मराठी कविता

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

मराठी काव्याचे प्रकार[संपादन]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

लोककाव्यात गाथा, लावणी ,पोवाडे, ओव्या, आरत्या,भजने,गवळण,भारूडे भोंडल्याची गाणी इत्यादींचा समावेश होतो. मराठी भाषेत संतकाव्यही मोठ्या प्रमाणात लिहिले गेले. पंडिती काव्य, छंदबद्ध काव्य, चारोळी , चित्रपट गीते, नाट्य संगीत

सुरुवातीचे मराठी काव्य —  कवी मुकुंदराज यांना मराठीचे आद्यकवी म्हणून संबोधले जाते. त्यांनी विवेकसिंधू हा काव्यग्रंथ लिहिला आहे.

१६व्या,१७व्या आणि १८व्या शतकातील मराठी काव्य[संपादन]

==१९व्या शतकातील मराठी काव्य==बाग हि कविता

१८८५ ते १९८५ या कालखंडातील मराठी कविता[संपादन]

इ.स. १८८५ ते १९८५ एवढ्या दीर्घ कालमर्यादेचे अभ्यासाच्या दृष्टीने, चार खंडांत विभाजन केले आहे.

१८८५ ते १९२०[संपादन]

[१] पहिला खंड हा या कालमर्यादेचा असून केशवसुत व त्यांचे समकालीन यांच्या अर्वाचीन काव्यातील परंपराशरणता या विषयींची वैशिष्ट्ये नमूद करणारा आहे.

दुसरा खंड -१९२०-१९४५[संपादन]

या काळात उदयाला आलेले रविकिरण मंडळ व नवपूर्वकाव्यातील कवी-कवयित्री यांच्या काव्यविषयक जाणिवांचा आढावा घेतला आहे.

तिसरा खंड - १९४५-१९६०[संपादन]

या काळात कवी मर्ढेकरांसारखा नवकवी होऊन गेला. मर्ढेकरांनी आणलेली नवकविता आणि त्यानंतर नवकाव्याचा झालेला विकास हे या खंडाचे वैशिष्टय आहे.स्वातंत्र्योतर कालखंडात नवकवी म्हणून उद्यायास आलेले मर्ढेकरणारे लिंग कवी म्हणून संबोधत असत

चौथा खंड १९६० ते १९८५[संपादन]

लघुनियतकालिकांतील कविता, भावकवींचे वेगळेपण, साम्यवादी कविता, दलित-आदिवासी कविता व अर्वाचीन मराठी काव्यप्रकार. संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेमध्ये राजकीय नेते, विचारवंत, पत्रकार, लेखक यांच्याबरोबर कवी आणि शाहिरांनीही महत्त्वाची भूमिका बजावली . कविवर्य वसंत बापट, शाहीर शाहीर अमर शेख यांच्यासारख्या कवींच्या कविता आणि पोवाड्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत जान आणली. अर्थात महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेत अशा जोशपूर्ण काव्याने महत्त्वाची भूमिका बजावली असली तरी मराठी कविता तेवढ्यापुरती सीमित नव्हती. साठोत्तरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या कवितेवर प्रभाव होता तो केशवसुतांचा. रोमॅन्टिक वास्तववाद, रविकिरण मंडळाची सौंदर्यलक्षी कविता आणि मर्ढेकरांची वास्तववादी दृष्टी या साऱ्यांचाच. बरीचशी मध्यमवर्गीय जाणिवेची, ग्रामीण विश्वाचे थोडेसे कृतक बेतलेली व रोमॅन्टिक वर्णन करणारी कविता या काळात लिहिली जात होती. अशा वेळी मर्ढेकरांच्या रूपाने मराठी कवितेला हादरवून सोडणारे एक वादळ आले. हे वादळ इतके जबरदस्त होते की, आजही त्याच्या खुणा मराठी कविता पुसू शकली नाही. (उदा. संजीव खांडेकरांचे सर्च इंजिन) मर्ढेकर, शरदचंद्र मुक्तिबोध, विंदा करंदीकर, पुढे सदानंद रेगे यांच्यासारख्या कवींनी खऱ्या अर्थाने मराठी कवितेला नवा चेहरा दिला. केवळ आशयसूत्रांतच वेगळेपण आणले असे नाही तर हा बदल दाखविण्यासाठी त्यांनी विविध कविता#रचनाबंधांचा वापर केला, तसेच भाषेचीही मोडतोड केली. साठोत्तरी कविता यांच्या पावलावर पाऊल टाकतच पुढे गेली.

महाराष्ट्रभरातील खेड्यापाड्यातले लोक वेगवेगळ्या बाजाची कविता लिहू लागले. ना.धों. महानोर यांनी ग्रामीण कवितेला दिलेला मातीचा स्पर्श अनेक कवींच्या कवितेत आजही अनुभवायला मिळतो.

