सह्याद्री
| सह्याद्री |
|
पश्चिम घाट |
|
| देश | भारत |
| राज्य | महाराष्ट्र, गोवा, गुजरात, कर्नाटक, केरळ, तमिळनाडू |
| सर्वोच्च_शिखर | अनाई मुदी शिखर |
| लांबी | १६०० कि.मी. |
| रूंदी | १०० कि.मी. |
| क्षेत्रफळ | ६०,००० वर्ग कि.मी. |
| प्रकार | बसाल्ट खडक |
सह्याद्री पर्वतरांग किंवा पश्चिम घाट ही भारताच्या पश्चिम तटाशेजारी उभी आहे. ही रांग तापी नदीच्या दक्षिणेकडून महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेशेजारी चालू होते आणि अंदाजे १६०० किलोमीटर लांबीची ही पर्वतरांग महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ आणि तमिळनाडू या राज्यांतून भारताच्या दक्षिण टोकाच्या जवळ पोचते. या पर्वतरांगेचा जवळजवळ ६०% भाग हा कर्नाटकात येतो.[१]
या पर्वतरांगेचे क्षेत्रफळ ६०,००० वर्ग कि.मी. असून या पर्वतरांगेची सरासरी उंची १२०० मीटर आहे [२]. अनेक उंच शिखरे ही पर्वतरांग सामावून घेते, त्यामध्ये रांगेच्या उत्तरेकडे महाराष्ट्रात कळसूबाई शिखर (उंची १६४६ मी), महाबळेश्वर (उंची १४३८ मी) आणि हरिश्चंद्रगड(उंची १४२४ मी), कर्नाटकात १८६२ मी उंचीवर असलेले कुद्रेमुख शिखर आणि दक्षिणेकडे केरळमध्ये अनाई मुदी शिखर (उंची २६९५ मी). अनाई मुदी शिखर हे पश्चिम घाटातील सर्वात उंच शिखर आहे. पर्वतरांगेत महत्त्वाचा खंडभाग पलक्कड खिंडीच्या स्वरुपात आहे जी तमिळनाडू आणि केरळ यांना जोडते. इथे सह्याद्रीची सर्वात कमी उंची आहे (३०० मी). पश्चिम घाट ही जगातील सर्वात जास्त जैवविविधता असणाऱ्या आठ जागांपैकी एक आहे. इथे ५००० पेक्षा जास्त फुलझाडे, १३९ प्राण्यांच्या जाती, ५०८ पक्ष्यांच्या जाती, १७९ उभयचर प्राण्यांच्या जाती आढळतात.[३]
अनुक्रमणिका |
भौगोलिक रचना
पश्चिम घाट ही पर्वतरांग नसून दख्खनच्या पठारातील अंतर्गत घडामोडींमुळे निर्माण झालेली कड आहे. सुमारे १५० दशलक्ष वर्षांपूर्वी गोंडवन खंडाच्या झालेल्या तुकड्यांमुळे सह्याद्रीची निर्मिती झाली असावी असे मानले जाते. या तुकड्याची पश्चिमेकडची बाजू साधारण १००० मी. उंचीचा कडा असावा असे शास्त्रज्ञांना वाटते [४].
गोंडवन खंडाच्या तुकड्यातून वेगळी झालेली भारतीय उपखंडाची जमीन ही सरकत सरकत युरेशियन उपखंडाला जिथे येऊन मिळाली, तिथे ज्वालामुखीचा उद्रेक झाला. या ज्वालामुखीतून निघालेला लाव्हा सुमारे ६५ दशलक्ष वर्षांपूर्वी थंड होऊन दख्खनचे पठार निर्माण झाले. या लाव्हामुळे जे खडक निर्माण झाले त्यांना बसाल्ट खडक असे म्हणतात. त्याखालील खडक हे सुमारे २०० दशलक्ष वर्षांपूर्वी तयार झालेले जुने खडक आहेत व ते निलगिरीच्या काही भागांमध्ये सापडतात..[५]
बसाल्ट खडक हा सह्याद्री पर्वतरांगेत सर्वात जास्त सापडणारा खडक आहे. सह्याद्रीमध्ये सापडणारे इतर खडक पुढीलप्रमाणे चार्नोकाईट, ग्रॅनाईट, खोंडालाईट, लेप्टिनाईट. लॅटराईट व बॉक्साईट खडक दक्षिणेकडील पर्वतरांगांमध्ये आढळतात.[६]
पर्वतशिखरे
सह्याद्री पर्वतरांग उत्तरेला सातपुडा पर्वतरांगेपासून सुरू होते. नंतर दक्षिणेला गोवा, कर्नाटक, केरळ व शेवटी तमिळनाडू राज्यामध्ये पसरलेली आहे. यातील मुख्य रांग म्हणजे सह्याद्री. सह्याद्री पर्वतरांगेमध्ये माथेरान, महाबळेश्वर, पांचगणी, कुद्रेमुख व कोडागु इत्यादी थंड हवेची ठिकाणे प्रसिद्ध आहेत. निलगिरी पर्वतरांग, बिलिगिरीरंगन पर्वतरांग, सेर्वरायन पर्वतरांग आणि तिरुमला पर्वतरांग इत्यादी काही छोट्या पर्वतरांगा पूर्व घाट आणि पश्चिम घाट यांना जोडतात.
