नागपूर मेट्रो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
नागपूर मेट्रो
स्थान नागपूर, महाराष्ट्र, भारत
वाहतूक प्रकार जलद परिवहन
मार्ग
मार्ग लांबी ३८.२१ (प्रस्तावित)) कि.मी.
एकुण स्थानके ३६ (मार्ग१-१७,मार्ग२-१९)
दैनंदिन प्रवासी संख्या ३,६३,०००
सेवा आरंभ सन २०१९ मध्ये अपेक्षित
वेबसाईट अधिकृत संकेतस्थळ

नागपूर मेट्रो ही नागपूर शहरात उभारण्यात येत असणारी मेट्रो प्रणाली आहे.हा प्रकल्प अद्याप प्रस्तावित आहे. यास महाराष्ट्र शासनाची विधीवत् मंजूरी नुकतीच २९ जानेवारी २०१४ला देण्यात आलेली आहे.[ चित्र हवे ][१][२]


मुंबई मेट्रो नंतर महाराष्ट्रात नागपूर मेट्रो उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पाची सुरुवात अद्याप झालेली नाही.भारताच्या केंद्रिय मंत्रीमंडळाची मंजूरी मिळाल्यावर व 'मेट्रो रेल्वे अधिनियम १९७८' लागू झाल्यावर[३] हा प्रकल्प सुरू होईल.[१][२] २० ऑगस्ट २०१४ रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने यास मंजुरी दिली व २१ आॉगस्ट २०१४ रोजी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपुजन करण्यात आले.

प्रकल्पाची कारणमिमांसा[संपादन]

नागपूर शहराची लोकसंख्या अंदाजे २४ लाख असून या महानगराच्या सभोवताली असलेल्या ९ तालुक्यांची संख्या ३२.७२ लाख आहे.या शहरात बहुसंख्य इंधनचलित छोटी वाहने आहेत.दुचाकी १०.३३ लाख,तीन चाकी ०.१७ लाख,चारचाकी १.८७ लाख.एकूण वाहने:१२.३७ लाख. या सर्वांमुळे,वाहतुकीवर पडणारा ताण,छोट्या रस्त्यांमुळे होणारे अपघात,प्रदूषण,पार्किंग प्रश्न इत्यादींवर उपाय म्हणून हा प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला.[२]

प्रकल्प अहवाल[संपादन]

या प्रकल्पाचा अहवाल दिल्ली मेट्रो रेल्वे कार्पोरेशन तयार करीत आहे.[४]तो नुकताच राज्य शासनास सादर करण्यात आला आहे.[५]

प्रकल्पाचे फायदे[संपादन]

कायमस्वरुपी वेगवान व विनाअडथळा मोठ्या स्वरुपाची वाहतूक, वायू व ध्वनी प्रदुषणात घट,इंधन बचत,परकीय चलनात बचत,सध्या असलेल्या सार्वजनिक बस वाहतुकीस उत्तम पर्याय.[२]

वित्तपुरवठा[संपादन]

या प्रकल्पासाठी ६६६८ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे(सुधारित:८६८० कोटी रुपये)[१].या प्रकल्पासाठी जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजंसी ही जपानमधील वित्तीय संस्था १.४ टक्के दराने वित्तपुरवठा करणार आहे.एकुण खर्चापैकी ५० % एवढी रक्कम कर्जस्वरुपात उभारण्यात येणार आहे.यात उरलेल्या ५० टक्क्याचे भारवहन खालील प्रमाणे राहील:भारत सरकार:२० %,महाराष्ट्र राज्य शासन: २० % ,नागपूर महानगरपालिकानागपूर सुधार प्रन्यास प्रत्येकी ५ % रक्कम.[१]

वित्तीय परतावा[संपादन]

