रासलीला नृत्य
रासलीला नृत्य हे उत्तर भारतातील अनेक प्रांतांमध्ये प्रचलित असलेला, संगीत-नृत्यप्रधान लोकनाट्यप्रकार आहे. नाट्यशास्त्रामध्ये रास किंवा रासक व हल्लीसक यांचा ‘उपरूपक’−म्हणजेच नृत्यप्राधान्य असलेला नाटकाचा दुय्यम रचनाप्रकार−असा उल्लेख सापडतो. रूढार्थाने कृष्णाने वृंदावनात गोपींबरोबर जे नृत्य केले, त्याचा ‘रास’ म्हणण्याचा प्रघात आहे. परंतु या प्रकारच्या नृत्य-नाट्यातून कृष्णाची गोपक्रीडा किंवा इतरही कथाभाग येत असल्याने त्यास ‘रासलीला’ ही संज्ञा प्राप्त झाली असावी.
‘रास’चे वर्णन भागवत पुराणात पाच अध्यायांत सविस्तर आले आहे. कृष्णाच्या मुरलीने बेहोष होऊन गोपी आपले नित्य व्यवहार सोडून त्याच्याबरोबर नृत्य करू लागल्या. प्रत्येक गोपीबरोबर एक-एक कृष्ण अनेक रूपे धारण करून नृत्य करू लागला. हे वर्तुळाकार नृत्य सहा महिने चालले होते, असे हे वर्णन आहे. भागवतातून मूळ प्रेरणा घेऊन नृत्यकारांकडून नृत्य, नटांकडून अभिनय आणि कृष्णाच्या रसपूर्ण आयुष्यातून कथाभाग घेऊन रासलीलेचे तंत्र निर्माण झाले असावे. रासमधील कथोपकथन काव्यमय असते. पुढे कृष्णजीवनावरील चैतन्य महाप्रभू, सूरदास, जयदेव यांसारख्या सिद्धहस्त कवींची मधुराभक्तीपर काव्ये संगीतात बांधून रासलीलेच्या माध्यमातून मांडली गेली.
रासलीलेत नृत्यास विशेष प्राधान्य असते. यातील नृत्याचे साधारणपणे तीन भेद आढळतात. ‘ताल-रासक’ म्हणजे टाळ्या वाजवून केले जाणारे नृत्य ‘दंड-रासक’ म्हणजे हातातील दंड (काठ्या-टिपऱ्या) वाजवून केले जाणारे नृत्य व ‘मण्डल-रासक’ म्हणजे दोन गोपींमध्ये माधव अशा रूपात गोलाकार केले जाणारे नृत्य.
रासलीला होण्याचे मुख्य ठिकाण
[संपादन]उत्तर प्रदेशातील कृष्णाची जन्मभूमी असलेल्या ब्रजभूमीमध्ये रासलीला फार प्राचीन काळापासून प्रचारात आहे. इथूनच ही परंपरा इतरत्र पसरली व त्या त्या प्रांताने आपापल्या रुचीनुसार आणि इतर वैशिष्ट्यांनुसार ती जोपासली. ब्रजप्रमाणेच मणिपूरमध्ये व राजस्थान, गुजरातमध्ये ही रासलीला प्रसिद्ध आहे.
ब्रजभूमीतील रास
[संपादन]रासलीला हर लोकनाट्याच्या स्वरूपात भारतभर पसरली आहे. तरीही ब्रजभूमीत सोळाव्या शतकापासून एका परंपरेने ती केली जात आहे. कृष्णाच्या ह्या जन्मभूमीमुळे येथील रासलीलेस एक आगळे महत्त्व आले आहे.
येथील रंगभूमीचे तंत्र साधे असून रंगभूमी म्हणजे एक चौकोनी व्यासपीठाव्यतिरिक्त प्रेक्षकाच्या समान पातळीवर सोडलेला एक प्रशस्त भाग होय. ह्या व्यासपीठावर दोन आसने असून एक राधेकरिता व दुसरे कृष्णाकरिता असते. पडदा म्हणजे दोन व्यक्तींनी धरलेला अंतरपाट असतो. हा फक्त विशेष प्रसंगी वापरला जातो.