साठोत्तरी कालखंडात लिहिणाऱ्या कवींच्या अभिव्यक्तींची तऱ्हा वेगळी होती. कविता#आशय, कविता#रूपबंध वेगळे होते. निसर्ग, प्रेम, दु:ख, विरह, मानवी संबंध, मंत्राक्षरांनी भारलेले आयुष्य मांडणारी कविता या काळात लिहिली गेली असली तरी ती वेगळ्या रूपात आपल्यासमोर येत होती. काल्पनिक जगात रमण्यापेक्षा अनुभवातला सच्चेपणा व्यक्त करीत होती. ग्रेस, चिंतामणी त्र्यंबक खानोलकर, वसंत सावंत यांच्या कवितेत तो दिसतो. कुसुमाग्रज, मंगेश पाडगावकर, इंदिरा संत, शांता शेळके यांच्यासारख्या आधीच्या पिढीतील कवी-कवयित्रीही स्वतःचा नव्याने शोध घेत होते. गझल हा काव्यप्रकार याच काळात जन्माला आला. सुरेश भट यांनी नव्याने त्यात जान ओतली. सामाजिक भान त्यातून व्यक्त व्हायला लागले. पण गेल्या काही वर्षांत लिहिली गेलेली गझल मात्र भट यांना ओलांडून पुढे जाऊ शकली नाही.

या काळात सुरू झालेल्या अनियतकालिकाच्या चळवळीतून पुढे आलेले दिलीप चित्रे, अरुण कोलटकर, मनोहर ओक, भालचंद्र नेमाडे, सतीश काळसेकर, चंद्रकांत पाटील, गुरुनाथ धुरी इत्यादी कवींनी प्रस्थापित काव्य परंपरेला छेद देण्याचा प्रयत्न केला. (अर्थात यातील जवळजवळ सगळेच कवी पुढे प्रस्थापित झाले.) यातील काही कवींनी भाषेचे एक नवे दालनच लोकांसमोर उघडले. भाषेची काव्यात्मदृष्ट्या केलेली मोडतोड, परंपरागत मांडणीला छेद देत शब्दांची केलेली काव्यात्म मांडणी, बोलीभाषेच्या किंवा जुन्या म्हणींचा केलेला उपयोग, लैंगिक जाणिवा व अनुभव यांनी भारलेल्या प्रतिमांचा केलेला वापर, चित्रात्मकता, नव्या-जुन्या पाश्चात्त्य व भारतीय संस्कृतीतील तसेच वाङ्मयातील संदर्भाचा वापर ही यांच्या कवितेची वैशिष्ट्ये होती. त्यानंतर लिहू लागलेल्या विलास सारंग यांनी कविता#निरुद्देशिका, कविता#प्रतिसुनिते, सापडलेल्या कविता यांसारख्या वेगळ्या रूपबंधाच्या कविता लिहिल्या. त्यांना कविता म्हणायचे की प्रतिकविता हे त्यांनी वाचकांवर सोपवले असले तरी वाचकांची भाषिक संवेदनशीलता जागवणारी ही कविता असल्याचे डॉ. म.सु. पाटील यांनी म्हटले आहे. याच काळात लिहिणारे नारायण सुर्वे आणि नामदेव ढसाळ हेही आपल्या अनुभवातला सच्चेपणा वेगळ्या शैलीत मांडत होते. हे दोन्ही कवी खऱ्या अर्थाने प्रवाह प्रवर्तक ठरले.[२]

याच काळात लिहिणारे नारायण सुर्वे आणि नामदेव ढसाळ हेही आपल्या अनुभवातला सच्चेपणा वेगळ्या शैलीत मांडत होते. हे दोन्ही कवी खऱ्या अर्थाने प्रवाह प्रवर्तक ठरले.[२]


श्री. सूर्यकांत तथा सू.द. वैद्य.(दत्तकुमार )

१९५५ ते २०२० या काळात कविता लेखन करणारे कवि श्री. सू.द. तथा सूर्यकांत वैद्य यांनी फारच थोडे पण उच्च दर्जाचे लेखन केले. त्यांचे मारवा (१९६४), माझे जग)(१९७२) , त्रिमिती(१९८२) , सूर्यफुले(१९१८) हे काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले आहेत, तर सूर्यकिरण हा संग्रह लवकरच प्रसिद्ध होत आहे. शिक्षक,प्राध्यापक,प्राचार्य आणी निवृत्त अशा वेगवेगळ्या कालखंडात लिहीलेल्या त्यांच्या भावकवितांचे आगळेवेगळे स्थान आहे. त्यांच्या सूर्यफुले या काव्यसंग्रहास आचार्य प्र.के. अत्रे प्रतिष्ठान यांचा २०१८चा 'कवी केशवकुमार आचार्य अत्रे पुरस्कार' प्राप्त झाला आहे.

