भालचंद्र वनाजी नेमाडे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
भालचंद्र वनाजी नेमाडे
Bhalachandra Nemade.jpg
जन्म नाव भालचंद्र वनाजी नेमाडे
जन्म २७ मे १९३८
सांगवी ता.यावल जि.जळगाव, खानदेश, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
भाषा मराठी
साहित्य प्रकार कादंबरी,कविता,समीक्षा
प्रसिद्ध साहित्यकृती कोसला
वडील वनाजी
पुरस्कार साहित्य अकादमी पुरस्कार -१९९१
ज्ञानपीठ पुरस्कार-२०१५

भालचंद्र वनाजी नेमाडे (जन्म: २७ मे १९३८, सांगवी, खानदेश) हे परखड लेखन, कोणाचीही भीड न ठेवता टीका करणे, आपल्या साहित्याने जनमानस ढवळून काढणे आणि तितक्‍याच जोरकसपणे सार्वजनिक जीवनात स्पष्ट मते व्यक्त करून प्रसंगी वादाला तोंड फोडणारे प्रसिद्ध मराठी लेखक व टीकाकार आहेत.

शिक्षण[संपादन]

भालचंद्र नेमाडे हे खानदेशातून मॅट्रिक (१९५५), पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजातून बी.ए. (१९५९), डेक्कन कॉलेजातून भाषाशास्त्र या विषयात एम.ए.(१९६१) झाले. शिवाय त्यांनी इंग्रजी साहित्यात मुंबई विद्यापीठातून एम.ए. केले आहे. (१९६४) नेमाडे यांना जळगावच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडून डी.लिट. ही सन्माननीय पदवी मिळाली आहे.

व्यवसाय[संपादन]

इंग्रजीचे प्राध्यापक : अहमदनगर (१९६५), धुळे (१९६६), औरंगाबाद. (१९६७-७१), School of ऒriental and African studies, London (१९७१-?), आणि १९७४ पासून औरंगाबादच्या मराठवाडा विद्यापीठात व शेवटी ते मुंबई विद्यापीठात तुलनात्मक साहित्याच्या अभ्यासाठी स्थापन झालेल्या गुरुदेव टागोर अध्यासनावरून निवृत्त झाले. तसेच नेमाडे यांनी गोवा विद्यापीठातही इंग्रजी विषयाचे विभागप्रमुख म्हणून कार्यभार सांभाळला...

नेमाडे ’वाचा‘ या अनियतकालिकाचे संपादक होते.

कवितालेखन[संपादन]

भालचंद्र नेमाडे यांची ’कोसला’ ही पहिली कादंबरी प्रसिद्ध होण्यापूर्वीच त्यांच्या कविता ’छंद‘, ’रहस्यरंजन‘, ’प्रतिष्ठान‘, ’अथर्व‘ यामधून प्रसिद्ध झाल्या होत्या.

देखणी हा त्यांचा कविता संग्रह प्रसिद्ध आहे.

कोसला: पहिली कादंबरी (१९६३)[संपादन]

कोसला ही कादंबरी त्यांच्या वयाच्या २५व्या वर्षी प्रकाशित झाले. कोसला ही पांडुरंग सांगवीकर या खेड्यातून आलेल्या व पुण्यात शिकणार्‍या तरुणाची आत्मकथा आहे. ही कादंबरी सर्वसाधारण मराठी वाङ्मयप्रवाहाच्या बाहेरील कलाकृती मानली जाते.

’कोसला‘चा नायक पांडुरंग सांगवीकर या नैतिकतेच्या आधारावर बाप, गाव, सगेसोयरे यांना नाकारतो. अशा व्यक्तिमत्त्वावरील कथा असलेली ’कोसला‘ ही कादंबरी प्रस्थापित कांदबर्‍यांचे स्वरूप, विषय, भाषाशैली, संकल्पना अशा सर्वांना दूर ठेवणारी ठरली. ’कोसला‘ने मराठी कादंबरीला नवी दिशा देत ती अधिक खुली व लवचिक केली. आत्मचरित्रात्मक मांडणी हे नेमाडेंच्या कादंबरीचे वैशिष्ट्य आहे.