काही छोट्या पर्वतरांगा उदा. कार्डमम पर्वतरांग व निलगिरी पर्वतरांग या तमिळनाडू राज्याच्या उत्तर-पश्चिम क्षेत्रात आहेत. निलगिरी पर्वतरांगेमध्ये प्रसिद्ध उटकमंड हे थंड हवेचे ठिकाण आहे. या पर्वतरांगेमध्ये दोड्डाबेट्टा (२,६२३ मी) हे सर्वोच्च शिखर आहे. या पर्वतरांगेच्या दक्षिणेकडे, अनामलाई पर्वतरांगे मध्ये अनाई मुदी (२,६९५ मी), चेंब्रा शिखर (२,१०० मी), बाणासूर शिखर (२,०७३ मी), वेल्लारीमाला शिखर (२,२०० मी) आणि अगस्त्यमाला शिखर (१,८६८ मी) इत्यादी पर्वतशिखरे आहेत. केरळ राज्यातील सर्व चहा व कॉफीचे मळे हे पश्चिम घाटातच आहेत. पश्चिम घाटात दोन मुख्य खिंडी आहेत. गोवा खिंड जी महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांच्या मध्ये आहे व दुसरी पलक्कड खिंड जी निलगिरी व अनामलाई पर्वतरांगांच्या मध्ये आहे.
पश्चिम घाट आणि अरबी समुद्र यांच्या मधल्या चिंचोळ्या पट्टीच्या उत्तरेकडील सपाट भागाला कोकण असे म्हणतात. तर दक्षिणेला मलबार किंवा मलबार किनारा असे म्हणतात. सह्याद्रीच्या पायथ्याशी पूर्वेकडे असलेल्या भागाला महाराष्ट्रात देश असे म्हणतात तर मध्य कर्नाटकात मळनाड म्हणतात.
पश्चिम घाट मौसमी वाऱ्यांना अडवतो, त्यामुळे ढग उंचीवर जातात आणि थंड होतात व पाउस पडतो. घनदाट जंगलेही पावसाला मदत करतात. तसेच जमिनीतील बाष्प पुन्हा वाफेच्या स्वरुपात हवेत सोडण्यास मदत करतात. यामुळेच घाटाच्या पश्चिम उताराकडे पूर्व उतारापेक्षा जास्त पाउस पडतो. भरपूर पावसामुळेच पश्चिम घाटात अनेक नद्यांची उगमस्थाने आहेत. गोदावरी, कृष्णा, कावेरी आणि त्यांच्या उपनद्या इथेच उगम पावतात.
नद्या व धबधबे
पश्चिम घाट हा अनेक लहान मोठ्या नद्यांचे उगमस्थान आहे. या पैकी मुख्य नद्या म्हणजे गोदावरी, कृष्णा व कावेरी. या तिन्ही नद्या पूर्ववाहिनी असून बंगालच्या उपसागरात जाऊन मिळतात. तसेच इतर अनेक नद्या ज्या पश्चिमवाहिन्या आहेत, त्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात. यापैकी मुख्य नद्या म्हणजे मांडवी व झुआरी नदी. इतर अनेक नद्या या पश्चिम घाटात उगम पावतात. छोट्य नद्यांमध्ये भीमा नदी, मलप्रभा नदी, कुंडली नदी, इ. प्रमुख नद्या आहेत.