२०१६ मध्ये 'प्रा. सू.द. वैद्द यांच्या मराठी कविता ' या विषयावर प्रा.डाॅ.बाळकृष्ण लळीत यांच्या मार्गदर्शनाखाली ,सौ. कामिनी थोरात यांनी प्रबंध लिहून सावित्रीबाई फुले विद्यापीठातून एम् फिल् पदवी प्राप्त केली.

स.प. महाविद्यालय पुणे येथून मराठी विषयात एम्.ए. परीक्षा उत्तीर्ण केली. श्री. सू.द. वैद्य नूतन मराठी विद्यालय प्रशाला ,पुणे येथे मराठी भाषेचे अध्यापक म्हणून १९६३—६५ मध्ये काम केले. त्यानंतर स.प. विद्यालय पुणे, वाई महाविद्यालय, शिरुर महाविद्यालय येथे मराठीचे अध्यापन केले.

१९८५ ते २०१०[संपादन]

१९८५ ते २०१०[संपादन]

पाल्हाळ, पुनरुक्ती विधान स्वरूपी गद्यप्रायता, बौद्धिक चमकदारपणा, उपमा, प्रतीके व प्रतिमांचा एकसुरी वापर, चिंतनाचा अभाव अलीकडच्या ग्रामीण कवितेत पाहायला मिळतो, असे डॉ. रणधीर शिंदे यांनी या कवितेबद्दल आपले निरीक्षण नोंदवले आहे. दलित कवितेचा आवाजही काही अपवाद वगळता क्षीण होत चालला आहे असे वाटते. एवढ्या वर्षांचा सरस्वतीचा वारसा सांगणाऱ्या उच्चवर्णीयांच्या कलावादाला आव्हान देणारी, गाण्याविषयी बोलतानाच कविता#काव्यमूल्य जपणारी, मराठी भाषेत नवे शब्दभंडार खुले करणारी, व्यवस्थेला जाब विचारणारी दया पवार, यशवंत मनोहर, केशव मेश्राम, नामदेव ढसाळ यांच्या कवितेचा वारसा सांगणारी कविता लिहिली जात असली तरी ती या सर्वाच्या पुढे जाऊन काही वेगळे सांगण्याचा प्रयत्न करीत नाही आहे. अर्थात अरुण काळे,महेंद्र भवरे, प्रज्ञा पवार इत्यादींसारखे काही अपवाद आहेत. दलित जाणिवेबरोबर दलित चळवळीतले अराजक, नेतृत्व हरवलेल्या भ्रष्ट व्यवस्थेत पिचलेल्या हताश तरुण पिढीची कैफियत, आजच्या जगात हरवत चाललेली मूल्यव्यवस्था, जागतिकीकरणाच्या रेट्यात माणसाला आलेले वस्तूरूप, स्त्रीचे शोषण अशा अनेक गोष्टींचा आविष्कार त्यांच्या कवितेत दिसतो. भुजंग मेश्राम यांच्यासारख्या कवींच्या कवितेतही आदिवासी तसेच भटक्या विमुक्तांचा आदिम संघर्ष व्यक्त होतो. त्यांनी केलेला बोलीभाषेचा उपयोग पाहिल्यावर मराठी कविता प्रमाणित भाषेच्या कक्षा ओलांडून नवनव्या भाषांचे अवकाश शोधत पुढे चालली आहे हे लक्षात येते. अनियतकालिकांच्या चळवळीतील कवितेचा आणि विशेषत: चित्रे-कोल्हटकर या द्वयीचा प्रभाव असलेली कविताही गेल्या २०-२५ वर्षांत खूप लिहिली गेली. या प्रभावातून बाहेर पडून स्वतःची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न काही कवी करताहेत. नव्वदोत्तरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या कवींनी कवितेसाठी चळवळ उभारण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी अनियतकालिके सुरू केली. पण हळूहळू ती त्यांच्या स्वतःच्या जगण्याची, विचारसरणीची आणि त्यांच्यासारखेच लिहिणाऱ्यांची मुखपत्रे झाली. या सगळ्याच कवींच्या जाणिवा आजच्या जगाशी जोडलेल्या आहेत. जागतिकीकरण, ऱ्हास पावत चाललेली मूल्यव्यवस्था, जगण्यात आलेले एकसुरीपण, महानगरातील झपाट्याने बदलणारे वास्तव, विखंडित होत चाललेले जगणे त्यांना हादरवून सोडत आहे. एक प्रकारचे वांझ, निर्मितीक्षमता हरवलेले जगणे जगणाऱ्या माणसाची कविता हे कवी लिहीत आहेत. त्यामुळेच अनेकदा ती बौद्धिकतेकडे झुकते. चित्रे-कोल्हटकरांच्या कवितेत असलेली संवेदनशीलता रमेश इंगळे उत्रादकरांसारखे काही अपवाद सोडले तर त्यांच्या कवितेत अभावानेच सापडते, यांच्या बरोबरीने लिहिणारे अनेक कवी आपले वेगळेपण जपण्याचा प्रयत्न