Jump to content

नेणावली लेणी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नेणावली लेणी किंवा खडसांबळे लेणी ही महाराष्ट्रामधील रायगड जिल्ह्यातल्या सुधागड तालुक्यातील लेणी आहेत. हा इ.स.पू. पहिल्या शतकामध्ये कोरलेल्या ३७ बौद्ध लेण्यांचा हा समूह आहे. या लेणी नाडसूर लेणी (ठाणाळ लेण्यां)पासून दक्षिणेस ९ कि.मी. वर तर पालीपासून ३५ किमी अंतरावर आहेत.[]

लेण्यांची सविस्तर माहिती :-

ह्या लेण्यांचा दगड हा लाल रंगाच्या बुरुम असणारा दगड असून जास्त टिकावू नाही त्यामुळे या लेण्यांचे खूप नुकसान झालेले आहे.

या ठिकाणी जवळपास ३० ते ४८ लेणी समूह असल्याचे लेणी अभ्यासकांचे म्हणणे आहे काही जण २१च लेण्यांचा उल्लेख करतात कारण प्रत्यक्ष त्या लेण्या किती हे आता सांगणे कठीण झालेले आहे. कारण बरीच लेणी ही गाडली गेली आहेत. डोंगराचा कडा कोसळल्याने बहुतांश लेणी नष्ट झालेली आहेत. लेण्यांचा दर्शनी भाग पूर्णपणे नष्ट झाल्यामुळे या लेण्यांवर शिलालेख असू शकतात हे नाकारता येत नाही. जवळपास सर्वच लेण्याचे प्रवेशद्वार नष्ट झाले आहे. लेण्यांच्या मुख्य चैत्यगृहाच्या बाजूला १७ भिक्खूंची निवासस्थाने आहेत. ती भग्न असली तरी त्यांचे पूर्वीचे सौंदर्य मात्र अप्रतिम होते. बऱ्याच लेण्यांच्या पुढील दर्शनी भाग नष्ट झालेला असून छताचा भाग तेवढाच राहिलेला आहे. या ठिकाणी डोंगरातून पाण्याचा प्रवाह स्तूपाच्या मागून काढून तो पाण्याच्या टाक्यात घेऊन जाणारे तंत्र, अश्या बऱ्याच गोष्टी सांगता येतील.

लेण्याच्या एका ठिकाणी अर्ध्या अवस्थेतल्या दोन स्तूपांचे अवशेष सापडतात. अर्हत भिक्खूंच्या अस्थी ठेवून त्यावर ते स्तूप कोरलेले असावेत असे दिसते. या ठिकाणी स्तूपांची रांगच असावी असे वाटते. कारण भाजे लेण्यांवरअश्याच पद्धतीचे स्तूपांची मांडणी आहे कदाचित या लेण्यांनंतरच भाजे लेण्यांची निर्मिती केली गेली असावी असे वाटते.

स्तूपांच्या बाजूलाच एक प्रशस्त विहार असून ते पूर्णपणे मातीखाली गाडले गेले आहे. एका बाजूने आतमध्ये जाण्यास रास्ता आहे पण तो धोकादायक आहे. समोरून बंदिस्त असल्याने व उंचीने कमी असल्याने त्यातून बाहेर निघणे त्रासदायक आहे.

लेणे क्रमांक १ हे अर्धवट लेणे वाटते, पण कदाचित ते अर्धवट नसावे कारण त्याचा वरचा भाग हा कोसळलेला असल्याने त्याचे अवशेष आजूबाजूलाच असणार. ज्या डोंगरात ते आहे त्या डोंगराचा वरचा कडा पूर्णपणे कोसळलेला आहे.

दोन नंबरच्या लेण्याची मागची भिंतच ओळखता येते; बाकी त्याची समोरील दीर्घिका वगैरे नष्ट झाली आहे.

तीन नंबर लेण्याच्या पुढे दीर्घिका असून जवळच एक प्रांगण व मागे एक शून्यागार आहे. दर्शनी भाग पूर्णपणे कोसळलेला आहे.

चार नंबरच्या लेण्यात भिंतीचे अवशेष छताला चिटकून असलेले दिसतात. शिवाय भिंती पूणर्पणे कोसळल्या असून समोरील दर्शनी भाग नष्ट झालेला आहे.

पाच नंबरचे लेणे चार नंबर सारखेच आहे. मात्र त्याच्या मागच्या भिंतीस लागून शयन ओटा आहे..

सहा नंबरच्या लेण्याचा फक्त खोलीच ओळखायला येते. या खोलीच्या मागच्या भिंतीमध्ये एक कोनाडा आहे.

सात नंबरच्या लेण्याचीही अशीच अवस्था आहे; मागची खोली ओळखता येते, बाकी सर्व भग्न अवस्थेत आहेत.

