इंफाळ
इंफाळ ইম্ফল |
|
भारतामधील शहर | |
इंफाळ विमानतळ |
|
देश | भारत |
राज्य | मणिपूर |
जिल्हा | पश्चिम इंफाळ, पूर्व इंफाळ |
समुद्रसपाटीपासुन उंची | २,५७९ फूट (७८६ मी) |
लोकसंख्या (२०११) | |
- शहर | २,६८,२४३ |
- महानगर | ४,१८,७३९ |
प्रमाणवेळ | भारतीय प्रमाणवेळ |
इंफाळ (मणिपुरी: ইম্ফল) ही भारत देशाच्या मणिपूर राज्याची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. इंफाळ शहर साधारण मणिपूरच्या मध्य भागात इंफाळ नदीच्या काठावर वसले आहे. २०११ साली २.६८ लाख लोकसंख्या असलेले इम्फाल ईशान्य भारतामधील एक आघाडीचे शहर मानले जाते.
१२व्या शतकापासून भारताच्या स्वातंत्र्यापर्यंत अस्तित्वात असलेल्या मणिपूरच्या राजतंत्राचे केंद्र इम्फालमधील कांगला राजवाडा येथेच होते. सध्या कांगला प्रासाद पडझड झालेल्या अवस्थेत आहे. दुसऱ्या महायुद्धामधील इम्फालची लढाई ८ मार्च ते ३ जुलै १९४४ दरम्यान येथेच लढली गेली. ह्या लढाईमध्ये ब्रिटिश सैन्याने जपानवर सपशेल विजय मिळवला.
राष्ट्रीय महामार्ग ३९ (गोलाघाट-बर्मा सीमा), राष्ट्रीय महामार्ग ५३ (इम्फाल-सिलचर) व राष्ट्रीय महामार्ग १५० (कोहिमा-ऐझॉल)) हे ईशान्य भारतामधील प्रमुख महामार्ग इम्फालमधून जातात. इम्फाल विमानतळ हा मणिपूर राज्यामधील एकमेव कार्यरत विमानतळ असून तो गुवाहाटी व अगरतला खालोखाल ईशान्य भारतमधील तिसऱ्या क्रमांकाच्या वर्दळीचा विमानतळ आहे.
बाह्य दुवे
[संपादन]मणिपुरी रंगभूमी
[संपादन]रतन थिय्याम हे भारतीय रंगभूमीवरील सृजनशील दिग्दर्शक म्हणून सर्वपरिचित आहेत. मणिपूर येथे त्यांनी रंगभूमीचे नंदनवन घडविले आहे. ‘तीन हजार वर्षांपूर्वी लिहिलेल्या नाटकात किंवा सद्यस्थितीत लिहिलेल्या नाटकात खराब व्यवस्थेवर घाव घातलेला असतो. भारतीय रंगभूमी व ग्रीक रंगभूमीवरसुद्धा हा समान धागा दिसतो. व्यवस्थेवर थेट भाष्य करीत असल्यामुळे प्रत्येक नाटक निषेधात्मक आंदोलन असते,’ असे त्यांचे नाट काविषयी मत आहे. प्रसिद्ध रंगकर्मी पद्मश्री रतन थिय्याम यांनी ‘रंगभूमीचे पारंपरिक तत्त्व’ या विषयावर महान कार्य केले आहे . प्राचीन भारतीय रंगभूमीचा अभ्यास करून आधुनिक रंगभूमीवर वेगळे प्रयोग करणारे रंगकर्मी अशी थिय्याम यांची देशभर ओळख आहे. ‘संगीत नाटक अकादमी’, ‘पद्मश्री’ अशा महत्त्वाच्या पुरस्कारांनी त्यांचा सन्मान झाला आहे.
रंगभूमीचे वेगळेपण सांगतानाच त्यांनी मर्यादांवर परखड भाष्य केलेले आहे.‘संगीत, प्रकाशयोजना, नेपथ्य, नृत्य, वेशभूषा अशा अनेक घटकांची नाटक सांघिक कला आहे. भावनांचे मिश्रण असलेल्या नाटकात हजारो भावमुद्रा असतात. धार्मिक, राजकीय, आर्थिक घटक जोडल्यामुळे नाटक एक धाडसी कलासुद्धा आहे, पण त्यापेक्षा ते एक निषेधात्मक आंदोलन आहे. एखाद्या कलाकाराला प्रशिक्षण देऊन घडवणे कठीण आणि आर्थिकदृष्ट्या परवडणारे नसते. त्यामुळे पारंपरिक भारतीय रंगभूमी संपुष्टात आली. मागील ७० वर्षांत भारतीय कला आणि संस्कृतीचा विकास आपण पाहू शकलो नाही. सांस्कृतिक सुबत्तासुद्धा संपली. कुशल व गुणी कलाकार असलेल्या भूमीत हा प्रकार दुर्दैवी आहे. गिरीश कार्नाड, इब्राहीम अल्काझी, हबीब तन्वीर, धर्मवीर भारती, मोहन राकेश असे चांगले नाटककार-कलाकार आले, पण त्यांचे काम पुढे गेले नाही. पाठबळ आणि व्यावसायिकतेच्या अभावामुळे काम थांबले. एका मिनिटाच्या कामासाठी कलाकार पैसे मागू लागले. जगण्यासाठी पैसे आवश्यक असल्यामुळे त्याने का मागू नये ? या गोंधळात रंगभूमीचे नुकसान झाले’ असे थिय्याम यांचे मत आहे.