ह्या रासलीलेचे तीन भाग आहेत
नांदी अथवा नित्यरास
[संपादन]ह्या नृत्यनाट्याची पारंपरिक सुरुवात, मंचकावर बसलेल्या राधाकृष्णाच्या भक्तिपर समूहगायनाने होते. नंतर गोपी पूजा करून राधाकृष्णाला रासमंडलात प्रवेश करून नृत्यात भाग घेण्याचे आवाहन करतात. नित्यरासमध्ये प्रमुख पात्राची ओळख करून देऊन शैलीपूर्ण नृत्य करून ‘परमेलू’ नावाचे तालपूर्ण पदन्यास करतात. हा भाग कथ्थक नृत्यशैलीशी साम्य दाखविणारा वाटतो. हा जलद लयीत करून ह्यात ‘भ्रमरी’ म्हणजेच चक्कर घेतात. ह्या नित्यरासमध्ये कथ्थकमधील गतभावनृत्यासारखी छोटी नृत्ये, आकर्षक चाली व भुवयांच्या नयनरम्य हालचालींचा अंतर्भाव असतो.
संगीत अथवा बोधप्रद भाग
[संपादन]संगीत ह्या दुसऱ्या भागात बोधप्रद व भक्तिरसपूर्ण सहगानाचा अंतर्भाव होतो. वैष्णव लोक कला हे धर्मप्रसाराचे साधन मानत असल्यामुळे राधाकृष्णाच्या प्रीतीचा धार्मिक व तात्त्विक अर्थ दर्शविणारी गीते वापरीत असत.
लीला अथवा खेळकर नृत्यभाग
[संपादन]तिसऱ्या भागात वैष्णव पुराणातील एक कथा निवडून, ती संपूर्ण नृत्यनाट्याच्या स्वरूपात सादर करतात. हा भाग लोकनृत्यतंत्रात बसविलेला असतो. अधूनमधून गतभाव वा नृत्यचालीचा उपयोग करून रंजनप्रधान नृत्ये पेश करतात. सोळाव्या शतकातील वैष्णव कलेचा वारसा आजतागायत ब्रजमधील लोकांत पहावयास सापडतो.
गोपींचा वेश घागरा, चोळी व दुपट्टा असा असतो तर गोप हे धोतर व माळा परिधान करतात. ह्या रासलीलेतील गीते सोळाव्या शतकातील समाजव्यवस्था, भाषा व प्रघात दर्शवितात. कथ्थकमधील तोड्यासारखे बोल व नृत्य ह्या भागातसुद्धा दिसतात. रासलीला ही मुख्यतः देवालयाच्या आवारात केली जात असे. हल्ली वसंत, होळी, जन्माष्टमी वगैरे उत्सव व सणांच्या प्रसंगी रासलीला उत्तरेकडे खेडेगावांत सर्रास केली जाते. रासची सुरुवात होण्यापूर्वी ब्रजमधील सुप्रसिद्ध कवींनी रचलेल्या पदांनी साथीदार मंगलाचरण करतात व मग नित्यरासचा आरंभ होतो.
मणिपुरी रासलीला
[संपादन]मणिपूरचे महाराज भाग्यचंद्र जयसिंह यांनी १७७६ साली मणिपुरी रासलीला प्रथम प्रकाशात आणली, असे मानले जाते. ही वैष्णव संप्रदायावर आधारित असल्याने त्यात गीतनृत्यांत संपूर्ण कृष्णचरित्र केले जाते. भागवतात ‘रास’ म्हणजे अभिनय, नृत्य, गीतांसह पाच अंकांचे नाटक म्हणले आहे. पण नृत्याच्या प्राबल्यामुळे रास नाटकापेक्षा नृत्यरूपातच अधिक प्रसिद्ध आहे. अनेक प्रकारची नृत्ये व गीते ह्यात गुंफलेली असल्यामुळे, त्याला ‘महारास’ ही संज्ञा मिळाली असावी. मणिपुरी रासलीला भागवत परंपरेचे अधिकतम अनुकरण करते.
या रासमध्ये लास्य व तांडव हे दोन्ही प्रकार आहेत. त्याचे लोकमान्य असे सात प्रकार आहेत.