मेट्रो तिकिटापासून होणारे उत्पन,जाहिरातीद्वारे होणारे उत्पन,स्थानके व डेपो क्षेत्रात वाणिज्यिक विकसनाद्वारे निधी उभारणी,महानगरपालिका विकसन शुल्क, आदींद्वारे मिळणारा वित्तीय परतावा १०.३५ टक्के राहील.[२]

प्रस्तावित खर्च[संपादन]

अनुमानित वर्षनिहाय खर्च असा आहे[६]:

वित्तीय वर्ष प्रस्तावित खर्च(कोटी रुपये)
२०१३-१४ ४५२
२०१४-१५ १०२१
२०१५-१६ १८७४
२०१६-१७ २४१२
२०१७-१८ १९८३
२०१८-१९ ७४०
२०१९-२०२० १९८
- -

भूसंपादन[संपादन]

या प्रकल्पासाठी, मिहान प्रकल्पाजवळ ३३.९० हेक्टर जागेचे (मार्ग क्र.१) तर नीलडोह येथे १५.२४हेक्टर जागेचे (मार्ग क्र.२) जमिन अधिग्रहण करण्यात येणार आहे.एकूण ७७.६८ हेक्टर(७७६८१९.३० चौ मी) जमिन या प्रकल्पासाठी लागणार आहे.[६]

इतिहास व पूर्वीचा प्रस्ताव[संपादन]

मुख्य लेख: नागपूर#मेट्रो

नागपूर मेट्रो रेल्वेच्या प्रकल्पाला महाराष्ट्र शासनाने मंजुरी प्रदान केली आहे. हा प्रकल्प सुमारे २५ किलोमीटर लांबीचा राहणार असून, याचे कार्य जानेवारी २०१३ पासून सुरू होणार आहे. नागपूर हे महाराष्ट्रातील दुसरे मोठे शहर मेट्रो रेल्वेसाठी तयार झाले असून, या कार्यावर १२५० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. जानेवारी २०१३ पासून कार्याला प्रारंभ होईल आणि डिसेंबर २०१६ मध्ये ते पूर्णत्वास जाईल. नागपूरची लोकसंख्या वर्तमानात २५ लाख असून, २०३० पर्यंत ही आकडेवारी ५० लाखांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागपूर शहर मेट्रो रेल्वे सेवेसाठी पात्र ठरणार आहे. मिहान प्रकल्पाच्या प्रारंभी प्रकल्प सल्लागार एल ऍण्ड टी रॅम्बोल यांनी २००१ मध्ये आपल्या सक्षमता अहवालात मेट्रो रेल्वेची प्रस्तावना केलेली आहे. त्यांनी तर १०० किलोमीटरपर्यंत मेट्रो रेल्वे प्रस्तावित केली होती. मात्र शासनाने २५ किलोमीटर पर्यंत तिचा मार्ग राहील असे म्हटले आहे. दरम्यान यातील दुसऱ्या टप्प्यात पारडी नाका ते वाडी नाका, कस्तुरचंद पार्कचा एक विभाग जोडण्यात येईल. तर तिसऱ्या टप्प्यात फुटाळा तलाव ते धंतोली असा मार्ग प्रस्तावित केला होता.

सध्याचा प्रस्ताव[संपादन]

खालील प्रस्तावास मंजूरी देण्यात आलेली आहे.येथिल कामठी मार्गावरील ऑटोमोटिव्ह चौक ते मिहान असा १९.६५ किमी चा एक मार्ग तर दुसरा मार्ग प्रजापतीनगर ते लोकमान्यनगर असा १८.५५ किमी चा मार्ग असेल.यातील एकुण लांबीपैकी ३३.६१ किमी हा उन्नत(एलिव्हेटेड) स्वरुपात तर ४.६० किमी मार्ग हा भूपृष्ठावरुन असेल.या एकुण मार्गाचे लांबी सुमारे ३८.२१ किमी राहील.[१]

कार्यान्वयन संस्था व इतर संस्था[संपादन]

