ज्ञानपीठ पुरस्कार
ज्ञानपीठ पुरस्कार हा भारतीय साहित्यजगतात नोबेल पुरस्काराइतकाच सर्वश्रेष्ठ पुरस्कार समजला जातो.
सुरुवात
[संपादन]हा पुरस्कार सुरू करण्यामागे रमा जैन यांची प्रेरणा होती. रमा जैन आणि त्यांचे पती साहू शांतिप्रसाद जैन यांनी भारतीय साहित्यिकांच्या गौरवार्थ हा उपक्रम करण्याचे ठरवले. २२ मे, इ.स. १९६१ या दिवशी साहू जैन यांच्या एक्कावन्नाव्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांनी स्वतःच्या कौटुंबिक ट्रस्टमधून ज्ञानपीठ पुरस्कार देण्याची घोषणा केली. त्यानुसार भारतीय ज्ञानपीठाच्या संस्थापक अध्यक्षा श्रीमती रमा जैन यांनी १६ सप्टेंबर, इ.स. १९६१ यादिवशी संस्थेच्या बैठकीत ज्ञानपीठ पुरस्काराबाबतचा ठराव मांडला. या पुरस्काराचे स्वरूप ठरविण्यासाठी २ एप्रिल, इ.स. १९६२ या दिवशी दिल्लीत देशभरातून ३०० विद्वानांना आमंत्रित करण्यात आले. या विद्वानांचे दोन सत्रांत संमेलन झाले. सत्रांचे अध्य्क्षपद डॉ. वी. राघवन आणि डॉ. भगवतीचरण वर्मा यांच्याकडे होते. सूत्रसंचालन डॉ. धर्मवीर भारती यांनी केले. या संमेलनाला काका कालेलकर, हरेकृष्ण मेहताब, निसीम इझिकेल, डॉ. सुनीति कुमार चॅटर्जी, डॉ. मुल्कराज आनंद, सुरेंद्र मोहंती, देवेश दास, सियारामशरण गुप्त, रामधारी सिंह दिनकर, उदयशंकर भट्ट, जगदीशचंद्र माथुर, डॉ. नगेन्द्र, डॉ. बी.आर. बेंद्रे, जैनेन्द्र कुमार, मन्मथनाथ गुप्त, लक्ष्मीचंद्र जैन यांसारखे विद्वान हजर होते. या संमेलनातून तयार झालेली पुरस्काराची संपूर्ण योजना डॉ. राजेंद्रप्रसाद यांना सादर करण्यात आली. त्यांनी ती मान्य केली व निवडसमितीचे प्रमुखपदही स्वीकारले पण इ.स. १९६३ मध्ये त्यांचे निधन झाले. त्यानंतर ही जबाबदारी काकासाहेब कालेलकर व डॉ. संपूर्णानंद यांच्याकडे आली. २९ डिसेंबर १९६५मध्ये पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मल्याळम कवी श्री. गोविंद शंकर कुरूप यांच्या ओडोक्वुघल (बासरी) या काव्यकृतीला मिळाला. मराठी भाषेतील पहिला ज्ञानपीठ पुरस्कार वि.स.खांडेकर यांना प्रदान करण्यात आला.
निवडीचे निकष व प्रक्रिया
[संपादन]भारताचा कोणताही नागरिक भारतीय संविधानाच्या आठव्या अनुसूचीत नमूद केलेल्या बावीस भाषांपैकी कोणत्याही भाषेत लेखन करणाऱ्या एका नागरिकाला दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येतो. प्रकाशित होऊन कमीतकमी पाच वर्षे झालेल्या पुस्तकांचाच पुरस्कारासाठी विचार होतो. ज्या भाषेसाठी हा पुरस्कार दिला गेला असेल, त्याच्या पुढील तीन वर्षे त्या भाषेचा पुरस्कारासाठी विचार केला जात नाही. सुरुवातीला एक लाख, नंतर दीड लाख, नंतर पाच लाख त्यानंतर आता सात लाख रुपये एवढी रक्कम पुरस्कार विजेत्याला दिली जाते. काहीवेळा एका ऐवजी दोन साहित्यिकांची पुरस्कारासाठी निवड होते त्यावेळी ही रक्कम विभागून दिली जाते. इ.स. १९६७ मध्ये गुजराती व कानडी, इ.स. १९७३ मध्ये उडिया व कानडी तसेच इ.स. २००६ मध्ये कोकणी आणि संस्कृत अशा दोन भाषांना हे पारितोषिक विभागून देण्यात आले होते.