अनेक पश्चिमवाहिनी नद्या ह्या खूप उतारावरून वाहत असल्यामुळे जलविद्युत प्रकल्पांसाठी खूप उपयुक्त आहेत. पश्चिम घाटात जवळजवळ ५० धरणे बांधलेली आहेत व त्यापैकी सर्वात जुना जलविद्युत प्रकल्प खोपोली येथे १९०० साली बांधला गेला.[७] या सर्व धरणांपैकी मोठी धरणे म्हणजे महाराष्ट्रातील कोयना धरण, केरळमधील परांबीकुलम धरण व कर्नाटकातील लिंगणमक्की धरण.
पावसाळ्यात पश्चिम घाटाचे सौंदर्य वाढविण्यास कारणीभूत घटक म्हणजे धबधबे. पश्चिम घाटात अनेक प्रेक्षणीय धबधबे आहेत. उदा. जोग धबधबा, कुंचीकल धबधबा, शिवसमुद्रम धबधबा व उंचाल्ली धबधबा. जोग धबधबा हा दक्षिण आशियातील सर्वात उंच नैसर्गिक धबधबा आहे व तो जगातील १००१ नैसर्गिक आश्चर्यांपैकी एक आहे.[८] तळकावेरी वन्यजीव अभयारण्य हे कावेरी नदीच्या उगमाजवळ असलेले एक मोठे अभयारण्य आहे. तसेच घनदाट जंगलांमुळे तुंगभद्रा नदीच्या उगमापाशी शरावती व सोमेश्वर ही दोन अभयारण्ये आहेत.
हवामान
पश्चिम घाटातील वातावरण हे उंचीनुसार बदलत जाते. कमी उंचीवर उष्ण व दमट हवामान असून जास्त उंचीवर (१५०० मी च्या वर) सरासरी १५ °से. तापमान असते. काही अति उंचीच्या भागांमध्ये कायम धुके असते व हिवाळ्यात तापमान ४-५ °से. पर्यंत खाली येते. पश्विम घाटातील सरासरी तापमान उत्तरेला २० °से व दक्षिणेला २४ °से आहे.[५]
पश्चिम घाटातील सरासरी पर्जन्यमान हे ३०००-४००० मी.मी. (कोकणात) व १००० मी.मी. (देशावर). पश्चिम घाटातील पावसाचे प्रमाण हे बदलत जाणारे आहे. महाराष्ट्राच्या उत्तरेला खूप पाऊस पडतो पण थोडेच दिवस पडतो तर विषुववृत्ताच्या जवळ असणाऱ्या प्रदेशांमध्ये थोडाच पाऊस पडतो पण वर्षभर पडतो.[५]
जैविक क्षेत्रे
पश्चिम घाटात चार प्रकारची वृत्तीय जंगले आढळतात. पश्चिम घाटाच्या उत्तर व दक्षिण भागात पानगळीची व सदाहरित जंगले आढळतात. पश्चिम घाटाच्या उत्तरेला सामान्यत: दक्षिण भागापेक्षा कमी आर्द्रता असल्यामुळे, कमी उंचीवर उत्तर भागात पानगळीची जंगले आढळतात. यात मुख्यत: सागाचे वृक्ष आहेत. १,००० मी. पेक्षा जास्त उंचीवर आर्द्रतेचे प्रमाण जास्त असल्यामुळे सदाहरित जंगले आढळतात.
केरळमधील वायनाड जंगले ही उत्तर व दक्षिणेकडील जैविक क्षेत्रांमधील जागेत मोडतात. दक्षिणेकडील जंगलांमध्ये जास्त जैवविविधता आहे. उत्तर भागाप्रमाणेच दक्षिण भागात सुद्धा कमी उंचीवर पानगळीची तर जास्त उंचीवर सदाहरित जंगले आढळतात. दक्षिण भागात १,००० मी. पेक्षा जास्त उंचीवर सर्वाधिक प्रमाणात जैवविविधता आढळते. येथे संपूर्ण पश्चिम घाटात आढळणाऱ्या फुलझाडांपैकी ८०% पेक्षा जास्त जाती आढळतात.