करत आहेत. आजचे अस्वस्थ करणारे वास्तव त्यांना आपल्या आदर्शवत वाटणाऱ्या जुन्या दिवसांत घेऊन जाते आहे. (उदा. अरुण म्हात्रे, सौमित्र यांच्या कविता). स्मरणरंजनात रमणाऱ्या अशा काही कवींच्या कविता कथनपर किंवा वर्णनपर होताना दिसतात (उदा. दासू वैद्य, प्रवीण बांदेकर). त्यामुळे अनेकदा त्या दीर्घ व कंटाळवाण्या होतात. कदाचित आयुष्यात आलेला कंटाळा दाखविण्यासाठी तसा रूपबंध वापरला असावा, पण तो पोहोचत नाही. प्रेम निसर्ग यात रमणारी रोमॅन्टिक कविता ही सार्वकालिक आहे. ती पूर्वीही लिहिली गेली आणि आजही लिहिली जातेय. उक्त अभिव्यक्तीची तऱ्हा बदलली आहे एवढेच. वसंत आबाजी डहाक्यांच्या पावलावर पाऊल टाकत अनेकांनी राजकीय उपरोध व्यक्त करणारी कविता लिहिली. पण डहाक्यांच्या कवितेत व्यक्ती आणि समाज यांच्या परस्पर संबंधाबद्दल जी संवेदनशीलता व्यक्त होते, ती त्यांच्या परंपरेत लिहिणाऱ्या कवींमध्ये दिसत नाही. तीही वर्णनपर आणि बौद्धिक होते.नारायण कवठेकर कुलकर्णी,नरेंद्र नाईक,अशोक नायगावकर,महेश केळुसकर यांच्या राजकीय व सामाजिक परिस्थितीवर उपहासात्मक भाष्य करणाऱ्या काही कविता लक्षणीय आहेत.1990 च्या नंतर लिहिणारी मंडळी फार मोठ्या प्रमाणात असली तरी गांभीर्याने लिहिणारे कमी आहेत किरण शिवहर डोंगरदिवे ह्यांच्या कवितेत जाणवनारे सहज आणि वास्तव समाजभान तुटलेल्या बोटांचे संदर्भ मधून कधी अस्वस्थ करते तर त्याच्याच मृगजळाचे पाणी किंवा मृगजळातील अक्षरशिल्प मधील काव्यात रसिक गुंतुन जातो तीच जाणीव जुन्या प्रेयसीचे नवे संदर्भ मध्ये अधिक गडद होत जाते. अजीम राही किंवा ह्या पिढितील अनेक कवी कधी फार सोपी तर कधी फार गुंतागुंतीची कविता आजच्या काळातील कवी लिहित आहेत. दलित कवितेतील आक्रोश मात्र आजही बदलला नाही. गेल्या ३० वर्षांत स्त्रीजाणिवेची कविताही प्रामुख्याने पुढे आली.प्रभा गणोरकर,रजनी परुळेकर यांच्या पावलावर पाऊल टाकून अनेक कवयित्री लिहू लागल्या. स्त्रीच्या स्वरूपाचा शोध घेतानाच पुरुष व्यवस्थेत आजपर्यंत तिला व्यक्ती म्हणून जगण्याचा नाकारलेला हक्क, तिचे शोषण, तिला आलेले वस्तूरूप, पुरुषाशी तिचा तुटलेला संवाद आणि त्यातून आलेले एकाकीपण व तुटलेपण कवयित्री त्यांच्या कवितेतून व्यक्त करू लागल्या. या समाजात एकीकडे स्त्रीचे उदात्तीकरण करणाऱ्या तर दुसरीकडे तिचे उपभोग्य वस्तूत रूपांतर करणाऱ्या पुरुषाच्या दुटप्पीपणावर त्या कोरडे ओढू लागल्या; पुरुषाला नकार देऊन स्वतःची वेगळी सृष्टी निर्माण करण्याची भाषा करू लागल्या. हे करताना त्यांच्या शब्दात बंडखोरी आली, त्यांची भाषा आक्रमक झाली. गेल्या ५० वर्षांतील काव्यप्रवासाकडे नजर टाकली तर लक्षात येते की, आज कविता उदंड लिहिली जातेय. कविसंमेलनेही खूप होत आहेत. कविता एकांतात वाचण्यापेक्षा ऐकण्यामध्ये लोकांना जास्त रस आहे. त्यामुळे कविसंमेलनांच्या सूत्रसंचालनालाही महत्त्व आले आहे. कविसंमेलन रंगवण्यासाठी विनोद, कधी अश्लील तर कधी बालिश शेरे यांची पेरणी केली जाते. फड जिंकणाऱ्या कविता सादर केल्या जातात आणि हीच खरी कविता आहे, असा समज झाल्याने नवे कवी त्याचे अनुकरण करतात. एकीकडे लोकानुनय करणारी सोपी, विधानवजा कविता लिहिली जाते आहे, तर दुसरीकडे चांगली कविता ही दुर्बोधच असते, असा गैरसमज पसरवून ती आपल्या वर्तुळापर्यंत सीमित ठेवली जाते आहे. अर्थात गेल्या ५० वर्षांतील कवितेत विविध प्रयोग झाले आहेत हे नाकारता येणार नाही.[३]

