Jump to content

अजिंठा-वेरुळची लेणी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(अजिंठा-वेरूळची लेणी या पानावरून पुनर्निर्देशित)

मराठी विकिपीडियावर अजिंठा आणि वेरुळ लेणीचे स्वतंत्र लेख असणे अभिप्रेत आहे तसे दुवे वर दिले आहेत. अजिंठा-वेरुळची लेणी हा एकत्र लेख त्या दोन लेखांवर बेतलेला असणे अभिप्रेत आहे. हा लेख पूर्वी मासिक सदर होऊन गेला आहे, तेव्हा लेखाचे संपादन खुले असले तरी या लेखाचे स्थानांतरण कनफ्यूजन्स टाळण्याच्या दृष्टीने सुरक्षीत केले गेले आहे.

भारताच्या महाराष्ट्र राज्यातील प्राचीन अजिंठा-वेरूळची लेणी ही सातवाहन,वाकाटक, चालुक्य आणि राष्ट्रकूट काळात निर्माण झाली. ही लेणी त्यांच्यातील स्थापत्यकला, शिल्पकलाचित्रकलेसाठी जगप्रसिद्ध आहेत.

प्रामुख्याने बौद्ध लेण्यांसाठी प्रसिद्ध असलेले हे ठिकाण औरंगाबादपासून १०० कि.मी. ते ११० कि. मी. वर आहे.व जळगाव पासून फक्त 60 km अंतरावर आहे. सुमारे एक हजार वर्षेपर्यंत या ठिकाणी बौद्धांचे एक महत्त्वाचे केंद्र होते असे मानले जाते.[]

वेरूळ हे भारतातील, पूर्वीच्या निजामाच्या हैदराबाद संस्थानातील व आताच्या महाराष्ट्र राज्यातील औरंगाबाद जिल्ह्यातले गाव पाषाणातील कोरीव लेण्यांसाठी प्रसिद्ध आहे. इ.स. १९८३ साली वेरूळ लेणी 'युनेस्को जागतिक वारसा स्थळ' म्हणून घोषित केली गेली.

अजिंठा

[संपादन]

इतिहास

[संपादन]

प्राचीन भारतात धर्मशाळा, लेणी व मंदिरेसुद्धा मुख्यत्वे व्यापारी मार्गांवर विश्रांतीसाठी उभारण्यात येत असत. त्यांचा उद्देश वाटसरूंना सुरक्षित आश्रय स्थान मिळावे असा असे. त्यांना राजाश्रय, धर्माश्रय व लोकाश्रय असे. अजिंठा गावाजवळची लेण्यांची निर्मितीही याच उद्देशातून सुरू झाली असावी. कालांतराने तिचे रूपांतर एका नितांतसुंदर अशा चित्रकला व शिल्पकला दालनांत झाले. मात्र या लेण्यांची मूळ रचना एखाद्या धार्मिक शिक्षणसंस्थेसारखी आहे.

पुरातत्त्वशास्त्रीय पुराव्यानुसार ही लेणी दोन वेगवेगळ्या कालखंडात निर्माण केली गेली. ९, १०, १२, १३ व १५-अ ही लेणी हीनयान कालखंडात कोरली गेली असावीत. हा कालखंड साधारणतः इ.स.पूर्वीच्या दुसऱ्या शतकाच्या सुमारास सुरू झाला. या सगळ्या लेण्यांतून बुद्धाचे दर्शन स्तूप-रूपांत होते. ही सोडून १ ते २९ क्रमांकांची लेणी साधारणतः ८००-९०० वर्षांनंतर (इ.स.च्या सहाव्या व सातव्या शतकाच्या आसपास) महायान कालखंडात निर्माण केली गेलेली असावीत. या लेण्यांतून बुद्धाचे सर्वसामान्य लोकांस परिचित असे रूप दिसून येते. महायान लेणी ही वाकाटक राजांचा राजवटीत निर्मिली गेली, त्यामुळे त्यांस एकेकाळी वाकाटक लेणी असेही संबोधले जाई. ही लेणी जगासाठी भूषण आहे.