एकूण लेण्यांचे दर्शनी भाग नष्ट झाले असल्याने फक्त शिल्लक असलेला छताचे भाग त्या लेण्याची साक्ष देत आहेत.

लेणे क्रमांक आठ हे भव्य असून त्याचा विन्यास नमुनेदार आहे. प्रांगणातून तीन पायऱ्या चढून समोर असणाऱ्या दीर्घिकेत प्रवेश करता येतो. दीर्घिकेच्या बाजूला एक दालन आहे. दालनाच्या उजव्या बाजूस एक अंतर्दालन आहे व मध्यभागी एक खोली आहे. बाह्य दालनाच्या बाजूस असणाऱ्या भिंतीच्या बाजूला प्रशस्त असे शयन ओटे आहेत. अंतर्दालनाच्या समोर असणाऱ्या भिंतीवर चौरसाकार खिडकी असून, अंतर्दालनाच्या उजव्या बाजूस ओटा आहे. एकूणच या लेण्याची मांडणी पाहता हे लेणे अनेक खोल्यांची सदनिका असल्यासारखे वाटते. या लेण्यात एकूण पाच ओटे आहेत त्यामुळे इथे किमान पाच भिक्खूंची झोपण्यासाठीची व्यवस्था असावी.

नऊ नंबरच्या लेण्यात छत व मागच्या खोलीतले व मागच्या भिंतीच्या बाजूचे ओटे शिल्लक आहेत.

दहावे लेणे हे इथले प्रमुख लेणे आहे इथे प्रशस्त असे विहार पाहायला मिळते. त्याला सभागृह किंवा मोठे चैत्यगृह म्हणता येईल. महाराष्ट्रातील अतिविशाल चैत्यगृहांपैकी हे एक आहे. हे आयताकृती असे चैत्यगृह आहे. इथे महत्त्वाची गोष्ट म्हणजे या लेण्यांच्या स्तूपाच्या बाजूला एकूण सतरा खोल्या आहेत. एकूण स्तूप पाहता इतर लेण्यांप्रमाणे तो आपल्याला मध्यभागी दिसत नाही. तो एका कोपऱ्यात दिसतो यावरून एकूण असा अंदाज काढता येतो की स्तूपाची कल्पना नंतर आली असावी. शिवाय हा स्तूप इतर स्तूपांपेक्षा वेगळा वाटतो, कदाचित आद्य स्तूप असावा. ही लेणी इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकात कोरली गेल्यामुळे या लेण्यांची बांधणी सामान्य वाटते. सतरा भिक्खू निवास असून ते अर्हत भिक्खू किंवा ज्येष्ठ भिक्खू यांच्या ध्यानसाधनेसाठी कोरलेले असावेत. स्तूपावर लाकडी छत आणि लाकडाची हार्मिक असावी असे म्हणता येईल. एकूण या विहार लेण्याच्या मध्यभागी स्तूप असावा नंतर तो हटवला गेला असावा असे दिसते. कारण तिथे त्याचे अवशेष जाणवतात एकूणच खोल्यांचा समोर असणारा ओटा, त्यांनतर असणाऱ्या विहाराची जागा व त्यानंतर असणारे स्तूपाचा गर्भगृह पाहून येथे मन थक्क करणारी वास्तू स्थापत्य कला विकसित झालेली होती असे म्हणायला हरकत नाही. एकूणच दर्शनी भाग नष्ट झाल्याने इथे शिलालेख असावा .असे म्हणता येऊ शकते कारण एवढा मोठा लेण्यांचा समूह आणि शिलालेख नाही असे म्हणता येत नाही. छोट्या छोट्या लेण्यांवर शिलालेख पाहायला मिळतात मग एवढ्या मोठा लेणी समूह असून तिथे शिलालेख नसेल असे म्हणता येणार नाही,. कारण सर्वच लेण्यांचे दर्शनी भाग नष्ट झालेले आहेत, आणि शिलालेख बहुधा दर्शनी भागावरच कोरलेला असतो. खाली पडलेल्या दगडांच्या अवशेषात कदाचित तो सापडू शकतो, शक्यता नाकारता येत नाही.

दर्शनी भागात लाकडाचे काम असावे, कारण तश्या पद्धतीच्या खोबण्या आपणास पाहायला मिळतात. स्तूपाच्या पाठीमागून पाणी वाहून नेण्याची व व्यवस्था केलेली आहे. ते पाणी टाक्यात नेलेले असावे, पण पुढे असणारे पाण्याचे टाके नष्ट झालेले आहे, असे एकूणच मांडणी पाहता म्हणावे लागेल.