या कामासाठी नागपूर सुधार प्रन्यास या नागपूरच्या विकासासाठी असलेल्या संस्थेची 'कार्यान्वयन संस्था' म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे.'मेट्रो रेल्वे अधिनियम १९७८' हा केंद्रिय मंत्रीमंडळाकडून लागू करवुन घेणे इत्यादी कामे ही संस्था करणार आहे.[३]

पुढे, या प्रकल्पाचे संचलन व अंमलबजावणी करण्याचे दृष्टीने,नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड ही एक 'स्पेशल पर्पज व्हेहीकल कंपनी' (विशिष्ट प्रयोजन वाहन कंपनी) स्थापण्यात येणार आहे.ही कंपनी स्थापन होईपर्यंत व त्या कंपनीला हे काम सोपवेपर्यंत, नासुप्र याचे काम करीत राहील. [३]यात राज्य शासन,महानगरपालिका व नासुप्रचे सहा संचालक राहतील.या सर्वांवर एक उच्चाधिकार समिती राहील.[६]

कार्यारंभ व समाप्ति[संपादन]

सन २०१३-२०१४ या आर्थिक वर्षात याचा आरंभ होणार असे प्रस्तावित आहे. हे काम २०२० पर्यंत पूर्ण करण्याचे प्रस्तावित आहे.[१][६]

मार्ग १ : (केशरी मार्गिका)[संपादन]

वर्धा मार्गावरील मेट्रो रेल्वेचे व्हायडक्ट

उत्तर - दक्षिण:ऑटोमोटिव्ह चौक ते मिहान,विमानतळ मार्गे (केशरी मार्गिका): एकुण स्थानके १७,

प्रस्तावित स्थानकांची नावे:ऑटोमोटिव्ह,नारी रोड,इंदोरा,कडबी चौक,गड्डीगोदाम चौक,कस्तुरचंद पार्क,शून्य मैल, सिताबर्डी, काँग्रेस नगर,रहाटे कॉलनी,अजनी चौक,छत्रपती चौक,जयप्रकाश नगर,उज्जवलनगर,जूने विमानतळ,नवे विमानतळ,खापरी मेट्रो डेपो.[२]

यात पूर्वी असलेला,मार्ग क्र. १ मधील 'भूयारी मार्ग' वगळण्यात आलेला आहे.[२]

मार्ग २ : (निळी मार्गिका)[संपादन]

नागपूर मेट्रो चा पुल

पूर्व-पश्चिम:प्रजापत्तीनगर ते लोकमान्य नगर (निळी मार्गिका): एकुण स्थानके १९

प्रस्तावित स्थानकांची नावे:प्रजापत्तीनगर,वैष्णोदेवी चौक,आंबेडकर चौक,टेलिफोन एक्स्चेंज चौक,चितार ओळी चौक,दोसर वैश्य चौक,रेल्वे स्थानक,सिताबर्डी(इंटरचेंज),झांसी राणी चौक,इंस्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स,शंकर नगर(बँक ऑफ इंडिया),एल ए डी चौक,धरमपेठ विज्ञान महाविद्यालय सुभाष नगर,रचना रिंगरोड जंक्शन,वासुदेवनगर,बन्सीनगर,लोकमान्य नगर मेट्रो डेपो.(संपूर्ण उन्नत मार्ग)

तांत्रिक माहिती[संपादन]

या प्रकल्पाची तांत्रिक माहिती खालीलप्रमाणे आहे:

बाब वर्णन शेरा
गेज १४३५ मी मी -
गती ९५ किमी प्रति तास महत्तम
विद्युत पुरवठा २५ के.व्ही. ओव्हरहेड
बोगी -
एका मेट्रोची प्रवासी संख्या ७६४ -
एकूण दररोज प्रवासी हाताळणी ३ लाख (अपेक्षित)
तिकिट स्वयंचलित व स्मार्टकार्ड -
डब्यांचा प्रकार स्टेनलेस स्टील वातानूकुलित
सिग्नल पद्धती एटीपी व एटीओ -
स्थानक सुविधा उद्वहन,एस्कलेटर्स,जिने -
दोन्ही मार्ग जंक्शन मुंजे चौक एका मार्गावरुन दुसऱ्यात जाण्याची सोय[३]
वारंवारिता दर सहा मिनीटे -[३]

