Jump to content

म्हणी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ज्यात लोकपरंपरेने आलेला अनुभव वा ज्ञान ग्रथित झालेले असते अशी लोकोक्ती, ते वाक्य म्हणजे म्हण होय. किंवा कमी शब्दात परिस्थितीचा अन्वयार्थ अथवा तत्संबंधी सूचक, समर्पक, कालातीत भाष्य व्यक्त करणारा लोकपरंपरेने वापरला जाणाऱ्या अर्थपूर्ण शब्द समूहांना 'म्हण' असे म्हणतात.

म्हणीमध्ये जीवनातील विशिष्ट अनुभव, माहिती, सत्य व उपदेश साठवलेला असतो. म्हणीच्या विचारांत मार्मिकता असते. म्हणी समाजाचा आरसाच आहेत. मानवाच्या चांगल्या वाईट प्रवृत्ती, आचार -विचार, नानाविध चालीरीती, निरनिराळी नातीगोती इ.चे प्रतिबिंब त्यांत पडलेले असते. समाजातील सर्व थरातील लोकांना 'म्हणी' आवडतात. कमी शब्दात परिस्थितीचा अन्वयार्थ अथवा तत्संबंधी सूचक, समर्पक, कालातीत भाष्य व्यक्त करणारा लोकपरंपरेने वापरला जाणाऱ्या अर्थपूर्ण शब्द समूहांना 'म्हण' असे म्हणतात. यात उपमा, रूप, पर्यायोक्ती, विरोधाभास, यमक, अनुप्रास अशा विविध भाषा अलंकारां सोबत ठसकेदार रचनेचा वैशिष्ट्यपूर्ण उपयोग केलेला असतो.[]'म्हण' शब्द समूहात बऱ्याचदा ध्वन्यार्थ हा वाच्यार्थापेक्षा निराळा असू शकतो.<ref> या शिवाय गणिती अंक, संख्या व कल्पना यांचा चपखल उपयोग यामुळे म्हणी तसेच वाक्प्रचारयुक्त भाषा-साहित्य व बोलीभाषा लोकप्रिय राहिलेल्या आहेत. जगातील सर्व प्रमुख भाषांमध्ये म्हणी भरपूर प्रमाणात आढळतात.

प्रचलित मराठी म्हणी

[संपादन]

मराठीतील म्हणी आणि त्यांचे अर्थ

  • एका हाताने टाळी वाजत नाही
अर्थ: कोणत्याही भांडणात दोन्ही बाजूंकडील माणसे जबाबदार असतात.
  • खाई त्याला खवखवे
अर्थ: अपराधी व्यक्तीला मनातून भीती वाटत असते, तो मनात अस्वस्थ असतो.
  • गर्जेल तो पडेल काय?
अर्थ: केवळ बडबड करणाऱ्याच्या हातून कोणतेही कार्य घडत नाही.
  • पाण्यात राहून माशाशी वैर कशाला?
अर्थ: समाजात ज्यांच्या सोबत राहायचे आहे त्यांच्याशी शत्रुत्व करू नये.
  • जी खोड बाळा ती जन्म काळा
अर्थ: जन्मजात अंगी असलेले गुण किंवा दुर्गुण जन्मभर जात नाहीत.
  • अति तेथे माती
अर्थ: कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच
  • अडला हरी गाढवाचे पाय धरी
अर्थ: शहाण्या माणसाला प्रसंगी मूर्खाची विनवणी करावी लागते.
  • आधी पोटोबा मग विठोबा
अर्थ: आधी स्वतःच्या पोटापाण्याचा (स्वार्थाचा) विचार करावा आणि त्यानंतर अन्य कामांचा (परमार्थाचा) विचार करावा
  • आयत्या बिळात नागोबा
अर्थ: दुसऱ्याच्या कष्टांचा स्वतःसाठी उपयोग करून घेणे
  • आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन
अर्थ: किमान लाभाची अपेक्षा केली असताना आर्थिक लाभ मिळणे.
  • उचलली जीभ लावली टाळ्याला
अर्थ: विचार न करता बोलणे.
  • करावे तसे भरावे
अर्थ: केलेल्या कर्माची फळे भोगावी लागतात.
  • काखेत कळसा गावाला वळसा
अर्थ: हरवलेली वस्तू जवळपास असताना सर्वत्र शोधत राहणे.
  • कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ
अर्थ: आपलाच माणूस आपल्याच माणसांच्या नुकसानीला जबाबदार होतो.