वाकाटक साम्राज्याच्या ऱ्हासानंतर यांची निर्मिती अचानक थांबली व ही लेणी नियोजित भव्यतेपासून वंचितच राहिली.

रचना

[संपादन]

अजिंठा येथे एकूण २९ लेणी आहेत. ही सर्व लेणी वाघूर नदीच्या आसपास विखुरलेली आहेत. ती नदीच्या पात्रापासून १५-३० मीटर (४०-१०० फूट) उंचीवर कातळात आहेत.

हीनयान कालखंडातील लेण्यांपैकी ९ व १० क्रमांकाची लेणी ही चैत्यगृहे आहेत व १२, १३ ही लेणी आणि १५-अ क्रमांकाचे लेणे विहार आहे. महायान कालखंडातील लेण्यांपैकी १९, २६ व २९ क्रमांकाची लेणी चैत्यगृहे असून १, २, ३, ५, ६, ७, ८, ११, १४, १५, १६, १७, १८, २०, २१, २२, २३, २४, २५, २७ व २८ क्रमांकाची लेणी विहार आहेत.

विहार साधारणपणे चौरस आकाराचे असून त्यांची लांबी-रुंदी १७ मीटर (५२ फूट) पर्यंत आहे. हे विहार मुख्यत्वे भिक्षूंना राहण्यासाठी होते, तर चैत्यगृहे सुद्धा पारंपरिक पूजाअर्चेसाठी वापरण्यात येत. कालांतराने विहारांतही मूर्तींची स्थापना झाली. बऱ्याच विहारांना सोपा व आंगण करण्यात आले व तेथे दगडात कलाकुसर व चित्रे काढण्यात आली.

वेरूळ

[संपादन]

महाराष्ट्रातल्या मराठवाडा भागात औरंगाबाद शहरापासून ३० किलोमीटर अंतरावर वेरूळ हे एक छोटे खेडेगांव आहे. येथे प्राचीन काळात कोरलेली १२ बौद्ध, १७ हिंदू आणि ५ जैन अशी एकूण ३४ लेणी आहेत. शिवाजी महाराजांचे भोसले घराण्याचे मूळ गाव वेरूळ आहे.

वेरूळची लेणी साधारणत: इ.स.च्या पाचव्या ते दहाव्या शतकाच्या कालखंडात कोरण्यात आली असून प्राचीन भारतातली बौद्ध, हिंदू आणि जैन धर्मांमधली परस्परसहिष्णुता प्रकर्षाने दाखवतात.

वेरूळच्या लेण्यांची हिंदू लेणी, बौद्ध लेणी व जैन लेणी अशी विभागणी केली जाते.

वेरूळची लेणी

[संपादन]

भारतातील महाराष्ट्र राज्याच्या औरंगाबाद या जिल्ह्याच्या ठिकाणापासून २३ किलोमीटर अंतरावर वायव्य दिशेला, सह्याद्रीच्या रांगेतील सातमाळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पर्वतरांगेत, दोन किलोमीटर परिसरात वेरूळ लेण्यांचा समूह विखुरलेला आहे. हैदराबादच्या निजाम राजवटीकडे या लेण्यांची मालकी जाईपर्यंत इंदूरच्या होळकरांनी या लेण्यांची काळजी घेतली होती. मात्र इ.स. १९५१ साली भारत सरकारने वेरूळ लेणी हे राष्ट्रीय स्मारक असल्याचे घोषित केले आणि त्यानंतर ती भारत सरकारच्या पुरातत्त्व विभागाकडे सोपविण्यात आली.

एक युरोपियन प्रवासी कॅप्टन जॉन बेंजामिन सिली याने इ.स. १८१० मध्ये वेरूळ लेण्यांना भेट दिली होती. मुंबईहून पायी प्रवास करून तो वेरूळला पोहोचला होता. द वंडर्स ऑफ एलोरा या १८२५ मध्ये प्रकाशित केलेल्या पुस्तकात त्याने वेरूळ आणि आजूबाजूच्या परिसराची इत्थंभूत हकीकत लिहिलेली आहे.