मराठी काव्य समीक्षा[संपादन]

  ऐश्वर्य पाटेकर 

‘भुईशास्रा’तील आदिम मातृसत्ताक संस्कृतीच्या अस्पष्ट खुणा


प्रा.कैलास सलादे, मराठी विभाग, सा.फु.पुणे विद्यापीठ पुणे. मोबा-९९२१५२८४२१


 शेतीचा लागलेला शोध हा मानवी संस्कृतीचा स्थापनेतील प्रारंभ बिंदू होय.शेतीचा शोध हा स्रीने लावला याबद्दल सर्व अभ्यासक सहमत आहे.कृषीचा शोध स्रीने लावल्याने मानवी संस्कृतीच्या स्थापनेत तिचा मुख्य सहभाग स्पष्ट होतो.या संस्कृती प्रारंभावस्थेत संस्कृतीची प्रमुख म्हणून स्रीच होती.प्रारंभीच्या मातृसत्ताक कृषिसंस्कृतीत “शिकार करणारा (hunter and food gatherer)पुरुष हा तिच्या आश्रयाने नांदत होता.”१ प्रारंभ अवस्थेत स्रीला प्रतिष्ठा होती.कारण स्री आणि भूमी यांच्यातील गर्भधारणक्षमतेबद्दल मानव भांबावलेल्या अवस्थेत होता.स्रियांची ही सर्जनशीलता बघून स्रियांबद्दल त्याच्या मनात आदर आणि भीती या दोन्ही भावना निर्माण झाल्या असाव्या.कारण मातृसत्ताक कृषिसंस्कृतीमध्ये बर्याच कृषिदेवता ह्या स्रीरूपी होत्या. “स्री हे विश्वनिर्मितीचे,सृजनाचे केंद आहे.उगमस्थान आहे.तिच्यात अलौकिक आणि विलक्षण यातुशक्ती आहे अशी त्यांची श्रद्धा होती.”२ डॉ. रा.चिं.ढेरे एक निरीक्षण नोंदवतात की खननयष्टी(डीगिंग स्टीक) च्या साह्याने स्रीने शेतीला सुरुवात केली.या कालावधीत समाजजीवनात स्रीचे स्थान महत्वाचे होते. “कारण अगदी प्राथमिक अवस्थेत उत्पादनाची शक्यताच नसल्याने श्रमविभागणीचा प्रश्नच निर्माण झालेला नसावा.पुरुषांकडे विशिष्ट असे काम नव्हते.स्रीकडे मात्र मुलांची जोपासना नैसर्गिक रीत्या असल्याने या श्रमाविभागणीला पूर्व प्राथमिक अवस्थेत स्रीचे स्थान अधिक महत्वाचे होते.”३ “लोकायत परंपरेने वामाचारात स्रीला प्राध्यान्य दिले होते.स्री हीच विश्वाची माता आहे असेही या परंपरेत मानले गेले.”४संस्कृतीच्या निर्मितीत कृषीच्या शॊधाचा वाटा महत्वाचा आहे.हा कृषीचा शोध सहजासहजी लागलेला शोध नाही.काळाच्या निरीक्षणातून आणि प्रयोगातून स्रियांनी प्राथमिक अवस्थेतील शेतीचा शोध लावून भटकंतीला कंटाळलेल्या मानवाला स्थिरता मिळवून दिली. म्हणून त्याकाळात समाजजीवनात “स्रियांना उच्चपदस्थ भूमिका मिळाली असावी.एखाद्या गटाची व जमातीची संपत्ती नव्या पिढीच्या हातात देण्याचे काम स्रिया करीत असत.सर्व प्राचीन समाजामध्ये जो मातृदेवतांचा पंथ दिसतो.त्यातून स्रीची उच्चभूमिका दिसते.”५ संस्कृती निर्माणात महत्वाचे योगदान देणाऱ्या स्रीचे नंतरच्या काळात अवमूल्यन झाले.संस्कृतीच्या प्रधानावस्थेकडून ती दुय्यम अवस्थेकडे फेकली गेली.स्रीचे हे अवमूल्यन “सीमान द बूव्हा’ एक मानवी जीवनातील ,इतिहासातील पायरी व टप्पा समजतात.”६ मुळात हे अवमूल्यन खननयष्टीच्या शेतीकडून नांगराने केल्या जाणाऱ्या कृषीकडे जी वाटचाल झाली तिच्यामुळे घडले असे रा.चिं.ढेरे मत नोंदवतात.नांगराकडे कृषीची जी वाटचाल झाली “ती पुरुषसत्तेच्या प्रस्थापनेची नांदी ठरली.शेती(क्षेत्रासत्ता ,क्षेत्रप्रतिष्ठा)संपून,तिच्या जागी कृषी (म्हणजे कर्षसत्ता) स्थिरावली.जोवर खननयष्टीच्या साह्याने स्री करवी शेती होत होती .तोवर निसर्गाशी/सृष्टीशी आमौपम्यवृतीचा अनुभव घेतला जात होता.परंतु कर्षसत्तेत भूमी आणि तिच्याशी समरूपता साधणारी स्री केवळ भोगवस्तू बनली,भोगवासना बनली.”७ नांगराच्या साह्याने शेतीला प्रारंभ झाला.या अवस्थेत स्री शारीरिक असमर्थतेमुळे नांगराच्या अधिक कष्टाच्या शेतीपासून दूर झाली.पुरुषाने कृषिव्यवस्था आपल्या हाती घेतली.मुळातील मातृप्रधान संस्कृती नष्ट होत गेली.आर्यांची पुरुषप्रधान संस्कृती सर्वत्र वर्चस्व निर्माणकर्ती झाली.मुळातील नैसर्गिक,आदिम अशी मातृसंस्कृती नष्ट होऊन नंतरच्या काळात स्री पुरुषाची गुलाम बनली.मनुस्मृतिने तिच्या अभिव्यक्तीचे,अविष्काराचे स्वतंत्र्य नाकारले.आणि तिचे अस्तित्व गौण ठरवले.
