सिंधी भाषा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सिंधी
سنڌي / सिन्धी
स्थानिक वापर भारत, पाकिस्तान
प्रदेश सिंध, कच्छ
लोकसंख्या २.५ कोटी
भाषाकुळ
लिपी अरबी, देवनागरी, खुदाबादी
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर पाकिस्तान ध्वज पाकिस्तान
भारत ध्वज भारत
भाषा संकेत
ISO ६३९-१ sd
ISO ६३९-२ snd

हिंदुस्थान देशाची फाळणी होण्यापूर्वी देशाच्या वायव्येला सिंध नावाचा प्रदेश होता. तो मुंबई इलाख्याचा भाग होता. साहजिकच सिंधमध्ये आणि विशेषतः त्यातल्या कराची शहरात अनेक मराठीभाषक होते. त्यावेळी अनेक सरकारी नोकरांच्या बदल्या सिंधमध्ये होत असत. फाळणीआधी कराचीत २५ हजार मराठी लोक रहात होते. बांधकाम, शिक्षण, वैद्यकीय अशा क्षेत्रांत ते होते. कराचीत मराठी चित्रपट झळकत होते. सिंधी, पंजाबी, गुजराथी, मराठी लोकसंस्कृतीचा प्रभाव कराचीवर होता. फाळणीआघी कराची मुंबई प्रांतातच प्रशासकीयदृष्ट्या जोडलेले होते. कोकण आणि पुण्यातून अनेक कुटुंबे कराचीत स्थलांतरित झाली होती. लक्ष्मीबाई टिळकांच्या ‘स्मृतिचित्रे’मध्येही कराचीतील वास्तव्याचे खुमासदार वर्णन आहे.

कराची ही सिंध प्रांताची राजधानी होती आणि सिंधच्या शैक्षणिक विकासासाठी मुंबईच्या नारायण जगन्नाथ या शिक्षकाला तिथे खास बोलावण्यात आले होते. त्यांच्याच नावे सिंधमधील पहिली मराठी शाळाही सुरू झाली. इ.स. २०१३ सालीही कराचीत ‘नारायण जगन्नाथ हायस्कूल’ सुरू आहे. उन्हाळ्याच्या सुटीत कराचीच्या बंदरावरून बोट पकडून मुंबईचे बंदर गाठायचे आणि मग कोकणात आपल्या गावी जायचे, हा अनेक मराठी कुटुंबांचा तेव्हाचा रिवाजच होता. कराचीचे विद्यार्थीही मुंबईच्या विल्सन कॉलेजात बोटीने येत असत. इ.स. १९६१ सालापर्यंत गोव्याहून सुटलेली बॉम्बे स्टीम नेव्हिगेशन कंपनीची आगबोट कोंकणातली व सौराष्ट्र-कच्छमधील बंदरे घेत कराचीला जात असे. फाळणीनंतर फार तुरळक मराठी लोक कराचीतच राहिले. कराचीच्या लोकसंख्येत १२.८१ टक्के ‘अन्यभाषिक’ म्हणून समजलेल्या गटात मराठी लोकही आहेत. तेथील महादेव मंदिरात दरवर्षी दीड दिवसाचा गणेशोत्सव मराठी पद्धतीने साजरा होतो. कराचीतल्या विविध देवळांत पुजारी म्हणून धार्मिक विधी करणारे, भाद्रपद चतुर्थीला गणपतीची पूजा करतात. ‘द डेली टाइम्स’ या पाकिस्तानी वृत्तपत्रात आलेल्या बातमीनुसार, कराचीतल्या या उत्सवासाठी पाकिस्तानातल्या अन्य भागांतील मराठी लोकही आवर्जून येतात. मंडप उभारला जातो, मोदक केले जातात, लोक गाणी गातात, आरत्या म्हणतात, नाचतात. दीड दिवसाच्या गणपतीचे मग अरबी समुद्रात यथाविधी विसर्जन केले जाते. आज २०१३ साली, कराचीतील मराठी लोकांनी अतिशय प्रतिकूल सांस्कृतिक परिस्थितीतही आपली मराठी भाषा वा संस्कृती टिकविण्याची धडपड सुरू ठेवली आहे.

कराचीतील मराठीभाषकांत आणखी एक वर्ग आहे तो बेनेइस्रायलींचा. कराचीतील ६३० बेनेइस्रायली कुटुंबे अन्य भागांत विखुरली. झियांच्या कारकिर्दीतील हिंसक विरोधानंतर त्यातील कित्येकांनी आपली धार्मिक ओळख लपविली आहे. कित्येक पार्शी असल्याचेही भासवत आहेत. मात्र घरात ते उर्दू व मराठीत बोलतात.