बौद्ध लेणी

वेरूळची बौद्ध लेणी येथील सगळ्यात जुनी लेणी आहेत. ही लेणी मुख्यत्वे विहार रूपाची आहेत. काही विहारांतून पूजेसाठी मूर्तीही आहेत.

यांपैकी प्रसिद्ध लेणे म्हणजे विश्वकर्मा लेणे. अनेकमजली प्रवेशद्वारातून आत गेल्यावर आपण स्तूपापाशी पोचतो. या स्तूपाच्या वरच्या भागातील दगड जणू लाकडी वासाच वाटावा असा कोरलेला आहे. या स्तूपात बुद्धाची धर्मचक्रप्रवर्तनमुद्रेतील मूर्ती आहे.

लेणे क्रमांक १

[संपादन]

बौद्ध भिक्षूंना राहण्यासाठी या लेण्यात एकूण आठ खोल्या खोदलेल्या आहेत. खांबाशिवाय खोदलेली ही गुंफा वेरूळ येथील सर्वात जुनी गुंफा आहे. या लेणीत गाभारा नाही तसेच कुठल्याही प्रकारची मूर्ती अथवा प्रतिमा नाही. वेरूळची ही पहिल्याच क्रमांकाची लेणी अगदी प्राथमिक स्वरूपातील आहे.

लेणे क्रमांक २

[संपादन]

बौद्ध भिक्षूंना राहण्याबरोबरच बुद्धाची पूजा, मनन व चिंतन करता यावे म्हणून या लेणीत पाठीमागील भिंतीमध्ये गाभारा खोदलेला आहे. या गाभाऱ्यात बुद्धप्रतिमा कोरलेली आहे. या लेणीत गोल स्तंभशीर्षांचे कोरीवकाम आहे. लेणीच्या प्रवेशद्वारावर दोन बाजूला पद्मपाणी आणि वज्रपाणी हे बोधिसत्व द्वारपालाच्या रूपात आहेत. मुख्य प्रवेशद्वाराच्या आत डाव्या भिंतीमध्ये एका स्त्रीदेवतेची मोठी मूर्ती आहे. गाभाऱ्यात बसलेली बुद्धप्रतिमा असून बुद्धाचे पाय उमललेल्या कमलासनावर टेकलेले आहेत. बुद्ध बसलेले आसन चौकोनाकृती व त्यावर सिंहप्रतिमा कोरलेल्या आहेत. मूर्तीच्या दोन्ही बाजूला चामरधारी बोधिसत्वे आहेत.

लेणे क्रमांक १० (विश्वकर्मा लेणे)

[संपादन]

हे लेणे म्हणजे एक चैत्यगृह आहे. या चैत्यगृहाला वरचा मजला असून सज्जा कोरलेला आहे. सज्जाच्या कठड्यावर अनेक लहान शिल्पाकृती कोरलेल्या आहेत. सज्जाच्या आतील भिंतीवर भरतनाट्यम नृत्यप्रकार करणाऱ्या एका नर्तकीचे शिल्प कोरलेले आहे. चैत्यगृहाच्या मुख्य कमानीवर तीन अर्धवलये कोरलेली आहेत. त्यांना त्रिदली बिल्वतोरण असे म्हणतात. केवळ बौद्धधर्माच्या प्रसाराचा दृष्टिकोन न ठेवता कलाकारांनी सौंदर्याभिरूची या लेण्यात दाखवल्यामुळे सुरुवातीच्या काळात खोदलेल्या इतर लेण्यांपेक्षा स्थापत्यकलेच्या दृष्टीने विश्वकर्मा लेणे सरस आहे. या लेण्याच्या समोर खूप मोठे प्रांगण असून या या प्रांगणाच्या सभोवताली असणाऱ्या दगडी भिंतींमध्ये लेण्याचे प्रवेशद्वार खोदलेले आहे. प्रवेशद्वाराच्या बाजूला एका कोनाड्याच्या भिंतीवर दोन ओळींमध्ये लिहिलेला ब्राम्ही लिपीतील शिलालेख आहे.[] प्रांगणाच्या तीनही बाजूला वऱ्हांडा आहे. याच्या दोन्ही बाजूंना खोल्या असून मधोमध गर्भगृह आहे. चैत्यगृहामध्ये पाठीमागच्या बाजूला स्तूप आहे. स्तूपावर असणारी छत्रावली नष्ट झालेली आहे. स्तूपाच्या पुढील बाजूस प्रलंबपादासनात सिंहासनावर बसलेली बुद्धाची प्रतिमा आहे.