कझेन्स यांनी देखील या लेण्यांचा कालावधी हा इसवी सन पूर्वी दुसरे शतक सांगितला आहे. शिवाय एम एन देशपांडे यांनीही याला दुजोरा दिला आहे. नाडसूर इथे सापडलेल्या आहुत नाण्यांवरून त्यांनी देखील या मताला दुजोरा मिळतो.

प्रमुख लेणे अतिशय देखणे आहे सध्या त्याची भग्न अवस्था देखील मनाला आनंद देऊन जाते. त्याच्या बाजूलाच ११ ते २१ पर्यंतची लेणी आहेत तीहीहि भग्न अवस्थेत आहेत. बाजूला कडा कोसळल्यामुळे अतोनात नुकसान झालेले आहे. या येण्यांतली अतिशय प्रशस्त अशी विहारे भग्न झाली असून कड्याच्या दगडाखाली व पावसाच्या पाण्यासोबत आलेल्या मातीने भरली आहेत.

कड्याच्या पलीकडेही अनेक लेण्यांचा समूह आहे. आधीचा समूह व हा एकच आहे परंतु कडा तुटल्यामुळे त्यांचे विभाजन झाले आहे. तिकडेही विहारसंघ तसेच शून्यगृहे आहेत. ही ऐसपैस जागा असणारी कातळात कोरलेली लेणी आहेत. तिकडे जाणे थोडेसे धोक्याचे आहे, कारण डोंगराचा कडा कोसळल्यामुळे तिकडे जाणे अवघड आहे. पण एवढेहीहि कठीण नाही की तिकडे जाताच येत नाही. या ठिकाणी एकूण ४२ ओटे आहेत. ते भिक्खूंच्या झोपण्यासाठी कोरलेले आहेत. या ठिकाणी जवळपास ५० भिक्खूंच्या झोपण्याची व्यवस्था केलेली असावी. शिवाय इथे ५० पेक्षा जास्त भिक्खूंच्या निवासाची व्यवस्थाही केलेली असावी.

त्याच्या पुढे असणारी लेणी ही सध्या जवळपास नष्ट होण्याच्या मार्गावर असून शिवाय मातीने भरलेली आहेत. डोंगराचे कड्याचा दगड हा समोर पडल्याने दर्शनी भागाचे अतोनात नुकसान झालेले आहे. शिवाय आतमधली लेणीदेखील कोसळलेली आहेत. लाल रंगाचा बुरुम दगड असला तरी भव्यदिव्य अशी ही लेणी आहेत.

या लेण्यांविषयी जास्त माहिती सापडत नाही. कारण लेण्यांवर लिहिणाऱ्या बर्जेस वैगरे अभ्यासकांना याची माहिती मिळालेली नाही. बर्जेस यांनी महाराष्ट्रातील १२०० लेण्यांचा अभ्यास करून आपला रिपोर्ट बनवले असून महाराष्ट्रातील उर्वरित लेणीही अभ्यासात आलेली नाहीत त्यापैकी ही खडसांबळे बौद्ध लेणी आहेत.

लेणींविषयक माहिती घेण्यासाठी प्रत्यक्ष गेल्यावरच लेण्यांचा अभ्यास करता येऊ शकतो. कारण त्याचे बांधकाम त्याची बांधकाम शैली शिवाय तिथे असणारे स्तूपांची रचना पाहता अश्या पद्धतीचे स्तूप आपल्याला इतर ठिकाणी पाहायला मिळत नाही. बाकीचे स्तूप हे शिल्पकलेने समृद्ध असे आहेत त्यामुळे त्या लेण्यांचे एक वेगळे वैशिष्ट्य आहे असे म्हणायला हरकत नाही .

खडसांबळे लेणी ही नेणवली गावात असल्याने त्यांना नेणवली लेणी म्हणले गेले पाहिजे परंतु ब्रिटिश अभ्यासकांना ते खडसांबळे गावातून आल्यामुळे त्यांनी त्याला ते नाव दिले असावे असा अंदाज वर्तवणे चुकीचे ठरणार नाही.

या लेण्यांचे वैशिष्ट्य असे की याच्या एका बाजूला ठाणाळे म्हणजे नाडसूरची लेणी आहेत, दुसऱ्या बाजूला गोमाशी लेणी आहेत दोन्हीही बौद्ध लेणी आहेत. गोमाशी लेण्यात भूमी स्पर्श मुद्रेत असणारी बुद्धाची मूर्ती असून, हे एक छोटेसेच लेणे आहे.

एकूणच महाराष्ट्राचा हा ऐतिहासिक वारसा जतन न करता आल्यास ही नेणावली लेणी नजीकच्या काळात नष्ट होणार आहेत.

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ Ahir, D. C. (2003). Buddhist sites and shrines in India : history, art, and architecture (1. ed.). Delhi: Sri Satguru Publ. p. 200. ISBN 8170307740.