कोसलानंतर[संपादन]

कोसलाच्या यशानंतर नेमाडेंनी बिढार (१९६७), जरीला (१९७७) व झूल(१९७९) या "चांगदेव पाटील" या काल्पनिक नायकाच्या जीवनावरील कादंबर्‍या लिहिल्या. हिंदू नावाची कादंबरी नेमाडे लिहिली असून ती जुलै १५, इ.स. २०१० ला पॉप्युलर प्रकाशनातर्फे प्रसिद्ध झाली. कादंबर्‍यांशिवाय त्यांचे 'देखणी' आणि 'मेलडी’(१९७०) हे काव्यसंग्रहही प्रसिद्ध आहेत. या कवितासंग्रहातील कवितांची हिंदी आणि इंग्रजी भाषांतरे प्रकाशित झाली आहेत. १९६० नंतरचे मराठीतील श्रेष्ठ लेखक अशी भालचंद्र नेमाडे यांची प्रतिमा आहे.

नेमाडेंनी कादंबरी, कविता व समीक्षा ग्रंथांची निर्मिती या सर्व क्षेत्रांत साहित्यिक कामगिरी केली. रंजनवादी मूल्यांना कडाडून विरोध करतानाच परंपरेविषयी चिकित्सक असण्याकडे त्यांचा कल आहे. मराठीवरील इंग्रजी साहित्याचा प्रभाव, शैलीशास्त्रीय दृष्टीने अभ्यास ही वैशिष्ट्ये असणार्‍या नेमाडेंनी इंग्रजीतूनही साहित्यनिर्मिती केली. व "साहित्याची भाषा‘ हे त्यांचे भाषाविज्ञानविषयक तात्त्विक स्वरूपाचे पुस्तक वाचकांना वेगळी दृष्टी देते.

नेमाड्यांचा देशीवाद[संपादन]

सातत्याने देशीवादाची संकल्पना मांडणार्‍या नेमाडे यांनी त्याचा आग्रहही धरला. जागतिकीकरणाचा रेटा वाढला आणि देशीवादाला गती आली. ईशान्येत जंगले टिकून आहेत ती देशीवादाने आणि पुण्या-मुंबईचा र्‍हास झाला तो जागतिकीकरणाने, अशी त्यांची भूमिका होती. पाश्‍चात्त्यांच्या नादी लागून त्याचे अंधानुकरण करण्याऐवजी आहे त्या व्यवस्थेत सुधारणा करून त्या अधिक विकसित कशा करता येतील, यावर त्यांनी भर दिला.

सर्व क्षेत्राप्रमाणे साहित्यातही पाश्‍चात्त्य प्रवाह शिरले असताना नेमाडेंनी त्यावरच प्रहार केल्यानंतर इतर लेखक अंतर्मुख झाले आणि त्यांनी आपल्या लेखनाची कूस बदलली. नेमाडेंनी आपल्या साहित्यात बोलीभाषेला अधिकाधिक वाव दिला. कोकणी, गोंयची, हिंदीमिश्रित उर्दू आणि वैदर्भीय या बोलींमध्ये त्यांनी कविता लिहिल्या.

हिंदू : जगण्याची समृद्ध अडगळ[संपादन]

’हिंदू’ लिहिण्यापूर्वी नेमाडे यांनी तब्बल ३० वर्षे लेखन विश्रांती घेतली होती. ’हिंदू‘ प्रकाशनापूर्वीच भरघोस चर्चा घडवणारी ठरली. ’हिंदू‘वर प्रचंड टीकाही झाली आणि भरभरून स्वागतही झाले. पिढ्यांमागून आलेल्या पिढीमध्येही लोकप्रियता टिकवून असलेले नेमाडे हे त्यांच्या साहित्यातील बंडखोर वृत्ती, साक्षेपी आणि परखड लेखन, वस्तुनिष्ठतेला अग्रक्रम आणि लोकभाषेतून साहित्यरचना यामुळेच वाचकांना आपलेसे वाटतात.

पुस्तके[संपादन]

कादंबऱ्या 
कविता संग्रह
 • देखणी (कोकणीतसुद्धा अनुवादित झालेला काव्यसंग्रह, अनुवादक-रमेश वेळुसकर)
 • मेलडी (१९७०)
समीक्षा 
 • टीकास्वयंवर
 • तुकाराम
 • मुलाखती
 • साहित्य, संस्कृती आणि जागतिकीकरण
 • साहित्याची भाषा
 • सोळा भाषणे
इंग्रजी
 • इंडो - अँग्लिकन रायटिंग्ज - टू लेक्‍चर्स
 • नेटिव्हिजन
 • इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स्ड स्टडी
 • द इन्फ्ल्युएन्स ऑफ इंग्लिश ऑन मराठी - ए सोशिओलिंग्विस्टिक ॲन्ड स्टायलिस्टिक स्टडी

भालचंद्र नेमाडे यांची परखड मते[संपादन]

भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्याच्या निमित्ताने त्यांनी मातृभाषांवरील इंग्रजीचे वाढते प्रस्थ, मराठीचा अभिजात भाषेचा दर्जा, हिंदुत्व, साहित्य संमेलन अशा अनेक विषयांवर आपले परखड विचार मांडले.