    एके काळाची ही मातृप्रधान संस्कृती नष्ट झाली असली तरी कोणतीही संस्कृती ही पूर्णतः कधीच नष्ट होत नसते.तिच्यातील काही अवशेष हे नंतरच्या पिढ्यात अभौतिक संस्कृतीचे घटक म्हणून टिकून राहतात.आदिम मातृसंस्कृतीच्या अस्पष्ट खुणा या सजीवाशेष रूपाने लोकगीते,लोककथा,उखाणे,म्हणी,विधीविधानाच्या रूपाने साहित्यात टिकून राहतात. “भारतामध्ये अगदी अलीकडेपर्यंत आसाममधील खासी जमातीमधील आणि त्रावणकोर कोचीन मधील नायर जमातीमध्ये मातृसत्ताक समाजपद्धती अस्तिवात होती.”८ सातवाहन राजवटीतील राज्यकर्ते आपल्या नावाच्या अगोदर आईचे नाव लावत याकडे मातृसत्ताक संस्कृतीचा एक अवशेष म्हणून बघायला हवे.मराठी साहित्यामधून मातृसंस्कृतीच्या अस्पष्ट खुणा शोधता येतात.
     ऐश्वर्य पाटेकर यांच्या ‘भुईशास्र’(२०११) या काव्यसंग्रहातून आदिम अशा मातृसंस्कृतीच्या काही अस्पष्ट खुणा दिसून येतात.काव्यसंग्रहाच्या शीर्षकातच ‘भुई’ हा मातृप्रतिमेचा आदिबंध सांगणारा शब्द आहे.मुळात भूमी आणि स्री यांच्यातील एकरूपता हे मातृसत्ताक संस्कृतीचे एक महत्वाचे वैशिष्ट्ये होते. “भूमी आणि स्री यांची एकरूपता माणसाच्या मनोविश्वात भूमीच्या सर्जनशीलतेचा आणि स्रीच्या सर्जनशीलतेचा अनुभव माणसाने परस्पर भाषेत मांडला आहे.कधी भूमीला स्री मानून तिच्यावर स्रीचे निसर्गधर्म आरोपित केले आहे.तर कधी स्रीला भूमी मानून तिच्यावर भूमीचे निसर्गधर्म आरोपित केले आहेत.”९ पाटेकरांच्या ‘भूईशास्र’या काव्यसंग्रहातून ‘स्री’चे,स्रीच्या भावजीवनाचे ,समाज स्थानाचे आणि तिच्यावरील सांस्कृतिक वर्चस्वाचे अनेक रूपे व्यक्त झाली आहे.या संग्रहातील रूपांमध्ये ‘माय आणि भुई’ह्या दोन रूपातील साध्यर्म्य वौशिष्ट्य पूर्ण आहे .ह्या कवितेतील स्री ही पुरुषप्रधान व्यवस्थेत दुय्यम स्थानावर फेकली गेलेली आहे.पुरुषीव्यवस्थेशी संघर्ष करणारी आणि आपली मातृसत्ताक जीवनपद्धती जपू बघणारी स्री या कवितेत ‘आई’च्या रूपाने जाणवते.मातृसत्ताक कृषिव्यवसायावर हळूहळू पुरुषांचे वर्चस्व प्रस्थापित होत गेले आणि स्रीच्या स्थानाचे अवमूल्यन होत गेले.ह्या गोष्टींचा संदर्भ पाटेकरांच्या ‘मुंगीचिया विवरी’या कवितेत जाणवतो. “आईने पेरलं वावर/स्वतःच्या हातानं/उगवून आल्यावर म्हणाली/एवढा हिर्वा हिर्वा/हिर्वा हिस्सा माझा/माझ्या एकटीचा/नेमकी तितकंच/तेवढंच हिर्व तिच्या भरताराच्या डोळ्यात खुपलं/आईच्या हिर्व्या हिस्स्याचं जाळीत झालं..”१० हा संदर्भ स्रीच्या सामाजिक आणि सांस्कृतिक स्थित्यंतराचा आहे.मुळ मातृसत्ताक संस्कृती ज्या पुरुषी कावेबाजीतून नष्ट झाली तोच गनिमीकावा कवितेतील भ्ररताराकडून केला गेला आहे.आदिम मातृप्रधान संस्कृतीत स्रीच्या हातातून शेती ज्या पद्धतीने काढून घेतली व स्रीला दुय्यम स्थानावर आणले तो आदिम संस्कृतीतील सांस्कृतिक स्थित्यंतराचा संदर्भ संस्कृतीतिहासाची पुनरावृत्ती करतो.