जैविक सुरक्षा
पश्चिम घाटातील दाट जंगले ही मुख्यत: आदिवासी लोकांसाठी खूप उपयुक्त आहेत. त्यांना लागणारे अन्न व निवारे या जंगलांमध्ये मुबलक प्रमाणात आढळतात. या दाट जंगलांमुळेच पठारावरील लोक इथे स्थायिक होऊ शकले नाहीत. इंग्लिश लोक या देशात आल्यावर त्यांनी मोठ्या प्रमाणावर जंगले साफ करून जमीन शेतीयोग्य बनविली.
१९८८ मध्ये पश्चिम घाटाला पर्यावरणशास्त्रज्ञ नॉर्मन मायर्स यांच्या प्रयत्नांमुळे संरक्षित जैविक क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले. जरी पश्चिम घाट हा भारताच्या फक्त ५% क्षेत्रफळावर पसरलेला असला तरी भारतात आढळणाऱ्या उंच वाढणाऱ्या झाडांच्या १५,००० जातींपैकी सुमारे ४,००० जाती (२७%) या इथेच सापडतात. यापैकी सुमारे १,८०० जाती या फक्त पश्चिम घाटातच आढळतात. सह्याद्री पर्वतरांगेत जवळजवळ ८४ उभयचर प्राण्यांच्या जाती, १६ पक्ष्यांच्या जाती, ७ प्रकारचे सस्तन प्राणी व १,६०० प्रकारची फुलझाडे आढळतात जी जगात इतरत्र कोठेही आढळत नाहीत.
भारत सरकारने पश्चिम घाटातील अनेक जंगले संरक्षित केलेली आहेत. यामध्ये २ संरक्षित जैविक क्षेत्रे, १३ राष्ट्रीय उद्याने, अनेक अभयारण्ये व संरक्षित वनक्षेत्रे यांचा समावेश होतो. ही सर्व संरक्षित वनक्षेत्रे जतन करण्यासाठी वेगळे वनखाते बनवून या सर्व जंगलांचे रक्षण करण्यात येत आहे. यापैकी अनेक राष्ट्रीय उद्याने ही पूर्वी अभयारण्ये होती. निलगिरी संरक्षित जैविक क्षेत्र हे जवळजवळ ५,५०० वर्ग कि.मी. क्षेत्रफळावर पसरलेले सर्वात मोठे संरक्षित क्षेत्र आहे. यामध्ये नागरहोलची सदाहरीत जंगले, बंदीपूर राष्ट्रीय उद्यानातील पानगळीची जंगले, कर्नाटकातील नुगू जंगल व केरळ व तमिळनाडू मधील अनुक्रमे वायनाड व मुदुमलाई राष्ट्रीय उद्यान यांचा समावेश होतो.[९] केरळमधील पश्चिम घाटात अनेक थंड हवेची ठिकाणे प्रसिद्ध आहेत. यामध्ये मुन्नार, पोन्मुदी व वायनाड ही प्रमुख ठिकाणे आहेत. केरळमधील सायलंट व्हॅली राष्ट्रीय उद्यान हे भारतातील शिल्लक असलेल्या सदाहरीत जंगलांमधील एक आहे.[१०]
जागतिक वारसा
२००६ साली भारताने यूनेस्कोकडे पश्चिम घाटाला जागतिक वारसा स्थानांमध्ये समाविष्ट करण्यासाठी विनंती केली आहे.[११]. यामध्ये एकंदर सात उपक्षेत्रे असतील.
- अगस्त्यमलाई उपक्षेत्र - यामध्ये अगस्त्यमलाई संरक्षित जैविक क्षेत्र (९०० वर्ग कि.मी.) ज्यामध्ये तमिळनाडूतील कलक्कड मुंडणथुराई व्याघ्र प्रकल्प (८०६ वर्ग कि.मी.) व नेय्यार अभयारण्य [१२], पेप्पारा[१३] तसेच शेंदुर्णी[१४] व त्याच्या आसपास असणारे आचेनकोईलचे क्षेत्र [१५], थेन्मला, कोन्नी[१६], पुनलुर, तिरुवनंतपुरम आणि अगस्त्यवनम, केरळ[१७] यांचा समावेश आहे.
- पेरियार उपक्षेत्र - यामध्ये केरळमधील पेरियार राष्ट्रीय उद्यान (७७७ वर्ग कि.मी.), रान्नी, कोन्नी व आचनकोविल इथली जंगले. पूर्वेला श्रीविल्लीपुत्तुर अभयारण्य व तिरुनवेली इथली जंगले यांचा समावेश आहे.