फाळणीनंतर सिंध हा प्रदेश पाकिस्तानात गेला. तेव्हा मराठीजन आपली घरे मागे टाकून भारतात आले. त्यातील कित्येकांनी दिल्लीतही आसरा घेतला. सिंधमधील सिंधी भाषा बोलणारे लोक मात्र महाराष्ट्रातील पुण्याजवळच्या पिंपरी आणि कल्याणजवळच्या अंबरनाथ या गांवी आले. पिंपरीजवळ सिंधी कॉलनी उभी राहिली आणि अंबरनाथजवळ उल्हासनगर.

सिंधी भाषा[संपादन]

सिंधी ही आधुनिक आर्यभाषांपैकी एक भाषा आहे. तिचा उगम संस्कृत भाषेपासून झाला आहे. ती मुळात देवनागरी लिपीत लिहिली जात असे. इ.स. १८५३मध्ये ईस्ट इंडिया कंपनीने सिंधी लिपी निश्चित करण्यासाठी एक समिती गठित केली. त्या समितीने काही अरबी आणि काही फारसी वर्ण एकत्र करून तिसरीच एक लिपी तयार केली. तीच सध्याची अरबी-सिंधी लिपी होय. या लिपीत ५२ वर्ण आहेत. आधुनिक सिंधी वाङ्‌मय प्रामुख्याने याच लिपीत लिहिले गेले आहे. या लिपीबरोबर आज सिंधीचे देवनागरी रूपही प्रचलित आहे.

सिंधी लिपीत ५२ वर्ण आहेत. ते असे
  • तीन अ. बाकीचे स्वर नाहीत. पण उच्चार आहेत.
  • दोन क, दोन ख, तीन ग, सहा ज, तीन ड, दोन त, दोन फ, दोन ब, तीन स, दोन ह, असे २७ वर्ण.
  • प्रत्येकी एक घ, ङ, असे दोन वर्ण.
  • प्रत्येकी एक च, छ, झ, ञ, असे चार वर्ण.
  • प्रत्येकी एक ट, ठ, ढ, ण, असे चार वर्ण.
  • प्रत्येकी एक थ, द, ध, न, असे चार वर्ण.
  • प्रत्येकी एक प, भ, म, असे तीन वर्ण.
  • प्रत्येकी एक य. र, ल, व, श, असे पाच वर्ण.
  • एकूण ३+२७+२+४+४+४+३+५=५२ वर्ण.

सिंधी भाषेची वैशिष्ट्ये[संपादन]

  • सर्व शब्द स्वरान्त असतात.
  • शेवटच्या अकारान्त, इकारान्त किंवा उकारान्त अक्षरातील स्वराचा पूर्ण उच्चार होतो. उदा० खट या शब्दाचा उच्चार खटऽ असा.
  • अकारान्त नामे स्त्रीलिंगी असतात. उदा० खट (खाट)
  • ओकारान्त नामे पुल्लिंगी असतात. उदा० घोडो (घोडा)
  • आकारान्त आणि इ-ईकारान्त नामे स्त्रीलिंगी असतात.
  • ऱ्हस्व उकारान्त नामे पुल्लिंगी असतात. उदा० ग्रंथु (ग्रंथ)
  • हिंदीप्रमाणे पुल्लिंग आणि स्त्रीलिंग ही दोनच असतात. नपुंसकलिंग नाही. वचनेही दोनच, एकवचन आणि अनेकवचन.
  • सिंधी धातू णु्कारान्त असतात. उदा० पिअणु (पिणे), वगैरे.

भारतात सिंधी[संपादन]

भारतात आकाशवाणी आणि दूरदर्शनवर सिंधी कार्यक्रम होत असतात. जुनी सिंधी माणसे रोजच्या व्यवहारात सिंधी भाषेचा आवर्जून वापर करतात. आधुनिक तरुण-तरुणी यांना सिंधी समजते, पण अनेकांना ती बोलता आणि लिहिता येत नाही.

सिंधी माणसे मराठी माणसांत पूर्णपणे विरघळून गेली आहेत. त्या लोकांपैकी प्राध्यापक लछमन हर्दवाणी नावाच्या गृहस्थाने सिंधी लोकांना मराठी संस्कृती आणि मराठी माणसांना सिंधी संस्कृती समजावून सांगण्याचा वसा घेतला होता. हिंदीपेक्षा मराठीला सिंधी भाषा जवळची आहे असे त्यांचे मत आहे. हर्दवाणी वयाच्या सहाव्या वर्षी महाराष्ट्रात आले आणि अहमदनगरच्या महाविद्यालयातून हिंदीचे प्राध्यापक म्हणून निवृत्त झाले.