त्यांपैकी ५ लास्य रास होत
- महारास
- वसंतरास
- कुंजरास
- नित्यरास
- दिजराज
आणि २ तांडव रास होत
- गोष्ठरास व
- उत्खलरास
लास्यप्रकार हे गोपी व कृष्ण यांच्या जीवनावर आधारलेले असून, तांडवप्रकार हे कृष्णाचे गोरक्षण, राक्षस दमन, अश्वारोहण वगैरे क्रीडांवर आधारलेले आहेत. मणिपूरमध्ये राससाठी योजिलेल्या देवालयाजवळील मंडपास ‘रासमंडल’ असे म्हणतात. रासमध्ये शृंगार हा स्थायीरस असतो. मणिपुरी रासनाट्याचे दोन भाग आहेत : (१) चाली व (२) भंगी परेंग. चाली म्हणजे छोटे शुद्ध नृत्यप्रकार. भंगी परेंग म्हणजे विविध नृत्यासारखा. रासलीलेचा शेवट पुष्पांजली व प्रार्थना यांनी होतो.
महारास :
[संपादन]कार्तिक महिन्यातील पौर्णिमेच्या रात्री हा रास केला जातो. कृष्ण, राधा व गोपी नृत्य करीत असताना राधा व इतर गोपी यांचा अहंकार व गर्व नाहीसा करण्याकरता कृष्ण अंतर्धान पावतो. नंतर राधा व गोपींच्या विनवणीस मान देऊन समूहनृत्य होते.
वसंतरास :
[संपादन]चैत्रातील पौर्णिमेच्या रात्री हे नृत्यनाटय केले जाते. हे एक रंगपंचमीचे नृत्य आहे. चंद्रावली नावाच्या गोपीबरोबर कृष्ण नृत्य करताना पाहून राधेच्या मनात मत्सर उत्पन्न होऊन ती रुसून निघून जाते. कृष्णाने अनुनय केल्यावर ती दोघे मीलन नृत्य करतात.
कुंजरास :
[संपादन]हे आनंदमय नृत्यनाटय आश्विनातील प्रथमेच्या चंद्रांच्या साक्षीने करतात. गोपी व राधा शृंगार-साधन करून कुंजामध्ये कृष्णास भेटण्यास निघतात. कृष्णसुद्धा मीलनोत्सुक आहे. मीलनानंतर कुंजविहार करून सर्वजण गोलात नृत्य करतात.
नित्यरास :
[संपादन]सामाजिक उत्सवप्रसंगी व सणावारी हे नृत्य केले जाते. हे श्रीकृष्णाभोवती केलेले गोलाकार नृत्य. ह्यास ‘अभिसारा’ ने (कृष्णाचे राधेकडे गमन) सुरुवात होऊन राधाकृष्णाचे पवित्र मीलन दाखवितात. ह्याचा शेवट भक्तिरसपूर्ण नृत्यात होतो. राधा शेवटी आपला आत्मा कृष्णाच्या चरणी अर्पण करते.
दिजरास :
[संपादन]हा रास लास्यप्रकार असून दिवसा केला जातो. तो थोडासा गरबा नृत्यासारखा असून आकर्षण व नाजुक असा आहे.
गोष्टरास :
[संपादन](गोपनृत्य). हा तांडवप्रकार कार्तिकात केला जातो. कृष्ण व बलराम यांचे गोरक्षण, गोपांसमवेत कंदूक (चेंडू) नृत्य व नंतर बलरामाने केलेला धेनुकासुराचा वध हा कथाभाग नृत्यातून दाखवला जातो. काही नृत्यांत वृंदावनास पोहोचल्यावर कृष्णाने बकासुराच्या केलेल्या वधाचा प्रसंगही दाखवितात. हा एक ओजस्वी व आनंदमय तांडवप्रकार आहे आणि त्याचा शेवट भक्तिरसपूर्ण व तल्लीनरूप नृत्यांत होतो.
उत्खलरास :
[संपादन]ह्या नृत्यात श्रीकृष्णाच्या बाललीला व खोड्या दाखविल्या जातात. तसेच गोपींची छेड, माखन-चोरी, घागरफोडी, नंतर यशोदेकडे केलेली तक्रार व यशोदेने उखळास बांधून श्रीकृष्णास केलेली शिक्षा वगैरे दाखवून शेवटी गोपी व कृष्णाचे समूहनृत्य दाखविले जाते.