- अनामलाई उपक्षेत्र - यामध्ये चिन्नार अभयारण्य, एराविकुलम राष्ट्रीय उद्यान (९० वर्ग कि.मी.), इंदिरा गांधी राष्ट्रीय उद्यान, ग्रास हिल्स राष्ट्रीय उद्यान व करियन शोला राष्ट्रीय उद्यान (एकूण ९५८ वर्ग कि.मी.) तसेच तमिळनाडूमधील पलानी पर्वतरांग राष्ट्रीय उद्यान (७३६.८७ वर्ग कि.मी.) व केरळमधील परांबीकुलम अभयारण्य (२८५ वर्ग कि.मी.) यांचा समावेश आहे.
- निलगिरी उपक्षेत्र - यामध्ये निलगिरी संरक्षित जैविक क्षेत्र तसेच करीम्पुझा राष्ट्रीय उद्यान (२३० वर्ग कि.मी.), सायलंट व्हॅली राष्ट्रीय उद्यान (८९.५२ वर्ग कि.मी.) व केरळमधील वायनाड अभयारण्य (३४४ वर्ग कि.मी.) आणि तमिळनाडूमधील बंदीपूर राष्ट्रीय उद्यान (८७४ वर्ग कि.मी), मुकुर्थी राष्ट्रीय उद्यान (७८.४६ वर्ग कि.मी.), मुदुमलाई राष्ट्रीय उद्यान (३२१ वर्ग कि.मी.) तसेच अमरांबलमचे संरक्षित जंगल (६,००० वर्ग कि.मी.) यांचा समावेश आहे.
- तळकावेरी उपक्षेत्र - यामध्ये ब्रह्मगिरी अभयारण्य (१८१.२९ वर्ग कि.मी.), राजीव गांधी राष्ट्रीय उद्यान (३२१ वर्ग कि.मी), पुष्पगिरी अभयारण्य (९२.६५ वर्ग कि.मी.), कर्नाटकातील तळकावेरी अभयारण्य (१०५.०१ वर्ग कि.मी.) व केरळमधील आरळम संरक्षित वनक्षेत्र यांचा समावेश आहे.
- कुद्रेमुख उपक्षेत्र - यामध्ये कुद्रेमुख राष्ट्रीय उद्यान (६००.३२ वर्ग कि.मी.), सोमेश्वर अभयारण्य व आजूबाजूची सोमेश्वरची संरक्षित जंगले तसेच कर्नाटकातील अगुंबे व बलहल्ली येथील जंगले यांचा समावेश आहे.
- सह्याद्री उपक्षेत्र - यामध्ये आंशी राष्ट्रीय उद्यान (३४० वर्ग कि.मी.), चांदोली राष्ट्रीय उद्यान (३१७.६७ वर्ग कि.मी.), कोयना अभयारण्य व राधानगरी अभयारण्य यांचा समावेश आहे.
प्राणीजगत
पश्चिम घाटात हजारो प्रकारचे प्राणी आढळतात. यामध्ये जवळजवळ ३२५ प्रजाती या जागतिक स्तरावर नष्ट व्हायला आलेल्या प्रजाती आहेत. तसेच उभयचरांमधील बऱ्याच प्रजाती या फक्त पश्चिम घाटातच आढळतात.
- सस्तन प्राणी: पश्चिम घाटात सस्तन प्राण्यांच्या जवळपास १३९ प्रजाती आढळतात. यापैकी मलबार गंधमार्जार व सिंहपुच्छ वानर या दोन प्रजाती विनाशाच्या मार्गावर आहेत. पश्चिम घाटात आढळणाऱ्या सिंहपुच्छ वानरांची संख्या तर फक्त २,५०० आहे. सिंहपुच्छ वानरांची सर्वात जास्त संख्या ही सायलंट व्हॅली राष्ट्रीय उद्यानात आढळते. कुद्रेमुख राष्ट्रीय उद्यानात सुद्धा सिंहपुच्छ वानरे आढळतात.[१८]
ही पर्वतरांग वन्यजीवांसाठी खूप उपयुक्त जागा आहे. निलगिरीचे जैविक क्षेत्रामध्ये आशियाई हत्ती मोठ्या प्रमाणावर आढळतात. ब्रह्मगिरी व पुष्पगिरी अभयारण्येसुद्धा हत्तींसाठी सुयोग्य निवासस्थान आहे. कर्नाटकातील पश्चिम घाटात ६,००० पेक्षा जास्त हत्ती आढळतात (२००४ सालातील गणनेप्रमाणे) व भारतात सापडणाऱ्या वाघांपैकी १०% वाघ सुद्धा इथेच आहेत.[१९].