भारतातील विद्यापीठे, त्यांचे भाषाप्रमुख, अन्य शिक्षणसंस्थांचे प्रमुख, विख्यात साहित्यिक, समीक्षक, भाषाशास्त्रज्ञ अशा सर्वांना आपापल्या मातृभाषेतील साहित्यकृतीची शिफारस करण्याची विनंती करण्यात येते. ज्ञानपीठ पुरस्काराच्या पहिल्या निवडसमितीवर सातपेक्षा कमी व अकरापेक्षा जास्त मान्यवर असू नयेत असे धोरण ठरविण्यात आलेले आहे. ज्ञानपीठ पुरस्कारासाठी नावाची छाननी करण्यासाठी प्रत्येक भाषेची तीन सदस्यांची एक समिती असते. तिला एल.ए.सी. म्हणजेच लोकल अॅडव्हायझरी कमिटी म्हणतात. ही समिती आपल्या भाषेतील एका समर्थ साहित्यिकाच्या नावाची एकमुखाने शिफारस ज्ञानपीठ व्यवस्थापनाला करते. नंतर मध्यवर्ती निवड समितीत एकाच साहित्यिकाच्या ग्रंथाची निवड केली जाते.
पुरस्काराचे स्वरूप
[संपादन]ज्ञानपीठ पुरस्कारात 'पुरस्कार-पत्र', 'वाग्देवीची प्रतिमा' आणि 'अकरा लाख रुपयांचा धनादेश' यांचा समावेश असतो. ज्ञानपीठ पुरस्कारात दिली जाणारी वाग्देवीची प्रतिमा ही माळवा प्रांतातील धार येथील सरस्वती मंदिरातील एका मूर्तीची प्रतिकृती आहे. या सरस्वती मंदिराची निर्मिती राजा भोज याने इ.स. १३०५ मध्ये केली होती. वाग्देवीची ही मूर्ती सध्या लंडन येथील ब्रिटिश संग्रहालयात आहे.
विजेते
[संपादन]भाषा | पुरस्कार प्राप्तकर्ते |
---|---|
आसामी | ३
|
इंग्रजी | १
|
उडिया | ४
|
उर्दु | ४
|
कन्नड | ८
|
काश्मिरी | १
|
कोकणी | २
|
गुजराती | ४
|
तमिळ | २
|
तेलुगू | ३
|
पंजाबी | २
|
बंगाली | ६
|
मराठी | ४
|
मल्याळम | ६
|
संस्कृत | १
|
हिंदी | १०
|
- टीप
• - १९८२ नंतर, लेखकाच्या कोणत्याही एक विशिष्ट कृतिस पुरस्कार प्रदान न करता त्यांच्या लेखनाच्या संपूर्ण संकलनाचा विचार केला जातो.
पुढील वाचन
[संपादन]- वाग्देवीचे वरदवंत - ज्ञानपीठ लेखक (लेखिका - मंगला गोखले)
बाह्य दुवे
[संपादन]संदर्भ
[संपादन]- ^ http://jnanpith.net/images/40thJnanpith_Declared.pdf Archived 2009-04-07 at the Wayback Machine. 40th Jnanpith Award to Eminent Kashmiri Poet Shri Rahman Rahi