      मातृसत्ताक संस्कृतीमध्ये पुरुषाला फारसे महत्वाचे स्थान नव्हते.पित्याचा कुळाशी फारसा संबंध नव्हताच.आर्य संस्कृतीत मात्र ‘पिता’हा सर्व कुटूंब व्यवस्थेचा प्रमुख आणि समाज व्यवस्थेत आदराचे स्थान प्राप्त झालेला होता.त्यामुळे ऐश्वर्य पाटेकर यांच्या कवितेतील वेगळ्याच बापाची प्रतिमा बघून ह्या प्रतिमेवर काहींनी आक्षेप नोंदवले आहे.आपल्या संस्कृती विचारात पाटेकरांनी चितारलेली बापाची प्रतिमा बसत नाही असे आक्षेपकर्त्यांचे म्हणणे होते.मात्र त्यांच्या कवितेतील बापाची प्रतिमा ही आदिम मातृसत्ताक संस्कृती सदर्भातून आलेली आहे.पुरुषाचा “मातृसत्ताक समाजात पित्याच्या कुळाशी संबंध जवळ जवळ नसतोच.चिनी भाषेत कुळवाचक शब्दाचा अर्थ ‘स्री पासून’ जन्मलेला असा होतो.अतिप्राचीन काळातील मातृसत्तकाचा हा अवशेष असावा. ‘खासी’ टोळ्यांमध्ये from the women sprang the clan’ असा वाक्प्रचार आहे.मुलाचा वंश आईवरून ठरतो.पिता हा केवळ निमित्तकारण म्हणून जन्मदाता(begetter)होय,’स्रीला’भेट देणारा परका पाहुणा एवढेच त्याचे स्थान!”११ पाटेकरांच्या कवितेतली बाप प्रतिमाही या पेक्षा वेगळी नाही.म्हणून बापाची ओळख सांगताना कवी म्हणतो-“आईनं बोट दाखवलं तुझ्याकडे/म्हणून तुला बाप समजतो/बाकी काय खुणा आहे तुझ्या/तू माझा बाप असल्याच्या माझ्यात.”१२ ही बापाची ओळख पुरुषप्रधान संस्कृती रक्षकांना खटकणारी आहे.मात्र कवीच्या भावविश्वात आदिम मातृसंस्कृतीच्या अस्पष्ट खुणा ह्या निमित्ताने स्पष्ट झाल्या आहे.
     कवितेतील बापाच्या प्रतिमा ‘पितृत्व’आदिबंधाच्या विरोधाभासी आहे.पित्याचा किंवा बापाचा आदिबंध पाऊस,मार्गदर्शक,सावली या प्रतिमातून व्यक्त होतो.मात्र येथे बापाची प्रतिमा –“ठणक बेंबीच्या देठीला/मशागतीतून मागे राहिलेलं धसकट/खसकन खुपसलं पायात/हाच तो बाप,ज्यानं मोडला आईचा खोपा/छाकट्या छिनालगवश्या बाईसाठी.”१३मातृसंस्कृतीत कुटूंब व्यवस्थेची प्रमुख म्हणून स्रीच मुख्य होती.याचा संदर्भ भुईशास्रात दिसतो. “पिकाच्या मधोमध पोहचलो/जगून राठ झालेल्या शरीराचं/भूरभूरलं जावळ/ह्याच त्या माझ्या चार बहिणी/आईच्या जात्यापाळच्या ऒवीतल्या चार गावच्या बारवा/अन मी मधी जॊंधळा हिरवा.”१४ या लॊकगीत आणि संकेतांच्या जवळ जाणा-या कवितेत बापाचे स्थान मुळीच दिसत नाही.कारण बापानं “गॊमाशी झटकावी इतक्या सहजतेने/झटकून फेकलं नातं.”१५ किंवा “रानभर चरणारी चंद्रीगाय/संध्याकाळी माझ्याच गव्हाणीत आपसूक येऊन/उभी राहते खुंट्याशी बिनदाव्याची/तू तर कधीच वळाला नाहीस/माझ्या घराकडं.’’१६
      कवितेतल्या बाप प्रतिमेनं कधीच पितृत्व स्वीकारलं नाही.बाप म्हणून ज्या जबाबदा-या आणि कर्तव्य असतात त्या त्याने कधीच पूर्ण केल्या नाहीस्रीला भेट देणारा एक परका पाहूणा किंवा ‘बिगेटर’या भूमिकेपलिकडे तॊ कधीच गेला नाही.मातृसत्ताक पध्द्तीमध्ये पुरुष हा “In jawai he neither live not eats in his wise’s house,but visites it only other dark.”१७ ह्या पुरताच मर्यादित राहिला. मातृसंस्कृतीत “पुरुषाला स्रीच्या गर्भधारणेच्या प्रक्रीयेतील आपली ताकद आणि यॊगदान माहित नसल्याने तॊ तंत्र आणि यातू या दॊहॊमध्ये भांबवलेल्या अवस्थेत होता.”१८ असे निरिक्षण विद्यूत भागवत यांनी नॊंदवलेले आहे.पाटेकरांच्या कवितेतील बापाच्या प्रतिमा ह्या संस्कृतीकक्षात न बसणा-या अशा आढळून येतात. कारण मातृसंस्कृतीत “पुरुषाला महत्वाचे स्थान नाही.स्रीच्या नात्यातील माणसांच्या दृष्टीने तॊ अगदी परकाच मानला जातॊ.केवळ ‘बिगेटर’ या शब्दानेच ते त्याचा उल्लेख करतात.एकेकाळी अज्ञात असलेले निर्मिती क्रीयेतील पुरुषाचे स्थान ज्ञात झाल्यावर त्याला ‘बिगेटर’हे स्थान तरी लाभले.परंतु व्यावहारिक जीवनात कुटूंबाच्या दृष्टीने त्याला मुळीच स्थान नसल्याने तो केवळ ‘उदासिन’ परका पाहूणाच राहिला.”१९
     ‘भुईशास्र’ या ऍश्वर्य पाटेकर यांच्या संग्रहातील बापाची प्रतिमा यापेक्षा वेगळी नाही.या काव्यसंग्रहभर बापाची प्रतिमा ‘nagetive’(नकारात्मक)स्वरूपाची राहिली आहे.कारण ‘भुईशास्र’ ह्या संग्रहात आदिम मातृसत्ताक संस्कृतीच्या अस्पष्ट खुणा स्पष्ट झाल्या आहे.