लेणे क्रमांक ११ (दोन ताल लेणे)

[संपादन]

दोन ताल म्हणून ओळखली जाणारी हे लेणे प्रत्यक्षात तीन मजली आहे. लेण्यात वरपर्यंत जाण्यासाठी दगडात घडवलेल्या पायऱ्या आहेत. पहिल्या मजल्यात विशेष दखल घेण्याजोगे शिल्पकाम नाही, मात्र मजल्याच्या मध्यभागी असणाऱ्या गर्भगृहात चौकोनी आसनावर भगवान बुद्धाची पद्मासनात योगमुद्रेत बसलेली प्रतिमा आहे. दुसऱ्या मजल्यावर चार गर्भगृहे आहेत. पहिल्या गर्भगृहात असणाऱ्या बुद्धाच्या उजवा हात भूस्पर्श मुद्रेत असून डावा हात योगमुद्रेत मांडीवर ठेवलेला आहे. दुसऱ्या क्रमांकाचे गर्भगृह आकाराने छोटे आहे. यातही बुद्धप्रतिमा आहे. तिसरे गर्भगृह वऱ्हांड्यापेक्षा खाली असल्यामुळे दोन तीन पायऱ्याया उतरून खाली जावे लागते. चौथ्या गर्भगृहात व्याख्यान मुद्रेत बसलेल्या बुद्धाची प्रतिमा आहे. तिसरा मजला म्हणजे खूप मोठा प्रशस्त विहार आहे. विहारामध्ये ठिकठिकाणी खोदकाम सुरू केल्याच्या खुणा आहेत पण ते अर्धवट अवस्थेत सोडलेले आहे.

लेणे क्रमांक १२ (राजविहार लेणे)

[संपादन]

तीन ताल किंवा राजविहार या नावाने प्रसिद्ध असलेली हे लेणे तीन मजली आहे. लेण्याच्या प्रवेशद्वाराजवळ दोन बाजूला दोन सिंहप्रतिमा आहेत. आत समोरच चौकोनी प्रशस्त प्रांगण आहे. वऱ्हांड्यातील स्तंभांची रचना चौकोनी आहे. या लेण्याचा पहिला मजला अनेक स्तंभांनी आधारलेला आहे. या मजल्यावर असलेल्या खोल्यांमध्ये दगडी चौथरे व त्यावर डोके टेकण्यासाठी दगडी उशा खोदलेल्या आहेत. या लेण्यात मागच्या बाजूला गर्भगृह आहे. या गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला बोधिसत्व कोरलेला आहे. त्याच्या डाव्या हातातील कमलपुष्पावर पुस्तक ठेवलेले आहे. गर्भगृहात आत सिंहासनावर धम्मचक्र परिवर्तन मुद्रेतील बुद्धप्रतिमा आहे.

हिंदू लेणी

वेरूळच्या हिंदू लेण्यांची शैली इतर लेण्यांपेक्षा अगदी वेगळी आहे. ही लेणी म्हणजे शिल्पकारांनी कातळात कोरलेली अतिप्रचंड शिल्पेच आहेत. यातील बरीचशी लेणी वरपासून सुरू करून खालपर्यंत कोरीवकाम करीत निर्मिलेली आहेत. असे शिल्प किंवा बांधकाम करण्यासाठी शिल्पकार/कारागीरांच्या अनेक पिढ्या खर्ची पडल्याचा उल्लेख आहे.

