे पदार्थ़[१०]

२. मंचकावर शयन

३. ऋतुकालावाचून स्त्रीगमन

४. परान्न

५. विवाह किंवा अन्य तत्सम कार्य

६. चातुर्मासात यतीला वपन वर्ज्य सांगितले आहे. त्याने चार मास, निदान दोन मास तरी एकाच ठिकाणी राहावे, असे धर्मसिंधूत आणि इतरही काही धर्मग्रंथांत सांगितले आहे.

अवर्ज्य

[संपादन]

चातुर्मास्यात हविष्यान्न (यज्ञाच्या वेळी चालते ते अन्न) सेवन करावे, असे सांगितले आहे. तांदूळ, मूग, जव, तीळ, वाटाणे, गहू, सैंधव मीठ, गायीचे दूध, दही, तूप, फणस, आंबा, नारळ, केळी इत्यादी पदार्थ ही हविष्ये जाणावीत. (वर्ज्य पदार्थ रज-तमगुणयुक्त असतात, तर हविष्यान्ने सत्त्वगुणप्रधान असतात.)

चातुर्मासासंबंधी पुस्तके

[संपादन]
  • आपला संपूर्ण चातुर्मास : संपादक - ज्योतिष महामहोपाध्याय किशनलाल वर्मा
  • संपूर्ण चातुर्मास (प्रकाशक - अमोल प्रकाशन)
  • संपूर्ण चातुर्मास (संपादक - काशिनाथ अनंत जोशी)
  • संपूर्ण चातुर्मास (संपादक - वेदमूर्ती केशवशास्त्री जोगळेकर) : या पुस्तकात चातुर्मासात करावयाची व्रतवैकल्ये, ती कशी करावीत, त्यांचे धार्मिक महत्त्व, त्यांचे नियम आणि उद्यापन यांबाबत माहिती दिली आहे. चातुर्मासातील नित्यक्रम, भूपाळ्या, देवपूजा, देवतांच्या आरत्या, विशेष पूजा, वर्षभरातील सण आणि उत्सव, कहाण्या स्तोत्रे, संतांचे अभंग आदी सर्व माहिती दिली आहे. अशीच साधारण माहिती खालील पुस्तकांत आहे.
  • संपूर्ण चातुर्मास (संपादक - व्यंकटेश केळकर गुरुजी)
  • संपूर्ण चातुर्मास (संपादक - ज्ञानेश्वर तांदळे)
  • संपूर्ण चातुर्मास (संपादक - शं.रा. देवळे)
  • संपूर्ण चातुर्मास (संपादक - वि.के. फडके)
  • संपूर्ण चातुर्मास (संपादक - अ.ल. भागवत)
  • चातुर्मासासाठी भक्तिमार्गदर्शन (प्रकाशन - सरस्वती बुक)

हे सुद्धा पहा

[संपादन]
  1. ^ Bhiḍe, Gaṇeśa Raṅgo (1963). Abhinava Marāṭhī jñānakośa. Abhinava Marāṭhī Jñānakośa Kāryālayākarit̃ā Ke. Rā. Kulakarṇī.
  2. ^ Bhārilla, Śobhācandra; Shastri, Indra Chandra (1968). Jainācāryavarya Pūjya Śrī Javāharalālajī kī jīvanī: Lekhaka Śobhācandra Bhārilla, Indracandra Śāstrī (हिंदी भाषेत). Akhila Bhāratavarshīya Sādhumārgī Jaina Saṅgha.
  3. ^ Lochtefeld, James G. (2002). The Illustrated Encyclopedia of Hinduism: A-M (इंग्रजी भाषेत). The Rosen Publishing Group. ISBN 9780823931798.
  4. ^ "उत्सव विशेष : पाऊस, धर्म आणि चातुर्मास!". लोकसत्ता दैनिक. ३१.८.२०१९. ८.१.२०२० रोजी पाहिले. |access-date=, |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  5. ^ Thamke, Gauri Abhishek (2017-10-11). Aarth Marathi E-Diwali Edition 2017: Diwali Magzine. Abhishek Thamke.
  6. ^ Bhanu, B. V. (2004). People of India: Maharashtra (इंग्रजी भाषेत). Popular Prakashan. ISBN 978-81-7991-101-3.
  7. ^ Reje, Shailaja Prasannakumar (1968). Mādheracā āhera.
  8. ^ Lochtefeld, James G. (2002). The Illustrated Encyclopedia of Hinduism: A-M (इंग्रजी भाषेत). The Rosen Publishing Group. ISBN 9780823931798.
  9. ^ Gopal, Dr Krishna; Girota, Phal S. (2003). Fairs and Festivals of India: Chhattisgarh, Dadra and Nagar Haveli, Daman and Diu, Goa, Gujarat, Madhya Pradesh, Maharashtra (इंग्रजी भाषेत). Gyan Pub. House.
  10. ^ Bhargava, S. C. Bhatt, Gopal K. (2006). Land and People of Indian States and Union Territories: In 36 Volumes. Gujarat (इंग्रजी भाषेत). Gyan Publishing House. ISBN 9788178353647.