सुंदरबन नंतर भारतात सर्वात जास्त वाघ हे कर्नाटक, तमिळनाडू व केरळच्या जंगलातच आढळतात. बंदीपूर राष्ट्रीय उद्यान व नागरहोल इथे ५,००० पेक्षा जास्त गौर (बैल) कळप करून राहतात.[२०] कोडागु जंगलांच्या पश्चिमेला निलगिरी माकडे मोठ्या प्रमाणावर आढळतात.
भद्रा अभयारण्यात हरणांची मोठी संख्या आढळते. बरेच हत्ती, गौर, सांबर, चित्ते, वाघ इ. प्राणी केरळमधील जंगलांमध्ये आढळतात.
- सरपटणारे प्राणी:अजगराच्या काही जाती या फक्त पश्चिम घाटातच आढळतात.
- उभयचर प्राणी: जगात आढळणाऱ्या १७९ उभयचर प्राण्यांच्या प्रजातींपैकी सुमारे ८०% प्रजाती या फक्त पश्चिम घाटातच आढळतात.[२१]
संदर्भ
- ↑ कर्नाटक जंगल खाते (जंगल-सांख्यिकी)
- ↑ एशिया पॅसिफिक माउंटन नेटवर्क
- ↑ मायर्स, एन., आर. ए. मिट्टरमेयर, सी.जी. मिट्टरमेयर, जी.ए.बी. दा फाँन्सेका, व जे. केंट. (२०००) बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट्स फॉर कॉन्जर्वेशन प्रायॉरिटीज. नेचर मासिक ४०३:८५३–८५८ मायर्स, एन.
- ↑ डेक्कन हेराल्ड ची बातमी
- ↑ ५.० ५.१ ५.२ पश्चिमघाटातील जैवविविधता. वाईल्डलाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया.
- ↑ खाणक्षेत्र. भूगोल व खाणकाम विभाग, गव्हर्नमेंट ऑफ तमिळनाडू.
- ↑ नद्या व राज्यांप्रमाणे भारतातील धरणे.
- ↑ मायकेल ब्राईट, जगातील १००१ नैसर्गिक आश्चर्ये, बॅरन्स एड्यूकेशनल सिरीज २००५.
- ↑ निलगिरी सुरक्षित जैविक क्षेत्र.
- ↑ एलॅमॉन सुरेश(२००६) "केरळ मधील ठेवा", यूट्यूब व्हिडियो,केरळ मधील ठेवा
- ↑ यूनेस्को, एमएबी, (२००७) जागतिक वारसा स्थान, तात्पुरती यादी, पश्चिम घाट
- ↑ नेय्यार अभयारण्य
- ↑ पेप्पारा अभयारण्य
- ↑ शेंदुर्णी अभयारण्य
- ↑ आचेनकोईल, केरळ
- ↑ कोन्नी, केरळ
- ↑ अगस्त्यवनम, केरळ
- ↑ सिंग मेवा व कौमान्स वर्नर (२००५) "बिहेव्हियरल स्टडीज: वन्यजीव संरक्षणाची गरज", करंट सायन्स, खंड ८९, क्र. ७, ऑक्टोबर १०, पान.१२३३.पूर्ण लेख
- ↑ कर्नाटक जंगल खाते
- ↑ कर्नाटकमधील वन्य प्राण्यांची संख्या
- ↑ वासुदेवन कार्तिकेयन, पश्चिम घाटातील जंगलांचा उभयचर प्राण्यांच्या प्रजातींचा अभ्यास
बाह्य दुवे
- सह्याद्री पर्वतरांगेची चित्रे
- पश्चिम घाटातील खारी
- सह्याद्री मधील किल्ले, देवळे व गुहा
- पश्चिम घाटाची चित्रे
विकिव्हॉयेज वरील Western Ghats पर्यटन गाईड (इंग्रजी)- पश्चिम घाटातील नद्या
- सह्याद्री पर्वतरांगेची चित्रे
- सह्याद्री मधील किल्ले
- सह्याद्री मधील किल्ले, पक्षी प्राणी, फुले व इतर चित्रे
|
|||||||