लेणे क्रमांक १६ (कैलास मंदिर)

[संपादन]

वेरूळमधल्या १६ व्या लेण्यातले शिवमंदिर जगातले सर्वात मोठे कोरीव शिल्प आहे. ह्या बहुमजली मंदिराची रचना कैलास पर्वताच्या धर्तीवर आहे. ते मंदिर निर्माण करायला अंदाजे २ लाख टन वजनाचा एका अखंड खडक वापरण्यात आला असून तो उघडपणे वरून खाली म्हणजे कळसाकडून पायाकडे खोदून कोरण्यात आला असला पाहिजे आणि ते प्रचंड खोदकाम/कोरीवकाम पुरे व्हायला कित्येक दशके लागली असणार. ह्या मंदिराच्या निर्मितीमागचे असामान्य शिल्पज्ञान ह्या गोष्टी हजार-दीडहजार वर्षांपूर्वी ज्या माणसांना अवगत होत्या त्यांची नावेही इतिहासात कोणी नोंदवलेली नाहीत.

  वेरुळचे कैलासनाथ मंदिर हे भारतीय शिल्पकलेतील एक आश्चर्य मानले जाते. एकपाषाणी मंदिरामध्ये हे सर्वात प्रचंड आणि परिपूर्ण असे मंदिर आहे. गिरीशिल्प परंपरेतील तसेच तांत्रिक व कलेच्या दृष्टीने हे सर्वात प्रगत अविष्कार असलेले मंदिर आहे. या या मंदिराचा वरचा भाग म्हणजे कळस आधी घडवून शिल्पकार खाली खाली उतरत गेले. राष्ट्रकूट राजा श्रीकृष्ण प्रथम आणि दंतिदुर्ग यांच्या काळात हे मंदिर खोदले गेले. कैलासनाथ मंदिर द्राविड मंदिर स्थापत्यशैली मध्ये घडविण्यात आले आहे.

आज कैलास लेण्यातील शिवलिंगाची पूजा होत नाही ही पूजा कधीपासून बंद पडली हे सांगता येत नाही परंतु इ.स. १८१० च्या सुमारास कैलास लेण्यातील मंदिरात पूजाअर्चा होत होती व गाभाऱ्यासमोरील मंडपामध्ये साधुसंत राहत असत.[]

जैन लेणी

वेरूळची जैन लेणी तुलनेने लहान आहेत व जैन धर्माची वैराग्यभावना दर्शवितात. याबरोबरच बारीक कोरीव काम व चित्रे ही या लेण्यांची वैशिष्ट्ये आहेत..... जैन लेणी समुहात ५ लेणी आहेत. ह्या लेणीच्या प्रत्येकाला हेवा वाटावा अशीच ही लेणी आहे.

घृष्णेश्वर मंदिर

[संपादन]

वेरूळ लेण्यांपासून जवळच हे मंदिर आहे. भारतातील १२ ज्योतिर्लिंगांपैकी हे एक आहे.इलागंगा नदीच्या तीरावर वेरूळ गावाजवळ हे मंदिर आहे. हे मंदिर दक्षिणाभिमुख असून जांभ्या दगडाचे आहे.मंदिराच्या छतावर पशु-पक्षी, नर्तक, धनुर्धारी शिकारी इ. चित्रे आहेत. राष्ट्र्कूट वंशातील कृष्णराजाने हे मंदिर बांधले. सध्याचे मंदिर मल्हारराव होळकर यांच्या पत्नीने बांधले असे कळते. दरवर्षी शिवरात्रीला इथे यात्रा भरते.[] यावेळी मोठी गर्दी होते.

अजिंठा-वेरूळ लेण्यांना कसे जावे?

[संपादन]
  • रस्ता मार्गे:-

औरंगाबाद शहर मुंबई, नागपूर, पुणे वगैरे अनेक शहरांशी राज्य महामार्गाने जोडलेले आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ औरंगाबाद ते मुंबई दरम्यान आरामगाड्या (luxury buses) चालवते (अंतर सुमारे ३९२ कि.मी.). अजिंठा लेणी जळगांव शहराच्या जवळ आहेत, तर वेरूळची औरंगाबादजवळ.