संदर्भ- 1-ढेरे रामचंद्र चिंतामण,’श्री आनंदनायकी’,पद्मागंधा प्रकाशन पुणे,प्रथम आवृत्ती,२००२,पृ.९४. 2-लोहीया शैला, ‘भूमी आणि स्री’, गॊदावरी प्रकाशन ऒरंगाबाद,जुलै २०००,पृ.१७. 3-गाडगीळ स.रा., ‘लोकायत’,लोकवाड्‍मय गृह प्रा,लि.मुंबई,व्दि.आ.१९९४,पृ.६८. 4-तंत्रैव,पृ.२४. 5-विद्यूत भागवत, ‘स्रीवादी सामाजिक विचार’,डायमंड पब्लिकेशन पुणे,प्र.आ.२००८,पृ.१११. 6-तंत्रैव,पृ.१११. 7-ढेरे रामचंद्र चिंतामण, उनि.पृ.९४. 8-गाडगीळ स.रा.,उनि.पृ.७२. 9- ढेरे रामचंद्र चिंतामण, उनि.पृ.९३. 10-पाटेकर ऍश्वर्य, ‘भुईशास्र’,शब्दालय प्रकाशन श्रीरामपूर,प्र. आ. २०११,पृ.४६. 11-गाडगीळ स.रा.,उनि.पृ.१३१. 12- पाटेकर ऍश्वर्य, उनि.पृ.49. 13- तंत्रैव,पृ.41. 14- तंत्रैव,पृ.42. 15- तंत्रैव,पृ.49. 16- तंत्रैव,पृ.49. 17- गाडगीळ स.रा.,उनि.पृ.131 . 18- ढेरे रामचंद्र चिंतामण, उनि.पृ.111. 19- गाडगीळ स.रा.,उनि.पृ.131 .

संदर्भ[संपादन]

 1. ^ अर्वाचीन मराठी काव्यदर्शन
 2. a b Google's cache of नीरजा[मृत दुवा] snapshot of the page as it appeared on 14 May 2010 06:33:51 GMT.
 3. ^ http://loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=66450:2010-04-30-15-37-34&catid=212:2009-08-18-16-27-53&Itemid=210. It is a snapshot of the page as it appeared on 14 May 2010 06:33:51 GMT[मृत दुवा]

संदर्भ[संपादन]

नोंदी[संपादन]

बाहुदुवे[संपादन]