घारापुरीची लेणी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
घारापुरीच्या लेण्यांमधील त्रिमूर्तीचे शिल्प

घारापुरीची लेणी ऊर्फ एलिफंटा केव्ह्‌ज ही महाराष्ट्रामधील मुंबईनजीकच्या घारापुरी बेटांवरील लेणी आहेत. पाषाणात खोदलेली ही लेणी इ.स.चे ९ वे शतक ते १३ वे शतक या कालखंडात निर्मिण्यात आली. १९८७साली या लेण्यांना युनेस्को जागतिक वारसा स्थानाचा दर्जा देण्यात आला.


Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. कृपया लेख तपासून पुनर्लेखन करावे.हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.


घारापुरी बेटांवर पोहोचण्यासाठी मुंबई शहरातील गेट वे ऑफ इंडियापासून अरबी समुद्रात लाँचने जावे लागते. लाँचचा हा प्रवास साधारण तासाभराचा आहे. या एका तासाच्या सागरी प्रवासात समुद्रावर विहार करणाऱ्या नानाविध पक्षी-बगळ्यांबरोबरच मुंबईचे दुरुन दिसणारे विहंगम रूपही न्याहाळता येतं. शिवाय बॉम्बे हाय नावाचे समुद्रातून उत्खनन करून पेट्रोलियम मिळवणारे क्षेत्र, न्हावा शेवा बंदर, देशविदेशांतील मोठमोठ्या व्यापारी नौका यांचेही दर्शन होते.

समुद्रात थोडेसे आत गेल्यानंतर सीगल पक्ष्यांचे अनेक थवे लाँचवर घिरट्या घालायला लागतात. या पक्षांचे वैशिष्ट्य म्हणजे अन्नपदार्थ हवेतच झेलण्याची त्यांची क्षमता होय! लाँचेतील अनेक प्रवासी समुद्रात सीगल पक्ष्यांबरोबर हा खेळ खेळायला सुरुवात करतात. हवेत भिरकावलेल्या शेंगा, बिस्किटे हे सीगल पक्षी हवेतच आपल्या चोचीत लीलया झेलतात.आणि फस्त करतात. लाँचेतील लहान मुलांना हा खेळ भरपूर आनंद देऊन जातो.

हरखून गेलेल्या अशा वातावरणातच तासाभराचा हा सागरी प्रवास नकळत संपतो आणि आपण घारापुरी बेटाच्या काठाला लागतो. आपलं स्वागत करण्यासाठी आणि अर्थातच एलिफंटा लेण्यांच्या पायथ्याशी नेण्यासाठी तिथे एक मिनी ट्रेन सज्ज असते. सागराच्या लाटा झेलत-झेलत मिनी ट्रेन पुढे सरकू लागते आणि आपल्या देशाचा वैभवशाली भूतकाळ आपल्यासमोर उलगडू लागतो.

एलिफंटा लेण्यांच्या निर्मितीचा काळ हा साधारण इसवी सन ९०० ते १३००च्या दरम्यान असावा असा अंदाज आहे. एका अखंड पाषाणात ही लेणी कोरण्यात आली आहेत. ज्या काळी पाश्चात्य देशांमध्ये मानवी वसाहतीचा मागमूससुद्धा नव्हता त्याकाळी आपल्या भारतीय पूर्वजांनी इतक्या दुर्गम भागात इतकी अफाट कलाकृती कशी निर्मिली असेल, यावरच आपले मन चिंतन करू लागते. लेणी पाहून मन जितकं भरून येते तितकेच ते अभिमानाने पुलकितही होतं. ही लेणी म्हणजे मूर्तिकलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे.

मुख्य लेण्याच्या आत प्रवेश करताच समोर वीस फूट उंचीचे त्रिमूर्तीचे शिल्प दिसते. त्या मूर्तीच्या चेहऱ्यावरील शांत भाव पाहून आपले मनही तशाच शांतीचा अनुभव घेऊ लागते. याशिवाय लेण्यांमधील नटराज, योगेश्वर आदी विविध शिल्पांना 'युनिक' म्हणता येईल इतपत वेगळेपण देण्यात आले आहे. त्यावरील भावही 'एकमेवाद्वितीय' असेच आहेत.

लेण्यांच्या प्रवेशद्वाराजवळ हत्तीचे प्रचंड आकाराचे एक शिल्प होते. त्यावरून या लेण्यांना एलिफंटा लेणी असे नाव पडले. हे शिल्प सध्या मुंबईच्या राणीच्या बागेत आहे.