 • मराठीला तेराव्या शतकात अडकून ठेवले आहे. हे बदलले पाहिजे. गोंड, कोरकू, भिल्ल, कातकरी हे मराठीच आहेत. त्यांची भाषा ही शुद्धच आहे.
 • इंग्रजी भाषा हटवणे हे ज्ञानपीठाहून मोठे आहे. इंग्रजी चांगली आहे, ती आली पाहिजे मात्र, इंग्रजी माध्यमामुळे ती बदलते. मराठी माध्यमातले लोक जास्त चांगले इंग्रजी बोलतात, जास्त चांगले इंग्रजी लिहितात. महात्मा गांधी, टागोर, जगदीशचंद्र बोस हे मातृभाषेतूनच शिकले व मोठे झाले. महाराष्ट्रातल्या महाविद्यालयांतले जे इंग्रजीचे प्राध्यापक आहेत ते सगळे मराठी माध्यमातले आहेत. भाषा ही नुसती शाळेत शिकली की झाले असे होत नाही, तर ती माणसाच्या मेंदूत, समाजात असावी लागते.
 • इंग्रजी माध्यमातला माणूस इंग्रजीचाही प्राध्यापक होऊ शकत नाही. मुंबई विद्यापीठात पोस्ट ग्रॅज्युएशनला सगळे खेड्यातून आलेले आहेत. इंग्रजीत ५००-६०० वर्षात एकही महाकाव्य झालेले नाही.
 • हिंदुत्व हा जगप्रसिद्ध असा शब्द, सर्वसमावेशक अशी संस्कृती आहे; परंतु धर्म करून संकुचित अर्थ करणे हे हिंदुत्वाला खूप मारक आहे. ही हिंदू संस्कृती आहे, तिचा धर्माशी संबंध नाही. हे खूळ इंग्रजांनी आणले.
 • साहित्य संमेलनाला चांगला लेखक चुकून जातो. संमेलनात जे साहित्यिक असतात ते चांगले साहित्यिक असतात का यावर प्रश्‍नचिन्ह आहे. कधी कधी चुकून एखाद्या कार्यक्रमाला जातो तसा चुकून चांगला लेखक साहित्य संमेलनाला जातो.

नेमाडे यांच्‍या विषयी आणि त्यांच्या साहित्याविषयीचे लेख[संपादन]

 • एका असंबद्ध लिखाणाचा पंचनामा
 • खंडेराव, अडगळ आवरत जा, राव!
 • नेमाड्यांचा लेखकराव होतो तेव्‍हा
 • मेलडी - भालचंद्र नेमाडे
 • रसग्रहण स्‍पर्धाः ‘हिंदू’ – भालचंद्र नेमाडे
 • भालचंद्र नेमाडे: साहित्याचे समृद्ध जाळे...
 • ‘कोसला’कार ते ‘हिंदू’कार
 • भालचंद्र नेमाडे यांची मुलाखत
 • किशोर सानप : भालचंद्र नेमाडे यांची कादंबरी
 • किशोर सानप : भालचंद्र नेमाडे यांची समीक्षा
 • देवानंद सोनटक्के : समीक्षेचा अंतःस्वर, पद्मगंधा प्रकाशन पुणे.

चित्रपट[संपादन]

दिग्दर्शक अक्षय इंडीकर यांनी नेमाडेंच्या जीवन व साहित्यावर आधारित "उदाहरणार्थ नेमाडे". हा मराठीतला पहिलावहिला डॉक्युफिक्शन चित्रपट काढला आहे. (डॉक्युफिक्शन म्हणजे विचाराल तर डॉक्युमेंट्री म्हणजेच माहितीपट आणि कल्पना यांना एकत्र साधून केलेलं सिनेचित्रण.) चित्रपट दीड तासाचा असून तो २७ मे २०१६ रोजी प्रदर्शित झाला.

भालचंद्र नेमाडे यांना मिळालेले पुरस्कार[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]