गोपालकाला
कृष्ण जयंतीचा उत्सवासाठी तयार केल्या जाणाऱ्या विशिष्ट प्रसादास गोपालकाला असे म्हणतात.[१]दहीहंडी आणि कृष्णजन्माष्टमी यांच्या निमित्ताने हा प्रसाद तयार केला जातो. श्रीकृष्णजयंती व्यतिरिक्त वर्षभरात जेव्हाजेव्हा काल्याचे कीर्तन होते तेव्हा तेव्हा त्या कीर्तनानंतर गोपालकाला होतो. म्हणूनच त्या कीर्तनाला "काल्याचे" कीर्तन म्हणतात. ज्ञानेश्वरीचे किंवा दासबोधाचे पारायण, किंवा अनेक दिवस चालणाऱ्या अशाच एखाद्या ग्रंथवाचनानंतर, अथवा कीर्तन महोत्सवामध्ये शेवटच्या दिवशी काल्याचे कीर्तन होते. वारकरी संप्रदायात वारीची सांगता गोपाळकाला करूनच होते.[२]
दहीहंडी
[संपादन]कृष्ण जयंतीचा उत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो. महाराष्ट्रात विशेषतः कोकणात या उत्सवानिमित्त दहीकाला होतो. श्रीकृष्ण त्याच्या बालपणी आपल्या मित्रांसह गोकुळातील घरांमध्ये जाऊन टांगलेल्या शिंकाळ्याच्या मडक्यातील दही-लोणी खात असे.[३] त्यासाठी मुले मानवी मनोरा करून मडके फोडीत असत. ही परंपरा आजही भारतात दहीहंडीच्या रूपाने साजरी केली जाते. 'गोविंदा आला रे आला, गोकुळात आनंद झाला' असे गाणे गात अनेक लहान थोर पुरुष घरोघरी नाचायला जातात व दहीहंडी फोडतात. [४] कित्येक ठिकाणी गोपाळकाला करून कृष्ण चरित्रातील सोंगे आणण्याचाही प्रघात आहे.[५]
गोपाळकाला/दहीकाला
[संपादन]गोपाल म्हणजे गायींचे पालन करणारा. काला म्हणजे एकत्र मिसळणे. पोहे, ज्वारीच्या लाह्या, धानाच्या लाह्या, लिंबाचे वा आंब्याचे लोणचे, दही, ताक, चण्याची भिजविलेली डाळ, साखर, फळांच्या फोडी इत्यादी मिसळून तयार झालेला हा एक खाद्यपदार्थ असतो.[६] हा कृष्णास फार प्रिय होता, असे सांगितले जाते. श्रीकृष्ण व त्याचे सवंगडी मिळून यमुनेच्या तीरावर हा तयार करीत असत व सर्वजण वाटून खात असत असे मानले जाते.
संदर्भ
[संपादन]- ^ "Gopalkala recipe and its significance in Janamashtami - Times of India". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). 2021-08-25 रोजी पाहिले.
- ^ Kulkarni, Dattatray Digambar (1975). Dvādaśa jyotirliṅga varṇana. Pravāsī Prakāśana.
- ^ Chanchreek, Jain; Chanchreek, K. L.; Jain, M. K. (2007-01-01). Encyclopaedia of Great Festivals (इंग्रजी भाषेत). Shree Publishers & Distributors. ISBN 9788183291910.
- ^ Das, Ajay (2007). Faiths, fairs & festivals of India (इंग्रजी भाषेत). Better Books. ISBN 9788190317771.
- ^ भारतीय संस्कृती कोश खंड दुसरा
- ^ "Ghar ka Swad: जन्माष्टमी पर बनाएं श्रीकृष्ण का प्रिय Gopalkala प्रसाद". punjabkesarinari. 2021-08-25. 2021-08-25 रोजी पाहिले.