(गोत >गोत्र> कूळ >आपली माणसे )

  • कुठे इंद्राचा ऐरावत कोठे शाम भटाची तट्टाणी
अर्थ: अति थोर माणूस आणि अति सामान्य माणूस यांची बरोबरी होऊ शकत नाही.
  • खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी
अर्थ: आपल्याला हव्या त्या गोष्टी हव्या तितक्या प्रमाणात मिळाल्या पाहिजेत नाहीतर काहीच नको असे वाटणे.
  • गरज सरो नी वैद्य मरो
अर्थ: आपली गरज संपली की लोक उपकारकर्त्याला विसरतात.
  • गोगलगाय आणि पोटात पाय
अर्थ: वरून दिसायला अगदी घरी पण प्रत्यक्षात मात्र पक्का बेरकी असणे.
  • चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे
अर्थ: प्रत्येकाला आयुष्यात कधीना कधी अधिकाऱ्याची संधी मिळते.
  • चोर सोडून संन्याशाला फाशी
अर्थ: अपराध्याला सोडून निरपराध्याला शिक्षा देणे.
  • जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही
अर्थ: मूळचा स्वभाव कधीच बदलत नाही.
  • झाकली मुठ सव्वालाखाची
अर्थ: स्वतःविषयी वल्गना करत राहण्याऐवजी मौन पाळल्यास अब्रूचे रक्षण होते.
  • तहान लागल्यावर विहीर खणणे
अर्थ: एखाद्या वस्तूची गरज निर्माण झाल्यावर उपाय शोधण्याची धडपड करणे.
  • दगडापेक्षा वीट मऊ
अर्थ: मोठ्या संकटापेक्षा लहान संकट सुसह्य वाटणे.
  • दाम करी काम
अर्थ: पैशाने (बरीच) कामे होतात.
  • देश तसा वेश
अर्थ: भोवतालच्या परिस्थितीनुसार वागावे.
  • न कर्त्याचा वार शनिवार
अर्थ: काहीतरी सबबी सांगून काम टाळणे
  • नाव मोठे लक्षण खोटे
अर्थ: भपका मोठा पण वस्तुस्थिती नेमकी त्या विरुद्ध
  • नाचता येईना अंगण वाकडे
अर्थ: आपल्यातील उणेपणा झाकण्यासाठी दुसऱ्या वस्तूला नावे ठेवणे.
  • पुढच्यास ठेच मागचा शहाणा
अर्थ: दुसऱ्याचा अनुभव लक्षात घेऊन स्वतः वागावे
  • प्रयत्नांती परमेश्वर
अर्थ: कितीही अवघड गोष्ट प्रयत्नांनी सध्या होते.
  • पी हळद नी हो गोरी
अर्थ: केलेल्या कामाचे फळ लागलीच मिळावे अशी अपेक्षा बाळगणे.
  • बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी
अर्थ: प्रत्यक्ष कृती न करता नुसती बडबड करणे.
  • भित्यापाठी ब्रह्मराक्षस
अर्थ: भित्र्या माणसावर अनेक संकटे कोसळतात.
  • बाळाचे पाय पाळण्यात दिसतात
अर्थ: एखाद्याच्या भावी काळातील कर्तबगारीचा अंदाज त्याच्या लहानपणीच बांधता येतो.
  • रात्र थोडी सोंगे फार
अर्थ: काम कमी करणे आणि देखवा जास्त करणे
  • लेकी बोले सुने लागे
अर्थ: एकाला उद्देशून पण दुसऱ्याला लागेल असे बोलणे.
  • शेंडी तुटो का पारंबी तूटो
अर्थ: दृढ निश्चय करणे.
  • सुंठी वाचून खोकला जाणे
अर्थ: उपाययोजना करण्याआधीच संकट दूर होणे.
  • हसतील त्याचे दात दिसतील
अर्थ: चांगली गोष्ट करताना हसणाऱ्यांची पर्वा करू नये.
  • शेरास सव्वा शेर
अर्थ: समर्थ माणसाला त्याच्याहून अधिक समर्थ माणूस भेटणे.
  • हातच्या काकणाला आरसा कशाला?
अर्थ: प्रत्यक्ष दिसणाऱ्या गोष्टीला पुराव्याची गरज नसते.

(मराठी म्हणींची यादी विकीकोट सहप्रकल्पात पहावी.)

म्हणीसंबंधातील ग्रंथ आणि कोशवाङ्‍मय

[संपादन]
  • मराठी भाषेचे वाक्प्रचार व म्हणी (वि.वा. भिडे)
  • मराठी भाषेचे संप्रदाय व म्हणी - इंग्रजी पर्यायांसह (वा.गो. आपटे)

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ डॉ. विवेक पाटकर. "भाषा-गणित घनिष्टता". दिव्य मराठी भास्कर. ९ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.