  • लोहमार्गे (रेल्वे):-

औरंगाबादकडून मुंबई, आग्रा, दिल्ली, भोपाळ, हैदराबाद ह्या शहरांकडे थेट लोहमार्ग आहेत. हिवाळ्यात डेक्कन ओडिसी ही खास रेल्वे अभ्यागतांना औरंगाबादची सफर घडवते.

चाळीसगांव, मनमाड, परभणी, पूर्णा आणि नांदेड या रेल्वे स्थानकांवर उतरून रस्तामार्गे औरंगाबादला जाणेही शक्य आहे. जळगांव स्टेशनवर उतरून आधी अजिंठा पाहून मग वेरूळला जाता येते.

  • विमान मार्गे:-

औरंगाबादहून ७ कि.मी. अंतरावर चिकलठाणा गावी एक विमानतळ आहे. मुंबई-दिल्ली-जयपूर-उदयपूर आणि औरंगाबाद ह्या शहरांमधे सध्या विमानांची येजा असते. जळगाव विमानतळाहुन अजिंठा जवळ आहे.

लेण्यांना भेट देण्याकरता सगळ्यात चांगला कालावधी

[संपादन]

उन्हाळ्याचे एप्रिल, मे आणि जून हे तीन महिने सोडून वर्षातला इतर नऊ महिन्यांचा कालावधी लेण्यांना भेट देण्याकरता चांगला असतो. उन्हाळ्यात त्या परिसराचे सरासरी तपमान ४०-४४ सेल्सियस (१०४-११२ फॅरनहाइट) अंशांपर्यंत जात असल्यामुळे त्या काळात प्रवास दगदगीचा होऊ शकतो.

लेणी पहायची वेळ

[संपादन]

सोमवार आणि राष्ट्रीय सुट्ट्यांचे दिवस सोडून इतर दिवशी सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत अभ्यागतांनी पहाण्याकरता लेणी उघडी असतात.

  • कॅनडा देशातल्या एलोरा, ऑन्टारियो या गावाचे नाव वेरूळ ह्या नावावरून देण्यात आलेले आहे. पण पुरातन अप्रतिम लेणी पहायला मात्र भारतातल्या अजिंठा-वेरूळलाच भेट दिली पाहिजे!

चित्रदालन

[संपादन]

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ महाराष्ट्रातील लेणी - प्रा. सु.ह जोशी 
  2. ^ रिपोर्ट ऑन दि एलुरा केव्ह टेम्पल्स, इ.स. १८७७, आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ वेस्टर्न इंडिया खंड ५ (इंग्लिश मजकूर, पी. डी. एफ.)
  3. ^ द वंडर्स ऑफ एलोरा, १८२५, जॉन बेंजामिन सिली (इंग्लिश मजकूर, इ बुक.)
  4. ^ भारतीय संस्कृती कोश खंड ३ 

बाह्य दुवे

[संपादन]
  1. युनेस्कोच्या संकेतस्थळावर जागतिक वारसा म्हणून अजिंठा-वेरूळ
  2. महाराष्ट्रातील लेणी Archived 2008-12-01 at the Wayback Machine. मराठीमाती
  3. भारतीय पुरातत्त्व संशोधन विभागाच्या संकेतस्थळावरील वेरूळची माहिती Archived 2006-02-02 at the Wayback Machine.
  4. भारतीय उपखंडातील वास्तुस्थापत्यासंबंधीची माहिती Archived 2015-05-02 at the Wayback Machine.
  5. india.net वरील अजिंठामधील चित्रे Archived 2007-03-03 at the Wayback Machine.
  6. india.net वरील वेरूळ लेण्यांमधील चित्रे Archived 2008-03-21 at the Wayback Machine.
  7. भिक्खू बुद्धभद्र यांच्या सव्वीसाव्या लेणीसंकुलाविषयीचा लेख (वाकटककालीन अजिंठा) Archived 2020-08-09 at the Wayback Machine.
  8. महाराष्ट्र पर्यटन व्हिडिओ जाहिरात Archived 2006-02-15 at the Wayback Machine.