प्रस्तावित भाडे[संपादन]

हे सन २०१९ मधील प्रस्तावित भाडे आहे.यात सुधारणा करण्याचे अधिकार भाडे निश्चिती समितीकडे आहेत.[६]

प्रवास अंतर(किमी) भाडे (रु.)
० ते २ १५
२ ते ४ १९
४ ते ६ २३
६ ते ९ २८
९ ते १२ ३०
१२ ते १५ ३४
१५ ते १८ ३६
१८ ते २१ ३९
२१ पेक्षा जास्त ४१

नाव[संपादन]

या प्रकल्पाचे नाव माझी मेट्रो राहणार आहे.[७]

संदर्भ[संपादन]

  1. a b c d e f यदु जोशी,प्रतिनिधी,मुंबई. लोकमत नागपूर, ई-पेपर,दि.०८/०१/२०१४,पान क्र.१ , "लेखमथळा:नागपुरात मेट्रो धावणार" (मराठी मजकूर). लोकमत प्रकाशन,. २३ जानेवारी २०१४ रोजी पाहिले. "वित्त,नियोजन विभागाची हिरवी झेंडी" 
  2. a b c d e f g लोकमत नागपूर,हॅलो नागपूर पुरवणी, ई-पेपर,दि.३०/०१/२०१४,पान क्र.१ व २, "लेखमथळा:मेट्रोनगरी" (मराठी मजकूर). लोकमत प्रकाशन,. ३० जानेवारी २०१४ रोजी पाहिले. "नागपूरकरांसाठी 'ड्रीम प्रोजेक्ट':प्रवास होणार सुखकर" 
  3. a b c d e तरुण भारत,नागपूर,आपलं नागपूर पुरवणी, ई-पेपर,दि.३०/०१/२०१४, "नागपूर मेट्रो रेल्वेला शासनाची मंजुरी" (मराठी मजकूर). ३० जानेवारी २०१४ रोजी पाहिले. 
  4. ^ ई-सकाळ.कॉम, दि.११ जानेवारी २०१३ "'मेट्रो'च्या अहवालाची प्रतीक्षा कायम" (मराठी मजकूर). ३० जानेवारी २०१४ रोजी पाहिले. 
  5. ^ ई-सकाळ.कॉम, दि.३० जानेवारी २०१४ "नागपुरातील मेट्रो रेल्वेला राज्य मंत्रिमंडळाची हिरवी झेंडी" (मराठी मजकूर). ३० जानेवारी २०१४ रोजी पाहिले. 
  6. a b c d e लोकमत नागपूर, ई-पेपर,दि.३०/०१/२०१४,पान क्र.१ व ७ , "लेखमथळा:नागपूर मेट्रो रेल्वेला मान्यता" (मराठी मजकूर). लोकमत प्रकाशन,. ३० जानेवारी २०१४ रोजी पाहिले. "'३८.२१५ किमीचा उन्नत मेट्रो मार्ग'" 
  7. ^ "चीनसोबत करार विकासाचा नवा अध्याय:मुख्यमंत्री". तरुण भारत नागपूर या दैनिकाच्या ई-पेपरचे संकेतस्थळ. तरुण भारत प्रकाशन नागपूर. १६/१०/२०१६. १६/१०/२०१६ रोजी पाहिले. "नागपूरात माझी मेट्रो तर पुण्यात महा मेट्रो" 


बाह्य दुवे[संपादन]

  • अधिकृत संकेतस्थळ