इंदिरा गोस्वामी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
इंदिरा गोस्वामी
Mamoni Raisom Goswami (cropped).JPG
इंदिरा गोस्वामी
जन्म नाव मामुनी रायसोम गोस्वामी
जन्म १४ नोव्हेंबर, इ.स. १९४२
गुवाहाटी, ब्रिटिश भारत
मृत्यू २९ नोव्हेंबर, इ.स. २०११
गुवाहाटी, आसाम, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
भाषा आसामी
साहित्य प्रकार कथा, कादंबरी
कार्यकाळ १९६२-२०११
विषय स्त्रियांचे शोषण
प्रसिद्ध साहित्यकृती उने खोवा हावरा
वडील उमाकांत गोस्वामी
आई अंबिकादेवी
पती माधवन रायसोम अय्यंगार
पुरस्कार ज्ञानपीठ पुरस्कार(२०००), साहित्य अकादमी पुरस्कार (१९८३),

इंदिरा गोस्वामी (रोमन लिपी: Indira Goswami, आसामी মামণি ৰয়ছম গোস্বামী ) (१४ नोव्हेंबर, इ.स. १९४२; गुवाहाटी, ब्रिटिश भारत - २९ नोव्हेंबर, इ.स. २०११; गुवाहाटी, आसाम, भारत) ह्या आसामी लेखिका, कवयित्री व संपादिका होत्या. आसामी साहित्यातील त्यांचे योगदान साहित्य अकादमी पुरस्कार (इ.स. १९८३) व ज्ञानपीठ पुरस्कार (इ.स. २०००) देऊन गौरवण्यात आले. साहित्य वर्तळात या मामुनी रायसोम गोस्वामी या नावाने ओळखल्या जात. 'युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम' (उल्फा) आणि केंद्र सरकारदरम्यान शांतता-करार करण्यासाठी त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.[१]

जीवन[संपादन]

इंदिरा गोस्वामी यांच्या पित्याचे नाव उमाकांत गोस्वामी आणि मातेचे अंबिकादेवी गोस्वामी. गोहत्तीतल्याच टी.सी. गर्ल्स हायस्कूलमधून त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केले. इ.स. १९६२ मध्ये त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाले. इ.स. १९६५ मध्ये दाक्षिणात्य अभियंता माधवन रायसोम अय्यंगार याच्याशी त्यांनी विवाह केला. लग्नाच्या अठरा महिन्यांत त्याच्या पतीचे कार अपघातात निधन झाले. इ.स. १९६८ ते १९७१ मध्ये आसामातील गोलपारा सैनिकी शाळेत शिक्षिका म्हणून काम केले. १९७१ मध्ये दिल्ली विश्वविद्यालयाच्या आधुनिक भारतीय भाषा विभागात त्यांनी अध्यापनाचे काम चालू केले. तुलसीदासविरचित रामायण आणि आसामी भाषेतील माधव कंदली यांचे रामायण यांचा तौलनिक अभ्यास करून इ.स. १९७३ साली त्यांनी गोहत्ती विद्यापीठाची डॉक्टरेट मिळवली.

लेखनाचा वारसा[संपादन]

लेखनाचा वारसा इंदिरा गोस्वामी यांना आपल्या आजोबांकडून मिळाला होता. त्यांच्या आजोबांनी नरकासुरवध नावाचे पुस्तक लिहिले होते, त्यावर त्याकाळी ब्रिटिश अधिकाऱ्यांनी बंदी आणली होती. [ संदर्भ हवा ] कारण या पुस्तकात त्यांनी ब्रिटिश अधिकाऱ्यांना अप्रत्यक्षपणे असुर म्हणून उल्लेखिले होते.

लेखन[संपादन]

इंदिरा गोस्वामी यांचा चिनाकी मरम हा पहिला कथासंग्रह इ.स. १९६२ साली प्रकाशित झाला. त्यानंतरचे कइना (१९६६), हृदय एक नदीर नाम (१९९०), निर्वाचित गल्प हे कथासंग्रहही प्रसिद्ध आहेत.

चिनाबार स्रोत ही इंदिरा गोस्वामी यांची पहिली कादंबरी इ.स. १९७२ मध्ये प्रसिद्ध झाली. इ.स. १९७६ साली प्रसिद्ध झालेल्या नीलकंठी व्रज या कादंबरीत त्यांनी वृंदावनमधील अभागी विधवा स्त्रियांच्या शोषणाची कहाणी सांगितलेली आहे. इ.स. १९८० मध्ये मामारा धारा तारोवाल (गंजलेली तलवार) ही कादंबरी प्रकाशित झाली. याच कादंबरीला १९८३ मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. त्यांची मध्यप्रदेशातील अहिरान नदीवरील बांधकामावर काम करणाऱ्या मजुरांच्या दयनीय स्थितीवर प्रकाश टाकणारी अहिरान ही कादंबरी १९८८ मध्ये प्रकाशित झाली. ईश्वरी जख्मी जात्री इत्यादी, उने खोवा हावरा (मत्त हत्तीचा वाळवी लागलेला हौदा) या इंदिरा गोस्वामी यांच्या विशेष गाजलेल्या कादंबऱ्या आहेत. आधालेखा दस्तवेज (अर्धीमुर्धी कहाणी) हे आत्मचरित्र त्यांनी लिहिलेले आहे.

पुरस्कार[संपादन]

  • साहित्य अकादमी पुरस्कार (१९८३) मामारा धारा तारोवाल (गंजलेली तलवार) या कादंबरीला.
  • आसाम साहित्यसभा पुरस्कार (१९८८) उने खोवा हावरा (मत्त हत्तीचा वाळवी लागलेला हौदा) या कादंबरीला.
  • भारत निर्माण पुरस्कार दिल्ली (१९८९).
  • सौहार्दीय पुरस्कार लखनौ (१९९२).
  • कथा पुरस्कार दिल्ली (१९९३).
  • कमलकुमारी प्रतिष्ठान पुरस्कार गुवाहाटी (१९९६).
  • आंतरराष्ट्रीय ज्युरी पुरस्कार (१९९७) कादंबरीवर आधारीत चित्रपटासाठी.
  • तुलसी पुरस्कार (१९९९)
  • ज्ञानपीठ पुरस्कार (२०००)

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "ज्ञानपीठ विजेत्या इंदिरा गोस्वामी यांचे निधन". २३ ऑगस्ट, इ.स. २०१३ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)[permanent dead link]