प्रा. लछमन हर्दवाणी यांनी लिहिलेली पुस्तके[संपादन]

  • चला सिंधी शिकू या (मराठी माणसांना सिंधी भाषा शिकण्यासाठीचे पुस्तक). या पुस्तकाचे प्रकाशन(इ.स.२०१३) हर्दवाणी यांनी स्वतःच केले आहे. या पुस्तकात सिंधी आणि मराठी भाषेतील साम्यस्थळे आणि दोन्ही भाषेतील समान अर्थाचे आणि समान उच्चाराचे किमान ५००० शब्द दिलेले आहेत.
  • जर्मन-मराठी-सिंधी शब्दकोश (सहलेखक - अविनाश बिनीवाले)
  • तुकारामाची अभंगगाथा (सिंधी भाषांतर)
  • दासबोध (सिंधी भाषांतर)
  • मनाचे श्लोक (सिंधी भाषांतर)
  • मराठी-सिंधी शब्दकोश (हा महाराष्ट्र सरकारच्या साहित्य आणि संस्कृती मंडळाने १९९२साली प्रकाशित केला आहे.)
  • सिंधी-मराठी शब्दकोश (१९९२)
  • सिंधी लघुकथा (मराठी भाषांतर)
  • ज्ञानेश्वरी (सिंधी भाषांतर)

सिंधी भाषेसंबंधी ब्रिटिश आमदानीत प्रसिद्ध झालेले ग्रंथ[संपादन]

  • A Dictionary : Sindhi & English - कॅप्टन स्टॅक (१८५५-मुंबई)
  • English & Sindhi Dictionary - एल.व्ही. परांजपे (१८६८-मुंबई)
  • Grammar of Sindhi Language - डॉ. अर्नेस्ट ट्रॅम्प (१८७२-लंडन)
  • सिंधी-इंग्लिश डिक्शनरी - जॉर्ज शर्ट व उधाराम थावरदास (१८७९-कराची)
  • An English-Sindhi Dictionary - परमानंद मेवाराम (१९१०)

भारताच्या फाळणीनंतर १९४७ ते १९९२ या काळात प्रकाशित झालेले सिंधी भाषेविषयीचे ग्रंथ (फक्त २)[संपादन]

  • हिंदी-इंग्लिश-सिंधी शब्दकोश
  • हिंदी-सिंधी शब्दकोश (केंद्रीय हिंदी निदेशालय, नवी दिल्ली).

१९९२मध्येआणि नंतर फक्त प्रा. लछमन हर्दवाणी यांचीच भाषाविषयक पुस्तके प्रकाशित झालेली दिसतात.

सिंधी वृत्तपत्रे[संपादन]

सिंधी भाषेत प्रसिद्ध होणारी भारतातील रोज़ानी (=दैनिक) वर्तमानपत्रे
  • रोज़ानी उल्हास विकास
  • रोज़ानी गंगा आश्रम
  • रोज़ानी नगर न्यूज़
  • रोज़ानी नगरवासी
  • रोज़ानी हिंदू

ही सर्व वर्तमानपत्रे महाराष्ट्रातील उल्हासनगर येथून प्रसिद्ध होतात.

सिंधी भाषेतील पाकिस्तानी दैनिक वृत्तपत्रे (सुमारे २४)
  • अवामी पाकिस्तान
  • उधर
  • कविश
  • कोशिश (सिंध-हैदराबाद येथून प्रसिद्ध होणारे दैनिक)
  • ख़दीम-ए-वतन
  • ख़बरों
  • गुलफ़ुल
  • तमीर-ए-सिंध
  • नई ज़िंदगी
  • निजात
  • पारिश
  • मेहरन ((सिंध-हैदराबाद येथून प्रसिद्ध होणारे दैनिक)
  • रोज़नामा इब्रत (सिंध-हैदराबाद येथून प्रसिद्ध होणारे दैनिक)
  • शाम ((सिंध-हैदराबाद येथून प्रसिद्ध होणारे दैनिक )
  • सक्कर
  • सिंध
  • सुजग
  • सोभ
  • हलचल
  • हलार
  • हिलाल-ए-पाकिस्तान, वगैरे वगैरे.

बाह्य दुवे[संपादन]

हेसुद्धा पहा[संपादन]