ह्या सर्व रासनृत्यांतून श्रीकृष्णाचे पवित्र, शृंगारपूर्ण व आनंदमयी दर्शन घडते. यांत कुंजरास, वसंतरास, महारास व नित्यरास आहेत. यांतील पहिले तीन रास ऋतूंसंबंधी असून ते आश्विन, वैशाख आणि कार्तिक महिन्यांमध्ये केले जातात. नित्यरास कोणत्याही उत्सवाच्या वेळी केला जातो. मणिपूरमध्ये रासनृत्यासाठी रासमंडल नामक एक खास मंडप उभारला जातो. रासची सुरुवात कीर्तन व साहित्यिक गीतगानाने होते. नंतर सुत्रधार प्रेक्षकांना कथावस्तू कथन करतो. त्यानंतर लास्य व तांडव प्रकारांचे योग्य असे नृत्य होते. यात ‘भंगी परेंग’ नावाटे लास्य नृत्य आहे. त्याच्या अभावाने रासलीला अपूर्ण समजली जाते. जवळजवळ सात तास हा रासरंग चालत असतो.
राजस्थानमधील रासलीला
[संपादन]राजस्थानमध्ये वल्लभाचार्यांनी (पंधराव्या शतकाच्या उत्तरार्ध−सोळाव्या शतकाच्या पूर्वार्ध) कृष्णाच्या लीलाक्षेत्रामध्ये गीततत्त्व आणण्याचे प्रयत्नल केले. पूर्व राजस्थान, भरतपूर येथेही रासलीलेचा प्रचार दिसून येतो. माखन−चोरी, क्रीडा-कौतुक, यशोदा-विलाप तसेच हास्याचे अभिनयसुद्धा रासलीलेत केले जातात. त्याचप्रमाणे रासलीलेत ब्रजलीला, चंद्रावली, माखन-लीला, पनघट-लीला इ. उपाख्याने केली जात परंतु जयपूरातील फुलोर भागात रासलीला काहीशी विकृत बनल्याचे दिसून येते. रासलीलेमध्ये काही मर्यादा व बंधने आहेत. कृष्णाचा मुकुट स्यामी, ब्राह्मण किंवा कुंभावतच धारण करू शकतात. गोपी मात्र अन्य जातीचेही बनू शकतात. बहुधा गोपींची कामे मुलगेच करतात.
गुजरातमधील रासनृत्य
[संपादन]गुजरातमध्ये सर्वत्र नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने रासनृत्य खेळण्याचा प्रघात आहे. हे प्रकार ‘रासगरबा’ (स्त्रियांचे), ‘रासगरबी’ (पुरूषांचे), ‘दांडियारास’ या नावांनी ओळखले जातात. मिश्ररास किंवा स्वस्तिकरास हे या भागात प्रचलित इतर रासप्रकार होत.गरबा टाळ्या वाजवीत व दांडियारास हे टिपऱ्या वाजवीत गोलाकार नाचून केले जातात. सोबतच्या गाण्यामधून कृष्णवर्णन असते.
वाद्ये
[संपादन]पूर्वी रासलीलेमध्ये झांज, करताल, ढोल, बीन, खंजरी इ. वाद्ये वापरली जात परंतु हल्ली रासलीलेमध्ये सर्वसाधारणपणे खोळ, मंजिरा, बासरी, सारंगी व मृदंग ही वाद्ये वापरतात.
पोशाख
[संपादन]गोपींचा पोशाख आकर्षण व चित्रोपम केलेला असतो. परकर-पोलका व ओढणी असा गोपींचा वेश असून तो बारीक कलाकुसरीने युक्त असतो. कृष्णाला केशरी रंगाचे धोतर व गळ्यात अनेक प्रकारचे हार व मणिमाला घातल्या जातात.
ज्या त्या प्रांतातील विशिष्ट बोलीभाषा, प्रचलित संगीत तसेच पोशाखातील वैशिष्ट्यांचा त्या त्या रासप्रकारावर प्रभाव पडलेला दिसतो.