Jump to content

भुजंगप्रयात (वृत्त)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(भुजंगप्रयात या पानावरून पुनर्निर्देशित)

भुजंगप्रयात हे अक्षरगणवृत्त आहे. यात लघुगुरूक्रमानुसार शब्द येतात. याचे ४ खंड असून, प्रत्येक खंड हा १२ मात्रांचा असतो. एकूण अक्षरे ४८, एकूण मात्रा-४८, यती ६ व्या अक्षराअंती. यती म्हणजे थांबणे.

हे वृत्त मराठीत मोठ्या प्रमाणात वापरले गेले आहे. समर्थ रामदासस्वामींचे मनाचे श्लोक याच वृतात आहेत.

उर्दू काव्यातही हे वृत्त खूप लोकप्रिय आहे. याचे उर्दू काव्यातील नाव- मुतकारिब मुसम्मन सालिम बहर असे आहे. (बहर या शब्दाचा उच्चार बेहेर असा होतो, म्हणजे अहमदचा जसा अहेमद तसा. बहर म्हणजे वृत्त )

भुजंगप्रयातचा लघुगुरू क्रम असा आहे -

ल गा गा ल गा गा ल गा गा ल गा गा
१ २ २ १ २ २ १ २ २ १ २ २

ल म्हणजे लघु अक्षर आणि गा म्हणजे गुरू अक्षर. लघु अक्षराची १ मात्रा आणि गुरू अक्षराच्या २ मात्रा.

उर्दू छंदशास्त्रात याचे गण खालीलप्रमाणे

फऊलुन फऊलुन फऊलुन फऊलुन फऊलुन फऊलुन फऊलुन फऊलुन

उदाहरणे:

१) मनोगतवरील प्रवासी महाशयांची 'तुलाही मलाही' ही गझल या वृत्तात आहे.

 कशी को । ण जाणे । अकस्मा ।त लाट
 
  कशी कोण जाणे अकस्मात लाट
  दुभंगून जाई तुलाही मलाही
  कधी भेट होई? अता राहवेना
  प्रवासी जराही, तुलाही मलाही
       ----- प्रवासी महाशय

( मात्रा नीट समजण्यासाठी पहिली ओळ खंड पाडून दाखवली आहे)

२)

  
  पहाटे पहाटे मला जाग आली
  तुझी रेशमाची मिठी सैल झाली
          -----सुरेश भट

३)

  गज़ल उसने छेडी मुझे साज़ देना
  जरा उम्रे-रफ्ता को आवाज़ देना
          ---- सफी लखनवी

४)

  
  अता राहिलो मी जरासा जरासा
  उरावा जसा मंद अंती उसासा
  गडे सांग हा घाव आहे कुणाचा
  तुझा चेहरा वाटतो पाहिलासा
        ---सुरेश भट

टीप :- माधव ज्युलियनांच्या छंदशास्त्र पद्धतीनुसार लगा पद्धतीने वृत्त चटकन समजते, असा समज आहे. त्यामुळे त्याप्रमाणे येथे दिले आहे. य य य य असे दिलेले नाही. यरतनभजसम प्रमाणे ही वृत्ते लक्षात ठेवता येतात.

उर्दू छंदशास्त्र

[संपादन]

आपल्याकडे भुजंगप्रयात कसे वापरले जाते ते पाहिले. आता जरा उर्दू छंदशास्त्रावर चर्चा करू. गज़ल लेखन करणाऱ्यांसाठी याचा विशेष उपयोग होणार आहे.

मूळ गणांत( सालिम बहरमध्ये) जेव्हा काही विकृती निर्माण होते, तेव्हा त्यापासून काही, तेच गुणधर्म असलेले पण अंशात्मक भेद असलेले गण निर्माण होतात. त्याला ज़िहाफ असे म्हणतात. ज़िहाफ म्हणजे उणीव, कमतरता, मुळापासून अलग झालेले. उर्दू छंदशास्त्रात मूळ १० गण आहेत. त्यांच्यापासून १९ मूळ वृत्ते (सालिम बहर) निर्माण झाली आहेत. ज़िहाफमुळे निर्माण झालेले गण अनेक आहेत.

भुजंगप्रयात उर्फ बहर-ए- मुतकारिब

[संपादन]

सालिम बहर - लगागा ! लगागा ! लगागा ! लगागा

ज़िहाफमुळे होणारे या बहरचे उपछंद पुढीलप्रमाणे-

१) लगागा ! लगागा ! लगागा ! लगागाल

२)लगागा ! लगागा ! लगागा ! लगाल

३)लगागा ! लगागा ! लगागा ! लगा

 उदाहरण :
 कधी मी असा अन् कधी मी तसा
 कळेना मलाही असा मी कसा?
 कुठे चालली वाट ही एकटी
 कुणाचाच नाही कुठे ही ठसा...
       - प्रदीप कुळकर्णी

४) लगागा ! लगागा ! गागा ! लगागा

५) गागा ! गागा ! गागा ! गागा

६) लगा ! लगागा! लगा ! लगागा

७) गाल! लगागा ! गाल ! लगाल

८) गाल ! लगागा ! गाल ! लगा

९) लगाल! ललगा ! लगाल ! ललगा

१०) लगाल ! गागा ! लगाल ! गागा

 उदाहरण :
  खुशी न गम की, न गम खुशीका
  अजीब आलम है जिंदगी का
  चिराग-ए-अफसुर्दी-ए-मोहब्बत
  न बुझ रहा है न जल रहा है
       - शकील बदायुनी

११) लगा ! लगागा ! लगा ! लगागा ! लगा ! लगागा

  उदाहरण :
   कुणा कळेना कुणा दिसेना घरात माझ्या
   तुझा परी चेहरा हसे या मनात माझ्या
   उगीच का कारणाविना का वसंत आला
   अता तरी वेचण्या फुले ये वनात माझ्या
            - अनिल पाटील

१२) लगालगागा ! लगालगागा ! लगालगागा ! लगालगागा

  उदाहरण :
  किती क्षणांचे असह्य ओझे, निमूट खांद्यावरून न्यावे
  कुणी दिली ही अनाम शिक्षा, रिते किती माप मी भरावे
                  ---- शांता शेळके

बाह्य दुवे

[संपादन]

भुजंगप्रयात[permanent dead link]


मना सज्जना तू कडेनेच जावे, न होऊन कोणासही दुखवावे| कुणी दुष्ट लावील अंगास हात, तरी दाखवावा भुजंगप्रयात||